July 7, 2010

ये परतीचा वारा...

नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्‍याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्‍याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.

खरोखर विल़क्षण आहे! एवढ्या मोठ्या जगड्व्याळ पसार्‍यात कुठेतरी एक जीव जन्मतो, दिसामासी वाढतो, वाट्याला आलेल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव गाठीशी जमा करतो, त्यातून शिकतो, कधी हसतो, कधी रडतो. वाट्याला आलेले काही क्षण मनात अक्षय जपतो, काही विसरु पाहतो. काही काही क्षणांच्या आधाराने जगण्यासाठी नव्या उमेदीने पालवतो आणि काही क्षणांपुढे पार खचतो, शरणागती पत्करुन केविलवाणा होतो. कधी सूर जुळतात, कधी बेसूर होऊन दुखरी नस बनून ठसठसतात, आणि तरीही कोड्याची भूल सुटत नाही..

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

दिवस येतात, जातात. कित्येक घटना घडत राहतात. लहान, मोठ्या, लक्षणीय, नगण्य. कळत नकळत आठवणींची मोहर कुठेतरी मनाच्या तळाशी अलगद उमटवून जातात. प्रश्न निर्माण करतात, कधी कधी उत्तरं घेऊन येतात. निरुत्तरही करतात, तर कधी नव्या जाणीवांना सोबतीला आणतात आणि तुम्हां आम्हांला अधिक समृद्ध बनवून जातात, उत्तरं शोधायचीच खोटी. अर्थात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, असंही नाहीच. आणि समजा, सापडलेल्या उत्तरात नवीन प्रश्न लपलेल असेल, तर? जेति, जेति म्हणताना कधी ना कधी नेति नेति म्हणावं लागत असेल का?

लयबद्ध गतीने, तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दु:खांची चक्रं फिरतात. सुखावतात, दुखावतात. आपल्या, परक्यांची जाण देतात, शहाणं करुन सोडतात. उन सावलीचा खेळ जणू. कधी मनाची उमेद बांधण्यासाठी हात देतात, आणि कधी आपल्या सावलीलाही आपल्याचसाठी परकं करुन जातात. मन मात्र प्रत्येक क्षणामध्ये गुंतून पडतं, सुखाबरोबर तृप्त होतं, आणि दु:खानं पोळून निघतं.

... आणि चक्र सुरुच राहतं.. शेवटी हातात गवसतं काय? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही.

आणि असंच चक्र सुरु असताना, कधीतरी, हळूहळू थोडं फार उमगायला सुरुवात होते. ज्ञात अज्ञाताच्या पाठशिवणीच्या खेळाकडे नजर जाते, त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात. सोबतीतला एकलेपणा आणि एकलेपणातली सोबत जाणवते आणि एक दिवस कळून येतं,

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

जाणीवा अधिक संवेदनाक्षम बनतात आणि आपल्या हाती तसं पाहिलं तर काही काही नाही हे जाणवून थोडंफार सुटल्यासारखंही होतं. आता कसली भिती? दिशा कधीच्याच ठरलेल्या असतात, त्यातले खाचखळगे, राजमार्ग सगळं काही आधीच रेखलेलं असतं, आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी. कळूनच जातं सारं काही. तोवर परतीचा मार्ग समोर येऊन ठाकलेला असतोच. पण, आता कसं, सारं काही लख्ख समोर असतं, कसलीच घाई नसते. आता कदाचित सगळंच सोपं बनून गेलेलं असतं.

नाही मज घाई, पण वेग धरी होडी
जाताना एखाद्या शब्दातच गोडी
जो दुवा दिलास त्यात शीण मिटे सारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

राग, लोभ मावळलेले असतात. फारशा तक्रारी राहिलेल्या नसतात. एकच छोटंसं मागणं राहिलेलं असतं, मागणं कसलं, विनंती. अगदी शेवटची. हरवलेलं काहीतरी आता गवसलेलं असतं आणि आता ते पुन्हा हरवायचं नसतं. म्हणून, एवढंच सांगणं होतं,

मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....


समाप्त


*कवितांच्या ओळी कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या.

* हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.

त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं.

मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.

July 5, 2010

पुस्तक परिचय: युगांत

रामायण आणि महाभारत. भारतवर्षाची स्वतःची, आपली अशी २ महाकाव्ये. मात्र दोन्हीं काव्यांमधे खूप फरक आहे. आदर्शवाद हे रामायणाचे बलस्थान. इतके, की आदर्श जपताना व्यक्तींची फरफट झाली तरी, आदर्शाची जपणूक काही सुटत नाही. ह्याउलट महाभारत.

महाभारतात काय नाही? आकांक्षा, वैर, भक्ती, मैत्री, तत्वनिष्ठता.... मानवी मनात उमटणार्‍या प्रत्येक भावनांचे आंदोलन महाभारतात तितक्याच समरसतेने टिपले आहे, आणि त्याचबरोबर ह्या सर्वांचा फोलपणाही. अगम्य आणि मनाला चटका लावणारी अशी नात्यांमधली गुंतागुंत महाभारतात जशी टिपली आहे, तशी अजून कुठेही टिपली गेली नसेल बहुधा. महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या असण्याला, वागण्याला काही कारण आहे, आणि तरीही शेवटी नियतीच्या हातातल्या ह्या सार्‍या बाहुल्याच आहेत! त्यांचा रस्ता ठरलेला आहे आणि त्यावरील वाटचाल केवळ अटळ आहे... महाभारतातील पांडवांना शेवटच्या युद्धानंतर मिळालेल्या जयाचे स्वरुप पराजयापेक्षाही भीषण आहे.

अश्या ह्या गुंतागुंतीच्या महाभारतातील तितक्याच गुंतागुंतीच्या व्यक्तीरेखा इरावती कर्वे ह्यांनी "युगांत" ह्या त्यांच्या पुस्तकात मोठ्या समर्थरीत्या उलगडून दाखवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाभारतकालीन समाज, धर्म, तत्कालीन जीवन वगैरेवर अतिशय चपखल निरिक्षणे नोंदवली आहेत.

पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखी आहे, म्हणजे हे लेखन करण्यासाठी इरावतीबाईंनी उपसलेले कष्ट आणि त्यांच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येईल. महाभारत अधिक उत्तम रीत्या समजावून घ्यायचे असेल तर, माझ्या मते "युगांत" चे वाचन आवश्यक. पुस्तकाची सतरावी आवृत्ती सद्ध्या मिळते, त्यावरुन त्याचे महत्व लक्षात यावे.

नावः युगांत
एकूण पाने :२४५
लेखकः इरावती कर्वे
प्रकाशनः देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
किंमतः रुपये २५०/- (सतरावी आवृत्ती)

पुस्तक परिचय: उपनिषदांचा अभ्यास

उपनिषदे, अर्थात वेदांत. वैदिक जनांचे वाङ्मय म्हणजे वेद, त्या वेदवाङ्मयातील एक भाग, म्हणजे उपनिषदे. वेदवाङ्मयातील विचारबीजांचा साकल्याने केलेला अर्थविस्तार उपनिषदांमध्ये बघायला मिळतो, बहुधा ह्याच कारणाने, उपनिषदांना 'आम्नायमस्तक' वा वेदांचे उत्तमांग असे गौरवण्यात येते.

ऋग्वेदांनंतर व बुद्धपूर्वकाली प्रमुख उपनिषदे निर्माणे झाली. आजूबाजूचे विश्वाचे निरिक्षण करताना, अनुभवताना आणि त्या अनुभवांचे डोळसपणे चिंतन, मनन करताना, त्या अनुभवांवर विचार करताना, प्राचीन काली ऋषी मुनींनी स्वतःला आलेले अनुभव, आकळलेली तत्वे, संकल्पना, हे सारे शब्दबद्ध केले, आणि उपनिषदांचा जन्म झाला.

एकंदरीत उपनिषदे बरीच असली, तरी त्यापैकी जी महत्वाची व प्राचीन समजली जातात, त्यांचा अर्थासहित उहापोह 'उपनिषदांचा अभ्यास' ह्या प्रा के. वि. बेलसरेलिखित पुस्तकात अतिशय सहजसोप्या व प्रवाही भाषेत करुन दिलेला आहे. पुस्तकाच्या आरंभी, उपनिषदांविषयी, त्यातील संकल्पनांविषयी उत्तम माहिती दिलेली आहे. उपनिषदांतील संस्कृत ऋचांचा अर्थ, त्यामागील तत्व, आणि साध्या सोप्या भाषेत, व्यावहारिक उदाहरणांसहित त्यावर केलेले विवेचन हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

संस्कृत भाषा येत नाही, समजत नाही अश्या व तत्सम अडसरांपोटी जर उपनिषदे वाचायची व समजून घ्यायची इच्छा असूनही अजून वाचली नसतील, तर ह्या पुस्तकाचा तुमच्या संग्रहात समावेश करण्याविषयी नक्की विचार करा.

वाचनासाठी शुभेच्छा!

वाचाल तर वाचाल!

पुस्तक परिचय -

नावः उपनिषदांचा अभ्यास
एकूण पाने : ५५३
लेखकः प्रा. के. वि. बेलसरे
प्रकाशनः त्रिदल प्रकाशन
किंमतः रुपये २५०/- (द्वितीय आवृत्ती)