April 18, 2008

थँक्स मॅडम.....!!

मागचा शनिवार अगदी मस्तच उगवला!! शुक्रवारी रात्री राणीच्या देशातल्या हापिसमधून कोणी कोणताही सर्वर मोडला म्हणून फोन केला नाही, की हे सॉफ्टवेअर मोडलय, ते सॉफ्टवेअर चालत नाही म्हणून तक्रार केली नाही... सुखेनैव झोप झाली आणि दुपारी सगळे मायबोलीकर एकत्र भेटलो. खाणे, गप्पा यांत वेळ कसा निघून गेला काही कळलंदेखील नाही. मजा आली!

दोन - तीन तासांनी सगळ्यांनी आपापल्या घरी निघायचं ठरवल, तसं, मी आणि अजून एक मायबोलीकरीण, इतरांचा निरोप घेऊन, शॉपिंगसाठी सज्ज झालो!! दुसर्‍या दिवशी बॉसच्या लग्नाचं रिसेप्शन होतं आणि सगळी टीम जाऊन बॉसला अन त्याच्या झालेल्या बॉसला चेहरा दाखवून येणार होती अन मलाही सज्जड दम दिला होता की, बये ये तिथं!! बर नाही दिसत नाहीतर!! पुढच अप्रैजल हाच करणार आहे, माहिताय ना??? अरेच्या....!!! म्हणून काय झालं?? एकतर रविवारी संध्याकाळी कुठेतरी हजारो कोसांवरच्या ठिकाणी असले उच्छाव मांडायचे अन सगळ्यांनी त्याला जमायचं!! तर, मग आता ह्या उच्छावाला जायचं असल्याने, जरा शॉपिंग करणं क्रमप्राप्त होतं... इथे आल्यापासून ऑफ़िसला लागतील असे साधे रोजच्या वापरातलेच कपडे आहेत माझ्यापाशी, समारंभात घालता येतील अश्या कपड्यांची गरज होती, आणि शॉपिंगसारखं सुख कोणतं??

तर, मस्त शॉपिंग करून आम्ही रमत गमत निघालो. रस्ते वेगळे होताना एकमेकींना बाय केलं, शॉपिंगला मज्जा आली असं एकमेकींना सागून निरोप घेतला, अन घरी परतताना लक्षात आलं, की एक छोटीशी खरेदी राहिलीच!! एका मिनिटासाठी वाटलं जाऊदेत, खूप दमायला झालं होतं, पायही दुखत होते खूप... पण मग तेही पटेना मनाला. थोडक्यासाठी कंटाळा कशाला करायचा?? (हेच जर अभ्यासाची पुस्तकं वाचताना वाटलं असतं तर एखादी पी. एच. डी. तरी पडली असती हातात गेला बाजार!! हेहेहेहे!! असो.)

तर, पावलं वळलीच दुकानाकडे. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी. मला हवी असलेली खरेदी मी अक्षरश: आटोपली!! आणि नशीबाने ती आटोपलेली खरेदीही मनासारखी झाली, म्हणून बरच वाटलं. सगळा दिवस आत्तापर्यंत छानच गेला होता. असा दिवस क्वचित पदरात पडतो माझ्या!!

खुशीत दुकानाच्या दरवाज्यापाशी आले आणि मी दरवाजा उघडणार इतक्यात तिथेच दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मघाशी खरेदी करताना मी एकदा दोनदा ओझरतं पहिलं होतं त्यांना. तिथे दुकानातच काहीतरी खरेदी करायला आले असणार अशी नोंद माझ्या मनात ओझरती झाली होती, किंवा त्यांच कोणी, म्हणज़े पत्नी, मुलगी, किंवा तत्सम कोणी खरेदी करत असाव, आणि ते खरेदी संपायची वाट पाहत असावेत असा आपला माझा ग्रह झाला होता, आणि मनातल्या मनात ते या खरेदी प्रकरणाला कंटाळले असावेत, म्हणूनच असे कंटाळून एका बाजुला उभे असावेत असही वाटून हसू पण आलं होतं!! माझा बाबा नेहमीच माझ्या बरोबर किंवा आईबरोबर कुठेही बाहेर खरेदीला यायचं नेहमीच टाळत आलाय!! गृहस्थ तसे मध्यमवर्गीय वाटत होते, सभ्य, सुशिक्षित वाटत होते.

तर, जेह्वा मला दरवाज्यापाशी येताना पाहून त्यांनी दरवाजा उघडला, तेह्वाही मला काहीच लक्षात आलं नाही!! दरवाज्यापाशीच ते उभे आहेत अन एक त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांनी दरवाजा उघडून धरलाय असच वाटल मला!! शप्पत!! मी त्यांना धन्यवाद म्हणायला जाणार इतक्यात ते गृहस्थच म्हणाले, "थँक्स मॅडम, प्लीज कम अगेन.... "

......... म्हणजे?? मी दोन मिनिटं उडालेच!! आणि त्याहूनही मला मनाला लागला, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा टोन... इतका थकलेला, हरलेला आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तत्क्षणी भलतच अपराधी वाटायला लागल! प्रथम म्हणजे, डोअरपर्सन म्हणून कोणीतरी आपल्याहून वयाने मोठी अशी व्यक्ती उभी असणं आणि तिने आपल्यासाठी दरवाजा जाता येता उघडून धरणं अजून तरी माझ्या पचनी पडत नाही, बरं आत शिरताना, माझा मीच दरवाजा उघडून आत शिरले होते, त्यामुळे ते मला आधीच लक्षात आलं नव्हतं........ आणि आता माझ्या वडिलांच्या वयाचे हे गृहस्थ माझ्यासाठी दरवाजा उघडून उभे होते...!! अगदी कससंच झालं!! आत्तापर्यंत चढलेली शॉपिंगची धुंदी उतरली क्षणार्धात!!

त्यांच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर जरा हललंच आतमधे कुठे काहीतरी... ओढलेला, थकलेला चेहरा, पडलेले खांदे, चेहर्‍यावरचा खिन्न, विषण्ण आणि थकून हरल्याने येतो तसा एक अलिप्त, निर्विकार पण हार पत्करल्याचा भाव, आणि तो वैषम्याने भरलेला आवाज..... काय दु:ख असेल या काकांना, अस वाटल्यावाचून राहिलं नाही.

मनात प्रश्न उभे रहायला लागले एकामागोमाग....

या वयात हे असं दिवसभर उभं राहणं यांना जमत असेल का?? थकून जात असतील का? हो, नक्कीच.... काय कारण असेल बरं? वाईट परिस्थिती ओढवली असेल का घरी?? म्हणून मिळेल ती नोकरी पत्करावी लागली असेल का? या वयात योग्य अशी नोकरी मिळाली नसेल का? आयुष्यभर जबाबदारीने, नेकीने वागूनही आयुष्याचं विरत जाणंच सतत पाहणं तर नशीबात आलं असेल, ती अगतिकता, कुठेतरी मनानं पत्करलेली हार आवाजातून व्यक्त होत असेल का? कोणी पाहणारं नसेल का यांना अन यांच्या सहधर्मचारिणीला? का असूनही नसल्यात जमा झालं असेल?..... तेवढ्यात घरी गेल्यावर आई आणि बाबाशी फोनवर बोलायचं नक्की करुन टाकलं. तसही शनिवार, रविवार आणि आठवड्यातही माझे सतत फोन होतातच त्यांना, पण अजून एकदा....

का असं असेल? ऐन उमेदीत आयुष्य उधळलं असेल? जेह्वा, शक्य होतं तेह्वा बेदरकार वागून झालं असेल, अन शेवटी रिकाम्याच राहिलेल्या ओंजळीचा आता पश्चाताप होत असेल? पैलतीराची वाट चालताना आता आपणच आपली वाट कठीण बनवली आहे हे उमगून आणि आता वेळेचं घड्याळ मागे फिरवून आपली चूक दुरुस्त करु शकत नाही, हे लक्षात आल्याच वैफल्य असेल? अंगात रग असताना घरच्या, आपल्या लोकांना, हितचिंतकांना, मित्रांना कस्पटासमान वागवलं असेल आणि तेह्वा उमटवलेले ओरखडे इतके खोल असतील की आता ते पुसणं, अशक्य झालं असेल??

किंवा असं काहीच नसेल, बाकी सगळं ठीकच असेल अन फक्त तो दिवस खराब गेला असेल त्यांना? म्हणून मनातल्या मनात चिडचिडून वैतागल्या मूडमधे असतील त्याच दिवशी फक्त?

उगाच नुसते अर्थहीन प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि त्यापायीची वांझोटी खिन्नता....

दुसरा दिवस ठरल्यासारखा पार पडला, रिसेप्शनला पोचल्यावर मी खरेदी केली हे खूप चांगलं झालं ह्याचीही खात्री पटली, पण त्या दुकानातून बाहेर पडताना जी अस्वस्थता आली होती, ती मात्र मनातून जायला तयार नव्हती. उगाच अपराधी वाटत राहिलं.....

आता या सार्‍याला एक आठवडा उलटून गेलाय. अपराधीपणाची जाणीव बोथट होत चाललीच आहे शेवटी - त्याबद्दलही लाज वाटते मधूनच - पण अजूनही त्या गृहस्थांच्या शब्दांचा टोन आठवतो. आठवायचा अवकाश, की, अस्वस्थता एखाद्या लाटेसारखी परतून अंगावर येतेच!

कधीतरी परत त्या दुकानात शिरायचं धाडस करेन....

9 comments:

संदीप चित्रे said...

Preserve this sensitivity the whole life, Yadhodhara !

HAREKRISHNAJI said...

खुप अंतर्मुख करायला लावलय या लेखानी.
अलीकडही मी हा विचार करायला लागलोय आयुष्याला आता आवरु जरा नाही तर पुढे कठीणच

a Sane man said...

jaNeeva ashach prakhar asu det!

Samved said...

यशोधरा, अशी किती तरी उदाहरणं आपल्या आजुबाजुला असतात. किती टिपायचं हे आपल्या संवेदनशीलतेवर अवलंबुन असतं.

गंमत म्हणजे माझ्या मित्राच्या बायकोने अगदी अश्याच विषयावर ब्लॉग लिहीलाय. असो.

आणि हो, तुझ्या comments बद्दल Thanks a lot

सर्किट said...

chhaan lihilayes.

vegalya vishayavar ahe ekdum.

यशोधरा said...

संदीप, सेन मॅन, धन्यवाद. प्रयत्न तर तोच आहे....

सर्कीट, धन्यवाद.

कृष्णाकाका, असं का म्हणता? देवाच्या कृपेने सगळं उत्तमच होईल पुढेही...

संवेद, खरय तुझं. आणि रोजच्या रोज बरेच अनुभव, क्षण मला अस्वस्थ करतच असतात. कधी कधी ठरवते की अगदी दुर्लक्ष करायचं, पण नाहीच जमत. दुर्दैव एवढच की माझा परिस्थिती बदलवण्यामधे खूपच नगण्य वाटा असतो... :(

तुझ्या मित्राच्या पत्नीच्या ब्लॉगची लिंक देशील का?? वाचायला आवडेल.

Bhavana wagh said...

he yashodhara,
your experiece is very commom to all.But the way you look at it is so sensitive.I feel happy to read it knowing that yaa there is somebody who thinks like me.

Sneha said...

yashodhara.. majhi ashich aspasht jhaaleli aathavan parat thaLak jhalii... mi 12vi nantar pohanyach prashikshan dyayala mhanaun jayache.. aat gelya barobar sathitale gruhast dar ughadun mala namaste madam mhanayache .. mi naramun jayache tujhyasarakhech anek prashn mala padit ...
pan nishfaL vanjotech prashn...

... snehaa (www.shodhswatahacha.blogspot.com)

Samved said...

माझ्या ब्लॉग मधे सगळ्यात शेवटी आहे बघ link. तसं कश्याला, हे घे:
http://ashishandradhika.wordpress.com/

नवरा बायको, दोघं मिळून लिहीतात :) very sweet couple