मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?
.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.
अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत आमच्यावर मोठी माणसं, अजून काय?? :)
-क्रमशः
माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
November 15, 2008
November 9, 2008
बोल गं घुमा... बोलू मी कशी??
विषय तुमच्या, आमच्या, सार्यांच्याच मनातला. खास करुन स्रियांच्या. होणारा त्रास तुम्ही, आम्ही सर्वांनींच कधी ना कधी सहन केलेला. बरं, बोलावं तरी कोणापाशी? आणि कुठे? आणि समजा तक्रार केलीच तरी उपयोग नाही हे माहितीच! त्यामुळे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार!
लख्ख आठवतं की लहानपणी कोकणात आजोळी जायच्या आनंदात एकच मोठ्ठा मिठाचा खडा असायचा... तो म्हणजे, एसटी स्टॅण्डवरची टॉयलेटस वापरायला लागणार हा विचार! पोटातून मळमळून आतडी बाहेर पडतील असे वाटायला लावणारे वास, अस्वच्छता, गलिच्छपणा.. श्वास कोंडून धरून तरी किती वेळ ठेवायचा?? इतकं वैतागवाणं प्रकरण असायचं ते! त्रास, त्रास नुसता!! नाकावर रुमाल दाबा, त्यावरुन आईचा पदर दाबा, काहीही केलं तरी तो वास काही नाकात शिरल्याशिवाय रहात नसे. गावी पोचलं, गावचा एसटी स्टँड दिसला, की हुश्शss व्हायचं अगदी...
आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही! एकीकडे देशाची सर्व क्षेत्रांत अत्यंत वेगात प्रगती सुरु आहे पण त्याच वेळी,आरोग्याला आवश्यक अश्या स्वच्छ टॉयलेटच्या मूलभूत सुविधा शहरांत,गावांत कुठेच नीटश्या उपलब्ध नाहीत! सामान्य माणसाचं आरोग्य महत्वाचं नाही का? आणि ह्यात बायकांचे हाल तर विचारुच नका! ह्यावर 'स्वच्छतेच्या बैलाला.. ' हा एक परखड आणि चपखल लेख मायबोलीच्या दिवाळी अंकामध्ये अज्जुकाने लिहिलाय. मंडळी, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा लेख जरुर,जरुर वाचा. स्त्रीवर्ग तर लगेच ह्या लेखाशी रिलेट होऊ शकेल. पुरुष वाचक मंडळी, वाचताना आपल्या आई, बहिण, मैत्रिण, पत्नी यांपैकी कोणाला डोळ्यांसमोर ठेवून वाचा, म्हणजे त्यातील धग जाणवेल.
तसच, मायबोलीवरचे काही लोक ह्या लेखाच्या अनुषंगाने एकत्र येऊन, ह्या समस्येवर उहापोह करुन आपल्याला ह्या संदर्भात जे करता येईल ते करत आहेत. तुम्हीही या प्रयत्नात सहभागी होऊ शकता. निदान आपल्या ब्लॉगवर अज्जुकाच्या लेखाची लिंक द्या. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा दिला, तरी खूप फरक पडू शकेल. निदान फरक पडावा ह्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे??

October 29, 2008
ठसठसणारा कोपरा
माझ्या लहानपणी माझी आजी मला खूप गोष्टी सांगायची, गप्पा मारायची. गोष्टी म्हणजे फक्त चिऊ काऊच्या नव्हेत. अगदी लहानपणी त्याही सांगून झाल्या. पण जसजशी मी मोठी होत गेले, तशी आजी वडिलधारीपणाची भूमिका मागे टाकून हळूच मैत्रिणीच्या भूमिकेत कधी शिरली ते समजलंच नाही. समजावण्याचा आव न आणता कितीतरी गोष्टी तिने समजावल्या, सांगितल्या. नातवंडांच्या मनात हलकेच शिरण्याचं तिचं कसबही वादातीत होतं. तिच्या अनेक गोष्टी, मतं मला प्रसंगानुरुप आठवतच असतात, पण त्यातही तिच्यावेळी, तिच्या लहानपणी, ती मुलगी म्हणून तिला कितीतरी संधी मिळू शकल्याच नाहीत, याबद्दलची तिने बोलून दाखवलेली खंतही बर्याचदा टोचत राहते. लहानपणी वा वाढत्या वयात त्यामागचे तिचे दुखावलेले मन त्या तीव्रतेने कधी जाणवले नाही. तेवढे कळतही नव्हते, पण आता जरुर जाणवते.
तिच्या घरातले तिला अन् तिच्या बहिणींना लागू असणारे नियम आणि भावांना लागू असणारे नियम यात तफावत तर होतीच. खूप लक्षात येईल असा दुजाभाव नव्हता त्याकाळाच्या मानाने.. पण जो काही होता, तो होताच! मुलीच्या जातीला तेह्वा शिवण यायला हवे होते, स्वयंपाक तर अनिवार्य होता, घरकाम, विण़काम, कलाकुसर, पाटपाणी, घरातली साफसफाई, झाडलोट.. थोडक्यात काय, तर अगदी गृहकृत्यदक्ष मुलगी हवी असायची. घरगुती असणारी आणि घरातली कामे बिनभोबाट करणारी. ही कामे तर मुलींचीच होती फक्त! बाहेरचे विश्व असे काही नव्हतेच त्याकाळच्या मुलींना... चालीरीतींच्या नावाखाली, घरंदाजपणाच्या समजुतींपायी, सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक बंधनं!
तिचे सगळ्यात मोठे, मनात ठसठसणारे दु:ख म्हणजे सातवीनंतर तिची शाळा बंद केली हे होते. सगळ्याच बहिणींचे असेच थोडेफार. भाऊ शिकले. तिच्या वडिलांच्या मते, खेड्यात काय करायचे आहे खूप शिकून? शेवटी घरच ना सांभाळणार आहात?? तिच्या मताला काहीच किंम्मत दिली नाही, हे तिचे, एका मनस्वी स्त्री-मनाचे दु:ख, शेवटपर्यंत तसेच जिवंत राहिले... त्यामानाने तुम्ही मुली खूप खूप सुखी आहात, हे ती आम्हाला आवर्जून सांगायची. ते तर मान्यच. आज सगळ्या नाहीत तरी समाजातल्या बर्याच मुली हवे तसे शिक्षण घेऊ शकतात, त्यातल्याच थोड्या काही स्वतःच्या मनासारखी, स्वतःच्या निवडीची नोकरी/व्यवसायही करु शकतात. स्वतःला हवा तसा आयुष्याला आकार देऊ शकतात. काही भाग्यवान आभाळाएवढी आव्हानंही पेलतात. हे चित्र दिसत असतानाही, खरंच परिस्थिती किंवा अधिक योग्य शब्द वापरायचा झाला तर, समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललीय का?? निखळ झाली आहे का?
आजही, उच्च शिक्षण घेतलेले माझे काही सहकारी, घर सांभाळायला लग्न करायला हवं कारण घरातली कामं त्यांच्याच्याने जमत नाहीत म्हणतात! स्वयंपाक जमत नाही, भांडी घासायला, स्वतःचे कपडे धुणे इत्यादी कामे "बोअर" होतात म्हणे! यावर तर काही प्रतिक्रिया द्यायलाही मला सुचत नाही! तरीही त्यांच्याशी थोडाफार निष्फळ वाद मी घालतेच! सहचारिणीची जरुरी घरातली कामं करण्यासाठी आहे?
शेजारचं एक जोडपं त्यांच्या मुलाच्या शाळेवर खूपच नाराज असतं! कारण? मुलाला शाळेत साधं सोपं शिवण शिकवणार असतात! मुलाला काय करायचंय हे शिकून?? आता मुलगीच असती तर ठीक होतं एक वेळ! हे त्याची आजच्या जमान्यातली तथाकथित "आधुनिक" आई अत्यंत नाराजीने बोलते!! शिवण येण्याचा अन् मुलगा किंवा मुलगी असण्याचा संबंध काय आहे, हेच माझ्या लक्षात येत नाही! कधीतरी ह्या कौशल्याचा वापर हाच मुलगाही करु शकेल ना? स्वतःच्या शर्टाची तुटलेली बटनं तरी लावू शकेल? साधासा स्वयंपाक, जरुरीपुरतं शिवणकाम, घरात आणि आजूबाजूला लागणारी जुजबी दुरुस्ती, वाहनाची जुजबी दुरुस्ती करणे वगरे असली छोटी मोठी कामं, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो वा पुरुष, यायला नकोत का? शिवण, स्वयंपाक कामं मुलांची नाहीत आणि वाहन दुरुस्ती, घरातली छोटी मोठी दुरुस्तीसारखी कामं मुलीच्या जातीला कशी जमतील, असा काही नियम आहे कुठे?
आजीच्या काळात तर मुलींपेक्षा मुलांचे महत्व जास्त होते म्हणावे, लोकांच्या समजुतीही जुन्या होत्या म्हणावे तर आजही वैषम्य वाटण्याजोगी परिस्थिती आहेच! आजच्या जमान्यात देखील अडाणी, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित - कोणालाच मुलीचा गर्भ पाडण्याविषयी काही वाटत नाही... निदान डॉक्टर लोकांना असल्या कामात सहभागी होताना बाकी कसली नाही, निदान आपल्या पेशाचीही तरी लाज वाटावी?? तेही नाही! आजही कित्येक सुशिक्षित घरांतही मुलीपेक्षा मुलाचे करीअर हे महत्वाचे असते आणि योग्य वेळी मुली योग्य घरी पडू दे, हे बर्याच आईवडिलांचे उरी जपलेले आद्य स्वप्न असते! करीअर वगैरे होतच असते तिचे! हे सगळे बघताना वाटते, काय बदलले आहे?
आजीच्या जमान्यात आजी आणि तिच्या वयाच्या अनेकींना "मुलीची जात, बाईची जात" हा शब्दप्रयोग ऐकावा लागला, आणि आजही तो शब्दप्रयोग आम्ही, तुम्ही ऐकतोच आहोत. बर्याच घरांतून, आजचं, स्रीला मिळणारं स्वातंत्र्य हे एका ठराविक परिघातलं स्वातंत्र्य आहे. एक ठराविक परिघात घाल हवी तेवढी रिंगणं! पण खरंच निर्णयाची वेळ आली, की त्यागमूर्ती बनायचं ओझं पहिल्यांदा अजूनही स्त्रीच्या गळ्यातच पडतं, हेही खरच ना? लहान सहान गोष्टींत, आतल्या, बाहेरच्या जगात जरा परखडपणे डोकावून पाहिलं ना, की दरी अजून बर्यापैकी जैसे थे आहे हे जाणवतं, कधी कधी तर अजूनच रुंदावलेली. दुरुन पाहताना सगळं आलबेल आहे असं वाटत रहावं, पण जवळ गेल्यावर खड्डे अन् भोवरे कळावेत असं काहीसं!
आजी सांगे, तिच्या काळात मुलींना लहानपणापासूनच "मुलीच्या जातीने" कसे वागावे याचे धडे मिळत. वडिलधार्यांशी बोलताना कायम नजर खाली करुन बोलायचे, उलट उत्तर वा प्रश्न सोडाच, 'का?' हेही विचारायचे नाही, संयमाने उंबर्याच्या आत वावरायचे! घराचे घरपण जपायचे! आणि घरपण जपणारीचे मन कोणी जपायचे? आजच्या पिढीला हे असले सारे नियम पाळायला लागत नाहीत. आजीच्या पिढीला बाहेरच्या जगात वावरायला मिळालं नसेल पण आजही बर्याच घरांत परिस्थितीशी स्त्रीनेच आद्य कर्तव्य असल्यासारखं जुळवून घ्यायचं असतं आणि घराचं घरपण जपायचं असतं! प्रत्येकाच्या वेळापत्रकाशीही जुळवायचं असतं! आणि तरीही म्हणायचं की, घर दोघांचही असतं!
पूर्वीच्या पिढीच्या मानाने आजची स्त्री स्वतंत्र झाल्यासारखी भासत असली किंवा स्वतंत्र झालीही असली तरी त्या स्वातंत्र्याची किंमत म्हणून आज बाहेरच्या जगातलेही आणि घरातलेही कितीतरी ताणतणाव पदरी घेऊन जगणार्या स्त्रीच्या मनातला ठसठसणारा कोपरा अजूनही आजीच्या दु:खाशी जातकुळी सांगणाराच आहे हे जाणवतं... फक्त थोडीफार मापकं बदलली आहेत एवढंच!
******
हा लेख मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. हा अंक अतिशय देखणा झालाय! पाहिला नसाल, तर जरुर पहा. उपक्रम आणि मनोगत इथले दिवाळी अंक वाचून व्हायचे आहेत अजून.. तुम्ही वाचलेत का? कसे वाटले?

October 21, 2008
गज़ल
मायबोलीतर्फे गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यशाळेत मी भाग घेतला होता. कार्यशाळेबद्दल इथे वाचता येईल.
असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही
जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही
किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही
असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही
कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही
October 18, 2008
फेरफटका
सही चाललेत काही काही ब्लॉग्ज!! आज बर्याच दिवसांनी काही काही ब्लॉग्जवर चक्कर टाकली! काही काही पोस्ट्स खूप मस्त वाटली, भन्नाट एकदम! मजा आली वाचायला! धन्यवाद लेखकू मंडळी! मनापासून धन्यवाद.
**
माझं स्वतःच पोस्टणं मात्र कमी झालय का? काय अडत नाही म्हणा त्याने.. वेळ नसतो, काम असतं वगैरे वगैरे नेहमीची कारणं, आळशीपणा हे अजून एक. पण, खरं सांगायचं तर, ब्लॉग सुरु केला होता, तेह्वा नव्या नवलाईचा उत्साह होता, तो आता तितकाही राहिलेला नाही खरा! डेंजरच झालंय की हे! अगोदरच्या एक जुन्या पोस्टमधे मीच ना ते म्हटलय, की मला शब्दांची असोशी आहे म्हणून?? मग, हे काय?? अर्थात, लग्गेच मनाने सांगून टाकलय की ती असोशी इतरांच्या चांगल्या पोस्ट्स वाचूनही पुरवता येतेच! सो, फिकर नॉट!.. ह्म्म, मी उद्गारवाचक चिन्हं खूप वापरते की काय?? असंच दिसतय एकूणात... की ही पण एक फेज म्हणायची?? की ब्लॉग आचके द्यायला लागायची सुरुवात झालेली आहे म्हणू?? नियतीच्या कालचक्रासारखं ब्लॉगचंही चक्र की काय? कधी कधी जरा वाईटच वाटतं.. ब्लॉगकडे जरा दुर्लक्षच होत आहे की काय असं वाटत, पण फारसं काही सांगण्यासारखं नसताना लिहायचं तरी काय? भलतच सरळसोट चाललय सगळ! असूदेत पण, सद्ध्या तेच बरय, डोक्याला ताप नाही!!
**
ऑफिसमधे एक कलिग नोकरी सोडून चाललाय , दुसरीकडे मस्तच संधी मिळतेय त्याला. इथे आमच्या टेक्निकल मॅनेजरची आणि डिलिवरी मॅनेजरची चांगलीच फाटलीये! ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता, ते टप्प होईल आता काही काळ तरी. सगळ्यात चिवित्र गोष्ट म्हणजे मॅनेजर येऊन मला सांगतोय, की मी त्याला जाऊ नकोस म्हणून समजवावं! कमाल आहे!! सहकारी आहे, चांगला मित्र आहे म्हणून लगेच काय मी त्याला जॉब सोडू नको असं ज्ञान देईन, असं का वाटत बुवा ह्या मॅनेजर्सना?? आणि हे मॅनेजर लोकांचं गणित मल तरी समजलेलं नाही! नोकरीत असेपर्यंत चांगल्या माणसाकडे, बर्यापैकी दुर्लक्ष करायचं आणि सोडून चाललं असं कोणी, की मग फुगड्या घालायच्या!! इतके वेगवेगळे फंडे वापरुन त्यांचा ह्या कलिगचं मन वळवायचा प्रयत्न चाललाय की काय!! कधी कधी खरच मजा वाटते. समजा, हा इथे थांबला, अन् हे प्रोजेक्ट संपलं आणि पुढे काही खास नसलं की ह्यची गरज भासेल, तर हेच प्रेम हे मॅनेजर्स पुढेही जोपासतील का?? येडे समजतात की काय हे लोकं आपल्या टीम मधल्या लोकांना??
**
मधे पुण्याला गेलेले असताना पुस्तकांच्या दुकानात शिरले होते तेह्वा तिथे आलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे ते दुकानवाले काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली होती!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक, असा विचारही केला होता, ते राहिलच की, एकदा वेळ काढून तब्येतीत टाकलं पाहिजे. आत्ता हे लिहिताना, ते संवाद आठवून हसायला येतय! एकदम खतरा आणि जिवंत संभाषण ऐकायला मिळालेलं त्यादिवशी!
**
परत एकदा ज्ञानोबामाऊलीचं पसायदान वाचलय आणि परत एकदा ह्या लोकविलक्षण माणसाच्या एकूणच मानसिक झेपेपुढे, उंचीपुढे मी नि:शब्द!! इतके हाल, त्रास आणि खडतर आयुष्य जगून, भोगून ही व्यक्ती सगळ्या प्राणिमात्रांसाठी, त्यांच्या अंतर्बाह्य भल्यासाठी साकडे घालते!! इतक्या लहान वयात इतकी ऋजुता कुठून येते मनात?? मनामध्ये जराही द्वेष नाही, कटुता, राग, आसक्ती नाही... किती विलक्षण! पण जिथे त्यांची अवस्थाच जर, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म'.. अश्या आत्म्याला कुठले आलेत राग लोभ?
काय बोलायचं पुढे...

Subscribe to:
Posts (Atom)