माझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही!
September 1, 2011
देवभूमीला जाण्याआधी...२
स्वाती माझ्याबरोबर पुण्याहून प्रवासात सोबत असणार होती. म्हणता म्हणता ५ तारीख उजाडणार होती. पण कितीतरी कामं अजून बाकीच होती! खरेदी व्हायची होती, इतिकिटांच्या प्रती प्रिंटायच्या होत्या, रैना आणि स्वातीशी पुन्हा थोडं व्हॅलीबद्दल, होणार्या प्रवासाबद्दल बोलायचं होतं, हे कमी म्हणून बरीच लक्षात न येणारी, कदाचित अॅक्च्युअलमध्ये नसलेली पण व्हर्च्युअलमध्ये विनाकारण मला भेडसावणारी, करायची राहिलेली खूऽऽऽपशी कामं आ वासून माथ्यात आणि माथ्यावर थयथयाट करत होती! दिवसभराचं ऑफिस आणि इतर कामं सांभाळताना आणि प्रवासाची तयारी करताना तारांबळ मात्र भरपूर उडाली. शेवटी प्रवासाच्या आदल्या वीकांताला इंच इंच लढवूच्या थाटात मी सगळ्या आवश्यक खरेदीचा फडशा पाडला. हुश्श! आता आमचं आरक्षण नक्की झालं का पहायचं होतं आणि जर ते झालं नाही तर काय, हा एक प्रश्न भेडसावत होता, वाकुल्या दाखवत होता आणि जे काय तत्सम करुन डोक्यावरचे केस पिकवता येतील ते सगळं करत होता! स्वातीही मला मध्ये मध्ये फोन करुन हाच प्रश्न विचारुन घाबरवत होती. तिच्या प्रश्नांना उत्तरंच नसायची माझ्याकडे कधीकधी. जपा, जपा तोच मंत्र जपा, जो भी होगा, देखा जायेगा... ठीके? ओक्के. ते राजधानीचं सांगायचं राहिलंच आहे, नैका? सांगत्ये तेही ओघाने..
तशात, मध्येच स्वातीला आपण येताना राजधानीने यायच्या ऐवजी फ्लाईट घेऊयात, असं वाटायला लागलं आणि योग्य फ्लाईटची शोधाशोध सुरु झाली! पण एकूणातच ते त्रासदायक ठरणार आहे अशा निर्णयाप्रत मी आले आणि त्याला कारण म्हणजे, दिल्लीमधे आयुष्य घालवून आता पुण्यात येऊन नोकरी करणार्या आणि पुन्हा कधीही दिल्लीला जायची स्वप्नं न पाहणार्या कलीगकडून ऐकलेल्या दिल्ली रेल्वे ठेसन ते दिल्ली एअरपोर्ट ह्या प्रवासाच्या सुरस कथा -ट्रॅफिक इन्क्लूडेड, माइंड प्लीजच. तेह्वा स्वातीचा बेत, आपलं सामान आपणच वहायचं आहे, ह्या बागुलबुवाच्या मागे लपून हाणूनच पाडला. बाईसाहेबांना दिल्लीत शॉपिंग करायचं होतं! किती उत्साह आहे ह्या मुलीला! भारी कौतुक वाटलं. ट्रेकनंतर शॉपिंग करायची शक्ती उरलेली असेल का, हा प्रश्नही तिच्या मनात आला नव्हता. काय म्हणायच? हा उत्साह असाच राहूदेत इतकंच म्हणते.
सॅक्स भरायचं अजून एक मुख्य काम बाकी होतं.. सामान वगैरे भरायला मला जाम कंटाळा येतो. पहिल्या फटक्यात मनाला येईल अश्या प्रकारे मी कधीच बॅग व सॅक भरु शकलेले नाहीये. आजवर तसा बर्यापैकी प्रवास झालेला आहे, तरी दर वेळी नवीन च्यायलेंज असतं हे एक! ह्यात काहीच फरक नाही. कधीकधी मी इतका कंटाळा केला आहे, की प्रवासाच्या काही तास आधी नाईलाजाने बॅग भरलेली आहे. असो. तर काय म्हणत होते, की प्रवासाचा कंटाळा नाही येत, पण सामान भरायचा मात्र येतो, तेह्वा ते सॅका भरायचं सतत उद्यावर ढकलत होते, पण सामान एकत्र करुन ठेवलं होतं मात्र. जणू काय ते आपण होऊनच सॅकमध्ये जाऊन बसणार होते, आपसूक. आता असं होत नाही, पण तरीही आशावादी राहून चांगल्या इच्छा मनात धरायला काय हरकत आहे? नै का?
घरुन फिदफिदत आहेर मिळालाच, "सामान जाईल सॅकेत | आधी भरलेचि पाहिजे ||" असूद्यात, असूद्यात. एवढं काय नै, आणि सामान एकत्र ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. पटपट मिळतं भरायच्या वेळी. घेतलं ना भरायला एकदा, की धा मिनटांत आटपून टाकीन, हाय काय अन् नाय काय! असं म्हणत, आणि त्यावर घे तरी एकदाचं मग. बाई येतात त्यांना केर काढायला त्रास होतो.. असा आहेर मिळाला. बघा आता! २ दिवस एका कोपर्यात सामान काय ठेवलं इतकूस्सं तर लगेच अडचण व्हावी का हो? काय काय करावं माणसानं? नोकरी, खरेदी, हिमालयात ट्रेकींग, पुस्तकवाचन, तिकिटं बुक करणं, व्हॅलीत जायच्या आधी व्हॅलीची माहिती देणारी काही पुस्तकं आहेत का शोधणं.. एक जान भला क्या क्या करेगी? चार तारखेच्या रात्री, दहाच्या पुढे एकदाच्या सॅक्सही भरल्या. ऑफिसमधून घरी येऊन भरल्या हो! त्याचं काय कौतुकच नव्हतं आणि कोणाला! तुलाच जायचं आहे ना हिमालयात, मग हे करायलाच पाहिजे ना हे सगळं, असं सडेतोड आणि मुद्देसूद उत्तर ऐकून गप्प बसले. काय करणार? खरंच की ते. सगळ्यांचा कोकणी पिंड आणि त्यातून पुण्यात स्थायिक. तस्मात् सडेतोड उत्तरं, खरी उत्तरं वगैरेंना आमच्या घरात तोटा नाही. मुबलक प्रमाण आहे. फालतू लाड आणि खरोखरचं कारण नसेल तर समोरच्याला काय वाटेल वगैरे भानगड नस्से. त्यामुळे विचार करुनच बोलावे लागत अस्से. फालतूपणा चालत नस्से हा मुद्दा.
तेह्वा गपगुमान सॅक्स भरायला सुरुवात केली आणि काय सांगू चिमित्कार म्हाराजा! एकदम फिट्ट आणि मस्त बसलं की सगळं सामान, पैल्या फटक्यात. जय हो! स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं असल्याने मोजकंच सामान घेतलं होतं, त्याचाही फायदा सॅक भरताना झाला असणार. नक्कीच. काही का असेना, मनाजोगतं पॅकींग झालं होतं. ४ तारीख संपली. झोप. थकल्यामुळे २ मिनिटांत ठार.
एक सांगायचं राहूनच गेलं. व्हॅलीची माहिती देणारं एक तरी पुस्तक मिळावं म्हणून हाताशी असलेल्या तुटपुंज्या वेळामध्ये दुकानं पालथी घातली होती. मिळालं का? तर हो, मिळालं. जसं हवं तसंच मिळालं. पुस्तक मिळाल्याचा मात्र मनापासून आनंद झाला.
दुसरं म्हंजे येताना दुरांतोची आणि आमची वेळ जुळत नव्हती, तेह्वा मुंबैपरेंत राजधानीने येऊन तिथून पुढे बस, टॅक्सी, रेल्वे जे काही मिळेल ते रामभरोसे घ्यावे असा विचार केला होता. जिंदगीमें थोडा डेरिंग जरुरी हय. तर राजधानी मुंबई सेंट्रलपरेंत आहे, पण सेंट्रल हे वेगळे ठेसन आणि शिवाजी टर्मिनस हे वेगळे हे ज्ञान मला वेळेवारी नसल्याने - आता नाय म्हायती! काय करायचं? - मी त्याला शिवाजी टर्मिनस समजून तिथूनच येताना आपल्याला पुण्याची गाडी पकडायला कित्ती सोपं असे समजून सुखात होते. यथावकाश सगळ्यांनी मिळून ज्ञानदान करुन शहाणे करुन टाकिले आणि अजून एका धडकीने मनात घरटे केले. एव्हांना अशा अनेक धडक्यांची घरटी बाळगून मनाची घरटी-चाळ झाली होती!
रैना, मी आणि स्वाती निघण्यापूर्वी एकदा कॉन्फरन्स कॉल करुन बोललो. बोललो कमी आणि एकूणातल्याच अज्ञात प्रवासाच्या थोडयाफार टेन्शनमुळे येड्यासारख्या हसलो जास्ती. तिघींनाही तिघीही मनातून बर्यापैकी टरकलो आहोत हे समजले. तरीही एकमेकींच्या सोबतीमुळे आश्वस्त होतो. स्वतःची चिंता नव्हती. हे किती मह्त्त्वाचे काम किती सहजगत्या झाले होते!
आता प्रत्यक्ष प्रवासाची सुरुवात करुन अनुभव घ्यायचे मात्र राहिले होते. बाकीचा फापटपसारा मागे पडला होता. आम्हीही आता तयार होतो.
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
बॉ...लय डेअरिंगै तुझ्यात. मला प्रवास आणि असोसिएटेड गोष्टींचा सॉलीड बाऊ आहे पण मी तरीही करत राहातो. पण ट्रेक म्हणजे अ-श-क्य. मी सिंहगडपण गाडीने चढलोय :)
हौ ना भौ! लयच डेरिंगबाज बघ मी! :P
Post a Comment