मिसळपाववरचा हा लेख. लेखावर उत्तम चर्चाही सुरु आहे. ती चर्चा वाचून मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच.
मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत.
उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा.
संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?
उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे,
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll
एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll
(गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर)
थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो.
ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो.
माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.
तुकोबाराय म्हणतात,
अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll
हेच ना संस्कार?
क्रमशः....
July 1, 2009
June 28, 2009
तिच्या डायरीचं शेवटचं पान..
तिची मूळ डायरी कधीपासून वाचायची होती. डायरीतून ती अधिक समजेल का, असं एक कुतुहल, थोडीशी अपेक्षा, थोडी उत्सुकता... पण काही काही पुस्तकं वाचायचा योगच यावा लागतो. समोर पुस्तक असलं तरी त्याचं आपल्या नशीबात वाचन असल्याशिवाय त्या वाचनाची सुरुवात होत नाही, हेच अनेक अंतिम सत्यांपैकी एक!! तशीच ही डायरी. अॅनीची डायरी. ही डायरी, तिच्या पूर्ण आणि कोणत्याही प्रकारे संपादित न केलेल्या रुपात मला हवी होती. तशी मिळते. त्यामुळे मागच्या वेळी पुण्याला गेले होते तेह्वा मिळाली, तशी उचललीच लागलीच. पुन्हा परत आल्यावर कामाच्या वाढत्या जंजाळात बुडून गेले. डायरी वाचायची राहूनच जात होती.
अॅनी काही मला अनोळखी नाहीये तशी. जगात अनेक लोकांना ठाऊक आहे, तशीच मलाही ठाऊक आहे. आंतरजाल, पुस्तकं, अधून मधून वृत्तपत्रांमधून येणारे लेख... पण म्हणून आजवर मी तिच्यामध्ये कधी इतकी गुंतले नव्हते. मध्यमवर्गीय मनाला जितकी आणि जशी हळहळ वाटते, तशीच माझीही अॅनीसाठी वाटणारी हळहळ. पुरात वाहून जाणार्या व्यक्तीला पाहून काठावरच्या व्यक्तीला वाटणारी हळहळ जशी असते ना, तशीच. अॅनी हे एक उदाहरण झालं, पण एकूणच मध्यमवर्गीय हळहळीची जातकुळीच अशी. बेफाम, बेफाट, झोकून देणारं असं काही बर्याचदा परवडणारं नसतं हे तिच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला पक्कं ठाऊक असतं. असो.
हवा तसा वेळ काही मिळत नव्हता आणि डायरी तशीच पडून राहिली होती. आधीच म्हटलं ना, एखादं पुस्तक वाचायचा योगही असावा लागतो. बाकी बाबतीत ठाऊक नाही पण पुस्तकांच्या बाबतीत तरी "जब जब, तब तब" हेच अंतिम सत्य! किती दिवस झालेत, शांतपणे वाचन करण्याचा योग साधलेला नाही. काहीतरी कामं निघतातच. घरची, नाहीतर ऑफिसची. कुठे बाहेर जावं लागत, कुठे काही. ह्या सगळ्यात वाचनाच्या नावाने मात्र मोठ्ठा भोपळा आहे, आणि तो वाढिता वाढिता वाढे, भेदिले शून्यमंडला, ह्या गतीने वाढतच चालला आहे, ही एक जाणीव नेहमी त्रास देते. ( हे एक लिहिताना आठवलं म्हणून, डेक्कन जिमखान्यावरचं क्रॉसवर्ड बंद करुन तिथे हल्लीच्या शून्य शरीरयष्टीवाल्यांच्या टिचभर कपड्यांचं दुकान सुरु केलंय! पुस्तकांचं दुकान बंद करुन कपड्यांचं दुकान! कुठे फेडाल ही पापं? :( क्रॉसवर्ड काही पुस्तकांच्या दुकानांचा मानदंड नव्हे, हे मलाही ठाऊक आहे, पण मुद्दा तो नाहीये. पुस्तकांचं दुकान बंद करुन, कपड्यांचं दुकान सुरु केलं हा मुद्दा, का तर म्हणे, तिथला भाडेपट्टी करार संपला! अरे, मग वाढवा ना! पुस्तकांचं दुकान महत्वाचं नाहीये का? उत्कर्ष आणि पॉप्युलर आहेत म्हणा, आणि आमचा अब चौकपण आहेच म्हणावं. बsssरं......असूदे.)
आणि त्यादिवशी डायरी हातात घेतली, आणि डायरी वाचण्याआधी पुस्तकाच्या शेवटी लिहिलेला उपसंहार (Epilouge) वाचायची बुद्धी झाली. फक्त एका पानाचा उपसंहार आहे, पाठपोठ लिहिलं आहे म्हणून फारतर दोन पानं म्हणूयात. एका पाठपोठ पानावर मागे पुढे लिहिलेली माहिती. अॅनीची डायरी जिथे १ ऑगस्ट १९४४ ला थांबली, तिथून पुढे अॅनीचं आयुष्य कसं गेलं ह्याची संक्षिप्त माहिती ह्या एका पानात मिळते. बस्स, एका पानात संपू शकलं, एवढंच तिचं १ ऑगस्टनंतरचं आयुष्य! ते पान पहिल्यांदा वाचताना काय वाटलं, किंवा आजही काय वाटतं, हे शब्दांत सांगता येणं केवळ कठीण! एक प्रकारचा सुन्नपणा अवतीभवती साकळल्यासारखा झाला खरा. वस्तुनिष्ठपणे, कोणताही भावनिक आव न आणता दिलेली माहिती वाचता वाचता कधी अंगावर येउन आदळली, लक्षातही आलं नाही. भयानक अस्वस्थ व्हायला झालं. आजही होतं. छिन्न, विछिन्न झाल्यासारखं वाटतं. तिने लिहिलेलं शेवटचं पत्रही असंच. अतिशय अस्वस्थ करुन जाणारं. निरागसपणा हरवलेल्या लहानग्यांच्या अंगी आलेला मोठेपणा सहन होण्यासारखा नसतो, नाही?
हे डायरीचं शेवटचं पान वाचताना मनात येणार्या निरर्थक प्रश्नांना उत्तरं तरी आहेत का?
मार्च १९४५ मध्ये अॅनी मृत्यू पावली. तिची शेवटची इच्छा होती, ती म्हणजे, मृत्यूनंतरही चिरकालीन सगळ्यांच्या स्मरणात असावं अशी.
तुला कोण विसरेल गं?

June 15, 2009
May 17, 2009
प्रार्थना
मी छंद वापरुन याआधी कधी लिहिले नाही. हा एक छोटासा प्रयत्न. जाणकारांनी काही चुका असल्या तर जरुर दाखवून द्या, अशी विनंती.
नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..
चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...
तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...
शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...
नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..
चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...
तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...
शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...
May 16, 2009
मी, कॅमेरा आणि माझा बाबा
अगदी लहानपणापासून, फोटोग्राफी म्हणजे काय हे कळत नसतानाही घरातला आजोबांचा कॅमेरा खूप आवडायचा. कालांतराने तो न वापरण्याने म्हणा, किंवा काय माहिती का ते, पण जवळ जवळ निकामी झाला. आताही तो आहे माझ्याकडे, असाच ठेवलाय जपून, केवळ आवडायचा म्हणून आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून.
कॅमेराबद्दलची दुसरी आठवण आहे, ती, मी शाळेत होते, आणि कॅमेराचं वेड होतंच, आणि स्वप्नंही पहायची ती कधीतरी मी इतका मस्त कॅमेरा घेईन ना.. ह्याचीच.. आणि एका वाढदिवसाला मला माझ्या बाबाने कॅमेरा आणून दिला! मी अवाक् झाले होते! कॅमेरा आवडत असला म्हणून काय झालं? तो हाताळण्याची काहीच अक्कल नव्हती, किंवा, आजूबाजूला कोणी फारसं कॅमेराबद्दल शिकवणारं, असंही नव्हतं. मीच काय, माझ्या शाळामैत्रिणीही अवाक् झाल्या होत्या आणि मी उगाच (आणि अर्थात) खूप भाव खाल्ल्याचं आठवतं! :) अगदी उच्च आणि अति उच्च मध्यमवर्गीय घरातल्या मुलींनाही अशी वाढदिवसाची भेट मिळाली नव्हती. तेह्वा तर बाबा ग्रेट वाटलाच, पण आता विचार करताना बाबाचा इतका अभिमान वाटतो! हॅट्स ऑफ रे तुला!
मनाने साधा मोकळा पण तत्वं आणि मूल्यांना पक्का असा माझा बाबा. बर्याचदा त्या मूल्यांची किंम्मत चुकवण्यासाठी, खूप खडतर प्रसंग त्याने पाहिले. त्या अनुषंगाने व्यावहारिक आयुष्यात येणारे सारे मानसिक, काही प्रमाणात आर्थिक त्रासही भोगले. असं असतानाही, त्या काळी, आपल्या लेकीसाठी, तो कॅमेरा आणण्यासाठी त्याने स्वत:च्या किती गरजा तेह्वा कमी केल्या असतील, हा विचार जेह्वा कधी माझ्या मनात येतो, तेह्वा तेह्वा माझ्या घशात अडकल्यासारखं झाल्याशिवाय रहात नाही. सद्ध्याचा कॅमेरा घेतला, तेह्वा त्यालाच पहिला फोन केला, आणि सांगितलं, कॅमेरा घेतला! त्याच्याइतकं माझं कॅमेरावेड कोणाला माहित असणार आहे! आज जुन्या बंगलोरात जाऊन नायकॉन वापरुन फोटो काढताना, मला सारखं हेच डोक्यात येत होतं आणि बाबा आठवत राहिला सारखा.
तसं पाहिलं तर माझा बाबा काही बोलघेवडा नाहीये. मी आणि बाबा सतत गप्पा मारत बसलो, असं कधी आठवत नाही. त्याच बरोबर, त्याच्याशी गप्पा मारायला कोणत्याही विषयाची बंदी नव्हती - नाही, हेही खरच. जेह्वा कधी बोललो वा बोलतो, खूप भरभरुन बोललो. कोणताही प्रश्न आजवर त्याने टाळलेला नाही, तू लहान आहेस, तुला काय समजतय, म्हणून आधीही डावलला गेला नाही, किंवा आताही नाही. अगदी कोणत्याही विषयाबद्दलच्या मताची खिल्ली उडवली गेली नाही. एखादं मत पटणारं नसेल, किंवा माझं काही चुकत असेल तरीही चर्चेतून समजावणार. तेह्वाही, आताही.
हे सारं खूप महत्वाचं असत, आत्मविश्वास वाढवणारं ठरत. माणूस म्हणून कसं जगावं हे मी माझ्या घरातली माणसं पाहून शिकलेय नेहमी.
मी पहिलीत असताना, शाळेच्या वार्षि़क स्नेहसंमेलनात माझा जिप्सी नाच बघायला आलेला आणि बसायला जागा नसली तरी उभ्याने सगळा कार्यक्रम पाहणारा बाबा आठवतो अजून. माझ्या लहानपणी तासतासभर माझ्या केसांना तेल लावून देणारा बाबा, शाळेत असताना जेह्वा शाळेतर्फे खेळांमध्ये भाग घेत असे, तेह्वा आवर्जून खेळ बघायला येणारा बाबा, एकदा त्याच्याबरोबर जात असताना, रस्त्यावरच्या मवाल्याने धक्का द्यायचा प्रयत्न केलेला पाहून भर रस्त्यात त्याची गचांडी पकडणारा बाबा. बर्याच व्यवधानांमधून जेह्वा मी मास्टर्स पहिल्या वर्गात पूर्ण केलं, तेह्वा मनापासून सुखावलेला बाबा. त्याचा आजही धाक आहे अन् तो माझा मित्रही आहे. मी त्याच्याशी काहीही बोलू शकते. अगदी काहीही. त्याची मला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याने मला स्वतंत्र विचार करायला शिकवलं आहे. असो.
नंतरही पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर एक कॅमेरा मिळाला, परदेशी प्रवास केले तेह्वा फिल्मवाले कॅमेरा घेतले, बाजारात नवीन, नवीन जेह्वा डिजीटल कॅमेरा आला, तोही घेतला... आणि आता हा नायकॉन डी ६०. कधी तरी आता अधिक जास्त क्षमतेची लेन्स किट वगैरे घेईन, आणि बाबाला उत्साहाने फोन करेन.. बाबा, मी आज लेन्स घेतली.. फोनमधून तो अतिशय संयत अशी प्रतिक्रिया देईल, "छान हं.." पण त्याच्या मनातून ओसंडणारं समाधान माझ्यापर्यंत आपसूक पोहोचलेलं असेल, आणि माझा उत्साह त्याला तिथे समजला असेल. बाबाला सगळं समजतं, बर्याचदा न सांगताही कळतं.
माय बाबा स्ट्राँगेस्ट!

Subscribe to:
Posts (Atom)