December 29, 2008

Que Sera Sera..

बघता बघता वर्ष संपत आलय. तरी यावर्षीच्या सुरुवातीला कसलेही बेत केले नाहीत हे एक नशीब! नाहीतर वर्ष संपताना पूर्ण न झालेल्या बेताची टोचणीच की ती एक मनाला. त्यापेक्षा त्या भानगडीतच नाही पडलं तर बरं, असं म्हटलं आणि काहीही, कसलाही निर्धार न करता वर्षभरासाठी तरी निर्धास्त झाले होते!

खरं तर वर्ष कसं आलं, आणि कसं गेलं - खरं म्हणायचं तर कधी आणि कुठे आलं आणि गेलं हेच कळलं नाही. इथे घरापासून दूर येऊनही सलग २ वर्ष झाली. एकूणच परिस्थितीशी जमवून घेतलं तरीही, घरची ओढ अजूनही तशीच आहे. अगदी पहिल्या दिवशी इथे आल्यावर एका क्षणी जसं परकं परकं वाटलं होतं, तसच कधी तरी एकदम वाटत. घराशी, घरच्यांशी, आपले मित्रगण, ज्यांच्याशी आपलं फारशी खळखळ न होता जमून जातं असे नातेवाईक, एवढच काय पण घरासभोवतालचा सजीव आणि निर्जीव परिसर, आसमंत हे सारं, सारं आपलं असतं. अगदी कठीण प्रसंगातही मूकपणे आपल्याला धीर देत असतं, नाही? घर ही कल्पनाही आपल्याला बांधिलकीची जाणीव देऊन जाते, नाही?

कळून जुळणारे ऋणानुबंध तर महत्वाचे वाटतातच, पण नकळत जुळणारे ऋणानुबंध त्याहूनही चिवट. सुटता सुटत नाहीत अन् तुटता तुटत नाहीत! पण कोणासाठी त्याच्या बेड्या बनत असतील तर? माणसासाठी नातं की नात्यासाठी माणूस? हळू हळू लक्षात आलंय की तसं प्रत्येक नातं विसकटतच कधी ना कधी. तीव्रता, काल मात्र कमी जास्त. मजा अशी असते, जोपर्यंत ते नातं आपल्या मनात हवंस वाटत असत ना, तोपर्यंत ते जिवंतच वाटत असत. ज्याक्षणी तुम्हांला किंवा तुमच्या सोबत ते नातं जोपासत असणार्‍या व्यक्तीला त्या नात्याचं ओझं वाटायला लागलं ना, की मग ते एकदम विसकटल्या सारखं वाटायला लागतं. आल्हाददायक झुळुकेसारखं वाटणारं नातंही काही लक्षात येण्याआधी कोंडमारा कधी करु लागतं, जाणवतही नाही कधी कधी. निर्माण झालेल्या आणि कधी कधी आपणच निर्माण केलेल्या ऋणानुबंधांचं ओझं झालं तर काय करायच? बिनधास्त भिरकावून द्यायच का कधीतरी आपल्यालाही गरज लागेल हं, हा निव्वळ स्वार्थी आणि व्यवहारी विचार करुन थोड्याश्या अलिप्त भावनेनं का होईना, ते तसंच सोबत वागवायच?

आणि तरीही कधी कधी परिचित रस्ते आणि ठराविक वर्तुळं सोडवत नाहीत, नाही? नकळत आपली काहीतरी ओळख निर्माण झालेली असते - का आपली अशी अशी समजूत झालेली असते? कुठेतरी आपला स्व ही सुखावलेला असतो. कधीतरी मनाशी कबुली देऊन झालेली असते, की नाही करमत आता या घोळक्यात. दुसरा रस्ता, दुसरी पायवाट शोधायला हवी. पण कसली भीती वाटते? कोणी बरोबर नसेल याची? कोणी अहंकारावर फुंकर घालायला असणार नाही याची? आपल्याविषयी दुसर्‍याच्या तोंडून चांगले शब्द - तोंडदेखले का होईना, ऐकायला मिळणार नाहीत, यामुळे अस्वस्थता येते की, एकटं असताना आपण खरोखर किती पाण्यात आहोत हे कळेल, ही जाणीव का अस्वस्थ करते? की भविष्यकाळाच्या अनिश्चिततेची भीती असते ती? परिचितांच्या घोळक्यात अशी जाणीव तितक्या तीव्रतेने टोचत नसावी बहुधा. इतरांच्या नजरांतून आपण आपल्याला बघायला लागतो अन् स्वत:शी स्वतःची ओळख विसरत जातो का? स्वतः नगण्य असूही शकतो हे स्वीकारणं कठीण असतं ना? किती अभिमान! ताठा! हे काही खरं नाही!

जे मनाला पटत नाही आहे, जिथे मन रमत नाही आहे, तिथून मन काढून घ्यावं. थोडसं दुखेल, खुपेल. आजूबाजूला घोळका नसेल, नसू देत. स्वतःशी मैत्री होईल, कोणत्याही मुखवट्याशिवाय शेवटपर्यंत टिकेल. नवीन अनोळखी वाटांवर सुरुवातीला धडपडायला होईल. हरकत नाही, त्यातूनच उभारी घ्यायचीही समज येईल. स्वतःला परत एकदा ओळखता येईल. कदाचित नवीन रस्ते अधिक सुंदर असतील... किंवा नसतीलही. नसले तर सुंदर बनवता येतील. काळाच्या ओघात ते सत्य आहे, निखळ, निर्व्याज आहे ते टिकेलच. निदान असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे? जे दिखाऊ आहे, वरवरचं आणि असत्य आहे, ते हवं तरी कशाला? हेच नात्यांच्या बाबतीतही लागू. जी खरीखुरी आहेत, ज्यांत मनापासून जीव ओतला आहे, ती टिकतील, बाकीची विरतील. तोंडदेखल्या नात्यांचं ओझं तरी कशाला उगीच? भविष्यात काय आहे, हे कळेलच आज ना उद्या. त्याची उगाच आताच चिंता कशाला? जे काय असेल ते पाहता येईलच ना?

Que Sera Sera, whatever will be, will be..

December 27, 2008

मम आत्मा गमला..२

मम आत्मा गमला..१

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.

कधी, कधी आम्हांलाही गाण्यातल्या जागा, बालगंधर्वांच्या आवाजातली फिरत वगैरे समजावून द्यायचा ते प्रयत्न करत असत. तेह्वा सगळं पालथ्या घड्यावर पाणीच असे! वैनी कधी कधी वैतागायची आमच्यावर! "बरी पदांबी ऐकच्याक नाकात ह्यां चोरडांक!" ("चांगली गाणीही ऐकायला नकोत ह्या मुलांना!") असं म्हणत जरा दटावतच आम्हाला बसायचा आणि ल़क्ष देऊन पदां ऐकायचा आग्रह करायची. "ऐक गं, ऐक गं, किती सुंदर गातात ते!" म्हणत स्वतःच तल्लीन व्हायची. ती गाणी ऐकण्यात रंगून गेलेली माझी गोरीगोमटी आज्जी मला अजूनही डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसते.

अण्णांना तशी खात्री होती की कधी ना कधी अश्या गायकीबद्दल आणि शास्त्रीय संगीतबद्दल आम्हांला प्रेम उत्पन्न होईलच होईल! ते तसं म्हणतही. स्वतःच्या नातवंडांबद्दल त्यांना भलतीच खात्री होती! वैनीला मात्र अशी काहीच खात्री नव्हती! आणि अशी आवड उत्पन्न झाली नाही तर.. हीच तिची भीती आणि काळजी होती - म्हणजे असावी. पण, पुढे मग जेव्हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतात उत्पन्न झालेली गोडी बघून तिलाही धन्य झालं! आपली नातवंड तानसेन आणि तानसेनी नसल्या तरी कानसेन आणि सेनी तरी असाव्यात एवढीच तिची माफक अपेक्षा होती. आता अगदीच तयारीचे कानसेन नसलो तरी संगीताविषयी आवड निश्चितच उत्पन्न झाली, आणि त्याचं सारं श्रेय माझ्या आजी आजोबांना!

या दोघांनी आमच्या लहानपणात खूप खूप रंग भरले. नातवंडांबरोबरचं आजी आजोबांच नातं खूप खूप समरसून त्यांनी निभावलं. तेह्वा लहानपणी असलं काही जाणवत नाही, कळतही नाही, पण आता त्यामागची अपूर्वाई जाणवते. महत्त्व समजतं. आम्ही भावंड किती भाग्यवान होतो हे पुन्हा पुन्हा लक्षात येतं.

कारवार, बेळगाव, धारवाडसारख्या त्यावेळच्या गावांतून राहिलेली ही माणसं. सरळ, साधं जगणारी. मनात कोणाविषयी वैर नाही, कधी कोणाविषयी वाईट साईट बोललेलं ऐकलं नाही. आमची वैनी तर तिथल्या समाज जीवनावर, माणसांच्या दिलदार, मनमोकळ्या वृत्ती अन् स्वभावावर शेवटपर्यंत फिदा होती! जीवाला जीव देणारे किती तरी लोक राहतील तिथे ह्या दोघांनी जोडले. व्यवहारापेक्षा ह्या गावांतून माणसामधल्या परस्परांच्या नात्याला, विश्वासाला अधिक किंम्मत होती हे दोघांचे लाडके आणि ठाम मत. तसेच वागणे, जगणे त्यांच्याही हाडांमासी रुळले होते. त्यामानाने आयुष्याच्या उतरणीवर पुण्यात राहणे तिला जरा कमीच मानवले होते, पण त्याच्याशीही जुळवून घेत ती शेजारपाजारचीही वैनी बनून गेली खरी. कधी काही मनाविरुद्ध घडलं आणि मानसिक त्रास झालाच तर शांतादुर्गेला चिंता.. असं म्हणत विषय संपवणारी वैनी अजूनही लक्षात आहे.

अगदी मंडईमध्ये सुद्धा अण्णा, वैनी मला घेऊन जात. अभ्यास, खेळ वगैरे तर झालंच, पण धान्य कसं पहायच, चांगली फळं , भाज्या कश्या ओळखायच्या ह्या सारख्या बारीक बारीक गोष्टीही त्यांनीच मला शिकवल्या. जे जे म्हणून त्यांना माहित होतं, भावत होतं, नातवंडांसाठी आवश्यक वाटत होतं ते शिकवण्यामधे, देण्यामधे ते कधीच कमी पडले नाहीत... जुन्या पिढीतल्या ह्या माणसांचं अंतरंगच न्यारं होत!

किती आठवणी लिहाव्यात? किती सांगाव्यात? लहानपणच्या आठवणी पुन्हा पुन्हा काढून त्यात आनंदानं, सुखानं रमून जाता यावं, असं लोभस लहानपण आमच्या पदरात अण्णा वैनीमुळे आलं, आणि त्याने आम्हां आते मामे चुलत भावंडांना कायमसाठी आजही एकत्र बांधून ठेवलय!

December 13, 2008

आपापला खारीचा वाटा

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, मिसळपाववर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी जनताजनार्दनाच्याही लक्षात आल्या! आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, लाल फितीच्या खाबूगिरीमधे माहिर असलेल्या राजकारणापायी तुमच्या आमच्या सारख्याच आतापर्यंत सामान्य असलेल्या पोलिस आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांच्या आयुष्याची शासनाला आणि राजकारण्यांना नसलेली किंम्मत, न चालणार्‍या, अपुर्‍या आणि जुनाट शस्त्रांनिशी निधड्या छातीने ह्या सामान्या माणसांनी दिलेला असामान्य लढा, झालेली जिवीत हानी..

तसं पाहिलं तर आपण सामान्य माणसं मवाळच. फार तर आपला राग बोलण्यातून व्यक्त करावा, अतिच झालं तर जरा चारेक शिव्या वगैरे द्याव्या आणि मनातल्या मनात धुमसावं! पुन्हा रोजच्याच आयुष्यातले नेहमीचे प्रश्नच इतके भेडसावत असतात की असल्या मोठ्या प्रश्नांकडे इच्छा असूनही बर्‍याचदा वळताच येत नाही, नेहमीच्या जबबदार्‍या पार पाडताना ते शक्यही नसतं...

पण म्हणून काहीच नाही का करता येणार आपल्याला? आपणही ह्या जनशक्तीचाच भाग आहोत ना?? की फक्त, परिस्थिती बदलायला हवी अशी कळकळीची इच्छा व्यक्त करणारी, पण त्यासाठी स्वतःकडून काहीच हातभार न लावणारी मंडळी आहोत? आता तर कोणत्याही परकीय राजवटीच्या अंमलाखाली आपण राहात नाही, तर आपणच निवडून दिलेलं सरकार, आपल्या ह्या देशाचा कारभार पहातं. जर ते सरकार चुकत आहे अथवा लोकमनाची आणि मताची हवी तितकी दखल घेत नाही असं वाटत असेल, तर, सरकारला आपलं मत ऐकवायचा अधिकार आपल्याला आहे, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. दरवेळी राज्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून आपण हातावर हात ठेऊन शांत बसणार ही परिस्थिती बदलायला नको का? जनशक्ती आहे, आणि ती सक्रीय आहे याची जाणीव सरकारच्या मनात असली तर सरकार अधिक सतर्कतेने, जनशक्तीच्या जागरुकतेची जाणीव मनात ठेवून काम करेल असं नाही का वाटत?

ह्यासाठी आपल्या हातात आहे तितके करावे या हेतूने, हे एक पत्र, सरकारला पाठवण्यासाठी मिसळपाववरील माझे एक आंतरजालीय स्नेही आहेत, त्यांनी तयार केले आहे. त्यांच्याच परवानगीने त्या पत्राचा दुवा इथेही देत आहे. हे पत्र आमच्यापैकी बर्‍याच जणांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. तुम्हां सर्वांनाही विनंती आहे, की त्या मसुद्यात आपल्याला योग्य वाटतील ते बदल करून पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे, गृहमंत्रालयाकडे आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनाही कृपया पाठवा, आपल्या सर्व मित्रमंडळींना पत्र पाठवायची विनंतीही करा... मोठ्या प्रमाणावर पत्रांचा वर्षाव झाला तर काहीतरी चांगला बदल घडूनही येईल, निदान थोडाफार तरी परिणाम होईल ना?

खाली काही पत्ते देत आहे, पत्रं, इमेल्स पाठवण्यासाठी यांचा उपयोग होईलसे वाटते.

पंतप्रधान कार्यालय: http://pmindia.nic.in/

पंतप्रधानांची वेबसाइट, संपर्कासाठी पत्ता: http://pmindia.nic.in/pmo.htm
The Prime Minister's Office
South Block, Raisina Hill,
New Delhi,
India-110 011.
Telephone: 91-11-23012312.
Fax: 91-11-23019545 / 91-11-23016857.

येथे तुम्हाला पंतप्रधानांच्या कार्यालयाला इमेल पण करता येतो, विषयानुसार वर्गवारी आहे: http://pmindia.nic.in/write.htm

राष्ट्रपतींशी संपर्क : http://presidentofindia.nic.in/
इमेल : presidentofindia@rb.nic.in

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ई-मेल: ashokchavanmind@rediffmail.com
मटा मधे दिलेला होता.

मग उचलाल ना तुम्हीही आपापला खारीचा वाटा?

November 15, 2008

मम आत्मा गमला..१

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्‍यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.

अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत आमच्यावर मोठी माणसं, अजून काय?? :)

-क्रमशः

November 9, 2008

बोल गं घुमा... बोलू मी कशी??

विषय तुमच्या, आमच्या, सार्‍यांच्याच मनातला. खास करुन स्रियांच्या. होणारा त्रास तुम्ही, आम्ही सर्वांनींच कधी ना कधी सहन केलेला. बरं, बोलावं तरी कोणापाशी? आणि कुठे? आणि समजा तक्रार केलीच तरी उपयोग नाही हे माहितीच! त्यामुळे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

लख्ख आठवतं की लहानपणी कोकणात आजोळी जायच्या आनंदात एकच मोठ्ठा मिठाचा खडा असायचा... तो म्हणजे, एसटी स्टॅण्डवरची टॉयलेटस वापरायला लागणार हा विचार! पोटातून मळमळून आतडी बाहेर पडतील असे वाटायला लावणारे वास, अस्वच्छता, गलिच्छपणा.. श्वास कोंडून धरून तरी किती वेळ ठेवायचा?? इतकं वैतागवाणं प्रकरण असायचं ते! त्रास, त्रास नुसता!! नाकावर रुमाल दाबा, त्यावरुन आईचा पदर दाबा, काहीही केलं तरी तो वास काही नाकात शिरल्याशिवाय रहात नसे. गावी पोचलं, गावचा एसटी स्टँड दिसला, की हुश्शss व्हायचं अगदी...

आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही! एकीकडे देशाची सर्व क्षेत्रांत अत्यंत वेगात प्रगती सुरु आहे पण त्याच वेळी,आरोग्याला आवश्यक अश्या स्वच्छ टॉयलेटच्या मूलभूत सुविधा शहरांत,गावांत कुठेच नीटश्या उपलब्ध नाहीत! सामान्य माणसाचं आरोग्य महत्वाचं नाही का? आणि ह्यात बायकांचे हाल तर विचारुच नका! ह्यावर 'स्वच्छतेच्या बैलाला.. ' हा एक परखड आणि चपखल लेख मायबोलीच्या दिवाळी अंकामध्ये अज्जुकाने लिहिलाय. मंडळी, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा लेख जरुर,जरुर वाचा. स्त्रीवर्ग तर लगेच ह्या लेखाशी रिलेट होऊ शकेल. पुरुष वाचक मंडळी, वाचताना आपल्या आई, बहिण, मैत्रिण, पत्नी यांपैकी कोणाला डोळ्यांसमोर ठेवून वाचा, म्हणजे त्यातील धग जाणवेल.

तसच, मायबोलीवरचे काही लोक ह्या लेखाच्या अनुषंगाने एकत्र येऊन, ह्या समस्येवर उहापोह करुन आपल्याला ह्या संदर्भात जे करता येईल ते करत आहेत. तुम्हीही या प्रयत्नात सहभागी होऊ शकता. निदान आपल्या ब्लॉगवर अज्जुकाच्या लेखाची लिंक द्या. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा दिला, तरी खूप फरक पडू शकेल. निदान फरक पडावा ह्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे??

October 29, 2008

ठसठसणारा कोपरा

माझ्या लहानपणी माझी आजी मला खूप गोष्टी सांगायची, गप्पा मारायची. गोष्टी म्हणजे फक्त चिऊ काऊच्या नव्हेत. अगदी लहानपणी त्याही सांगून झाल्या. पण जसजशी मी मोठी होत गेले, तशी आजी वडिलधारीपणाची भूमिका मागे टाकून हळूच मैत्रिणीच्या भूमिकेत कधी शिरली ते समजलंच नाही. समजावण्याचा आव न आणता कितीतरी गोष्टी तिने समजावल्या, सांगितल्या. नातवंडांच्या मनात हलकेच शिरण्याचं तिचं कसबही वादातीत होतं. तिच्या अनेक गोष्टी, मतं मला प्रसंगानुरुप आठवतच असतात, पण त्यातही तिच्यावेळी, तिच्या लहानपणी, ती मुलगी म्हणून तिला कितीतरी संधी मिळू शकल्याच नाहीत, याबद्दलची तिने बोलून दाखवलेली खंतही बर्‍याचदा टोचत राहते. लहानपणी वा वाढत्या वयात त्यामागचे तिचे दुखावलेले मन त्या तीव्रतेने कधी जाणवले नाही. तेवढे कळतही नव्हते, पण आता जरुर जाणवते.

तिच्या घरातले तिला अन् तिच्या बहिणींना लागू असणारे नियम आणि भावांना लागू असणारे नियम यात तफावत तर होतीच. खूप लक्षात येईल असा दुजाभाव नव्हता त्याकाळाच्या मानाने.. पण जो काही होता, तो होताच! मुलीच्या जातीला तेह्वा शिवण यायला हवे होते, स्वयंपाक तर अनिवार्य होता, घरकाम, विण़काम, कलाकुसर, पाटपाणी, घरातली साफसफाई, झाडलोट.. थोडक्यात काय, तर अगदी गृहकृत्यदक्ष मुलगी हवी असायची. घरगुती असणारी आणि घरातली कामे बिनभोबाट करणारी. ही कामे तर मुलींचीच होती फक्त! बाहेरचे विश्व असे काही नव्हतेच त्याकाळच्या मुलींना... चालीरीतींच्या नावाखाली, घरंदाजपणाच्या समजुतींपायी, सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक बंधनं!

तिचे सगळ्यात मोठे, मनात ठसठसणारे दु:ख म्हणजे सातवीनंतर तिची शाळा बंद केली हे होते. सगळ्याच बहिणींचे असेच थोडेफार. भाऊ शिकले. तिच्या वडिलांच्या मते, खेड्यात काय करायचे आहे खूप शिकून? शेवटी घरच ना सांभाळणार आहात?? तिच्या मताला काहीच किंम्मत दिली नाही, हे तिचे, एका मनस्वी स्त्री-मनाचे दु:ख, शेवटपर्यंत तसेच जिवंत राहिले... त्यामानाने तुम्ही मुली खूप खूप सुखी आहात, हे ती आम्हाला आवर्जून सांगायची. ते तर मान्यच. आज सगळ्या नाहीत तरी समाजातल्या बर्‍याच मुली हवे तसे शिक्षण घेऊ शकतात, त्यातल्याच थोड्या काही स्वतःच्या मनासारखी, स्वतःच्या निवडीची नोकरी/व्यवसायही करु शकतात. स्वतःला हवा तसा आयुष्याला आकार देऊ शकतात. काही भाग्यवान आभाळाएवढी आव्हानंही पेलतात. हे चित्र दिसत असतानाही, खरंच परिस्थिती किंवा अधिक योग्य शब्द वापरायचा झाला तर, समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललीय का?? निखळ झाली आहे का?

आजही, उच्च शिक्षण घेतलेले माझे काही सहकारी, घर सांभाळायला लग्न करायला हवं कारण घरातली कामं त्यांच्याच्याने जमत नाहीत म्हणतात! स्वयंपाक जमत नाही, भांडी घासायला, स्वतःचे कपडे धुणे इत्यादी कामे "बोअर" होतात म्हणे! यावर तर काही प्रतिक्रिया द्यायलाही मला सुचत नाही! तरीही त्यांच्याशी थोडाफार निष्फळ वाद मी घालतेच! सहचारिणीची जरुरी घरातली कामं करण्यासाठी आहे?

शेजारचं एक जोडपं त्यांच्या मुलाच्या शाळेवर खूपच नाराज असतं! कारण? मुलाला शाळेत साधं सोपं शिवण शिकवणार असतात! मुलाला काय करायचंय हे शिकून?? आता मुलगीच असती तर ठीक होतं एक वेळ! हे त्याची आजच्या जमान्यातली तथाकथित "आधुनिक" आई अत्यंत नाराजीने बोलते!! शिवण येण्याचा अन् मुलगा किंवा मुलगी असण्याचा संबंध काय आहे, हेच माझ्या लक्षात येत नाही! कधीतरी ह्या कौशल्याचा वापर हाच मुलगाही करु शकेल ना? स्वतःच्या शर्टाची तुटलेली बटनं तरी लावू शकेल? साधासा स्वयंपाक, जरुरीपुरतं शिवणकाम, घरात आणि आजूबाजूला लागणारी जुजबी दुरुस्ती, वाहनाची जुजबी दुरुस्ती करणे वगरे असली छोटी मोठी कामं, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो वा पुरुष, यायला नकोत का? शिवण, स्वयंपाक कामं मुलांची नाहीत आणि वाहन दुरुस्ती, घरातली छोटी मोठी दुरुस्तीसारखी कामं मुलीच्या जातीला कशी जमतील, असा काही नियम आहे कुठे?

आजीच्या काळात तर मुलींपेक्षा मुलांचे महत्व जास्त होते म्हणावे, लोकांच्या समजुतीही जुन्या होत्या म्हणावे तर आजही वैषम्य वाटण्याजोगी परिस्थिती आहेच! आजच्या जमान्यात देखील अडाणी, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित - कोणालाच मुलीचा गर्भ पाडण्याविषयी काही वाटत नाही... निदान डॉक्टर लोकांना असल्या कामात सहभागी होताना बाकी कसली नाही, निदान आपल्या पेशाचीही तरी लाज वाटावी?? तेही नाही! आजही कित्येक सुशिक्षित घरांतही मुलीपेक्षा मुलाचे करीअर हे महत्वाचे असते आणि योग्य वेळी मुली योग्य घरी पडू दे, हे बर्‍याच आईवडिलांचे उरी जपलेले आद्य स्वप्न असते! करीअर वगैरे होतच असते तिचे! हे सगळे बघताना वाटते, काय बदलले आहे?

आजीच्या जमान्यात आजी आणि तिच्या वयाच्या अनेकींना "मुलीची जात, बाईची जात" हा शब्दप्रयोग ऐकावा लागला, आणि आजही तो शब्दप्रयोग आम्ही, तुम्ही ऐकतोच आहोत. बर्‍याच घरांतून, आजचं, स्रीला मिळणारं स्वातंत्र्य हे एका ठराविक परिघातलं स्वातंत्र्य आहे. एक ठराविक परिघात घाल हवी तेवढी रिंगणं! पण खरंच निर्णयाची वेळ आली, की त्यागमूर्ती बनायचं ओझं पहिल्यांदा अजूनही स्त्रीच्या गळ्यातच पडतं, हेही खरच ना? लहान सहान गोष्टींत, आतल्या, बाहेरच्या जगात जरा परखडपणे डोकावून पाहिलं ना, की दरी अजून बर्‍यापैकी जैसे थे आहे हे जाणवतं, कधी कधी तर अजूनच रुंदावलेली. दुरुन पाहताना सगळं आलबेल आहे असं वाटत रहावं, पण जवळ गेल्यावर खड्डे अन् भोवरे कळावेत असं काहीसं!

आजी सांगे, तिच्या काळात मुलींना लहानपणापासूनच "मुलीच्या जातीने" कसे वागावे याचे धडे मिळत. वडिलधार्‍यांशी बोलताना कायम नजर खाली करुन बोलायचे, उलट उत्तर वा प्रश्न सोडाच, 'का?' हेही विचारायचे नाही, संयमाने उंबर्‍याच्या आत वावरायचे! घराचे घरपण जपायचे! आणि घरपण जपणारीचे मन कोणी जपायचे? आजच्या पिढीला हे असले सारे नियम पाळायला लागत नाहीत. आजीच्या पिढीला बाहेरच्या जगात वावरायला मिळालं नसेल पण आजही बर्‍याच घरांत परिस्थितीशी स्त्रीनेच आद्य कर्तव्य असल्यासारखं जुळवून घ्यायचं असतं आणि घराचं घरपण जपायचं असतं! प्रत्येकाच्या वेळापत्रकाशीही जुळवायचं असतं! आणि तरीही म्हणायचं की, घर दोघांचही असतं!

पूर्वीच्या पिढीच्या मानाने आजची स्त्री स्वतंत्र झाल्यासारखी भासत असली किंवा स्वतंत्र झालीही असली तरी त्या स्वातंत्र्याची किंमत म्हणून आज बाहेरच्या जगातलेही आणि घरातलेही कितीतरी ताणतणाव पदरी घेऊन जगणार्‍या स्त्रीच्या मनातला ठसठसणारा कोपरा अजूनही आजीच्या दु:खाशी जातकुळी सांगणाराच आहे हे जाणवतं... फक्त थोडीफार मापकं बदलली आहेत एवढंच!

******

हा लेख मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. हा अंक अतिशय देखणा झालाय! पाहिला नसाल, तर जरुर पहा. उपक्रम आणि मनोगत इथले दिवाळी अंक वाचून व्हायचे आहेत अजून.. तुम्ही वाचलेत का? कसे वाटले?

October 21, 2008

गज़ल

मायबोलीतर्फे गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यशाळेत मी भाग घेतला होता. कार्यशाळेबद्दल इथे वाचता येईल.

असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही

मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही

जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही

October 18, 2008

फेरफटका

सही चाललेत काही काही ब्लॉग्ज!! आज बर्‍याच दिवसांनी काही काही ब्लॉग्जवर चक्कर टाकली! काही काही पोस्ट्स खूप मस्त वाटली, भन्नाट एकदम! मजा आली वाचायला! धन्यवाद लेखकू मंडळी! मनापासून धन्यवाद.

**

माझं स्वतःच पोस्टणं मात्र कमी झालय का? काय अडत नाही म्हणा त्याने.. वेळ नसतो, काम असतं वगैरे वगैरे नेहमीची कारणं, आळशीपणा हे अजून एक. पण, खरं सांगायचं तर, ब्लॉग सुरु केला होता, तेह्वा नव्या नवलाईचा उत्साह होता, तो आता तितकाही राहिलेला नाही खरा! डेंजरच झालंय की हे! अगोदरच्या एक जुन्या पोस्टमधे मीच ना ते म्हटलय, की मला शब्दांची असोशी आहे म्हणून?? मग, हे काय?? अर्थात, लग्गेच मनाने सांगून टाकलय की ती असोशी इतरांच्या चांगल्या पोस्ट्स वाचूनही पुरवता येतेच! सो, फिकर नॉट!.. ह्म्म, मी उद्गारवाचक चिन्हं खूप वापरते की काय?? असंच दिसतय एकूणात... की ही पण एक फेज म्हणायची?? की ब्लॉग आचके द्यायला लागायची सुरुवात झालेली आहे म्हणू?? नियतीच्या कालचक्रासारखं ब्लॉगचंही चक्र की काय? कधी कधी जरा वाईटच वाटतं.. ब्लॉगकडे जरा दुर्लक्षच होत आहे की काय असं वाटत, पण फारसं काही सांगण्यासारखं नसताना लिहायचं तरी काय? भलतच सरळसोट चाललय सगळ! असूदेत पण, सद्ध्या तेच बरय, डोक्याला ताप नाही!!

**

ऑफिसमधे एक कलिग नोकरी सोडून चाललाय , दुसरीकडे मस्तच संधी मिळतेय त्याला. इथे आमच्या टेक्निकल मॅनेजरची आणि डिलिवरी मॅनेजरची चांगलीच फाटलीये! ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता, ते टप्प होईल आता काही काळ तरी. सगळ्यात चिवित्र गोष्ट म्हणजे मॅनेजर येऊन मला सांगतोय, की मी त्याला जाऊ नकोस म्हणून समजवावं! कमाल आहे!! सहकारी आहे, चांगला मित्र आहे म्हणून लगेच काय मी त्याला जॉब सोडू नको असं ज्ञान देईन, असं का वाटत बुवा ह्या मॅनेजर्सना?? आणि हे मॅनेजर लोकांचं गणित मल तरी समजलेलं नाही! नोकरीत असेपर्यंत चांगल्या माणसाकडे, बर्‍यापैकी दुर्लक्ष करायचं आणि सोडून चाललं असं कोणी, की मग फुगड्या घालायच्या!! इतके वेगवेगळे फंडे वापरुन त्यांचा ह्या कलिगचं मन वळवायचा प्रयत्न चाललाय की काय!! कधी कधी खरच मजा वाटते. समजा, हा इथे थांबला, अन् हे प्रोजेक्ट संपलं आणि पुढे काही खास नसलं की ह्यची गरज भासेल, तर हेच प्रेम हे मॅनेजर्स पुढेही जोपासतील का?? येडे समजतात की काय हे लोकं आपल्या टीम मधल्या लोकांना??

**

मधे पुण्याला गेलेले असताना पुस्तकांच्या दुकानात शिरले होते तेह्वा तिथे आलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे ते दुकानवाले काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली होती!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक, असा विचारही केला होता, ते राहिलच की, एकदा वेळ काढून तब्येतीत टाकलं पाहिजे. आत्ता हे लिहिताना, ते संवाद आठवून हसायला येतय! एकदम खतरा आणि जिवंत संभाषण ऐकायला मिळालेलं त्यादिवशी!

**

परत एकदा ज्ञानोबामाऊलीचं पसायदान वाचलय आणि परत एकदा ह्या लोकविलक्षण माणसाच्या एकूणच मानसिक झेपेपुढे, उंचीपुढे मी नि:शब्द!! इतके हाल, त्रास आणि खडतर आयुष्य जगून, भोगून ही व्यक्ती सगळ्या प्राणिमात्रांसाठी, त्यांच्या अंतर्बाह्य भल्यासाठी साकडे घालते!! इतक्या लहान वयात इतकी ऋजुता कुठून येते मनात?? मनामध्ये जराही द्वेष नाही, कटुता, राग, आसक्ती नाही... किती विलक्षण! पण जिथे त्यांची अवस्थाच जर, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म'.. अश्या आत्म्याला कुठले आलेत राग लोभ?

काय बोलायचं पुढे...

October 6, 2008

रखडलेलं लिखाण

हे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...
(२६ सप्टेंबर २००८)

शेवटी आज मुहूर्त सापडलेला दिसतोय!! दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही!! कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल की नाही याची खात्री वाटली नाही, की मग लिहिण्यामधली मजा निघून गेल्यासारखी वाटते. मग ठप्प! म्हणजे काही गहन विषय मांडणार नसते - तसलं काही फारसं जमतच नाही म्हणा मला, पण साधं, सोपंही नेमकं मांडायला जमलं पाहिजे की! अणि अर्थात, आळशीपणाही आहेच. असो. तर, हे दोन अनुभव प्रवासात आलेले. त्रयस्थ दृष्टीतून पाहताना, बरंच काही शिकवून गेलेले. अनुभवही काही जगावेगळे, महान वगैरे नाहीत, पण अजूनही मनात घोळतात. कधीतरी मधेच आठवतात. इथे लिहावेसे वाटले म्हणून...
(२८ सप्टेंबर २००८)

मनाजोगतं जमत नाहीये असं वाटतंय, मग लिहायलाही अळंटळं, म्हणून तारखा!! किती दिवस लागणार दळण संपायला बघूयात, हा विचार त्यामागे!! :D :P

तर, पुण्याच्या लोहगाव विमानतळावर थांबले होते. नेहमीसारखंच विमान दिल्लीहून उशीरा सुटलं होत, उशीरा पुण्याच्या हवाई अड्ड्यावर पोचणार होतं आणि तिथून नेहमीसारखं उशीरा सुटणारही होतं. एव्हाना आता याची सवय झालेय, थोडंस अंगवळणीच पडलय म्हणाना, आणि मला यात विमान कंपन्यांचीही शंभर टक्के चूक असेल असं वाटत नाही. अर्थात, उद्या सगळा कारभार सुधारला, तर हवंच आहे म्हणा! पण अगदी खूप शिव्या देण्याइतकंही काही नाही हेही खरंच. विमानतळावर एखादी मागची कोपर्‍यातली खुर्ची पकडून, निवांत बसून एकूणच सगळा माहौल निरखण्यात खूप गंम्मत असते. पुन्हा सोबत एखादे आवडणारे पुस्तक असले तर मग कशाला कंटाळा येतोय!!

असो. मूळ मुद्दा सोडून अवांतरच जास्त लिहितेय. :P

तर, त्याही दिवशी अशीच बसले होते विमानतळावर विमान कधी सुटतंय याची वाट बघत. सुरक्षा तपासण्या वगैरेचे सोपस्कार संपले होते. कधी नाही ते गर्दीही नव्हती. अख्खा विमानतळच मस्त, शांत, निवांत वाटत होता. तितक्यात एक चार पाच वर्षांचं पिल्लू आपल्या आई आणि आज्जीसकट आलं. पिल्लाच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्साह आणि उत्सुकता! एकदम हसरा चेहरा, इकडे तिकडे सगळीकडे भिरभिरणारी नजर. एकदम चैतन्याचा स्रोत! पेंगुळल्या, संथ अश्या त्या वातावरणात एकदम काहीशी जान आल्यासारखं झालं, पण आई आणि आज्जी एकदम परीटघडीची इस्त्री छाप!! चेहर्‍यावर आम्ही विमानातनं प्रवास करतो.. असे काहीसे भाव. माझ्या शेजारची एक खुर्ची सोडून बसले. सामान मधल्या खुर्चीवर. हे सामान वगैरे खुर्च्यांवर ठेवणारे लोक म्हणजे जरा अतिच असतात, असं माझं एकूणच निरिक्षणावरुन बनलेलं मत आहे. कधी कधी तर बसायलाही जागा नसते, आणि यांची सामानं बसायच्या जागांवर!! रेल्वे फलाटावरही हे नमुने दिसतील!! तर, मंडळी स्थानापन्न झाली.

पण, छोटुला भलताच गोडांबा होता! एकदम गट्टूकलाल!! सुरुवातीला अगदी छान्या, छान्या मुलासारखं हाताची घडी, तोंडावर बोट असं तिथल्या एका खुर्चीवर बसून झालं, पण तेह्वाही मान जितक्या अंशात फिरु शकते, तितक्या अंशात फिरवून सगळीकडंच निरिक्षण सुरुच होतं. पाचेक मिनिटांतच शहाणपणाचं ओझं पिल्लाला सांभाळणं जरा जडच व्हायला लागलं. हळूच तिरकी नजर आई आणि आज्जीकडे ठेवत खुर्चीतच चुळबुळायला सुरुवात झाली. हळूच खुर्चीतून खाली उडीपण घेऊन झाली! चेहर्‍यावर जरा तरतरीपण आली पिल्लाच्या!
(३ ऑक्टोबर २००८)

वाटलं होतं तसच झालं! काल तर लिहिलंच नाही काही.. तर, श्टोरी पुढे -

मग हळू हळू पिल्लू इकडे तिकडे बागडायला लागलं, गर्दी नसल्यामुळे बागडायला फुल टू स्कोप होता!! पण जसजसं पिल्लू खुलायला लागलं, तसतशी परीटघडीच्या इस्त्र्या नाराजीने विसकटायला लागल्या. मी मनात, आता पिल्लू ओरडा खातय वाटतं, म्हणेपर्यंत पिल्लूने ओरडा खाल्लाच!! ते एकवेळ ठीक आहे, पण इस्त्र्या एकदम इंग्लिशमधूनच सुरु!! आणि ओरडतानापण जी एक आपलेपणाची भावना असते ती काय कुठे दिसतच नव्हती!! म्हणजे पिल्लाला काय एकदम मिठीत घेऊन समजवा, असं म्हणत नाही मी, तसं करायलाही हरकत नव्हतीच खरं तर, पण हे भलतच कोरडं प्रकरण होतं, आणि ते जाम खटकलं. बरं, असाही काही भयानक उच्छाद मांडला नव्हता पिल्लानं, पण त्यातही गंम्मत म्हणजे आई, आज्जी इंग्लिशमधून शिस्त शिकवत होत्या, खरं तर त्याच्या माथी मारत होत्या, आणि पिल्लू शुद्ध मराठीमधून न थकता उत्तरं देत (उलट उत्तरं नव्हे!) त्यांच समाधान करत होतं, स्वतःची बाजू पटवून देत होतं. खूप कौतुक वाटलं मला. शेवटी इस्त्र्या थकल्या आणि गप्प बसल्या. पिल्लू परत एकदा खेळाकडे वळलं.

इतक्यात पिल्लूला एक दुसरं पिल्लू मिळालं खेळायला!! आपल्या आई बाबांबरोबर एक छोटुली गोबरुली आली होती. त्यांचंही विमान बहुधा उशीराच येणार होतं, आणि ही छोटूली एकदम सही होती, आल्या आल्या गट्टूकलालशी दोस्ती करुन इथे तिथे मस्त बागडंबागडीला सुरुवात. खूप धमाल आली त्यांची बागडंबागडी पहायला. इतके मस्त हसत होते खऴखळून! धावत होते, पडत होते, परत उठून नाचत होते! किती मनमोकळं वागत होते! मला चक्क त्या दोघांचा मनापासून हेवा वाटला. नेहमीचे उगीच अतिशय गंभीरपणे वावरणारे मोठया लोकांचे चेहरे पाहण्यापेक्षा हे खूप छान वाटत होतं. मनातल्या मनात मीही त्यांच्याबरोबर रिंगा रिंगा रोझेस... मधे भाग घेतला.

पण, मम्मीची कोरडी शिस्त जरा अतिच कोरडी असावी. तिने लगेच पिल्लूला मी आता डॅडला फोन लावून तुझी तक्रार करतेय, असे सांगितले. मला वाटले, असंच सांगतेय घाबरवायला, पण पिल्लूचा लगेच उतरलेला चेहरा, कावरीबावरी नजर आणि अगदी काकुळतीला येऊन केलेल्या "नक्को ना गं मम्मी.. " अश्या विनंत्या बघून हे खरंच आहे समजेपर्यंत मम्मी डॅडशी फोनवर बोलून अगदी गंभीर स्वरात - अर्थात इंग्लिशमधेच - तक्रार करत होती आणि डॅडने पिल्लूला फोनवर बोलावलं. खरं सांगायचं तर मलापण मम्मीचा एकदम राग आला होता!! बरं, आज्जीने तरी नातवाची जरा बाजू घ्यायची ना?? तेपण नाही!! तीपण इंग्लिश ओरडा देण्यात मग्न!! असली कसली आज्जी??? आता पलिकडून डॅड काय ओरडणार, याची धाकधूक मलाच वाटायला लागली...

"हॅलो डॅडू..." चाचरतच पिल्लू बोललं, आणि बघता बघता पिल्लाचा घाबरा, कोमेजला चेहरा परत फुलायला लागला की!! डॅडूला पिल्लू सगळ्या गंमती जमती सांगत होतं, अश्शी उडी मारली न् तश्शी उडी मारली न् धावलो मी मस्त...!! नवीन मैत्रीण मिळालीय, आणि ती आणि मी कशा उड्या मारुन ढुमाक्कन् (पिल्लूचाच शब्द! ) खालीच बसतोय, मज्जाच येतेय, आपणपण करुयात असं मी आलो की, हेही सांगून झालं!! माझ्या समोरच काही पावलांवर उभं राहून या गप्पा सुरु होत्या. माझी हळूच आईकडे - नव्हे, मम्मीकडे नजर वळली, तीच परीटघडी बघून किंचित खट्टूच व्हायला झालं. आज्जीच्या डोळ्यांत पण फारसं कौतुक दिसत नव्हतं... ये बात तो बिलकुल हजम नै हुई!!

पण, डॅडू आणि पिल्लूचं एकदम गुळपीठ दिसत होतं आणि सगळ्या गप्पा मराठीतूनच चालल्या होत्या. अगदी दिलखुलासपैकी. मस्त वाटलं, अगदी याsssहू करून ओरडावसं वाटलं!!! कोणीतरी पिल्लाशी त्याच्या भाषेत बोलणारं आणि त्याच्या बरोबर ढुमाक्कन् खाली बसणारं पण आहे तर! डॅडूशी गप्पा संपवून गट्टूकलाल परत एकदा खेळात गुंगले. त्याबद्दल अजून दोन तीनदा अस्सखल इंग्लिशमधून ओरडापण खाल्ला. एवढं त्या छोट्याला डांबायची काय गरज त्यांना वाटत होती, मला काहीच कळू शकलं नाही. ज्या छोटूलीबरोबर तो सुखाने खेळत होता, तिच्याशीदेखील त्यांच वागणं बरोबर नव्हतं, ते तर जामच खटकलं, तेवढयात तिच्या आई वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तिला बोलावून घेतलं. काही काही लोकांना दिलखुलास वागण्या बोलण्याचं वावडं असतं का?? इतक्या लहान मुलाच्या मनात मोठेपणाच्या इतक्या तद्दन फालतू अन् खोट्या कल्पना का भरवायच्या?? (त्यांचं आपल्या छोटूशी काय बोलणं सुरु होतं, आणि त्याला जे "समजावणं" सुरु होतं, ते मी ऐकू शकले होते, त्यावरुन हे विधान करतेय. )

तेवढ्यात माझी विमानात चढायची वेळ झाली. मनातल्या मनात छोटूला बेस्ट लक दिलं, मनात आलं, ह्याची हसरी वृत्ती कधीच नाहीशी होऊ नये... मला त्याच्याशी हातही मिळवायचा होता, पण मनातली उर्मी मनातच ठेवली, न जाणो त्याच्या मम्मी, आज्जीला आवडलं नाही तर, म्हणून.... छोटू कसा असेल, असं मनात येतंच कधी कधी अजूनही.

आणि बरोब्बर याउलट दुसरा अनुभव. बंगलोरच्या विमानतळावर बसले होते. अर्धा पाऊण तास वेळ काढायचा होता. एक आई आपल्या लेकीला घेऊन आली. तीन चार वर्षांची भावली एकदम चुणचुणीत होती!! माझ्या समोरच्या खुर्च्यांवर दोघी बसल्या. भावलीही इकडे तिकडे धावत होती. आईचं बरोबर लक्ष होतं, पण भावलीला मनसोक्त बागडायलाही आडकाठी केलेली दिसली नाही. उलट, आईही मुलीबरोबर हसत होती, बसल्या जागेवरुनच लेकीशी संवाद साधत होती, बघायलाही इतकं लोभसवाणं वाटत होतं! खेळून खेळून भावली दमली आणि आईच्या कुशीत शिरुन, तिच्या खांद्यावर मान ठेवून दोन मिनिटांत मस्तपैकी झोपून गेली. ज्याप्रकारे त्या आईने तिला कुशीत धरली होती, तिच्या केसांवरुन इतक्या मायेने हात फिरवत होती... तिची ती लेकीबद्दलची माया, आत्मियता अगदी माझ्यापर्यंत पोचली! एकदम एक उबदार भावना मनात उभी राहिली. ते दृश्य मनात साठवत, खूप समाधानानं मी विमानात चढायच्या रांगेत उभी राहिले. माझ्या त्या दिवसाची सुरुवात ह्या मायलेकींमुळे अगदी मस्त झाली होती!

अनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही! एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, बाकी काही नाही! बरेच दिवसांपासून हे लिहायचं राहून गेलं होतं, खरं तर, लिहू की नको, असं लिहिणं बरोबर आहे की नाही, ह्याची स्वतःच्या मनाशी खात्री होत नव्हती. आज संपलं लिहून.
(६ ऑक्टोबर २००८)

September 13, 2008

गणराज रंगी नाचतो

गणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll
नृत्य करता सकल देव l तटस्त होती ll

नृत्य-गणपती हे भारतीय संगीत आणि नृत्य कलेचे प्रतीक जणू. दक्षिण भारतात, नृत्य गणपतीच्या मूर्ती सापडतात. म्हैसूरच्या हळेबिड येथील होयसलेश्वर मंदिरात (बारावे शतक) नृत्य गणपतीची अत्यंत नयनमनोहर अशी अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या सहा हातांमधे परशू, पाश, मोदक्पात्र, दंत, सर्प आणि कमळपुष्प असून, दोन हात, अनुक्रमे, गजहस्त आणि विस्मयहस्त मुद्रेमध्ये आहेत.*

तंजावूरच्या भेडाघाटच्या मंदिरातही श्रीगणेशाच्या कलात्मक प्रतिमा आहेत. मयूरभंज, ओरिसा येथेही नृत्य गजाननाची अत्यंत मनोहारी अशी मूर्ती आहे. भुवनेश्वर येथे मुक्तेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची निर्मीती सन ८०० ते १०६० च्या दरम्यान झालेली आहे. ह्या मंदिरातही नृत्य गणपतीची अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीमध्ये जी नृत्य मुद्रा साकारलेली आहे, त्यात गजाननाने दोन हात वर करुन, त्या दोन्ही हातांमध्ये सर्पास पकडले आहे, चार हातांत मोदक, कुर्‍हाड, तुटलेला दात आणि कमळ धरलेले आहे. राहिलेले दोन हात भग्नावस्थेत आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सेवक असून डाव्या बाजूचा सेवक झांज तर उजव्या बाजूचा सेवक मृदंग वाजवत आहे.

काशी हिंदू विश्विद्यालयाच्या भारत कला भवनात नृत्य मुद्रेतल्या गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कनोज येथे साधारण आठव्या शतकाच्या आसपास निर्माण केलेली चतुर्भुज अशी नृत्य गणपतीची मूर्ती सापडली असून गजाननाने सर्पयद्नोपवीत (जानवे) धारण केले असून, वाघाची कातडी पांघरलेली आहे. अल्वर येथील संग्रहालयातही तोमरकालीन, गणपतीची नृत्यप्रधान मूर्ती असून तिच्या दोन हातांत सर्प असून, पायांपाशी मूषक आणि गण इत्यादी आहेत. मूर्तीबरोबर जो लेख सापडला आहे, त्यात महालोकस नामक व्यक्तीने विक्रम संवत ११०४ मध्ये (ई. स. १०४४)मध्ये या मूर्तीची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो.

मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरामधून द्विभुज, चतुर्भुज, षड्भुज, अष्टभुज ते षोडशभुज अश्या नृत्यामध्ये मग्न असणार्‍या गणपतीच्या मूर्ती आढळून येतात. लखनौच्या राजसंग्रहालयात, बाराव्या शतकातील गाहवालवंशीय राजांच्या कारकीर्दीत निर्माण झालेली नृत्य गणेशाची मूर्ती त्या काळातल्या मूर्तीकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते.

अश्या ह्या नृत्य निपुण देवतेला मानवंदना म्हणून संगीतज्ञांनी गणेशताल निर्माण केला आहे. तानसेनाच्या संगीत-सार ग्रंथात, तालाध्याय, या अध्यायांतर्गत, ब्रह्मताल, रुद्रताल, विंध्यताल, कंदर्पताल, सिंहताल, जनकताल आणि विष्णूताल या तालांची माहिती आहे, परंतु, गणेशतालाचा उल्लेख आढळत नाही. संगीतज्ञ मानतात, की गणेशतालची निर्मिती संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाच्या नंतर झाली.

ह्या तालाच्या मात्रा २१ व १० भाग आहेत.

भाग : धा ता दिं ता कत तिट धा दिं ता कत
मात्रा: १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

भागः तिट ता धागे दिं ता धागे ता तिट कत गदि गन
मात्रा: ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१


अश्या ह्या नृत्य निपुण देवतेची सेवा म्हणून तानसेनाने ब्रजभाषेत काही धृपद रचना केल्या आहेत, ज्यात श्री गजाननाची स्तुती केलेली आहे.

एकदंत गजबदन बिनायक बिघ्न -बिनासन हैं सुखदाई ll
लंबोदर गजानन जगबंदन सिव-सुत ढुंढिराज सब बरदाई ll
गौरीसुत गनेस मुसक-वाहन फरसा धर शंकर सुवन रिद्ध-सिद्ध नव निद्ध दाई ll
तानसेन तेरी अस्तुत करत काटे कलेस प्रथम बंदन करत द्वंद मिट जाई ll

आणि ही एक, ज्यात तानसेन श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करत आहे,

एकदंत वंत लंबोदर फिरत जाहे बिराजे
गनेस गौरी सुत महा सुनि महिमा सागर
गुरु गन नाथ अविघन राजे l
हेरंब गन दीपक तू ही महातुर,
उग्र तप बट चंद्रमा सों छबिनायक जगत के सिरताजे l
तानसेन को प्रसाद दीजे सकल बुध नव निध के,
सदा दायक लायक जगत के सरे काजे ll

अजून एक गणेश स्तुती,

तुम हो गनपत देव बुधदाता सीस धरे गज सुंड,
जेई जेई ध्यावै तेई तेई पावै चंदन लेप किये भुजदंड
सिद्धेश्वरी नाम तुमारो कहियत जे विद्याधर तीन लोक मध
सप्त दीप नव खंड,
तानसेन तुमको नित सुमिरन सुर-नर-मुनि-गुनि-गंधर्ब-पंडित ll


लंबोदर गजानन गिरिजासुत गनेस एक्-रदन
प्रसन्न बदन अरुन भेस,
नर्-नारी-मुनी-गंधर्ब-किंनर-यक्ष-तुंबर मिली
ब्रह्मा बिष्नु आरत पूजवत महेस l
अष्टसिद्ध नव निद्ध मूषकवाहन बिद्यापति तोहि सुमिरत
तिनको नित सेष,
तानसेन प्रभु तुमही कूँ ध्यावैं अबिघन रुप विनायक रुप
स्वरुप आदेस ll

असा हा सर्व विद्या आणि कलांचा अधिपती असलेला देव. आद्यकवी वाल्मिकी ऋषी गणेशाची स्तुती करताना म्हणतात,

चतु:षष्टीकोटयाख्यविद्याप्रदं त्वां सुराचार्यविद्याप्रदानापदाम् l
कठाभिष्टविद्यापर्कं दंतयुग्मं कविं बुद्धीनाथं कवीनां नमामि ll

अर्थात, हे गणपती, तू चौसष्ठ कोटी विद्या प्रदान करणारा आहेस, एवढेच नाही, तर देवांच्या आचार्यांनाही विद्या प्रदान करणारा आहेस. कठालाही विद्या देणारा तूच आहेस ( कठोपनिषदरुपी विद्येचा दाता) दोन दात असणारा, कवी, असा तू, कवी (बुद्धीमान) जनांच्या बुद्धीचा तू स्वामी, तुला माझे वंदन असो.


संदर्भः १. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.
* मुद्रांविषयी माहिती मिळाली नाही. कोणाला माहित असेल जर जरुर लिहा.

September 11, 2008

गणेश तत्व - परब्रह्मस्वरुप गणेश

परमात्म्याला जाणून घेणे, हेच मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. यस्तन्न वेद किमृचा करिष्यति l असे ऋग्वेदात म्हटले आहे, म्हण़जे जो परमात्म्याला जाणत नाही, तो (फक्त) ऋचा जाणून काय करणार ? वैदिक कालापासून ऋषी मुनींनी सत्याच्या, परमतत्वाच्या रहस्याला जाणून घेण्याचा प्रयास केला आहे.

ऋग्वेदात सांगितले आहे, एकं सत् l - तेच एकमेवाद्वितीय सत्य, तेच अंतिम.

गणपत्यथर्वशीर्षात गणपतीस, एकं सत्, परम तत्त्व, आत्मा मानले आहे - त्वम् साक्षादात्मासि नित्यम् l तोच सर्व जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे, पालनकर्ता आहे. गण हा शब्द समूहवाचक आहे. ह्या समूहाचा पालनकर्ता तो गणपती. आपल्या विशाल उदरात जणू सारे विश्व सामावून घेऊन, धारण करुन तो लंबोदर बनला आहे, पण त्याच वेळी, तो परब्रह्म मात्र कोणातही सामावलेला नाही. सार्‍यांना सामावून घेऊनही तो मात्र निराकार असा सर्वांहून वेगळा असा आहे. ज्ञान आणि निर्वाण पद प्राप्त करुन देऊ शकणारा ईश, म्हणून परब्रह्म. सार्‍या जगाची उत्पत्ती आणि लय त्याच्यातच.

अथर्वशीर्षातही गणक ऋषींनी हे मत मांडलेले आहे,

त्वं वाड्गमयस्त्वं चिन्मयः l त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः l त्वं सच्चिदानंदाद्वितीयोsसि l
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि l त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोsसि ll

तूच वाड्गमय(रुपी) आहेस, तू चिन्मय आहेस -( चित्ते मयः इति चिन्मयः - शब्दशः भाषांतर, जो हृदयात आहे तो, बुद्धीमान् असाही अर्थ ), तू आनंदमय आणि ब्रह्ममय आहेस. तूच सच्चिदानंदरुपी अद्वितीय असा परमात्मा आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू ज्ञान आणि विज्ञानमयी आहेस.

गणपतीला साक्षात आत्मा संबोधून, सत्व, रज, आणि तम या गुणांपलिकडे मानलेले आहे. या गुणांनी युक्त अश्या विश्वाची उत्पत्ती, ऱक्षण आणि शेवटी अंतही, गणेशरुपी आत्म्यात होतो (अनेकत्वातून एकत्व). गणेशपुराणातही गणेशामध्येच सारे जग, सार्‍या देवता आणि मनुष्यगण अविर्भूत आहेत हे सांगितले आहे.

योगशास्त्रातही षट्चक्रांच्या भेदन क्रमात प्रथम चक्रात गणेशाला स्थान दिलेले आहे. अथर्वशीर्षातदेखील गणपती मूलाधारचक्रात नित्य वास करुन आहे याचा उल्लेख आहे - त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यं l याच मूलाधारचक्रावर योगी ध्यान करतात.

ज्ञानेश्वरीतही आदिबीज ॐकार असा गणपतीचा ज्ञानेश्वर माऊलींनी उल्लेख केलेला आहे.

अकार चरण युगुल l उकार उदर विशाल ll
मकर महामंडल l मस्तकाकारें ll
हे तिन्हीं एकवटले l तेथे शब्दब्रह्म कळवळले ll
तें मियां गुरुकृपे नमिले l आदिबीज ll

ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला ॐ कार स्वरुप मानून, त्याच्या आत्मस्वरुपाचे (गणेश तत्त्व) ज्ञान केवळ स्वानुभावाने होऊ शकते असे प्रतिपादन केले आहे.

ब्रह्मवैवर्तपुराणात गणपतीच्या परब्रह्मस्वरुपाची (आत्मरुपाची) स्तुती करताना श्रीविष्णूने म्हटले आहे,

ईश त्वां स्तोतुमिच्छामि ब्रह्मज्योति: सनातनम् l
निरुपितुमशक्तेsहमनुरुपमनीहकम् ll
त्वां स्तोतुमक्षमोsनन्त: सहस्त्रवदनेन च l
न क्षमः पंचवक्त्रश्च न क्षमश्चतुराननः ll
सरस्वती न शक्ता च न शक्तोsहं तव स्तुतौ l
न शक्ताश्च चतुर्वेदा: के वा ते वेदवादिनः ll

हे ईश, सनातन ब्रह्म ज्योतीस्वरुप अश्या तुझे स्तवन मी करु इच्छितो, पण तुझ्या रुपाचे यथार्थ वर्णन करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे. शेषही आपल्या सहस्त्र मुखांनी तुझी स्तुती करण्यास असमर्थ आहे. (तुझे आत्मस्वरूप ओळखून) तुझी स्तुती करण्यास पंचमुख महेश्वर, चतुर्मुख ब्रह्मा हे ही असमर्थ आहेत; देवी सरस्वतीचीही (तुझ्या रुपाची) स्तुती करण्याची शक्ती नाही,ना माझी. वेदही तुझ्या रुपाची यथार्थ कल्पना करण्यास समर्थ नाहीत, मग ते म्हणणार्‍यांची/ मानणार्‍यांची काय कथा??

संदर्भ: १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर ३. विकिपिडिया

September 9, 2008

श्रीगणेशाची निर्गुण आणि सगुणोपासना

सृष्टीच्या आरंभापासून माणूस, आत्मा-परमात्म्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या रहस्याची उकल करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न तो पूर्वीपासून करत आला आहे. वैदिक कालापासून अनेक ऋषी मुनींनी, त्तववेत्त्यांनी हे रहस्य उकलून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ऋचा, स्तोत्रे इत्यादी रचून सृष्टीचा पसारा उकलण्याची आणि इतरांना उकलून दाखवण्याची धडपड केली आहे.

उपनिषदांमध्ये सांगितले आहे की सृष्टी अनेक रुपांनी नटण्याआधी केवळ सत्य - 'सत्' अस्तित्वात होते. हेच एकमेवाद्वितीय परब्रह्म आहे, सतत चैतन्यदायी, निर्विकार आणि अद्वितीय असे हे सत् स्वयंप्रकाशी, नित्य शुद्ध, निरहंकार आणि कालातीत आहे. प्रथमतः त्याला ना आकार होता, ना विकार. ह्या एकातून अनेकत्वाची भावना उदयास आली. एकोsहं बहु स्यां प्रजायेय l - अर्थात, मी एक आहे, अनेक होईन. या स्फुरणाबरोबर, ते एकमेवाद्वितीय सत्यच परब्रह्म गणेशरुपात प्रकट झाले - गणेशौ वै सदजायत तद् वै परं ब्रह्म l


गणेशपूर्वतापिन्युपनिषदात म्हटले आहे,

सोsपश्यदात्मनाssत्मानं गजरुपधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं यतो वा इमानि भूतानि जायन्ते यतो वाssयन्ति यतैव यन्ति च l तदेतदक्षरं परं ब्रह्म l एतस्माज्जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च l खं वायुरापो ज्योति: पृथिवी विश्वस्य धारिणी l पुरुषं एवेदं विश्वं तपो ब्रह्म परामृतमिति l

अर्थात, त्या सत् ने स्वतःस धवल वर्ण, गजमुख, (आणि ) चतुर्भुज अश्या रुपात पाहिले; ज्यातून पंच महाभूतांची उत्पत्ती होते, सर्वांना स्थिती आणि लय प्राप्त होते, तेच हे अक्षर, हेच परब्रह्म आहे. ह्यातूनच प्राण, मन आणि इंद्रियांची उत्पत्ती होते. ह्यातूनच आकाश, वायू, जल, तेज आणि सगळ्या विश्वाला धारण करणारी पृथ्वी, हे सारे उत्पन्न होते. हाच तो आदिपुरुष, हेच परब्रह्म, हेच गणेशाचे सच्चिदानंदस्वरुप.


श्री गणेशाचं निर्गुण रुप वर्णन करणार्‍या गणेशोत्तरतापिन्युपनिषदातील या काही ऋचा/मंत्र पहा,

तच्चित्स्वरुपं निर्विकारम् अद्वैतं च l - तोच चिद्रूप, निर्विकार, एकमेव आहे.

आनन्दो भवति स नित्यो भवति स शुद्धो भवति स मुक्तो भवति स स्वप्रकाशो भवति स ईश्वरो भवति स मुख्यो भवति स वैश्वानरो भवति स तैजसो भवति स प्राज्ञो भवति
स साक्षी भवति स एव भवति स सर्वो भवति स सर्वो भवतीति l

अर्थात, (तोच गणेश ) आनंदस्वरुप आहे, तोच नित्य, शुद्ध, मुक्त असा स्वयंप्रकाशित आहे, तोच ईश्वर आणि प्रमुख आहे. तोच अग्नि, तेज आणि प्राज्ञ (बुद्धिमान्) आहे. तोच सर्वसाक्षी आहे, तोच तो (परब्रह्म) आहे, आणि तोच सर्व आहे, सर्व काही आहे.


न रुपं न नामं न गुणं l स ब्रह्म गणेशःl स निर्गुणः स निरंहकारः स निर्विकल्पः स निरीहः स निराकार आनंदरुपस्तेजोरुपमनिर्वाच्यप्रमेयः पुरातनो गणेशः निगद्यते l

तो अरुप (रुप नसलेला), ना त्याला नाव ना गुण. तोच ब्रह्मरुपी गणेश होय. तो निर्गुण, निरहंकारी, निर्विकल्प, निरीह, निराकार आनंदरुपी, तेजोमय, अनिर्वचनीय आणि परमपुरातन असा कालातीत गणेश आहे.

ओमित्येका़क्षरमं ब्रह्मेदं सर्वम् l तस्योपव्याख्यानम् l सर्वं भूतं भव्यं भविष्यदिती सर्वमोंकार एव l एतच्चान्यच्च त्रिकालातीतं तदप्योंकार एव l सर्वं ह्येतद्गणेशोsयमात्मा ब्रह्मेति l

ॐ हे एकाक्षररुपी ब्रह्मच आहे. त्याची व्याख्या आहे. भून, भविष्य, वर्तमान - सर्व ओंकारस्वरुपच आहे. त्रिकालस्वरुप, आणि त्रिकालातीत, सर्व ओंकारमयच आहे. तेच ओंकाररुप ब्रह्म, हा गणेश आहे.

अथर्वशीर्षातही त्वं सच्चिदानंदाद्वितियोsसि l असे वर्णन आहे.

ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचे वर्णन करताना म्हटले आहे,

ॐ नमो श्रीआद्या l वेद प्रतिपाद्या l जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा l देवा तूचि गणेशु l
सकलमति प्रकाशु l

ॐकार स्वरुपाचे ध्यान करणे हीच निराकार परब्रह्म अश्या श्री गजाननाची एकाक्षरी नामस्वरुप निर्गुणोपासना आहे.

ज्या साधकांना निर्गुणोपासना जमत नाही, त्यांच्यासाठी सगुणोपासना आहे. सगुणोपासनेत मूर्तीपूजा अंतर्भूत आहे. निरनिराळी स्तोत्रं, प्रार्थना आहेत. उपास्य मूर्तीचे अनेक प्रकार असून, पूजनचा विधीही वेगवेगळा असतो. यात सात्विक, तथा तंत्रमार्गातल्या उपासनांचाही समावेश आहे. द्विभुज ते अठरा बाहू असलेल्या आणि एकमुखी गजाननापासून दशमुखी गजाननाच्या मूर्ती पूजेत आढळतात. झालच तर वेगवेगळी व्रतं आहेत. ह्या अतिरिक्त स्थानागणिक आणि पंथागणि़क व्रताचार, पूजापद्धतीही बदलते.

कर्ममार्गाने उपासना करणारे गणेशयाग करतात. यज्ञविधी करुन, गणेशयंत्राची विधीवत् स्थापना करुन हवन केले जाते. यज्ञामधे हविष्यान्याची आहुती देऊन, मंत्रजप केला जातो. जप, हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मणभोजन हे सारे प्रकार यात मोडतात.

अश्या प्रकारे, व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्याला जी योग्य वाटेल, रुचेल ती उपासना यथाशक्ती करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संस्कृतीत आहे. ही संस्कृती अनेकरुपा आहे, आणि तरीही तिचा गाभा एकत्वाचा आहे. मनाला रुचेल अशी कोणतीही उपासना श्रद्धेने केली तर तिचा स्वीकार झाल्याशिवाय राहत नाही.

गणेशगीतेत म्हटल्याप्रमाणे,

येन येन हि रुपेण जनो मां पर्युपासते l
तथा तथा दर्शयामि तस्नै रुपं सुभक्तितः ll

अर्थात, लोक (भक्त) ज्या ज्या रुपामध्ये माझी उपासना करतात, त्यांच्या उत्तम भक्तीने प्रसन्न होऊन मी त्यांना त्या त्या रुपामध्ये दर्शन देतो/ देईन.

संदर्भ: १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

September 7, 2008

विराणी

कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;

क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्वाचे गुंजन;

कशास होतो जीव घाबरा,
भवताली भरला ना मेळा?

भासे मृगजळ,कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण;

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;

जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर;

मौनामध्ये दु:ख लपेटूनी,
खुळा जीव शोधे सांगाती;

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

September 5, 2008

गाणपत्य संप्रदाय

हिंदू धर्मात प्रामुख्याने पाच संप्रदाय आढळतात. सौर, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव. सौर संप्रदायाचा अधिपती सूर्य, गाणपत्य संप्रदायाचा अधिपती गणपती, शाक्त संप्रदायाची अधिपती शक्ती, शैव संप्रदायाचा अधिपती शिव आणि वैष्णव संप्रदायाचा अधिपती विष्णू मानला गेला आहे.

श्रीगणेशाची प्रामुख्याने आराधना करणारे ते गाणपत्य. या संप्रदायात सहा पंथ असल्याची नोंद आनंदगिरिंच्या शांकर दिग्विजय या काव्यात सापडते. हे सहा पंथ आणि यांच्या उपास्य दैवताची नावे अशी,

१. महा - दैवत महागणपती
२. हरिद्रा - दैवत हरिद्रागणपती
३. उच्छिष्ट - दैवत उच्छिष्टगणपती
४. नवनीत - दैवत हेरंबगणपती
५. सुवर्ण - दैवत सुवर्णगणपती
६. संतान - दैवत संतानगणपती

गाणपत्य गणपतीस परब्रह्म मानून इतर दैवतांना त्या परब्रह्माचा अंश मात्र मानतात, आणि हा संप्रदाय वामाचाराचा अवलंब करतो, अशीची नोंद या काव्य ग्रंथात आढळते. श्री शंकराचार्यांच्या अद्वैतमताच्या प्रभावाखाली हा पंथ आल्याने आणि वामाचारी पूजा पद्धतीबद्दल लोकमानसांत असलेल्या समज - गैरसमजांमुळे ह्या पंथाची वाढ होऊ शकली नाही, असे काही संशोधकांचे मत आहे. गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते व वैदिक धार्मिक विधींमध्ये इतर ब्राह्मणांसोबत त्यांना बसू देऊ नये अशीही प्रवृत्ती होती. आद्य श्री शंकराचार्यांनी प्रचलित केलेल्या पंचायनत पूजेनंतर हे आपापसातील मतभेद कमी झाले, असे मत संशोधक मांडतात. गाणपत्य संप्रदायाचा उदय पाचव्या शतकानंतर आणि नवव्या शतकाअगोदर झाला, असे मत संशोधकांनी नोंदवले आहे. ह्या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणजे गणेश पुराण.


श्रीमत्कृष्णानंद आगमवीश (१६ व्या शतकातील बंगालमधले कवी) यांनी आपल्या 'तंत्रसार' या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या गणेश स्तोत्रात, गणपतीस ब्रह्मतत्व, आद्यदेव मानले आहे. या ग्रंथात, विभिन्न गाणपत्य संप्रदायांविषयी आणि महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या उपासना पद्धती, मंत्र, ध्यान व पूजा पद्धती यांचे वर्णन सापडते.

तंत्रसार ग्रंथात महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या रुपाचे वर्णन आले आहे.

महागणपती - गणपतीची दोन प्रकारची ध्यानरुपे आहेत. एक, दशभुज आणि अरुणासमान रक्तवर्ण असलेला, आणि दुसरा, गौरवर्णीय आणि चतुर्भुज. सर्वांगी हा रत्नभूषणांनी आभूषित असून ह्याच्या मस्तकातून सतत मद वाहत असतो.

ह्या गणपतीच्या ध्यान स्वरुपाचे वर्णन करताना कवि म्हणतात,


श्री महागणपतीचे मुख श्रेष्ठ हत्तीचे आहे. त्याच्या भालप्रदेशावर अर्धचंद्र विराजित असून, त्याची देहकांती अरुणवर्ण आहे. हा गणेश त्रिनयन असून, त्याची परमप्रिया हातात कमळ धारण करुन त्याच्या मांडीवर बसली असून तिने अतिशय प्रेमाने गणेशाला अलिंगन दिलेले आहे. आपल्या दहा भुजांमधे गणेशाने क्रमशः दंड, गदा, धनुष्य, त्रिशूल, चक्र, पद्म, पाश, उत्पल, धान्याच्या ओंब्या, स्वतःचा तुटलेला दात व रत्नकलश धारण केला आहे. रत्नकलशातल्या रत्नांची वृष्टी आपल्या साधकांवर करुन आपल्या साधकांना तृप्त करणार्‍या, अश्या गणपतीचे पूजन आम्ही करतो.

ह्या गणपतीचे ध्यान करण्यासाठी अठ्ठावीस, बारा व अकरा अक्षरी मंत्र आहेत.

हेरंबगणपती - तंत्रसार ग्रंथात, हेरंबगणपतीचीही दोन रुपे सांगितली आहेत. एक, चतुर्भुज, रक्तवर्णीय, तीन डोळे असणारा. आपल्या चार भुजांमध्ये त्याने क्रमशः पाश, अंकुश, कल्पलता (वेल) आणि आपला दात धारण केला आहे.

दशाक्षरी मंत्राने ह्या गणपतीचे ध्यान केले जाते.

दुसर्‍या रुपाप्रमाणे, तो पंचमुखी - पाचही मुखे हत्तीची असून दशभुज आहे. चार मुखे चार दिशांना आणि एक उर्ध्व दिशेस आहे. या मुखाचा रंग मोतिया वर्णाचा असून, बाकीच्या मुखांचा वर्ण सोनेरी, निळा, धवल आणि लाल रंगाचा (कुंकुमवर्ण) आहे. प्रत्येक मुखाला तीन डोळे असून, कपाळावर चंद्रमा विलसित आहे. त्याच्या देहाची कांती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून, तो बलवान् आहे. सिंहावर आरुढ असून, दोन हात क्रमशः वर आणि अभयमुद्रा दाखवतात. बाकीच्या हातांमध्ये मोदक, दंत, लेखणी, मस्तक, माला, मुद्गल, अंकुश आणि त्रिशूल धारण केलेला आहे.

ह्या रुपाची साधना चार अक्षरी मंत्राने केली जाते.

हरिद्रागणपती -ह्या गणपतीच्या ध्यान मंत्रात वर्णन केल्याप्रमाणे, हा गणपती पीतवर्णीय असून चतुर्भुज आहे. हळदीने माखलेले वस्त्र त्याने धारण केले असून आपल्या चार भुजांमध्ये पाश, अंकुश, मोदक आणि दात धारण केला आहे.

एकाक्षरी मंत्राने ह्याची उपासना केली जाते.

उच्छिष्टगणपती - तंत्रसारातल्या वर्णनानुसार, हा गणपती रक्तवर्णी, चतुर्भुज, तीन डोळ्यांचा असून, त्याचं मस्तक जटामंडित असून, मस्तकावर चंद्र विराजमान आहे. रक्तवर्णी वस्त्रे परिधान केलेली असून, रक्तवर्णी कमळाच्या आसनावर तो बसला आहे, चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आहे. उजव्या बाजूचा वरचा हात वरमुद्रा दाखवत असून, खालच्या हातात दात पकडलेला आहे. डाव्या बाजूचा वरील हातात पाश तर खालच्या हातात अंकुश आहे. नाना प्रकारचे अलंकार त्याने धारण केले आहेत.

उपासनेचा मंत्र दशा़क्षरी आहे.

तंत्रसारात म्हटल्याप्रमाणे या गणपतीचे पूजा विधान साधकाने उष्ट्या मुखाने आणि अशुचि अवस्थेत करावे. साग्रसंगीत पूजा करण्याची आवश्यकता नसून, मानसिक जप केला तरी चालते.

गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार, साधकाने निर्जन अश्या ठिकाणी, वनात बसून, रक्तचंदनाने माखलेला तांबूल खाताना या गणपतीची साधना करावी, तर भृगू मुनींच्या मतानुसार आराधना करताना फळे खाता खाता जप करावा. अजून एका मतानुसार मोदक खाताना जप करावा.

उच्छिष्टगणपतीचे उपासक कपाळावर तांबडा टिळा लावतात.

सुवर्ण गणपती व संतान गणपती ह्यांच्या उपासकांची पूजा पद्धत साधारण वैदिक पूजा पद्धतीशी साम्य सांगणारी आहे.

गाणपत्यांसाठी गणपती हे परम दैवत आहे, साक्षात जीवनाचा स्वामी, यासाठी त्याचे पूजन सर्वांआधी.

आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्चैव महेश्वरी l
वायो: सूर्यः क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः ll

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

September 4, 2008

वेदांतील गणेशाचे स्थान

प्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे. प्राचीन काळात वेदांमधेही गणपतीची स्तुती करणारे, स्तवनपर मंत्र रचलेले आढळतात.

ऋग्वेदामध्ये गणपतीला बृहस्पती, वाचस्पती आणि ब्रह्मणस्पती या नावाने संबोधलेले आहे. ब्रह्मणस्पतीस ऋग्वेदात महत्वपूर्ण स्थान असून, त्याला सर्व मांगल्याचे परम निधान, सर्व ज्ञानाचा निधी, सर्वश्रेष्ठ देव आणि सर्व वाड्गमयाचा अधिष्ठाता आणि स्वामी मानलेले आहे. अकरा सूक्तांमधे ब्रह्मणस्पतीची स्तुती रचलेली असून, त्याची कृपादृष्टी आपल्यावर रहावी म्हणून मंत्र रचलेले आहेत.

उदाहरणार्थः

ब्रह्मणस्पतये त्वमस्य यन्ता सूक्तस्य तनयं च जिन्व l
विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद् वदेम विदथे सुवीरा: ll

अर्थात, हे मंत्र सूक्तांच्या अधिपती, तूच या जगाचा पालक, शास्ता आहेस, मी/ आम्ही रचलेले हे (तुझ्या स्तुतीपर) सूक्त जाणून घे (मान्य कर) आणि माझ्या/ आमच्या संततीला प्रसन्नता प्रदान कर. तुझ्यासारखे देव ज्यांचे रक्षण करतात, त्यां सर्वांचे सतत भलेच होते. आम्ही या जीवनात (जीवन यज्ञात ) सुंदर, सुदृढ पुत्र पौत्रांसहीत तुझी स्तुती, गुणगान करतो.

अश्या ह्या ब्रह्मणस्पतीची कृपादृष्टी विद्या मिळवून देते आणि विघ्नांचा नाश करते, हे सांगताना ऋषी म्हणतात,

न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न द्वयाविनः l
विश्वा इदमस्माद् ध्वरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि ब्रह्मणस्पते ll

अर्थात, हे ब्रह्मणस्पते, तू ज्यांचं रक्षण करतोस, त्यांना कोणत्याही प्रकारचे दु:ख किंवा त्रास अथवा पीडा होत नाही. शत्रू त्यांची कुठेही हिंसा करु शकत नाही, (एवढेच नाही तर), त्यांच्या कार्यांमधे कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांना बाधू शकत नाही. सर्व त्रासांपासून, हे ब्रह्मणस्पते, तू आपल्या भक्तजनांचे सदैव रक्षण करतोस.

तद्देवानां देवतमाय कर्त्वमष्नथ्नन् इळहासव्रदन्त वीळिता l
उद् गा आजदभिनद् ब्रह्मणा वलमगूहत्तमो व्यचक्षयत्सवः ll

सर्व देवांमधे श्रेष्ठ असा जो देव ब्रह्मणस्पती, कठीण असे पर्वत आपल्या बलाने विदीर्ण करु शकतो आणि जे काही कठोर आहे त्याला कोमल बनवू शकतो. ज्ञानरुपी प्रकाशाचं वरदान देऊन आणि आपल्या वाग् रुपिणी शक्तीच्या सहायाने अमंगल आसुरी शक्तींचा/ प्रवृत्तींचा नाश करुन, अज्ञानरुपी अंधकार दूर करतो.

ऋग्वेदात गणपतीला आदिदेव मानले आहे - सर्वप्रथम उत्पन्न झालेला आणि अक्षरसमूहांचा पालक, स्वामी. गणपतीची उत्पत्ती कशी झाली ह्याचे वर्णन पहा,

बृहस्पति: प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् l
सप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत्तमांसि ll

(सर्व संसाराचा स्वामी) बृहस्पती, परम व्योमरुप शक्तीच्या महान तेजापासून* सर्वप्रथम उत्पन्न होऊन सात स्वररुपी मुख/मुद्रा धारण करुन, आणि सप्तरश्मी वा सात वर्णांची विविध रुपं ( अ, क, च, ट, त, प, य) धारण करुन नादरुपाने अज्ञानरुपी अंधार दूर करतो.

*गणेशपुराणात गणपतीला गौरीतेजोभू: म्हटले आहे. ऋग्वेदात वर्णन केलेली व्योमरुप शक्ती म्हणजेच भगवान शिवाची शक्ती- चित् शक्ती वा चित्कला.

ॠग्वेदात, अमंगल, अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि यज्ञाचे रक्षण करण्यासाठी गणपतीला आवाहन केलेलेही आढळते.

चत्तो इतश्चत्तामुतः सर्वा भ्रूणान्यारुषी l
अराय्यं ब्रह्मणस्पते ती़क्ष्णशृंड्गोदृषन्निहि ll

अर्थात, ही अलक्ष्मी ह्या लोकातून (पृथ्वी) तसेच त्या लोकातूनही (स्वर्ग) नष्ट होवो, जी समस्त अंकुरांना (भ्रूण), औषधींना नष्ट करते. हे तीक्ष्णदंत ब्रह्मणस्पते, तू ह्या अलक्ष्मीचा नाश कर.

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll

हे ब्रह्मणस्पती! तू देवाधिदेव - गणपती असून कवींमधे / विद्वानांमधे सर्वश्रेष्ठ असा कवी आणि विद्वान आहेस. तूच ब्रह्म अर्थात अन्न, आणि उत्तम कर्मांचा रक्षणकर्ता आहेस. हे ज्येष्ठराज*, आणि मंत्रसमूहाचा (असा तू जो ) स्वामी, मी तुझे आवाहन करत आहे. आम्ही केलेली स्तुती ऐकून (मान्य करुन), आमच्या ऱक्षणार्थ, आम्ही करत असलेल्या यज्ञात उपस्थित रहा.

*सर्वात आधी उत्पन्न झालेला, सर्वांपे़क्षा ज्येष्ठ, देवतांचा राजा ह्या अर्थाने.

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपती हा रुद्राच्या गणांचा अधिपती आहे (रुद्रस्य गाणपत्यम्) हे सांगणारा संदर्भ आहे. वैदिक वाड्गमयांत गण हा शब्द लोक, देव आणि मंत्रसमूहाला उद्देशून वापरलेला दिसतो. त्यांचा अधिपती तो गणपती.

गणानां पति: गणपति: l
महत्तत्त्वगणानां पति: गणपति: l
किंवा, निर्गुणसगुणब्रह्मगणानां पति: गणपति: l

गणेश याही शब्दाचा अर्थ आहे - जो समस्त जीवांचा ईश अथवा स्वामी आहे.

गणानां जीवजातानां यः ईशः -स्वामी स गणेशः l

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपतीची वेगवेगळ्या नावांनी स्तुती केलेली आढळते. उदाहरणासाठी हे मंत्र पहा :

नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरुपेभ्यो विश्वरुपेभ्यश्च वो नमः ll

शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहितेतला,

गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे, निधिनां त्वा निधिपती हवामहे l
वसो मम ll
आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् ll

हा एक प्रसिद्ध मंत्र असून अश्वमेध यज्ञात गणपतीचे आवाहन करण्यासाठी ह्या मंत्राचा विनियोग करण्यात येत असे. या मंत्राचा साधारण अर्थ असा, हे माझ्या जिविताचे रक्षण करणारा असा तू ईश्वर, सर्व गणांचा असा तू स्वामी, तुझे आम्ही आवाहन करतो. सर्व प्रियांचा प्रिय अधिपती, आणि सर्व निधींचा निधीपती आम्ही तुझे आवाहन करतो. तू सर्व ब्रह्मांडरुपी गर्भाचा पोषणकर्ता आहेस, मलाही (तुझ्या कृपेने) प्रजारुपी गर्भाचा पोषणकर्ता बनू दे.

कृष्ण यजुर्वेदात मैत्रायणी संहितेत गणेशाचे गायत्री मंत्र आढळतात.

तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l
तन्नो दन्ती प्रचोदयात् ll

अथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष तर प्रसिद्धच आहे व आजही गणपतीच्या पूजापाठात त्याचा विनियोग होतो. गणपतीबद्दल प्रचलित लोकश्रद्धा लक्षात घेऊन, अथर्ववेदांतर्गत गणपतीच्या स्तुतीपर चार उपनिषदे रचली गेली.

गणपत्युपनिषद् (अथर्वशीर्ष ) - रचयिता गणक ऋषी
हेरंबोपनिषद् - स्वतः भगवान् श्रीशंकराने पार्वतीला सांगितले.
वरदा पूर्व - रचयिता याज्ञवल्क्य ऋषी
उत्तर तापिनी उपनिषद् -रचयिता रुद्र ऋषी

ह्या उपनिषदांमधून श्री गणेश रुपाचे वर्णन (अथर्वशीर्ष - एकदंतं चतुर्हस्तं..) आणि त्याची स्तुती केलेली आहे. गणेशाचे तेजस्वी रुप, त्याची कुशाग्र बुद्धी आणि त्याचे सर्व प्राणिमात्रांवरील आधिपत्य मान्य करुन गणपती नेहमीच आपल्या बुद्धीला सन्मार्गावर राहण्याची प्रेरणा देवो यासाठी त्याची प्रार्थना केलेली दिसते.

वेदांगातही गणेशोपासनेचा उल्लेख सापडतो. वैदिक कालापासून गणपतीची उपासना भारतवर्षात सुरु होती व यज्ञयागातही गणपतीला मानाचे स्थान होते असे दिसते.

असा हा पूर्वीपासून जनमानसात रुजलेला गणपती. आदौ पूज्यो विनायकः - ह्या उक्तीनुसार सर्व शुभकार्यांरंभी अग्रपूजेचा मान मिळालेलं हे दैवत आजही तितकच लोकप्रिय आहे.

असा हा ओंकारस्वरुपी, सार्‍या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता आणि पालनकर्ता तुम्हां आम्हां सर्वांचं सतत रक्षण करो!

वेदांविषयी काही माहिती इथे मिळेल.

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

August 31, 2008

माझं गणेशोत्सवातलं लिखाण

गणपतीच्या दिवसांत, मायबोलीवरही ई - गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी, गणेशोत्सव संयोजक समितीने काही लिहिणार का विचारले आणि मीही होकार दिला. ज्या प्रकारचे लेखन करायचे होते, त्याची रुपरेखा डोक्यात तयार होती आणि आंतर जालावर खूप माहिती उपलब्ध असेल, असा मला जालावर तपासून पाहण्याआधीच आत्मविश्वास होता, अन् जालावर भक्तीही!! :D

जेह्वा शोधायला सुरुवात केली, तेह्वा मात्र मी दिवसागणिक मी जरा हिरमुसली आणि मग, मग नर्व्हस होत गेले!! मनासारखं काही मिळेना! कदाचित माझंही चुकलं असावं काही बघताना! कोणास ठाउक! असो. शेवटी, जालावरची माहिती पुरेशी नाही या निष्कर्षापर्यंत येऊन पोचले. आपली कागदवाली पुस्तकंच खरी शेवटी!! - आणि तो नवीन पुस्तकांचा वास! अहाहा! - आणि मधे एकदा पुण्यालाही जाणार होतेच, त्यामुळे एवढी चिंता नव्हती. गणपतीवर पुस्तक भांडार असेल अप्पा बळवंतांकडे, याची खात्री होती!! वाचायला, अभ्यास करायला बरच काही मिळणारच होतं, शेवटी विद्येच्या माहेरघरी नाही मिळणार तर कुठे?? पण, सुरुवात तरी निराशाजनकच झाली. म्हणजे पुस्तकं होती भरपूर, पण स्तोत्रं, पुराणं अशी, किंवा मग पुराणातल्या कथा, गणपतीची स्थळं वगैरे. आता? आणि बाकीची कामंही होतीच की इतक्या दिवसांनी घरी गेल्यावर!! त्यामुळे अमुक एका वेळातच शोधकार्य आटपतं घ्यायचं होतं.

पण, अप्पा बळ्वंतांकडे जायचा मोठ्ठा फायदा म्हणजे जुनी पुस्तकं, जी पुनर्प्रकाशित होत नाहीत - आणि हवी ती माहिती नेमकी त्यांतच असते!! - त्यांची नावंही दुकानदारांना माहित असतात!! तुम्हांला त्या पुस्तकाबद्दल खरच कळकळ आहे असं जाणवलं तर ते तुम्हांला ते पुस्तक कुठे मिळू शकतं हेपण ते सांगतात. तुम्हीं तिथे नेहमी जात असाल, पुस्तकांबद्दलच तुमचं प्रेम त्यांना माहित असेल तर तुमचं चक्क हसून स्वागतही करतात, अगदी अप्पा बळवंतवरचे असले तरीही!! :D

तर, त्या दिवशी अप्पा बळवंतवरचं प्रत्येक दुकान मी चढले आणि उतरले!! शेवटी बाप्पालाच साकडं घातलं, "म्हटलं हे रे काय बाप्पा?? एवढी पण मदत नाही का रे करणार तू??" आणि शेवटच्या दुकानात शिरले. तिथं दुकानाचं नूतनीकरण सुरु होतं मनात म्हटलं, होतय की नाही काम इथे बाप्पाच जाणे!! कारण, सगळं काही बासनात गुंडाळून वरच्या माळ्यावर टाकलेलं दिसत होतं, पण, खूप बरही वाटलं! चक्क पुस्तकाच्या दुकानाचं नूतनीकरण!! म्हणजे दुकान चांगलं चालतंय म्हणायच!! वा, वा!! :) दुकानात शिरुन मला कश्या प्रकारचं पुस्तक हवं आहे ते दुकानदार काकांना सांगितलं. त्यांनी काही पुस्तकं माझ्यासमोर टाकली. ती सगळी मी आधीच पाहिली आहेत, आणि अशी नको आहेत, म्हटल्यावर, म्हणाले, "मग १५ -२० मिनिटं थांबतेस का, आता माझा मुलगा आला बाहेरुन, की वर काही आहेत, त्यापैकी काढून द्यायला सांगतो."


मी थांबले, आणि त्या १५-२० मिनिटांत दुकानात शिरलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक!! १५-२० मिनिटांनी त्यांचा मुलगा आला, आणि शेवटी मला हवं होतं तस एक पुस्तक मिळालं. लग्गेच घेऊन टाकलं!! दुसरं, गणेशकोष, आता मिळत नाही, पण पुणे मराठी ग्रंथालयात किंवा भांडारकरला मिळेल, हेही सांगितलं. पुणे मराठीला गणेशकोष सापडला. काय अफाट संकलन आहे त्या पुस्तकात!!


शेवटी बाप्पाला माझी दया आलीच होती तर!!


तर, दोन्ही पुस्तकांच्या आधारे, हे काही लेख लिहिले. अश्या प्रकारचं लेखन पहिल्यांदाच केलं, श्रीगणेशाच केला म्हणा ना!! तेच हे लेख इथे पुढच्या पोस्टपासून टाकणार आहे.


गोड मानून घ्या ही विनंती.

August 30, 2008

कवितांचा खो खो

संवेद आणि मंडळींचा कवितांचा खो वाचत होते. किती सुरेख कविता उतरवताहेत सगळे! वाचताना सुद्धा इतक छान वाटतं! सगळ्यांना या नेक कामाबद्दल खूप मनापासून धन्यवाद.

खरं तर आता वाचन खूपच कमी झालय - खरं तर बंदच - याची खूप खंत आहे, त्यामुळे मनातून एकीकडे स्वतःलाही खो मिळावा असं वाटत असताना तो मिळण्याची भीतीही होती मनात. मिळाल्यावर पटकन् लिहायला कविता आठवयाला हवी, लिहायला वेळ मिळायला हवा... वाचन कमी झालं की अशीही भीती वाटते दोस्तहो..... हसू नका :( आणि, आवडणार्‍या कवितांमधे डावं उजवं तरी कसं करायच? ते आणखीनच कठीण काम!!

हल्ली ब्लॉगवर येणंही कमीच झालय. कामाचा हिमालय, दुसरं काय?? :( मात्र, एक आवडतं कामही करतेय, ते लवकरच वाचायला मिळेल मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या ई -गणेशोत्सवात :) असो, विषयांतर नको. तरी सुदैवाचा आणि महत्वाचा भाग असा की शब्ददेखण्या आणि अर्थगर्भी कवितांची मराठी सारस्वतात काहीच कमी नाही. आपल्याला फक्त आवडलेली कविता ब्लॉगवर उतरवण्याचं काम!! ते एक बरं आहे!! :D


तर, विशाखाने मला खो दिल्याबद्दल तिचे खूपच आभार. असं, खो वगैरे मिळाला की ब्लॉगविश्वात आपली दखल घेतली जातेय वगैरे वाटून मला एकदम सही वाटायला लागतं!! विशाखा, इथे दोन कविता पोस्ट करतेय, पण दोनच कविता पोस्ट करायच्या हा खूप अन्यायकारक आणि जाचक नियम आहे!! संवेद, प्लीज नोट! :D पण, तो का घातलायस, हे आलं थोड फार ध्यानात. 'घेता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था! हा खो सुरु केल्याबद्दल आभार.

नंदन, माझं स्वतःचं पोस्ट नाहीय, पण ही नवीन पोस्ट टाकली पहा :) गोड मानून घे

तर, ह्या कविता, पटकन् आठवलेल्या.

राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

कितीतरी
आवडणार्‍या कविता इथे लिहायचा मोह होतोय!! एक वेगळा ब्लॉग उघडावा लागेल आता त्यासाठी!! :P

ही अजून एक, इंदिरा संतांची. एखादी व्यक्ती किती अलवार लिहू शकते याला काही मर्यादा??

कुब्जा

अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ।

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...

- इंदिरा संत

आणि संवेद, तू घातलेला नियम मोडतेय, सपशेल माफी मागते, पण अगदीच राहवलं नाही रे!! ही अजून एक जीवघेणी गजल, सुरेश भट यांची.

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!

- सुरेश भट

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गातें हैं, हेच खरय! !!

माझा खो श्यामलीला, द किंगला आणि तिसरा खो अरुणला. लिहिताय ना??


कवितांचा खो खो: खेळाचे नियम -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र अवश्य लिहा.

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद अवश्य करा.

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण अपेक्षित नाही.

५.अजून नियम नाहीत :)

नियमपण पोस्ट केले, नियम माहित नव्हते,संवेदच्या ब्लॉगपर्यंत जायचा कंटाळा आला, ब्लॉग सापडला नाही, अशी कारणं नकोत द्यायला कोणी!!!! :D

July 27, 2008

बंगलोर आणि २५ जुलै २००८

शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...

नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार... आनेका है तो हमारे टाइमपे आव, नै तो जाव!!तोच माज!! म्हणायला दूधवाला, एक किराण्याचं दुकान अन् एक दोन टपर्‍या सुरु झालेल्या असतात. बाकी, ही माझ्या घराजवळची टपरी एकदम खास!! तिथल्या काssssफीचा सुगंध तुमच्या नाकाशी जवळीक साधता साधता तुमची रसनेंद्रियंही हां हां म्हणता तॄप्त करुन जातो!! तर तिथे एक कॉफी रिचवून होतेच! तिथे काम करणारे एक दोघे जण, तिथेच फरशीवर फतकल मारुन एका लाकडी फळीवर पुढच्या रस्सम् सांबाराची तयारी म्हणून कांदे वगैरे कापण्यात गुंतलेले असतात. अगदी रस्त्यावरच बसलेले असतात, पण, याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं! नायतरी पंचतारांकित हाटेलात आतल्या मुदपाकखान्याची काय अवस्था अन् वेवस्था असते कोणास ठाऊक!! आमची अन्नदाती टपरी आम्हांला प्यारी! रस्त्यावर कांदे कापा नाहीतर गल्ल्यामागच्या एवढ्याश्या जागेत!

तर, सकाळी फिरुन परत येताना, हमखास दिसणारी दृश्यं, २५ तारखेलाही तशीच दिसत असतात -घरातल्या गृहिणींची घराबाहेर पाण्याने सडा शिंपण करुन, पाणी ओतून झाडझूड करुन रांगोळ्या काढायची लगबग, सुगंधी मोगर्‍याच्या वेण्यांचे हारे घेऊन विकायला बाहेर पडलेल्या फुलवाल्या, जरा उशीराने सकाळी फिरायला बाहेर पडलेले पेन्शनर्स... शहर हळूहळू जागं होत असतं.... मी राहते त्या भागात, ठराविक क्रमाक्रमानं बंगळुरुला जाग येते. आधी दूधवाले, पेपर टाकणारे लोक, मग फुलवाल्या, एखाद दुसरा भाजीवाला/ली, एक दोन दुकानवाले, तशातच शाळेत जाणारी पिल्लं आपापल्या आयांबरोबर चिवचिवत शाळेच्या बससाठी बाहेर पडतात. सकाळची शिफ्ट असणारे आयटी क्षेत्रातले विंजनेर, मॅनेजरही आपापले लॅपटॉप घेऊन आपापल्या कंपनीने पुरवलेल्या वाहनांची वाट पाहत थांबलेले तरी असतात, किंवा भरधाव वेगाने धावणार्‍या अशा वाहनांपैकी एकात, आपापला जीव मुठीत घेऊन बसून आपापल्या कंपन्यांमधून पोहोचत तरी असतात. बघता बघता बंगलोरच्या दिवसानं बर्‍यापैकी वेग घेतलेला असतो.

मीही नेहेमीप्रमाणे माझी सुमो पकडून नेहमीप्रमाणे हापिसात, शहरापासून दूर पोचते, काम सुरु होतं. एकदा कंपनीच्या आवारात शिरलं की शहराशी तसा काही संपर्क राहात नाही. शुक्रवार म्हणून जरा सगळेच आरामात असतात. रुटीन कामं, मीटींगा सुरु असतात, एक सहकारी नव्या नोकरीत रुजू होणार, त्याचा आमच्या बरोबर शेवटचा दिवस असतो, आता तो जाणारच म्हटल्यावर, मॅनेजरला तो किती कामसू आहे याचा सा़क्षात्कार होऊ घातलेला असतो... आम्हां एकत्र टपोरीगिरी करत असलेल्यांना अस्सल टपोर्‍या चालला म्हणून लै वाईट वाटत असत... त्यातच गप्पा, कामं, अस सुरु असतं. असंच थोडंफार बंगलोरमध्ये प्रत्येक कंपन्यांमधून सुरु असावं, नाही?

बाकीचं शहरही आता धावायला लागलेलं असतं. बंगळुरु तसं शांतताप्रिय शहर. अस्सल मूळ बंगळुरी माणूस आरामात जगायला प्रथम पसंती देतो, अस माझं मत. कॉफी, इडली, डोसे आणि रस्सम भात असला की दुपारी मस्त ताणून द्यायला त्याला मनापासून आवडतं. आता आयटीसारख्या फैलावलेल्या उद्योगामुळे जी काही हालचाल सुरु आहे, तीच आणि तेवढीच हालचाल. आयटी उद्योग बाहेर न्या, की बहुधा बंगळुरु परत एकदा बर्‍यापैकी पेंगायला लागेल!

आमच्या हापिसातही, माझ्या टीमची चंगळ असते! मीटींगा वगैरे आटोपलेल्या असतात, आणि आता पुढचे २-३ तास सांघिक भावना वगैरे असल्या विषयावर प्रशिक्षण असतं! टीपीची नामी संधी, असं जाणून आम्ही सगळे प्रशि़क्षणात भाग घ्यायला निघतो, आणि, बॉसलाही तिथे पुढचे २-३ तास काय धुमाकूळ चालणार याची पूर्ण कल्पना आलेली असते!! "हरलो बुवा मी", किंवा "मी तर तुमच्यापुढे हातच टेकले बुवा", छाप हसत तो मान हलवतो आणि आम्हांला लै लै आसुरी आनंद होतो!!!

प्रशिक्षण मजेत सुरु असतं, आणि, तेवढ्यात प्रशिक्षणात उशीरा सामिल झालेला एक सहकारी बाँबस्फोटाची वार्ता सांगत सांगत येतो. सारेजण अवाक् होतात!! हे काय मधेच! कोणाचा विश्वास बसणं कठीण असतं! एव्हाना, सर्वांचे सेल फोन किणकिणायला सुरुवात झालेलीच असते... एक तर शहरापासून दूर असल्याने, खरं तर अजूनपर्यंत शहरात नक्की काय झालंय याचा आम्हालाच काही पत्ता लागलेला नसतो, पण बंगलोरमधे अन् इतर शहरांतही घरी टी.व्ही. पुढे बसून बातम्या पाहणारे आई वडिल, इतर नातेवाईक, भाऊबंद, इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या पाहणारी मित्र मंडळी - सगळेच हादरलेले असतात! हळूहळू बातमीच गांभीर्य वाढायला लागतं आणि सर्वांचा मूडही गंभीर होत जातो. प्रशिक्षणात आता फारसं कोणाचं लक्ष नसतं....

प्रशिक्षक तरी म्हणतेच, " इथे बसून आत्ता आपण काही करु शकतोय का?? मग निदान प्रशिक्षण तरी पूर्ण करुयात!" परत एकदा सगळे प्रशिक्षणात मन रमवायचा प्रयत्न करतो... सगळ्यात जास्त माझा सेल वाजत असतो, बंगळुरुमधल्या अन् पुण्यातल्या इतर मित्र मैत्रिणींचेही फोन, निरोप यायला सुरुवात झालेली असते! थोडंस वैतागून माझी प्रशिक्षक मला सेलफोन सायलेंट मोडवर ठेव अशी सूचनावजा आज्ञा करते. मी काही म्हणायच्या आत, लग्गेच माझे सहकारी तिची कल्पना मोडीत काढतात. "ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते?? सगळ्यांचा आग्रह प्रशिक्षिकेलाही मोडवत नाही.

घरी फोन करायचाही मी आटोकाट प्रयत्न करते, तितक्यात सेल नेटवर्क जाम झालेलं असतं! आई, बाबांच्या जीवाला कसा घोर लागला असेल, याची कल्पना करुनच मला रडू फुटायच्या बेतात असतं. वैयक्तिक फोन ऑफिसमधले फोन वापरुन करायचे नाहीत, हा नियम "गया भाडमें" असं म्हणत माझा बॉस मला फोन लावायची सोय करुन देतो. "आरामसे, ठीक तरहसे बात कर..." हे पण सांगतो. घरी खुशाली कळवून मीही जरा निर्धास्त होते, आणि माझा आवाज ऐकून घरच्यांचा जीवही भांड्यात पडतो. बाकीच्यांचेही फोन लावून, करुन झालेले असतात, खुशाली विचारुन झालेली असते...

प्रशि़क्षण संपवून आम्ही बाहेर पडतो. कँपसमधे ठिकठिकाणी घोळके उभे राहून जरा दबक्या आवाजात एकच चर्चा करत असतात! बंगलोरमधे, आपल्या घरांच्या आसपास असं होईल, होऊ शकत, हे पचवायला बहुतेकांना जडच जात असत... काहीजणांची कुठलं आयटी पार्क आधी उडवतील यावरही चर्चा सुरु झालेली असते. काही जण लवकर घरी गेलेले असतात, त्यांची पिल्लं शाळांमधून सुरक्षित घरी आणायची असतात. जनजीवन तसं विस्कळीत झालेलं असतच, पण त्याहीपेक्षा अचानक बसलेला मानसिक धक्का बर्‍याच जणांसाठी जबरदस्त असतो. रस्त्यांवरही बर्‍याच कंपन्यांनी लोकांना घरी जायला परवानगी दिल्याने भरपूर गर्दी वाढलेली असते.... बंगळुरुमधली वाहनव्यवस्था परत एकदा कोलमडलेली असते, आणि या परिस्थितीमुळे आमची कंपनी आम्हांला नेहमीच्याच वेळेला, म्हणजे रात्री ८:००नंतर सोडायचा निर्णय घेते.

परत माझ्या जागेवर येऊन बसल्यावर, परत एकदा कामात गुंतवून घेण्याबरोबरच स्नेह्यांच्या खरडी, मेल्स, खुशालीबाबतचे प्रश्न, खुशाली कळवणं सुरुच राहत... नोकरी सोडलेला सहकारी संध्याकाळी ५:०० वाजता जायला निघतो, तसं सगळेच त्याला जपून जा आणि घरी पोचल्याचं कळव, असं कैकदा बजावून सांगतो. तब्बल साडेतीन तासांनी, रात्री ८:३० ला तो घरी पोचतो, आणि तो व्यवस्थित घरी पोहोचला हे ऐकून सगळ्यांनाच हुश्श् होतं! हळूहळू हापिसमधेही वातावरणातला ताण सैलावलेला असतो, घरी जायची वेळ जवळ येत असते अन घरी जायचे वेधही लागलेले असतात. एकमेकांना घरी जाताना वीकांताला फारसं बाहेर पडू नका, असं आवर्जून सांगितलं जातं. कंपनीची वाहन व्यवस्थाही बर्‍यापैकी कोलमडलेली असते, शहरात गेलेली वाहनं अडकलेली असतात, निम्मी अधिक परतलेली नसतात..... तरीही सर्वांची घरी जायची सोय ऍडमिन विभागातले कर्मचारी जातीने उभे राहून करतात, घरापर्यंत सोडणं आज शक्य नाही, मुख्य रस्त्यापर्यंत सोडू शकतो, कृपया सहकार्य करा, असं विनवतात. त्यांचाही इलाज नसतो, पुन्हा सर्व सुखरुप जावेत याचंही टेंशन.

परत घरी जाताना, बंगलोर परत एकदा सुरळीत, मार्गाला लागलेलं आहे हे लक्षात येतं, आणि जनतेचा विश्वास टिकून राहण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. माथेफिरु विघ्नसंतोष्यांच्या नाकावर टीच्चून बंगलोरमधले व्यवहार सुरुच असतात! हे बघून सुद्धा खूप खूप बरं वाटतं... सुरुवातीला इथे आल्यावर ह्या शहराला जितक्या शिव्या घातल्या, त्याच शहराबद्दल आता आत्मियताही वाटायला सुरुवात झाली आहे, हेही तेवढयात लक्षात येत! स्वतःचीच गंम्मत वाटते!

एव्हाना मस्त पाऊस झालेला असतो, रस्ता धुवून निघालेला असतो, वातावरणातही सुखद गारवा आलेला असतो. परत एकदा हा सुखद गार हवा अंगावर झेलत, मुख्य रस्त्यावर उतरून मी पायी पायी घरी जायला निघते. सगळा माझाच एरिया तर असतो, भीती कसली??

नवीन दिवसाला सामोरं जायला बंगलोर परत एकदा रात्रीच्या कुशीत विसावायला सुरुवात करत असतं, रस्त्यांवरची रहदारी तुरळक होत चाललेली असते. मध्यवर्ती भागांमधून मात्र, अजून थोडा वेळ रहदारी सुरु राहणार असते...

बंगळुरु थांबणार नसतं!

July 21, 2008

प्रत्येकाचा अंधार अन् सूर्य

कधी कधी असं उगीच होऊन जातं.... सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, आतल्या आत मन धुमसत राहतं, स्वतःचं मन, स्वतःलाच अनोळखी! मनात काय चाललंय, का चाललंय, कशासाठी चाललंय, त्यातून काय निष्पन्न होणार, होणार का? सारंच कसं अगदी बेभरवशाचं. प्रश्न आहेत, कधी कधी त्यांची उत्तरंही आहेत, पण हवी असणारी अन् लागू पडणारी आहेत का, हे मात्र ठाउक नाही... प्रत्येक वेळी आजमावून पहायची हिंम्मतही नाही, आणि तरीही आयुष्य सुरुच राहतं. आला दिवस आपला म्हणायचा का? हं, तसच असावं बहुधा...

जणू काही एका अश्या वळणावर कुठेतरी उभं असतो, जिथून रस्ते तर भरमसाठ निघतात, पण यातला माझा कुठला, असं वाटत राहतं. कोणत्याच रस्त्याशी बांधिलकी वाटत नाही, चार पावलं चालून मधेच रस्ता बदलला तरी, रस्त्यावर आपल्या पाऊलखुणा राहतील असही काही नाही आणि आपल्या मनातही त्या रस्त्याची काही आठवण राहील याची खात्री नाही, नाळच जुळत नाही, आणि तरीही एक रस्ता निवडून चालायच..... का? थांबण्यातही स्थैर्य असेलच, अस खात्रीपूर्वक सांगता येतं, असही नाहीच...

वरवर सगळं कसं छान छान, सुरळीत, एकदम मस्तच असत! पण कुठेतरी मनात एक खोलवर एक डोह असतो, ज्याचा तळ गवसत नाही... किती खोल जावं तळ शोधायला? गवसेलच याचीही शाश्वती नाही, परत उलट फिरुन काठावर येईनच याचीही खात्री नाहीच, आणि समजा जरी काठ दिसला आणि तिथपर्यंत पोचता आलं तरी परत एकदा काठावर उभं राहून पुन्हा एकदा डोहात वाकून पाहताना आपलंच प्रतिबिंब आपल्यालाच परकं वाटल तर??

काही कळत नाही... स्वतःच स्वतःला अनोळखी होत जाता जाता ओळख शोधायची तरी कुठे? प्रत्येकाचा अंधार वेगळा, प्रत्येकाचा सूर्य वेगळा... एकाच्या सूर्याला दुसर्‍याचा अंधार पेलेलच असंही नाही!

शेवटी प्रत्येकाने आपापला अंधार पेलायचा आणि त्याला छेद देऊ शकणारा स्वतःचा सूर्य स्वतःच शोधायचा.. कदाचित असंच असाव.

June 22, 2008

श्री महालक्ष्मी


एका मेलमधून आलेला हा श्री महालक्ष्मीचा नितांतसुंदर फोटो...

June 8, 2008

भिवाण्णाची काळी माय

भिवाण्णा पार सटपटून गेला होता.......

गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता! हताश असा, घरासमोरल्या अंगणातल्या बाजेवर बसून, शून्यात नजर लावून, परत एकदा आयुष्याची बेरीज वजाबाकी करण्यात, आणि कुठं न् काय चुकलं याचा मागोवा घेण्यात, भिवा गुंतला होता. एवढाच एक खेळ नियतीने त्याच्या नशीबात आता ठेवला होता जणू..... मनातल्या मनात, घरच्या देव्हार्‍यातल्या तसबिरीतल्या देवाला त्याने प्रश्न विचारुन झालं होतं, की बाबा रे, आता उतरत्या वयात हे भोग का रे बाबा देतोस नशीबी?? पण तसबिरीतला देवही गप्पच राहिला होता.....

उगाच मागचं, पार त्याच्या लहानपणचं काहीबाही आठवत राहिलं त्याला. पुरानं सुसाटणार्‍या नदीला लोंढे यावेत तशा आठवणी, एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी... मनावर काही धरबंदच राहिला नव्हता त्याचा.

..... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा नाव ठेवलेलं बानं आपल्या. बाच्या आईची -आपल्या आज्जीची आठवण म्हणून. दिसायलाही कशी चंद्रावाणी होती, गोरी गोमटी. चांगल्या घरात पडली. दाजीपण भला माणूस. बहिणीला सुखात ठेवलं आपल्या. भेटायला यायची माहेराला, तेह्वा कशी भरल्या मनानं, सुखानं तृप्त हसू ओठांवर लेवून यायची.... चंद्री पण आई बापाच्या नावाला जपून राहिली. पण कशी चिडायची लहानपणी!! आठवणीने आतापण भिवाण्णा गदगदत हसला.

रस्त्यावरून जाणार्‍या कोणी आश्चर्यानं नजर टाकली, काय झालयं हे भिवाण्णाचं, येवढा ताठ गडी, पार हेलपाटलाय, मधेच हसतोय, मधेच डोळ्यांतून टिपं गाळतोय, काय खरं नाही, ह्याअर्थी मान हलवत तो गडी आपल्या कामाला निघून गेला... भिवाण्णाला काहीच सोयरसुतक नव्हतं, तो आपला भूतकाळात रमला होता, चंद्रीच्या लहानपणची एक आठवण त्याच्या मनात रुंजी घालायला लागली होती.

"बा, ह्यो मला आक्का म्हनीत न्हाय बग!! ह्येला सांग, मला आक्काच म्हनायाचं...."

"आस्सं?? आक्का म्हनीत न्हायी?? मग काय म्हनीत्यो?? काय रं भिवा?? का तरास देतोयास रं माज्या चिमनीला??" मिशीतल्या मिशीत हसत बा कसा उगाच लटकं रागवायचा, आणि मग चंद्रीची समजूत काढायचा!! "अग पर सोन्ये, तू ल्हान हायेस त्येच्या परीस, तुजा त्यो मोठा भाव हे... तू त्येला दादा म्हनायाचं, व्हय का न्हाय? सांग बर..."

"मग त्यो मला शेंबडी, शेंबडी का चिडवायला लागलाय?? मला शेळीच्या शेजारी शेंबडी हाय, आसं म्हनतोया.... "

"अग चिमने, पर तू ये की नाक पुसून, आन् मंग त्येला इचार, काय रं, आसं का म्हनीतो म्हनून!! व्हय का न्हाय??"

चंद्राला लग्गेच पटायचं, लग्गेच धावायची घरात! आपण बाच्या संगतीने हसायचो.

सासरी पाठवणी करताना आपण म्हणालो होतो, "आक्के, चाललीस व्हय आमाला सोडून आता?" तेह्वा कशी उमाळ्याने आपल्या कुशीत येऊन रडली बाय माझी! मायाळू पोर अगदी.... कसबस ताठ राहिलो आपण, बाप्या माणसाने रडून कसं चालेल, म्हणत. परत एकदा भिवाण्णाच्या डोळयांत पाणी उभं राहिलं चंद्रीच्या आठवणीने... गेल्या सालीच गेली, ते एक बरं झालं, नाहीतर आपले भोग काय तिच्याच्यानं बघवले नसते, अस वाटत राहिलं त्याला.

मग असंच काय काय आठवत राहिलं त्याला, घरच्या आठवणी, माय आणि बाच्या आठवणी... बाच्या संगतीने मायही खपायची शेतात. भल्या पहाटेची उठून, झाडलोट करून, घरातली कामं आवरून, मुक्या जनावरांची काळजी घेऊन, त्यांच दाणापाणी, वैरण बघून ती शेतात जायला तयार व्हायची. किती कामाचा डोंगर पेलायची, पण कधी तिच्या कपाळी आठी नाही पाहिली, आपला बा ही तसाच. खूप धीराचा, मोठया मनाचा गडी, तितकाच मायाळू. असले आई बाप मिळायला नक्कीच आपण गेल्या जन्मी पुण्य केलं असलं पाहिजे... हसतमुख मायबाप त्याच्या डोळ्यांसमोर आले. परत एकदा लहान व्हावं आणि मायच्या पदरात तोंड लपवून पदरातला गारवा अनुभवावस वाटल त्याला. तिच्या मायाळू हाताचा स्पर्श आठवून आणखीनच सैरभैर झाला तो... कशी माय आपण थकूनभागून घरी आलो की मायेने चेहर्‍यावरुन आपला खडबडीत हात फिरवायची आणि पदराने चेहरा पुसायची हे आठवून त्याचं मन उगाच जडभारी झालं.

आणि बापाचा काळ्या आईवर किती जीव!! किती मानायचा तिला!! काही मनातलं सांगायच असल, तर तिची आण घ्यायचा!! बाने काळ्याईची आण घेतली की समजावं, प्रत्येक शब्द खरा अन् आता ती काळ्या दगडावरची रेघ. मग जरा मोठं झाल्यावर आपणही जाऊ लागलो बाच्या संगतीने शेतावर. बा सांगायचा, शिकवत रहायचा. किती तरी बारकावे... सुरुवातीला कंटाळा यायचा, मग हळूहळू जीव रमला. काळ्या आईची माया आपल्यालाही जडली, अन् तिचाही जीव जडला असणार आपल्यावर. आपल्या हाताला यशच देत गेली ती. बाच्या मनात एकच ध्यास होता, शेतजमिनीच्या तुकड्यात भर घालायचा. आपणही ठरवलं मनाशी, बासाठी एवढं करायचंच कधी ना कधी आयुष्यात. मनापासून मेहनत करत गेलो. काळ्या आईला सांगितलं मनातलं. "माय, तुजा आशिर्वाद र्‍हाऊ दे गं माज्यापाठी..." काळ्या आईच्या आठवणीने भिवा गलबलला.... परत एकदा त्याने देवाला मनातल्या मनात साद घातली, का रे बाबा देवा असा वागलास?? माझी मायही नेलीस तिची वेळ आली तशी, अन् तिची जागा भरून काढणारी काळी मायही तोडलीस!! मल तरी का ठेवतोस बाबा मागं? म्हातार्‍या, थकलेल्या डोळ्यांतून टिपं कशालाही न जुमानता सरसर ओघळली.....

पुढे काहीच न सुचता भिवा तसाच विमनस्क, दुपारच्या वार्‍याची झळ अंगावर घेत बसल्या जागीच लवंडला.... झोप तरी कुठे येत होती?? पडल्या ठिकाणावरुनच त्याने उगाच अंगणभर नजर फिरवली. पलिकडे कोपर्‍यात औत पडलं होत. औत बघून त्याला लाल्याची, त्याच्या बैलाची आठवण आली, अन घशात एकदम अडकल्यासारखंच झालं त्याच्या. दुनियेसाठी जनावर होतं ते, त्याच्यासाठी मात्र जिवाभावाचा सवंगडी होता लाल्या. तोही राहिला नाही, आपलं मन कसं कळायचं त्याला, कधी हिरमुसलो असलो की उगाच जवळ येऊन उभा रहायचा, खरबरीत जिभेने हात चाटायचा, कसा जीव लावलेला होता मुक्या प्राण्यानं... आठवणींच चाक फिरतच होतं....

अंगणाच्या मध्यभागी, त्याच्याच मायने हौसेने लावलेली, अन् पुढे तशीच निगुतीने काऴजी घेऊन त्याच्या बायकोने वाढवलेली तुळस आता फक्त काळया करड्या काटक्यांच्या रुपाने आपला जीव तगवून होती. बायकोच्या आठवणीने तो गलबलला. कशी लक्ष्मी होती भागिरथी... चंद्रीचं लग्न झालं आणि आपल्या मायने घरात मुलगी हवी म्हणून सून आणायचा हट्ट धरला!! बाने ही तिचीच री ओढली!! आपण तर कावलोच होतो, पण गेलोच मुलगी बघायला, अन व्हायच ते झालच!! जीवच अडकला की आपला तिच्या हसण्यात आणि लाजण्यात!! रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. कधी हट्ट नाही, मोठ्यांचा राग नाही, कामाचा कंटाळा नाही...घरात खपली, शेतात राबली. सासूसासर्‍यांची आवडती झाली.... कधी स्वतःसाठी हट्ट नसायचा तिचा. पण पोरगा झाला तसं मात्र तिने सांगितल, ह्याला शिकवायचं, कालिजात धाडायचं. त्यापायी पोरांचा लबेदाही वाढवला नाही... आणि पोरगा झाला त्याच वर्षी आपण अजून थोडी जमीन घेतली. बा किती किती हरकला होता काळ्या आईत चिमटीभर का होईना, भर पडली म्हणून !! हाडाचा शेतकरी तो, त्याची तीच पंढरी.... नातवाचा पायगुण म्हणाला!! पोराच्या नावावर त्याची जमीन केलीच, पण नव्याने घेतलेलीही कर म्हणाला!! आपणही खुळेच म्हणायचे!! करुन बसलो!! पोटच पोरगं म्हणूनच केली ना पण!!

पोरगा वाढत गेला, शिकत गेला... पोराच्या विचाराने त्याच तोंड एकदम कडू जार झालं. शहरात रहायला गेल्यापासून पोराला काळ्या मातीशी काय इमानच राहिलं नव्हतं. लहानपणी कसा रमायचा शेतावर... कानात वारं भरलेल्या खोंडासारखा धावायचा, काय काय गोळा करायचा.... आपण शिकवलेलं त्याला, ही काळी माय आपली, तर दमला की काळी माय, काळी माय म्हणत तसाच पसरायचा मातीत! गार गार वाटत, म्हणायचा... मग, आता काय झालं याला? कसं विसरला सगळं?? ह्या काळ्या आईच्या जोरावरच ना ह्याचं शिक्षण केल? पण शिक्षण झालं अन शहरातली नोकरी त्याला आवडायला लागली. मातीने पाय घाण व्हायला लागले त्याचे! गावाकडे करमत नाही, नोकरीच बरी म्हणून शहरातच राहिला. मला कधी बोलली नाही , पण त्याची आईही खंतावली मनातून पोराचं वागण बघून. ह्याला जराही जाणीव नाही राहिली?? ह्याही आईची नाही अन त्याही आईची!! असलं कसलं पोरगं रे देवा, स्वत:च्या आईला विकणारं...... बिनपोराचा राहिलो असतो तरी चालल असत की!! भिवाण्णा पोराच्या आठवणीनेही चिडला अन पचकन् थुंकला. म्हातारपणाची, असहायतेची जाणीव होऊन चरफडला... संध्याकाळ होत आली होती. जिकडे तिकडे भकास काळोख भरून येत चालला होता. भागिरथीच्या तुळशीपाशी जाऊन भिवाण्णानी सुकलेल्या तुळशीवरून सुरकुतला हात फिरवला. भागिरथीच्या आठवणीने कसनुसा झाला. तुळशीला म्हणाला, "ती गेली सोडून, आन् मला ठिवलया मागं ह्ये सगळं सोसाया..."

पोरगा तरी कसला वैर्‍यासारखा निघाला!!

त्याला आठवलं, बरोब्बर दीड वर्षापूर्वी, गावात सांगावा आला होता, गाव खाली करायचा, धरण बांधायचं होतं म्हणे सरकारला!! जे काय नुकसान भरपाई असेल ते सरकारच ठरवणार आणि देणार होतं. गावातली जुनी नवी माणसं चक्रावली, नाराज झाली. कितीतरी सभा, पंचायती, वाद विवाद - खूप काय काय घडलं! लोक पार जेलातही जाऊन आले! आपणही गेलो होतो. म्हातारं हाड असल म्हणून काय झालं?

..... पण शेवटी सरकारी नांगर फिरायला हळूहळू सुरुवात झाली होती, आणि लोक आजपर्यंत जिथे रुजले, जगले तिथून विस्थापित म्हणून बाहेर पडायला लागले होते.... न राहवून आपणच लेकाला पत्र लिहून बोलावून घेतलं, शहरात शिकलेला आपला लेक या साहेब लोकांशी बोलेल अशी आपली भाबडी आशा. लेकही पोचला, साहेब लोकांबरोबर ३-४ बैठकी झाल्या अन् एक दिवस खालच्या वाडीतला व्यंकप्पा सांगत आला की लेकाने जमीन विकली.... ऐकलं आणि भागिरथी तिथेच कोसळली ती उठलीच नाही! आपल्याला वेड लागायच बाकी राहिलेलं! किती परीन समजावलं पोराला, पण त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही!! गावात छिथू झाली ती वेगळीच... आपल्या आईला विकणारा शेतकरी तो कसला? कसाब बरा रे बाबा त्यापेक्षा....

आणि आता पोरगं म्हणतय की चला शहरात. कशाला? तिथं कोण आहे माझं? हे पोरग काय माझं नाही. मी का जाऊ? नाही, नाही मी नाही जाणार, मी माझ्या काळ्या आईला नाही सोडणार....

"अण्णा कापडं भरली का तुमची बॅगेत?" पोराने आवाज दिला.

भिवाण्णाने उत्तरच दिलं नाही... तो घराबाहेर पडताना पाहून पोराने विचारलं, "कुठे चालला आता रात्रीचं?"

"शेतावर जाऊन येतो जरा....."

"आत्ता कुठे या वेळी, कुठे पडाल बिडाल... नसतं झेंगट होईल.... उद्या निघायचं आहे आपल्याला, मला सुट्टी नाही जास्त...."

"पडलोच, आन् जड झालो का टाकून दे शेतात आपल्याच..." भिवाण्णा तिरमिरीतच बाहेर पडला. पोराने वैतागून बापाचे कपडे एकत्र करायला सुरुवात केली.....

भिवाण्णा शेतात पोचला होता. घरी तगमगणारा त्याचा जीव निळया काळ्या लुकलुकणार्‍या आभाळा़खाली आणि काळ्याईच्या स्पर्शाने हळू हळू निवत गेला. " माय गं, न्हायी गं जावस वाटत तुला सोडून, पर म्या काय करू गं, मला कायबी कळंना बग... समदी माजीच चूक हाय.... काळी माय, काळी माय, कधी काळी मापी करशीला का गं मला...." भिवाण्णा स्फुंदत स्फुंदत काळ्या मायेच्या कुशीत कधी विसावला, त्यालाही कळलं नाही.

सकाळी बाप घरात नाही म्हणून पोरगा, बापाला बघायला शेतावर पोचला...

बघतो तर काय, भिवाण्णा शांतपणे त्याच्या काळया मायच्या कुशीत पहुडला होता.

भिवाण्णाचं म्हणण शेवटी तसबिरीतल्या देवानं ऐकलं होत. भिवाण्णाच्या काळ्या मायशी त्याची ताटातूट टळली होती. त्याच्या मनासारखं झालं होतं......

April 27, 2008

मनात आलेले काही बाही....

एखादं पुस्तक वाचायला घेतलं की साधारण एक पान वाचायला ३ मिनिटं पुरत असतील?? कुठेतरी वाचलं होतं कधीतरी की तीन मिनिटांच्या कालावधीत साधारण ३०० माणसं मृत्यू पावतात अन साधारण त्याहून दुप्पटीने जरा जास्तच, महणजे साधारण ६२० ते ६५० नवीन बालकं जन्माला येतात.

ब्लॉगवर एक पोस्ट करायला साधारण ३० मिनिटं तरी लागत असतील ना? इथं आत्ता घरी बसून , समोरच्या लॅपटॉपवर पूर्णपणे तल्लीन होऊन ही पोस्ट बडवतेय. आजूबाजूला पुस्तकं पडली आहेत, गाण्यांच्या अन सिनेमांच्या सीड्या अन डीवीड्या पडल्या आहेत अन असाच थोडा थोडा माफक पसारा. थोडा फार पसारा असाच आयुष्यात पण, जो सध्ध्या आवरता येत नाही. तो तसाच असणार आहे काही काळासाठी तरी..... नंतर कधीतरी आपसूकच आवरला जाईल. असो.

आणि हे सगळं इथे सुरु असताना, बाहेरही नेहमीची जगरहाटी चालूच आहे, रस्ते माणसांनी अन वाहनांनी भरून ओसंडताहेत, जन्म, मृत्यू, सामान्य माणसांच्या आयुष्यातले नेहमीचे सोहळे, आनंदाचे क्षण, दु:खाचे कढ... सारं काही थोड्या फार फरकानं तसच. माझ्यासकट सगळे तथाकथित 'नॉर्मल' आयुष्य जगताहेत. वरच्या कुठे तरी वाचलेल्या जन्म मृत्यूच्या संख्या खर्‍या मानल्या तर, या अर्ध्या तासात कुठेतरी ३००० जीव मृत्यू पावलेत अन ६२०० ते ६५०० जीवांनी जन्म घेतलाय.या अर्ध्या तासात, काही घरांत मृत्यूच्या दर्शनानं वातावरण शोकाकूल झालं असेल, काही घरांत नवजन्माचा जल्लोष सुरु असेल, (जरासं विषयांतर, पण डोक्यात आलंच म्हणून, कदाचित काही घरांतून मुलाऐवजी मुलगी जन्माला आल्याचा एक नकळतसा बोचरा सलही जाणवत असेल. सुपर पॉवर व्हायचं असलं - किंवा अगदी झालोच आहोत तरीही -तरी आम्हाला मुलगी झाल्याचं अजूनही तेवढच वाईट वाटत, अगदी तथाकथित सुशिक्षित घरांतही!! जाऊदेत, हा एक वेगळाच विषय आहे.... ) कदाचित, यातल्या काहीजणांनी मृत्यूला सखा म्हणून हात पुढे केला असेल, कंटाळवाण्या आयुष्याला भोग म्हणून जगण्यापेक्षा एकच मृत्यू बरा, असही वाटल असेल कधी तरी. ज्यांचा जन्म झालाय, त्यांना तरी कुठे ठाऊक आहे पुढे काय काय घडणार आहे?? एका साधी आकडेवारी, अन ती सुद्धा कितीतरी कहाण्या सांगते, अश्रूंच्या, दु:खाच्या, आनंदाच्या क्षणांच्या, नाही??

त्यातही, पुन्हा, काहीजण या आकडेवारीचा भाग बनतही नसावेत..... एकाकी, निष्कांचन अवस्थेत जगून कधीतरी शांतपणे अन एकटेच कुठेतरी डोळे मिटण्याचं प्राक्तन घेऊन आलेले जीव. अनौरसपणाचा शिक्का कपाळावर घेऊन जन्मलेले आणि सोडून, टाकून दिले गेलेले जीव... पण जगरहाटी सुरुच आहे.

आणि मी, तुम्ही, आपण सगळेच, अगदी याच आकडेवारीचा एक हिस्सा. भूतकाळात कधीतरी जन्माच्या आकडेवारीचा हिस्सा अन पुढे भविष्यात कधी तरी मृत्यूच्या आकडेवारीचा हिस्सा!! जरी जीवनाचा प्रवाह वाहता असला आणि नैनं छिन्दन्ती शस्त्राणि, नैनं दहती पावक: , हे जरी खरं असेल तरी लौकिकार्थाने आपला या पृथ्वीवरचं निदान शारिरिक अस्तित्व संपणार, हे नक्की. पण, आपलं अस्तित्व अगदी अगदी क्षणभंगूर आहे, याची जाणीव असणं, बर असत.

एकूणच आपण मृत्यूविषयी खूप कमी विचार करतो, आयुष्य खूप गृहीत धरतो आपण. आयुष्यात अनेक नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो, कधी, कधी तर जरा अतिच!! नको त्या गोष्टींसाठी, खर्‍या खोट्या समजुतींपायी, मानापमानाच्या कल्पनांपायी आणि इगोपायी कितीतरी साधे, सरळ आणि सुंदर क्षण हातातून गमावतो. इतरांकडे बोटं दाखवतो, पण स्वतः कधीही बदलायचं मनातही आणत नाही!! खूप जगावेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटत असतात, पण जरा वेगळी वाट चोखाळायचं धाडस करायच की नाही, याबद्दल सांशकता असते. आपला आपल्यावरचा विश्वास डळमळतो...... संभाव्य धोक्यांना भिडण्याची ताकद खूप कमी जणांकडे. लहान मुलांसारख निर्भय, निर्व्याज जगण्याची कला तर आणखी कमी जणांकडे. आणि तरीही आपल्याला आयुष्याची एवढी नशा चढलेली असते, की आपण केवळा स्वतःचं आयुष्यच नाही तर आपल्या आजूबाजूच्यांनाही किती गृहीत धरतो!! आपल्या लोकांनाच नाही तर परक्यांनाही.....

थोडीशी मृत्यूची जाणीव मनात बाळगली तर इतकं बेदरकार वागू शकेल का कोणी?? किती तरी गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात अगदी रोजच्या जगण्यात, एखादा फोन कॉल, जो पलिकडल्या व्यक्तीला जाणवून देतो तुमच्या आयुष्यातलं त्या व्यक्तीच स्थान. एखादं दिलखुलास हास्य, कोणाला करायची राहून गेलेली निरपेक्ष मदत, तुम्हांला जोपासायचा असलेला एखादा छंद....

खरं तर आपल्याला कुठे ठाऊक असत की पुढचा क्षण तरी आपला आहे की नाही?? आणि प्रत्येक सुरुवातीला अंत हा असतोच म्हणतात, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कधी तरी पूर्णविराम हा ठरलेला, मग त्याला घाबरायच कशाला? उलट, थोडीशी त्या पूर्णविरामाची जाणीव ठेवली तर प्रत्येक जण थोडसं अधिक संवेदनशीलतेने वागेल का??

April 18, 2008

थँक्स मॅडम.....!!

मागचा शनिवार अगदी मस्तच उगवला!! शुक्रवारी रात्री राणीच्या देशातल्या हापिसमधून कोणी कोणताही सर्वर मोडला म्हणून फोन केला नाही, की हे सॉफ्टवेअर मोडलय, ते सॉफ्टवेअर चालत नाही म्हणून तक्रार केली नाही... सुखेनैव झोप झाली आणि दुपारी सगळे मायबोलीकर एकत्र भेटलो. खाणे, गप्पा यांत वेळ कसा निघून गेला काही कळलंदेखील नाही. मजा आली!

दोन - तीन तासांनी सगळ्यांनी आपापल्या घरी निघायचं ठरवल, तसं, मी आणि अजून एक मायबोलीकरीण, इतरांचा निरोप घेऊन, शॉपिंगसाठी सज्ज झालो!! दुसर्‍या दिवशी बॉसच्या लग्नाचं रिसेप्शन होतं आणि सगळी टीम जाऊन बॉसला अन त्याच्या झालेल्या बॉसला चेहरा दाखवून येणार होती अन मलाही सज्जड दम दिला होता की, बये ये तिथं!! बर नाही दिसत नाहीतर!! पुढच अप्रैजल हाच करणार आहे, माहिताय ना??? अरेच्या....!!! म्हणून काय झालं?? एकतर रविवारी संध्याकाळी कुठेतरी हजारो कोसांवरच्या ठिकाणी असले उच्छाव मांडायचे अन सगळ्यांनी त्याला जमायचं!! तर, मग आता ह्या उच्छावाला जायचं असल्याने, जरा शॉपिंग करणं क्रमप्राप्त होतं... इथे आल्यापासून ऑफ़िसला लागतील असे साधे रोजच्या वापरातलेच कपडे आहेत माझ्यापाशी, समारंभात घालता येतील अश्या कपड्यांची गरज होती, आणि शॉपिंगसारखं सुख कोणतं??

तर, मस्त शॉपिंग करून आम्ही रमत गमत निघालो. रस्ते वेगळे होताना एकमेकींना बाय केलं, शॉपिंगला मज्जा आली असं एकमेकींना सागून निरोप घेतला, अन घरी परतताना लक्षात आलं, की एक छोटीशी खरेदी राहिलीच!! एका मिनिटासाठी वाटलं जाऊदेत, खूप दमायला झालं होतं, पायही दुखत होते खूप... पण मग तेही पटेना मनाला. थोडक्यासाठी कंटाळा कशाला करायचा?? (हेच जर अभ्यासाची पुस्तकं वाचताना वाटलं असतं तर एखादी पी. एच. डी. तरी पडली असती हातात गेला बाजार!! हेहेहेहे!! असो.)

तर, पावलं वळलीच दुकानाकडे. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी. मला हवी असलेली खरेदी मी अक्षरश: आटोपली!! आणि नशीबाने ती आटोपलेली खरेदीही मनासारखी झाली, म्हणून बरच वाटलं. सगळा दिवस आत्तापर्यंत छानच गेला होता. असा दिवस क्वचित पदरात पडतो माझ्या!!

खुशीत दुकानाच्या दरवाज्यापाशी आले आणि मी दरवाजा उघडणार इतक्यात तिथेच दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मघाशी खरेदी करताना मी एकदा दोनदा ओझरतं पहिलं होतं त्यांना. तिथे दुकानातच काहीतरी खरेदी करायला आले असणार अशी नोंद माझ्या मनात ओझरती झाली होती, किंवा त्यांच कोणी, म्हणज़े पत्नी, मुलगी, किंवा तत्सम कोणी खरेदी करत असाव, आणि ते खरेदी संपायची वाट पाहत असावेत असा आपला माझा ग्रह झाला होता, आणि मनातल्या मनात ते या खरेदी प्रकरणाला कंटाळले असावेत, म्हणूनच असे कंटाळून एका बाजुला उभे असावेत असही वाटून हसू पण आलं होतं!! माझा बाबा नेहमीच माझ्या बरोबर किंवा आईबरोबर कुठेही बाहेर खरेदीला यायचं नेहमीच टाळत आलाय!! गृहस्थ तसे मध्यमवर्गीय वाटत होते, सभ्य, सुशिक्षित वाटत होते.

तर, जेह्वा मला दरवाज्यापाशी येताना पाहून त्यांनी दरवाजा उघडला, तेह्वाही मला काहीच लक्षात आलं नाही!! दरवाज्यापाशीच ते उभे आहेत अन एक त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांनी दरवाजा उघडून धरलाय असच वाटल मला!! शप्पत!! मी त्यांना धन्यवाद म्हणायला जाणार इतक्यात ते गृहस्थच म्हणाले, "थँक्स मॅडम, प्लीज कम अगेन.... "

......... म्हणजे?? मी दोन मिनिटं उडालेच!! आणि त्याहूनही मला मनाला लागला, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा टोन... इतका थकलेला, हरलेला आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तत्क्षणी भलतच अपराधी वाटायला लागल! प्रथम म्हणजे, डोअरपर्सन म्हणून कोणीतरी आपल्याहून वयाने मोठी अशी व्यक्ती उभी असणं आणि तिने आपल्यासाठी दरवाजा जाता येता उघडून धरणं अजून तरी माझ्या पचनी पडत नाही, बरं आत शिरताना, माझा मीच दरवाजा उघडून आत शिरले होते, त्यामुळे ते मला आधीच लक्षात आलं नव्हतं........ आणि आता माझ्या वडिलांच्या वयाचे हे गृहस्थ माझ्यासाठी दरवाजा उघडून उभे होते...!! अगदी कससंच झालं!! आत्तापर्यंत चढलेली शॉपिंगची धुंदी उतरली क्षणार्धात!!

त्यांच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर जरा हललंच आतमधे कुठे काहीतरी... ओढलेला, थकलेला चेहरा, पडलेले खांदे, चेहर्‍यावरचा खिन्न, विषण्ण आणि थकून हरल्याने येतो तसा एक अलिप्त, निर्विकार पण हार पत्करल्याचा भाव, आणि तो वैषम्याने भरलेला आवाज..... काय दु:ख असेल या काकांना, अस वाटल्यावाचून राहिलं नाही.

मनात प्रश्न उभे रहायला लागले एकामागोमाग....

या वयात हे असं दिवसभर उभं राहणं यांना जमत असेल का?? थकून जात असतील का? हो, नक्कीच.... काय कारण असेल बरं? वाईट परिस्थिती ओढवली असेल का घरी?? म्हणून मिळेल ती नोकरी पत्करावी लागली असेल का? या वयात योग्य अशी नोकरी मिळाली नसेल का? आयुष्यभर जबाबदारीने, नेकीने वागूनही आयुष्याचं विरत जाणंच सतत पाहणं तर नशीबात आलं असेल, ती अगतिकता, कुठेतरी मनानं पत्करलेली हार आवाजातून व्यक्त होत असेल का? कोणी पाहणारं नसेल का यांना अन यांच्या सहधर्मचारिणीला? का असूनही नसल्यात जमा झालं असेल?..... तेवढ्यात घरी गेल्यावर आई आणि बाबाशी फोनवर बोलायचं नक्की करुन टाकलं. तसही शनिवार, रविवार आणि आठवड्यातही माझे सतत फोन होतातच त्यांना, पण अजून एकदा....

का असं असेल? ऐन उमेदीत आयुष्य उधळलं असेल? जेह्वा, शक्य होतं तेह्वा बेदरकार वागून झालं असेल, अन शेवटी रिकाम्याच राहिलेल्या ओंजळीचा आता पश्चाताप होत असेल? पैलतीराची वाट चालताना आता आपणच आपली वाट कठीण बनवली आहे हे उमगून आणि आता वेळेचं घड्याळ मागे फिरवून आपली चूक दुरुस्त करु शकत नाही, हे लक्षात आल्याच वैफल्य असेल? अंगात रग असताना घरच्या, आपल्या लोकांना, हितचिंतकांना, मित्रांना कस्पटासमान वागवलं असेल आणि तेह्वा उमटवलेले ओरखडे इतके खोल असतील की आता ते पुसणं, अशक्य झालं असेल??

किंवा असं काहीच नसेल, बाकी सगळं ठीकच असेल अन फक्त तो दिवस खराब गेला असेल त्यांना? म्हणून मनातल्या मनात चिडचिडून वैतागल्या मूडमधे असतील त्याच दिवशी फक्त?

उगाच नुसते अर्थहीन प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि त्यापायीची वांझोटी खिन्नता....

दुसरा दिवस ठरल्यासारखा पार पडला, रिसेप्शनला पोचल्यावर मी खरेदी केली हे खूप चांगलं झालं ह्याचीही खात्री पटली, पण त्या दुकानातून बाहेर पडताना जी अस्वस्थता आली होती, ती मात्र मनातून जायला तयार नव्हती. उगाच अपराधी वाटत राहिलं.....

आता या सार्‍याला एक आठवडा उलटून गेलाय. अपराधीपणाची जाणीव बोथट होत चाललीच आहे शेवटी - त्याबद्दलही लाज वाटते मधूनच - पण अजूनही त्या गृहस्थांच्या शब्दांचा टोन आठवतो. आठवायचा अवकाश, की, अस्वस्थता एखाद्या लाटेसारखी परतून अंगावर येतेच!

कधीतरी परत त्या दुकानात शिरायचं धाडस करेन....

April 3, 2008

मी का लिहिते?

मी का लिहिते? ह्म्म्म्म... प्रांजळपणे सांगायच तर,माहीत नाही!! आत्तापर्यंत तरी माहीत नव्हतं असं वाटतंय - किंवा कदाचित कुठे तरी आत मनाच्या गाभार्‍यात ते उत्तर जाणवलंही असेल कधीतरी, तरी ते नेणीवेतून जाणीवेत आलेलं नाही - आणि कधी हे उत्तर शोधायचा जाणीवपूर्वक असा कधी प्रयत्नही केला नाही. आता करावा म्हणते...

खर तर संवादिनीने खो दिला, तेह्वा तिचाच लेख वाचला आधी अन एकदम एक दडपणच आलं मनावर!! इतक सुरेख लिहिलंय तिने अन मी काय लिहू आता असं वाटल!! पैठणीला पोतेर्‍याचं ठिगळ लावलं तर कसं वाटेल?? मग, त्यानंतर उत्सुकता स्वस्थ बसू देईना, म्हणून, आतापर्यंत सगळ्यांनी लिहिलेलं वाचलं अन मी खरं सांगायचं तर या खो मधून नाव काढून घ्यायचा विचार केला, मला हे असं इतकं ग्रेट लिहिता येत नाही.... पण, मग म्हटलं, एक प्रयत्न माझाही. कोणालाच नाही आवडलं समजा, तरी निदान आपल्याला तरी समजेल काहीतरी परत एकदा नवीन आपल्याविषयीच कदाचित.....

खर तर मुद्दाम असा कधी विचारच नाही केला यावर. जसा श्वास अत्यावश्यक, तसच लेखनही . वाचनही. कदाचित लिखाणातून स्वत:चा स्वत:शी चालणारा अखंड संवाद मला भावतो? किंवा, मी स्वत:च स्वत:ला उलगडते बहुधा... आत्ता इथे लिहायला बसलेय, का लिहावसं वाटत आणि खर सांगायच तर काय लिहू हा प्रश्नच पडलाय!! श्वास घेताना, मी हा प्रत्येक श्वास का घेतेय हा विचार तरी कुठे केला होता कधी??

माझं शब्दांवर प्रेम आहे, असोशी आहे मला त्यांची. आणि, मनात येणारे विचार, अनुभवलेल्या घटना, क्षण शब्दांत मांडताना समाधान मिळतं. लिहिताना मन शांत शांत होतं जात. बर्‍याचदा, असंही होतं की जे पाहिलं आहे, त्याचा, एखाद्या क्षणी जे लिहिते त्याच्याशी लेखालेखी संबंधही नसतो खर तर, पण कशावरून काहीतरी तिसरंच आठवतं!! मग जे वाटतय ते लिहिल्याशिवाय चैन नसतं जिवाला. मग लिहायचं, काय करणार? नाविलाज को कोई विलाज नहीं!!

हसाल आता, पण एक वेगळी वहीपण आहे माझी. इथे ब्लॉगवर मी मांडू इच्छित नाही किंवा कधीकधी धजावत नाही, ते मी वहीत उतरवते. अगदी आतलं, मनातलं. काही अनुभव आणि क्षण, अनुभूती फक्त स्वत:साठीच असतात ना? तर, फक्त माझी, माझ्यासाठीची अशी ती वही. बरचसं मनातलं असं मी त्या वहीत वेळोवेळी उतरवलय. यापुढेही उतरवणार आहे. जाणवलेलं सुख, अनुभवलेल्या वेदना, काही काही अतिशय वैयक्तिक असे क्षण, अनुभव, आठवणी, स्वत:च्या चुकांची कबुलीही, स्वप्नं... बरंच काही साठलंय त्या वहीत.

लिहिणं, तसं कोणाशी बोलण्यापेक्षा सोपं असतं, कारण, वही माझ्याविषयी कसलेही पूर्वग्रह बाळगत नाही, किंवा नवीन मतं तयार करत नाही. माझिया मनीचे, फक्त ती वही ज़ाणते. माझ्यासारख्या, मनातलं पटकन बोलून न दाखवू शकणारीला लिहिणं लहानपणापासूनच तुलनेनं सोप वाटलय, म्हणून मी लिहिते.

हे लिहिता लिहिता सांगावसं वाटलं म्हणून - शाळेतल्या एक शिक्षिका, मला लिहायला सतत प्रोत्साहन देत, त्यांना खूप आवडायच मी लिहिलेलं, अस त्या मला नेहमीच सांगायच्या. नंतर कॉलेजला गेल्यावर एकदा त्या मला भेटल्या अन मी कला शाखा निवडायच्या ऐवजी इंजिनीअरींगला गेले म्हणून खूप हळहळल्या! तुझं लिखाण थांबवू नकोस मात्र गं पोरी असं कळकळीने दहादा तरी म्हणाल्या, अर्थात त्यात त्यांच्या माझ्यावरच्या मायेचा भागच अधिक होता, पण त्या मायेचं माझ्यावर न संपणारं ऋण आहे, म्हणून मी लिहिते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि इतर कोणाशी नाहीच रहायला जमलं तरी स्वत:शी प्रामाणिक रहायला मी लिहिते. आणि काय सांगू?

संवादिनी, मनापासून आभार तुझे, तू मला खो दिलास म्हणून मला हे इतक्या जणांचं इतकं सुरेख लिखाण वाचायला मिळालं.

मी कोणाला खो देऊ? माझा खो सर्किटला.