September 8, 2012

शोध

इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?
मला शोध ना..

इथं, तिथं,
फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्‍या वाळवंटात.

पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.
निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या,
हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.

जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्‍याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,
नि:शब्द, नीरव शांततेत,
न सरत्या कोलाहलात.
हास्याच्या लकेरीत,
पापणीआडच्या पाण्यात.

अन् विसरु नकोस
पहायला शेवटी,
तुझ्या मनाच्या एखाद्या
खोलश्या कप्प्यात.

August 20, 2012

आधे अधुरे...

गेल्या वर्षी ट्रेकवरुन येऊन उत्साहाने ब्लॉग लिहायला घेतला आणि बर्‍यापैकी गाडी रेटलीही. नंतर, नंतर आळस, रोजचे रुटीन वगैरे नेहमीचे धक्के लागत गेले आणि गाडीचा वेगही मंदावला आणि शेवटी थांबलाच. ह्या वर्षी तर बना बनाया हुवा ट्रेक सुरुही करण्याआधी सोडून द्यावा लागला, त्याचे दु:ख तर इतके आहे की मी सांगू नये आणि कोणी विचारुही नये. शब्दांत सांगण्यासारखे नाहीच. मनापासून दु:ख झाले.

एकदा हिमालयात पाऊल ठेवले ना की त्याची ओढ निर्माण होते, वेड लागते. मग काय, जिथवर झेपेल तिथवर पुन्हा पुन्हा जायचा बेत करायचा. जायची वेळ जसजशी जवळ येते तसतसे अधिकाधिक हुरळून जायचे, त्याचाच विचार करायचा आणि प्रत्यक्ष जायचा दिवस आला की अगदीच आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे च्या थाटात धोकटी पाठीवर मारुन निघायचं! आठ दिवस तरी अलम दुनियेपासून दूर रहायची ऐश करायची. शांत व्हायचं, स्वतःला ओळखायचं, स्वसंवाद साधायचा. सभोवतालच्या अफाट निसर्गाचा भाग होऊन रहायचं. लई न्हाई मागनं...

तर ते र्‍हायलंच सगळं ह्यावेळी. जायच्या आधी झालेली कविता सुद्धा फुक्कट गेली राव! म्यां लिवल्यालं व्हतं का

येते म्यां जाऊन
तंवर नीट र्‍हावा
गप्पागोष्टी करताल
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वाट
चाल व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आन्भव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
कश्शी माझ्याच लेकीवानी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
परतताना नगाधिराजाला
साकडं मग मी घालंल
*
तर, भ्येटूच आपन लौकर
ती खात्री हायेच मला
आले की उलगडीन
निसर्गाअंगीच्या कळा
*
आता घेईन रजा
मागून येक मागनं
यारी दोस्ती इसरु नगा
आपुलकीचं लेनं
*
*

.. तर असो, असो.

पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या ट्रेकच्याच आठवणी जागवाव्या म्हणते. बरेचसे संदर्भ आता सुटलेही असतील, पण जमलं तर पुन्हा एकदा ट्रेकबद्दल लिहायला घेते.

पुढच्या वर्षीपरेंत तगवायला नको का स्वतःला?

January 15, 2012

ऋण

भांबावतो कल्लोळ,
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...