September 27, 2011

हर हर गंगे.. १

स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली.

रस्त्यावरुन एका जुन्या रथातून बसून कोणी साधूबाबा, कोण्यातरी बिनमहत्वाच्या पिठाचे स्वामी मिरवणूकीने चालले होते. बिनमहत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे गाठीशी पैसा नसलेले असावे. गर्दी नव्हती त्यावरुन अंदाज. समोर आणि मागे मिळून चार शिष्य. सगळ्यांनी भगवी, लाल धोतरे नेसलेली. गंधाचे, भस्माचे पट्टे. शेंड्या. समोर एक सनईवाला, एक ताशेवाला. इतकेच लोक. हसूही आले आणि अचंबामिश्रित कौतुकही वाटले. बरोबर गर्दी नव्हती, मग कसं काय मी असं बसू रथात? लोक हसतील का? वगैरे स्वामीजींना काही वाटले नव्हते बहुतेक. शिष्यही चामरे ढाळत होते, त्याच भक्तीभावाने. निदान कर्तव्यभावनेने. प्रत्येकजण आपले कर्तव्य, धर्म पाळत होते का? हीच का निष्ठा असते? अशीच? हे उगाच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणार्‍यांपैकी होते की खरेच भगवंतापाशी, वा जिथे कुठे स्वतःच्या श्रद्धा वाहिलेल्या होत्या, तिथे मनापासून विश्वास टाकून आपले कर्तव्य पार पाडणारे सत्शील जीव होते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले... माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे..

मला मात्र ह्यापैकी काहीच जमले नसते, जमणारही नाही बहुधा.. कितीतरी वेळा, कितीतरी कारणांनी लाज वाटली असती, ऑकवर्ड झाले असते. अशी निष्ठा अंगी बाणवू शकेन तो सुदिन. कधीतरी जमावे, ही इच्छा. आता इथून गंगामाई आणि तिचे हरिद्वार, पुढे हृषिकेश, कधीतरी भेटणार आहे तो हिमालय, एकूणातच एकामागून एक धडे द्यायला सुरुवात करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी बांधायला सुरुवात केली. घेता, किती घेशील दो करांनी.. सनईचे सूर फार फार मोहवून गेले. शांत, गंभीर असे सूर. कधीतरी मरहूम उस्ताद बिस्मिल्लां खाँ, त्यांची सनई आणि त्यांची अलाहाबादची गंगामैय्या ह्यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती, त्याची फार फार आठवण झाली. उगाच भरुन यायला लागले. आत्ताशी अजून दर्शन होणार आहे, तर ही गत? एवढ्यातच दिल गिरा वहींपे दफ्फतन होऊन कसे चालेल?

अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा.

नेहमीच्या गार वार्‍यात आणि पाण्यावरुन वाहत येणार्‍या गार वार्‍यात एक फरक असतो नेहमी, म्हणजे असं आपलं माझं मत. ठाम वगैरे कॅटेगरीतलं.नेहमीचा गार वारा जरासा कोरडासा. म्हणजे तुमचा जीव सुखावून देईल, पण एका अलिप्तपणे. तुमच्याभोवती रेंगाळणार नाही, तुमच्यात स्वतःला गुंतवून घेणार नाही. तुमच्या अंगावरुन म्हणता म्हणता पुढे निघून जाईल. एखाद्या बैराग्यासारखा. अडकणार नाही, आठवणी ठेवणार नाही. त्याउलट पाण्यावरुन वाहत येणारा वारा. त्याची जातकुळीच वेगळी आहे लोकहो. हा केवळ सुखावणारा वारा नसतो, हा शांतवणारा वारा. तुमच्याभोवती मायेने रेंगाळणारा, एखाद्या खर्‍याखुर्‍या दोस्ताप्रमाणे हलके हलके तुमच्या मनात शिरणारा. तुमच्याही नकळत तुमच्या मनातली खळबळ म्हणा, चिंता म्हणा, तत्समच जे काही असते, ते सारे, सारे दूर करणारा. जिवाला विसावा देणारा वारा. कोरडेपणाचा मागमूस नसलेला. असा वारा अनुभवल्याबरोब्बर पाणी कुठे आहे, हे नजरेने शोधायला सुरुवात केली. एक फार मोठाही नाही पण अगदीच नगण्यही नाही, असा कालवा सामोरा आला. मनात आले, ही गंगा? अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? नक्कीच नाही. ती तर जगन्नाथ पंडितांची गंगामाई आहे. त्यांनी भोगलेल्या सार्‍या तापत्रयातून त्यांना सोडवणारी. आपल्या अमर्याद मायेची फुंकर त्यांच्या श्रांत, क्लांत मनावर हळूवारपणे घालणारी.. भोळ्या सांबाने पार्वतीचा प्रसंगी कोप सहन करत मस्तकी धारण केलेली गंगा. कोण्या भगिरथाच्या पूर्वजांना उद्धरणारी गंगा. आजही जनमानसाच्या श्रद्धेचे स्थान असलेली गंगामैय्या. ह्या सर्वात मला व्यक्तिश: सगळ्यात भावलेली आहे ती तिची स्वतःच्या सामर्थ्याची असणारी पूर्ण जाण. ती लेचीपेची नाही. तिला स्वतःचे अस्तित्व आहे, त्याची बूज राखणारी. इतरांनीही ती राखावी ह्यासाठी ती सजगही आहे. तिच्यापाशी जे आहे त्यात जराही हिणकस नाही, तर तिने इतरांकडून तरी हिणकस का स्वीकारावे? पुराणे लाख म्हणतात की तिचा गर्व शंकराने हरण केला वगैरे, पण तसे नसावे ते. त्याने तिला जाणले आणि तिचे योग्य स्थान दिले असावे, यथोचित सन्मान केला असावा. तीही तिच्या शब्दाला जागून युगानुयुगे अव्याहत वाहते आहे... पण अजून दर्शन दिले नाही माईने.

मला वाटते, कोणीतरी अत्यंत अविश्वासाच्या आणि धक्का बसल्याच्या सुरात म्हणाले पण! ही गंगा? की माझ्याच डोक्यात माझ्याच मनातले शब्द ऐकू आले होते? कोणास ठाऊक. पण ही गंगा नाहीये, असेही कळाले. हुश्श.. गंगेला बघायला डोळे अणि मन आसुसल्यासारखे झाले होते. कधी दिसेल माई? आत्ता? आत्ता? की अजून थोडे पुढे गेल्यावर? डोळे भरुन बघता येईल का? किती वाचले आहे आणि किती ऐकले होते आजवर तिच्याबद्दल! खूप अपेक्षा, दडपण, आशा वगैरे अशांसारख्या आणि नेमक्या कसल्या ते अजूनही न उमगलेल्या भावना मनात बाळगून मी गंगेची वाट पहात होते आणि एक पूल लागला भला मोठा. गंगेवरचा पूल. मिट्ट काळोखाचा रंग मैय्याने पांघरुन घेतला होता. काहीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होता, संथसा. चुबळुक, चुबळूक.. किंवा पलक्, पलक् असा. की लपक्, लपक्? पलक् की लपक् हेच ठरवता येईना. राम की मरा - तसा गोंधळ. शेवटी लक्षात आले की पलक् असो की लपक्, फरक नै पेंदा. पलक लपकतेही सबके मनमें घर बसा लेती हैं माई. उसके बाद भूलना नामुमकीन. आयुष्यभरासाठीची ओढ. तीच मैया, तीच सखी, तिचाच आधार.

अंधारामध्ये नदीला घाट बांधला आहे, हे जाणवले, दगडी सुबकसा, विस्तीर्ण घाट. मनात आले, तिथेच पथारी पसरावी. माईच्या सोबतीने तिथेच शांतपणे झोपून जावे. कोणाची भीती? माई काळजी घेईल. नक्कीच.


क्रमश:

September 20, 2011

प्रवासाच्या सुरस कथा- २

दिल्लीवाल्या कलीगने सांगितलेलं की ठेशनावर उतरुन बावळटासारखी इथे तिथे बघू नकोस. चेहर्‍यावर एक माज, बेदरकारपणा आणून वावर. जमेल का? थोडी इथेच प्रॅक्टीस कर, वगैरे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की इतरांकडे तुच्छ कटाक्ष टाकत वावरायचं. काय कॉन्फिडन्स! कलीगचा हो, माझ्याविषयी! म्हंजे मला झेपणार नाही, हा. अधिक स्पष्ट बोलायचे तर, मी बावळट(च) वाटेन, हा. पण इतकी काय मी अगदीच हे नाहीय्ये हां. त्याला काय बोलायला! अल्पनानेही प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षा करायचा सल्ला दिला होताच. कलीगनेही. तर ह्या सर्वांचा सल्ला शिरोधार्य मानून सरळ बाहेर पडले तुच्छ कटाक्ष वगैरे टाकत, तिथलीच असल्यासारखी, स्वातीला सोबत घेऊन. तरी आमचा नवखेपणा रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना कसा काय उमजला त्यांनाच ठाऊक, आणि प्रत्येक गावा, शहरात असं कसं घडतं, हेही मला आजतागायत समजलेलं नाही, म्हणजे माझ्याच असं नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत. अशा बर्‍याच कथा कहाण्या ऐकल्या आहेत. तुच्छ कटाक्ष पुरेश्या तुच्छपणे टाकायचे राहिले असावेत.

मधमाशांचा थवा यावा तसे सगळे आपले भेनजी, किदर जाना हय वगैरे करत आले. स्वाती सगळ्यांना काय काय उत्तरं देत होती. मी थक्क! अगं चल, म्हणत तिलाही प्रीपेड बूथवर घेऊन आले. तिथेही टॅक्सी आणि रि़क्षावाल्यांचा इतका माज, वैताग होता, खरंच. इतक्या मोठ्या थव्याने सभोवताली गर्दी केली की मला बूथपरेंतही जाता येईना! आत काउंटरवर बसलेला माणूस बाहेर येऊन सक्काळी सक्काळी सगळ्यांना खास दिल्लीवाल्या शिव्या घालून पुन्हा आत बसायला गेला. दोन गोष्टी घडल्या, एक, ह्या लोकांना काहीही फरक पडला नाही. दोन, माझी शब्दसंपदा वाढलेली आहे. आता मात्र जरा डोक्यावरुन पाणी चाललं होतं, मग मात्र व्यवस्थित झापलंच जरासं आणि लगेच काम झालं. निदान बूथपाशी जाऊन रिक्षा बुक करता आली, रस्ता दिला सगळ्यांनी. मर्‍हाठी पाणी हो शेवटी. असो, असो.

रिक्षा घेऊन अल्पनाकडे निघालो. तिला आणि तिच्या कुटुंबियांना प्रथमच भेटणार होतो. उत्सुकता होती.

दिल्लीचा दर्शनी भाग, जिथे राजकीय कार्यालयं आहेत, तो देखणा आहे, ह्याची जाणीव झाली. मोठे, सरळ, सुरेख रस्ते, बिनखड्ड्याचे रस्ते. झाडी. चालणारे ट्रॅफिक सिग्नल्स, सहसा ते पाळणारे लोक. क्वचित एखादा गाडीचालक बेदरकारपणे नियम धुडकावून जात होता. जाता जाता रिक्षा एका वळणावर आली आणि समोर एकदम अमर ज्योतीचं दर्शन झालं.

रिक्षातच होतो, आणि रिक्षा बघता बघता पुढेही गेली खरी, पण त्या एका क्षणामध्ये ती ज्योती, ती बंदूक आणि हेल्मेट पाहून जे काय वाटलं ते शब्दातीत आहे! बघता बघता डोळ्यांत पाणी आणि घशात हुंदका कधी दाटला हे समजलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षा थांबव सांगून मी ज्योतीचं दर्शन घ्यायला अणि फोटो काढायला जाणार होते, पण शब्दच फुटेना तोंडातून. हे सगळं घडलं काही दोन पाच क्षणातच, रिक्षा खूप लांब गेली, पण सकाळच्या धुक्यातली तेजाळ अमर ज्योती कधी विसरेन असं वाटत नाही. आपल्याच शहीद सैनिकांची आठवण देणारी ती ज्योती आहे, खरं तर मशाल आहे, सतत धगधगणारी. कोण कुठले सामान्य लोक, जिगर बाळगतात, कठीणातलं कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात शिरतात, अख्ख्या देशाची सरहद सांभाळतात. प्रसंगी जीवाचं मोल देतात. आपल्या घरच्यांपासून महिनोंमहिने दूर राहतात, सगळ्या काळज्या, चिंता, त्यापायी होणारा त्रास, आठवणी, कदाचित कधी पूर्ण न होणारी स्वप्न, साध्या साध्या इच्छा, बहुधा घरच्यांना वेळ देता येत नाही ह्याबद्द्लची खंत, हे असं सगळं आणि अजूनही बरचंस काही मनातल्या मनात कुठेतरी लपवून जराही कुचराई न करता आणि पुन्हा कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो ही शक्यता माहीत असतानाही, जीवावर उदार होऊन आपलं काम चोख करायचं ही मला तरी साधीसुधी गोष्ट वाटत नाही, मग भले कोणी सेंटीमेंटल वगैरे म्हणालात तर म्हणा. मेरी बलासे. त्यांच्या जीवावर मी स्वतंत्र भारतात जगते. ज्या गोळीवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं ती येऊन शरीरात आदळली की शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय येत असेल? येत असेल? की काही समजण्याच्या पलिकडे क्षणार्धात पोचता येत असेल? ज्या कोणाची कारकीर्द गोळी न खाता संपत असेल, त्यांच्या मनामध्ये कधीतरी गोळी खावी लागेल, हे दडपण कुठेतरी आयुष्यभरासाठी दबा धरुन बसून रहात असेल का? त्याचा एकूणच जगण्यावर कसा आणि कितपत परिणाम होत असेल? हे दडपण संपल्यावर काय वाटत असेल? रितेपणा? सुटल्याची भावना?

ही नोकरी आणि त्यापायी येणार्‍या जबाबदार्‍या, ताणही त्याबरोबर येणारच, त्यात इतकं काय इतकं, वगैरे बुद्धीवादी युक्तीवादही मी ऐकले वाचले आहेत. असं बोलणार्‍यांची, विचार करणार्‍यांची मला आता कीव येते. आधी खूप राग यायचा. नोकरी आहे वगैरे सगळं ठीके हो, पण तरीही मला कौतुक आहे आणि आदरही आहे. काही बाबतींत मी कमालीची सेंटीमेंटल आणि इमोसनल वगैरे वगैरे जे काय असतं ते सगळं आहे. असूद्यात. आपल्याकडे - म्हंजे माझ्याचकडे त्येवडंच हाये.ज्याचा त्याचा नजरिया. असो. पुढे चाललो होतो...

दिल्लीचा हा बाहेरचा दर्शनी भाग जसा बाजूला पडला तसं दिल्ली शहर एकदम दिल्ली गाँव वाटायला लागलं. ए़कदम गाँवकी मिट्टीकी याद, सौंधी सौंधी खुशबू वगैरे. एकदम घरेलू दिसायला लागली दिल्ली. बघता, बघता अल्पनाचं घर आलं, अल्पना बाहेरच उभी होती आमच्यासाठी. तिच्या कुटुंबियांनीही फार अगत्याने आगत स्वागत केलं. आम्ही तिच्या घरात घुसून हक्काने सॅक्स तिथेच बैठकीच्या खोलीतच आपटल्या. पसारा झालाच, पण परक्या ठिकाणी नव्हतोच. पुढच्या प्रवासात आंघोळीच्या पाण्याची चैन वगैरे परवडणारी नव्हती, तेह्वा अल्पनाकडे अगदी चैन करुन घेतली! अल्पनाच्या सौजन्याने प्राठे वगैरे खाल्ले. खूप अगत्याने आणि निगुतीने तिने आमची खतिरदारी केली. खूप खूप कौतुक वाटलं. आयामचा थोडक्या वेळात खूप लळा लागला. तितक्यात रैनाही येऊन पोचली होती आणि रिक्षावाल्याने तिला व्यवस्थित गंडवलेलं होतं. जाऊंद्यात झालं, असा विचार केला. कुठे कुठे डोक्याला त्रास द्यायचा हो? चलताय. दुपारी एक वाजता ट्रेकवाला ग्रूप ठेशनजवळच्या हाटेलात पोचणार होता. गप्पा मारता मारता आणि प्राठे खाता खाता तिथे पोहोचायची वेळ झाली आणि आमची सवारी पुन्हा एकदा दिल्ली ठेशनाजवळच्या हाटेलात जाण्यासाठी निघाली. तिथे सगळे जमणार होतो आणि पुढचा प्रवास एकत्र करणार होतो.

तिथे पोहोचून मग रीतसर ग्रूपशी ओळख वगैरे सोपस्कार पार पडले. सगळ्यांनी ओळख करुन दिली खरी, पण त्यावेळी मला बरीच नावं लक्षातच राहिली नाहीत. तुमचं होतं का असं कधी? कळतील पुन्हा हळूहळू, म्हणून मी गप्प बसले, पण मंडळी ट्रेक्स केलेली, अनुभवी दिसत होती, आणि त्याचं मात्र दडपण आलं होतं. भय इथले संपत नाही.. सामान उचललं आणि हरिद्वारला जायच्या ट्रेनीचा पत्ता काढत योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचून गाडी आल्यावर आपापल्या जागा पकडून जरा स्थिरावलो. एकूणातच ग्रूपशी जमेल असं वाटायला लागलं, कारण गप्पा आणि टवाळक्या सुरु झाल्याच. दिल खुस हुवी गया! आगाज ये है, तो अंजाम होगा हॅंसी..

हरिद्वारला जायच्या ट्रेनमध्ये बसलो होतो. त्याआधी ठेसनावरुन दरभंगा गेलेली पाहिली. इतकी ठासलेली माणसं. प्रत्येक डब्यामध्ये अजून एक तरी माणूस अजून चढला तर रेल्वेचा डबा फुटेल अशी परिस्थिती. कठीण आहे! गाडी सुटली आणि हळूहळू शहरी भाग मागे टाकून शेती दिसायला सुरुवात झाली. लालसर काळी माती. लांबच लांब, आडवी उभी शेती पसरलेली. पाणथळीच्या जागा. वेगळे वेगळे पक्षी दिसत होते. आणि कसे स्वैर उडत होते, सूर मारत होते... खुशहाल जिंदगी. हेवा, हेवा. माणसाच्या जगातल्या कोणत्याच चिंता नाहीत. सुखी जीव. साहेबांना सगळ्यांची नावे ठाऊक. तेच ते अचंबा प्रकरण पुन्हा एकदा वाटून गेले. आता सगळ्यांच्या गप्पा सुरु. सोबतीला चहा, खाणे वगैरे. मिल बैठे थे सब यार. मध्येच मला उगाच झापड आली. मग, मला गप्पा ऐकायच्यात पण डोळे मिटताहेत, तेह्वा डोळे मिटून ऐकते, सांगून डुलकी वगैरे काढली असावी, कारण मधले फारसे काही आठवत नाहीये. खायच्या वेळी बरोब्बर जाग येत होती मात्र!

हरिद्वारला जायच्या ट्रेनीत बसले होते, तेह्वा एका मैत्रिणीचा फोन आला. स्मिताचा. आम्ही दोघी एकाच शहारात राहून, भेटणं बर्‍याचदा दुरापास्त. तीच ती शहरी घिसीपिटी कारणं. खरीखुरी असली तरी तितकीच वैतागवाणी. आलिया भोगासी टायपाची. तर, तिने फोन केला आणि नेहमीप्रमाणे कुठे आहेस, हा प्रश्न टाकल्यावर हरिद्वारला चाललेय, असं उत्तर ऐकून ती तीही खरोखरची उडाल्याचं मला इथे ट्रेनीत समजलं. मज्जेत हसलोच मग दोघी. मग तिला सगळं सांगितलं ह्या ट्रेकविषयी. गप्पा मारल्या. मी हा ट्रेक करतेय हे ऐकून तिलाच ग्रेट वाटलं होतं, आणि तिचा हा आपलेपणा पाहून, मला.

गाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. गंम्मत वाटली, कारण नाही, उगाच आपली वाटली. आवडलं. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली? तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे. ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं. जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे.

ठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..

क्रमश:

September 14, 2011

प्रवासाच्या सुरस कथा! -१
तर, असच गप्पा करत, रेल्वेच्या कृपेने खाऊ पिऊ करत, वाचत, गप्पा मारत प्रवास चालला होता - दुरांतोमध्ये उत्तम खाणं मिळतं - आणि अवचित बाहेर लक्ष गेलं. मळवली आली होती. काय देखणी दिसत होती! सगळीकडे भरुन राहिलेला ओला हिरवाकंच रंग आणि निळेसावळे, खाली उतरलेले ढग पाहता पाहता, हलके हलके मन शांत होत गेलं. जिथे पाहत होते, तिथे हिरव्या निळ्या रंगाची छटा. पावसाळी सर्द ओलसर हवा.. सावळे ढग तर इतके खाली आलेले की, पटकन उडी मारुन त्यांना हात लावावा आणि त्या धक्क्याने त्यांच्यातून पावसाचे थेंब ओघळतील की काय अशी परिस्थिती. हे कमी की काय म्हणून, उथळ पाणथळी आणि त्यात डोलणारी कमळं (वॉटर लिली), शेतांमधून चाललेली पावसाळी कामं.. माहौल बनत चालला होता.. गुंगत चाललेच होते, इतक्यात एका लयीत चाललेल्या मैफिलीमध्ये करकचून रसभंग व्हावा आणि मैफिल अवचित थांबावी असं झालं! समोरच्या सुंदर दृष्याला दृष्ट लागावी, तसं एक होर्डींग बेंगरुळपणे समोर आलं आणि मग अशी होर्डींगज येतच राहिली अधेमधे. कधीतरी कंटाळून आतमध्ये नजर वळवली. पुन्हा गप्पा, वाचन आणि असंच पडून राहिले मग.

स्वातीने तितक्यात ट्रेक लीडरला फोन केला होता. साहेब आमच्याच ट्रेनीत होते म्हणे, अजून कुठेतरी दुसरीकडे बसले होते. हिला अशी सगळी माहिती असायची. मलाच काही माहीत नसायचं. एकीला दोघी होतो ते बरंच होतं. पुढल्या कोणत्यातरी स्टेशनला गाडी थांबली की दर्शन देणार होते, मनात म्हटलं, याच. अभ्भी आपको मालूम नै की कैसे कैसे मेंबर हय इस ट्रेकमें, आव तो खरं, फिर मालूमच हो जायेगा! - अर्थात हे स्वतःविषयी, म्हंजे माझं स्वगत वगैरे. काळजीच वाटली खरं तर, की आपण नापास होऊ वगैरे. इथे कोणी कधी ट्रेक केलेत? पर्वतीही नाही चढलेय, अजूनही. चतु:शृंगी चढले आहे फक्त. ही माझी ट्रेकबद्द्लची जाण! पाप त्या बिचार्‍या ट्रेक लीडरचं, खरंच. रैनाचे मधे मधे एक दोन वेळा फोन आले, मला वाटतं. आता आठवत नाही नक्की, पण एकदा तरी आलाच. उधरमेंभी सब ठीक चल रहा था.

प्रवासात कधीतरी पुन्हा एकदा बाहेर नजर गेली, आणि काय सांगू! दिल थम गया! वैतरणा चमकत होती. इथून तिथपरेंत! सोनेरी, सावळी, मातकट, मधून मधून चंदेरी. अफाट जलाशय. नजर जाईल तिथे पाणी, पाणी आणि पाणी. आणि एकाच पाण्याला इतक्या छटा? इतक्या देखण्या? जिवंत? काठाकाठाला होडकी होती. जुन्या लहान मोठ्या होड्या. निळ्या, लाल रंगाच्या, त्यांची वल्ही. त्यांचा लाकडी पोत. गाडी थांबली असती आणि दाराकडे जागा असती तर एक फोटो काढणे हा धर्म होता, पण फोटो फोटोपर लिखा हय.. ना गाडी थांबली, ना दरवाज्याकडे जागा होती आणि ना फोटो काढता आला, पण मनामध्ये ठशासारखे ते दृष्य जमून राहिले आहे. कधीतरी तिथवर केवळ फोटोंसाठी जावे, मध्येच कुठेतरी उतरुन फोटो काढावे, असे ठरवले तरी आहे. कुठे तेहतीस कोटींच्या गर्दीत एखादा फोटोदेव किंवा देवी असेल आणि त्यांची कृपा झाली तर, जमेलही, कोणी सांगावे?

गुजराथमध्ये शिरलो होतो. कोणत्यातरी स्टेशनला गाडी थांबून स्वाती आणि साहेब भेटले आणि मग स्वातीबरोबर आमच्या डब्यात आले. मला उगीच धडकी भरली होती की आता काय काय प्रश्न विचारुन हैराण वगैरे करतात काय, अशी. उगीच दडपण वगैरे फुकट, पण चक्क नाही, मस्त गप्पा झाल्या. गप्पांचे विषय अनुक्रमे, आधीचा गेल्याच २ एक दिवसांपूर्वी संपलेला साहेबांचा ट्रेक - आणि लगेच दुसर्‍या ट्रेकवर? मनात प्रश्न घणघणला, मनातल्या मनात आ वासला, नमस्कार घालायच्या तयारीत होतेच - तितक्यात हेही समजले की फुलपाखरं आणि त्यांचा अभ्यास - साहेब करतात -, कुत्रे आणि एकूणातच प्राण्यांचे प्रेम,पर्यावरणाबद्दल जागरुकता - गंगेचं पाणी प्यायचं, कशाला हवं प्लॅस्टीक, असं म्हटलेलं ऐकलं आणि माझिया जातीचे मज... असे वाटून समाधान झाले. ट्रेकची चिंता राहिली नाही. फोटोग्राफी, पक्ष्यांचा अभ्यास, पुस्तकं, हिमालय, ट्रेक जमेल का, अद्ध्यात्म, देवाबाप्पा खरंच आहेत का, साहेब वाद्यं वाजवतात, खास करुन बासरी - आता आहे का! खलासच.. काय बोलावे बासरीबद्दल? सर्व वाद्यांमध्ये मला सर्वात जास्त प्रिय असणारे हे वाद्य. मनाचा एक फार हळवा कोपरा आहे तो. बासरी, तिचे सूर आणि बासरी वाजवू शकणार्‍या व्यक्ती.. जाऊद्यात- आणि असे अनेक विषय. स्वाती आणि साहेब आणि मी ह्यात मी बहुधा अधिक ऐकायचेच काम केले. सार्‍या गप्पा ऐकताना, मग आता राहिलं तरी काय असं वाटून घातलाच, घातलाच नमस्कार. मनातच. खरं सांगू तर कौतुक वाटले, अचंबाही. स्वत:विषयी पुन्हा एकदा वाटलेली इथपासून तिथपरेंत लाज आणि वैषम्य. असं भन्नाट काहीही येत नाही मला. असो. काय काय करतात लोक आणि किती सहजरीत्या. गुणी लोक असतात, खरंच. नायतर आम्ही. जौद्यात.

गप्पा टप्पा करता करता बाहेर हळूहळू अंधार पसरत गेला आणि रात्रीचं आलेलं जेवण आटोपून साहेब स्वस्थानी गेले. जाताना नक्कीच थक्क झाले असावेत. तोवर अज्ञानाची परमावधी म्हणजे काय हे त्यांना लक्षात आलेलं असणार. प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायामध्ये काही च्यायलेंज नको का? तो हम थे वो च्यायलेंज, बीकॉज ऑफ माय अज्ञान, दॅट वॉज जस्ट देअर! घ्या म्हणावं. मज्जाच होती न् काय!

डोळ्यावर कधी झापड आली, समजलंच नाही. PS वाचायचा प्लॅन होता, तो बारगळलेलाच राहिला.

आणि सक्काळी जाग आली! गुऽऽड मॉर्निग दिल्लीऽऽऽ म्हणत उठलो आणि दुरांतोचा नाश्ता वगैरे संपवून दिल्लीमध्ये उतरून तिथल्या माजखोर - तेह्वाची ऐकीव माहिती, थॅंक्स टू घाबरवणारे कलीग्ज हो, अ़जून काय! -रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांशी पंगा घ्यायला तय्यार झालो. बाहेर पडायचीच खोटी होती...

क्रमश:

September 6, 2011

हिमालयाला पाहण्यासाठी..
आणि, उजाडली, उजाडली! ५ तारीख उजाडली.

सकाळी उठून तयारी वगैरे आटोपली. प्रवासाबद्दल बरीचशी उत्सुकता, थोडंफार दडपण, जराशी भीती, कुतूहल.. कितीतरी वेगवेगळ्या भावना मनामध्ये उमटत होत्या. ते कॅलिडोस्कोपसारखं. एकामागून एक काय, काय विचार. धावताहेत नुसते. दम खा रे मना, म्हणेतोवर, मधेच डोक्यात काय आलं, आणि घरातल्या माझ्या लोकांना उगाच घट्ट मिठ्या मारल्या. न जाणो, तिकडेच कुठे माझा कडेलोट झाला तर काय घ्या! पुन्हा पहायला तरी मिळतील का हे प्रेमळ चेहरे? माझ्यामागे कसे राहतील? माझी आठवण येईल का? मग काय होईल? सैरभैर होतील? कसे सावरतील? तशात आम्ही सारखं, सारखं सांगतही नाही एकमेकांना घरात की I love you वगैरे. कोकणातल्या लोकांच्या तोंडी असली वाक्यं शोभत नाहीत हो - हे असं आमचं आम्हीच ठरवलंय बाकी. जमतच नाही बघा बोलायचं, खरंच. वेळ आली तर जीवही देऊ, पण बोलायचं? ज-म-त नाही. मग समजा, असं काय झालं तर, सिनेमात दाखवतात, तसं मला येता येईल का त्यांना धीर द्यायला भूत वगैरे होऊन? पांढरे कपडे आणि चोप्रास्टाईल वाद्यं आणि बॅकग्राऊंड स्कोअर्स नाही वाजले तरी चालतील. फक्त I should be able to reach out, that's all. अ-ग-दी का-ही-ही विचार येत होते मनामध्ये. माझा बाबा म्हणायचा, की मला उस्फूर्त निगेटीव्ह विचार करता येतात, तेच खरं असावं की काय? Baba knew me so well. I miss you रे. तुला खूप आवडलं असतं मी असा ट्रेक केलेला. तू आसामात भटकला आहेस मला माहिते. I really miss you. आणि शप्पथ, माझ्या डोक्यात हे विचार आले.

ट्रेक कसा होईल? कशी दृश्यं दिसतील, व्हॅलीमध्ये कसली फुलं असतील, हिमालय कसा दिसेल? हिमाचलात शॉपिंग वगैरे जमेल का? अगदीच काही नाही तर, गेला बाजार प्रवास कसा होईल, वगैरे विचार यावेत की नाही डोक्यात? पण नाही, काय तर, हे! अर्थात, ही एक शक्यता होतीच की, पण शुभ शुभ सोचो म्हणे. प्रयत्न जारी आहेत. अचपळ मन माझे, नावरे आवरीता.. हेच शेवटी. विचारांची रेंज अफाट असू शकते हो. लॅंडस्लाईड्सविषयी आधीच वाचलेलं. नेटवर, आणलेल्या पुस्तकात. दिल्लीवाल्या आणि काश्मिरवाल्या कलीग्जनी सांगून ठेवलेलं. तिसर्‍या एका कलीगने, तिकडेच उलथलीस तर लवकर स्वर्गात जाशील, नै का? हा प्रश्न रोज विचारलेला. नियतीचा संकेत वगैरे?? छ्या! असूद्यात. आपला मंत्र विसरनेका नै - जो भी होगा...

घरी लॅंड्स्लाईड्सविषयी सांगितलं नाही तर कमी काळजी वाटेल, हा अजून एक वेडगळ विचार. तितक्यात एक प्रश्न आलाच, "समजा कुठे दरडी वगैरे कोसळल्या तर गं? काय कराल?"

"तर आम्ही थांबू गं. उगाच काळजी काय करत्ये? इतके जण आहोत."

"बरं, फोन करत रहा रोज. नायतर आपलं हिमालय बघाल आणि घरच्यांना विसराल!"

"अर्रे, काय बोलते! नक्की करेन. जिथवर शक्य असेल, तिथवर करेन. पुढे रेंज नसते, काळजी करु नकोस. ट्रेकींग ऑफिसमध्ये नंबर वगैरे दिलेत, काही प्रॉब्लेम असला तर तेच करतील तुम्हांला. जोवर असं काही होत नाही, तोवर सगळं आलबेल असणार. तू काय काळजी करते? वो है ना.. "

वगैरे वगैरे बोलून वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत, बाहेर पडताना परत एकदा मिठ्या मारुन निरोप घेऊन निघालेच. उगाच गलबलतं की हो लांब निघालं कुठे की.. तेच ते, अचपळ मन माझे..

वेळेवारी रिक्षा वगैरे मिळाली, रिक्षावाल्याकडे सुट्टे पैसे होते आणि त्याने काहीही खळखळ न करता ते मला दिले. भलताच शुभशकून! पुन्हा दुरांतोही पहिल्याच प्लॅटफॉर्मला लागलेली. जिने वगैरे चढून पुढच्या प्लॅटफॉर्मवर जायची बात नस्से. वा, वा वा. शुभशकून नंबर दोन. गर्दी गजबजली होती. बसायला जागा नव्हती. सॅका घेऊन कुठे ठिय्या जमवावा ह्या विचारात असताना, एक डेहराडूनवालं दांपत्य पुण्यातल्या आपल्या मुलांना भेटून परत चाललं होतं, त्या माऊलीने हाक मारली, जागा दिली. तिसरा शुभशकून. प्रवास उत्तमच होणार ह्याबद्दल आता मला शंका नव्हती. हसतमुखानं गप्पा मारल्या, सुखदु:खांची देवाणघेवाण थोडीफार. त्यांच्या वागण्यातला सरळपणा, मोकळेपणे बोलायची पद्धत फार आश्वस्त करुन गेली.

अकरा वाजता ट्रेन निघणार होती. साडेदाहापरेंत स्वाती पोहोचणार होती, म्हणून मी निवांत होते. तितक्यात घरी फोन करुन नेटावरुन आमचे बर्थ नंबर वगैरे डीटेल्स घेतले. आता स्वाती आली की झालंच. मध्ये एकदा तिला फोन लावला आणि आलेच, इथ्थेच आहे,असं ऐकून निवांत झाले. वाटेत वाचायला पुस्तक घेतलं होतंच. आता जागेवर बसलं की वाचनेका, गप्पा मारनेका वगैरे. पण ठहरो! अजून स्वाती नै आली! आता जरा टेन्शन आलं. पावणेअकरा झाले होते. रैनाला मध्ये एकदा फोन केलेलाच होता, पण आता परत एकदा एकदम टेन्शनमध्ये फोन केला की समजा, स्वाती नाही आली, तर मी तरी चढणार आहे हां ट्रेनमध्ये. मनामध्ये, कुठे अडकली ही आता? फटके द्यायला हवेत! वेळेत यायला काय होतं? साडेदहाला इथे भेटायचं ठरलेलं ना! इ. इ. इ! समजून घ्यालच, पण तितक्यातच ती शांतपणे आली. कुठे ट्रॅफिकमध्ये अडकली होती. आम्ही थांबलो होतो, तिथेच जवळ आमचा डबा होता. बसलो. दोघींनाही खालचे बर्थ, खिडक्या. और क्या चाहिये एक खुशनुमा सफर के लिये?

गाडी सुरु झाली. स्थिरस्थावर होऊन गप्पा मारत, पुस्तकं वाचत, मासिकं चाळत प्रवास सुरु झाला. इथे PS - I love you हे पुस्तक विकत घेतलंच. काहीतरी लाईट वाचायचं होतं. ह्या पुस्तकाची गंम्मत सांगेन मग.


क्रमश:

September 1, 2011

देवभूमीला जाण्याआधी...२
स्वाती माझ्याबरोबर पुण्याहून प्रवासात सोबत असणार होती. म्हणता म्हणता ५ तारीख उजाडणार होती. पण कितीतरी कामं अजून बाकीच होती! खरेदी व्हायची होती, इतिकिटांच्या प्रती प्रिंटायच्या होत्या, रैना आणि स्वातीशी पुन्हा थोडं व्हॅलीबद्दल, होणार्‍या प्रवासाबद्दल बोलायचं होतं, हे कमी म्हणून बरीच लक्षात न येणारी, कदाचित अ‍ॅक्च्युअलमध्ये नसलेली पण व्हर्च्युअलमध्ये विनाकारण मला भेडसावणारी, करायची राहिलेली खूऽऽऽपशी कामं आ वासून माथ्यात आणि माथ्यावर थयथयाट करत होती! दिवसभराचं ऑफिस आणि इतर कामं सांभाळताना आणि प्रवासाची तयारी करताना तारांबळ मात्र भरपूर उडाली. शेवटी प्रवासाच्या आदल्या वीकांताला इंच इंच लढवूच्या थाटात मी सगळ्या आवश्यक खरेदीचा फडशा पाडला. हुश्श! आता आमचं आरक्षण नक्की झालं का पहायचं होतं आणि जर ते झालं नाही तर काय, हा एक प्रश्न भेडसावत होता, वाकुल्या दाखवत होता आणि जे काय तत्सम करुन डोक्यावरचे केस पिकवता येतील ते सगळं करत होता! स्वातीही मला मध्ये मध्ये फोन करुन हाच प्रश्न विचारुन घाबरवत होती. तिच्या प्रश्नांना उत्तरंच नसायची माझ्याकडे कधीकधी. जपा, जपा तोच मंत्र जपा, जो भी होगा, देखा जायेगा... ठीके? ओक्के. ते राजधानीचं सांगायचं राहिलंच आहे, नैका? सांगत्ये तेही ओघाने..

तशात, मध्येच स्वातीला आपण येताना राजधानीने यायच्या ऐवजी फ्लाईट घेऊयात, असं वाटायला लागलं आणि योग्य फ्लाईटची शोधाशोध सुरु झाली! पण एकूणातच ते त्रासदायक ठरणार आहे अशा निर्णयाप्रत मी आले आणि त्याला कारण म्हणजे, दिल्लीमधे आयुष्य घालवून आता पुण्यात येऊन नोकरी करणार्‍या आणि पुन्हा कधीही दिल्लीला जायची स्वप्नं न पाहणार्‍या कलीगकडून ऐकलेल्या दिल्ली रेल्वे ठेसन ते दिल्ली एअरपोर्ट ह्या प्रवासाच्या सुरस कथा -ट्रॅफिक इन्क्लूडेड, माइंड प्लीजच. तेह्वा स्वातीचा बेत, आपलं सामान आपणच वहायचं आहे, ह्या बागुलबुवाच्या मागे लपून हाणूनच पाडला. बाईसाहेबांना दिल्लीत शॉपिंग करायचं होतं! किती उत्साह आहे ह्या मुलीला! भारी कौतुक वाटलं. ट्रेकनंतर शॉपिंग करायची शक्ती उरलेली असेल का, हा प्रश्नही तिच्या मनात आला नव्हता. काय म्हणायच? हा उत्साह असाच राहूदेत इतकंच म्हणते.

सॅक्स भरायचं अजून एक मुख्य काम बाकी होतं.. सामान वगैरे भरायला मला जाम कंटाळा येतो. पहिल्या फटक्यात मनाला येईल अश्या प्रकारे मी कधीच बॅग व सॅक भरु शकलेले नाहीये. आजवर तसा बर्‍यापैकी प्रवास झालेला आहे, तरी दर वेळी नवीन च्यायलेंज असतं हे एक! ह्यात काहीच फरक नाही. कधीकधी मी इतका कंटाळा केला आहे, की प्रवासाच्या काही तास आधी नाईलाजाने बॅग भरलेली आहे. असो. तर काय म्हणत होते, की प्रवासाचा कंटाळा नाही येत, पण सामान भरायचा मात्र येतो, तेह्वा ते सॅका भरायचं सतत उद्यावर ढकलत होते, पण सामान एकत्र करुन ठेवलं होतं मात्र. जणू काय ते आपण होऊनच सॅकमध्ये जाऊन बसणार होते, आपसूक. आता असं होत नाही, पण तरीही आशावादी राहून चांगल्या इच्छा मनात धरायला काय हरकत आहे? नै का?

घरुन फिदफिदत आहेर मिळालाच, "सामान जाईल सॅकेत | आधी भरलेचि पाहिजे ||" असूद्यात, असूद्यात. एवढं काय नै, आणि सामान एकत्र ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. पटपट मिळतं भरायच्या वेळी. घेतलं ना भरायला एकदा, की धा मिनटांत आटपून टाकीन, हाय काय अन् नाय काय! असं म्हणत, आणि त्यावर घे तरी एकदाचं मग. बाई येतात त्यांना केर काढायला त्रास होतो.. असा आहेर मिळाला. बघा आता! २ दिवस एका कोपर्‍यात सामान काय ठेवलं इतकूस्सं तर लगेच अडचण व्हावी का हो? काय काय करावं माणसानं? नोकरी, खरेदी, हिमालयात ट्रेकींग, पुस्तकवाचन, तिकिटं बुक करणं, व्हॅलीत जायच्या आधी व्हॅलीची माहिती देणारी काही पुस्तकं आहेत का शोधणं.. एक जान भला क्या क्या करेगी? चार तारखेच्या रात्री, दहाच्या पुढे एकदाच्या सॅक्सही भरल्या. ऑफिसमधून घरी येऊन भरल्या हो! त्याचं काय कौतुकच नव्हतं आणि कोणाला! तुलाच जायचं आहे ना हिमालयात, मग हे करायलाच पाहिजे ना हे सगळं, असं सडेतोड आणि मुद्देसूद उत्तर ऐकून गप्प बसले. काय करणार? खरंच की ते. सगळ्यांचा कोकणी पिंड आणि त्यातून पुण्यात स्थायिक. तस्मात् सडेतोड उत्तरं, खरी उत्तरं वगैरेंना आमच्या घरात तोटा नाही. मुबलक प्रमाण आहे. फालतू लाड आणि खरोखरचं कारण नसेल तर समोरच्याला काय वाटेल वगैरे भानगड नस्से. त्यामुळे विचार करुनच बोलावे लागत अस्से. फालतूपणा चालत नस्से हा मुद्दा.

तेह्वा गपगुमान सॅक्स भरायला सुरुवात केली आणि काय सांगू चिमित्कार म्हाराजा! एकदम फिट्ट आणि मस्त बसलं की सगळं सामान, पैल्या फटक्यात. जय हो! स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं असल्याने मोजकंच सामान घेतलं होतं, त्याचाही फायदा सॅक भरताना झाला असणार. नक्कीच. काही का असेना, मनाजोगतं पॅकींग झालं होतं. ४ तारीख संपली. झोप. थकल्यामुळे २ मिनिटांत ठार.

एक सांगायचं राहूनच गेलं. व्हॅलीची माहिती देणारं एक तरी पुस्तक मिळावं म्हणून हाताशी असलेल्या तुटपुंज्या वेळामध्ये दुकानं पालथी घातली होती. मिळालं का? तर हो, मिळालं. जसं हवं तसंच मिळालं. पुस्तक मिळाल्याचा मात्र मनापासून आनंद झाला.

दुसरं म्हंजे येताना दुरांतोची आणि आमची वेळ जुळत नव्हती, तेह्वा मुंबैपरेंत राजधानीने येऊन तिथून पुढे बस, टॅक्सी, रेल्वे जे काही मिळेल ते रामभरोसे घ्यावे असा विचार केला होता. जिंदगीमें थोडा डेरिंग जरुरी हय. तर राजधानी मुंबई सेंट्रलपरेंत आहे, पण सेंट्रल हे वेगळे ठेसन आणि शिवाजी टर्मिनस हे वेगळे हे ज्ञान मला वेळेवारी नसल्याने - आता नाय म्हायती! काय करायचं? - मी त्याला शिवाजी टर्मिनस समजून तिथूनच येताना आपल्याला पुण्याची गाडी पकडायला कित्ती सोपं असे समजून सुखात होते. यथावकाश सगळ्यांनी मिळून ज्ञानदान करुन शहाणे करुन टाकिले आणि अजून एका धडकीने मनात घरटे केले. एव्हांना अशा अनेक धडक्यांची घरटी बाळगून मनाची घरटी-चाळ झाली होती!

रैना, मी आणि स्वाती निघण्यापूर्वी एकदा कॉन्फरन्स कॉल करुन बोललो. बोललो कमी आणि एकूणातल्याच अज्ञात प्रवासाच्या थोडयाफार टेन्शनमुळे येड्यासारख्या हसलो जास्ती. तिघींनाही तिघीही मनातून बर्‍यापैकी टरकलो आहोत हे समजले. तरीही एकमेकींच्या सोबतीमुळे आश्वस्त होतो. स्वतःची चिंता नव्हती. हे किती मह्त्त्वाचे काम किती सहजगत्या झाले होते!

आता प्रत्यक्ष प्रवासाची सुरुवात करुन अनुभव घ्यायचे मात्र राहिले होते. बाकीचा फापटपसारा मागे पडला होता. आम्हीही आता तयार होतो.

क्रमश: