December 30, 2007

संकल्पाची ऐशी तैशी

जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्‍याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ. इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्‍यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्‍याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केले असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!! अर्थात, घोडा मैदान जवळच आहे म्हणा, कळेलच लवकर कोण किती दृढनिश्चयी आहे, आणि संकल्पांची घोडी कुठपर्यंत दामटली जाताहेत ते!!

मला विचाराल तर, माझा काहीही संकल्प नाही!! आतापर्यंत संकल्प करण्याचे अन ते डोळ्यांदेखत आणि मनादेखत खितपत पडण्याचे अन पाडण्याचे भरपूर प्रयत्न आणि प्रयोग आपसूकच झालेत. त्यात परत काय आहे, की मुळातला पिंड आहे गोवा, कारवार वगैरे या भागातला, तेह्वा उगाच कटकट, दगदग करायला आवडत नाही! सुशेगात राहण्याला प्रथम पसंती!! त्यात हे असल काय बसत नाही हो!! जेवढ काही जिवाला त्रास न देता, सहजगत्या होऊ शकत तेवढच करायच, हे ब्रीदवाक्य. स्वतःच संकल्प करायचे, स्वतःच त्याची आखणी करायची, व्यवस्थित फूल प्रूफ प्लॅन करायचा, किती कष्टाच, अन वेळखाऊ काम आहे माहित आहे का? अन भरीस भर म्हणून पुन्हा त्याची अंमल बजावणी, ती पण आपणच स्वतः करायची... परत एखाद दिवशी समजा नाहीच जमल, तर पुन्हा आपणच आपली खरडपट्टी काढायची!! आता आहे का?? म्हणजे आपणच आधी सगळ ठरवायच वगैरे, म्हणजे, संपूर्णतः आपण या संकल्पनेचे मालक असतो, नाही का?? पण सरते शेवटी ही संकल्पना, किंवा संकल्पच आपले मालक बनून जातात, अशी काहीशी परिस्थिती!! हे काय बरोबर वाटतय का, सांगा बर! सांगितलेत कोणी नको ते धंदे?? म्हणजे जर आपण ठरवणार असू, की आपल्याला अमूक अमूक, अस, याप्रकारे करायचय बरका आता नव्या वर्षापासून वगैरे, तर एखाद दिवशी ते नाही केल म्हणून काय बिघडणारे का??? पण तस नसत रे सायबा......

संकल्प केलाय, मग तो पार पाडायला हवा, असा काहीतरी अलिखित नियम आहे म्हणे!! म्हणजे, आपली स्वतःची काहीच हरकत नसते एखाद दिवस नेहमीच "संकल्प नामक रुटीन" बदलायला, पण ज्या कोणाला आपल्या संकल्पाची कल्पना असते त्या सर्वांची मात्र असते!! मग आधीच डोक्यावर ते संकल्प नामक ओझ आणि भरीला भर म्हणून सर्वांच्या हरकतीच ओझ!! सरळ साध असणार आयुष्य उगाचच खड्ड्यात घालायच असेल तर खुशाल करा संकल्प!! होऊनच जाऊंदेत मग!!

तर, तुम्हां सार्‍या उत्साही जनांना शुभेच्छा, संकल्प करण्यासाठी, ते अमलांत आणण्यासाठी आणि यदाकदाचित ते मोडलेच, तर फारस वाईट न वाटून घेण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्यांच्या कमेंटस धीरोदात्तपणे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देण्यासाठीही. प्रयत्नांती संकल्पेश्वर म्हणे!!

तेह्वा, चालू देत तुमच संकल्पवाल्यांच. मी तरी आपलं, मस्तपैकी संकल्पविरहीत सुशेगात जगायच म्हणते यावर्षी!!

पण, आत्ता एक सुचल!! माझ्या ब्लॉग वाचक मायबापांसाठी एक आयडिया सुचली!! तुम्हां सार्‍यांना एक मस्त संकल्प सुचवू का?? :D

जेह्वा, जेह्वा, इथे या अनुदिनी वर याल, काही वाचाल, तर त्याबद्दल आपल मत जरुर सांगायच. संकल्प कसा वाटतो?? :) :D अगदीच काही नाही , तर निदान हाय हॅलो तरी म्हणा की!! :) म्हणजे कस, भेटल्यासारख वाटत ना, म्हणून! :) परत एकदा, येणार्‍या नववर्षाच्या शुभेच्छा!! :)

शुभेच्छा


येणार्‍या नवीन वर्षाच्या तुम्हां सार्‍यांना खूप सार्‍या शुभेच्छा!!

December 26, 2007

शब्द पसारा

कधी कधी काय होत ते समजत नाही खर तर. इतका कंटाळा दाटून येतो आतून, काही स्पष्टीकरण नसत त्यासाठी. जणू काही अंतर्मनावर कसल तरी मळभ दाटून आलेल असत. काहीच नकोस वाटत, लेखन वाचन, शब्द... सार काही परक वाटत अगदी. अस वाटत की मी कुठेतरी उभी आहे अन एक विशिष्ट परिघावर हे सार आहे. म्हणजे हेच, लेखन, वाचन, शब्द, ह्या सगळ्या गोष्टी. इतर वेळी मी यांच्यापासून स्वत:ला वेगळ काढूच शकत नाही, श्वास घेण्याइतकच ते ही सहजच आहे, पण कधी कधी हे ही परकच वाटाव?

अस वाटत की आहोत तिथूनच हात लांब केला तर येईलही आवाक्यात, पण जस, ज्या प्रमाणात हवय, ज्या कसदारपणे हवय, तस नाही आल तर? जरा वेळाने, हे अप्राप्य प्राप्त करण्याची खरच इच्छा आहे का इथपासून सुरुवात होते! काय आहे हे? मला स्वत:लाच कळत नाही कधी कधी. काय चाललय? कुठे जायचय, मकाम कुठे आहे, आहे का? का नुसतच जिप्सी होऊन भटकायच आहे? नक्की काय करायच आहे, ह्याचाच गोंधळ उडल्यासारखा होतो माझा. लक्ष्याचा शोध म्हणावा का?? स्वत:चा शोध? उगाच मोठे शब्द पण नाही वापरायचे मला.

ही तक्रार नाही आहे, किंवा मी रडगाणही गात नाही आहे, असच थोडस स्वत:शीच संवाद साधायचा हा एक प्रयत्न आहे. स्वत:ला शोधायचा म्हणूया हव तर.

आणि ही सगळी तगमग उराशी जपत, परत ते सगळे व्यवहारातले मुखवटे घालून जगातही यशस्वीपणे वावरायच, वावरतेही. तेही आवश्यकच ना? अजिबात तक्रारीचा सूर नाही त्याबद्दल, एक निरीक्षण नोंदवल, इतकच. जगाबद्दल वगैरे माझी मुळीच तक्रार नाही, किंवा जग विरुद्ध मी, किंवा जगाने माझ्यावर अन्याय केलाय असले हास्यास्पद दावे मी मुळीच करत नाही. मला वाटत, कधी कधी आपला स्वत:चाच दावा असतो स्वत:शीच. स्वत:लाच समजावयाचे, काय समजावयाचे पण?

अन कधीतरी शब्द पण पोकळ वाटतात! पाण्यावरचे बुडबुडे जणू. काय अन कस? काही काही अवस्था अश्या असतात ना, की त्या स्वत:च अनुभवायच्या, स्वत:च जळायच अन स्वत:च ती तगमग पण अनुभवायची! त्या कोणापाशी बोलून दाखवता येत नाहीत, बोलावस वाटत नाही असही नाही, पण एक तर योग्य शब्द सापडत नाहीत किंवा ते शब्दांच्या पलिकडे पोचलेल असत. मग बोलायची गरज पण संपून जाते.

विचित्र झाल आहे! स्वत:च्याच मनाशी असलेली बांधिलकी तुटतेय का? काहीतरी स्वत:शीच एक नाळ तुटल्यासारखा अनुभव, होता होता, एक राहून गेलेला संवाद जणू, की नुसताच जड झालेला शब्द पसारा?

कधीतरी एकदा असच,
अवती भवती फेर धरत,
सभोवताली हसत नाचत,
शब्द म्हणाले खेळ खेळत.....

म्हणाले, चल ना, जाऊ,
उंच शब्दभरार्‍या घेऊ,
जाणीवा, नेणीवांच्या जगात
एक चक्कर टाकू अन,
असच जरा भटकून येऊ....

हातात हात गुंफत,
आणि मनात गाणी जागवत,
एकमेकांना सोबत करत,
निघालो असच वाटचाल करत.
भिंगरीसारखे भिरभिरत,
पाण्यासारखे झुळझुळत,
उन्हांसारखे तळपत,
आणि सावलीसारखे शांतवत.

मधेच वाटत, खेळ संपला......
हात कधीचाच हातातून सुटला,
शब्दांच जणू कुरुक्षेत्र होता,
वावर नशिबी असेल का इथे,
अश्वत्थाम्याच्या जखमेच दु:ख सोसत?

December 24, 2007

सोनेरी उन्हं

या सप्ताहांताला ऑफिसमधे जायला लागल. शनिवार, अन रविवार पण!! मग, सांगतेय काय??? जाम वैताग आलेला.. आता आयटीमधे काही वर्ष जगून, शनिवार, रविवार सुट्टी हा माझा जन्मसिद्ध हक्क झालाय ना? अन मग त्याचीच पायमल्ली?? माणसाने जगाव तरी कस??लईच पिळून घेतात राव... ह्म्म्म्म...

तर, मनातल्या मनात बापूला, त्याच्या बापूला इत्यादि सर्व प्राणीमात्र, की ज्यांना शिव्या घालता येण शक्य आहे आणि जायज आहे - प्लीज नोट, उगाचच अन्यायाने कोणालाही शिव्या घालत नाही मी :D - अश्या सर्वांना शिव्या देत देत (पुण्यातली व्यक्ती असून शिव्या येत नाहीत म्हटल, तर पुण्याची लाज जाईल की !) मी शनिवारी ऑफिसला जायला लाल वोल्वोत बसले. हे बंगळुरुमधल लाल रंगाची वोल्वो प्रकरण मात्र एकदम सहीये! अस्ताव्यस्त अन बेशिस्त ट्रॅफिकमधून ही लाली अश्या नजाकतीत तुम्हांला इथून तिथे घेऊन जाते ना, की काय सांगाव! अगदी अल्लाद म्हणतात ना, तस! आता मी पुण्याचीच असल्याने बेशिस्त वाहनांची मला चांगलीच सवय आहे!! पुण्याच्या रस्त्यावरून गाडी मारताना ( आम्ही पुण्यात दुचाकीलाही गाडीच म्हणतो!! असो. :P) अंगी स्थितप्रज्ञ वृत्ती, वेगवेगळया प्रकारची संभाषणं ऐकून (यात शिव्या पण जमेला धरा!) ज्ञानात अफाट भर पडणं, कुठल्याही ट्रॅफिक चक्रव्यूहाचा यशस्वी भेद करायच कौशल्य अंगी येण, अस बरच काय होत असत.... सो नो वरीज पीपल... असो.

तर, ऑफिसला पोचले, काम अस काही नव्हतच, फक्त उपस्थिती अनिवार्य. मग म्हणल, चला भटकू ऑफिसच्या कँपसमधे. छान आहे कँपस खर तर. हिरवाई जोपासली आहे बरीच. आणि गेले आठवडाभर बंगळुरुमधे थंडीबरोबर कधीकधी रिमझिम तर कधी बदाबदा गिरणारा सावन पण आहे, जवळ जवळ आठेक दिवस धड सूर्यदर्शन झाल्याच आठवतच नाही. तसही, सोमवार ते शुक्रवार कामाच्या चक्कीला जुंपल की इतर काही पाहण्याची शुद्धही राहत नाही म्हणा....

तर, भटकता, भटकता अशीच एका बाकावर बसले. इतकी निरव शांतता होती, आणि सगळा परिसर इतका सोनेरी दिसत होता.... शांत, शांत बसून राहिले. अगदी आत कुठे तरी शांतता झिरपत होती. अगदी आत्म्याला वेढून राहिल्यासारखी वाटली. एकदम समाधानच भरून आल मनात. आजूबाजूला बघताना लक्षात आलं, मस्त सोनेरी ऊन्हं पडली होती, सगळ्या परिसरावर पसरली होती. एकदम उबदार, एखादी दुलई अंगावर पांघरून बसाव तस वाटत होत अगदी. परिसरही तसाच वाटत होता, अचानक एक नातच जुळल्यासारख वाटल सार्‍या आसमंताबरोबर. भर दुपार असली तरी उन्हाला कुठेही रख्ररखीतपणाचा स्पर्शही झाला नव्हता, मऊसूत, सोनेरी, झळाळणारी उबदार उन्हं इतकी देखणी दिसतात, हे किती तरी दिवसांनी अनुभवल. वाटल, हातात पकडून ठेवू शकेन का थोड माझ्याचपाशी? खूप वेळ तशीच बसून राहिले, सोनेरी उन्हं अनुभवत अन त्या सोन्याने सोनेरी बनलेला आजूबाजूचा परिसर निरखत. शनिवार, रविवार ऑफिसला येण्याच सार्थक झाल....

आणि हो, बापूच्या अन त्याच्या बापूच्या नावाने दिलेल्या शिव्या यावेळपुरत्या रद्द समजण्यात याव्यात! :D

December 22, 2007

सुहृद - भाग ६

शाळेत जाताना पण मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते। लक्षच नव्हते कशातही. एका विचित्र पेचात जणू ते अडकले होते. तत्वांना उराशी कवटाळाव, तर लेकीच्या स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांदेखत होत होती, आणि लेकीची स्वप्न फुलवायला जाव, तर तत्वं पायदळी तुडवली जाणार असच चित्र दिसत होत. मास्तरांना एकदम थकून, गळून गेल्यासारख, लढाई हरल्यासारख वाटायला लागल होत... शाळेत पोचले नाहीत, तोच, चालकांनी ऑफिसात बोलावले आहे असा निरोप आला. मास्तर ऑफिसात गेले.

"या, या मास्तर, मग काय ठरीवलय तरी काय मास्तर? कळू तरी द्या...."

"मला खोट बोलायला जमणार नाही..."

"आर तिच्या मारी!! काय लावलय राव खोट खोट! खोट काय बोला म्हणलोय का मी? फक्त गप्प बसा म्हणतोय न्हव का??! आन खोटच बोलायच नाय तर तुमच्या पावण्यांना सगळ सांगाया वो काय कोणी बंदी तर नाय घातली ना? ते का व्हईना हो तुमच्या हातन...? तिथं का नाय खर खर बोलला आधीच?? आँ? तर मग जाईबाईच्या नशिबातच रडणं दिसतय तर!! हां, आता ती आन तिच नशीब नाय का मास्तर, त्याला तुम्ही तरी काय करणार अन मी तरी काय करणार... या तुम्ही!" मग्रूरपणे चालकांनी मास्तरांना बाहेर जाण्यासाठी सुचवले.

आयुष्यात एक भयानक पोकळी निर्माण झाली आहे अन ती आपल्याला कुठेतरी अंधारात ओढून घेउन चालली आहे असे मास्तरांना वाटायला लागले होते। कसाबसा दिवस संपवून ते घरी आले. संध्याकाळ अन रात्र अशीच उदासवाणी गेली...

दुसर्‍या दिवशी मास्तरांनी राजीनामा लिहिला अन ते शाळेत जाण्यासाठी बाहेर पडणार, इतक्यात दारावर थाप पडली। कोण आले असावे असा मनातल्या मनात विचार करत मास्तरांनी दरवाजा उघडला अन पाहतात तो काय! दरवाजात दादासाहेब अन अनिकेत उभे होते! अचानक दोघांना दरवाज्यात उभे राहिलेले पाहून मास्तरांच मन भितीने एकदम झाकोळून आल... एवढ्या लवकर जाईची स्वप्न पायदळी तुडवली जाणार? बापाच मन कळवळल....

"काय सर, येऊ का आत?? अहो, इतक आश्चर्य वाटायला काय झाल?" दादासाहेब बाहेर उभे राहून प्रसन्नपणे हसत विचारत होते.

"अं.. नाही, नाही तस नाही, या, या... बसा. अग , ऐकलस का? दादासाहेब आलेत आणि अनिकेतही आलेत सोबत... चहा, जेवणाच बघा...."

स्वयंपाक घरात मास्तरांच्या पत्नीच्या पोटात गोळा उठला!! आता काय होईल? यांना काही समजल असेल का?

"सर, कुठे चालला होता का तुम्ही?? बाहेर जायची तयारी दिसतेय..."

"हां, तस काही नाही, आपल हेच... शाळेत चाललो होतो...."

"हं... अच्छा... काय म्हणतेय शाळा तुमची, ठीक ठाक सगळ? आणि लग्नाची तयारी कुठवर आलीये? आमची ही तर अगदी जोरदार बेत करते रोज, ही खरेदी, ती खरेदी... काय काय सुरुच असत तिच, अन सध्ध्या लेकाला पकडलय खरेदीसाठी!! मी पण म्हणतो जा रे बाबा, तेवढीच तुला सवय पुढच्या आयुष्यासाठी, काय म्हणता?? खर की नाही? द्या टाळी!! " मास्तरांनी कसनुस हसत टाळी देण्यासाठी हात पुढे केला. "आणि जाई कुठे आमची? जाsssईSSS, ए जाssई... सर, एकदम गोड मुलगी आहे हो तुमची... कुठे गेली? तिला भेटायला म्हणून तर आलो मी!"

एवढ्यात जाई बाहेर आली। तिने दादांना वाकून नमस्कार केला, अनिकेतकडे कळत नकळत एक दृष्टीक्षेप टाकला. अनिकेत तिच्याकडेच पाहत होता. परत एकदा तीच शांत, हसरी, मनाचा ठाव घेणारी नजर.....

"आलीस बेटा, ये, ये, आईलाही बोलव बेटा। सर, तुम्हां सर्वांशीच बोलायचे आहे आम्हां दोघांना. काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बर्‍या, नाही का?" मास्तर आणि त्यांच्या पत्नी धडधडत्या मनाने दादासाहेबांपुढे येऊन बसले.

"जाई बेटा, जरा आत जा बर तू...."

"नाही वैनी, तस नको, जाई देखील इथे असलेली मला हवी आहे। शेवटी हा तिच्या पण आयुष्याचा प्रश्न आहेच ना... थांब बेटा..... "

हे ऐकूनच, लेकीसाठी, तिच्या कानावर आता जे काही काही पडेल अन तिची काय प्रतिक्रिया होईल या धास्तीनेच आईची छाती दु:खाने दडपली!

"सर, वैनी, आमच्या कानावर सगळ काही आलय। सर, तुम्ही संस्थेत पैशाची सोय करायला गेला होतात अन तिथे चालकांनी तुम्हांला काय काय अटी घातल्या आहेत अन काय काय धमक्या दिल्या आहेत हे सगळ कळलय आम्हांला!"

"दादासाहेब... माझ चुकलच खर तर॥ मी खर तर तुम्हांला माझ्या भावाविषयी सांगायला हव होत... तुमच्यापासून लपवायच अस नव्हत हो मला, पण एकदम काय सांगाव अन कस सांगाव या विवंचनेत होतो मी.. पुन्हा इतक्या वर्षांमागच्या गोष्टी... त्याला सगळे लागू नयेत ते छंद लागले, सवयी लागल्या, त्यापायी झालेला तुरुंगवास... पण खूप वर्ष झाली याला.. दुर्दैवाने म्हणा किंवा काही म्हणा, आता तो या जगात कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही, त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण काही ठावठिकाणा नाही... जाईची काहीदेखील चूक नाही हो यात.... जाई, बेटा... "

"शांत व्हा सर। ऐका तर खर माझ. आम्हांला हे सगळ जाईकडूनच कळलय... मोठी धीराची आणि स्वाभिमानी लेक आहे तुमची सर... अगदी आम्हांला हवी तशी आहे आमची होणारी सून! काय जाई? एकदम सासर्‍यावर गेलीयेस हां तू!!" दादासाहेबांनी वातावरणात आलेला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

"जाई? जाईने सांगितल तुम्हांला? पण॥ तुला कोणी सांगितल जाई? कस कळल?" मास्तर गोंधळून विचारत होते, त्यांच्या पत्नीही गोंधळल्या होत्या।

"आई, बाबा, त्यादिवशी ऐकल मी॥ मी मैत्रिणीकडे गेले होते ना, तिथे पोचले अन कळल की तिला काही कामासाठी बाहेर जाव लागतय, मग काय तशीच माघारी फिरले.. दरवाज्याशी पोचले तोच बाबांचा चढलेला आवाज ऐकू आला म्हणून दाराशीच थबकले अन सगळ ऐकल... ऐकून इतका त्रास झाला!! माझ लग्न ठरलय याचा गैरफायदा घेऊन तुम्हांला कोणी कोंडीत पकडू पाहणार असेल तर, मला त्यात कसला आलाय आनंद? आणि तुम्ही दोघांनी मला काही सांगितल नाहीत ना? का? विश्वास नव्हता वाटला माझा? मी मुलगी आहे म्हणून? मी एवढी स्वतःतच मशगुल राहिन, तुमची काहीच काळजी मला वाटणार नाही, अस वाटल का तुम्हाला?" बोलता बोलता जाईच्या डोळ्यांत पाणी तरळल.....

"॥तस नाही ग बेटा.... हं, तरीच दरवाजापाशी काही वाजल्याचा आवाज आला त्यादिवशी, पण बाहेर येऊन पाहते तो कोणीच नव्हत... "

"मी सटकले ग आई, मागच्या मागे..."

"तर सर, जाईने त्यादिवशी तुमच बोलण ऐकल अन तिने अनिकेतला फोन करून सगळ सांगितल। अनिकेतने ते आम्हाला सांगितल. अन तुमच्या भावाबद्दल म्हणाल ना, तर आम्हांला ठाऊक आहे ते आधीपासूनच. अनिकेतच्या जिवलग दोस्ताचा एक मित्र तुमचा विद्यार्थी होता, त्याच्याकडून खूप काही ऐकलय तुमच्याबद्दल, आणि काकाच्या पूर्वायुष्याची सजा पुतणीला देऊ नये हे कळण्याइतके मीही केस पांढरे केलेत की आता!! सर, उगीच टेंशन घेऊ नका विनाकारण... अप्पांनीही मला कल्पना दिली होती सर... मीच म्हणालो, ते एवढ महत्वाच नाही आता... "

"दादासाहेब... काय बोलू आता मी.... खरच...."

"खर सांगू का सर, जाईचा खूप अभिमान वाटतो मला। वयामानाने तिचे विचार परिपक्व आहेत. तिने अनिकेतला जेह्वा भावी जोडीदाराबद्दल तिच्या अपेक्षा बोलून दाखवल्या ना, तेह्वा, घर, गाडी, घोडा, पगार यापैकी काहीच विचारल नाही, तिला हवा आहे तिच्यासारखाच एक सुहृद जोडीदार, जो तिला सतत साथ देईल... अश्या मुलीला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही कसा करू? आणि अनिकेत दुसर्‍या कोणा मुलीला जोडीदार मानायला तयार होईल अस वाटत नाही मला... काय अनिकेत?? दुसरी कोण सुहृद मिळणार त्याला अशी?? स्पष्ट सांगितल आहे त्याने तस, आणि आमचाही पूर्ण विश्वास आहे त्याच्या निर्णयावर. "

"तुमचीही काळजी आहे तिला खूप, म्हणून आम्ही इथे येऊन तुमच्याशी बोलाव अशी विनंती केली तिने... आणि मानीदेखील आहे सून माझी! आम्हांला, जे काही तुमच्यावर ओढवलय त्यात तुमची साथ द्यावीशी वाटली नाही, तर इथेच सार थांबवायची तयारी होती पोरीची.... काय ग, अनिकेत तुझा सुहृद बनू शकतो, नव्हे आहेच, याची खात्री नव्हती का ग तुला? निदान या म्हातार्‍या सासू सासर्‍यांवर तरी विश्वास??"

"दादा...." जाईचे डोळे पाण्याने भरले होते. अनिकेत जाईकडे बघत फक्त आश्वासक हसला.

मास्तर अन त्यांच्या पत्नींची काही वेगळी अवस्था नव्हती....

"सर, आता जाऊन त्या चालकांना सांगा, काय करतोस ते करुन घे म्हणाव खुशाल!! माझेही सुहृद आहेत म्हणाव ठामपणे माझ्या पाठीमागे उभे!!" दादासाहेबांनी दिक्षीतांना सांगितल.

"वैनी, फक्कडसा चहा करा बुवा आता!!" होकार देत, समाधान भरल्या मनाने, मास्तरांच्या पत्नी चहा करायला अन त्यांच्या गजाननापुढे वात उजळायला आत वळल्या.

दादासाहेब जाईपाशी आले. तिच्यासमोर उभे राहून हसत हसत म्हणाले, "आता तरी सून म्हणू का तुला?? आहे का परवानगी??" अन मग हळूच गुपित सांगितल्यासारख म्हणाले, "अग, लवकर हो म्हण, तुझ्या सुहृदाचा जीव टांगणीला लागलाय ना तिथे!!" वडिलांच्या मायेने दादासाहेबांनी जाईला जवळ घेतले, अन तिच्या डोक्यावर थोपटले.बापाच्या मायेने जवळ घेणार्‍या सासर्‍याच्या कुशीत हसत भरले डोळे पुसताना जाईने पाहिले, तिचा सुहृद तिच्याकडेच पहात होता. तिच्याच नजरेच्या भाषेत तिच्याशी बोलत.......


समाप्त.

December 21, 2007

सुहृद - भाग ५

नेहमीचा घरचा रस्ता आज संपतच नाही, असे मास्तरांना वाटत होते... अतिशय थकल्या मनाने मास्तरांनी घरचा दरवाजा ठोठावला.

"आलातही इतक्यात? झाल का काम? काय म्हणाले ते लोक?"

"अग, हो, हो, आत तरी येऊदेत मला.... " आत येता येता हुsssश्श करत मास्तर जवळच्याच खुर्चीवर टेकले. अचानक मास्तर थकलेले दिसत होते. बघूनच पत्नीच्या लक्षात आले की काहीतरी बिनसले आहे, नक्कीच! त्यांच्या मनालाही हुरहूर लागली... काय घडले असावे? देवा, गजानना, काही त्रासदायक तर नाही घडले? कोणी काही खोडा तर नाही घातला? झाले तरी काय असेल? नाना शंका, कुशंका मनात उभ्या राहू लागल्या...

" अहो... चहा ठेवते बर का, इतक्या लवकर कसे आलात? काय झाल ? झाल का काम? लवकरच झाल मग!! का परत बोलावलय वगैरे?"

"नको, चहा नको, जरा पाणी आण गारस माठातल... आणि हे पहा, तूही ये जरा इथे, बोलायच आहे, किती ते प्रश्न... अन हो, जाई कुठे आहे? घरातच आहे का? "

"नाही, बाहेर गेली आहे इथेच जरा मैत्रिणीकडे, एवढ्यात नाही यायची, अजून दोनेक तास तरी आहेत तिला...."

"बर झाल, ये बैस इथे॥ सांगतो तुला, सांगायचे तर आहेच...." आणि धडधडत्या मनाने शेजारी येऊन बसलेल्या आपल्या पत्नीला मास्तरांनी सार्‍या घटना एकामागून एक सांगितल्या। "सरळ सरळ धमक्या दिल्या आहेत मला त्या माणसाने!! लायकी तर काहीच नाही!! नुसता पैशाचा माज!! काय करायच ग आता....? मन नुसत पोखरून निघाल्याप्रमाणे झाल आहे माझ! जाईचा विचार मनात येऊन वेड लागेल अस वाटत!! काय वाटेल तिला माझ्याबद्दल? या बापाबद्दल काय वाटेल तिला? दादासाहेब तर किंम्मत करतीलच आपली, आणि गावात पण लोकांच्या कुचाळक्यांचा विषय होणार पहा आपण..... " मास्तर दु:खातिशयाने थरथरत होते...

"अहो, अहो, शांत व्हा!! काही तरी मार्ग निघेल हो... अप्पांना विचारायच का??" मास्तरांच्या पत्नी सार ऐकून हबकल्याच होत्या, पण पतीला धीर देण्यासाठी काही बाही बोलत होत्या। जाईची हे सर्व ऐकून काय अवस्था होईल हा विचार मनात येऊन त्यांना अगदी खचल्यासारखे वाटू लागले....

"अहो, हे सगळ जाईला कस सांगायच हो? पोर अगदी जिवाला लावून घेईल हो माझी..."

"अग, नाही, एवढ्यात जाईला नको सांगूस काही!! खचूनच जायची ग ती.... तिचेच जास्त वाईट वाटते, आपणच अस स्वप्न ठेवल ना तिच्या हातात आणि आपणच आता हे अस... कुठे पुण्याई कमी पडली माझी, काही कळत नाही, बघ!! अप्पांशी बोलून पाहतो, काय सल्ला देतात... माझी अक्कल गुंग झाली आहे ख्रर तर!!" मास्तर विमनस्कपणे काही न बोलता बसून राहिले। घरातले सकाळचे हसरे, उत्साही वातावरण आता कुठल्याकुठे निघून गेले होते! खिन्न मनाने मास्तरांच्या पत्नी उठून आत जाता जाता त्यांना दारापाशी काही तरी वाजल्यासारखे वाटले. अरे बापरे!! कोणी ऐकले की काय!! दारापाशी जात त्या पुटपुटल्या, त्यांची काळजी अधिकच वाढली!! कोणी काही ऐकले तर गावात बोभाटा व्हायला कितीसा उशीर!! असे कसे विसरलो आपण दाराला कडी लावायला??!! भरभर बाहेर येऊन त्यांनी बाहेर डोकावल, घराच्या आसपासही जरा पाहिल... कोणीच नव्हतं... वारा सुटला होता. हं!! वार्‍याने हलल असाव दार॥ आपल मन कमकुवत झाल की सगळयाच गोष्टींचा संशय येतो, झाल!! मनाशीच म्हणत त्या दार बंद करून आत वळल्या.

थोड्या वेळाने जाई उत्साहातच घरी परतली आणि तिची बडबड सुरु झाली!! आपल्याच नादात, उत्साहात जाई वावरत होती!! मैत्रिणीकडे जाऊन काय काय धांगडधिंगा घातला याबद्दल अगदी उत्साहाने ती गप्पा मारत होती. मास्तरांच्या पत्नी, मुलीचे बोलणे खोटा उत्साह दाखवून ऐकत होत्या, पण मास्तरांना मात्र त्यात भाग घेववेना। रात्रीच्या जेवणातही मास्तरांचे मन लागेना. भूक नाही, पोटात बरोबर नाही अशी कारणं देत मास्तर ताटावरुन लवकरच उठले. जाईला संशय येऊ नये म्हणून आईने कसेबसे लेकीबरोबर दोन घास पोटात ढकलले.

"आई, काय ग झाल बाबांना एकदम? दुपारपासून तसे मलूलच वाटताहेत नाही? खर तर मघाशीच तुला विचारणार होते ग मी... राहूनच गेल बघ!"

"नाही ग, काही नाही, जर दगदग झाली त्यांना आज, एवढच... बर वाटेल हं उद्यापर्यंत! जा आता झोपायला॥"

"अग आई, हे काय??" जाईच्या आवाजात आश्चर्य होते! "अग, आज तू चक्क देव्हार्‍यात दिवा लावायला विसरलीस की!! अस कस काय??"

"अगsss बाई!! खर की काय?? कठीणच आहे ग बाई!! अग कामापुढे अन आता या गडबडी पुढे ना, मला लक्षातच नाही राहिलं बघ!" डोळ्यांतल पाणी थोपवत अन जाईपुढे हसण्याचा खोटा आव आणत जाईच्या आईने गणपतीपुढे वात उजळली। "माफ कर रे गजानना, बाबा!! पण चित्तच थार्‍यावर नाही रे माझ...." मनातल्या मनात गजाननाला आळवत त्यांनी देवापुढे हात जोडले अन मस्तक टेकल, "आता तूच रे बाबा त्राता!! आम्हांला जनांत लाज येईल अस काही होऊ देऊ नकोस रे...."

जाई झोपली याची खात्री करून अन बाकीची स्वयंपाकघरातली झाक पाक करून जेह्वा त्या निजण्यासाठी आल्या, तेह्वा मास्तर टक्क जागे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.

"अहोsss..." हलकेच त्यांनी हाक मारली. "झोपा आता, प्रयत्न तरी करा... उद्या अप्पांशी बोलून घ्या..."

एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत दोघेही पती पत्नी कूस बदलत रात्रभर जागेच होते.

"ऐकलस का?" मधेच मास्तर म्हणाले.

"काय झाल? काय म्हणता आहात?"

"उद्या अप्पांकडे जातो, अन बोलून घेतो। खर तर ते तरी काय म्हणणार?? उगाच आपल्यामुळे ते मात्र संकटात आता!!त्यांचे आपापसातले संबंध दुरावले तर आपल्यामुळे.... " मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते! "... पण जाईला तू घरातच थांबव, नाहीतर, काही तरी कामाने कुठेतरी पाठव तरी.... माझ्याबरोबर तिथे नको! सुनिताकडे येते म्हणून हट्ट धरून बसायची नाही तर!!"

सकाळी लवकरच ऊठून, सारी आन्हिकं आटोपून अन तयार होऊन मास्तर घराबाहेर पडले। अप्पांना पतपेढीत घडलेल सगळ सविस्तर सांगायच अस मनाशीच ठरवत त्यांनी अप्पांच्या घरचा दरवाजा ठोठावला. अप्पा नक्कीच काही तरी मार्ग दाखवतील, अशी आशाही त्यांना वाटत होती. अप्पांनी कदाचित दादासाहेबांना सार काही सांगितलही असेल, कोण जाणे!! तस असेल तर बरच होईल......

सुनिताने दरवाजा उघडला. "सर तुम्ही!! या, या ना, बसा. जाई आलीये का?" सुनिताने बाहेर डोकावत विचारल.

"नाही ग बाळा, मी एकटाच आलो आहे, जरा कामाच बोलायच होत अप्पांशी... काय करताहेत ते? बोलवतेस जरा?"

"सर, अप्पा ना, कालच रात्री जरा आत्याकडे गावी गेलेत... दोन तीन दिवसांत येतील परत। आत्याला काल ते फोन करायला गेले तेह्वा समजल की आत्याच्या सासूबाईना अगदी बर नाही, म्हणून बघायला गेलेत. काही अर्जंट आहे का काम तुमच? फोन देउ तुम्हांला आत्याचा? फोन करा न अप्पांना..."

"नाही ग, अस इतक काही अर्जंट नाही...." अश्या परिस्थितीत अप्पांना कुठल्या तोंडाने फोन करून मी माझे रडगाणे गाऊ?? मास्तरांनी स्वत:शीच विचार केला, अन खिन्न मनाने अप्पांच्या घरून परत यायला निघाले.....

अपूर्ण......

सुहृद - भाग ४

दिक्षीत मास्तरांच्या घरात उत्साहाच वातावरण होत. इतक्या अनपेक्षितरीत्या जाईच लग्न ठरल होत, घरही चांगल मिळाल होत. जाई सुखावली होती हे बघून मास्तर आणि त्यांची पत्नी दोघांनांही समाधान वाटत होत. लग्नाची किती तरी तयारी करायची बाकी होती. मास्तर आपल्या पत्नीशी विचार विनिमय करत होते...

"झेपेल ना ग आपल्याला? आता जरी दादासाहेब काही नको म्हणाले तरी थोड फार तरी करूच आपण... आपल्याला तरी दुसर कोण आहे? आपली जी काही थोडी फार पुंजी आहे ती उपयोगाला येईल आता, थोड मी शाळेच्या संस्थेच्या पतपेढीमधून कर्ज काढतो... इतकी वर्ष मन लावून विद्या दान केलय, काही तरी केल्या कष्टांचा मान ठेवतीलच ना... "

"अहो, पतपेढीकडून कर्ज घेणार तुम्ही...? दुसरा काही मार्ग नाही का सापडणार? तुमच्या त्या संस्थेच्या पतपेढीचे व्यवहार.... "

"मान्य ग, पण आता काय करायच, सांग... सध्ध्या आपल्याला गरज आहे ना, आणि मी त्याच संस्थेत कामाला आहे, मग माझ काम तस तुलनेन सोपच आहे, नाही का? मी बघून तर येतो, तू चहा दे, मग मी जरा जाऊन येतो संस्थेत, पाहतो कस काय होतय ते... गरज पडली तर संस्थाचालकांना भेटायला हव... "

मास्तर बाहेर पडले तस, मास्तरांच्या पत्नीने, न राहवून गजाननाला हात जोडले. "सगळ काही ठीक कर रे देवा..." त्या मनातल्या मनात पुटपुटल्या।

संस्थेच्या आवारात शिरता शिरता मास्तरांना संस्थाचालकांनी बघितले अन त्यांना थोडे आश्चर्यच वाटले!! दिक्षीत सर? इथे?? काय काम काढल असेल?? माहित करून घ्यायलाच हव, म्हणत चालक जिना उतरायला लागले....

"नमस्काsssर, नमस्काsssर मास्तर, याsss!! हितं कुणीकड वाट चुकली म्हणायची आज?? आव, म्हटलच हाय नाय का, साधू संत येती घराsssss, तोची दिवाळी, आन तोची दसराsssss!!" आपल्याच वक्तव्यावर खूष होत, चालक मोठयाने हसले! त्या हास्यातून सत्तेचा, पैशाचा माज जाणवत होता। "चला, हापिसात बसूयात आपल्या॥ अरे गणा, मास्तर आल्यातीsss काय चा वगैरेच बघ की जरा ल्येका!" शिपायाला त्यांनी चहासाठी पाठवल.... "बोला मास्तर, काय कामाने आलात म्हणायच हित?? कायतरी मोठ दिसतया, नायतर तुम्ही आजपावतर काय हित आल्याले मला तरी काय आठवना बघा...." इथल तिथल बोलत, मास्तरांच्या येण्यामागच प्रयोजन काढून घ्यायचा चालक प्रयत्न करत होते... "बोला मास्तर, तुम्ही आपलेच हाय की.. काय आडचण आसल तर सांगा की तस..... "

"नाही, म्हणजे, घरात जरा कार्य निघालय...."

"म्हंजे??? " चालक जरा कोड्यात पडले... "अन कसल कार्य म्हणायच आता ह्ये?? आरे होsssss आलं, आलं!! समद ध्येनात आल बघा!! जाईच लगीन ठरिवताय का?? आरे वा, वा, वा.... पन म्या काय म्हणीत व्हतो, बर का मास्तर, हितन तुमास्नी आस कितीस कर्ज भ्येटणार? आँ? त्यापरीस माझ्याकडे येक प्ल्यान हाय तो ऐका! अन त्ये जाईच्या लग्नाला आपल्या संस्थेचा हॉल वापरायचा बर का, आगदी संकोच म्हून करायचा न्हायी!! आन त्येच भाडं घेणार नाही आम्ही!! आमची बी ल्येकच की ती..." गोड गोड शब्द वापरून चालक आपले योजना मास्तरांच्या गळी उतरवू पाहत होते... " तर आस बघा मास्तर, आपल्याकडे सरकारी पावण येणार हायती, ह्येच हो, आपल शाळा बघत्याल, पोरांची प्रगती बघत्याल... आन सध्ध्या त्येंच्या काय योजना बी हाये म्हणत्यात. त्यातून आपल्या शाळेला काय अनुदान वगैरे पदरात पाडता येत का ते बघतो बघा मी... तुम्ही बघताच आता, किती खर्चिक काम आसतय शाळा चालवण..."

"मग यात मी काय करावे अशी अपेक्षा आहे आपली??" मास्तरांना संशय आणि मनातून संताप येत चालला होता... केवळ आपण इथे आलो आहोत म्हणून हा माणूस आपल्याला अशी वागणूक देऊ धजावतोय!!

"अजाबात काय बी करायच न्हाय तुमी उलट!! म्हणजी आस बघा, त्येंना माहित हायसा तुमी, राजा हरिश्चंद्राचे अवतार!! पण आमास्नी तस र्‍हाऊन नाय चालायच!! आणि आमी सगळ बिन बोभाटा काम करवून घेऊ!! अनुदान पण वाढवून मिळेल, पण आम्ही दिलेल्या अहवाला बाबत त्यानी तुम्हाला विचारल तर तुम्ही आमची री ओढा! त्यावर अनुदान अवलंबून हाय... तुम्हाला जाईच्या लग्नाला काय जी मदत लागल, ती द्यायची हमी आमची. ह्ये अनुदान मोठ हाय आन आम्हाला त्ये हव बी हाय!!"

"काय बोलताय तुम्ही हे?? मला खोट बोलायला सांगताय तुम्ही?? शाळा नावालाच आहे तशी, मुल येतात, शिकतात एवढच!! कित्येक योजनांसाठी अर्ज करून, शाळेच्या नावाखाली अनुदानं, फायदे पदरात पाडून घेतले जातात, मुलांना कसलाच फायदा होत नाही... आणि आता मला ही या पापात ओढू पाहता आहात??" मास्तर संतापाने थरथरत होते!! "केवळ मी कर्ज घ्यायला आलो, म्हणजे मी विकाऊ आहे अस वाटल की काय तुम्हाला??"

"आवं मास्तर, चिडायच कशाला? चिडू नका!! घ्या, पाणी घ्याsss बसा!" चालक मनातून संतापले होते! आवाजात हळू हळू संताप, गुर्मीची झाक येत होती, " येक ध्येनात राहू दे म्हणजे झाल, आजून जाईच लगीन झाल्याल न्हाय, त्ये मोडूही शकत, आन हो!! बरी आठवण झाली... काय हो मास्तर, तुम्ही सांगितलच असणार म्हणा मुलाकडच्या मंडळीना..... आता तुम्ही कधी खोट बोलत नाय, काय लपवा लपवी करत नाय म्हटल्यावर... ते तुमच्या बंधू राजांच्या करतुती सांगितल्या हायती का पावण्यांस्नी?? तुमच्या सारख्यास्नी कुटुंबातल एक माणूस खराब , आन ते बाह्येर कळल की आख्ख कुटुंबच पार कामातून जातय की!! या आता, विचार करून सांग काय ते, तशी काय घाई न्हाय आपल्याला..." छद्मीपणे हसत हसत चालक ऑफिसातून बाहेर पडले!

मास्तर सुन्न होऊन तिथेच काही वेळ बसून राहिले!! काय कराव? इथे नकोच, बँकेतून कर्ज घ्याव का?? तिथेही हाच माणूस संचालक पदावर!! जिथे तिथे खोडे घातल्याशिवाय राहणार नाही!! अन, धमकीही दिलीय वरून तुमच्या भावाबद्दल सांगेन म्हणून!! काय होईल जर सांगेल तर? दादासाहेबांना काय वाटेल? जाई इतका जीव लावून बसलीय अनिकेतवर.. काही बोलायची नाही आपल्याला पण दु:खाने झुरून मरून जाईल पोरगी.... आपण आपल्या भावाबद्दल सांगितल नाही , हे चुकल का आपल?? सांगायला हव होत का?? दादासाहेबांची अन घरच्यांचे काय प्रतिक्रिया होईल अस काही कळल तर?? पण आता त्याला किती वर्ष लोटली, अन जाईचा काय दोष? काय संबंध? माझ्या भावाच्या चुकांची शिक्षा माझी लेक भोगणार आता?? काय कराव? कोणाचा सल्ला घ्यावा?? " विचार करकरून मास्तरांच डोक फुटायची वेळ आली....

" का वो मास्तर, बर वाटत नाय का??" आत आलेला गणा विचारत होता....
" नाही रे बाबा, ठीक आहे... निघतो मी..." अतिशय जड पावलांनी मास्तरांनी घरची वाट धरली। घरी जाऊन आता हे सारे पत्नीला सांगायचे होते. सारेच कठीण होऊन बसले होते......


अपूर्ण.........

December 20, 2007

सुहृद - भाग ३

बागेत जाता जाता जाई हळूच सुनिताकडे पाहून पुटपुटली, "तू जाऊ नकोस हं कुठे, आमच्या बरोबरच थांब... "

सुनिताने जाईकडे बघत डोळे मोठ्ठे केले!! तिला जाम हसू यायला लागल होतं, कसबस गंभीर राहण्याचा प्रयत्न करत ती जाईला हळू आवाजात म्हणाली, "चक्रमच आहेस!! मी काय करू तिथे?? कबाबमें हड्डी! अनिकेत काय खातोय का तुला??"

"अग पण... अस काय ग... थांब ना... "

"गप ग...!! अनिकेत मारेल मला!! वेडी आहेस का तू?? मी आहे पलीकडेच..... तू बोलून घे, काय? कळल नं?"

घराच्या मागच्या बाजूला बसण्यासाठी सिमेंटचे छोटे बाक होते, तिथे मंडळी जाऊन बसली. थोड्याश्या इथल्या तिथल्या गप्पानंतर पाचेक मिनिटांत सुनिता काहीतरी कारण काढून तिथून उठली. सुनिता गेल्यावर अचानक वातावरणात थोडस अवघडलेपण भरुन आल.... दोन एक मिनिटं अशीच शांततेत गेली.... अचानक, एक क्षणी अनिकेत अन जाईची नजर एकमेकांना मिळाली, अन दोघांच्याही चेहर्‍यावर हसू उमलल...

"टेंशन आलय का??" अनिकेत जाईला विचारत होता. "खर सांगायच तर, थोडस मलाही आल होतच.... " अनिकेत हसर्‍या चेहर्‍याने सांगत होता.

जाईने त्याच्याकडे क्षण, दोन क्षण पाहिल. तीच फोटोतल्यासारखीच आर्जवी, हसरी नजर.... शांत, समजूतदार आवाज, बोलण्याची पद्धत... जाईला आत कुठेतरी अनिकेतबद्दल खूप विश्वास वाटला.
"जाई, तुला मान्य आहे ना हे लग्न? नाही, म्हणजे आई दादांना तू आवडली आहेस. दादांना तर एकदमच!! लेक घरी आणायची घाई झालीये त्यांना. ते तर पसंती सांगूनही मोकळे झालेत!! खर तर, अप्पांनी आम्हांला सुचवल तुझ स्थळ, आणि त्या सर्वांकडून तुझ्या विषयी अन तुझ्या कुटुंबाबद्दल चांगलच ऐकलय आम्ही. जे काही ऐकलय ते आवडलय. तुझा फोटोही दाखवला होता सुनिताने...." जाई जिवाचा कान करून ऐकत होती.... "आज तुला प्रत्यक्ष बघतोय. मलाही आवडली आहेस तू, पण तुझ्याही काही स्वतःच्या अपेक्षा, कल्पना असतीलच ना?? त्यात बसतोय का मी? माझे आई वडिल? काही घाई नाही जाई, तू विचार कर थोडा.... आणि ठरव, मगच कळव मला. हव तर सुनिताकडे निरोप दे... दादांनी खर तर एकदम अशी घाई नको होती करायला..."

"नाही, तस नाही.... " एकदम जाईच्या तोंडून शब्द निघून गेले!!

"म्हणजे...??" मिश्किल हसत, जाईकडे बघत अनिकेत विचारत होता. जाई त्या नजरेने मोहरली!! "नवरा मुलगा पसंत आहे तर तुला??" जाईने हसत, थोडस लाजत होकारार्थी मान हलवली. अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला!! किती निर्व्याज, मुग्ध दिसते ही!! "सुटलो बुवा एकदाचा!! तू नकार दिलास तर काय करू असा प्रश्न पडला होता मला तुला पाहिल्यापासून!!"

हसर्‍या, आश्चर्यचकीत चेहर्‍याने जाईने अनिकेतकडे पाहिले अन मनाला मनाची खूण पटली. जाई आता पहिल्यापेक्षा खूप सावरली होती.

"अनिकेत, एक सांगू का पण?"

"बोल ना.... काय झाल? काही अडचण आहे का??"

"नाही, तस नाही, पण थोड बोलू का?? मी आता एकुलती एक मुलगी आहे माझ्या आई बाबांची. लग्न झाल, दुसर्‍या घरात गेले तरी मला त्यांची जबाबदारी घ्यायची आहे. तुझ्या आई वडिलांना जस मी आपल करेन, तसच माझ्या नवर्‍यानेही माझ्या आई बाबांना आपलस केलेल मला आवडेल.... संसारात मला माझ्या नवर्‍याची सुहृद बनायला आवडेल आणि माझा नवराही माझा सुहृद असावा एवढीच अपेक्षा आहे माझी...."

अनिकेत आश्वासक हसला. "याबाबतीत तुला कधी तक्रारीची वेळ नाही येणार जाई... विश्वास ठेव माझ्यावर..."

"म्हटल, आम्हीं यावं का??" सुनिता येता येता हसत हसत विचारत होती!! " मी आपल म्हटल, की जाई येईल पाचच मिनिटांत सांगतsss, चल, जाऊया म्हणून!! काय ग जाई?? बघते तर तुम्ही आपले इथे गप्पा मारताय!! काय रे बोलत होता एवढ??" उत्तर म्हणून सुनिताला जाईने एक चिमटा काढला!! "आई गsss... हं!! चला आता!! वाट पहात असतील सगळे... पण काय रे अनिकेत..." सुनिताचा दोघांना चिडवण्याचा मूड अजून संपला नव्हता!! " बाग पाहिली का तू इथली?? अन ही वेल पाहिलीस का?? कशी छान बहरलीये ना? कसली आहे माहिती आहे काsss, जाईची!! जाई बघ किती फुललीय, आवडली का??" सुनिता मिश्किलपणे अनिकेतला विचारत होती.

सुनिताची बडबड ऐकून जाईने उगाच खोट्या रागाने तिच्याकडे पाहिल, मनातल्या मनात, अनिकेत काय उत्तर देतो, याची उत्सुकता तिलाही होतीच!!

"हो। खूप आवडली." अनिकेत जाईकडे बघत हसत उत्तरला. सुखाचा वर्षाव अंगावर झेलत फुललेल्या, आनंदी चेहर्‍याने जाई तिथून मागील दारातून घरात पळाली!!

बैठकीच्या खोलीत मास्तरांचा प्रश्न ऐकून दादासाहेब प्रथमच जरा गंभीर झाले होते... "दिक्षीतसाहेब, मला एकच मुलगा. तुमचीही एकच मुलगी. मला फक्त दोन चांगली घर जोडली जाण्यामधे स्वारस्य आहे. चांगली माणस जोडायची आहेत मला. आमच्या काहीच अपेक्षा नाहीत देण्या घेण्या बाबतीत, अगदी मनापासून सांगतोय. आपण एकत्रच लग्नाची सारी व्यवस्था पाहू. अहो, आमचाही एकच मुलगा, आम्ही ही जरा भाग घेऊ हौसमौज करण्यात!! कस?? आणि पत्रिकेच म्हणाल ना, तर माझा काही विश्वास नाही यावर. पत्रिका पाहण्यापेक्षा मी माणस पाहण्याला जास्त महत्व देतो!! पटतय का पहा... आता जर मुलांनी एकमेकांना पसंत केल असेल तर..."

एवढयात सुनिता अन अनिकेत पुढच्या दाराने आत शिरले. दोघांच्या चेहर्‍यांवरचा आनंद पाहून बैठकीतही सार्‍यांच्या चेहर्‍यावर हसू उमटल. मुलांचाही होकार सार्‍यांना कळला होता.

अप्पा म्हणाले, "वैनी, तोंड गोड करा आता! गजाननापुढे वात उजळा.... "

मास्तरांच्या पत्नी स्वयंपाकघरात देवापुढे निरंजन उजळण्यासाठी अन काहीतरी गोड आणण्यासाठी गेल्या. आत जाई हसर्‍या चेहर्‍याने उभी होती. लेक खूप खुषीत, समाधानात आहे, पाहून आईच मनही सुखावल, अन लेकीला त्यांनी मायेने जवळ घेतल....

अपूर्ण.....

December 19, 2007

सुहृद - भाग २

ठीक साडेचार वाजता, अप्पा आणि सुनिता दिक्षितांकडे आले. अनिकेत आणि त्याचे आई वडिल येणार, तेह्वा, दोन्ही कुटुंबाना ओळखणारे म्हणून अप्पांनी आपल्या घरी त्यावेळी हजर रहाव, अशी दिक्षितांनी विनंती केली होती, त्याप्रमाणे अप्पा आले होते. काही हाताखाली मदत लागली तर, म्हणून सुनिताही आली होती.

"येऊ का सर?? वैनी?? झाली का तयारी सगळी?? सुनिता बेटा, तू जा जाई काय करतेय बघ बर... " अप्पांनी सुनिताला जाईकडे पिटाळल.... "सर, वैनी, कसलीही काळजी नको!! सगळ छान होणार बघा... "

"तस झाल ना भावोजी, तर तुम्ही काय म्हणाल ते गोडधोड करुन घालेन हो मी तुम्हांला... गजाननच बोलूदे तुमच्या तोंडून!!"

"अप्पा, या, या, बसा, पहा सगळ आहे ना व्यवस्थित? ठीकठाक वाटतय ना??"

"छान आहे हो सर, उगाच काऴजी का करता? सगळ उत्तम आहे, अन मुख्य म्हणजे आपली जाई म्हणजे शंभर नंबरी सोन आहे!! पसंत पडणारच! मी सांगतो ना..."

अश्या गप्पा सुरु असतानाच अचानक मिश्किल हसर्‍या स्वरात एक प्रश्न आला, "नमस्कार, याव का आम्ही??" सगळ्यांनीच आवाजाच्या दिशेने पाहिल. अनिकेत अन त्याचे आई वडिल दरवाज्यात उभे होते, आणि अनिकेतच्या वडिलांनीच प्रश्न केला होता. तिघांना पाहताना, त्यांच्या चेहर्‍यांवरचे हसरे, शांत, मैत्रीपूर्ण भाव निरखता निरखता, दिक्षित मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला हायस वाटल।

"अरे, या, या, याsss दादासाहेब, या वैनी... कसा आहेस रे अनिकेत?" अप्पा स्वागताला उठून उभे राहत म्हणाले, पाठोपाठ दिक्षितांनीही सर्वांच स्वागत केल. सारे आपापल्या जागेवर स्थिरस्थावर झाल्यावर, अप्पांनी सर्वांची एकमेकांशी रीतसर ओळख करून दिली. अनिकेतचे आई वडिल, अप्पांनी म्हटल्याप्रमाणे, बोलायला अन वागायला मोकळे ढाकळे होते, मुलाकडची बाजू वगैरे असला कसल्याही प्रकारचा अभिनिवेश त्यांच्या बोलण्या वागण्यात नव्हता. दादासाहेब तर विलक्षण बोलघेवडे होते, आणि त्यांनी लगेच गप्पांची बैठकही जमवून टाकली होती!! अनिकेतचही वागण, बोलण मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला आवडल होत. पंधरा एक मिनिटं गप्पांमधे गेल्यावर दादासाहेब एकदम आठवल्यासारखे म्हणाले, "अरे हो, पण आधी उत्सव मूर्तीला बोलवा आजच्या! आमच काय, आम्ही आपल सावकाश बघू होsss गप्पा, चहा झाला की निवांत!! आता आमच्या सुनिताची मैत्रीण म्हणजे छानच असणार!! पण आमच्या हिला धीर निघत नसेल जाईला बघायचा!! काय रे अनिकेत? खर की नाही??"

"अहो, काय उगीच जिथे, तिथे थट्टा तुमची!!" अनिकेतची आई हसत उद्गारली. अनिकेतच्या चेहर्‍यावरही हसू उमटल होत. वातावरण सैल झाल, आणि अप्पांनी सुनिताला हाक मारुन जाईला घेऊन यायला सांगितल. सुनिता आणि जाई चहा आणि खाण्याच घेऊन आल्या।

"कशी आहेस ग सुनिता?" दादासाहेबांनी लगेच सुनिताकडे मोहरा वळवला, "आणि ही जाई ना?? ये बेटा, बैस इथे. अग, लिस्ट काढ ग ती प्रश्नांची, परीक्षेला सुरुवात करूयात!! काय ग जाई, करु का सुरुवात?" सगळ्यांच्याच चेहर्‍यांवर एक मिश्किल हसू होत।

"अं...??" आधीच जराशी घाबरलेली जाई अजूनच बावचळली आणि तश्याच गोंधळलेल्या चेहर्‍याने तिने आळीपाळीने दादासाहेबांकडे आणि आपल्या आई वडिलांकडे पाहिल! तिचा गोंधळ बघून, सगळेच हसायला लागले, तस काही सेकंदांनी तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि एक प्रसन्न हसू तिच्या चेहर्‍यावर उमटल! प्रसन्नपणे हसणारे अनिकेतचे आई वडिल बघता बघता, त्यांच्या डोळ्यामधली, चेहर्‍यावरची आपुलकी पाहता पाहता ती निर्धास्त झाली. आपल्या आई बाबांसारखेच दिसताहेत की... तिच्याही मनात एक आपुलकीची भावना रुजू झाली, अन अनिकेत? हसता हसता झालेली निमिषार्धातली नजर भेट एकमेकांना खूप काही सांगून गेली होती.... जाईच मन सुखावल होत... सुनिताने खरच सांगितल होत तर....

"सर, आम्हांला तुमची लेक एकदम पसंत बघा!! काय ग, तुला आहे ना पसंत?? का नको म्हणतेस?? का रे अनिकेत? आवडेल का आईला??"

"अहो, काय हे परत!! कशाला छळता त्याला?" अनिकेतची आई हसतच म्हणाली... "पसंत आहे हो मला!"

"चला, एक काम झाल!!" दादासाहेब म्हणाले, "आता आपण बसू गप्पा मारत, सुनिता ताई, आता तुम्ही एक काम करा, अनिकेतला जरा सरांची बाग दाखवा, अन जाईला माहीत असेल बागेची, तेह्वा तिलाही घ्या बरोबर, कस??"

सुनिता या संधीची वाटच पाहत होती, लग्गेच तिने दोघांना घेऊन बाग गाठली।

आत बैठकीमधे सरांनी दादासाहेबांना विचारल, "दादासाहेब, मुलगी पसंत आहे म्हणालात, आनंद वाटला, पण आपण पत्रिका वगैरे मागितली नाही, तसच आपल्या काय अपे़क्षा आहेत, याचा जरा अंदाज आला असता तर..... "


अपूर्ण
....

December 17, 2007

मैत्रिणीची व्यथा

आज एका मैत्रिणीचा फोन आलेला. बर्‍याच दिवसांनी. ती पण बिझी आहे सध्ध्या, अन मी पण! निदान, मी खूप बिझी आहे, अस मी सांगते तरी!! म्हणजे हल्लीच ठरवल की अस सांगायच.

I hardly get time for my own things, you knowऽऽऽऽ ! कप्पाळ!!

पण काय करणार?? आयटीसारख्या क्षेत्रात आहे अन बिझी नाही म्हटल , म्हणजे समोरची व्यक्ती, अगदी काय ध्यान आहे अश्या नजरेने बघते असा काहीसा अनुभव! त्यापेक्षा खूपच बिझी आहे अस म्हटल, की समोरच्या व्यक्तीला जरा पटत असाव, की असेल बुवा आयटीमधली! माझ्या शेजारणीला पण मी बिझी असण्याच कौतुक! नसले तरी!! आम्ही कधी गप्पा मारत उभ्या असलो, अन तिच्या बहिणाबाई तिला भेटायला म्हणून आल्या तर त्यांना ती लग्गेच सांगणार, अग आजच दिसतेय ही तुला, नाहीतर इतकी बिझी असते!! आता असे बरेच 'आज' बहिणाबाईंनी माझ दर्शन घेतलय म्हणून ठीकेय!! असो। तर गाडी मूळ मुद्द्याकडे आणूया.

तर, मैत्रिणीचा फोन आलेला, अन खूपच उदास अन डिप्रेस्ड वाटली... काय झाल विचारल्यावर, म्हणाली, ऑफ़िसमधे पॉलिटिक्सचा त्रास होतो आहे... मजा म्हणजे त्रास देणार्‍या पण स्त्री सहकारीच!! इतका वैताग आला हे ऐकून! मैत्रिण सरळ, साधी आहे माझी, खरच। आत बाहेर अस काही नाही, छक्के पंजे फ़ारसे पटकन लक्षात येत नाहीत, येई पर्यंत वेळ निघून गेलेली असते. कामात चोख, म्हणून पाट्या टाकणार्‍यांच्या मते शिष्टच आहे!! हे कोड काय आजता गायत उलगडलेल नाही बुवा मला!! कामात चोख असण हे शिष्टपणाच लक्षण आहे?? नेहमीच टिपिकल गॉसिपिंग नाही, तसल्या गोष्टीत फ़ारसा इंटरेस्ट नसतोच तिला कधी, आणि मुख्य म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करायला जमत नाही तिला.

आणि म्हणाली, इथेच घोड पेंड खातय सध्ध्या!! त्रास देणार्‍या स्त्री सहकार्‍यांपैकी एक जण जरा सिनियर कामामधे, अन दुसर्‍या दोघी तिच्या पिट्टू!! पण सध्ध्या सिनिअर बाईंना हिच्यामुळे जरा स्पर्धा!! अर्थात अस काही हिच्या मनातही नव्हत। आणि मैत्रिणीचा स्वभाव माहित असल्याने, मी याबाबतीत १००% खात्री देऊ शकते! ते सगळ तिथूनच आलय. त्यामुळे सध्ध्या जोरदार आघाडी विरुद्ध एकटी उभी आहे!! बर, तक्रार तरी काय करणार? अस काहीच नाही की जे ती प्रूव्ह करू शकेल... पण त्यांच्या वागण्याच्या पद्धतीचा नाही म्हटल तरी त्रास हा तिला होतोच!! आणि पुन्हा त्यांच्याइतक्या क्षुल्लक पातळीवर ती उतरूही नाही शकणार.....

मी तरी तिला ह्या असल्या लोकांकडे दुर्लक्ष करायचा सल्ला दिलाय, पण डोळे उघडे ठेवून। जिथे जमेल अन गरज असेल तर, तडाखा दिल्याशिवाय रहायच नाही. स्वत: तर कोणाच्या वाटेला विनाकारण जात नाही ना? मग? इतर कोणी आपल्या वाटेला जाणार असेल, तर कधी कधी अरेला कारे म्हणण प्राप्त आहेच. मैत्रिणीच काम चोख आहे, हीच तिची सगळ्यात मोठी जमेची बाजू. अंगी गुण असतील तर व्यक्ती चमकल्याशिवाय राहणार नाहीच. हळूहळू मैत्रिणीची दखल ऑफ़िसात घेतली जातेय अन नेमक हेच खटकतय वाटत या दोघी तिघींना. का?? ते नाही ठाऊक.

कधीतरी मैत्रिणीला 'खटासी व्हावे खट, नटखटासी नटखट' हे धोरण स्वीकारावच लागेल मात्र. मी हे सांगितलय तिला. पाहू, म्हणाली.

तुम्हाला काय वाटत यावर??

December 16, 2007

सुहृद - भाग १

दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…

कुलकर्णी स्थळाची माहिती देताना म्हणालेही होते, "काळजी करू नका सर, अगदी चांगली माणंस आहेत ही. मला ठाऊक आहे, तुम्हांला जाईची काळजी वाटते, तुमच्या काळजाचा तुकडा आहे जाई, पण माझी खात्री असल्याशिवाय मी तुम्हांला अस तस घर दाखवणार नाही. अहो, माझ्या चांगल्या परिचयाची माणस आहेत…"

"नाही हो अप्पा, तुमच्या हेतूविषयी काहीच शंका नाहीत माझ्या मनात, पण तरीही मनात आपले नाही नाही ते विचार येतात हो… आणि पुन्हा, मी काही खूप काही डबोल बाळगून असलेला माणूस नाही. साधासुधा शिक्षक या गावातला. शिक्षणाचा बाजार करण आणि माया जमा करण, मला काही शक्य झाल नाही, यापुढे होणार नाही, त्यामुळे व्यवहारात माझ्यासारख्या माणसाची किंम्मत तशी शून्यच! मी आपला या गावातच राहिलो, शाळेत, विद्यार्थ्यांत रमलो. मनापासून शिकवल, पण या सार्‍याला व्यवहारात किंम्मत नाही हो.... आजच्या जगात तरी नाही! अन आताशा मला हे फार टोचत, खर सांगायच तर, तत्वांवर चालणारा माणूस मी, पण अस वाटत हल्ली कधी कधी की या तत्वांपायी मी आमच्या हिच्यावर अन जाईवर अन्याय करतो की काय... आता ह्या बघायला येणार्‍या मंडळींच्या काय अपेक्षा असतील, काय माहीत? उगाच न झेपणार काही असल तर? हुंडा वगैरे माझ्या तत्वांत बसणार नाही, रीतीप्रमाणे, खुशीने जमत तेवढ करणारच मी सगळ, पण त्यांच्याही मनाला आल पाहिजे... अश्या बाबी वरून बैठक मोडली तर, तुम्हालाही वाईट वाटायच.... "

"पैजेवर सांगतो सर मी तुम्हांला, अस काहीही होणार नाही बघा. अहो, ती माणसही तुमच्याच सारखा विचार करणारीच आहेत, पहालच तुम्ही....." आज परत एकदा, मास्तरांना हे बोलण आठवून गेल. अप्पांनी दिलेला भरवसा होता, पण स्वत: भेटल्याशिवाय, बोलल्याशिवाय काही खर नाही... मास्तर मनाशीच म्हणत होते.

मास्तरांच्या पत्नीची फारशी वेगळी अवस्था नव्हती. त्यांनाही चिंता लागलीच होती, जरा धाकधूकच होती. मनातल्या मनात, गजाननाला आळवून झाल होत... "देवा गजानना, सगळ काही व्यवस्थित पार पाड रे बाबा! तुला एकवीस संकष्ट्या मोदकांचा नैवेद्य दाखवीन बाबा... एवढस गाव रे, त्यात असली बातमी लपूनही राहणार नाही, आणि हे जमल नाही तर, लोकांना लगेच चघळायला विषय!! नकोरे गजानना, असल काही..." किती वेळ त्या गजाननाला आळवत होत्या....

अन जाई? जराशी गोंधळलेली, जराशी वैतागलेली... उगाच जरा धडधडत पण होत! शेजारच्या अप्पांची सुनिता येऊन चिडवून गेलीच होती!! एकदम छान जोडा शोभेल म्हणे!! एवढ काही कौतुक नकोय करायला त्याच!! जाईने उगाच नाक उडवल!!

तिला आठवल, सुनिताने फ़ोटो आणला होता दाखवायला....

जाईने आपल खूप लक्ष न देऊन पाहिल्यासारख दाखवल खर सुनिताला, पण सुनिताही जाईला लहानपणापासून ओळखत होतीच!! "इथेच ठेवून जाऊ का ग फोटो?" मिश्किलपणे हसत हसत सुनिता विचारत होती, "नाही म्हणजे कस, की मी इथून गेले ना, की कस अगदी नीट बघता येईल हो फोटो!! काय??"

"सुनिटलेऽऽऽऽ!!" सुनिताच्या पाठीत एक धपाटा बसला!! तरीही सुनिताच हसणं काही आवरेना! मग दोघी मैत्रिणी हसत सुटल्या!!

थोड्या वेळाने सुनिताच जरा गंभीर होत म्हणाली, "जाई, अनिकेत खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, आवडेल तुला ग.... माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यांच कुटुंबच चांगल माहितीतल आहे आमच्या. अप्पांची इथे बदली होऊन यायच्या आधी आम्ही दुसर्‍या गावी होतो तेह्वा ते शेजारीच होते आमचे, एकत्रच वाढलोय ग आम्ही, अगदी बहिण भावासारख. अगदी तुला जस आवडेल तसच घर आहे ग त्यांच.. काका आणि काकी खूप प्रेमळ आहेत बघ. तू नाही म्हणू नकोस ग..."

"अग पण..."

"पण काय आता? जाई, माणस चांगली आहेत, संस्कारांना मानणारी आहेत, स्वाभिमानी, सचोटीने वागणारी आहेत. अनिकेतलाही चांगली नोकरी आहे, एकमेकांना जपून, धरून राहणारी माणस आहेत ग... तुझ्या सारख्या मुलीला जस मिळायला हव, तस घर आहे ग अगदी...... असच होत नं मनात तुझ्या?"

"हो, अग पण , त्या मुलालाही आवडायला हवी ना मी?? मी अशी साधी..."

परत एकदा मिश्किल हसत सुनिता म्हणाली, "आवडलीयेस ग!! पाहिलय त्याने तुला फ़ोटोत, मीच दाखवला त्याला फोटो..."

थक्क झालेल्या जाईच्या हातावर फोटो ठेवून सुनिता हसतच तिथून निघून गेली होती... जाईची नजर आपसूक फोटोकडे गेली, तेह्वा, अनिकेतची हसरी नजर आपल्याला काही विचारतेय अस उगीच तिला वाटून गेल! इतकी मनाचा ठाव घेणारी नजर.......

आता परत एकदा जाईला सगळ आठवल, आणि उगाच तिची धडधड वाढली! आज प्रत्यक्ष भेट होणार होती......

अपूर्ण....

सुमल्याची आश्रम वारी!!... (३)

"रे, माका काय न चलूक?? पण सुमल्याक पण विचारुक व्हया मां? तेणी हो म्हणूक व्हया मां? आयला तर बराच होईत, आमका ही काळजी नाय होईत, आणि पोरग्या आसाही चुणचुणीत, काय हो मास्तर, तुमका काय वाटता??"

"माझ अनुमोदन आहे हो!! हुशारच ती, पण शिकली नाही!! नाहीतर आज गावाचे नाव काढले असते हो पोरीनं!! हंऽऽऽ! कमी का समजावले मी तीस आणि तिच्या आईस आणि बापूसाक?? पण नाहीं!! कोणी फारसे मनावरच नाही घेतले!! असो. रे बाबल, येऊ दे हो सुमतीला आमच्या सोबत. भारी तीक्ष्ण नजरेची पोर आहे होऽऽऽ आणि तुझ्या काकीबायची आवडती पण. बायका बायका घालतील घोळ एकत्र, आमच्या डोक्यांस शांतता!! कसें??"

आणि अश्या रीतीन ठरला, काका, मास्तर आणि दोघांचे फ़्यामिल्ये, गुरव आणि सुमल्या, येवढे मंडळी जावन आश्रम बघून येतली.

सुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो.

"सुमल्याऽऽऽऽऽ गो सुमल्याऽऽऽऽऽ!! चल, हिकडे ये बघया चटचट!! गो सुमल्या!! अगो, चल लवकर, माका कामा आसात गोऽऽऽ! काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर?? चल, चल!! "

"रे, काय झाला, मेल्या वराडतस कित्या धोतराक आग लागल्या सारखो?? काऽऽऽय, काय झाला?"

"गो, सामान बांधूक घे, समाजलय? तुका जावचा आसा, आश्रम बघूक... बरोबर काका, काकीबाय, मास्तर, मास्तरीणकाकी, गुरव सगळे आसत, तेह्वा तशी चिंता करा नको, काय तुका येकट्याकच धाडणव नाऽऽय.... पण थय सगळा डोळे उघडे ठेवन बघ, समाजलय मां?? येकदम वेवस्थिशीर रिपोर्ट मिळाक व्हयो हयसर, कितपत पाण्यात आमी आसव ता कळाक व्हया! आपले अडाणी कोकणी लोक म्हणान कोणी शेंडी लावूक जातीत, तर तसा होता कामा नयेऽऽऽ, आयला मा ध्येनात?"

सुमल्याचो वासलेलो आ अजून तसोच होतो, आता शेहराकडे जाणा तेका तसा नवीन नव्हता, पण तेची आपली ठरलेली वारी होती, आणि एक मामाचा ठिकाण सोडून अजून खयच ता फारसा जावक नाय होता. आणि आता एकदम आश्रम बघूक जावचा??

"अगोऽऽऽऽ काय?? समाजला का नाय तुका?? जातलय मां?? "

"गेऽऽऽऽ बाये माझ्याऽऽऽ!! काय सांगतय तरी काऽऽय.... खराच सांगतसय का भगल करतसय?? माका नेतत आश्रम बघूऽऽऽक?? रे, रव रे, चाय हाडतय इल्ली......"

चाय बरोबर सुमल्यान बाबल्यापुढे रव्याचो लाडू पण ठेवलो। चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचन दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!! पण गावच्या इज्जतीचो आणि भलायकीचो सवाल होतो ना!!

आणि मग, प्रस्थानाचो दिवस उजाडलो! एव्हाना, महाराज पण बाकीच्या पंचक्रोशीत फिरणार होते, आजूबाजूच्या गावातल्या लोकांक त्येंच्या पवित्र दर्शनाचो लाभ देणार होते, आणि काय काय करुचो त्येंचो विचार होतो हे त्या श्रीकृष्णाकच ठावक होता!!

आश्रमाक जातले लोकांच्या प्रवासाखातेर, एका भक्ताची आरामदायक क़्वालिस डायवर सकट तयारच होती, तर, शुभस्य शीघ्रम म्हणत, बर्‍याश्या मुहूर्तावर, सगळा लटांबर गाडीत बसून आश्रमाच्या वाटेक लागला येकदाचा.....


अपूर्ण....

December 14, 2007

मार्गी दूरच्या एकल्या......

दिठ तुझी माझी कधी,
क्षणी एका रे गुंतली
मौन आर्जवाची तुझ्या,
वेडी भूलही पडली

अश्या वेड्या वेडासाठी,
केली आयुष्याची होळी
झुगारूनी ऋतू सारे,
वाट काटेरी धरली

वेड हेच आता माझे,
आहे माझ्या सोबतीला
वाट चालते सांगाती,
मार्गी दूरच्या एकल्या......

December 8, 2007

मी ब्लॉगतेय!!

मागच्याच एक पोस्टमधे मी म्हटलय ना, मला दाट शंका येतेय की मी ब्लॉग जंकी बनत चाललेय म्हणून?? आता ती शंका खात्रीत बदललेली आहे! अगदी खात्रीच झालीये माझी, शंभरच काय हजार टक्के, की मी एकदम अव्वल दर्जाची ब्लॉग जंकी बनलेय म्हणून!!

जेह्वा सुरुवातीला एक मित्राने सुचवल की ब्लॉग बनव स्वत:चा वगैरे, तेह्वा मी अगदी खोडूनच काढल त्याला!! छे, छे, मला नाही जमणार वगैरे!! तशी जरा निरुत्साहीच होते या सगळ्या प्रकरणाबद्दल. मग जेह्वा त्याने ठरवलच अगदी, की माझा ब्लॉग असायलाच हवा, तेह्वा, हो, हो केल आणि थोडेफ़ार कष्ट घ्यायचा प्रयत्न केला!! :P

म्हणजे ते टेंप्लेट निवडण वगैरे, वगैरे… तपशिलात जात नाही कारण, सगळ्यांनाच माहीत आहे काय काय कराव लागत ते… :P हे सुरुवातीचे कष्ट घेणे प्रकार जरा वैतागवाणा. आणि मी जऽऽऽराशी(च) आळशी आहे, त्यामुळे, हे असे कष्ट कोण घेणार, हे एक मोठ्ठ प्रश्न चिन्हच! आणि ही सगळी पूर्वतयारी संपली की मग, लिहायला सुरुवात करायची!! फारच लांबचा पल्ला होता!!

पण मित्र तारी, अन ब्लॉग सुरु करण्यातही मदत करून देई!! नंतरच्या बर्‍याच छोट्या, किचकट अन महत्वाच्या गोष्टी या माणसान अगदी न कंटाळता केल्या. किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, पण त्याला नाही आवडणार, म्हणून, इथे एका वाक्यात मनापासून मानतेय. अगर तुम नहीं होते तो मेरा ब्लॉग नहीं होता!! :P

आणि मग, पोस्टायला सुरुवात केली, मिळणार्‍या कमेंट्सनी पण उत्साह वाढत गेला, आणि मंडळी वाचतात आपण लिहिलेल, ही भावना पण सुखावणारी तर खरीच. आता हा उत्साह किती दिवस टिकतो ते बघू!! तो भाग अलाहिदा!! सध्ध्या तरी हे सगळ मी मस्त एंजॉय करतेय.

आता यात कसला आलाय जंकीपणा अस वाटतय का तुम्हांला?? तर तस नाहीय, मी सध्ध्या इतर ब्लॉगही खूप वाचते, ते ही नॉर्मल आहे, म्हणता?? पण माझ नुसते पोस्ट्स वाचूनच समाधान नाही होत आताशा, मला त्यावर पडणारे कमेंटस पण वाचायचे असतात आणि आता तर आधी कमेंट्स वाचून, कमेंटमधे काय लिहिलय ते कळाव, त्याचा अर्थ लागावा म्हणून मी पोस्ट्स वाचते!!

बोला आता!!

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

"अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!"

"मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??"

"होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!! सगळ्यांचा एक झटक्यात झालेला एकमत बघून पारही अचंबित झालो!!

"अजून कोणाक धाडूयात?? ओ गुरवानु, तुम्ही जाशात काय?? तुमका आपला देवाधर्माचा माह्यत आसा, तुम्ही जावात काकांबरोबर..... काय हो काकानुं??"

परत एकदा होय, होय असो घोष झालो, अशा रितीन दोन मेंबर तरी ठरले.

"आता अजून कोणाक धाडूयात??"

"मी काय म्हणतय, आपल्या शाळेचे हेडमासतर आसत, तेंका जावदे हेंच्या बरोबर! जरा शहाणो माणूस बरोबर असलो म्हणजे बरा, नाऽऽऽय?"

"म्हणजे रे काय?? काका आणि गुरव काय वेडे रे?? काऽऽय मेलो बोलतासाऽऽऽ, समाजली अक्कल! उगी रव!!"

"रे उगीच अकलेवर जाव नको हां!! सांगान ठेवतय!!"

"अरे, अरे काय ह्या?? सतत कसले रे भांडत रवतत!! बायल माणसा तरी बरी रे तुमचेपेक्षा!! उगी रवात बघया!! आरे मास्तरांका असांदी बरोबर, मीच सुचवतलय होतय ह्या, शिक्षक आसात ते, चार बुका वाचलेली आसत, तेंका कळता बरा वाईट आपल्यापेक्षा… असांदेत" इति काका.

"आणि आता बायल मनशा कोण कोण जातली?? ह्यापण ठरवा बघू…"

"बायल मनशा?? ती कित्यां आणि?? थय काय तुझ्या आवशीचा डोहाळ जेवाण आसा की काय?? आणि बायल मनशा जातली आणि हयसर घराकडे कोण बघतला?? काय पण मेलो सांगतासा!!"

"अरे असा काय, ते स्वामीच नाय सांगी होते, की बायला माणसां पण येवूक व्हयी आणि तेणी पण बघूक व्हयो आश्रम म्हणान?? ता मी सांगी होतय!! आणि काय रे चुकला माझा?? बायल माणसांका बरोब्बर समाजता, कसा काय वातावरण आसा तां, समाजला?? तेंच्या दृष्टीन पण बघूक व्हया ना?? आजकाल सरकारात पण तेत्तिस टक्क्यांची भाषा करतत, वाचलेलय मां पेपरात?? मगे?? काय नुसतेच आपले नट्यांचे फोटो बघीत रवतय??"

"तां खरां, अरे मेल्या पण असा जाताला कोण घरदार अन पोरा टोरां टाकून??"

" मी सांगू कोणाक धाडूचा ता??" बाबल बोललो.

"बोल, बोल बाबल, काय म्हणी होतय?" काकांन विचारल्यान.

"काकांनु, ह्या तर खराच की कोणी घरातसून बायल माणसांक तसा पाठवचा नाय.... आता बायल माणसाबरोबर घोवाकय धाडूचो लागतलो मांऽऽऽ.... त्यापेक्षा, तुम्हींच काकीबायेक घेवन जायात आणि मास्तरानुं तुम्ही मास्तरीणकाकीक नेयात होऽऽ... कसा?? आणि बरोबर सुमल्याक नेयात!"

"रे, ह्या समाजला की, काकीबाय आणि मास्तरीणबाय जातले, ता ठीक, पण सुमल्या कित्या आणि?? थय काय हळदी कुंकू आसा काय रे?? काय फुगडे घालूचे आसत??"

"च्च!! इतक्या समाजणा नाऽऽऽय तुका?? रे, ही तशी जरा म्हातारी मंडळी जातत मां..... काकानु, मास्तरानु, रागाव नकात हांऽऽ म्हातारा म्हटलय म्हणान, पण आता तुम्हीच सांगात बघया, मी काय खोटा म्हणतय काय?? सुमल्या जायत तर तेंची काळजी घेईत नाऽऽऽयऽऽ.... अगदीच कसो रे तुझो वरचो भाग रिकामो?? द्येव विसारलो मुद्देमाल ठेवूक की मेल्या तू धावलेलय मागच्या बाजूक द्येव अक्कल वाटीत होतो तेंव्हा??"

"....मगे काकानु, काय वाटता तुमका??

अपूर्ण....

December 7, 2007

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(२)

.... हे अगदीच राहवल नाही म्हणून!! अतिशय आनंदाने पोस्ट करतेय! :)

ज्या सहकार्‍याला मी आजपर्यंत सर्वात जास्त पिडलय ना की ताटातल टाकू नको म्हणून, तो माझ्या बरोबर कँटीनला आला होता जेवायला अन ताटात चक्क मोजकेच पदार्थ अन मोजक्या प्रमाणात!!!!

मला म्हणाला की "देखो, आज तुम्हारी बात का असर हो गया"

जेवणाच्या शेवटी स्वच्छ ताट पहायला त्यालाही बर वाटल, मला तर इतक बर वाटल!! आता तोही सांगेल म्हणे इतरांना. ऐकूनच छान वाटल. :)

अगदी ज्योतसे ज्योतच झाल की!!! :)

मराठीचिये पाईंका वक्र पाहे....

हा आजचा किस्सा, असच आज आठवला म्हणून... गमती, गमतीत :)

काय झाल, की बंगळुरुत आल्यावर एखाद्या तहानलेल्याला जस पाणी, पाणी व्हाव ना, अगदी तस्सच, मला मराठी, मराठी झाल होत!! कुठेही जा, आपल, कुडुकुडूच ऐकू यायच!! आणि मराठी आठवून बेचैन व्हायच!

नाही, नाही, माझी कुठल्याही भाषेशी कसलीही दुश्मनी नाहीये. खर सांगायच तर मला वेगळ्या भाषा शिकायला आवडत. वेगवेगळे शब्द वगैरे. आतापण माझ्याबरोबर काम करणार्‍या सहकार्‍यांना मी पीडतच असते की कन्नड शिकवा वगैरे..... शिकवणी सुरुपण झालीये अख्ख्या टीमकडून! :D मजा येते, पण शेवटी माय मराठी ती माय मराठीच ना?? म्हणजे मी ही अधून मधून विंग्रजी शब्द वापरतेच, अस काही ज्वलंत भाषाभिमानीपणा वगैरे नाही करत, पण शेवटी आपली भाषा ती आपलीच भाषा.

आता बघा, की जर मला म्हटल, की तुला २ पर्याय आहेत, सुंदर अलंकारयुक्त अस काही तरी कन्नड ऐक - आता खर तर,मुळात साध कन्नड पण मल येवढ येत नाही, तर अलंकारयुक्त काय कळणार कप्पाळ!! पण सध्ध्या कन्नड भागात आहे, मग पटकन तेच आल मनात, बर, हिंदी म्हणूयात - तर सुधारीत आवृत्तीनुसार अलंकारिक हिंदी ऐक, किंवा मराठीतल्या शिव्या ऐक, कोणता पर्याय निवडशील?? दुसर्‍या क्षणाला, मी भन्नाट शिव्या ऐकण्याचा पर्याय निवडेन!!! खरच, शप्पत!! यावर काहीही म्हणालात, तरी शेवटी, माझ्यासाठी, माझी मराठी आहेच माझा बाब्या!! आणि यावर कोणाचेच, काहीही विरुद्ध मत मला ऐकायचे नाहीये!! खलास!! :D

आणि तसही बरका, विरुद्ध, अभ्यासपूर्ण, चिकित्सक, तात्विक मतं मांडायचे, अन तीच मतं कशी योग्य आहेत (बरोबर नव्हेत, योग्यच!! बरोबर मत अस म्हटल की ते फुटकळ मत वाटत, योग्य म्हटल की कस एक वजन येत त्याला!) हे आग्रहानं आणि अट्टाहासानं प्रतिपादन (शब्द फाऽऽर महत्वाचाय बर!!) करण्याचे सगळे घाऊक हक्क आम्हां पुणेकरांकडे अत्यंत सुरक्षित आहेत!! कायमच्या निविदा भरल्यात आम्ही त्यासाठी अन त्या मंजूर झाल्याच असाव्यात!! :D त्याशिवाय का आम्हांला जमत अस हे वागा बोलायला सगळ आणि ते ही सतत?? असो, खूपच विषयांतर झाल.

तर, इथे आल्यावर, हापिसमधे कोणी माझ्या मराठीचिये कौतुके बोलणारे आहे का, ह्याच शोध घ्यायला लगेच सुरुवात केली आणि सुदैवाने चार एक टाळकी सापडली. बर वाटल, मग अर्थात आम्ही एकमेकांशी मराठीतूनच बोलायचो/बोलतो, जाम धमाल यायची आणि येते गप्पा मारायला, आणि सगळ्यात ग्रेट म्हणजे, दोन जण माझ्याच टीममधे आहेत.

तर, असच एकदा, गप्पा मारताना माझा एक मद्र देशीय सहकारी तिथे आला, रीतीप्रमाणे त्यालाही हाय हॅलो केल, कस चाललय वगैरे विचारल.. आणि, अर्थात हे विंग्रजीमधून, कारण, त्यांना एक मद्र आणि दुसरी विंग्रजी ह्या दोन भाषा सोडून, अगदी ते राहतात त्या राष्ट्राची भाषा बोलायची पण विलक्षण एलर्जी आहे!!

आणि कोणी काही लेक्चर द्यायच्या आत सांगतेय, मी मुळीच सगळ्यांना एकच पट्टीने मोजत नाहीये. माझी शेजारीण पण मद्र देशीयच आहे, आणि आमच एकदम गूळपीठ आहे. आणि ती चक्क मस्त हिंदीही बोलते, अन कधी कधी मला पण मद्र भाषेतले शब्द शिकवते, आणि मी ही शिकते. कुठलीच भाषा शिकायच मला काही वावड नाहीये, विरोध आहे तो प्रवृत्तीला, राष्ट्र भाषा येत नाही याचा अभिमान कसला?? हा तर निव्वळ करंटेपणा आहे, अस माझ मत आहे.

तर, सुरुवातीला ठीक बोलत होतो आम्ही इथल तिथल, मग तो एकदम, आमच्या मराठी बोलण्यावरच घसरला!! आणि मग ही मुक्ताफळ उडाली!! तेच मूळ संवाद घालायचा मोह आवरत नाहीये, म्हणून त्यातल्या त्यात सेंसॉर करून... :D

मद्रमॅन: व्हाऽऽट इस धिऽऽसऽऽऽ यू आल आऽऽऽऽलवेज स्पीक इन यूवर लॅंग्वेऽऽज... धिऽऽस इज वेऽऽऽऽरी रॉंग! ग वर जोर देऊन!

आम्ही जरा उडालोच!! अरेच्या! याला काय चावल आता!! आधी आम्ही समजलो की तो खेचतोय आमची, मग लक्षात आल की, तस नाही, खरच म्हणतोय तो, तेवढ्यात,

मद्रमॅन: यू मस्ट स्पीक इन अवर लॅंग्वेज, दु यू नो, देअर इज नोऽऽऽ लॅंग्वेज लाईक अवर्स!! इट इज इंटऽऽऽर् नॅशनल लंग्वेज, यू नो??

आमची डोचकी सटकायला लागलेली!!

मी: इंटरनॅशनल?? सिन्स व्हेन?? हाउ कम??

मद्रमॅन: यू डोंट नो?? व्हाऽऽट यू आर सेईंग?? इट इज स्पोकन इन श्रीलंका, यू नो दॅट???

आम्ही प्रचंड वैतागाने, पण प्रचंड हसू यायला लागल्याने, खुर्च्यांमधून पडायच्या बेतात होतो!! आणि आता मराठी मॅन पण वैतागलेले!! आता सगळ्यांनाच खुमखुमी चढलेली!!

मराठी मॅन १: सो व्हाय डोंट यू गो टू श्रीलंका?? सेटल डाऊन देअर?

मराठी मॅन २: लेका फ़ुकण्या ( ए, तू कान बंद कर आता, मी त्याला शिव्या ऐकवतो मस्त - हे मला) भXXXx तिकडे मुंबईत येता लेको, तिकडे काय मराठी शिकता का रे?? तू भेट रे साल्या बाहेर!! च्यायला, माज उतरवतो तुझा, मराठी बोलू नका म्हणतोय!!

नंतरच्या शिव्या न लिहिल्याबद्दल क्षमस्व वाचक हो! (कोणी वाचत असाल तर!)

मद्रमॅन : व्हाऽऽट इज धिस?? आय एम नॉट फ़ॉलोइंग यू गाऽऽईज!! स्पीक इन इंग्लिश, सो दॅट आय कॅन फ़ॉलो....

मराठी मॅन १: अबे, मेरी बात को समझ ध्यानसे, एक तो हम मराठीं में बोलना तो छोडने वाले नहीं, तेरी लॅंवेज इंटरनॅशनल हो या और कुछ...

मद्रमॅन: आय डोंट अंडरस्टॅंड हिंदी...

मराठी मॅन१ : वो तुम्हारा प्रॉब्लेम है, नहीं आती तो सीखो!!

आणि अस बरच काय काय वाजल!! त्यानंतर त्याच्या समोर तर मराठीतच बोलयचो आम्हीं अन त्याच्याशी बोलताना हिंदीतच बोलायचो!

सुरुवातीला त्याने कांगावा केला, पण आम्हां मराठी लोकांची डोकी जरा तरकटच राव!! एकदा खुन्नस म्हणजे खुन्नस, बस!! मद्रमॅन आता झक्कत हिंदीतही बोलतो!!!

आणि आम्ही सुखाने मराठी गप्पांचा फड त्याच्या समोर, त्याच्या नाकावर टीच्चून जमवतो!!

December 5, 2007

ब्लॉग जंकी

आज पहाटे चार वाजता हापिसचा ऑन कॉल मोबाईल किणकिणला!! मनातल्या मनात शिव्या घालत, कानाशी धरला तर पार साता समुद्रापलीकडून, राणीच्या देशातून हापिसमधला गोरा बोलत होता... काही तरी क्रिटिकल प्रॉब्लेम होता, अन मदत करतेस का म्हणून. नाही म्हटल तर चालणार नसतच!! नको रे बाबा आता, मला झोपायचय खरतर, उद्या बघू, अस सांगून चालत नाही!! मग उगाच आपल अर्थ नसलेल स्मॉल टॉक अन फालतू गप्पांचा प्रयत्न. पहाटे चारला गप्पा तरी काय मारायच्या डोळ्यांत झोप असताना?? काही जण मस्त गप्पा मारतात अन काही जण उगाच राजघराण्याकडून "स्टिफ़ अप्पर लिप" शिकवण घेऊन आल्यासारखे असतात वागायला. जाऊंदेत.

तर, प्रॉब्लेमवर काम केल अन मग सुटलाही तसा पटकन, दिडेक तासात, मग लगेच झोप येईना, अन मराठी ब्लॉगविश्वात भ्रमंती सुरु केली. कधी कधी वाटत, ब्लॉग जंकी होणार मी, का झालेय एव्हांना? पण खूप छान छान पोस्टस वाचायला मिळतात अन बर्‍याच वेळा प्रतिक्रिया द्यायचा मोह मी आवरते, उगाच आपल काय, जिकडे तिकडे आपल्या पाऊलखुणा उमटवत बसायच!! :D पण सही लिहितात मंडळी!! कधी कधी, म्हणजे बर्‍याचदा इतरांच लिखाण वाचून मला जाम कॉम्प्लेक्स येतो!! आपण काय भिकारचोट लिहितो अन का लिहितो अस वाटत! पण काय... आता व्यसन जडल्यासारख झालय थोडफार.... म्हणतात ना, नाविलाज को क्या विलाज, तस्सच अगदी!! असो.

तर, उठले तेह्वा बाहेर इतका गडद अंधार होता, इतकी निरव शांतता... आणि मग काम करताना, आणि नंतर भ्रमंती करता करत बाहेर नजर गेली तर अंधार पुसला गेला होता अलगद अन सकाळ हलके हलके उजळत होती.......इतक ग्रेट वाटल पाहताना!! म्हणून हा लेखन प्रपंच, शब्दांत पकडून परत कधीतरी अनुभवायला. तरी कठीणच आहे शब्दांत पकडण तस. तरीही बसलेय लिहायला, झालेच आता मी ब्लॉग जंकी! नक्कीच!!

कदाचित, एखाद दिवशी लांबलचक चाललेल्या कंटाळवाण्या रटाळ मीटींगमधून बाहेर पडल्यावर वाचल तर बर वाटेल का?? :)

पुरावे

पुरावे आणि उसासे,
सारंच आता फ़ोल आहे,
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(१)

बेंगलोरला नोकरी मिळून एक वर्ष झालय आणि आता हळूहळू इथल्या रस्सम, सारमची सवय पण व्हायला लागलीय! न होऊन सांगतेय कोणाला?? एक वेळ सकाळच जेवण बनवण जमतं, पण रात्री घरी येऊन परत स्वयंपाकघराकडे जायला पण नको वाटत!

तरी, तस कंपनीत अगदीच सतत काही बेकार नसत जेवण. बरही असत कधी कधी. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे केवळ दाक्षिणात्य लोकच इथे काम करत नाहीत याची ही जाण कंपनीच्या प्रशासनाला आहे. त्यामुळे, उत्तर भारतीय प्रकारच खाण पण असतच. अगदी सामिष पण. त्यावर तर रोजच किती जणांच्या भक्तीभावे उड्या असतात!! कधी न पाहिल्यासारख!! नाही, नाही, मला सामिषाहाराचे मुळीच वावडे नाही. मी खात असे. आता सोडलय, तेही स्वेच्छेनेच. पण बनवते अजूनही. पण मुद्दा हा नाही, हे आपल असच, ओघानेच आल म्हणून.

मुद्दा वेगळाच. मी नेहमीच बघते, कितीतरी जणं जेवण घेताना आपापली ताटं अगदी भरून घेतात. इतक, की आता अजून घेतल तर खाली पडेल अन ताटातून पण ओसंडेल इतक. बर, घेतलत तर घ्या, असेल तुमची भूक तेवढी, तर जरूर घ्या, पोटभर जेवा, अगदी सुखाने तृप्त व्हा! पण हे एवढं, बकासुरी पद्ध्तीन घ्यायच अन मग ते पानात तसच टाकून द्यायच!! कोणती रीत आहे ही?? इतका संताप अन चिडचिडाट होतो माझा!! रोज ही अशी अन्नाची नासाडी करायला काहीच कस वाटत नाही या लोकांना?? इतका कसला माज?? का आपलं समोर भरपूर आहे, आणि सहजगत्या उपलब्ध होतय, म्हणून त्याची किंम्मत नाही?? जेवण झाल्यावर हात धुवायला गेल, की तिथले वाया घालवलेल्या अन्नाचे एक-दोन ड्रम - हो, हो ड्रम - पाहूनच मलाच पोटात खड्डा पडल्यासारख होत... किती उपाशी पोटं या अन्नावर भरली गेली असती, किंवा जाऊ शकतात हा विचार माझ मन कुरतडल्याशिवाय रहात नाही रोज.... विलक्षण अपराधी भावना माझ्या मनात दाटून येते अन अगदी खिन्न व्हायला होत!

आत्तापर्यंत, मी माझ्याबरोबर जेवायला जे कलीग्ज येतात, त्यांना सांगायचा, समजवायचा खूप प्रयत्न केलाय, नेहमीच करते, की सुरुवातीला पानात जरा कमीच घ्या अन्न, मग हव तर परत घ्या, अन त्याला काही बंदी पण नाहीये, तरीही बर्‍याचदा पालथ्या घड्यावर पाणी असत हे माझ्या लक्षात येत.

काही कळतच नाही मला... आजकाल माणसांची मन इतकी मख्ख झाली आहेत का?? खूप कुठे लांब जायला नको, इथेच बेंगलोरमधे रस्त्यांवरची भीक मागणारी, उपाशी तापाशी असणारी लहान मुलं, अठरा विश्व दारिद्र्य भोगणारी माणसं, झालच तर देशातले दुष्काळी प्रदेश, तिथली माणस, त्यांच्या वाट्याला आलेले भोग, खाणच काय, पाण्याच्या थेंबालाही महाग असणारी आयुष्य पण काही जण जगतात, हे यांना जाणवतच नाही का?? वाया जाणार्‍या अन्नाकडे बघून असे कोणतेच चेहरे आठवत नाहीत का? का सुशिक्षित म्हणायच यांना??

अर्थात, ज्या शहरात आपण राहतो तिथले प्रश्न जाणवत नसतील तर, देशासमोरच्या प्रश्नांवर विचार करण, ही खूप लांबची पायरी आहे म्हणा. ते तर जाऊच देत, पण एक मूलभूत सुसंस्कृतपणाही नाही का? इतक अन्न शांतपणे, जराही रुखरुख न बाळगता, टाकवतच कस मुळात? आपापल्या घरी ही असेच वागत असतील का हे?? समृद्धी माणसाला इतकी बेलगाम रीत्या बेजबाबदार बनवते?

वाया जाणार्‍या त्या अन्नाकडे बघून, अन्न हे पूर्णब्रह्म, हे उगाच कुठे तरी डोक्यात घणघणत राहत इतक मात्र खर!

December 2, 2007

सुमल्याची आश्रम वारी!!...(१)

"रे बाऽऽऽबल, खयं चललय मेल्या सकाळच्या पारी इतक्या घाईत?? कोणच्या म्हशीक रेडकू झाला काय मेल्या?? तुका काय बारशाचा आवताण आसा रेऽऽऽ??" सकाळच्या चायच्या भांड्याक भायेरसून राख फासता फासता, सुमतीन बाबलाक साद घातली!

बाबलो थयच थबकलो. सुमल्याचो आवाज तेह्वाच वळाखलो त्येनी, नायतर इतक्या प्रेमळ भाषेत त्येचो उद्धार करणारा दुसरा कोण असताला!! "गो सुमल्या, अगो आयलय तरी कधी परतान? माका काय खबरच नाय!! कोण काय बोलूक पण नाय ता..."

"तर रे मेल्या!! तू येकदम मामलेदारच मां, तुका सगळे बातम्ये पोचवूक!! लोकांकनी काय काम धंधे नाय आसत काय मेल्या?? तुझे पाठसून बातमी पुरवत धावतले ते!!" इति सुमल्या.

बाबलो थक्कच झालो!! काय बायल माणूस तरी!! त्वांड आसा काय तोफखानो!! सतत आपला चलतासा, काळ नाय, येळ नाय! धन्य माऊली आसा अगदी!! काय त्या तोंडाळपणाक धरबंध असात तर!! तशी हातान सढळ आसा, पण, तोंडान सगळा घालवतली! आणि आता सुमल्यान अडवल्यावर, त्येच्या प्रश्नांच्या सरबत्तीक तोंड दिल्यशिवाय थयसून जाणा पण जमण्यासारखी बाब नव्हती!! कठीणच काम होता! शिकला नाय म्हणानच ह्या, नाय तर बालिश्टर होऊक काय हरकत नव्हती हेका!! मनातल्या मनात काय बाय कुरकुरत, बाबल्यान थयच एक बर्‍याश्या दगडार बसकण घेतल्यान.

" बोल, काय म्हणतय सुमल्या?? आणि आता हयसर हाकारलयसय, तर वायच चाय दी बघया इल्ली, सकाळच्यान घसो नुसतो कोरडो पडलो माझो!" बाबल्यान चायची फ़रमाईश करूनच टाकली!

सुमल्याकडे चायवांगडा अगदीच काय नाय तर बटर तरी मिळात ह्या ठाऊकच होता बाबल्याक. थोड्या वेळातच सुमतीने बाबल्यासमोर चाय आणि बटर ठेवल्यान. पितळी कपबशीतून फ़ुर्र करून चाय पिता पिता बाबल्यान येकदम मान्य करून टाकला की सुमल्यासारखी चाय कोणाकच बनवूक येणा नाय!!

"बाकी कायेक म्हण तू सुमल्या, तुझ्या हाताक चवच बरी हां!! मेल्या, सगळ्यांचा सगळा करतय, पण तोंडान घालवतय मगो!! आणि आयलय कधी परतून येवढा शहराकडे गेलेलय ता??" गरम चाय पोटात गेल्यावर, बाबल्याचा नरडा मोकळा झाला गजाली करूक। " जरा ती पानाची डबी घे गो हयसर... वायच पान खतय, मगे आसतच कामा, जरा सुदीक वेळ मिळूचो नाय माका... हसतय काय मेल्या, खराच सांगतय!" बाबल करवादलो!

"रे बाबल, तू माका सांगतय मेल्या कामाचा कवतुक?? तुका काय आज बघतसय काय रे मी?? मेल्या लंगोट लावून आवशी पाठल्यान शेंबडा नाक ओढत जाय तू, तेव्हांच्यान बघतसय, समाजलय?? कोणाक रे सांगतय कामाची कवतिका?? आणि कसला मेल्या काम काढलय इतक्या?? तुझ्या व्होकलेच्या लग्नाचो माटव घालूचो आसा काय रे??" आता बाबल काय बोलतलो कप्पाळ!!

तसा बाबल आणि सुमल्यात जास्त अंतर नाय होता, सुमल्या म्हणजे सुमन, बाबल पेक्षा पाच- सात वर्षांनीच मोठा होता, आणि तोच मोठे पणाचो अधिकार ता गाजवी, पण कसो? तर होडल्या बहिणीच्या मायेन, आणि ह्या माहित होता, म्हणान, बाबल ही आपलो गप रवी.

"हं, तर सांग मरे खयच्या कामासाठी धावत होतय??"

"गो सुमल्या, आता काय सांगतलय तुका, आपल्या गावाक येक एकदम पावरबाज स्वामी येवचे आसत! समाजलय?? त्येंची सगळी तजवीज करूक व्हयी, काय समाजलय?? सगळे बापये येतले आता महादेवाच्या देवळात, विचार विनिमय करुक, थय जाइ होतय मी. आता देवाचो माणूस येतलो, त्येची जरा सेवा करीन तर पुण्य मिळात मां??"

"गे बाये माझ्या, सांगतस तरी काय?? रे थय काय सांगतत, ठरवतत, ता येऊन सांगशीत मां माका?? मी पण जोडीन रे थोडा पुण्य, संत माणसाची सेवा करूची, माझी आवशी नेहमी म्हणा रे!" सुमल्यान विचारला। त्यावर होय, होय करत, बाबलान थयसून काढतो पाय घेतलो! कारण येकदा का सुमल्याचा आवशी पुराण सुरु झाला की तास दोन तासांची निश्चिंती, ह्या आता सरावान बाबलाक ठाऊक झाला होता!

बाबल बैठकीक गेलो, अन नंतर प्रत्येक बैठकीक गेलो. गावात जोरदार बैठकी घडले, महा नगर पालिकेच्या निवडणूकीत होवचे नाय इतके संवाद परिसंवाद घडले आणि कसा काय करुक व्हया, अन स्वामी महाराजांची कशी बददास्त ठेवूक व्हयी, याची जोरदार रूपरेखा ठरली येकदाची! द्येवाचा काम ता, तेका कोण नको म्हणात!

आणि, शेवटी एकदा, गावात स्वामी महाराज अवतरले!! त्येंची ती लांबलचक दाढी, पायघोळ रेशमी वस्त्र प्रावरणां बघून मंडळीही जरा सुखावली. आणि महाराजांवांगडा शहरी, सुशिक्षीत गर्दी बघून तर त्येंची खात्रीच पटली, की ह्या काय असा तसा कुडमुडा काम नाय आसा!! जोरदार काम आसा! हळू हळू या स्वामीच्या पाया पडाक कायच धोको नाय असा सगळ्यांचा मत होवूक लागला, एकूणच स्वामींचा आणि त्येच्या भवतीच्यांचा वागणा बघून । देवाचो माणूस असलो तरी तेका पारखूक व्हया ना, आजकालच्या जमान्यात? मगे?

स्वामी महाराज गावात आयले, रवले, एकदम गोड, मिठ्ठास आवाजात काय काय बोलले आणि सरते शेवटी त्येंनी जाहीर केला की, ह्या गाव इतक्या सुंदर आसा, की प्रत्यक्ष देवाकडून तेंका आदेश आसा, की हय एक आश्रम बांधच!! आता साक्षात देवाचोच आदेश तो, नाय तरी कसा म्हणतला कोणी?? पण जागेचा काय?? आता कोकणी माणूस भावूक आसा, पण अगदीच हे पण नाय मां.... पण स्वामी महाराजच ते, तेंका नाय भक्त मंडळींची काळजी तर कोणाक असतली?? आणि ते काय अशे तशे भक्त मंडळीक फसवणारे स्वामी होते काय?? ते तर प्रत्यक्ष श्री कृष्णाक भगवान मानून चालत बोलत, अगदी त्येच्या सारखेच गोऽऽड़ हासत, वागत!! ते काय अशे फसवतीत?? काय तरीच काय?? साक्षात श्रीकृष्ण प्रसन्न त्येंका!!! उगाच काय तरी इपरीत शंका घेवचे म्हणजे काय?? कलियुगाचो प्रताप म्हणतत, ता ह्या असा, समाजल्यात?? कलीच तो, मनात नाय ते इपरीत इपरीत कल्पना घालीत रवता.... काय खरा नाय बाबा माणसाचा आजकाल!!

तर, स्वामी महाराजांन सांगितल्यान, की घाई करुचा काय काम नाय, व्हया तर गावातले चार शहाणे सुरते लोक, दोन एक बायल माणसा, अशे करून जा आणि त्येंचो मूळ आश्रम बघून घ्या, काय मनात शंका असतीत ते फेडून घ्या. बघा आता, असा कोण सांगात आधी?? ज़ावची येवची वेवस्था पण स्वामी महाराजांचे सुशिक्षित भक्त गण करुक तयार होते, गावकर्‍यांन नुसती हो म्हणूचीच खोटी होती!! आता सुशिक्षित लोक पण महाराज्यांच्या शब्दाखातर हो म्हणतत, म्हणज़े हो बाबा अगदीच कंडम नसात असो विचार करून परत येकदा महादेवाच्या पारार बैठक बसली!! ग़जाली, चवितचर्वण सुरु झाला!!

"नाय, पण मी काय म्हणा होतय, जावन बघूक काय झाला?? आपणांक काय खर्च पडणा नाय, काय नाय, आणि आपलो आश्रम बघूक गावता… काय बिघडला, सांगा बघया??"

"ता खराच रे, पण उगाच ह्या म्हणजे कसा, उपकार घेतल्यासारखे, नाय?? आता म्हणतले, या, बसा, खा, प्या…"

"मेल्या, प्या?? प्या??? तुका काय सुचता तरी रे पिण्याशिवाय?? खयही जातय ता आपला पिण्याचाच डोचक्यात मेल्या तुझ्या!! आश्रमात पितत रे?? कधी ऐकलेलय असा?? काय मेल्याचा लक्षण तरी!! रे, उगीच नाय तुझो बापूस गाळी करणा तो तुका, समाजलय मां?? काय तरी अकलेचे तारे तोडता मेलो!! रे, जनाची नाय तर मनाची तरी!"

"आत बघा ह्या उलटा काम कसा ता! मी म्हणी होतय, पाणी, दूध, ताक असा पिवूक दितले, श्रीकृष्णाचे भक्त मां ते...... मगे कृष्ण ह्या सगळा खाय, म्हायत आसा मां?? आपल्याच मनात चोर, आणि सगळयां जगाक नावा ठेवची, ह्या खयचा शास्त्र??"

"रे, हयसर माणसां जमली कशाक आणि तुमचा मेल्यांनो चललासा काय?? रे अशान कसा काय होयत रे?? खयही बघा, ता असाच!! मेल्यांचा अगदी देशाच्या राजकारणांत पण ह्याच! मूळ मुद्दो बाजूक आणि ह्ये तंडतत भलत्याच कारणांन!! म्हणान या देशाचा काय्येक कल्याण होणा नाय!! समाजलय मां?? कधी सुधरतले जाणा कोण!! सगळ्यांका नेवन समुद्रात बुडवूक व्हये!!"

अपूर्ण...

एक पत्र

प्रिय,

तुला पत्र लिहायला बसलेय खरी, पण शब्दांपलीकडल्या भावनांना शब्दांत चपखलपणे उतरवायच कसब नाही जमत मला तितकस अजून. मग वाटत, लिहू का नको, कारण जे म्हणायचय ते नेमक उतरल नाही तर काय अर्थ राहिला... पण तशी चिंता नाहीच मला, कारण सगळं समजेलच तुला, न बोलता आणि नेमक न सांगता आल मला, तरीही. तशीही कधी पत्र ही लिहायची गरज भासलीच नाही आपल्याला. तुला वाचता येत माझ मन, तुझ्यासमोर असले काय न नसले काय, अंतर कितीही असल तरी काहीच फरक नाही पडत तसा. आत्ता याक्षणी देखील एकमेकांपासून खूप लांब असलो तरी, एकमेकांच्या मनांत काय चालत असेल हे लक्षात येतच आपल्या. उगाच शब्दांच गालबोट तरी कशाला??

तसही, आपल्यात शब्दांचा आधार शोधणारी मीच. तुला त्यांची कधी फ़ारशी असोशी नसतेच. प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडायलाच हवी का, हे तुझा नेहमीचाच प्रश्न. कमीत कमी शब्द वापरण लॉजिकल आहे, अस वरून आग्रही मत, आणि ते मांडायचा अन माझ्याकडून मान्य करवून घ्यायचा अट्टाहासही, जोडीला एक मिश्किल हसू. माझी सपशेल शरणागती तिथेच ठरलेली. पण हे लॉजिक, मी शब्द नाही वापरले तर कुठे पळून जात, हे आजत गायत मला समजलेल नाही, बघ!! तुला समजलय का रे??

भेटलो ना , तेह्वाच लक्षात आल होत माझ्या, की लांब राहिलेलच बर, कारण एकदा गुंतलो की परत त्यातून पाय सोडवण जमणार नाही, निदान या जन्मी तरी नाहीच, मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी फारसा फरक नाही पडणार! कितीही व्यस्त असलो अन कितीही जणांच्या घोळक्यात असलो तरी, हळूच एकदा नजर सर्वांच्या नकळत भिरभिरेल, तुझ अस्तित्व शोधायला. कान आसुसतील, ओळखीचा आवाज ऐकायला आणि मन तर कधीचच सुटलेल असेल हातातून, वावरत असेल तुझ्याच अवती भवती. आणि एवढ होऊन देखील सार्‍या गर्दीत मी नसतेच एकटी. माझ्या सोबतीला तुझ्या मनाचा एक कप्पा आहेच. कधी नव्हे ते बोलून दाखवलस, आणि एकदा मला समजावलस, एखाद्या रुसलेल्या लहान मुलीला समजवाव तस्सच अगदी..........

आठवत का रे तुला? किती आणि काय काय... जणू काही सार्‍या आयुष्याचा धांदोळा घेतलास, आणि सारी बेरीज वजाबाकी झाल्यावर लक्षात आल दोघांच्याही, की हे काही खर नाही गड्या, एकमेकांसोबत चालताना, दोघांचीही फरफटच होणार आहे सतत, एक तर एकमेकांची फरफट करायची नाही तर सभोवतालच्यांची. दोघांनाही मान्य नसलेला पर्याय! तू हताश, माझ्या डोळ्यांतून अगतिकता वहायला लागलेली...... सार काही बोलण्यापलीकडे पोचलेल.

मग म्हणालास, ठीक आहे, परत कधी सांगता येईल, न येईल म्हणून सांगतोच आता, "माझ्या आयुष्यात तुला, फक्त तुलाच, ध्रुवाच स्थान आहे. आयुष्यं समांतर वाहतील आता, आणि वहायलाही हवीत, स्वत:साठी नाही तरी इतरांसाठी, तसाही फक्त आपलाच हक्क कुठे असतो आपल्यावर? पण मी आहेच. कधीही हाक मारलीस तरी इथेच आहे. तुलाही ठाऊक आहे ना, मी ही तुझ्यासाठी सतत इथेच आहे?? "

प्रिय, त्या दिवशी मलाही हेच सांगायच होत, पण शब्दच वाहून गेले... नाही तरी प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायला हवी असा थोडाच नियम आहे? जाणून आहेसच की तू देखील, की मीही सतत तुझीच आहे.....

December 1, 2007

सांगा! आता काय कराल?

मित्र दारात येतो, घरात येत नाही,
मित्र बोलत राहतो.... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं

मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक....
आणि पूर्ण विचारांती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई

अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्हीं द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही

तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार.... तर तो निर्विकार

मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?

मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकांतातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते

आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ,
आणि मग जेह्वा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हालां पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!

.... तेह्वां काय कराल?

सांगा! तेव्हां काय कराल?

( ही कविता मी २००७ च्या साधना दिवाळी अंकात वाचली आहे. डॉ. आशुतोष जावडेकर यांची कविता आहे.)

गूढ अशा एकांती

या गूढ अशा एकांती,
मज तुझी आठवण येते,
मी परत एकदा जगते,
क्षण सारे तुझे न माझे

नजरेची जगलो भाषा,
स्पर्शांची होती गाणी,
ती अनवट वेडी धुंद,
जी अजून वेढूनी राही

तू दूर आता, जणू स्वप्न,
माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,
तरी संगत अक्षय आहे

या गूढ अशा एकांती,
मग तुझी आठवण येते......