
माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
June 22, 2008
June 8, 2008
भिवाण्णाची काळी माय
गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता! हताश असा, घरासमोरल्या अंगणातल्या बाजेवर बसून, शून्यात नजर लावून, परत एकदा आयुष्याची बेरीज वजाबाकी करण्यात, आणि कुठं न् काय चुकलं याचा मागोवा घेण्यात, भिवा गुंतला होता. एवढाच एक खेळ नियतीने त्याच्या नशीबात आता ठेवला होता जणू..... मनातल्या मनात, घरच्या देव्हार्यातल्या तसबिरीतल्या देवाला त्याने प्रश्न विचारुन झालं होतं, की बाबा रे, आता उतरत्या वयात हे भोग का रे बाबा देतोस नशीबी?? पण तसबिरीतला देवही गप्पच राहिला होता.....
उगाच मागचं, पार त्याच्या लहानपणचं काहीबाही आठवत राहिलं त्याला. पुरानं सुसाटणार्या नदीला लोंढे यावेत तशा आठवणी, एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी... मनावर काही धरबंदच राहिला नव्हता त्याचा.
..... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा नाव ठेवलेलं बानं आपल्या. बाच्या आईची -आपल्या आज्जीची आठवण म्हणून. दिसायलाही कशी चंद्रावाणी होती, गोरी गोमटी. चांगल्या घरात पडली. दाजीपण भला माणूस. बहिणीला सुखात ठेवलं आपल्या. भेटायला यायची माहेराला, तेह्वा कशी भरल्या मनानं, सुखानं तृप्त हसू ओठांवर लेवून यायची.... चंद्री पण आई बापाच्या नावाला जपून राहिली. पण कशी चिडायची लहानपणी!! आठवणीने आतापण भिवाण्णा गदगदत हसला.
रस्त्यावरून जाणार्या कोणी आश्चर्यानं नजर टाकली, काय झालयं हे भिवाण्णाचं, येवढा ताठ गडी, पार हेलपाटलाय, मधेच हसतोय, मधेच डोळ्यांतून टिपं गाळतोय, काय खरं नाही, ह्याअर्थी मान हलवत तो गडी आपल्या कामाला निघून गेला... भिवाण्णाला काहीच सोयरसुतक नव्हतं, तो आपला भूतकाळात रमला होता, चंद्रीच्या लहानपणची एक आठवण त्याच्या मनात रुंजी घालायला लागली होती.
"बा, ह्यो मला आक्का म्हनीत न्हाय बग!! ह्येला सांग, मला आक्काच म्हनायाचं...."
"आस्सं?? आक्का म्हनीत न्हायी?? मग काय म्हनीत्यो?? काय रं भिवा?? का तरास देतोयास रं माज्या चिमनीला??" मिशीतल्या मिशीत हसत बा कसा उगाच लटकं रागवायचा, आणि मग चंद्रीची समजूत काढायचा!! "अग पर सोन्ये, तू ल्हान हायेस त्येच्या परीस, तुजा त्यो मोठा भाव हे... तू त्येला दादा म्हनायाचं, व्हय का न्हाय? सांग बर..."
"मग त्यो मला शेंबडी, शेंबडी का चिडवायला लागलाय?? मला शेळीच्या शेजारी शेंबडी हाय, आसं म्हनतोया.... "
"अग चिमने, पर तू ये की नाक पुसून, आन् मंग त्येला इचार, काय रं, आसं का म्हनीतो म्हनून!! व्हय का न्हाय??"
चंद्राला लग्गेच पटायचं, लग्गेच धावायची घरात! आपण बाच्या संगतीने हसायचो.
सासरी पाठवणी करताना आपण म्हणालो होतो, "आक्के, चाललीस व्हय आमाला सोडून आता?" तेह्वा कशी उमाळ्याने आपल्या कुशीत येऊन रडली बाय माझी! मायाळू पोर अगदी.... कसबस ताठ राहिलो आपण, बाप्या माणसाने रडून कसं चालेल, म्हणत. परत एकदा भिवाण्णाच्या डोळयांत पाणी उभं राहिलं चंद्रीच्या आठवणीने... गेल्या सालीच गेली, ते एक बरं झालं, नाहीतर आपले भोग काय तिच्याच्यानं बघवले नसते, अस वाटत राहिलं त्याला.
मग असंच काय काय आठवत राहिलं त्याला, घरच्या आठवणी, माय आणि बाच्या आठवणी... बाच्या संगतीने मायही खपायची शेतात. भल्या पहाटेची उठून, झाडलोट करून, घरातली कामं आवरून, मुक्या जनावरांची काळजी घेऊन, त्यांच दाणापाणी, वैरण बघून ती शेतात जायला तयार व्हायची. किती कामाचा डोंगर पेलायची, पण कधी तिच्या कपाळी आठी नाही पाहिली, आपला बा ही तसाच. खूप धीराचा, मोठया मनाचा गडी, तितकाच मायाळू. असले आई बाप मिळायला नक्कीच आपण गेल्या जन्मी पुण्य केलं असलं पाहिजे... हसतमुख मायबाप त्याच्या डोळ्यांसमोर आले. परत एकदा लहान व्हावं आणि मायच्या पदरात तोंड लपवून पदरातला गारवा अनुभवावस वाटल त्याला. तिच्या मायाळू हाताचा स्पर्श आठवून आणखीनच सैरभैर झाला तो... कशी माय आपण थकूनभागून घरी आलो की मायेने चेहर्यावरुन आपला खडबडीत हात फिरवायची आणि पदराने चेहरा पुसायची हे आठवून त्याचं मन उगाच जडभारी झालं.
आणि बापाचा काळ्या आईवर किती जीव!! किती मानायचा तिला!! काही मनातलं सांगायच असल, तर तिची आण घ्यायचा!! बाने काळ्याईची आण घेतली की समजावं, प्रत्येक शब्द खरा अन् आता ती काळ्या दगडावरची रेघ. मग जरा मोठं झाल्यावर आपणही जाऊ लागलो बाच्या संगतीने शेतावर. बा सांगायचा, शिकवत रहायचा. किती तरी बारकावे... सुरुवातीला कंटाळा यायचा, मग हळूहळू जीव रमला. काळ्या आईची माया आपल्यालाही जडली, अन् तिचाही जीव जडला असणार आपल्यावर. आपल्या हाताला यशच देत गेली ती. बाच्या मनात एकच ध्यास होता, शेतजमिनीच्या तुकड्यात भर घालायचा. आपणही ठरवलं मनाशी, बासाठी एवढं करायचंच कधी ना कधी आयुष्यात. मनापासून मेहनत करत गेलो. काळ्या आईला सांगितलं मनातलं. "माय, तुजा आशिर्वाद र्हाऊ दे गं माज्यापाठी..." काळ्या आईच्या आठवणीने भिवा गलबलला.... परत एकदा त्याने देवाला मनातल्या मनात साद घातली, का रे बाबा देवा असा वागलास?? माझी मायही नेलीस तिची वेळ आली तशी, अन् तिची जागा भरून काढणारी काळी मायही तोडलीस!! मल तरी का ठेवतोस बाबा मागं? म्हातार्या, थकलेल्या डोळ्यांतून टिपं कशालाही न जुमानता सरसर ओघळली.....
पुढे काहीच न सुचता भिवा तसाच विमनस्क, दुपारच्या वार्याची झळ अंगावर घेत बसल्या जागीच लवंडला.... झोप तरी कुठे येत होती?? पडल्या ठिकाणावरुनच त्याने उगाच अंगणभर नजर फिरवली. पलिकडे कोपर्यात औत पडलं होत. औत बघून त्याला लाल्याची, त्याच्या बैलाची आठवण आली, अन घशात एकदम अडकल्यासारखंच झालं त्याच्या. दुनियेसाठी जनावर होतं ते, त्याच्यासाठी मात्र जिवाभावाचा सवंगडी होता लाल्या. तोही राहिला नाही, आपलं मन कसं कळायचं त्याला, कधी हिरमुसलो असलो की उगाच जवळ येऊन उभा रहायचा, खरबरीत जिभेने हात चाटायचा, कसा जीव लावलेला होता मुक्या प्राण्यानं... आठवणींच चाक फिरतच होतं....
अंगणाच्या मध्यभागी, त्याच्याच मायने हौसेने लावलेली, अन् पुढे तशीच निगुतीने काऴजी घेऊन त्याच्या बायकोने वाढवलेली तुळस आता फक्त काळया करड्या काटक्यांच्या रुपाने आपला जीव तगवून होती. बायकोच्या आठवणीने तो गलबलला. कशी लक्ष्मी होती भागिरथी... चंद्रीचं लग्न झालं आणि आपल्या मायने घरात मुलगी हवी म्हणून सून आणायचा हट्ट धरला!! बाने ही तिचीच री ओढली!! आपण तर कावलोच होतो, पण गेलोच मुलगी बघायला, अन व्हायच ते झालच!! जीवच अडकला की आपला तिच्या हसण्यात आणि लाजण्यात!! रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. कधी हट्ट नाही, मोठ्यांचा राग नाही, कामाचा कंटाळा नाही...घरात खपली, शेतात राबली. सासूसासर्यांची आवडती झाली.... कधी स्वतःसाठी हट्ट नसायचा तिचा. पण पोरगा झाला तसं मात्र तिने सांगितल, ह्याला शिकवायचं, कालिजात धाडायचं. त्यापायी पोरांचा लबेदाही वाढवला नाही... आणि पोरगा झाला त्याच वर्षी आपण अजून थोडी जमीन घेतली. बा किती किती हरकला होता काळ्या आईत चिमटीभर का होईना, भर पडली म्हणून !! हाडाचा शेतकरी तो, त्याची तीच पंढरी.... नातवाचा पायगुण म्हणाला!! पोराच्या नावावर त्याची जमीन केलीच, पण नव्याने घेतलेलीही कर म्हणाला!! आपणही खुळेच म्हणायचे!! करुन बसलो!! पोटच पोरगं म्हणूनच केली ना पण!!
पोरगा वाढत गेला, शिकत गेला... पोराच्या विचाराने त्याच तोंड एकदम कडू जार झालं. शहरात रहायला गेल्यापासून पोराला काळ्या मातीशी काय इमानच राहिलं नव्हतं. लहानपणी कसा रमायचा शेतावर... कानात वारं भरलेल्या खोंडासारखा धावायचा, काय काय गोळा करायचा.... आपण शिकवलेलं त्याला, ही काळी माय आपली, तर दमला की काळी माय, काळी माय म्हणत तसाच पसरायचा मातीत! गार गार वाटत, म्हणायचा... मग, आता काय झालं याला? कसं विसरला सगळं?? ह्या काळ्या आईच्या जोरावरच ना ह्याचं शिक्षण केल? पण शिक्षण झालं अन शहरातली नोकरी त्याला आवडायला लागली. मातीने पाय घाण व्हायला लागले त्याचे! गावाकडे करमत नाही, नोकरीच बरी म्हणून शहरातच राहिला. मला कधी बोलली नाही , पण त्याची आईही खंतावली मनातून पोराचं वागण बघून. ह्याला जराही जाणीव नाही राहिली?? ह्याही आईची नाही अन त्याही आईची!! असलं कसलं पोरगं रे देवा, स्वत:च्या आईला विकणारं...... बिनपोराचा राहिलो असतो तरी चालल असत की!! भिवाण्णा पोराच्या आठवणीनेही चिडला अन पचकन् थुंकला. म्हातारपणाची, असहायतेची जाणीव होऊन चरफडला... संध्याकाळ होत आली होती. जिकडे तिकडे भकास काळोख भरून येत चालला होता. भागिरथीच्या तुळशीपाशी जाऊन भिवाण्णानी सुकलेल्या तुळशीवरून सुरकुतला हात फिरवला. भागिरथीच्या आठवणीने कसनुसा झाला. तुळशीला म्हणाला, "ती गेली सोडून, आन् मला ठिवलया मागं ह्ये सगळं सोसाया..."
पोरगा तरी कसला वैर्यासारखा निघाला!!
त्याला आठवलं, बरोब्बर दीड वर्षापूर्वी, गावात सांगावा आला होता, गाव खाली करायचा, धरण बांधायचं होतं म्हणे सरकारला!! जे काय नुकसान भरपाई असेल ते सरकारच ठरवणार आणि देणार होतं. गावातली जुनी नवी माणसं चक्रावली, नाराज झाली. कितीतरी सभा, पंचायती, वाद विवाद - खूप काय काय घडलं! लोक पार जेलातही जाऊन आले! आपणही गेलो होतो. म्हातारं हाड असल म्हणून काय झालं?
..... पण शेवटी सरकारी नांगर फिरायला हळूहळू सुरुवात झाली होती, आणि लोक आजपर्यंत जिथे रुजले, जगले तिथून विस्थापित म्हणून बाहेर पडायला लागले होते.... न राहवून आपणच लेकाला पत्र लिहून बोलावून घेतलं, शहरात शिकलेला आपला लेक या साहेब लोकांशी बोलेल अशी आपली भाबडी आशा. लेकही पोचला, साहेब लोकांबरोबर ३-४ बैठकी झाल्या अन् एक दिवस खालच्या वाडीतला व्यंकप्पा सांगत आला की लेकाने जमीन विकली.... ऐकलं आणि भागिरथी तिथेच कोसळली ती उठलीच नाही! आपल्याला वेड लागायच बाकी राहिलेलं! किती परीन समजावलं पोराला, पण त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही!! गावात छिथू झाली ती वेगळीच... आपल्या आईला विकणारा शेतकरी तो कसला? कसाब बरा रे बाबा त्यापेक्षा....
आणि आता पोरगं म्हणतय की चला शहरात. कशाला? तिथं कोण आहे माझं? हे पोरग काय माझं नाही. मी का जाऊ? नाही, नाही मी नाही जाणार, मी माझ्या काळ्या आईला नाही सोडणार....
"अण्णा कापडं भरली का तुमची बॅगेत?" पोराने आवाज दिला.
भिवाण्णाने उत्तरच दिलं नाही... तो घराबाहेर पडताना पाहून पोराने विचारलं, "कुठे चालला आता रात्रीचं?"
"शेतावर जाऊन येतो जरा....."
"आत्ता कुठे या वेळी, कुठे पडाल बिडाल... नसतं झेंगट होईल.... उद्या निघायचं आहे आपल्याला, मला सुट्टी नाही जास्त...."
"पडलोच, आन् जड झालो का टाकून दे शेतात आपल्याच..." भिवाण्णा तिरमिरीतच बाहेर पडला. पोराने वैतागून बापाचे कपडे एकत्र करायला सुरुवात केली.....
भिवाण्णा शेतात पोचला होता. घरी तगमगणारा त्याचा जीव निळया काळ्या लुकलुकणार्या आभाळा़खाली आणि काळ्याईच्या स्पर्शाने हळू हळू निवत गेला. " माय गं, न्हायी गं जावस वाटत तुला सोडून, पर म्या काय करू गं, मला कायबी कळंना बग... समदी माजीच चूक हाय.... काळी माय, काळी माय, कधी काळी मापी करशीला का गं मला...." भिवाण्णा स्फुंदत स्फुंदत काळ्या मायेच्या कुशीत कधी विसावला, त्यालाही कळलं नाही.
सकाळी बाप घरात नाही म्हणून पोरगा, बापाला बघायला शेतावर पोचला...
बघतो तर काय, भिवाण्णा शांतपणे त्याच्या काळया मायच्या कुशीत पहुडला होता.
भिवाण्णाचं म्हणण शेवटी तसबिरीतल्या देवानं ऐकलं होत. भिवाण्णाच्या काळ्या मायशी त्याची ताटातूट टळली होती. त्याच्या मनासारखं झालं होतं......
April 27, 2008
मनात आलेले काही बाही....
ब्लॉगवर एक पोस्ट करायला साधारण ३० मिनिटं तरी लागत असतील ना? इथं आत्ता घरी बसून , समोरच्या लॅपटॉपवर पूर्णपणे तल्लीन होऊन ही पोस्ट बडवतेय. आजूबाजूला पुस्तकं पडली आहेत, गाण्यांच्या अन सिनेमांच्या सीड्या अन डीवीड्या पडल्या आहेत अन असाच थोडा थोडा माफक पसारा. थोडा फार पसारा असाच आयुष्यात पण, जो सध्ध्या आवरता येत नाही. तो तसाच असणार आहे काही काळासाठी तरी..... नंतर कधीतरी आपसूकच आवरला जाईल. असो.
आणि हे सगळं इथे सुरु असताना, बाहेरही नेहमीची जगरहाटी चालूच आहे, रस्ते माणसांनी अन वाहनांनी भरून ओसंडताहेत, जन्म, मृत्यू, सामान्य माणसांच्या आयुष्यातले नेहमीचे सोहळे, आनंदाचे क्षण, दु:खाचे कढ... सारं काही थोड्या फार फरकानं तसच. माझ्यासकट सगळे तथाकथित 'नॉर्मल' आयुष्य जगताहेत. वरच्या कुठे तरी वाचलेल्या जन्म मृत्यूच्या संख्या खर्या मानल्या तर, या अर्ध्या तासात कुठेतरी ३००० जीव मृत्यू पावलेत अन ६२०० ते ६५०० जीवांनी जन्म घेतलाय.या अर्ध्या तासात, काही घरांत मृत्यूच्या दर्शनानं वातावरण शोकाकूल झालं असेल, काही घरांत नवजन्माचा जल्लोष सुरु असेल, (जरासं विषयांतर, पण डोक्यात आलंच म्हणून, कदाचित काही घरांतून मुलाऐवजी मुलगी जन्माला आल्याचा एक नकळतसा बोचरा सलही जाणवत असेल. सुपर पॉवर व्हायचं असलं - किंवा अगदी झालोच आहोत तरीही -तरी आम्हाला मुलगी झाल्याचं अजूनही तेवढच वाईट वाटत, अगदी तथाकथित सुशिक्षित घरांतही!! जाऊदेत, हा एक वेगळाच विषय आहे.... ) कदाचित, यातल्या काहीजणांनी मृत्यूला सखा म्हणून हात पुढे केला असेल, कंटाळवाण्या आयुष्याला भोग म्हणून जगण्यापेक्षा एकच मृत्यू बरा, असही वाटल असेल कधी तरी. ज्यांचा जन्म झालाय, त्यांना तरी कुठे ठाऊक आहे पुढे काय काय घडणार आहे?? एका साधी आकडेवारी, अन ती सुद्धा कितीतरी कहाण्या सांगते, अश्रूंच्या, दु:खाच्या, आनंदाच्या क्षणांच्या, नाही??
त्यातही, पुन्हा, काहीजण या आकडेवारीचा भाग बनतही नसावेत..... एकाकी, निष्कांचन अवस्थेत जगून कधीतरी शांतपणे अन एकटेच कुठेतरी डोळे मिटण्याचं प्राक्तन घेऊन आलेले जीव. अनौरसपणाचा शिक्का कपाळावर घेऊन जन्मलेले आणि सोडून, टाकून दिले गेलेले जीव... पण जगरहाटी सुरुच आहे.
आणि मी, तुम्ही, आपण सगळेच, अगदी याच आकडेवारीचा एक हिस्सा. भूतकाळात कधीतरी जन्माच्या आकडेवारीचा हिस्सा अन पुढे भविष्यात कधी तरी मृत्यूच्या आकडेवारीचा हिस्सा!! जरी जीवनाचा प्रवाह वाहता असला आणि नैनं छिन्दन्ती शस्त्राणि, नैनं दहती पावक: , हे जरी खरं असेल तरी लौकिकार्थाने आपला या पृथ्वीवरचं निदान शारिरिक अस्तित्व संपणार, हे नक्की. पण, आपलं अस्तित्व अगदी अगदी क्षणभंगूर आहे, याची जाणीव असणं, बर असत.
एकूणच आपण मृत्यूविषयी खूप कमी विचार करतो, आयुष्य खूप गृहीत धरतो आपण. आयुष्यात अनेक नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो, कधी, कधी तर जरा अतिच!! नको त्या गोष्टींसाठी, खर्या खोट्या समजुतींपायी, मानापमानाच्या कल्पनांपायी आणि इगोपायी कितीतरी साधे, सरळ आणि सुंदर क्षण हातातून गमावतो. इतरांकडे बोटं दाखवतो, पण स्वतः कधीही बदलायचं मनातही आणत नाही!! खूप जगावेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटत असतात, पण जरा वेगळी वाट चोखाळायचं धाडस करायच की नाही, याबद्दल सांशकता असते. आपला आपल्यावरचा विश्वास डळमळतो...... संभाव्य धोक्यांना भिडण्याची ताकद खूप कमी जणांकडे. लहान मुलांसारख निर्भय, निर्व्याज जगण्याची कला तर आणखी कमी जणांकडे. आणि तरीही आपल्याला आयुष्याची एवढी नशा चढलेली असते, की आपण केवळा स्वतःचं आयुष्यच नाही तर आपल्या आजूबाजूच्यांनाही किती गृहीत धरतो!! आपल्या लोकांनाच नाही तर परक्यांनाही.....
थोडीशी मृत्यूची जाणीव मनात बाळगली तर इतकं बेदरकार वागू शकेल का कोणी?? किती तरी गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात अगदी रोजच्या जगण्यात, एखादा फोन कॉल, जो पलिकडल्या व्यक्तीला जाणवून देतो तुमच्या आयुष्यातलं त्या व्यक्तीच स्थान. एखादं दिलखुलास हास्य, कोणाला करायची राहून गेलेली निरपेक्ष मदत, तुम्हांला जोपासायचा असलेला एखादा छंद....
खरं तर आपल्याला कुठे ठाऊक असत की पुढचा क्षण तरी आपला आहे की नाही?? आणि प्रत्येक सुरुवातीला अंत हा असतोच म्हणतात, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कधी तरी पूर्णविराम हा ठरलेला, मग त्याला घाबरायच कशाला? उलट, थोडीशी त्या पूर्णविरामाची जाणीव ठेवली तर प्रत्येक जण थोडसं अधिक संवेदनशीलतेने वागेल का??
April 18, 2008
थँक्स मॅडम.....!!
दोन - तीन तासांनी सगळ्यांनी आपापल्या घरी निघायचं ठरवल, तसं, मी आणि अजून एक मायबोलीकरीण, इतरांचा निरोप घेऊन, शॉपिंगसाठी सज्ज झालो!! दुसर्या दिवशी बॉसच्या लग्नाचं रिसेप्शन होतं आणि सगळी टीम जाऊन बॉसला अन त्याच्या झालेल्या बॉसला चेहरा दाखवून येणार होती अन मलाही सज्जड दम दिला होता की, बये ये तिथं!! बर नाही दिसत नाहीतर!! पुढच अप्रैजल हाच करणार आहे, माहिताय ना??? अरेच्या....!!! म्हणून काय झालं?? एकतर रविवारी संध्याकाळी कुठेतरी हजारो कोसांवरच्या ठिकाणी असले उच्छाव मांडायचे अन सगळ्यांनी त्याला जमायचं!! तर, मग आता ह्या उच्छावाला जायचं असल्याने, जरा शॉपिंग करणं क्रमप्राप्त होतं... इथे आल्यापासून ऑफ़िसला लागतील असे साधे रोजच्या वापरातलेच कपडे आहेत माझ्यापाशी, समारंभात घालता येतील अश्या कपड्यांची गरज होती, आणि शॉपिंगसारखं सुख कोणतं??
तर, मस्त शॉपिंग करून आम्ही रमत गमत निघालो. रस्ते वेगळे होताना एकमेकींना बाय केलं, शॉपिंगला मज्जा आली असं एकमेकींना सागून निरोप घेतला, अन घरी परतताना लक्षात आलं, की एक छोटीशी खरेदी राहिलीच!! एका मिनिटासाठी वाटलं जाऊदेत, खूप दमायला झालं होतं, पायही दुखत होते खूप... पण मग तेही पटेना मनाला. थोडक्यासाठी कंटाळा कशाला करायचा?? (हेच जर अभ्यासाची पुस्तकं वाचताना वाटलं असतं तर एखादी पी. एच. डी. तरी पडली असती हातात गेला बाजार!! हेहेहेहे!! असो.)
तर, पावलं वळलीच दुकानाकडे. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी. मला हवी असलेली खरेदी मी अक्षरश: आटोपली!! आणि नशीबाने ती आटोपलेली खरेदीही मनासारखी झाली, म्हणून बरच वाटलं. सगळा दिवस आत्तापर्यंत छानच गेला होता. असा दिवस क्वचित पदरात पडतो माझ्या!!
खुशीत दुकानाच्या दरवाज्यापाशी आले आणि मी दरवाजा उघडणार इतक्यात तिथेच दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मघाशी खरेदी करताना मी एकदा दोनदा ओझरतं पहिलं होतं त्यांना. तिथे दुकानातच काहीतरी खरेदी करायला आले असणार अशी नोंद माझ्या मनात ओझरती झाली होती, किंवा त्यांच कोणी, म्हणज़े पत्नी, मुलगी, किंवा तत्सम कोणी खरेदी करत असाव, आणि ते खरेदी संपायची वाट पाहत असावेत असा आपला माझा ग्रह झाला होता, आणि मनातल्या मनात ते या खरेदी प्रकरणाला कंटाळले असावेत, म्हणूनच असे कंटाळून एका बाजुला उभे असावेत असही वाटून हसू पण आलं होतं!! माझा बाबा नेहमीच माझ्या बरोबर किंवा आईबरोबर कुठेही बाहेर खरेदीला यायचं नेहमीच टाळत आलाय!! गृहस्थ तसे मध्यमवर्गीय वाटत होते, सभ्य, सुशिक्षित वाटत होते.
तर, जेह्वा मला दरवाज्यापाशी येताना पाहून त्यांनी दरवाजा उघडला, तेह्वाही मला काहीच लक्षात आलं नाही!! दरवाज्यापाशीच ते उभे आहेत अन एक त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांनी दरवाजा उघडून धरलाय असच वाटल मला!! शप्पत!! मी त्यांना धन्यवाद म्हणायला जाणार इतक्यात ते गृहस्थच म्हणाले, "थँक्स मॅडम, प्लीज कम अगेन.... "
......... म्हणजे?? मी दोन मिनिटं उडालेच!! आणि त्याहूनही मला मनाला लागला, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा टोन... इतका थकलेला, हरलेला आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तत्क्षणी भलतच अपराधी वाटायला लागल! प्रथम म्हणजे, डोअरपर्सन म्हणून कोणीतरी आपल्याहून वयाने मोठी अशी व्यक्ती उभी असणं आणि तिने आपल्यासाठी दरवाजा जाता येता उघडून धरणं अजून तरी माझ्या पचनी पडत नाही, बरं आत शिरताना, माझा मीच दरवाजा उघडून आत शिरले होते, त्यामुळे ते मला आधीच लक्षात आलं नव्हतं........ आणि आता माझ्या वडिलांच्या वयाचे हे गृहस्थ माझ्यासाठी दरवाजा उघडून उभे होते...!! अगदी कससंच झालं!! आत्तापर्यंत चढलेली शॉपिंगची धुंदी उतरली क्षणार्धात!!
त्यांच्या चेहर्याकडे लक्ष गेल्यावर जरा हललंच आतमधे कुठे काहीतरी... ओढलेला, थकलेला चेहरा, पडलेले खांदे, चेहर्यावरचा खिन्न, विषण्ण आणि थकून हरल्याने येतो तसा एक अलिप्त, निर्विकार पण हार पत्करल्याचा भाव, आणि तो वैषम्याने भरलेला आवाज..... काय दु:ख असेल या काकांना, अस वाटल्यावाचून राहिलं नाही.
मनात प्रश्न उभे रहायला लागले एकामागोमाग....
या वयात हे असं दिवसभर उभं राहणं यांना जमत असेल का?? थकून जात असतील का? हो, नक्कीच.... काय कारण असेल बरं? वाईट परिस्थिती ओढवली असेल का घरी?? म्हणून मिळेल ती नोकरी पत्करावी लागली असेल का? या वयात योग्य अशी नोकरी मिळाली नसेल का? आयुष्यभर जबाबदारीने, नेकीने वागूनही आयुष्याचं विरत जाणंच सतत पाहणं तर नशीबात आलं असेल, ती अगतिकता, कुठेतरी मनानं पत्करलेली हार आवाजातून व्यक्त होत असेल का? कोणी पाहणारं नसेल का यांना अन यांच्या सहधर्मचारिणीला? का असूनही नसल्यात जमा झालं असेल?..... तेवढ्यात घरी गेल्यावर आई आणि बाबाशी फोनवर बोलायचं नक्की करुन टाकलं. तसही शनिवार, रविवार आणि आठवड्यातही माझे सतत फोन होतातच त्यांना, पण अजून एकदा....
का असं असेल? ऐन उमेदीत आयुष्य उधळलं असेल? जेह्वा, शक्य होतं तेह्वा बेदरकार वागून झालं असेल, अन शेवटी रिकाम्याच राहिलेल्या ओंजळीचा आता पश्चाताप होत असेल? पैलतीराची वाट चालताना आता आपणच आपली वाट कठीण बनवली आहे हे उमगून आणि आता वेळेचं घड्याळ मागे फिरवून आपली चूक दुरुस्त करु शकत नाही, हे लक्षात आल्याच वैफल्य असेल? अंगात रग असताना घरच्या, आपल्या लोकांना, हितचिंतकांना, मित्रांना कस्पटासमान वागवलं असेल आणि तेह्वा उमटवलेले ओरखडे इतके खोल असतील की आता ते पुसणं, अशक्य झालं असेल??
किंवा असं काहीच नसेल, बाकी सगळं ठीकच असेल अन फक्त तो दिवस खराब गेला असेल त्यांना? म्हणून मनातल्या मनात चिडचिडून वैतागल्या मूडमधे असतील त्याच दिवशी फक्त?
उगाच नुसते अर्थहीन प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि त्यापायीची वांझोटी खिन्नता....
दुसरा दिवस ठरल्यासारखा पार पडला, रिसेप्शनला पोचल्यावर मी खरेदी केली हे खूप चांगलं झालं ह्याचीही खात्री पटली, पण त्या दुकानातून बाहेर पडताना जी अस्वस्थता आली होती, ती मात्र मनातून जायला तयार नव्हती. उगाच अपराधी वाटत राहिलं.....
आता या सार्याला एक आठवडा उलटून गेलाय. अपराधीपणाची जाणीव बोथट होत चाललीच आहे शेवटी - त्याबद्दलही लाज वाटते मधूनच - पण अजूनही त्या गृहस्थांच्या शब्दांचा टोन आठवतो. आठवायचा अवकाश, की, अस्वस्थता एखाद्या लाटेसारखी परतून अंगावर येतेच!
कधीतरी परत त्या दुकानात शिरायचं धाडस करेन....
April 3, 2008
मी का लिहिते?
खर तर संवादिनीने खो दिला, तेह्वा तिचाच लेख वाचला आधी अन एकदम एक दडपणच आलं मनावर!! इतक सुरेख लिहिलंय तिने अन मी काय लिहू आता असं वाटल!! पैठणीला पोतेर्याचं ठिगळ लावलं तर कसं वाटेल?? मग, त्यानंतर उत्सुकता स्वस्थ बसू देईना, म्हणून, आतापर्यंत सगळ्यांनी लिहिलेलं वाचलं अन मी खरं सांगायचं तर या खो मधून नाव काढून घ्यायचा विचार केला, मला हे असं इतकं ग्रेट लिहिता येत नाही.... पण, मग म्हटलं, एक प्रयत्न माझाही. कोणालाच नाही आवडलं समजा, तरी निदान आपल्याला तरी समजेल काहीतरी परत एकदा नवीन आपल्याविषयीच कदाचित.....
खर तर मुद्दाम असा कधी विचारच नाही केला यावर. जसा श्वास अत्यावश्यक, तसच लेखनही . वाचनही. कदाचित लिखाणातून स्वत:चा स्वत:शी चालणारा अखंड संवाद मला भावतो? किंवा, मी स्वत:च स्वत:ला उलगडते बहुधा... आत्ता इथे लिहायला बसलेय, का लिहावसं वाटत आणि खर सांगायच तर काय लिहू हा प्रश्नच पडलाय!! श्वास घेताना, मी हा प्रत्येक श्वास का घेतेय हा विचार तरी कुठे केला होता कधी??
माझं शब्दांवर प्रेम आहे, असोशी आहे मला त्यांची. आणि, मनात येणारे विचार, अनुभवलेल्या घटना, क्षण शब्दांत मांडताना समाधान मिळतं. लिहिताना मन शांत शांत होतं जात. बर्याचदा, असंही होतं की जे पाहिलं आहे, त्याचा, एखाद्या क्षणी जे लिहिते त्याच्याशी लेखालेखी संबंधही नसतो खर तर, पण कशावरून काहीतरी तिसरंच आठवतं!! मग जे वाटतय ते लिहिल्याशिवाय चैन नसतं जिवाला. मग लिहायचं, काय करणार? नाविलाज को कोई विलाज नहीं!!
हसाल आता, पण एक वेगळी वहीपण आहे माझी. इथे ब्लॉगवर मी मांडू इच्छित नाही किंवा कधीकधी धजावत नाही, ते मी वहीत उतरवते. अगदी आतलं, मनातलं. काही अनुभव आणि क्षण, अनुभूती फक्त स्वत:साठीच असतात ना? तर, फक्त माझी, माझ्यासाठीची अशी ती वही. बरचसं मनातलं असं मी त्या वहीत वेळोवेळी उतरवलय. यापुढेही उतरवणार आहे. जाणवलेलं सुख, अनुभवलेल्या वेदना, काही काही अतिशय वैयक्तिक असे क्षण, अनुभव, आठवणी, स्वत:च्या चुकांची कबुलीही, स्वप्नं... बरंच काही साठलंय त्या वहीत.
लिहिणं, तसं कोणाशी बोलण्यापेक्षा सोपं असतं, कारण, वही माझ्याविषयी कसलेही पूर्वग्रह बाळगत नाही, किंवा नवीन मतं तयार करत नाही. माझिया मनीचे, फक्त ती वही ज़ाणते. माझ्यासारख्या, मनातलं पटकन बोलून न दाखवू शकणारीला लिहिणं लहानपणापासूनच तुलनेनं सोप वाटलय, म्हणून मी लिहिते.
हे लिहिता लिहिता सांगावसं वाटलं म्हणून - शाळेतल्या एक शिक्षिका, मला लिहायला सतत प्रोत्साहन देत, त्यांना खूप आवडायच मी लिहिलेलं, अस त्या मला नेहमीच सांगायच्या. नंतर कॉलेजला गेल्यावर एकदा त्या मला भेटल्या अन मी कला शाखा निवडायच्या ऐवजी इंजिनीअरींगला गेले म्हणून खूप हळहळल्या! तुझं लिखाण थांबवू नकोस मात्र गं पोरी असं कळकळीने दहादा तरी म्हणाल्या, अर्थात त्यात त्यांच्या माझ्यावरच्या मायेचा भागच अधिक होता, पण त्या मायेचं माझ्यावर न संपणारं ऋण आहे, म्हणून मी लिहिते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि इतर कोणाशी नाहीच रहायला जमलं तरी स्वत:शी प्रामाणिक रहायला मी लिहिते. आणि काय सांगू?
संवादिनी, मनापासून आभार तुझे, तू मला खो दिलास म्हणून मला हे इतक्या जणांचं इतकं सुरेख लिखाण वाचायला मिळालं.
मी कोणाला खो देऊ? माझा खो सर्किटला.