सही चाललेत काही काही ब्लॉग्ज!! आज बर्याच दिवसांनी काही काही ब्लॉग्जवर चक्कर टाकली! काही काही पोस्ट्स खूप मस्त वाटली, भन्नाट एकदम! मजा आली वाचायला! धन्यवाद लेखकू मंडळी! मनापासून धन्यवाद.
**
माझं स्वतःच पोस्टणं मात्र कमी झालय का? काय अडत नाही म्हणा त्याने.. वेळ नसतो, काम असतं वगैरे वगैरे नेहमीची कारणं, आळशीपणा हे अजून एक. पण, खरं सांगायचं तर, ब्लॉग सुरु केला होता, तेह्वा नव्या नवलाईचा उत्साह होता, तो आता तितकाही राहिलेला नाही खरा! डेंजरच झालंय की हे! अगोदरच्या एक जुन्या पोस्टमधे मीच ना ते म्हटलय, की मला शब्दांची असोशी आहे म्हणून?? मग, हे काय?? अर्थात, लग्गेच मनाने सांगून टाकलय की ती असोशी इतरांच्या चांगल्या पोस्ट्स वाचूनही पुरवता येतेच! सो, फिकर नॉट!.. ह्म्म, मी उद्गारवाचक चिन्हं खूप वापरते की काय?? असंच दिसतय एकूणात... की ही पण एक फेज म्हणायची?? की ब्लॉग आचके द्यायला लागायची सुरुवात झालेली आहे म्हणू?? नियतीच्या कालचक्रासारखं ब्लॉगचंही चक्र की काय? कधी कधी जरा वाईटच वाटतं.. ब्लॉगकडे जरा दुर्लक्षच होत आहे की काय असं वाटत, पण फारसं काही सांगण्यासारखं नसताना लिहायचं तरी काय? भलतच सरळसोट चाललय सगळ! असूदेत पण, सद्ध्या तेच बरय, डोक्याला ताप नाही!!
**
ऑफिसमधे एक कलिग नोकरी सोडून चाललाय , दुसरीकडे मस्तच संधी मिळतेय त्याला. इथे आमच्या टेक्निकल मॅनेजरची आणि डिलिवरी मॅनेजरची चांगलीच फाटलीये! ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता, ते टप्प होईल आता काही काळ तरी. सगळ्यात चिवित्र गोष्ट म्हणजे मॅनेजर येऊन मला सांगतोय, की मी त्याला जाऊ नकोस म्हणून समजवावं! कमाल आहे!! सहकारी आहे, चांगला मित्र आहे म्हणून लगेच काय मी त्याला जॉब सोडू नको असं ज्ञान देईन, असं का वाटत बुवा ह्या मॅनेजर्सना?? आणि हे मॅनेजर लोकांचं गणित मल तरी समजलेलं नाही! नोकरीत असेपर्यंत चांगल्या माणसाकडे, बर्यापैकी दुर्लक्ष करायचं आणि सोडून चाललं असं कोणी, की मग फुगड्या घालायच्या!! इतके वेगवेगळे फंडे वापरुन त्यांचा ह्या कलिगचं मन वळवायचा प्रयत्न चाललाय की काय!! कधी कधी खरच मजा वाटते. समजा, हा इथे थांबला, अन् हे प्रोजेक्ट संपलं आणि पुढे काही खास नसलं की ह्यची गरज भासेल, तर हेच प्रेम हे मॅनेजर्स पुढेही जोपासतील का?? येडे समजतात की काय हे लोकं आपल्या टीम मधल्या लोकांना??
**
मधे पुण्याला गेलेले असताना पुस्तकांच्या दुकानात शिरले होते तेह्वा तिथे आलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे ते दुकानवाले काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली होती!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक, असा विचारही केला होता, ते राहिलच की, एकदा वेळ काढून तब्येतीत टाकलं पाहिजे. आत्ता हे लिहिताना, ते संवाद आठवून हसायला येतय! एकदम खतरा आणि जिवंत संभाषण ऐकायला मिळालेलं त्यादिवशी!
**
परत एकदा ज्ञानोबामाऊलीचं पसायदान वाचलय आणि परत एकदा ह्या लोकविलक्षण माणसाच्या एकूणच मानसिक झेपेपुढे, उंचीपुढे मी नि:शब्द!! इतके हाल, त्रास आणि खडतर आयुष्य जगून, भोगून ही व्यक्ती सगळ्या प्राणिमात्रांसाठी, त्यांच्या अंतर्बाह्य भल्यासाठी साकडे घालते!! इतक्या लहान वयात इतकी ऋजुता कुठून येते मनात?? मनामध्ये जराही द्वेष नाही, कटुता, राग, आसक्ती नाही... किती विलक्षण! पण जिथे त्यांची अवस्थाच जर, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म'.. अश्या आत्म्याला कुठले आलेत राग लोभ?
काय बोलायचं पुढे...
2 comments:
अरे वा! नाही नाही म्हणता म्हणता झालं की पोस्टणं. छान वाटला शेवटचा परिच्छेद ।
आशाताई, धन्यवाद!
Post a Comment