February 3, 2014

नातो नामको जी

भाषांतरात सहसा नेहमीच मूळ कलाकृतीमधल्या बारिकियाँ असतात त्या हरवात. मूळ भाषेचा लहेजा, उपमांचं सौंदर्य, नजाकत, अचूकपणा सगळंच एका मर्यादेनंतर हरवतं, म्हणून भाषांतर नामक प्रकाराची जरा भीतीच वाटते. तेच अनुवादांचंही. अर्थात काही खूप सकस अनुवादही वाचले आहेत, तरीही मूळ भाषा ती मूळ भाषा, असं आपलं मला वाटतं. आज ही मीरेची रचना पाहिली आणि कोण्या मैत्रिणीला सारांश रुपाने अर्थ हवा होता म्हणून साधारण अर्थ लावायचा प्रयत्न केलाच शेवटी . प्रयत्न करता करता साध्याच, पण दिलसे असलेल्या रचनेच्या प्रेमात पडायला झालं!

अर्थात, हे  थोडंसं अंदाजपंचे भाषांतर आहे, हौसेपायी केलेलं..

नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।
माझ्या सावळ्याच्या नामस्मरणाशी माझं जे नातं जुळलंय ते मला जराही तोडवत नाहीये
पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।
पानं जशी हिवाळ्यात सुकून पिवळी पडतात ना, तशीच दु:खाने आणि विरहाने जणू काही सुकलेय मी आणि लोकांना वाटतं आहे की मला काविळ झालेय..
छाने लांघण म्हैं किया रे, राम मिलण के जोग॥
माझ्या रामाच्या मिलनाचा ध्यास घेऊन जगापासून लपत छपत उपाशी तापाशी अशी मी (दिसले/ आहे असे पाहून)
बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।
(कसला रोग असेल म्हणून की काय) माझ्या वडिलांनी वैद्याला सांगाव धाडला आणि माझी नाडीपरी़क्षा करवली..
मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।
पण त्या मूर्ख वैद्याला माझ्या हृदयाची तडफड काय समजणार?
जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।
अरे वैद्यबुवा, तू चालू लाग बरं आपल्या रस्त्याला, उगा माझ्या वाटेला जाऊ नकोस..
मैं तो दाझी बिरहकी रे तू काहेकूं दारू देय।।
मी तर विरहामध्ये होरपळणारी (त्या रामाची दासी आहे रे..) तू कशाला औषधं देतो आहेस (आणि ती लागू तरी कशी पडतील..)
मांस गल गल छीजिया रे करक रह्या गल आहि।
(विरहात होरपळून) मी इतकी क्षीण झालेय (शरीरावरलं सगळं मांस गळून हाडांचा सापळा तेवढा शिल्लक राहिलाय..)
आंगलिया री मूदडी म्हारे आवण लागी बांहि।
माझ्या बोटात होणारी अंगठी आता माझ्या हातात (बांगडीप्रमाणे) येते आहे, (इतकी क्षीण झालेय मी..)
रह रह पापी पपीहडा रे पिवको नाम न लेय।
अरे (मेल्या - सात्विक संताप आहे बरं!) कोकीळ पक्ष्या, सतत प्रेमाच्यासंबंधी काय बोलतोस रे?
जै को बिरहण साम्हले तो पिव कारण जिव देय।।
कोण्या विरहिणीने तुझे बोल ऐकले ना, तर तुझ्यामुळे दु:खाने जीव देईल..
खिण मंदिर खिण आंगणे रे खिण खिण ठाडी होय।
क्षणात माझ्या गृहात, क्षणात बाहेर अंगणात, अशी मी क्षणात इथे तर क्षणात तिथे (अशी मी बावरी होऊन फिरतेय..)
घायल ज्यूं घूमूं खडी म्हारी बिथा न बूझै कोय।।
म्या घायाळ विरहिणीच्या व्यथेचं समाधान मात्र कोणापाशीच नाही..
काढ कलेजो मैं धरू रे कागा तू ले जाय।
माझं हृदय मी जणू हातात धरलंय आता, ये रे काऊ, तूच आता ते घेऊन जा..
ज्यां देसां म्हारो पिव बसै रे वे देखै तू खाय।
ज्या कोण्या देशी माझा प्रियकर (मजेत) आहे ना, तिथे (त्याला दाखव) तो पाहील आणि (त्याच्यासमोरच) तू खा ते...
म्हांरे नातो नांवको रे और न नातो कोय।
केवळ (रामाच्या) नामाशीच नातं आहे रे माझं मीरेचं, अजून कोणतंच नातं ठाऊक नाही मला..
मीरा ब्याकुल बिरहणी रे हरि दरसण दीजो मोय||
ही मीरा (तुझ्या) दर्शनासाठी वेडी, व्याकूळ झाली आहे रे हरी, विरहाने दु:खी अशा ह्या मीरेला हरी, तुझं दर्शन दे..



हिमालय..

हिमालय. त्याचं वेड लागतं.

 अत्युत्तारस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित: पृथिव्या इव मानदण्ड:॥

 नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.

 हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.

कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्‍या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्‍या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्‍या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्‍या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्‍या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्‍याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता.

अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो.

घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?

त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!

... आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....

 “There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."