बघता बघता वर्ष संपत आलय. तरी यावर्षीच्या सुरुवातीला कसलेही बेत केले नाहीत हे एक नशीब! नाहीतर वर्ष संपताना पूर्ण न झालेल्या बेताची टोचणीच की ती एक मनाला. त्यापेक्षा त्या भानगडीतच नाही पडलं तर बरं, असं म्हटलं आणि काहीही, कसलाही निर्धार न करता वर्षभरासाठी तरी निर्धास्त झाले होते!
खरं तर वर्ष कसं आलं, आणि कसं गेलं - खरं म्हणायचं तर कधी आणि कुठे आलं आणि गेलं हेच कळलं नाही. इथे घरापासून दूर येऊनही सलग २ वर्ष झाली. एकूणच परिस्थितीशी जमवून घेतलं तरीही, घरची ओढ अजूनही तशीच आहे. अगदी पहिल्या दिवशी इथे आल्यावर एका क्षणी जसं परकं परकं वाटलं होतं, तसच कधी तरी एकदम वाटत. घराशी, घरच्यांशी, आपले मित्रगण, ज्यांच्याशी आपलं फारशी खळखळ न होता जमून जातं असे नातेवाईक, एवढच काय पण घरासभोवतालचा सजीव आणि निर्जीव परिसर, आसमंत हे सारं, सारं आपलं असतं. अगदी कठीण प्रसंगातही मूकपणे आपल्याला धीर देत असतं, नाही? घर ही कल्पनाही आपल्याला बांधिलकीची जाणीव देऊन जाते, नाही?
कळून जुळणारे ऋणानुबंध तर महत्वाचे वाटतातच, पण नकळत जुळणारे ऋणानुबंध त्याहूनही चिवट. सुटता सुटत नाहीत अन् तुटता तुटत नाहीत! पण कोणासाठी त्याच्या बेड्या बनत असतील तर? माणसासाठी नातं की नात्यासाठी माणूस? हळू हळू लक्षात आलंय की तसं प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी. तीव्रता, काल मात्र कमी जास्त. मजा अशी असते, जोपर्यंत ते नातं आपल्या मनात हवंस वाटत असत ना, तोपर्यंत ते जिवंतच वाटत असत. ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं. आल्हाददायक झुळुकेसारखं वाटणारं नातंही काही लक्षात येण्याआधी कोंडमारा कधी करु लागतं, जाणवतही नाही कधी कधी. निर्माण झालेल्या आणि कधी कधी आपणच निर्माण केलेल्या ऋणानुबंधांचं ओझं झालं तर काय करायच? बिनधास्त भिरकावून द्यायच का कधीतरी आपल्यालाही गरज लागेल हं, हा निव्वळ स्वार्थी आणि व्यवहारी विचार करुन थोड्याश्या अलिप्त भावनेनं का होईना, ते तसंच सोबत वागवायच?
आणि तरीही कधी कधी परिचित रस्ते आणि ठराविक वर्तुळं सोडवत नाहीत, नाही? नकळत आपली काहीतरी ओळख निर्माण झालेली असते - का आपली अशी अशी समजूत झालेली असते? कुठेतरी आपला स्व ही सुखावलेला असतो. कधीतरी मनाशी कबुली देऊन झालेली असते, की नाही करमत आता या घोळक्यात. दुसरा रस्ता, दुसरी पायवाट शोधायला हवी. पण कसली भीती वाटते? कोणी बरोबर नसेल याची? कोणी अहंकारावर फुंकर घालायला असणार नाही याची? आपल्याविषयी दुसर्याच्या तोंडून चांगले शब्द - तोंडदेखले का होईना, ऐकायला मिळणार नाहीत, यामुळे अस्वस्थता येते की, एकटं असताना आपण खरोखर किती पाण्यात आहोत हे कळेल, ही जाणीव का अस्वस्थ करते? की भविष्यकाळाच्या अनिश्चिततेची भीती असते ती? परिचितांच्या घोळक्यात अशी जाणीव तितक्या तीव्रतेने टोचत नसावी बहुधा. इतरांच्या नजरांतून आपण आपल्याला बघायला लागतो अन् स्वत:शी स्वतःची ओळख विसरत जातो का? स्वतः नगण्य असूही शकतो हे स्वीकारणं कठीण असतं ना? किती अभिमान! ताठा! हे काही खरं नाही!
जे मनाला पटत नाही आहे, जिथे मन रमत नाही आहे, तिथून मन काढून घ्यावं. थोडसं दुखेल, खुपेल. आजूबाजूला घोळका नसेल, नसू देत. स्वतःशी मैत्री होईल, कोणत्याही मुखवट्याशिवाय शेवटपर्यंत टिकेल. नवीन अनोळखी वाटांवर सुरुवातीला धडपडायला होईल. हरकत नाही, त्यातूनच उभारी घ्यायचीही समज येईल. स्वतःला परत एकदा ओळखता येईल. कदाचित नवीन रस्ते अधिक सुंदर असतील... किंवा नसतीलही. नसले तर सुंदर बनवता येतील. काळाच्या ओघात ते सत्य आहे, निखळ, निर्व्याज आहे ते टिकेलच. निदान असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे? जे दिखाऊ आहे, वरवरचं आणि असत्य आहे, ते हवं तरी कशाला? हेच नात्यांच्या बाबतीतही लागू. जी खरीखुरी आहेत, ज्यांत मनापासून जीव ओतला आहे, ती टिकतील, बाकीची विरतील. तोंडदेखल्या नात्यांचं ओझं तरी कशाला उगीच? भविष्यात काय आहे, हे कळेलच आज ना उद्या. त्याची उगाच आताच चिंता कशाला? जे काय असेल ते पाहता येईलच ना?
Que Sera Sera, whatever will be, will be..
8 comments:
कसलं प्रामाणिक नि खरंखुरं लिहिलंयस... बहुदा सगळं सगळं अस्संच वाटत असल्यामुळे जवळचं वाटलं असेल...
तुझ्या निर्णयासाठी अभिनंदन नि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Ekda Chokh prakare vichar mandle ahes tu! Sane man shi agdi sahmat.
Happy New Year :)
navin varshachya shubhechchha!
@सेन मॅन, धन्यवाद. माझ्याकडूनही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
>>> बहुदा सगळं सगळं अस्संच वाटत असल्यामुळे जवळचं वाटलं असेल..
यासाठी डबल धन्यवाद!मीच फक्त असा विचार करत नाही हे समजून बरंही वाटलं आणि कुठेतरी मनाच्या कोपर्यात हायसंही!
@आनंद, धन्यवाद! तुलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
@जास्वंदी, तुलाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
>>मीच फक्त असा विचार करत नाही हे समजून बरंही वाटलं आणि कुठेतरी मनाच्या कोपर्यात हायसंही!
अगदी...मलाही तसंच झालं...मेरा और एक धन्यवाद! :)
masta...patala ani hny...
संवादिनी, धन्यवाद आणि तुलाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सेन मॅन :)
प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी.> खरतर मला हे आत्ता उमजलय पण ते तस होत हे माहित नव्हत अस नाही! यावेळी अस होणार नाही अशी वेडी आशा बाळगून होतो चुकलो! :(
ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं.>> किती खर आणि स्पष्ट लिहिलयस तू हे!
केवळ अप्रतिम लिहिलयस :)
Post a Comment