October 15, 2016

शब्दभूली

अचानक कधीतरी,
तू उमलून येतेस.
काळ वेळ न पाहता,
राग लोभ न जाणता.

पापणीतल्या पाण्यात
कोणाच्या मुग्ध हास्यात,
चुकार निवांत क्षणी
कोण्या विस्कटल्या मनी.

शब्दांचा आधार घेतेस
तशी मौनातही बोलतेस
उलगडतेस, तरीसुद्धा
अलगद मिटू मिटू होतेस...

तुझा सूर, तुझा नूर
कधी फटकून दूर,
गूज जीवाचे सांगण्या
शब्द कधी महापूर.

सभोवताली वावरत रहा
शब्दांची नक्षत्रं पेरत,
गावा शब्दभूलीच्या जाईन
माग नक्षत्रांचा काढत.


February 11, 2016

राजसगाणी

भाग १ : अक्षय कविता

अर्थात, जगाला विटून, संसाराचा उद्वेग, उबग येऊन, वैतागून आलेले हे वैराग्य नव्हे. नाही म्हणायला जगाचे अनुभव, बर्‍या वाईटाचे संचितही आता गाठीशी भरपूर जमा झालेत. तिला कधीचे बरेच काही उमजले आहे.. जरी सगळ्यांत अजून ती रमते आहे, तरीही त्यातून दूरही होते आहे.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजूनजातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

हळूहळू सगळ्यांत असूनही नसण्याची मजा तिला उमगली आहे, सगळ्यांत नसूनही असता येते हेही लक्षात आलेय. तिला उमजलेय की आज जे असेल ते उद्या असेलच असे नाही, आयुष्याचं कोडं उलगडेलच असंही नाही. काही अक्षत टिकेल असंही नाही. स्वतःच्याच मनाचा भरवसा देता येत नाही, मग दुसर्‍यांचा कोणी द्यावा?

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

ज्ञात अज्ञाताचा पाठशिवणीचा खेळ आता तिच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, त्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव झालीये आणि आपल्या अट्टाहासांच्या मर्यादाही जाणवल्यात. आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी हे जाणवून सारं कसं लख्ख समोर आलं आहे...

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

तिची काही तक्रार नाही, आता काही मागणी नाही, इच्छा नाही. जे काही आयुष्य पुढ्यात आले, जसे काही दान पदरात पडले त्यात सर्वांतच लावण्याची जत्रा शोधणारी ही कविता. आता तिला अलौकिकाची कळा चढली आहे. ती शेवटचे ऋण व्यक्त करते आहे. अंतर्बाह्य शब्दसौंदर्याने सजून झाल्यावर आता उरले तरी काय?

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
उमलल्या शब्दी नवीन पहाट
पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ
श्वासी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे....

समाप्त

February 3, 2014

नातो नामको जी

भाषांतरात सहसा नेहमीच मूळ कलाकृतीमधल्या बारिकियाँ असतात त्या हरवात. मूळ भाषेचा लहेजा, उपमांचं सौंदर्य, नजाकत, अचूकपणा सगळंच एका मर्यादेनंतर हरवतं, म्हणून भाषांतर नामक प्रकाराची जरा भीतीच वाटते. तेच अनुवादांचंही. अर्थात काही खूप सकस अनुवादही वाचले आहेत, तरीही मूळ भाषा ती मूळ भाषा, असं आपलं मला वाटतं. आज ही मीरेची रचना पाहिली आणि कोण्या मैत्रिणीला सारांश रुपाने अर्थ हवा होता म्हणून साधारण अर्थ लावायचा प्रयत्न केलाच शेवटी . प्रयत्न करता करता साध्याच, पण दिलसे असलेल्या रचनेच्या प्रेमात पडायला झालं!

अर्थात, हे  थोडंसं अंदाजपंचे भाषांतर आहे, हौसेपायी केलेलं..

नातो नामको जी म्हांसूं तनक न तोड्यो जाय।।
माझ्या सावळ्याच्या नामस्मरणाशी माझं जे नातं जुळलंय ते मला जराही तोडवत नाहीये
पानां ज्यूं पीली पडी रे लोग कहैं पिंड रोग।
पानं जशी हिवाळ्यात सुकून पिवळी पडतात ना, तशीच दु:खाने आणि विरहाने जणू काही सुकलेय मी आणि लोकांना वाटतं आहे की मला काविळ झालेय..
छाने लांघण म्हैं किया रे, राम मिलण के जोग॥
माझ्या रामाच्या मिलनाचा ध्यास घेऊन जगापासून लपत छपत उपाशी तापाशी अशी मी (दिसले/ आहे असे पाहून)
बाबल बैद बुलाया रे पकड दिखाई म्हांरी बांह।
(कसला रोग असेल म्हणून की काय) माझ्या वडिलांनी वैद्याला सांगाव धाडला आणि माझी नाडीपरी़क्षा करवली..
मूरख बैद मरम नहिं जाणे कसक कलेजे मांह।।
पण त्या मूर्ख वैद्याला माझ्या हृदयाची तडफड काय समजणार?
जा बैदां घर आपणे रे म्हांरो नांव न लेय।
अरे वैद्यबुवा, तू चालू लाग बरं आपल्या रस्त्याला, उगा माझ्या वाटेला जाऊ नकोस..
मैं तो दाझी बिरहकी रे तू काहेकूं दारू देय।।
मी तर विरहामध्ये होरपळणारी (त्या रामाची दासी आहे रे..) तू कशाला औषधं देतो आहेस (आणि ती लागू तरी कशी पडतील..)
मांस गल गल छीजिया रे करक रह्या गल आहि।
(विरहात होरपळून) मी इतकी क्षीण झालेय (शरीरावरलं सगळं मांस गळून हाडांचा सापळा तेवढा शिल्लक राहिलाय..)
आंगलिया री मूदडी म्हारे आवण लागी बांहि।
माझ्या बोटात होणारी अंगठी आता माझ्या हातात (बांगडीप्रमाणे) येते आहे, (इतकी क्षीण झालेय मी..)
रह रह पापी पपीहडा रे पिवको नाम न लेय।
अरे (मेल्या - सात्विक संताप आहे बरं!) कोकीळ पक्ष्या, सतत प्रेमाच्यासंबंधी काय बोलतोस रे?
जै को बिरहण साम्हले तो पिव कारण जिव देय।।
कोण्या विरहिणीने तुझे बोल ऐकले ना, तर तुझ्यामुळे दु:खाने जीव देईल..
खिण मंदिर खिण आंगणे रे खिण खिण ठाडी होय।
क्षणात माझ्या गृहात, क्षणात बाहेर अंगणात, अशी मी क्षणात इथे तर क्षणात तिथे (अशी मी बावरी होऊन फिरतेय..)
घायल ज्यूं घूमूं खडी म्हारी बिथा न बूझै कोय।।
म्या घायाळ विरहिणीच्या व्यथेचं समाधान मात्र कोणापाशीच नाही..
काढ कलेजो मैं धरू रे कागा तू ले जाय।
माझं हृदय मी जणू हातात धरलंय आता, ये रे काऊ, तूच आता ते घेऊन जा..
ज्यां देसां म्हारो पिव बसै रे वे देखै तू खाय।
ज्या कोण्या देशी माझा प्रियकर (मजेत) आहे ना, तिथे (त्याला दाखव) तो पाहील आणि (त्याच्यासमोरच) तू खा ते...
म्हांरे नातो नांवको रे और न नातो कोय।
केवळ (रामाच्या) नामाशीच नातं आहे रे माझं मीरेचं, अजून कोणतंच नातं ठाऊक नाही मला..
मीरा ब्याकुल बिरहणी रे हरि दरसण दीजो मोय||
ही मीरा (तुझ्या) दर्शनासाठी वेडी, व्याकूळ झाली आहे रे हरी, विरहाने दु:खी अशा ह्या मीरेला हरी, तुझं दर्शन दे..



हिमालय..

हिमालय. त्याचं वेड लागतं.

 अत्युत्तारस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित: पृथिव्या इव मानदण्ड:॥

 नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.

 हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.

कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्‍या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्‍या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्‍या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्‍या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्‍या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्‍याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता.

अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो.

घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?

त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!

... आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....

 “There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."

July 12, 2013

दिंडया, पताका...

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

 खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

अगदी लहानपणापासून हो. वाडवडिलांची पुण्याई म्हणावी का, घरावरुनच पालख्या जातात, तुकामाऊली म्हणू नका, ज्ञानोबामाऊली म्हणू नका, इतर लहान मोठ्या पालख्या म्हणू नका.. आठवतं आहे तेंव्हापासून जातात. वारी आणि पालखी अगदी माझ्या लहानपणापासून आयुष्याचा एक भाग व्यापून आहेत. वारी ह्या शब्दाशी निगडीत अश्या काही व्यक्तींच्या आठवणी आहेत. लहानपणी आमच्या इथे एक मावशी यायच्या भाजी विकायला आणि वर्षाची वारी करायच्या. आज्जीचं आणि त्यांचं गूळ्पीठ. आजी मग त्यांना विठठलासाठी काहीबाही द्यायची, त्याही नेऊन पोचवायच्या, येताना बुक्का आणायच्या, थोड्या तुळशी, चुरमुर्‍याचा प्रसाद, एखादा चिकचिकलेला राजगिर्‍याचा लाडू. एकदा विठोबा- रखुमाईची पितळी छोटी मूर्त आणली. अगदी युगे अठ्ठावीस करत विठाई आजतागायत देव्हार्‍यात विराजमान आहेत. आमचे सकाम आणि क्वचित निष्काम नमस्कारसुद्धा आवर्जून आपेलेसे करुन घेतात.. त्यांना सवय आहे. तर अशी ह्स्ते परहस्ते वारी करायची आजीची पद्धत. अजून एक दूरच्या नात्यातल्या आजी वारी करायच्या, त्यांच्या मंडळासोबत, त्या वारीच्या दिवशी आल्या, की त्यांच्या पाया पडून त्यांच्या वारीच्या पुण्यसंचयावर आम्ही लहान मोठे डल्ला मारायचो आधीच. शांत मूर्ती, प्रेमळ चेहरा, मृदू बोलणं. वारी म्हटलं की त्यासोबत हे सारं आठवतं.

 अजूनही आठवतं म्हणजे आजी आजोबांबरोबर घेतलेलं वारीचं दर्शन, ते उभे असेतोवर. कपाळावर लावून घेतलेलं गंध, टिळे, बुक्के. घरात तेह्वा वडिलधार्‍यांचे असलेले आणि श्रद्धापूर्व़क केले जाणारे उपवास. आता समजतं की शरीराने वारी चालू शकले नाहीत, तरी त्यांनी मन:पूर्वक वारी अनुभवली. रस्त्यावर आजी आजोबांसकट उभं रहायचं, दोघेही वारीची वाट पहात. जाणार्‍या वारकर्‍यांना नमस्कार करत. आम्ही चिल्ली पिल्ली बाजूलाच हुंदाङपणा करत. वेळ निघून जाई. बराच वेळ टाळ, मृदुंग, टाळ्या, माऊलीचे जयघोष कानी पडत. लोक शांतपणे उभे असत. पावसाची एखादी नाजूक भुरभुर सर येई, की आम्ही अधिकच हुंदाडगंपूपणा सुरु करत असू. आज्जीची आम्हांला आवरता त्रेधातिरपीट उडे. अचानक वातावरण जिवंत होई आणि आली, आली म्हणेपरेंत एकेक पालखी येऊन झपाटृयाने निघूनही जाई. त्यातच लोकांमध्ये प्रसाद म्हणून फुलांच्या पाकळ्या,तुळशी, प्रसाद वगैरे वाटले जात. आजोबा पालख्यांच्या गर्दीमध्ये घुसून दर्शन घेत, आज्जी लांबूनच हात जोडी. आम्ही आपले प्रसादाचे धनी होण्यात समाधानी! अवघा आनंदकल्लोळ असे! काळा बुक्का आणि गंध लावलेला आजोबांचा चेहरा आणि नमस्कार करुन पालखीचं दर्शन घेतल्याने तृप्त समाधानी असा आज्जीचा चेहरा अजून डोळ्यांसमोरुन हलत नाही. आजही पालखीच्या अनाम गर्दीचा चेहरा ह्या दोन चेहर्‍यांना आठवून खूप ओळखीचा बनून जातो.

 आणखी म्हणजे त्यादिवशी रस्ता वाहतुकीला बंद असायचा, आजही असतो, सकाळपासूनच अगदी तुरळक वाहतूक असते, बरं वाटतं खरं सांगायचं तर. रोजच्या वाहतूकीचा अव्याहत वाहणारा गदारोळ लईच काव आणतो जिवाला रोज. तेह्वापण असायचा. मात्र आताच्याइतकी वाहतूक नसायची म्हणा. कधी नव्हे ते सकाळची उन्हं रस्त्यावर पडलेली दिसतात, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात... दिवस शांतपणे उजाडल्यासारखा वाटतो. आम्हांला तर शाळेला सुट्टी पण असायची, खरी मज्जा हीच बरं, वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने अभ्यासाला रीतसर दांडी. काय दिवस होते..

 वयपरत्वे पुढे दोघांचं हे वारी दर्शन बंद झालं. आम्ही गर्दीत घुसून दर्शन घ्यायला शिकलो. माऊलीच्या पादुकांना हात लावून दर्शन घ्यायला मिळालं की एकदम विजय मिळवल्यासारखा वाटायचा! सोसायटीमधलीधली मुलं, आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणून तरुण दादा, काका पब्लिक वगैरे आम्ही एकत्र मिळून वारीमध्ये जरासं चार पावलं टाकायचो, अगदी फुगड्या वगैरे खेळल्याचंही आठवतय. बाबा, काका आणि आई, काक्या वगैरे तत्सम पब्लिक घरापाशीच उभं असायचं. पालखी आली की आमच्यासोबत दर्शनाला यायचं. पालखी पूर्वीसारखीच, अंगाखांद्यावर गर्दी खेळवत टाळ चिपळ्या म्रूदुंगांच्या तालावर नाचत, अलगद निघून जायची... काही क्षणांसाठीचा पाहिलेला सोहोळा दर वेळी पुढल्या वर्षीपरेंत पुरत गेला. चक सुरुच राहिलेलं आहे.

 पुढे काही वर्षं नोकरी धंद्या निमतानं वारी जराशी दुरावली. आठवण येत राहिली.

 आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स! बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच! तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय! तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय, म्हणे! मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असावा. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी, जाऊद्या, तितकंच द्येवाचं नाव येतया तेच्याबी तोंडात, चालायचंच, अशी समजूत काढणारे अनुभवी, मुरलेले वारकरी. त्यांच्यासोबत सहभागी झालेले हौशी, नवशे,पोटार्थी, चोर, लबाड, सज्जन, साव सगळे सगळे. खर्‍या अर्थाने जनसमुदाय. नाचणार्‍या दिंड्या, पताका. डोईवरली तुळशी वृंदावनं. गाठुडी. सामानाचे ट्रक. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भक्तीभाव, विश्वास.

 आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विशवासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी.

 वारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली, माझ्याबरोबर दोघेही खूप समजूतीचं असं हसले. माझ्या मनामध्ये उगाच दिलासा दिल्याप्रमाणे भावना झाली. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.

 तीनही लोक आनंदाने भरुन टाकत वारीही मार्गस्थ झाली.