Showing posts with label प्रकाशचित्र. Show all posts
Showing posts with label प्रकाशचित्र. Show all posts

September 29, 2009

पिवळ्या पंखांचा पक्षी

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय!

September 22, 2009

रंग माझा वेगळा

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!

May 10, 2009

निवडुंग

निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्‍या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.

अश्याच एका झुडुपाचं प्रकाशचित्र टिपायचा केलेला प्रयत्न.





कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..
-अभिजीत

मूळ गझल इथे पहा.

April 5, 2009

चांदणगोंदणी


ताडमाड वाढणारे अशोक वृक्ष परिचयाचे होते, पण त्याला लगडणारी फुलं ऐकूनच ठाऊक होती. इथे, बंगलुरुत ती फुलंही पाहिली! वरपासून खालपर्यंत चांदण्यांसारख्या हिरव्या फुलांनी आणि पोपटी, सोनेरी कोवळया पर्णसंभारांनी फुललेले, नटलेले अशोकवृक्ष अतिशय देखणे दिसतात मात्र!

दृष्टीला सुखाचा सोहळा!

February 22, 2009

चाफा बोलेना...



ह्म्म.. लिहिणार होते, त्याशिवाय फोटो टाकायचा नाही असं ठरवलं होतं, कारण मुख्यत्वे ब्लॉग सुरु केला ते काही बाही खरडायला! आता ते मागे पडून फोटो टाकणं सुरु झालय! :P पण, हा एक फोटो मलाच खूप आवडला, आणि इथे पोस्टावासा वाटला म्हणून मग पोस्टतेच. तसाही पेशन्स कमीच आहे माझ्यामधे! :D

आणि दुसरी सबब अशी की,एक काहीबाही खरडून अर्धवट ठेवलंच आहे आणि ते पोस्टणारच आहे लवकरच. तोपर्यंत एवढी सूट मिळायाला काय हरकत आहे? नाही म्हणजे, नसावी, नसूदेत. ... :D

February 15, 2009

फुले माझी अळूमाळू



हल्ली छायाचित्रणाचं भूत डोक्यावर चढल्यापासून लिखाण एकदम थंड पडलय! आता हा फोटू शेवटचा हां, म्हणजे या फोटूनंतर काही बाही लिहिल्याशिवाय फोटू टाकणे नाही, नाही, नाही!! :)

February 7, 2009

स्वतःच्या ब्लॉगवरील छायाचित्रं



स्वतःचा ब्लॉग असलेलं बरं असतं, हे मला परत एकदा नव्यानं उमगलंय! :D आपल्या ब्लॉगवर काहीही वेडंवाकडं लिहा अथवा फारशी उत्तम वा अतिउत्तम नसलेली अशी चित्रं वा छायाचित्रं टाका! काहीही करा! तेह्वा हे अजून एक छायाचित्र! आजच एकीकडून माझे फोटो भलतेच बेक्कार आहेत व ते मी उगाच का प्रकाशित करतेय वगैरे बरंच ऐकायला मिळालं. नेहमीसारखेच आहेत, काही वेगळेपणा नाही आहे त्यांच्यामध्ये, करायचेच म्हणून करतेय का वगैरे आणि तत्सम बरंच काही..... एकीकडे मजाही वाटत होती! राग आला का? खरं सांगायचं, तर नाही आला. फारसं काहीच नाही वाटलं..असो. खरच इतके बेक्कार आहेत का? असतीलही.

मी म्हणते, असेनात का बेक्कार! मला आवडलेत ते काढताना. मला ते जसजसे कॅमेरात बंदिस्त करायला सापडत गेलेत, ते सगळे क्षण मी खूप मनापासून एंजॉय केलेत. मग त्यांवर पिकासा, फोटोशॉप वगैरे मध्ये काम करताना मला खूप आनंद मिळालाय. ते फोटो पहायलाही मला छान वाटत. माझ्या कष्टांचे आहेत ना ते! तर, मी ते माझ्या ब्लॉगवर आणि जिथे म्हणून माझं म्हणून हक्काचं असं ब्लॉगचं पान आहे तिथे ते मी टाकणारच!

माझ्या असलेल्या ब्लॉगवर आणि माझ्या हक्काच्या पानावर मी काढलेली छायाचित्रं प्रकाशित करायचा मला पूर्ण हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!! :D हे सगळं पण लिहिलंय म्हणजे काय, असंच, माझ्या ब्लॉगवर लिहायचा मला हक्क आहेच! म्हणूनच.. ;)

टीका करा, कोणत्याही शब्दांत करा, पण ती किती मनावर घ्यायची हे मीच ठरवणार ना? :)

February 5, 2009

बोगनवेलीचं फूल



पिकासामधे काही इफेक्ट्स वगैरे वापरुन प्रयोग करायचा प्रयत्न केलाय. हल्लीच शिकतेय ना! किडे करायची सवय जात नाही! सूचना, सल्ले (फोटोग्राफीविषयक फक्त! :D ) आवडतील. काही मतं असतील तर जरुर सांगा. चांगलं दिसत नसेल तर तसं सांगा. जोर के धक्के देने हो, तो दिजिये, मगर धीरेसे! :D

January 27, 2009

ज्योत दिव्याची..



ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी...