October 10, 2009

झुरळे, पाली आम्हां सोयरी...

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या... :)

पहिलं घर छानच होतं, भरपूर प्रकाश येणारं घर. बंगळुरुमधे प्रकाशमान घर मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे म्हटलं! पण मग सद्ध्याच घर बदललं, कारण, घरमालक आता त्याच्या घरी रहायला येणार होता. हे नवं घर तस जुनं आहे, बैठं. हेही छान आहे, लहान आहे, त्यामुळे आवराआवरी आणि साफसफाई पटकन होते! जमेची बाजू. घेताना घरमालकाने नवीन रंग वगैरे काढून दिलं होतं, त्यामुळे पाली, झुरळं नसतील असं मी समजून चालले होते. पण कसलं काय! नवीन घरात सामान आणून टाकलं, व्यवस्थित लावलं, तोपर्यंत ही मंडळी दबा धरुन बसली होती की काय कोणास ठाऊक! मग एकेक झुरळं बाहेर पडायला लागली, ही एवढाली! कधी नव्हे ती मी १०-१२ झुरळं तरी मारली असतील! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! फक्त त्यांना माझी भीती वाटायचय ऐवजी मला त्यांची भीती वाटते! तरीपण, हिय्या करुन मारलीच! सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणतात हे हेच असावं! :D

असो. तर झुरळं मेली, राहिलेल्यांवर हीट आणून मारलं, मग ती मेली. राहता राहिल्या पाली. स्वयंपाकघरात एक, तिथल्या ओट्यावर फुदकणारी. स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते! दिवाणखान्यात बहुधा दोन असाव्यात, आणि झोपायच्या खोलीत दोन. एकूण ५ आहेत, मला ठाऊक असलेल्या. तसं, आम्ही एकमेकींना टाळायचोच. त्याही अन् मीही. त्यामुळे ठीकठाक एकमेकींचा अंदाज घेऊन वावर चालायचा. काहीही केलें तरी उपयोग नसतो, पाली कुठेही जात नाहीत बहुधा.

मध्यंतरी घरी गेले. परत आल्यावर काही तरी वेगळे वाटले खास. माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही. नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली!

अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की प्रेग्नंट आहेत वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली! आत्ता झोपायच्या खोलीतली एक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धावली! आली, आली! :) दुसरी कुठेय काय माहित! स्वयंपाकघरातली गुल्लच आहे! असो बापडी. आणि आज एक छोटुलंही दिसलं त्यांच! माझी शंका बरोबर होती म्हणायची! एकूण सगळ्या पालींमध्ये एक पालोबाही आहे वाटत! देवा रे! वाचव!

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे, नायतर पालीला दिली भिंत आणि पाल घरभर पसरी, असं व्हायचं! भूतदया गेली खड्ड्यात!

काय म्हणता?

7 comments:

Anonymous said...

’पाल्केस्ट्रा’ सही!!!सगळ्या पालीत ’पालोबा’ ही आहे....मस्त ...

मला स्वत:ला पाल आणि झुरळ यांची भिती वाटत नाही त्यामुळे ते घरात आले तर नवरा हातात काठी किंवा कुंचा घेउन उगाचच आव आणतो त्यांना हकलण्याचा, आणि मी फटक्यात काम करून मोकळी होते...किळस मात्र फार वाटते या प्राण्यांची...

Ajay Sonawane said...

आईशप्पथ, पाली, झुरळांवर एवढा खुसखुशीत ले़ख होऊ शकत्तो हे वाचल्यानंतरच कळलं. ख्ररंच, लेख छान जमलाय , असंच लिहीत जा !

-अजय
http://ajaysonawane1.blogspot.com

Bhagyashree said...

e khup mast jamlay g lekh !! palkestra khup avdla! :D

माझा ब्लॉग - माझे विचार..

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

पाल्केस्ट्रा! पोट धरून हसले. घरात जर पाली येत असतील तर याचा अर्थ घरात अजूनही किटकांची वस्ती आहे. किटक नसले तर पाली येऊन काय करणार? माझ्या घरात पण होत्या पाली. त्यांना, लीली, ल्युसी, डिंगू अशी नावं दिली होती. . एका रात्री गनिमी काव्याने हल्ला करावा तशी झुरळांची फौजच्या फौज सिंकखालच्या जाळीतून बाहेर आली होती. ह्याला मारू की त्याला मारू असं झालं होतं. पण झुरळं गेली पाठोपाठ पालीही गेल्या. तुमचा लेख वाचला आणि स्वत:चाच अनुभव वाचल्यासारखं वाटलं. लेख एकदम निराळ्या विषयावर आहे. बरं वाटलं.

अनिकेत वैद्य said...

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार!

अंड्याच्या कवचाचा effect फ़क्त २ दिवस राहतो. नंतर नाही.


बाकी लेख मस्तच आहे.


अनिकेत वैद्य.

veerendra said...

mastach zalay lekh .. sahich

यशोधरा said...

सर्वांचे धन्यवाद!