December 17, 2010

पाककृत्या, मी आणि ब्लॉगपोस्ट

आपलाच ब्लॉग असल्यामुळे मी अक्षरश: काहीही लिहू शकते, नाही का? :P

तर मध्यंतरी मी काही रेसिपीज मायबोलीवर लिहिल्या. स्वयंपाक करायला मला मनापासून आवडतं. कोणत्याही पद्धतीचा - शाकाहारी, मांसाहारी. भारतीय प्रकारचा, विदेशी प्रकारचा. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सारस्वती रेसिपी तर लाजवाब! कोंड्याचा चविष्ट मांडा करायची कला सारस्वत बायकांकडून शिकावी - आज्जी, पणजी आणि थोडेफार आई, आत्या, मावशी ह्या कॅटेगरीमधल्या बायकांविषयी मी बोलतेय. तितकं तर नाही जमणार, पण जितकं काही शिकता येईल, बनवता येईल, तसं बनवायचं, खायचं - खिलवायचं ह्या गोष्टी मला आवडतात. आपल्या मायेच्या मंडळींची गर्दी जमलेय, मजेत, गप्पा टप्पा करत, जेवणं चालली आहेत आणि गप्पांमध्ये रंगून गेल्याने हातही नळाखाली धरुन त्यावर पाणी घेण्याआधी वाळून गेलाय... हे असलं काही अनुभवायला पुण्य लागतं...

नातेवाईक, मित्र - मैत्रिणी घरी याव्यात आणि आपण मायेनं रांधलेलं त्यांनी तितक्याच प्रेमाने खाऊन तृप्त व्हावं आणि आपल्यालाही दाद द्यावी, ह्यासारखं सुख नाही!

... तर काय सांगत होते, ठरवलं की आपण लिहित असलेल्या रेसिपीज एकत्र कराव्यात. आहे त्याच ब्लॉगवर. नाहीतरी ब्लॉग म्हजे काय हो? आपल्या मनातलं बोलायची जागाच ना? :)


ओल्या काजूंची उसळ

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती:
काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.





उसळीचा फोटो मी काढलेला नाही.



खतखते


लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: अर्धी वाटी तूरडाळ.
भाज्या: पाव किलो लाल भोपळा, सुरण - थोडे कमीही चालेल, १ रताळे, २ मध्यम बटाटे, १ कच्चे केळे, उसाच्या करव्याचे ९- १० तुकडे, कच्च्या पपईचे तुकडे, नीरफणसाचे तुकडे, करांदे, कणग्या.

वाटण : पाव ते अर्धी वाटी खवलेले खोबरे व ४-५ तिरफळे.

इतरः हळद, तिखट, चिंच, गूळ, मीठ.

कृती: डाळ चांगली शिजवून घ्यावी व घोटावी .
फळभाज्यांच्या साली काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
डाळीमध्ये सर्व भाज्या जरुरी पुरते पाणी घालून शिजवून घ्याव्या. भाज्या शिजत असतानाच त्यात तिरफळे ठेचून घालावीत.
१ चमचा तिखट व हळद प्रत्येकी आणि छोट्या सुपारीएवढा गूळ घालावा. थोडा चिंचेचा कोळ घालावा.
खोबरे वाटून घेतानाही त्यात तिरफळे घालावीत.
सर्व भाज्या शिजल्यावर वरुन खोबर्‍याचे वाटण घालावे व ही भाजी चांगली खदखदू द्यावी. चवीपुरते मीठ घालायचे.
भाजी फार पातळ वा सुकी करावयाची नाही.

अधिक टिपा:
डाळ न वापरताही ही भाजी करता येते.
तिरफळे ताजी असली तर कमी वापरावी कारण त्यांना अधिक वास असतो. मग वाटणात २-३ आणि ठेचण्यासाठी २-३ चालतील. सुकी असतील तर जास्त घ्यायची. ५-६ प्रत्येकी. त्याची बी काढून टाकायची वापरण्याआधी. ह्यात अळू वापरतात का, तर नाही. ही ऋषीची भाजी नव्हे. ह्यात कांदा, लसूण, आले, धणे वगैरे घालत नाही आम्ही.


मुडदुशांचे (नगली) कालवण

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.

क्रमवार पाककृती:
ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.

खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.

१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्‍याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्‍यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.

हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.


कैरीची उडदमेथी

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती:
१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.


कोलंबीची उडदमेथी

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो कोलंबी, २ कांदे, २ वाटी खोबरे, ७ -८ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी, सुपारीएवढी चिंच, मीठ, साधारण २ -३ चमचे हळद, २ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती:
कोलंबी विकत घेताना शिळी वा खूप वास येणारी अशी घेऊ नये, शिळी कोलंबी निस्तेज दिसते आणि मऊ पडलेलीही असते. कोलंबीचे वरील कवच काढून, डोके व मधील काळा दोरा काढून ती साफ करुन घ्यावी, व तिला मीठ लावून ठेवावे. कवच काढून टाकल्यावर, अगोदर भरपूर वाटणारी कोलंबी, अगदी एवढीशी दिसायला लागते! जरी कवच काढलेली विकत आणली, तरी घरी आणल्यावर तिच्यातील दोरा मात्र काढायला विसरु नये.

कांदे कापून घ्यावेत. ह्यातील थोडासा चिरलेला कांदा बाजूला काढून ठेवावा व उरलेल्या चिरलेल्या कांद्याचे २ भाग करावेत.

वाटण १: १ भाग चिरलेला कांदा व १ वाटी खोबरे, लाल मिरच्या, २ चमचे हळद व चिंच हे एकत्र करुन वाटावे.

वाटण २: उरलेला भाग चिरलेला कांदा, उरलेल्या खोबर्‍या आणि धण्यांसकट तेलावर परतून घ्यावा. हे बाजूला उतरवून, त्याच तव्यावर थोड्या तेलात १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी हे सारे एकत्र परतून घ्यावे. हे सारे एकत्र वाटावे. वाटण बा़जूला काढून, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालावे व हे वाटणाचे राहिलेले पाणी उडदामेथीत घालण्याकरता ठेवावे.

मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी.

एका पातेल्यात राहिलेला कांदा तेलावर परतून घ्यावा व परतताना त्यावर ४ -४ उडीद डाळीचे व मेथीचे दाणे घालावेत. परतून झाले की त्यावर वाटण क्र १ घालावे.

उकळी आली की त्यात कोलंबी घालावी. कोलंबी शिजली की वाटण क्र २ घालावे व चवीनुसार मीठ घालावे. वाटण क्र २ चे पाणीही ह्या उडदामेथीत घालावे, चांगली उकळी काढावी व उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

कर्ली ह्या माशाचीही अशाच प्रकारे उडदमेथी बनवता येते.



नंतर पुन्हा अजूनही लिहीन. ह्या इथे लिहिलेल्या, मला बनवता येतात बरं! :P

December 6, 2010

अक्षय कविता

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.

बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये नाहून निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!

मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....

असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक.

कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव.

कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही अध्यात्मिक साधना.

"लौकिक जीवनात राहणार्‍या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."

कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.

छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....

ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्‍याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.

गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्‍यां कपार्‍यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्‍या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात...

ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही...उलट तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली! मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्‍या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!

इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...

जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!

क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....

शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...

तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..

किंवा,

केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....

हृदयातून उमाळत, उसासत येणार्‍या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.

हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्‍यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ

आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्‍या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.

तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...

तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..

प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...

तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...

शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...

सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरतेही, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?

तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...

आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे.


क्रमशः

November 7, 2010

निळू दामल्यांना दिसलेलं लवासा

लवासा.

कुठे आहे हे लवासा?

*पुणे जिल्ह्यात, मुळशी तालुक्यातल्या मोसे नामक नदीवर बांधलेलं वरसगाव धरण. धरणाच्या भिंतीमुळे तयार झालेला, चरही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला, असा जलाशय. ह्या डोंगरांमधून अठरा गावं वसलेली - दासवे, भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, वदवली, पडलघर, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे बुद्रुक, साईव, वरसगाव आणि भोडे.

ह्या परिसरातील एकूण १२ हजार ८० एकर जमीन लवासा कॉर्पोरेशन ह्या कंपनीने विकत घेतलेली आहे आणि दासवे इथे प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१० च्या शेवटापर्यंत पूर्णपणे तयार व्हायचा आहे. त्यानंतर, एक डोंगर पार करुन येणार्‍या भोइनी गावात बांधकामं होतील, आणि त्यानंतर मुगावमध्ये. धामण ओहोळ ह्या टोकाला असलेल्या गावात शेवटचं बांधकाम होईल, हे ३ टप्पे २०२० सालापर्यंत पूर्ण होतील.*


सुरुवातीपासूनच लवासा प्रकरण बर्‍यापैकी प्रकाशझोतात आहे. वर्तमानपत्रं, टीव्ही चॅनेल्स, इंटरनेट अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याविषयी तुकड्यातुकड्याने माहिती मिळते. लवासावाले अर्थातच प्रकल्पाची भलावण करतात, तर आक्षेप घेणार्‍यांसाठी, पर्यावरणाचा होणारा आणि झालेला र्‍हास, विस्थापितांचं पुनर्वसन, त्यांना मिळालेली व काहीजणांच्या बाबतीत अजिबातच न मिळालेली नुकसानभरपाई, हे महत्वाच्या मुद्द्यांपैकी काही.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर लवासाबद्दल अधिक खोलात जाऊन जाणून घ्यावसं वाटत होतं. त्याच सुमारास 'सकाळ' वृत्तपत्रात 'लवासा' ह्या निळू दामले लिखित पुस्तकाची जाहिरात पाहिली, आणि हे पुस्तक एक अभ्यास पूर्ण विवेचन वाचायला मिळेल म्हणून घ्यायचं ठरवलं, घेतलं आणि वाचूनही काढलं.

पुस्तकाची सुरुवात होते, ती लवासा ह्या शहराच्या कल्पनेचे जन्मदाते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, अजित गुलबचंद ह्यांच्या करुन दिलेल्या ओळखीने. लवासाच्या अठरा गावांतून पसरलेल्या क्षेत्रफळाची ओळख करुन देत, त्याच्या पसार्‍याची जाणीव करुन देत हे पुस्तक पुढे सरकतं. लवासाच्या जडणघडणीत ज्या अनेक कार्यकुशल लोकांचा हातभार लागलेला आहे, अशा लहान थोरांशी साधलेला संवाद आणि त्या संवादांमधून हाताशी लागलेली माहिती असं बहुतांशी पुस्तकाचं स्वरुप आहे. त्याचबरोबर, ह्या प्रकल्पाची पाहणी करताना, पत्रकाराच्या तटस्थ भूमिकेतून (लेखकाच्या मते) घेतलेला वेध आणि काही ठिकाणी केलेलं भाष्य आणि काही ठिकाणी मांडलेली मतं, हेही पुस्तकात वाचायला मिळतं.

लवासा उभारताना तिथे वसलेल्या स्थनिकांपासून ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांमधून उद्भवलेल्या अडचणी, पर्यावरणविषयक व इतर, जसं की, जमिनीविषयक कायदे कानून, वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या नियमावली व त्यांची पूर्तता करताना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि त्यावर लवासावाल्यांनी आपापलं कार्यकौशल्य वापरुन केलेली मात, ह्याचं समरसून केलेलं वर्णन ह्या पुस्तकात आहे.

जमिनींचे गैरव्यवहार कसे चालतात, का होतात इत्यादि बाबींवर पुस्तकात काही पानं खर्ची पडलेली आहेत. तलाठी, मधले दलाल ह्यांचे व्यवहार, साताबाराच्या भानगडी आणि ह्या सर्वाचा लवासावाल्यांना झालेला त्रास. त्यातून लवासा उभारण्याच्या ध्येय्याने (!) प्रेरीत होऊन काढलेले मार्ग उपाय वगैरे. नोकरशाहीचा त्रास. वाचताना, इतके लागेबांधे असलेल्य कंपनीला इतका त्रास होतो, तर, सामान्य माणसाची काय गत, हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

मेधा पाटकर व त्यांच्या संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी पुस्तकात विरोधी सूर मांडलेला आहे, पाटकरांच्या कार्यपद्धतीमधील त्रूटी दाखवल्या आहेत, त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे, आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत. लवासा स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करत असूनही स्थानिक लवासावाल्यांना लहान सहान बाबींवरुन त्रास देताना आपण पाहिल्याचं दामले नोंदवतात. पर्यावरणवालेही पर्यावरणाचा र्‍हास झाल्याची उगाचच आरडाओरड करत आहेत, कारण लवासा पर्यावरणाची काळजी घेते आहे, हे उदाहरणं देऊन दामल्यांमधला पत्रकार पटवू पाहतो. त्यासाठी लवासाने नांदते वृक्ष न तोडता एका जागेवरुन दुसर्‍या जागी स्थलांतरीत केले आहेत, हे ते आवर्जून सांगतात. एकूणातच मीडीया सांगोवांगीच्या गोष्टी सांगत, काहीही अभ्यास न करता लवासाविरोधी बातम्या पसरवण्यातच कशी धन्यता मानत होती/ आहे, हे दामल्यांचं प्रतिपादन. पण प्रश्न हा आहे, की एखादा नांदता वृक्ष जरी दुसरीकडे जगला तरी मूळ जागी जिथे तो वाढत, जगत होता, तिथे त्याच्या आडोशाने जगणारी पक्षीसृष्टी, त्याच्या सावलीत वाढणारी इतर झाडं झुडपं, अनेक वर्षांनी वाढू लागलेल्या वेली, त्यावर येणारे कीटक आदी सगळी इकोसृष्टीच हादरून जाते. एकेका वृक्षाबरोबर हे सारं गोकुळ उभं राहतं, म्हणून तर तो नांदता वृक्ष. नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, निदान रहावा. ह्याबाबतीत दामल्यांनी काहीच भाष्य का केलेले नाही, कोणास ठाऊक!

पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये दामले म्हणतात, लवासा बनत आहे, तिथे २००१ साली ३११७ माणसं रहात होती, परगावी जाऊन नोकर्‍या करुन पोटं भरत होती, कारण, गावांतील उत्पन्नावर त्यांची आबाळ होत होती. लवासामुळे त्यांची रोजगारीची सोय झाली. काही माणसं श्रीमंत झाली! म्हणजे नक्की किती? अभ्यासात तो मुद्दा येत नसावा.

वरील ३११७ माणसांपैकी ३१७ आदिवासी आणि ९५% पेक्षा अधिक अ-आदिवासी व अ-दलित आणि वाईट परिस्थितीत जगणारी, ही त्यांनीच दिलेली आकडेवारी. लवासा लोकांची काळजी घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी २०१० साली लावसाने दासवे इथे उभं केलेल्या २२ घरांच्या गावाचं आणि तिथे राहणार्‍या एका कुटुंबाचं उदाहरण ते देतात. उदाहरण वाचताना, वरवर आलबेल वाटलं तरी कळीचा मुद्दा हा की, २२ घरांपैकी ६ घरं ही एकाच कुटुंबाची आहेत. उरली १६. ती कितीजणांना पुरेशी आहेत?

दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

१. दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील
२. विकासामुळे दर एकरी उलाढाल काही कोटींची होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात काही अब्जांची वाढ होईल.
३. दासवे हा केवळ टप्पा. एकूण लवासा कितीतरीपट मोठं असेल आणि एकूण रोजगार निर्मिती दासवेपेक्षा खूप अधिक.

पण, काही प्रश्नांची उत्तरं मात्र ह्या पुस्तकात नाहीत, जसं खूप सारे लोक लवासात येऊन आनंद लुटताना, ३११७ स्थानिक तेह्वा कुठे असतील, किंवा आत्ता कुठे आहेत? २२ घरांतून राहणारे सोडून देऊयात. बाकीचे? ३१७ आदिवासींचा वाली कोण? वृक्ष स्थलांतरीत करताना बाकीच्या इकोसिस्टीमचं काय? सगळी शेतजमीन आज अन उद्या अशा तर्‍हेच्या विकासासाठी वापरली जाणार असेल, तर शेती कुठे होईल? होणारा हा फायदा नक्की कोणाचा असेल? कुठे जाईल? कोणाचा विकास साधला जाईल?

एकूण हे पुस्तक वाचल्यावर लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्‍यांवर आणि दामल्यांवरही. एक गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यानुसार सगळी सत्यं वळवली जातात! आणि हे संबंधित सर्वांनाच कमीअधिक प्रमाणात लागू पडत असणारच... पुस्तक खूप एकांगी वाटते. सामान्य जनमानस आपल्या बाजूने असावे हाच शेवटी ह्यातील प्रत्येक घटकाचा अट्टाहास. त्याप्रमाणे वळणार्‍या, वळण दिलेल्या बातम्या आणि सांगितली जाणारी सत्यं. शेवटी काय? कोणीही कोणाचेही नाही. मामला खतम. माझ्या मते तरी, दामल्यांकडून निराशा. कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल, तरीही दामल्यांना अप्रत्यक्ष पीआरच्या कामाला जुंपले आहे की काय असे वाटते पुस्तक वाचताना, खरे तर. प्रकल्पाची दामल्यांनी मांडलेलीही बाजूही असेलच. तेह्वा, ती मांडण्यातही चूक नाही, असेही वाटते. एकूण काय, माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा तुकड्या तुकड्याने परस्परविरोधी माहिती मिळाल्याने भेजा फ्राय! पुस्तक संग्राह्य आहे. एक रेफरन्स म्हणून माहिती, डिटेल्स हयासाठी नक्कीच बरे आहे.

पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?

* * - हा भाग 'लवासा' ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकात जरी अठरा गावं म्हटलेली असली, तरी प्रत्यक्षात १७ गावांचाच उल्लेख आढळला.

पुस्तकाचं नाव: लवासा
लेखक: निळू दामले
किंम्मत: रुपये १५०/-
प्रकाशकः मौज प्रकाशन

September 22, 2010

कैफियत

भासली शाबासकी, की घातलेला घाव होता?
सोसलेल्या चेहर्‍यांचा, शापितांचा गाव होता..

हाय! का नाही कळाले, वाट होती रोखलेली,
पावलांना शाप होता, की तुझा हा डाव होता?

सोबती ज्या मानले, पाठीत केला वार त्याने,
दंश ज्याचा धर्म तो, का मानला मी साव होता!

घालता कोडे, जवाबाचे तुला का दु:ख झाले?
बोचला काटा, असा चर्येवरी का भाव होता?

टाळले सौख्या जरी, ते प्राक्तनाला मान्य होते
लागता हातास काही, वाद होण्या वाव होता!

चालताना सोबती होता जरी अंधार माझ्या
चांदण्याने घेतलेला अंतरीचा ठाव होता...

July 7, 2010

ये परतीचा वारा...

नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्‍याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्‍याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.

खरोखर विल़क्षण आहे! एवढ्या मोठ्या जगड्व्याळ पसार्‍यात कुठेतरी एक जीव जन्मतो, दिसामासी वाढतो, वाट्याला आलेल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव गाठीशी जमा करतो, त्यातून शिकतो, कधी हसतो, कधी रडतो. वाट्याला आलेले काही क्षण मनात अक्षय जपतो, काही विसरु पाहतो. काही काही क्षणांच्या आधाराने जगण्यासाठी नव्या उमेदीने पालवतो आणि काही क्षणांपुढे पार खचतो, शरणागती पत्करुन केविलवाणा होतो. कधी सूर जुळतात, कधी बेसूर होऊन दुखरी नस बनून ठसठसतात, आणि तरीही कोड्याची भूल सुटत नाही..

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

दिवस येतात, जातात. कित्येक घटना घडत राहतात. लहान, मोठ्या, लक्षणीय, नगण्य. कळत नकळत आठवणींची मोहर कुठेतरी मनाच्या तळाशी अलगद उमटवून जातात. प्रश्न निर्माण करतात, कधी कधी उत्तरं घेऊन येतात. निरुत्तरही करतात, तर कधी नव्या जाणीवांना सोबतीला आणतात आणि तुम्हां आम्हांला अधिक समृद्ध बनवून जातात, उत्तरं शोधायचीच खोटी. अर्थात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, असंही नाहीच. आणि समजा, सापडलेल्या उत्तरात नवीन प्रश्न लपलेल असेल, तर? जेति, जेति म्हणताना कधी ना कधी नेति नेति म्हणावं लागत असेल का?

लयबद्ध गतीने, तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दु:खांची चक्रं फिरतात. सुखावतात, दुखावतात. आपल्या, परक्यांची जाण देतात, शहाणं करुन सोडतात. उन सावलीचा खेळ जणू. कधी मनाची उमेद बांधण्यासाठी हात देतात, आणि कधी आपल्या सावलीलाही आपल्याचसाठी परकं करुन जातात. मन मात्र प्रत्येक क्षणामध्ये गुंतून पडतं, सुखाबरोबर तृप्त होतं, आणि दु:खानं पोळून निघतं.

... आणि चक्र सुरुच राहतं.. शेवटी हातात गवसतं काय? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही.

आणि असंच चक्र सुरु असताना, कधीतरी, हळूहळू थोडं फार उमगायला सुरुवात होते. ज्ञात अज्ञाताच्या पाठशिवणीच्या खेळाकडे नजर जाते, त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात. सोबतीतला एकलेपणा आणि एकलेपणातली सोबत जाणवते आणि एक दिवस कळून येतं,

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

जाणीवा अधिक संवेदनाक्षम बनतात आणि आपल्या हाती तसं पाहिलं तर काही काही नाही हे जाणवून थोडंफार सुटल्यासारखंही होतं. आता कसली भिती? दिशा कधीच्याच ठरलेल्या असतात, त्यातले खाचखळगे, राजमार्ग सगळं काही आधीच रेखलेलं असतं, आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी. कळूनच जातं सारं काही. तोवर परतीचा मार्ग समोर येऊन ठाकलेला असतोच. पण, आता कसं, सारं काही लख्ख समोर असतं, कसलीच घाई नसते. आता कदाचित सगळंच सोपं बनून गेलेलं असतं.

नाही मज घाई, पण वेग धरी होडी
जाताना एखाद्या शब्दातच गोडी
जो दुवा दिलास त्यात शीण मिटे सारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

राग, लोभ मावळलेले असतात. फारशा तक्रारी राहिलेल्या नसतात. एकच छोटंसं मागणं राहिलेलं असतं, मागणं कसलं, विनंती. अगदी शेवटची. हरवलेलं काहीतरी आता गवसलेलं असतं आणि आता ते पुन्हा हरवायचं नसतं. म्हणून, एवढंच सांगणं होतं,

मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....


समाप्त


*कवितांच्या ओळी कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या.

* हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.

त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं.

मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.

July 5, 2010

पुस्तक परिचय: युगांत

रामायण आणि महाभारत. भारतवर्षाची स्वतःची, आपली अशी २ महाकाव्ये. मात्र दोन्हीं काव्यांमधे खूप फरक आहे. आदर्शवाद हे रामायणाचे बलस्थान. इतके, की आदर्श जपताना व्यक्तींची फरफट झाली तरी, आदर्शाची जपणूक काही सुटत नाही. ह्याउलट महाभारत.

महाभारतात काय नाही? आकांक्षा, वैर, भक्ती, मैत्री, तत्वनिष्ठता.... मानवी मनात उमटणार्‍या प्रत्येक भावनांचे आंदोलन महाभारतात तितक्याच समरसतेने टिपले आहे, आणि त्याचबरोबर ह्या सर्वांचा फोलपणाही. अगम्य आणि मनाला चटका लावणारी अशी नात्यांमधली गुंतागुंत महाभारतात जशी टिपली आहे, तशी अजून कुठेही टिपली गेली नसेल बहुधा. महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या असण्याला, वागण्याला काही कारण आहे, आणि तरीही शेवटी नियतीच्या हातातल्या ह्या सार्‍या बाहुल्याच आहेत! त्यांचा रस्ता ठरलेला आहे आणि त्यावरील वाटचाल केवळ अटळ आहे... महाभारतातील पांडवांना शेवटच्या युद्धानंतर मिळालेल्या जयाचे स्वरुप पराजयापेक्षाही भीषण आहे.

अश्या ह्या गुंतागुंतीच्या महाभारतातील तितक्याच गुंतागुंतीच्या व्यक्तीरेखा इरावती कर्वे ह्यांनी "युगांत" ह्या त्यांच्या पुस्तकात मोठ्या समर्थरीत्या उलगडून दाखवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाभारतकालीन समाज, धर्म, तत्कालीन जीवन वगैरेवर अतिशय चपखल निरिक्षणे नोंदवली आहेत.

पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखी आहे, म्हणजे हे लेखन करण्यासाठी इरावतीबाईंनी उपसलेले कष्ट आणि त्यांच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येईल. महाभारत अधिक उत्तम रीत्या समजावून घ्यायचे असेल तर, माझ्या मते "युगांत" चे वाचन आवश्यक. पुस्तकाची सतरावी आवृत्ती सद्ध्या मिळते, त्यावरुन त्याचे महत्व लक्षात यावे.

नावः युगांत
एकूण पाने :२४५
लेखकः इरावती कर्वे
प्रकाशनः देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
किंमतः रुपये २५०/- (सतरावी आवृत्ती)

पुस्तक परिचय: उपनिषदांचा अभ्यास

उपनिषदे, अर्थात वेदांत. वैदिक जनांचे वाङ्मय म्हणजे वेद, त्या वेदवाङ्मयातील एक भाग, म्हणजे उपनिषदे. वेदवाङ्मयातील विचारबीजांचा साकल्याने केलेला अर्थविस्तार उपनिषदांमध्ये बघायला मिळतो, बहुधा ह्याच कारणाने, उपनिषदांना 'आम्नायमस्तक' वा वेदांचे उत्तमांग असे गौरवण्यात येते.

ऋग्वेदांनंतर व बुद्धपूर्वकाली प्रमुख उपनिषदे निर्माणे झाली. आजूबाजूचे विश्वाचे निरिक्षण करताना, अनुभवताना आणि त्या अनुभवांचे डोळसपणे चिंतन, मनन करताना, त्या अनुभवांवर विचार करताना, प्राचीन काली ऋषी मुनींनी स्वतःला आलेले अनुभव, आकळलेली तत्वे, संकल्पना, हे सारे शब्दबद्ध केले, आणि उपनिषदांचा जन्म झाला.

एकंदरीत उपनिषदे बरीच असली, तरी त्यापैकी जी महत्वाची व प्राचीन समजली जातात, त्यांचा अर्थासहित उहापोह 'उपनिषदांचा अभ्यास' ह्या प्रा के. वि. बेलसरेलिखित पुस्तकात अतिशय सहजसोप्या व प्रवाही भाषेत करुन दिलेला आहे. पुस्तकाच्या आरंभी, उपनिषदांविषयी, त्यातील संकल्पनांविषयी उत्तम माहिती दिलेली आहे. उपनिषदांतील संस्कृत ऋचांचा अर्थ, त्यामागील तत्व, आणि साध्या सोप्या भाषेत, व्यावहारिक उदाहरणांसहित त्यावर केलेले विवेचन हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

संस्कृत भाषा येत नाही, समजत नाही अश्या व तत्सम अडसरांपोटी जर उपनिषदे वाचायची व समजून घ्यायची इच्छा असूनही अजून वाचली नसतील, तर ह्या पुस्तकाचा तुमच्या संग्रहात समावेश करण्याविषयी नक्की विचार करा.

वाचनासाठी शुभेच्छा!

वाचाल तर वाचाल!

पुस्तक परिचय -

नावः उपनिषदांचा अभ्यास
एकूण पाने : ५५३
लेखकः प्रा. के. वि. बेलसरे
प्रकाशनः त्रिदल प्रकाशन
किंमतः रुपये २५०/- (द्वितीय आवृत्ती)

June 24, 2010

पुस्तक परिचय: बापलेकी

बाप आणि लेक. हे नातं मूलभूत आणि महत्वाचं तर खरच, पण माय -लेकीच्या नात्याइतकं महत्व ह्या नात्याला अजूनही मिळालेलं दिसत नाही. माय - लेक ह्या नात्याच्या उल्लेखातूनही जवळीकीचे जे संदर्भ मनात उमटत जातात, तसे बाप - ले़क ह्या नात्याच्या उल्लेखातून मात्र सहसा उमटत नाहीत. लेकीची सुरुवातीची, लहानपणाची काही वर्षं सोडली तर, मनात माया असली तरी, शिस्त, थोडासा दुरावा आणि परस्पर नात्यामधली एक अदृश्य लक्ष्मणरेखा हे संचित काही ह्या नात्याला टाळता येत नाही. मनात अमाप माया ओसंडून जात असली तरी, ती आईसारखी उघडपणे लेकीवर उधळता येत नाही.

का बरं? सामाजिक दडपण? संस्कृती? लेकीच्या मानसिक जडण घडणीत, व्यक्तिमत्त्व विकासात, संगोपनात आणि एकूणच आयुष्यात बापाची भूमिका काय? जसं लेक मोठी होता होता, मायलेकीच्या नात्यामधे सहसा मैत्रीचे धागेही गुंफले जातात, तश्या धाग्यांची वीण बाप लेकीमध्ये गुंफली जाऊ शकते का? गुंफायला हवी की नको? ह्या प्रक्रियेला थोपवण्यासाठी अडसर उभे असतात का? असतील, तर कश्या प्रकारचे?

मुळात पुरुषाची अधिकार गाजवण्याची मानसिकता, समान पातळीवर उतरुन लेकीशी "मैत्री" साधू, जोडू शकते का? मैत्रीच्या नात्यातलं कधी काळी उमटणारं अरे - कारेही पेलू शकते का?

अर्थात, प्रत्येक पिढीगणिक हे नातं बदलत आहे, हे तर नक्कीच.

हेच बदल आणि वर उद्धृत केलेल्या व ह्या सारख्या इतर प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न बापलेकी ह्या पुस्तकातून केलेला दिसतो. पद्मजा फाटक, विद्या विद्वांस आणि दीपा गोवारीकर ह्यांनी संपादित केलेल्या ह्या पुस्तकांत काही लेकींनी आणि मोजक्या बापांनी अतिशय प्रामाणिकपणे आपापल्या नात्यांविषयी लिहिलेलं आहे. काही सुसंवादी आणि आल्हाददायक नातेसंबंधांविषयी वाचताना एक हृद्य भावना मनात दाटून येते, तेह्वा काही खुरटलेली, कोमेजलेली नाती समजून घेताना वाईटही तेवढंच वाटतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे मनात येऊन जातं...

पुस्तकाच्या प्रस्तावनेत संपादिका विनंती करतात, तसं, रसिकांनी ह्या मनोगतांतली साम्यस्थळं आणि भेद, बलस्थान आणि भेद न्याहाळावेत, समजून घ्यावेत. त्याच्याशी शक्य असेल तसे, स्वतःचे अनुभव पडताळावेत आणि त्यातून आपल्या नात्यांच्या संदर्भचौकटींसाठी जे काही आधार मिळतील, कप्पे गवसतील, त्यांच खुल्या मनानं स्वागत करावं!

बस एवढंच.

नावः बापलेकी
एकूण पाने :४१८
संपादकः पद्मजा फाटक, विद्या विद्वांस आणि दीपा गोवारीकर
प्रकाशनः मौज
किंमतः रुपये ३५०/- (पाचवी आवृत्ती)

May 20, 2010

योगायोग

तर, काय सांगत होते... गेले दोनेक दिवस एका मराठी संस्थळावर मृत्यूसंबंधी गप्पा, लेख, कविता वगैरे सतत वाचायला मिळत होतं. इतकं धपाधप लेखन येत होतं की थोडंस सवंग वाटायला लागलं होतं. निदान माझ्यासाठी तरी थोडंफार अजीर्णच झालं होतं ह्या विषयाचं. का असं वाटतय आपल्याला, हेही मनात येऊन गेलं. मॄत्यूची मला भीती वगैरे वाटते का, असा प्रश्न विचारला स्वत:लाच. तर, नाही. खरोखरच नाही. वेदपुराणांत सांगितलेलं मृत्य़ूबद्दलच चिंतन मला पटतं का? तर, उत्तर आहे की, पटतं की नाही, ठाऊक नाही, कारण पटतं वा पटत नाही हे म्हणण्याआधी ते पूर्ण समजायला हवं, पण थोडंफार आश्वासक निश्चितच वाटतं. मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत, आत्म्याचा नव्हे, शरीराला जिवंत बनवणार्‍या आतल्या चैतन्याचा नव्हे...हे ऐकायला खूप उदात्त वगैरे आहे, पण हे खरंच असं होत असतं का? असेलही, किंवा काय माहीत... हे तत्त्व कधीकधी समजल्यासारखं वाटत, आणि कधीकधी पार गोंधळून टाकणारं असं वाटतं. असो.

अंत, मृत्यू तर निश्चितच असतो. निदान आपल्या लौकिक अस्तित्वाचा तरी आहेच ना? जो डोळ्यांना दिसतो आणि बुद्धीला, जाणीवेला पटतो असा. प्रत्येकाच्या अस्तित्वाबरोबर, त्या अस्तित्वाला अबाधित ठेवण्यासाठी जे झगडे होतात, ज्या किंमती मोजल्या जातात, जे जे काही केलं जातं, ते सगळं अलवारपणे पुसून कसलाही मागमूस उरु न देता, शांतपणे आपल्यासोबत नेणारा. सगळ्यांच्या अस्तित्वाला एकच नियम लावणारा आणि ज्याची त्याची वेळ झाली की ज्याला त्याला उचलणारा. त्यावेळी वय, जात, पात, वा तत्सम अजून काही निकष - जे समाजात पाळले जातात -असल्या कसल्यालाही भीक न घालणारा. जसं सबका मालिक एक, तसा, सबके लिये एकच नियम लावनेवाला!

हे आज पुन्हा एकदा सगळं मनाशीच उगाळलं. निमित्त?

कालच्या बुधवारी ऑफ़िसच्या मेलमधून एका कलिगच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी आली होती. इथलं मृत्यूविषयक लिखाण वाचत असल्याने असेल कदाचित, ती बातमी येऊन अक्षरश: आदळली! नुसती बातमीच राहिली नव्हती ती आता. काल पाहिलेली व्यक्ती आज एकदम नाहीच? व्यक्तीश: ह्या घटनेमुळे माझ्या रोजच्या आयुष्यात अर्थाअर्थी काहीही फरक पडत नसला, तरीही, दोनेक क्षण काहीच सुचू शकलं नाही हे तर खरंच. नक्की शब्दांत काय वाटल हे पकडता येत नाहीये, पण हा विचार नक्कीच आला की हे मॄत्यूविषयक लिखाण वा बोलणं वगैरे किती सोपं आहे आणि किती अर्थहीन! नुसतेच पोकळ शब्द! केवळ फोल! एखाद्या तिर्‍हाईताने केवळ सांगू शकतो, बोलू शकतो म्हणून एखादा शहाणपणाचा पाठ पढवावा तसं. एखाद्या थिअरी आणि प्रॅक्टीकलमध्ये जमीन अस्मानाचा फरक असावा असं. ह्यापुढे मरणाबद्दल इतकं सहज, तिहाईतासारखं आणि इतकं धपाधपा नाहीच लिहू, बोलू आणि वाचू शकणार...

ह्याला योगायोग म्हणा किंवा काही.

January 15, 2010

कोकणसय



२००९च्या वर्षांताला पुन्हा एकदा आजोळी जायचंच असं ठरवून, आणि नशीबाने त्यात काहीही अडथळे न येता, बर्‍याच वर्षांनी कोकणात पोहोचलो. गेल्यावर लगेच लक्षात आलं, की, अरे, कोकणही आता खूप बदललं.... बरचसं ओळखीचं खरं, पण थोडंसं अनोळखीही वाटायला लागलं.....

दर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, कोकणात आजोळी - पणजोळी जायची चैन कधीचीच सरली आहे. मे महिन्यातल्या ऐन दुपारी, विहिरीकाठच्या आंब्यांच्या सावलीत बसून, जिवाला शांतवणारा वारा अनुभवत, गप्पांमध्ये रमण्याचे आणि गावाकडच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या भुतांच्या "लेटेश्ट" कहाण्या आणि थोडयाफार - निरुपद्रवी का होईना - चहाडया ऐकून फिदफिदण्याचे आणि क्वचित प्रसंगी आश्चर्यचकित होण्याचे दिवससुद्धा कुठल्या कुठे उडून गेलेत...... बघता बघता, ज्या मायेच्या माणसांसाठी तिथे जात होतो, त्यांच्या कुशीत बसून आणि शेजारी झोपून कथा कहाण्या ऐकवत होतो आणि ऐकत होतो, हक्काने कौतुकं करुन घेत होतो, ती माणसंही राहिलेली नाहीत. गावी जायचं मुख्य प्रयोजनच सरलेलं आहे.....

मला आठवतं तसं, माझ्या अगदी लहानपणी आजोळी वीजही पोहोचली नव्हती. जसजशी संध्याकाळ होऊ लागे, तसतसा अंधार हलके हलके अवघ्या आसमंतात पसरत जाई. बघता, बघता मिट्ट काळोखामध्ये सभोवताल हरवून जाई. आजी रोज सकाळी कंदीलांच्या काचा घासून पुसून स्वत: स्वच्छ करायची. संध्याकाळी ह्या कंदीलांच्या वाती ती उजळत असे. घराबाहेर काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असलं तरीही, घरातला कंदीलांचा उजेड मोठा आश्वासक असायचा. त्या मंद, स्निग्ध प्रकाशात आम्ही सर्व पोरंटोरं शुभं करोति कल्याणम् म्हणत असू...पाठोपाठ, देवघरामध्ये अखंड तेवणार्‍या समयीची तेलवात ठीक आहे ना हे पाहून आणि मग तुळशीपुढे दिवा लावून, आजी सुस्पष्ट आणि हळूवार स्वरा -लयीमध्ये तिची नेहमीची स्तोत्रं म्हणायला सुरुवात करायची....संध्याकाळचं असं चित्र, तर सकाळी भल्या पहाटे उठून देवापुढं, वास्तुपुरुषाच्या गडग्यापुढं आणि पुढील दारी, तुळशीपुढं सडासंमार्जन आणि छोटीशीच का होईना, रांगोळी चितारायचा तिचा नेम कधीच चुकला नाही. देवघरातल्या देवीला आणि शाळीग्रामांना सोवळ्याचा नैवेद्य असे. घरासभोवताल असलेली कुंपणावर फुलणारी जास्वंद, चाफी, तुळशी, एखाद दुसरं गुलाबाचं फूल, काकडयाची फुलं, अबोलीचे, बकुळीचे वळेसर ह्यांनी फुलांची परडी भरायची. भटजी येऊन पूजा करुन जात.

पिंगुळी येथील दत्त पादुका



पूजेनंतर, चहा आणि रव्याचा लाडू खात, दोन चार सुख दु:खाच्या गप्पा करीत, आणि कुलाचार व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे देव देवता नेहमीच ह्या घराण्यावर प्रसन्न राहतील ह्याची ग्वाही देऊन संतुष्ट मनाने निघून जात. खरं तर पूजा सुरु असताना आम्हांला ती जवळून पहायची असे, पण, "चला, चला दूर रवात आणि लांबून काय ती पूजा बघा! समाजल्यात? हात जोडल्यात काय की नुसतीच धुमशानां घालतल्यात?" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत! मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती! तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून "शाळा शिकतंस मां नीट? आवशीक त्रास नाय मां दिणस? खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. ?" असं मायाभरल्या आवाजात सांगून डोक्यावर मायेचा हात फिरवून जात.

ह्या वेळी देवघरात उभं राहून देव्हार्‍यात स्थानापन्न झालेल्या देवीला आणि शाळीग्रामांना हात जोडताना, पुन्हा एकदा हे सगळं आठवलंच. तेह्वा येणारे भटजीबुवा आता नाहीत, पण कोणी दुसरे भटजीबुवा येऊन पूजा करतात. त्यांचं फारसं, पूर्वीइतकं सोवळं नसावं बहुधा. तुळस मात्र अजूनही तशीच बहरते, सकाळच्या कोवळ्या उन्हांत तिच्या बाळमंजिर्‍या देखण्या दिसतात! तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा! तो थोडाफार स्वभावात असण्याची चैन अजून परवडते, हेच नशीब!

सगळ्यांसारखंच शिक्षण, कॉलेज, नोकरी वगैरे शहरी जीवन मीही जगते, जे आता हाडीमांसी रुळून गेलं आहे. असं असलं ना, तरीही, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, जराही न बदललेलं असं, फक्त माझं स्वत:चं असं, कोकणच्या आठवणींनी पालवलेलं एक विश्व आहे. ते कधीही बदलत नाही, त्याला चरे जात नाहीत, ते फिकुटत नाही की विस्मरणात जात नाही. कधी ना कधी, ह्या ना त्या निमित्ताने ते मला सामोरं येतच राहतं. कोकण मनातून बाहेर पडायला तयार नाही! ह्या वेळी, काही वर्षांनी पुन्हा कोकणात जाताना हे असं काहीबाही आठवत होतं....

कोकणात शिरताना आंबोलीतून शिरायचं. निपाणीपर्यंत सरळसोट महामार्ग आहे. महामार्गावर जात असता, निपाणीपाशीच, एके ठिकाणी आजर्‍याकडे जायला रस्ता वळतो. तो रस्ता धरायचा. आतापर्य़ंतचा महामार्ग संपून हा छोटासा रस्ता सुरु होतो. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, पण जसंजसं आजरा मागे पडायला लागतं, तसतसं कोकणच्या खुणा दिसायला लागतात आणि एका वळणावर समोर येतो तो आंबोलीचा घाट! आंबोली सदासुंदर ठिकाण आहे. कधीही जा, न कंटाळण्याची हमी!

पूर्वेचा वस इथून दिसणारी आंबोली



आंबोली घाटात ’पूर्वेचा वस’ म्हणून एक देऊळ आहे, तिथेच देवळाशेजारी २-३ टपर्‍या आहेत, तिथला मस्त उकळलेला चहा आणि बटाटेवडे खाण्याचं भाग्य अजून तुम्हांला लाभलेलं नसेल, तर मी केवळ एवढंच म्हणू शकते, हाय कंबख्त, तूने...!!!! ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा! समोर दर्‍याखोर्‍यांडोंगरांचा आणि वनराजीचा एवढा विस्तीर्ण पसारा पसरलेला असतो... वळणावळणाची वाट पुढे पुढे जात असते.

आंबोलीचं अ़जून एक दृश्य



आपलं रांगडं, सभोवताल वेढून राहिलेलं देखणेपण आणि त्यापुढे आपला नगण्यपणा अतिशय सहजपणॆ निसर्ग एकाच वेळी आपल्या पदरात घालतो..... सलामीलाच असं चहू बाजूंनी कोकण तुम्हांला रोखठॊक सामोरं येतं, जसं आहे तसं. फुकाचा बडेजाव नाही, की उसनी आणलेली दिखाऊपणाची ऐट नाही. इथे जे काही आहे ते साधं, सहज आणि म्हणूनच सुंदर आहे. अगदी दगडी पाय़र्‍यांच्या खाचेमध्ये उमललेलं एखादं रानफूलसुद्धा!

जाईन विचारीत रानफुला...!



आणि आंबोलीचा घाट उतरला की ह्या देवभूमीत प्रवेश होतो. आणि ही भूमीही अशी, की, सहज चित्त जाय तिथे, अवचित सौंदर्यठसा!

ह्या भूमीचं स्वत:चं असं एक, अनेक घटकांनी बनलेलं अजब रसायन आहे. स्वत:चे कायदेकानून आहेत, अंगभूत अशी एक मस्ती आहे. इथल्या विश्वाला स्वत:ची अशी एक लय आहे, तंद्री आहे. इथला निसर्गही आखीव रेखीव नाही, त्याची रुपं ह्या भूमीवर यत्र, तत्र सर्वत्र उधळलेली आहेत. हे विश्वच वेगळं. इथले लाल मातीचे रस्ते, घरांच्या कुंपणांवरल्या जास्वंदी, माडां पोफळ्यांच्या बागा, आमराया, मागील दारी लावलेली, घरची आंब्या फणसांची झाडं, एखाद दुसरी सोनकेळ, तिच्या पानांमधून डोकावणारं सुरेखसं केळफूल, क्वचित बागेच्या एका कोपर्‍यातला निरफणस ह्यां सगळ्यांमधून डोकावणारी कौलारु घरं... सगळं कसं एखाद्या चित्रात शोभून दिसेल असं.

सावंतवाडीच्या मोती तलावाचे वेगवेगळे मूड्स



सावंतवाडीचा मोती तलाव



मोती तलावात कधीकाळी मोती सापडले होते म्हणे, म्हणून तलावाचं नाव मोती तलाव.



कोकणात टिपलेली काही दृश्ये



यादी इथे संपत मात्र नाही. इथले वाहणारे व्हाळ, पाणंद्या, शांत, सुंदर, साधीच असली तरी शुचिर्भूत वाटणारी देवालयं, दर्शनाला येणार्‍या प्रत्येकाच्या कथा व्यथा मनापासून ऐकणार्‍या आणि केलेल्या नवसांना पावणार्‍या नीटस सजलेल्या देवता, तरंग, देवळांसमोरच्या दीपमाळा, जिवंत झरे पोटात घेऊन कडक उन्हाळ्यातही नितळ पाण्याने झुळझुळणार्‍या आणि पंचक्रोशीची वा येणार्‍या जाणार्‍या कोणाही तहानलेल्याची तहान भागवणार्‍या बावी, तीमधे सुखाने नांदणारी कासवं आणि बेडूक, आणि त्यांच्या अवतीभोवती ओलसर वातावरणात उगवलेली नेची आणि मखमली शेवाळी, रस्त्यांच्या, शेतांच्या काठाकाठानं पसरत उमललेली लाजाळू, दोन गावांना जोडणारी मेटं, लहान मोठे धबधबे, कोणा भाग्यवंताच्या घरी असलेली गुरं, त्यांच्या गळ्यांतल्या लयीत वाजणार्‍या घंटा, ओवळीची झाडं, भातशेती, एखाद्या टिकलीएवढ्या छोट्याश्या गावातलं कमळांनी फुललेलं तळं, काजूंच्या झाडांचे कोवळे लसलसते सोनेरी कोंब, रायवळांचे आणि हापूस पायर्‍यांचे गंध, फणस गर्‍यांचे दरवळ, रानमेवा.... काय आणि किती... लहानपणापासून जरी हे सगळं पाहिलेलं असलं तरी अजूनही ह्या वातावरणाची मोहिनी माझ्या मनावरुन उतरायला तयार नाही. इथल्या भुतांखेतांच्या गप्पांसकट हे सगळं माझ्या मनात कायमचं वस्तीला आलेलं आहे.

वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराशेजारचं निळंशार तळं



लक्ष्मीनारायण मंदिरासमोरचे दीपस्तंभ



पाट - परुळेपैकी पाट गावात असलेलं भगवती मंदिराशेजारचं कमळांनी भरलेलं तळं



आणि कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांबाबत तर किती सांगायचं? तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन जायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते! दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो! दिवस सार्थकी लागतो!


निळी निळी सुरेल लाट, रत्नचूर सांडतो, फुटून फेस मोकळा नवीन साज मांडतो.....
भोगवेचा किनारा




वेंगुर्ले खाडी



भोगवेचा किनारा



लांबून दिसणारा भोगवेचा सागरनजारा



अशी ही देवभूमी. इथे पावलांपावलांवर सौंदर्य आहे, वातावरणात जिवंतपणा आहे आणि ह्या सर्वांपेक्षाही लोभस, जिवंत आहेत ती इथली माणसं. बर्‍या वा वाईट, अनुकूल असो की प्रतिकूल असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं माणूसपण न सोडता जगणारी, जिभेवर काटे असले तरी पोटात मात्र निव्वळ माया असलेली माणसं. मायेच्या आतल्या उमाळ्याची आणि फक्त ओठांतूनच नाही, तर डोळ्यांतूनही मनापासून हसणारी, आणि तसंच आपले राग लोभही ठामपणे बोलून दाखवणारी माणसं. त्यांच्यापाशी शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आहे. कष्टांना भिऊन एखाद्या कामापासून मागं सरणं त्यांना ठाऊक नाही, आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्यात दानत आहे. वेळी अवेळी दारात आलेल्या अतिथीचंही इथे मनापासून स्वागत होतं आणि पाहुण्यासारखं घरादारानं वागावं ही अपेक्षा न ठेवता, घरादारासारखं, त्यांच्यापैकीच एक बनून वागलात, तर कोकणातलं घर तुम्हांला कायमचं आपलसं करुन घेतं! कोणाची आर्थिक पत किंवा मोठेपणा ह्यांनी भारावून वा बुजून जाऊन किंवा त्या बाबींच्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्यक्तीकडून किती फायदा होऊ शकतो, असा हिशेबी विचार करुन तोंडदेखलं का होईना पण आदरार्थी वगैरे वागायची इथे पद्धतच नाही. बाहेरच्या जगात असणारा एखादा शेठ वगैरे, त्याच्या गावात, शेजारी पाजारी आणि पंचक्रोशीत प्रथमपुरुषी एकवचनी संबोधनानेच ओळखला जातो, अन त्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. इथलं कष्टमय आयुष्य हसतमुखानं उपसताना, परिस्थितीच्या शाळेत, अनेक अडचणींचा सामना करत इथल्या जुन्या पिढ्यांनी आयुष्यविषयक आडाखे, मतं स्वत: तयार केलेली आहेत आणि अनुभवांतून शहाणपण शिकलेलं आहे. भलेही त्यांच्याकडे उच्च शिक्षण नसेल - बर्‍याचजणांनी तर शाळेनंतर महाविद्यालयाची पायरीही चढलेली नसेल, पण त्यांचं शहाणपण कोणाहूनही कमी नाही.

हिरवे हिरवे गार गालिचे!



कोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी!



शेतचित्रं



आता नवी पिढी बाहेरच्या जगातले बदल पाहून त्यानुसार बदलते आहे आणि आपापल्या गावांमध्येही सुबत्ता आणू पहाते आहे, जागरुक बनते आहे, शिकते आहे, त्याचंही कौतुकच वाटत. एके काळी बहुतांशी अठरा विश्वे दारिद्र्य नांदणार्‍या ह्या कोकणात आता बर्‍यापैकी सुबत्ता नांदताना दिसते. कोकणातलं दारिद्र्य असंच दूर होत रहावं, तिथे चारी ठाव सुबत्ता नांदावी, मात्र, ह्या कोकण प्रांताची कोकणी ओळख मात्र अजिबात हरवू नये ही इच्छा मनात धरून देवघरातल्या देवाला हात जोडत त्याचा आणि आजोळचा निरोप घेतला.

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले...



वेळ थोडा राहिलेला, सूर सारे संपले, या असीमाला तरीही पाहिजे ना मापले?
वाहत्या पाण्यातूनी गुंफीत जावे साखळी, एक नाते मी तसे शोधीत आहे आपले!




निघायच्या आदल्या दिवशी लाडक्या तळ्यावर जाऊन खूप वेळ बसले. लहानपणी खेळायचो तो पाण्यात चपट्या टिकर्‍या फेकण्य़ाचा खेळ मनसोक्त खेळून घेतला. बाजूला तीन, चार छोटी मुलं आपलं हसू लपवत कुजबुजत होती, त्यांनाही खेळात सामील करुन घेतलं आणि मग एकदमच धमाल आली खेळायला! सूर्यास्त झाला, रात्र होत आली, तसं शेवटी तळ्यावरुन उठून घरची वाट पकडली. आठवड्याची सुट्टी संपल्याचं प्रकर्षाने जाणवलं....

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शहराकडे गाडी दामटली.

समाप्त.