December 29, 2008

Que Sera Sera..

बघता बघता वर्ष संपत आलय. तरी यावर्षीच्या सुरुवातीला कसलेही बेत केले नाहीत हे एक नशीब! नाहीतर वर्ष संपताना पूर्ण न झालेल्या बेताची टोचणीच की ती एक मनाला. त्यापेक्षा त्या भानगडीतच नाही पडलं तर बरं, असं म्हटलं आणि काहीही, कसलाही निर्धार न करता वर्षभरासाठी तरी निर्धास्त झाले होते!

खरं तर वर्ष कसं आलं, आणि कसं गेलं - खरं म्हणायचं तर कधी आणि कुठे आलं आणि गेलं हेच कळलं नाही. इथे घरापासून दूर येऊनही सलग २ वर्ष झाली. एकूणच परिस्थितीशी जमवून घेतलं तरीही, घरची ओढ अजूनही तशीच आहे. अगदी पहिल्या दिवशी इथे आल्यावर एका क्षणी जसं परकं परकं वाटलं होतं, तसच कधी तरी एकदम वाटत. घराशी, घरच्यांशी, आपले मित्रगण, ज्यांच्याशी आपलं फारशी खळखळ न होता जमून जातं असे नातेवाईक, एवढच काय पण घरासभोवतालचा सजीव आणि निर्जीव परिसर, आसमंत हे सारं, सारं आपलं असतं. अगदी कठीण प्रसंगातही मूकपणे आपल्याला धीर देत असतं, नाही? घर ही कल्पनाही आपल्याला बांधिलकीची जाणीव देऊन जाते, नाही?

कळून जुळणारे ऋणानुबंध तर महत्वाचे वाटतातच, पण नकळत जुळणारे ऋणानुबंध त्याहूनही चिवट. सुटता सुटत नाहीत अन् तुटता तुटत नाहीत! पण कोणासाठी त्याच्या बेड्या बनत असतील तर? माणसासाठी नातं की नात्यासाठी माणूस? हळू हळू लक्षात आलंय की तसं प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी. तीव्रता, काल मात्र कमी जास्त. मजा अशी असते, जोपर्यंत ते नातं आपल्या मनात हवंस वाटत असत ना, तोपर्यंत ते जिवंतच वाटत असत. ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्‍या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं. आल्हाददायक झुळुकेसारखं वाटणारं नातंही काही लक्षात येण्याआधी कोंडमारा कधी करु लागतं, जाणवतही नाही कधी कधी. निर्माण झालेल्या आणि कधी कधी आपणच निर्माण केलेल्या ऋणानुबंधांचं ओझं झालं तर काय करायच? बिनधास्त भिरकावून द्यायच का कधीतरी आपल्यालाही गरज लागेल हं, हा निव्वळ स्वार्थी आणि व्यवहारी विचार करुन थोड्याश्या अलिप्त भावनेनं का होईना, ते तसंच सोबत वागवायच?

आणि तरीही कधी कधी परिचित रस्ते आणि ठराविक वर्तुळं सोडवत नाहीत, नाही? नकळत आपली काहीतरी ओळख निर्माण झालेली असते - का आपली अशी अशी समजूत झालेली असते? कुठेतरी आपला स्व ही सुखावलेला असतो. कधीतरी मनाशी कबुली देऊन झालेली असते, की नाही करमत आता या घोळक्यात. दुसरा रस्ता, दुसरी पायवाट शोधायला हवी. पण कसली भीती वाटते? कोणी बरोबर नसेल याची? कोणी अहंकारावर फुंकर घालायला असणार नाही याची? आपल्याविषयी दुसर्‍याच्या तोंडून चांगले शब्द - तोंडदेखले का होईना, ऐकायला मिळणार नाहीत, यामुळे अस्वस्थता येते की, एकटं असताना आपण खरोखर किती पाण्यात आहोत हे कळेल, ही जाणीव का अस्वस्थ करते? की भविष्यकाळाच्या अनिश्चिततेची भीती असते ती? परिचितांच्या घोळक्यात अशी जाणीव तितक्या तीव्रतेने टोचत नसावी बहुधा. इतरांच्या नजरांतून आपण आपल्याला बघायला लागतो अन् स्वत:शी स्वतःची ओळख विसरत जातो का? स्वतः नगण्य असूही शकतो हे स्वीकारणं कठीण असतं ना? किती अभिमान! ताठा! हे काही खरं नाही!

जे मनाला पटत नाही आहे, जिथे मन रमत नाही आहे, तिथून मन काढून घ्यावं. थोडसं दुखेल, खुपेल. आजूबाजूला घोळका नसेल, नसू देत. स्वतःशी मैत्री होईल, कोणत्याही मुखवट्याशिवाय शेवटपर्यंत टिकेल. नवीन अनोळखी वाटांवर सुरुवातीला धडपडायला होईल. हरकत नाही, त्यातूनच उभारी घ्यायचीही समज येईल. स्वतःला परत एकदा ओळखता येईल. कदाचित नवीन रस्ते अधिक सुंदर असतील... किंवा नसतीलही. नसले तर सुंदर बनवता येतील. काळाच्या ओघात ते सत्य आहे, निखळ, निर्व्याज आहे ते टिकेलच. निदान असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे? जे दिखाऊ आहे, वरवरचं आणि असत्य आहे, ते हवं तरी कशाला? हेच नात्यांच्या बाबतीतही लागू. जी खरीखुरी आहेत, ज्यांत मनापासून जीव ओतला आहे, ती टिकतील, बाकीची विरतील. तोंडदेखल्या नात्यांचं ओझं तरी कशाला उगीच? भविष्यात काय आहे, हे कळेलच आज ना उद्या. त्याची उगाच आताच चिंता कशाला? जे काय असेल ते पाहता येईलच ना?

Que Sera Sera, whatever will be, will be..

December 27, 2008

मम आत्मा गमला..२

मम आत्मा गमला..१

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.

कधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे! वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर! "बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक!" ("चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना!") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. "ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते!" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.

अण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल! ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती! वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती! आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं! आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना!

या दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.

कारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती! जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.

अगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत!

किती आठवणी लिहाव्यात? किती सांगाव्यात? लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय!

December 13, 2008

आपापला खारीचा वाटा

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, मिसळपाववर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी जनताजनार्दनाच्याही लक्षात आल्या! आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, लाल फितीच्या खाबूगिरीमधे माहिर असलेल्या राजकारणापायी तुमच्या आमच्या सारख्याच आतापर्यंत सामान्य असलेल्या पोलिस आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांच्या आयुष्याची शासनाला आणि राजकारण्यांना नसलेली किंम्मत, न चालणार्‍या, अपुर्‍या आणि जुनाट शस्त्रांनिशी निधड्या छातीने ह्या सामान्या माणसांनी दिलेला असामान्य लढा, झालेली जिवीत हानी..

तसं पाहिलं तर आपण सामान्य माणसं मवाळच. फार तर आपला राग बोलण्यातून व्यक्त करावा, अतिच झालं तर जरा चारेक शिव्या वगैरे द्याव्या आणि मनातल्या मनात धुमसावं! पुन्हा रोजच्याच आयुष्यातले नेहमीचे प्रश्नच इतके भेडसावत असतात की असल्या मोठ्या प्रश्नांकडे इच्छा असूनही बर्‍याचदा वळताच येत नाही, नेहमीच्या जबबदार्‍या पार पाडताना ते शक्यही नसतं...

पण म्हणून काहीच नाही का करता येणार आपल्याला? आपणही ह्या जनशक्तीचाच भाग आहोत ना?? की फक्त, परिस्थिती बदलायला हवी अशी कळकळीची इच्छा व्यक्त करणारी, पण त्यासाठी स्वतःकडून काहीच हातभार न लावणारी मंडळी आहोत? आता तर कोणत्याही परकीय राजवटीच्या अंमलाखाली आपण राहात नाही, तर आपणच निवडून दिलेलं सरकार, आपल्या ह्या देशाचा कारभार पहातं. जर ते सरकार चुकत आहे अथवा लोकमनाची आणि मताची हवी तितकी दखल घेत नाही असं वाटत असेल, तर, सरकारला आपलं मत ऐकवायचा अधिकार आपल्याला आहे, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. दरवेळी राज्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून आपण हातावर हात ठेऊन शांत बसणार ही परिस्थिती बदलायला नको का? जनशक्ती आहे, आणि ती सक्रीय आहे याची जाणीव सरकारच्या मनात असली तर सरकार अधिक सतर्कतेने, जनशक्तीच्या जागरुकतेची जाणीव मनात ठेवून काम करेल असं नाही का वाटत?

ह्यासाठी आपल्या हातात आहे तितके करावे या हेतूने, हे एक पत्र, सरकारला पाठवण्यासाठी मिसळपाववरील माझे एक आंतरजालीय स्नेही आहेत, त्यांनी तयार केले आहे. त्यांच्याच परवानगीने त्या पत्राचा दुवा इथेही देत आहे. हे पत्र आमच्यापैकी बर्‍याच जणांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. तुम्हां सर्वांनाही विनंती आहे, की त्या मसुद्यात आपल्याला योग्य वाटतील ते बदल करून पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे, गृहमंत्रालयाकडे आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनाही कृपया पाठवा, आपल्या सर्व मित्रमंडळींना पत्र पाठवायची विनंतीही करा... मोठ्या प्रमाणावर पत्रांचा वर्षाव झाला तर काहीतरी चांगला बदल घडूनही येईल, निदान थोडाफार तरी परिणाम होईल ना?

खाली काही पत्ते देत आहे, पत्रं, इमेल्स पाठवण्यासाठी यांचा उपयोग होईलसे वाटते.

पंतप्रधान कार्यालय: http://pmindia.nic.in/

पंतप्रधानांची वेबसाइट, संपर्कासाठी पत्ता: http://pmindia.nic.in/pmo.htm
The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi,
India-110 011.
Telephone: 91-11-23012312.
Fax: 91-11-23019545 / 91-11-23016857.

येथे तुम्हाला पंतप्रधानांच्या कार्यालयाला इमेल पण करता येतो, विषयानुसार वर्गवारी आहे: http://pmindia.nic.in/write.htm

राष्ट्रपतींशी संपर्क : http://presidentofindia.nic.in/
इमेल : presidentofindia@rb.nic.in

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ई-मेल: ashokchavanmind@rediffmail.com
मटा मधे दिलेला होता.

मग उचलाल ना तुम्हीही आपापला खारीचा वाटा?