November 10, 2009

गमते उदास..

खरं तर हे, असले श्रद्धांजलीवाले लेख लिहायला मला मुळीच आवडत नाही! जमत तर त्याहूनही नाही! मुळात, ज्यांच्या निधनामुळे काही हरवलं आहे असं वाटावं, अशी माणसं बोटांवर मोजण्याइतकीही नसतात, आणि अशी माणसं कायमची उठून गेल्यावर काय सुचणार लिहायला तरी? तेह्वा, मग लिहिणार तरी काय... तरीसुद्धा, सुनिताताई, तुम्हांला, तुमची एक वाचक म्हणून काही सांगावसं वाटलं, म्हणून ह्या लेखनप्रपंचाचा प्रयत्न.

तसा आपला संबंध फक्त लेखिका आणि वाचक ह्या कुळीतला. एवढाच. खरंतर, एकतर्फीच संबंध, म्हणजे, मीच एक वाचक म्हणून, प्रथम तुमच्या लिखाणाशी आणि नंतर, लिखाण वाचता वाचताच कधीतरी आपसूक तुमच्याशी जोडलेला.

तुमच्यासारखं, लिखाणातून क्वचितच कोणी इतक्या कसदार आणि निर्भयपणे प्रतिबिंबित होत असेल.. की झालं असेल, म्हणू आता? कळतेपणी तर नाहीच, पण नकळतसुद्धा इतर कोणापाशी, इतक्या सहजासहजी स्वत:कडे कमीपणा घेण्याचा मनाचा मोकळॆपणा असेल, स्वत:च्या चुका, घोडचुका, क्वचित प्रसंगीचा करंटेपणा इतक्या स्वच्छपणे, सरळ साध्या शब्दांत, वस्तुनिष्ठपणे मांडायचं धैर्य असेल असं वाटत नाही. हे असं तुम्ही कसं लिहू शकलात? कुठेही स्वत:ला वा कोणालाच झुकतं माप नाही, फुकटची स्तुती नाही, उगाचच भरीचा मीठ मसाला नाही! जे जसं आहे, होतं, जसं घडलं, तसंच आणि तेवढंच. नेहमीच. कोणतीही सारवासारव न करता, नसते, अर्थहीन लटके खुलासे न करता, कोणत्याही सबबींचा आधार न घेता, एवढं प्रांजळ लिखाण करायची विलक्षण अशी हातोटी, तुम्ही कशी साधलीत? ह्या एका लखलखीत आणि दुर्मिळ गुणामुळे तुम्ही मला खूप खूप आपल्या वाटलात! वाचक म्हणून सुनिता देशपांडे ह्या लेखिकेशी माझे सूर कायमचे जुळून गेले...

तुमचं लिखाण वाचताना मला नेहमी ह्या ओळी आठवतात,

कडाडणारी वीज नव्हे जी
जाळून टाकील अवघ्या जगतां
शिशिर ऋतूतील गोठविणारा
हा थंडीचा नव्हे गारठा
गर्भरेशमी सौंदर्याची
सुरेख नाजूक निसर्गलेणी
अधरांवरती अवतरलेली
राजस हळवी सुरेल गाणी...

असं काहीसं आहे तुमचं लिखाण. तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच. म्हणून तर तुमच्या लेखणीतून उतरलेलं परखड आणि तरीही आपलंसं वाटणार लिखाण मनाचा ठाव घेणारं ठरलं. वाचताना कुठेतरी तुमच्याशी संवाद साधला गेला, आणि निर्भीड असलं, तरी त्या लिखाणातला सात्विकपणा, कळत नकळतसा हळवा, हळुवार भाव मनात घर करुन राहिला, नेहमीच. साध्या शब्दांत, किती परिणामकारक, उत्कट आणि मनाला स्पर्शून जाणारं, अंतर्मुख करणारं लिहिलंत तुम्ही.... तुमचं लिखाण वाचताना, कधी कधी, हेच, अगदी हेच, आपल्याही मनात येऊन जातं, गेलेलं आहे, असं वाटत रहायचं, आणि मग तुमच्याशी अधिकच जवळीकीचं नातं जडत गेलं. तुम्हांलाही कवितांची असोशी आहे, असं कळलं, आणि जीव सुपाएवढा झाला! तुम्ही मूळ कोकणातल्या हे कळलं, आणि मनातल्या मनात, कोकणातल्या लाल रस्त्यांवरुन तुमच्या संगतीने मीही फिरुन आले. अगदी, न पाहिलेल्या धामापूरच्या तळ्याच्या आणि देवळाच्या परिसरातही भटकले... आपली कोकणातली माणसंच मनस्वी, नाही? तुमच्या मनस्वी लिखाणाचे गूढ थोडेफार उकलले का?....

किती आणि काय, काय सांगावसं वाटतं... पण तुमच्यासारखी शब्दकळा माझ्यापाशी नाही. अंतरीच्या गाभ्याला हात घालण्याची ताकद माझ्या शब्दांत नाही. तुम्ही तुमच्या शब्दकळॆच्या रुपाने सतत सोबत आहातच, पण तरीही तुम्ही आता लौकिकार्थाने ह्या जगात नसणार आहात, ह्याचं अत्यंत शब्दातीत असं दु:खही आता माझ्या मनात कायमचं कुठेतरी गोठून राहील.... त्याला इलाजच नाही ना! अणि काय सांगू?

सुनीताताई, आता मात्र खरोखरच, गमते उदास.......

October 10, 2009

झुरळे, पाली आम्हां सोयरी...

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या... :)

पहिलं घर छानच होतं, भरपूर प्रकाश येणारं घर. बंगळुरुमधे प्रकाशमान घर मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे म्हटलं! पण मग सद्ध्याच घर बदललं, कारण, घरमालक आता त्याच्या घरी रहायला येणार होता. हे नवं घर तस जुनं आहे, बैठं. हेही छान आहे, लहान आहे, त्यामुळे आवराआवरी आणि साफसफाई पटकन होते! जमेची बाजू. घेताना घरमालकाने नवीन रंग वगैरे काढून दिलं होतं, त्यामुळे पाली, झुरळं नसतील असं मी समजून चालले होते. पण कसलं काय! नवीन घरात सामान आणून टाकलं, व्यवस्थित लावलं, तोपर्यंत ही मंडळी दबा धरुन बसली होती की काय कोणास ठाऊक! मग एकेक झुरळं बाहेर पडायला लागली, ही एवढाली! कधी नव्हे ती मी १०-१२ झुरळं तरी मारली असतील! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! फक्त त्यांना माझी भीती वाटायचय ऐवजी मला त्यांची भीती वाटते! तरीपण, हिय्या करुन मारलीच! सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणतात हे हेच असावं! :D

असो. तर झुरळं मेली, राहिलेल्यांवर हीट आणून मारलं, मग ती मेली. राहता राहिल्या पाली. स्वयंपाकघरात एक, तिथल्या ओट्यावर फुदकणारी. स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते! दिवाणखान्यात बहुधा दोन असाव्यात, आणि झोपायच्या खोलीत दोन. एकूण ५ आहेत, मला ठाऊक असलेल्या. तसं, आम्ही एकमेकींना टाळायचोच. त्याही अन् मीही. त्यामुळे ठीकठाक एकमेकींचा अंदाज घेऊन वावर चालायचा. काहीही केलें तरी उपयोग नसतो, पाली कुठेही जात नाहीत बहुधा.

मध्यंतरी घरी गेले. परत आल्यावर काही तरी वेगळे वाटले खास. माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही. नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली!

अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की प्रेग्नंट आहेत वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली! आत्ता झोपायच्या खोलीतली एक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धावली! आली, आली! :) दुसरी कुठेय काय माहित! स्वयंपाकघरातली गुल्लच आहे! असो बापडी. आणि आज एक छोटुलंही दिसलं त्यांच! माझी शंका बरोबर होती म्हणायची! एकूण सगळ्या पालींमध्ये एक पालोबाही आहे वाटत! देवा रे! वाचव!

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे, नायतर पालीला दिली भिंत आणि पाल घरभर पसरी, असं व्हायचं! भूतदया गेली खड्ड्यात!

काय म्हणता?

September 29, 2009

पिवळ्या पंखांचा पक्षी

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय!

September 28, 2009

काही संवाद, काही विषाद...

हे आपलं असंच मनात आलेलं, काहीबाही सुचलेलं आणि तसंच्या तसं गिरगटवलेलं लेखन. एका वाक्याचा कदाचित पुढच्या वाक्याशी काही संबंधही नसेलही! :) क्षणात इथे, क्षणात तिथे, असं काहीसं. थोडंस दिशाहीन, आणि कदाचित बयापैकी अर्थहीन, पण आत्तातरी आहे हे असं आहे! :)

सद्ध्या काही दिवस, एक असा आपला-आपला असा स्वत:चाच मूड आहे, वेगळाच. अलिप्त आणि तरीही सर्वसमावेशक. स्वत:साठीचा म्हणू फारतर..... किंवा मग सुनिताबाईंनी म्हटल्याप्रमाणे, "आताशा मी नसतेच इथे" असा काहीसा. त्यांनी म्हटल्यासारखं, - कोणाला भेटू नये, कोणी येऊन डिस्टर्ब करु नये, एकटेच बसावे, स्वत:तच रहावे- असा. स्वत:ला पुन्हा एकदा स्वत:ची ओळख पटवून देईलसा, आणि अशी ओळख पटवून घेताना हमखास अंतर्मनात डोकावायला लावणारा.

मी लहान असताना रात्री आज्जीच्या तोंडून गोष्टी ऐकत झोपणं हा नेहमीचा कार्यक्रम. माझ्या केसांमधून अत्यंत मायेनं आपली खरखरीत बोटं फिरवत तिनं सांगितलेल्या गोष्टी अजूनही आठवतात, उपदेशात्मक वगैरे अश्याही कधी कधी असायच्या ह्या गोष्टी, आणि मग, शेवटी कधीतरी आईपण कधी काही सांगत असे, आईचा उपदेश, म्हणजे थोड्या अधिक स्पष्ट शब्दांतला उपदेश! :D अजूनही करते म्हणा, पण आता तिच्यापासून दूर असल्याने, तोही सुखकारक वाटतो फोनवरुन ऐकायला. आज्जी करायची तो उपदेशही कसा, तिच्यासारखाच मायेच्या शब्दांत गुरफटून यायचा! हे आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, आईचं एक वाक्य असायचं तेह्वा उपदेशातलं, तिला, तिची आते, आई जेव्हा लहान होती, तेह्वा सांगायची म्हणे. ते वाक्य म्हणजे, दुसयांच्या डॊळ्यांत हवी तेवढी धूळफेक करता येते, पण स्वत:च्या मनाला फसवणं शक्य नसतं.... सद्ध्याच्या मूडसंदर्भात हे वाक्य एकदम फिट्ट! :) अर्थात, तिला ही कबूली द्यायला काही जात नाही म्हणा मी... :)))) :D

आज्जीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेली मी, आणि तिचं केसांमधून बोटं फिरवणं आणि गप्पा मारणं अजूनही कधी कधी एखाद्या चित्रासारखं माझ्या डॊळ्यांपुढे तरळतं. जुन्या सिनेमांमधून फ्लॅशबॅक वगैरे दाखवायचॆ ना, तसं... किती सुंदर दिवस होते... आपलं वय वाढतं हे एकवेळ ठीक, पण आजी आजोबांची का बरं वाढतात? पण, सगळ्यांचीच वयं वाढत राहतात, आणि पाहता, पाहता, जुनी माणसं, त्यांचे प्रेमळ, मायस्थ असे जिवाला धीर देणारे स्पर्श, त्यांनी मारलेल्या प्रेमळ हाका, केलेल्या गप्पा, ठेवलेली लाडाची नावं, फक्त आठवणींत राहून जातात... आणि खरंच, म्हणता, म्हणता किती आठवणी मनामधे जमा होत राहतात.. आश्चर्य वाटतं. लहानपणापासून जमा होत राहणाया आठवणी. सतत भरच, गळती अशी नसतेच त्यांना, आणि अजूनही भर पडणारच असते.. मन म्हणजे खरोखरच अजब चीज असावी! पुन्हा कुठले संदर्भ कुठे आठवतील आणि कुठली आठवण कधी कुठे उसळी मारेल, हा एक अजूनच अजब प्रकार. असो.

कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वत:शी आणि इतरांशी पूर्ण शंभर टक्कॆ प्रामाणिक असू शकते का? स्वत:शी किंवा इतरांशी? हो? खरंच? नक्की?

माझं उत्तरही काही वर्षापूर्वी ’हो’ असंच होतं. :) कॉलेजमधे असताना एकदा आमच्या ग्रूपने ह्या प्रश्नावर गंभीर चर्चा केलेली आणि मग नंतर हसत खिदळत सुखाने खादंती केलेली आठवते! कसले सही दिवस होते! विश्वही बयापैकी मर्यादित होतं, माहित असलेले मित्र मैत्रिणी आणि आजूबाजूचे लोक होते. आज ते दिवस आठवले की स्वत:च्या तेव्हाच्या भाबडेपणाचा जणू पुन्हा एकदा नव्याने साक्षात्कार होतो! :D खरं सांगायचं, तर त्यावेळच्या बावळट माझा हेवाही वाटतो. :) तर, प्रश्न असा, की शंभर टक्क्याची अट पाळायला जमते का, जसजसं आयुष्य पुढे पुढे सरकत रहातं, तशी? प्रत्येक वेळेला? आणि १००% टक्के म्हणजे एकदम बावनकशी १००% हां! जराही हिणकस नाही चालणार. आणि खोटं म्हणजे अगदी भलं मोठं, आभाळ कोसळवणारं, आपला रथाची चाकं जमिनीला लागतील, असं खोटं असायला पाहिजे असं नाही, अगदी लहान सहान गोष्टींमधून कधी ना कधी किंवा बर्‍याचदा आपण एकतर स्वत:ची प्रतारणा करत रहतो किंवा इतरांची तरी. त्याला इलाज नसतो बहुधा. कदाचित हे असंच चालत आलय, युगानुयुगं. कोणास ठाऊक... आणि सगळ्यात वैताग कधी येतो ठाऊकाय? :) घरी जायला साधारण ३० ते ३५ मिनिटं राहिलेली असतात, दिवसभराच्या कामाचा आढावा दिवस संपवायच्या तयारीने घेतला जात असतो, आणि इतक्यात डोक्यावर बॉस येऊन उभा राहतो. दुसया दिवशी, त्याच्या बॉस लोकांबरोबर त्याची मीटींग असते, आणि त्यासंदर्भात काही टेक्निकल डिटेल्स बोलायचे राहूनच गेलेले असतात, आणि प्लीज, ते आताच जरा १५-२० मिनिटांत डिस्कस करणं आवश्यक असतं! नानाची टांग! :D हे अर्थात, मनातल्या मनात मात्र! समोर? हो, हो, चला, चला करुन टाकू पटकन, म्हणत आमची टीम १५-२० मिनिटं काहीतरी चबड चबड करते! आता हे आपलं असं मजेत लिहिलंय, बॉसला जरा खलनायक बनवलं की कसं छान वाटतं! तेह्वा मनात खूप वैताग झालेला असतोच! :) पण आता तो नोकरी बदलतोय, आणि आता येणारा नवा बॉस खरंच वैतागवाडी आहे! :( मला आठवलेली म्हण? आगीतून निघून फुफाट्यात! भ्यां...... हं, असो.

बाकी, एरवी ऑफिसमधे सर्व वेळेस, मीटींगमधे, एवढंच काय, तिथून लॅपटॉपची धोकटी खांद्यावर टाकून , आपापल्या कॅबमधे जाऊन बसेपर्य़ंत सगळ्यांच्या चेहयावर हुकूमी "प्रोफ़ेशनल" हसू केह्वाही असतंच. प्रसन्न व्यक्तीमत्व नको का वाटायला?? मग? :) प्रामाणिक रहायचं, प्रामाणिक जगायचं वय असतं, हेच खरंय की काय? कधीतरी लक्षात येतं, हे बेटं मनही तसं हुशार झालंय हल्ली! बेरकी झालंय. आपण मनाला फसवतो की तेच आपल्यावर कुरघोडी करतं आणि परिस्थितीशी जुळवून वगैरे शांतपणे, सुखाने जगायला शिकतं? टू मच गुंता! कधीतरी त्या मनालाही आईचा उपदेश आठवतो वाटतं, आणि मग आपलीच परीक्षा घ्यायला लागतं! मज्जाच आहे सगळी.... की हे सगळं असंच असतं आणि आपल्या मूडनुसार आपण घटनांचे, आपल्या आणि इतरांच्या वागण्याचे अन्वयार्थ लावतो? त्यातही आपली सोय पाहतो का? नक्कीच बहुधा. प्रतिक्षिप्त क्रिया होत असावी. काय माहित...

आणि हे? हे रहिलंच! जपायची फारशी इच्छा नसलेल्या किंवा काही अनुभवांमुळे म्हणा, घटनांमुळे म्हणा, न राहिलेल्या अशा ओळखी? एखाद्या व्यक्तीशी मित्रत्वाचे नाते जोडायला सुरुवात झालेली असावी किंवा मैत्र असावं, आणि अवचित लक्षात आलेले अश्या व्यक्तीचे मातीचे पाय, आणि त्यामुळे झालेला मन:पूर्वक वैताग आणि चिडचिड! काय करावं? मित्र मैत्रिणी तुमच्या चांगुलपणाला गृहित धरायला सुरुवात करतात, आणि मैत्री हळूहळू विरत जाते. सुंदरशी संध्याकाळ, गडद, एकसुरी अंधार्‍या रात्रीत विरत जाते तशी. तुमच्याही आत काहीतरी मरत, उसवत जातंच कुठेना कुठे तरी. नातेवाईकांबद्दल असं झालं ना, तर वाटणारी चिडचिड एवढी त्रासदायक नसते; पण हेच तुमचं मैत्र पणाला लागलं की? जास्त त्रास होतो का? का बरं? मित्र मैत्रिणींची निवड आपण केलेली असते म्हणून बहुधा. नातेवाईक (काही काही बरका! :D) जसे आपल्याला जन्मापासूनच आंदण असतात, तसे हे धागे नसतात ना...हे तुम्ही स्वत: निवडलेले, पारखून घेतलेले वगैरे वगैरे. अशा नात्यांबद्दल झालेला भ्रमनिरास म्हणजे आपली हारच की एका अर्थी! तीच पचवायला जड जाते का? समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो? पण कोणाच्याही वागण्याचा असा ठराविक साचा कुठे असतो नाहीतरी?

आणि तरीही, आजूबाजूला, जीवनाचा म्हणा, आयुष्याचा म्हणा, कोलाहल अव्याहत वाहत असतो. सगळ्या कोलाहलाबरोबर कळत नकळत आपणही त्याच कोलाहलाचा एक भाग बनून वाहत राहतो, इच्छा असो वा नसो. खरोखर किती वैचित्र्यपूर्ण आहे ना? चरैवैती, चरैवैती?

बोरकरांची कविता आठवली,

राग नाही, रोष नाही, खोल थोडा आहे विषाद
या देहाची मातीच अशी!.. प्रेमासंगे जमतो प्रमाद
पाण्याखाली गाळ जसा, ज्योतीखाली छाया जशी
प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी
पण असा अकस्मात आपलाच आपणां लागता तळ
वरची ज्योत उजळ होऊन खालचे पाणी होते निवळ
कळ्ले मोकळ्या हवेत उन्हांत फुलासारखा फुलतो प्राण
मूळचा मळ गिळता गिळताच आतून निर्मळ मिळते त्राण
वार्‍या उन्हासारख्या तुला मोकळ्या आहेत दाही दिशा
मुक्तीसाठीच जखमी उरांत फुलत असतात उषा निशा
वाटल्यास खरेच विसर मला... पण सतत फुलत रहा
व्यथा माझी स्मरलीच तर.. तिच्यांत नवे क्षितीज पहा
करु नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद
पूजा खरी असॆल तर त्याचा देखील होईल प्रसाद.

सह्ही आहे ना?

कोण्या एका पुस्तकात राल्फ वाल्डो इमर्सनच्या म्हणण्यानुसार सगळ्यात यशस्वी माणसाची व्याख्या अशी दिली होती, - " खूपदा आणि खूप हसणारे; बुद्धीमान लोकांचा आदर आणि मुलांचं प्रेम जिंकणारे; प्रामाणिक समीक्षकांकडून वाहवा मिळवणारे आणि वाईट मित्रांचा विश्वासघात सोसणारे; सौंदर्याला दाद देणारे; दुसयांमधल्या चांगल्या गोष्टींची दखल घेणारे; हे आयुष्य सुकर गेलं, कारण आपण ते जगलो, असं मानणारे लोक हे यशस्वी समजावेत.." सोपं नाही, पण कठीणही नाही... तमसो मा ज्योतिर्गमय..।

आता नंतर लिहिते.. :)

September 22, 2009

रंग माझा वेगळा

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!

July 1, 2009

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे....च्यां निमित्ताने!

मिसळपाववरचा हा लेख. लेखावर उत्तम चर्चाही सुरु आहे. ती चर्चा वाचून मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच.

मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्‍या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत.

उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा.

संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?

उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्‍याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे,

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll
एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll

(गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर)

थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो.

ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो.

माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.

तुकोबाराय म्हणतात,

अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll


हेच ना संस्कार?


क्रमशः....

June 28, 2009

तिच्या डायरीचं शेवटचं पान..

तिची मूळ डायरी कधीपासून वाचायची होती. डायरीतून ती अधिक समजेल का, असं एक कुतुहल, थोडीशी अपेक्षा, थोडी उत्सुकता... पण काही काही पुस्तकं वाचायचा योगच यावा लागतो. समोर पुस्तक असलं तरी त्याचं आपल्या नशीबात वाचन असल्याशिवाय त्या वाचनाची सुरुवात होत नाही, हेच अनेक अंतिम सत्यांपैकी एक!! तशीच ही डायरी. अ‍ॅनीची डायरी. ही डायरी, तिच्या पूर्ण आणि कोणत्याही प्रकारे संपादित न केलेल्या रुपात मला हवी होती. तशी मिळते. त्यामुळे मागच्या वेळी पुण्याला गेले होते तेह्वा मिळाली, तशी उचललीच लागलीच. पुन्हा परत आल्यावर कामाच्या वाढत्या जंजाळात बुडून गेले. डायरी वाचायची राहूनच जात होती.

अ‍ॅनी काही मला अनोळखी नाहीये तशी. जगात अनेक लोकांना ठाऊक आहे, तशीच मलाही ठाऊक आहे. आंतरजाल, पुस्तकं, अधून मधून वृत्तपत्रांमधून येणारे लेख... पण म्हणून आजवर मी तिच्यामध्ये कधी इतकी गुंतले नव्हते. मध्यमवर्गीय मनाला जितकी आणि जशी हळहळ वाटते, तशीच माझीही अ‍ॅनीसाठी वाटणारी हळहळ. पुरात वाहून जाणार्‍या व्यक्तीला पाहून काठावरच्या व्यक्तीला वाटणारी हळहळ जशी असते ना, तशीच. अ‍ॅनी हे एक उदाहरण झालं, पण एकूणच मध्यमवर्गीय हळहळीची जातकुळीच अशी. बेफाम, बेफाट, झोकून देणारं असं काही बर्‍याचदा परवडणारं नसतं हे तिच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला पक्कं ठाऊक असतं. असो.

हवा तसा वेळ काही मिळत नव्हता आणि डायरी तशीच पडून राहिली होती. आधीच म्हटलं ना, एखादं पुस्तक वाचायचा योगही असावा लागतो. बाकी बाबतीत ठाऊक नाही पण पुस्तकांच्या बाबतीत तरी "जब जब, तब तब" हेच अंतिम सत्य! किती दिवस झालेत, शांतपणे वाचन करण्याचा योग साधलेला नाही. काहीतरी कामं निघतातच. घरची, नाहीतर ऑफिसची. कुठे बाहेर जावं लागत, कुठे काही. ह्या सगळ्यात वाचनाच्या नावाने मात्र मोठ्ठा भोपळा आहे, आणि तो वाढिता वाढिता वाढे, भेदिले शून्यमंडला, ह्या गतीने वाढतच चालला आहे, ही एक जाणीव नेहमी त्रास देते. ( हे एक लिहिताना आठवलं म्हणून, डेक्कन जिमखान्यावरचं क्रॉसवर्ड बंद करुन तिथे हल्लीच्या शून्य शरीरयष्टीवाल्यांच्या टिचभर कपड्यांचं दुकान सुरु केलंय! पुस्तकांचं दुकान बंद करुन कपड्यांचं दुकान! कुठे फेडाल ही पापं? :( क्रॉसवर्ड काही पुस्तकांच्या दुकानांचा मानदंड नव्हे, हे मलाही ठाऊक आहे, पण मुद्दा तो नाहीये. पुस्तकांचं दुकान बंद करुन, कपड्यांचं दुकान सुरु केलं हा मुद्दा, का तर म्हणे, तिथला भाडेपट्टी करार संपला! अरे, मग वाढवा ना! पुस्तकांचं दुकान महत्वाचं नाहीये का? उत्कर्ष आणि पॉप्युलर आहेत म्हणा, आणि आमचा अब चौकपण आहेच म्हणावं. बsssरं......असूदे.)

आणि त्यादिवशी डायरी हातात घेतली, आणि डायरी वाचण्याआधी पुस्तकाच्या शेवटी लिहिलेला उपसंहार (Epilouge) वाचायची बुद्धी झाली. फक्त एका पानाचा उपसंहार आहे, पाठपोठ लिहिलं आहे म्हणून फारतर दोन पानं म्हणूयात. एका पाठपोठ पानावर मागे पुढे लिहिलेली माहिती. अ‍ॅनीची डायरी जिथे १ ऑगस्ट १९४४ ला थांबली, तिथून पुढे अ‍ॅनीचं आयुष्य कसं गेलं ह्याची संक्षिप्त माहिती ह्या एका पानात मिळते. बस्स, एका पानात संपू शकलं, एवढंच तिचं १ ऑगस्टनंतरचं आयुष्य! ते पान पहिल्यांदा वाचताना काय वाटलं, किंवा आजही काय वाटतं, हे शब्दांत सांगता येणं केवळ कठीण! एक प्रकारचा सुन्नपणा अवतीभवती साकळल्यासारखा झाला खरा. वस्तुनिष्ठपणे, कोणताही भावनिक आव न आणता दिलेली माहिती वाचता वाचता कधी अंगावर येउन आदळली, लक्षातही आलं नाही. भयानक अस्वस्थ व्हायला झालं. आजही होतं. छिन्न, विछिन्न झाल्यासारखं वाटतं. तिने लिहिलेलं शेवटचं पत्रही असंच. अतिशय अस्वस्थ करुन जाणारं. निरागसपणा हरवलेल्या लहानग्यांच्या अंगी आलेला मोठेपणा सहन होण्यासारखा नसतो, नाही?

हे डायरीचं शेवटचं पान वाचताना मनात येणार्‍या निरर्थक प्रश्नांना उत्तरं तरी आहेत का?

मार्च १९४५ मध्ये अ‍ॅनी मृत्यू पावली. तिची शेवटची इच्छा होती, ती म्हणजे, मृत्यूनंतरही चिरकालीन सगळ्यांच्या स्मरणात असावं अशी.

तुला कोण विसरेल गं?

May 17, 2009

प्रार्थना

मी छंद वापरुन याआधी कधी लिहिले नाही. हा एक छोटासा प्रयत्न. जाणकारांनी काही चुका असल्या तर जरुर दाखवून द्या, अशी विनंती.

नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..

चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...

तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...

शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...

May 16, 2009

मी, कॅमेरा आणि माझा बाबा

अगदी लहानपणापासून, फोटोग्राफी म्हणजे काय हे कळत नसतानाही घरातला आजोबांचा कॅमेरा खूप आवडायचा. कालांतराने तो न वापरण्याने म्हणा, किंवा काय माहिती का ते, पण जवळ जवळ निकामी झाला. आताही तो आहे माझ्याकडे, असाच ठेवलाय जपून, केवळ आवडायचा म्हणून आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून.

कॅमेराबद्दलची दुसरी आठवण आहे, ती, मी शाळेत होते, आणि कॅमेराचं वेड होतंच, आणि स्वप्नंही पहायची ती कधीतरी मी इतका मस्त कॅमेरा घेईन ना.. ह्याचीच.. आणि एका वाढदिवसाला मला माझ्या बाबाने कॅमेरा आणून दिला! मी अवाक् झाले होते! कॅमेरा आवडत असला म्हणून काय झालं? तो हाताळण्याची काहीच अक्कल नव्हती, किंवा, आजूबाजूला कोणी फारसं कॅमेराबद्दल शिकवणारं, असंही नव्हतं. मीच काय, माझ्या शाळामैत्रिणीही अवाक् झाल्या होत्या आणि मी उगाच (आणि अर्थात) खूप भाव खाल्ल्याचं आठवतं! :) अगदी उच्च आणि अति उच्च मध्यमवर्गीय घरातल्या मुलींनाही अशी वाढदिवसाची भेट मिळाली नव्हती. तेह्वा तर बाबा ग्रेट वाटलाच, पण आता विचार करताना बाबाचा इतका अभिमान वाटतो! हॅट्स ऑफ रे तुला!

मनाने साधा मोकळा पण तत्वं आणि मूल्यांना पक्का असा माझा बाबा. बर्‍याचदा त्या मूल्यांची किंम्मत चुकवण्यासाठी, खूप खडतर प्रसंग त्याने पाहिले. त्या अनुषंगाने व्यावहारिक आयुष्यात येणारे सारे मानसिक, काही प्रमाणात आर्थिक त्रासही भोगले. असं असतानाही, त्या काळी, आपल्या लेकीसाठी, तो कॅमेरा आणण्यासाठी त्याने स्वत:च्या किती गरजा तेह्वा कमी केल्या असतील, हा विचार जेह्वा कधी माझ्या मनात येतो, तेह्वा तेह्वा माझ्या घशात अडकल्यासारखं झाल्याशिवाय रहात नाही. सद्ध्याचा कॅमेरा घेतला, तेह्वा त्यालाच पहिला फोन केला, आणि सांगितलं, कॅमेरा घेतला! त्याच्याइतकं माझं कॅमेरावेड कोणाला माहित असणार आहे! आज जुन्या बंगलोरात जाऊन नायकॉन वापरुन फोटो काढताना, मला सारखं हेच डोक्यात येत होतं आणि बाबा आठवत राहिला सारखा.

तसं पाहिलं तर माझा बाबा काही बोलघेवडा नाहीये. मी आणि बाबा सतत गप्पा मारत बसलो, असं कधी आठवत नाही. त्याच बरोबर, त्याच्याशी गप्पा मारायला कोणत्याही विषयाची बंदी नव्हती - नाही, हेही खरच. जेह्वा कधी बोललो वा बोलतो, खूप भरभरुन बोललो. कोणताही प्रश्न आजवर त्याने टाळलेला नाही, तू लहान आहेस, तुला काय समजतय, म्हणून आधीही डावलला गेला नाही, किंवा आताही नाही. अगदी कोणत्याही विषयाबद्दलच्या मताची खिल्ली उडवली गेली नाही. एखादं मत पटणारं नसेल, किंवा माझं काही चुकत असेल तरीही चर्चेतून समजावणार. तेह्वाही, आताही.

हे सारं खूप महत्वाचं असत, आत्मविश्वास वाढवणारं ठरत. माणूस म्हणून कसं जगावं हे मी माझ्या घरातली माणसं पाहून शिकलेय नेहमी.

मी पहिलीत असताना, शाळेच्या वार्षि़क स्नेहसंमेलनात माझा जिप्सी नाच बघायला आलेला आणि बसायला जागा नसली तरी उभ्याने सगळा कार्यक्रम पाहणारा बाबा आठवतो अजून. माझ्या लहानपणी तासतासभर माझ्या केसांना तेल लावून देणारा बाबा, शाळेत असताना जेह्वा शाळेतर्फे खेळांमध्ये भाग घेत असे, तेह्वा आवर्जून खेळ बघायला येणारा बाबा, एकदा त्याच्याबरोबर जात असताना, रस्त्यावरच्या मवाल्याने धक्का द्यायचा प्रयत्न केलेला पाहून भर रस्त्यात त्याची गचांडी पकडणारा बाबा. बर्‍याच व्यवधानांमधून जेह्वा मी मास्टर्स पहिल्या वर्गात पूर्ण केलं, तेह्वा मनापासून सुखावलेला बाबा. त्याचा आजही धाक आहे अन् तो माझा मित्रही आहे. मी त्याच्याशी काहीही बोलू शकते. अगदी काहीही. त्याची मला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याने मला स्वतंत्र विचार करायला शिकवलं आहे. असो.

नंतरही पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर एक कॅमेरा मिळाला, परदेशी प्रवास केले तेह्वा फिल्मवाले कॅमेरा घेतले, बाजारात नवीन, नवीन जेह्वा डिजीटल कॅमेरा आला, तोही घेतला... आणि आता हा नायकॉन डी ६०. कधी तरी आता अधिक जास्त क्षमतेची लेन्स किट वगैरे घेईन, आणि बाबाला उत्साहाने फोन करेन.. बाबा, मी आज लेन्स घेतली.. फोनमधून तो अतिशय संयत अशी प्रतिक्रिया देईल, "छान हं.." पण त्याच्या मनातून ओसंडणारं समाधान माझ्यापर्यंत आपसूक पोहोचलेलं असेल, आणि माझा उत्साह त्याला तिथे समजला असेल. बाबाला सगळं समजतं, बर्‍याचदा न सांगताही कळतं.

माय बाबा स्ट्राँगेस्ट!

May 10, 2009

निवडुंग

निवडुंग वा तत्सम प्रजाती म्हटलं की सहसा काटेरी वनस्पती डो़ळ्यांपुढे येते. ह्या वर्गात मोडणार्‍या काही वनस्पती मात्र अत्यंत देखण्या दिसतात.

अश्याच एका झुडुपाचं प्रकाशचित्र टिपायचा केलेला प्रयत्न.

कोमेजतो कधी का निवडुंग कुंपणाचा,
फुललो जराजरासा, गळणार मी कितीसा..
-अभिजीत

मूळ गझल इथे पहा.

April 5, 2009

चांदणगोंदणी


ताडमाड वाढणारे अशोक वृक्ष परिचयाचे होते, पण त्याला लगडणारी फुलं ऐकूनच ठाऊक होती. इथे, बंगलुरुत ती फुलंही पाहिली! वरपासून खालपर्यंत चांदण्यांसारख्या हिरव्या फुलांनी आणि पोपटी, सोनेरी कोवळया पर्णसंभारांनी फुललेले, नटलेले अशोकवृक्ष अतिशय देखणे दिसतात मात्र!

दृष्टीला सुखाचा सोहळा!

March 19, 2009

दुज्या गावच्या वाटा

इतक्यातच, थोडेथोडके नाही तर, चांगले पंधरा दिवस घरी जाऊन काही कामांनिमित्त राहणं झालं, आणि वरुन अजून बोनस दिल्यासारखे दोन -तीन दिवस मिळाले. अर्थात, घरुन ऑफिसचं काम करायचं, ही अट होतीच. पण घरी आणि माझ्या माणसांमध्ये इतके दिवस रहायला मिळणार असेल, तर अश्या कित्येक अटी अगदी हसत हसत सर ऑंखोंपर!

आणि म्हणता म्हणता पंधरा अधिक बोनस दोन, तीन दिवस संपलेदेखील. कालचा शेवटचा दिवस. उगाच एकदम इतकं वाईट वाटायला लागलं परत जायचं म्हणून, की काय सांगावं! आणि पंधरा दिवस रहा,चार दिवस रहा, की एक दिवस - ह्याने काहीच फरक नाही पडत. दर वेळी, पुण्याहून बंगलोरला परत येताना मला अगदी साता समुद्रापार चालल्यासारखं वाईट वाटतच. खरं तर इतकं कठीणही नाही बंगलोरहून पुण्याला येणं,म्हणजे पहायला गेलं तर साता समुद्रापलिकडून येणार्‍या व्यक्तीला जसं अन् जितकं प्लॅनिंग करुन वगैरे यायला लागतं, त्याच्या निम्म्यानेही त्रास नाही! पण तरीही, दर वेळी नव्यानं, परत तेवढंच दु:ख होतं. याउलट बंगलुरुहून सुटलेल्या माझ्या विमानाने (म्हणजे मी ज्या विमानात बसलेली असते ते विमान - मल्ल्या आणि इतर प्रभृती मला ही सेवा पुरवतात :D - त्यामुळे आकाशात अधिक प्रदूषण नको, ह्या विचाराने सवताचं इमान न्हाय घ्येतलं पघा! :P हेहेहे! :D ) पुण्याचा विमानतळ गाठला की मला दरवेळेस अगदी पहिल्यांदा बंगलोरहून पुण्याला आलेल्यावेळी जसा आनंद झाला होता, तस्साच आनंदही होतो! माझ्यातलं पुणं आणि क्वचित प्रसंगी पुणेरीपण मिटायला काही तयार नाही.

यावेळी ठरवलेली जास्तीत जास्त कामंही उत्तमरीत्या पार पडली. काही बाबतीत हत्तींचे कळप गेलेत आणि शेपटं राहिलीत. तशी खूप मजाही केली यावेळी पुण्यात. पुस्तकांची खरेदी (रसिक साहित्यमधून व्यवस्थित डिस्कांऊटसकट १०-१२ पुस्तकं -झिंच्याक, झिंच्याक, झिंच्याक, झिन् झिन् च्याक!! :) ), बोमलूशी ओळख अन् मग एकदम व्यवस्थित दोस्ती, रस्त्यावर मिळणार्‍या कुल्फ्या अन् बर्फाचे रंगीत गोळे खाणे (टुकटूक!), मित्रमैत्रिणींना भेटणे, शॉपिंग - म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे - मस्त पांढर्‍या रंगाची सुरेख डिझाईन्स असलेली सुती कापडं पाहणं हाही एक सुरेख अनुभव आहे, खरेदी करणं हा अजूनच सुंदर अनुभव! :D आणि हे पुरसं नाही म्हणून, नेहमीच्या शिंप्याकडून सांगितलेल्या वेळेत, कुठेही न चुकवता ते ड्रेसेस शिवून मिळणं! शिका म्हणावं बंगलोरमधल्या शिंप्यांना! अज्जिबात शिलाई जमत नाही बंगलोरी शिंप्यांना! एकतर झोळणे बनवतात, नाहीतर त्याहून काहीतरी विचित्र! कापडाची वाट लावायचं काम मात्र इमाने इतबारे करतात. असो. पुण्यातला तो शिंपी आणि बंगलोरचा तो कापडफाड्या! ;) आणि घरी पण खूप गप्पा झाल्या. एकदम मस्त वाटलं अगदी.

तर सांगायचा मुद्दा हा, की पुण्यातलं वास्तव्य सुखेनैव पार पडलं. जीव समाधानी झाला. काल मात्र परत निघायचं म्हणून जामच वाईट वाटत होतं, मलाही अन् घरच्यानांही, पण आपलं सगळेच एकमेकांना ते जाणवू नये असं "नॉर्मल" वागायला बघत होतो, प्रयत्न करत होतो. एकमेकांची अशी मनं जपण्यातही खूप समाधान आहे.

खूपश्या गोष्टी करायच्याही राहिल्या. माझ्या एक खूप लाडक्या शिक्षिका आहेत, त्यांना फोन करायचा राहिला. अजूनही काही पुस्तकं हवी होती, ती न मिळाल्याने घ्यायची राहिली. नाही मिळालीत. :( सगळ्याच मित्रमैत्रिणींना भेटता आलं नाही. घरातलीही काही कामं राहिलीत, ती आता पुढच्या वेळेला. अजून थोड्या गप्पा मारायच्या राहिल्या घरच्यांशी आणि शेजारी राहणार्‍या एक दोन काकवांशी. आहेत काकवा,पण मस्त जमतं माझं त्यांच्याशी. माझ्या फुलझाडांची जरा मशागत करायची होती, तेही राहिलच जरा धावपळीत रोजच्या.

काल रात्री झोपताना उगाच आपलं 'उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा' हे मनात घोळत राहिलं. कधीतरी झोप लागली, अन् आज पहाटे उठून परत एकदा विमानतळावर. बोमलू मुख्य फाटकापर्यंत सोडायला आला, अन् गोंधळलेल्या चेहर्‍याने तिथेच थबकला. मी आपली दुज्या गावच्या वाटा अन् वार्‍याच्या दिशेने निघाले होते.

परत एकदा ह्या दुज्या गावच्या वाटाही जुन्या आणि परिचित होतील, पण त्या शेवटी आहेत दुज्या गावच्याच.. त्या माझ्या गावच्या नाहीत!

March 12, 2009

बोमलू!
हा आमचा बोमलू!:) अतिशय डांबरट, खेळकर आणि एक नंबरचा नाटक्या!:) लिहिते याच्या गंमती कधीतरी :) बोमलूची आई आमच्याच परीसरात राहणार्‍या कोणी पाळली होती. तिला चार पाच पिल्लं झाली, त्यातला एक हा बोमलू. पिल्लं झाल्यानंतर, एक बोमलू सोडून बाकीची त्यांनी कोणा कोणाला देऊन टाकली. तेवढ्यात तिला काही आजार झाला, तर काळजी घ्यायच्याऐवजी तिलाच सोडून आले कुठेतरी... :( आणि हे पिल्लू आमच्या सोसायटीमधे आणून टाकलं. सुरुवातीला म्हणे,सगळ्यांनी बोमलूला हाकलायचा प्रयत्न केला, पण बोमलूने हर एक के दिल में जगह बनाही ली! :D

आता बोमलू सगळ्यांचाच लाडका झालाय! आणि त्या लब्बाड बोक्यालापण ते ठाऊकाय अगदी!

March 10, 2009

घर

घराचं महत्त्व माझ्या मनाला नेहमीच वाटत आलंय.

खरं पाहिलं तर भटकायला मला खूप आवडतं. मागच्या जन्मात मी भटकी जिप्सी किंवा नोमाड असणार नक्की! आणि भटकंती करायला माझी कधीही ना नसते, बरं, पुन्हा, फार ऐषोआरामात प्रवास करायला मिळावा वगैरे काही चोचलेही नसतात माझे. मस्तपैकी एखादी धोकटी पाठीवर मारुन मस्त कलंदर बनून प्रवास करायला मिळावा, हे माझं कधीकाळपासूनचं उराशी जपून ठेवलेलं स्वप्न आहे, आणि ते बर्‍याच अंशी बहुधा स्वप्नच राहणार आहे.

नॅशनल जिऑग्राफिक किंवा अ‍ॅनिमल प्लॅनेटवर, भटंकती करणारे अन् वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटी देणारे महान लोक पाहिले, की मला त्यांचा हेवा वाटल्याखेरीज रहात नाही. एक तर असं मस्त काम करा आणि त्यातून कमवा पण! कसलं ग्रेट! असलं काहीतरी मला जमायला हवं होतं, हे आयटी मधे रमण्यापे़क्षा... कसली धमाल आली असती! आत्ता सुद्धा कधी तरी मला मधेच हुक्की येते की शोधून तरी पाहू, माहिती तरी काढू की हे काम करण्यासाठी काय पात्रता लागेल वगैरे... आणि ते फूड नेटवर्क वाले! खाण्याच्या नावाखाली चॅनेलच्या खर्चाने फिरतात मस्तपैकी! अरे माणसांनो, गेल्या जन्मी नक्की पुण्यं तरी काय केलीत रे!! जाउंदेत.

अर्थात, आयटी विश्वातल्या नोकरीमुळे थोडंफार जग पहायला मिळालं, हा ही एक आनंदाचा भाग आहेच, अन् त्याचबरोबर, भारताबाहेरचंही भटकून झालं, पण अजून पूर्ण भारत काही बघून झालेला नाही, ह्याचाही एक विषाद आहे. भारत जाऊच दे, पण पुणे आणि त्याच्या सभोवतालचा परीसर, आणि आता बंगलोरला असते तर, बंगलोर अन् त्याच्या सभोवतालचा परीसर संपूर्णपणे मी पाहिलेला नाही! कारणं आहेतही आणि नाहीतही. नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यात हे असलं काही नेहमीच, किंवा जसं बसवायचं असतं तसं बसवताच नाही येत बर्‍याचदा, ज्या कोकणाचा मला मनापासून लोभ आणि अभिमान आहे, ती कोकणपट्टीही मी तुकड्यांतच पाहिली आहे, आणि तशीच मनात साठवली आहे.आनंद एवढाच की कधीतरी अवचित रीत्या अशी संधी येते अन् एखादी अतिशय सुंदरशी अनुभुती देऊन जाते.

अश्याच एक दोन आठवणी, सांगायचा मोह आवरत नाही म्हणून सांगते.

मध्यंतरी एकदा बंगलुरुच्या आसपास फिरायचा योग आला. बंगारु तिरुपती म्हणून एक देवस्थान पहायला आम्ही जाणार होतो. त्यादिवशी माझ्या कुंडलीत प्रवासाच्या सुखाचे ग्रह फार उच्चीचे असावेत. बंगलुरुमधून बाहेर पडलो, अन् पावसाला सुरुवात झाली. तोही कसा, असा रिमझिमणारा पाऊस, मधेच जरासाच जोरात येणारा, पण एकूणात प्रवास सुखकर बनवणारा असा पाऊस! हवा, उन्हं, वातावरण, आजूबाजूची हिरवाई सगळं काही एकसे एक बढकर असं होतं. अख्खा प्रवासच सुखकर रीत्या चालला होता... बरं, पावसाची एक मजा म्हणजे, जिथे आम्ही थांबायचो, पाय मोकळे करायला खाली उतरायचो, तिथे तोही थांबायचा. चिंब भिजलेला दूरदूरवर पसरलेला देखणा "ऋतू हिरवा" पाहून डोळे आणि मन सुखावलं होतं.

देवस्थानापाशी पोहोचलो तेह्वा एक कोपर्‍यातल्या अश्या त्या देवस्थानात गर्दी नसल्याचं पाहून खूप आनंद वाटला. पाऊस थांबत चालला होता, एखाद दुसरा चुकार, रेंगाळलेला थेंब, संपत आलेली पावसाची सर, झाडांमधून निथळणारे थेंब हे एवढंच. ओल्या हवेतला मातीचा गंध आत झिरपता झिरपता हळू हळू मन कधीतरी शांत होत गेलं असणार. नेहमीच्या रामरगाड्यात नोकरी, आणि रोजच्या धावणार्‍या आयुष्यात मन काय म्हणतय, कुठे आहे, काय करतय हे पहायची उसंत तरी कुठे? त्यामुळे मग असं काही घडलं की जरा वेळानंच लक्षात येतं खरं!

आजूबाजूची निरव, पण प्रसन्न शांतता आम्हांला हळू हळू वेढून टाकत होती. देऊळ असं जरा डोंगरातच होतं, खूप उंच असंही नाही, पण जरासं चढावरच. काळ्या डोंगरात बनवलेल्या मोठ्या पायर्‍या. वेलांची कमान. दगडातल्या प्रवेशद्वारापाशी मोठा नाग कोरलेला - कोरलेला की वेगळा बनवून तिथे प्रवेशद्वारावर चढवलेला ते नीटसं आठवत नाही, पण लक्षात येईल असा ठळकसा होता खरा. वर जाता जाता एक दोन चुकार देवळं, आणि वर बंगारु तिरुपती. वरचं काम सगळं संगमरवरी. अतिशय छोटासा गाभारा, इन मिन देव बाप्पा अन् त्यांचे पुजारी मावू शकतील असा. अतिशय अंधारा. करायचाय तरी काय मोठ्ठा गाभारा? अणूरेणूतही भरुन उरणार्‍या परमात्म्याला चार भिंतीच्या गाभार्‍याचं काय सोयरसुतक असणार? त्याचं हे घर सर्व प्रकारच्या भक्तांच्या सोयीसाठीच असावं बहुधा.

गाभार्‍यात आरती उजळून पुजारी बुवांनी तिरुपतीच्या चेहर्‍यासमोर ती धरली. अंधारलेला गाभारा क्षणभरात तेजाळून गेला. तिरुपतीच्या चेहर्‍यावरचं प्रसन्न हास्य अधिक खुलवणारा ज्योतीचा स्निग्ध प्रकाश हळूहळू अंधाराची जागा घेत सगळीकडे पसरत होता. बघता बघता अंधारलेला गाभारा प्रकाशमान भासायला लागला. पावसाळी, ओली, सांजावलेली, प्रसन्न हवा, आणि आत स्निग्ध प्रकाशात नाहून निघालेल्या गाभार्‍यात प्रसन्नपणे हसणारा तिरुपती.... पुजारीबुवा, जराही घाई न करता, शांतपणे, सुस्पष्ट स्वरात, नाद लयीत मंत्र म्हणत होते. एक गारुडच झालं होतं जणू काही. कसलीशी शांत समाधानी वृत्ती सभोवताली पसरुन राहिली होती. तो परीसर मनात साठवून घेत, थंड वार्‍याच्या झुळुकींचं सुख भोगत, थोडावेळ शांत उभं राहून हे सगळं चित्र मनात जपायचा प्रयत्न केला. याहून उत्तम अनुभव काही असूच शकणार नाही असं म्हणत गाभार्‍याच्या मागच्या बाजूला गेलो, वरुन खालचं दृश्य बघायला म्हणून.. आणि तिथेच थबकलो! आत्तापर्यंत अनुभवलं, ते मनात झिरपतय म्हणेपर्यंत हे अजून एक सौंदर्यस्थळ समोर आलं! खाली काही अंतरावर दोन बुचाच्या फुलांची झाडं, फुलांनी लगडून गेली होती. अंधारत चाललेल्या त्या संध्याकाळी, सावळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर, ओलसर वातावरणात, दोन्ही झाडांना अक्षरशः चांदण्या फुलल्याचा भास झाला! केवळ अवाक् होऊन ते दृश्य आम्ही पहात राहिलो! शब्दातीत अनूभूतीला शब्दांनी मलीन तरी का करा!

फक्त त्याक्षणी माझ्याकडे कॅमेरा नसल्याचं मला खूप खूप वाईट मात्र वाटलं. अर्थात, असता तरी ते सौंदर्य जसंच्या तसं, मला पकडता आलं असतं की नाही, कोणास ठाऊक. बर्‍याचदा फोटो काढताना मला हे जाणवतं की, जे आहे त्याच्या दशांशानेही कधी कधी कॅमेरात पकडता येत नाही! असो. खूप खूप समाधानाने आणि थोड्याफार अनिच्छेने तिथून निघून आलो. परत जायची इच्छा आहेच, पण परत तसाच माहौल जुळून येईल याची खात्री नाही...

दुसरी आठवण आहे ती माणगावची. तिथे श्री वासुदेवानंद सरस्वतींचा मठ आहे, तिथे दर्शनाला गेलो होतो. निसर्गरम्य ठिकाण आहे. दर्शन वगैरे होऊन परत फिरलो अन् कसं कोण जाणे, पण जाताना नजरेतून हुकलेलं एक जुनं असं श्री शंकराचं देऊळ दिसलं, आणि देवळासमोर छोटसं तळं होतं, ते कमळांनी भरलेलं! किती म्हणजे किती सुंदर दिसावं ते तळं! हेही चित्र टिपायचा योग नव्हताच! आजतागायत विसरु मात्र झालेलं नाही, हेच एक भाग्य! :) असो. आठवणींमुळे मूळ पोस्ट भलतच भरकटलं खरं.

तर, कशासंबंधी बोलत होतो, तर, भटकंती आणि घर.

कितीही भटकंती केली ना, तरी थकून भागून परतून यायला, भटकताना आलेल्या अनुभवांची पोतडी परत एकदा सोडून त्या पसार्‍यात हरवून जायलाही एक स्वतःची अशी जागा हवीच ना? त्यासाठी घर हवं. सद्ध्या घरी आहे नेहमीपेक्षा जास्त दिवस. घरुनच काम सुरु आहे, बॉसची कृपा! बॉस फणस आहे, म्हटलच होतं ना मी... या वेळेस अगदी शिक्कामोर्तब त्यावर.

घरी रहाणं, घरचं जेवण... जगी सर्वसुखी सद्ध्या मी आहे! :)

परवा रात्री जाग आली, पाणी पिण्यासाठी म्हणून उठले. आपल्या घरातला अंधारही सोबतीच. तिरुपतीला गाभार्‍यातला अंधार असाच सोबती वाटत असेल ना? आपल्याच पायाखालच्या वाटा, म्हणून अंधारातच स्वयंपाकघरापर्यंत पाणी प्यायला गेले. स्वयंपाकघराचं दार लोटता आत जाताना देवघरातल्या छोट्याश्या दिवलीच्या उजेडाची तिरीप येऊन अंधारात मिसळलेली दिसली. म्हटलं तर अंधार, म्हटलं तर उजेड. इतकं आश्वस्त, मायस्थ वाटलं.. घराचं रुपडं एकदम आश्वासक वाटलं, बर्‍याच दिवसांनी घरी आलेल्या माझं, मनापासून स्वागत करणारं.

घर असच असत. एकदा आपलं म्हटलं की बांधून ठेवतं. कुठेतरी खोल आपल्याही मनात कायमचं रुजतं. तिरुपतीही वर्षभर भक्तांच्या मागण्या मान्य करुन थकून भागून त्या अंधार्‍या गाभार्‍यात येऊन विश्रांतीसाठी राहतो आणि तिथे सुख पावतो म्हणे. ते त्याचं घर. त्याचं विसाव्याचं ठिकाण.

February 22, 2009

चाफा बोलेना...ह्म्म.. लिहिणार होते, त्याशिवाय फोटो टाकायचा नाही असं ठरवलं होतं, कारण मुख्यत्वे ब्लॉग सुरु केला ते काही बाही खरडायला! आता ते मागे पडून फोटो टाकणं सुरु झालय! :P पण, हा एक फोटो मलाच खूप आवडला, आणि इथे पोस्टावासा वाटला म्हणून मग पोस्टतेच. तसाही पेशन्स कमीच आहे माझ्यामधे! :D

आणि दुसरी सबब अशी की,एक काहीबाही खरडून अर्धवट ठेवलंच आहे आणि ते पोस्टणारच आहे लवकरच. तोपर्यंत एवढी सूट मिळायाला काय हरकत आहे? नाही म्हणजे, नसावी, नसूदेत. ... :D

February 15, 2009

फुले माझी अळूमाळूहल्ली छायाचित्रणाचं भूत डोक्यावर चढल्यापासून लिखाण एकदम थंड पडलय! आता हा फोटू शेवटचा हां, म्हणजे या फोटूनंतर काही बाही लिहिल्याशिवाय फोटू टाकणे नाही, नाही, नाही!! :)

February 11, 2009

पळभर म्हणतील...

आज बर्‍याच दिवसांनी एक सहकारी भेटली. सद्ध्या तिची अन् माझी हापिसची वेळ एकच नाही, मग भेटी होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी हापिसची एकच वेळ असल्याने आणि एकाच गाडीमध्ये असल्याने आम्ही भेटत असू. हळू हळू ओळख झाली, मूळ दिल्लीची, पंजाबी. बोलकी, गप्पिष्ट. सूत जुळायला कितीसा उशीर? खूप गप्पा व्हायच्या. मग, असंच एकदा बोलता बोलता तिने वडिलांविषयी सांगितलं होतं.

पंजाबी माणूस मुळातच हिंमतीचा, कष्टाला मागे न सरणारा, हे तिच्या वडिलांच्या आठवणी ऐकताना परत एकदा मला जाणवलं. स्वतःचे लहानपणातले पंजाबमधले दिवस, तिथे केलेली मौजमस्ती, वडिलांच्या आठवणी सांगताना ती आणि ऐकताना मी, अश्या दोघीही हरवून गेलो होतो. मला तर, पंजाब की मिट्टी, उसकी सुहानी खूशबू, मक्की दी रोटी और सरसोंका साग, लस्सी, हरेभरे खेत, आणि त्या खेतांमध्ये भांगडा करणारे लोकही दिसायला लागले होते!! करण जौहर, सुभाष घई आणि तत्समांचा जयजयकार!! मग हे कुटुंब दिल्लीला आलं, आणि तिथेही हिच्या वडिलांनी अफाट कष्ट करुन बस्तान बसवलं आणि अल्पावधीत बर्‍यापैकी नावही कमावलं. एकूणच आपल्या वडिलांविषयी बोलताना ती अतिशय आत्मीयतेने बोलायची. पंजाबी उच्चारांच्या लहेज्यातलं तिचं हिंदी ऐकायलाही गोड वाटायचं कानांना. दर दोन वाक्यांनंतर खळखळून हसणं! खोटं, खोटं नव्हे, मनापासून! खूप छान सोबतीण मिळाली होती मला.

मग एकदा एके दिवशी खूपच विमनस्क वाटली... विचारल्यावर समजलं की वडिलांना कर्करोगाचं निदान झालं आहे, अन् ते उशीरा समजलंय. बर्‍यापैकी उशीरा. तेह्वा आता फक्त वाट पाहणे, जितकं काही सुसह्य म्हणून करता येईल, तेवढं आणि तितकं करणे, एवढंच हातात राहिलेलं तिच्या अन् तिच्या बहिणींच्या. ते तर सुरुच होतं.... पण कुठेतरी एक आशा असतेच ना आपल्या व्यक्तीसाठी? कधी कधी वडिलांची प्रकृती व्यवस्थित असली की खुष असायची अन् कधी कधी गप्प गप्प.. पापा कधीतरी नसतील, ही शक्यता पचवता येत नाहीये म्हणायची.

मग आमच्या वेळा बदलल्या, अन् संपर्क राहिला नाही. ती तिच्या आयुष्यात गर्क अन् मी माझ्या. आज बर्‍याच दिवसांनी भेटली, आणि मी वडिलांविषयी चौकशी केली, तेह्वा कळालं की ते आता या जगात राहिले नाहीत. २० जानेवारीला त्यांचं निधन झालं. एकदम ऐकल्यावर दोनेक मिनिटं काय बोलावं हेच सुचेना! दोघी एकमेकींकडे पहातच राहिलो, नि:शब्द! काय बोलायचं अश्या वेळी? तिच्या खांद्यांभोवती हात टाकून तिला थोपटलं... दोनेक मिनिटांनी तीच म्हणाली, बीस को गये वोह, फिर मैं चार तारीख को निकल आयी.. रुककर क्या करना? अब तो कोई नहीं बचा उधर... निकल आयी| बस्, आखिरी वक्तमें साथमें रह पायें...

पुन्हा इथे येऊन परत एकदा इथल्या तिच्या आयुष्यात रुळली आहे. खूप बरं वाटलं. तिला दु:खी बघायचं नाहीच आहे मला. अर्थात, मन दुखावलं असणारच आहे तिचं, पण तिचं स्वतःचंही कुटुंब आहे, आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या आधाराने ती पुन्हा एकदा सावरेल, सावरतेय.

पण त्याचवेळी परत एकदा जाणवलंय की काळ कोणासाठीच थांबत नाही हेच खरं! एखाद्या व्यक्तीशिवाय जगणं हे कितीही अशक्यप्राय वाटत असलं, तरी काळ सारं काही शक्यतेत बदलतो.... वडील कधी नसू शकतील ह्या शक्यतेला पचवता येत नाही असं जेह्वा तिला वाटत होतं, तेह्वाच तिच्या मनाने, हळूहळू कायमच्या ताटातूटीची तयारी करायला सुरुवात केली होती का?आठवणींची तीव्रताही कमी होत जाईल ना?

माझी आज्जी आठवली एकदम! मला लहानपणापासून तिनेच जास्त वाढवलं अन् तिची आणि माझी एकदम गट्टी होती! जशी ह्या पंजाबी मैत्रीणीची आपल्या वडिलांशी. मी नाही माझ्या आज्जीपाशी राहू शकले तिच्या शेवटच्या दिवसांत आणि शेवटच्या दिवशीही.. मी घरापासून दूर होते, आणि घरी पोहोचणंही शक्य नव्हतं.... तिने मला कळवायचं नाही काही, हे निक्षून सांगितलं होतं. तिला माहित होतं, मला यायला जमण्याजोगं नव्हतं. शेवटी तिने माझी आठवण मात्र काढली होती अन् मी मात्र नव्हते तिथे! आज्जी नसलेल्या घरात पाऊल टाकलं तेह्वा किती भकास वाटलं होतं.. कसं जगायचं असच झालं होतं मला काही दिवस. पदोपदी तिची आठवण! काही सांगायला पटकन् तिला हाक मारली जायची. सगळ्या गोष्टी प्रथम आज्जीला सांगायची सवय होती मला, नव्हे, ती माझी मानसिक गरजच होती, पण मग हळूहळू सावरलेच. आज्जी नाही, हे ही स्वीकारलंच. आयुष्य थांबेल असं वाटताना, थांबलं नाहीच, पुढे जातच राहिलय. आज्जीलाही असंच झालेलं आवडणार हे माहिती आहेच मला. तिच्या वडिलांनाही त्यांच्या मुलींच्या बाबतीत असंच, हेच आवडेल ना?

अजूनही मात्र मी, मनातल्या मनात का होईना ,सगळं काही आधी आज्जीलाच सांगते. अगदी दुखलं खुपलेलं, आवडलेलं आणि छोट्यात छोटं, काहीही असलं तरीही!

February 7, 2009

स्वतःच्या ब्लॉगवरील छायाचित्रंस्वतःचा ब्लॉग असलेलं बरं असतं, हे मला परत एकदा नव्यानं उमगलंय! :D आपल्या ब्लॉगवर काहीही वेडंवाकडं लिहा अथवा फारशी उत्तम वा अतिउत्तम नसलेली अशी चित्रं वा छायाचित्रं टाका! काहीही करा! तेह्वा हे अजून एक छायाचित्र! आजच एकीकडून माझे फोटो भलतेच बेक्कार आहेत व ते मी उगाच का प्रकाशित करतेय वगैरे बरंच ऐकायला मिळालं. नेहमीसारखेच आहेत, काही वेगळेपणा नाही आहे त्यांच्यामध्ये, करायचेच म्हणून करतेय का वगैरे आणि तत्सम बरंच काही..... एकीकडे मजाही वाटत होती! राग आला का? खरं सांगायचं, तर नाही आला. फारसं काहीच नाही वाटलं..असो. खरच इतके बेक्कार आहेत का? असतीलही.

मी म्हणते, असेनात का बेक्कार! मला आवडलेत ते काढताना. मला ते जसजसे कॅमेरात बंदिस्त करायला सापडत गेलेत, ते सगळे क्षण मी खूप मनापासून एंजॉय केलेत. मग त्यांवर पिकासा, फोटोशॉप वगैरे मध्ये काम करताना मला खूप आनंद मिळालाय. ते फोटो पहायलाही मला छान वाटत. माझ्या कष्टांचे आहेत ना ते! तर, मी ते माझ्या ब्लॉगवर आणि जिथे म्हणून माझं म्हणून हक्काचं असं ब्लॉगचं पान आहे तिथे ते मी टाकणारच!

माझ्या असलेल्या ब्लॉगवर आणि माझ्या हक्काच्या पानावर मी काढलेली छायाचित्रं प्रकाशित करायचा मला पूर्ण हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!! :D हे सगळं पण लिहिलंय म्हणजे काय, असंच, माझ्या ब्लॉगवर लिहायचा मला हक्क आहेच! म्हणूनच.. ;)

टीका करा, कोणत्याही शब्दांत करा, पण ती किती मनावर घ्यायची हे मीच ठरवणार ना? :)

February 5, 2009

बोगनवेलीचं फूलपिकासामधे काही इफेक्ट्स वगैरे वापरुन प्रयोग करायचा प्रयत्न केलाय. हल्लीच शिकतेय ना! किडे करायची सवय जात नाही! सूचना, सल्ले (फोटोग्राफीविषयक फक्त! :D ) आवडतील. काही मतं असतील तर जरुर सांगा. चांगलं दिसत नसेल तर तसं सांगा. जोर के धक्के देने हो, तो दिजिये, मगर धीरेसे! :D

January 27, 2009

ज्योत दिव्याची..ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी...

January 18, 2009

एक चित्र

हे चित्र कसे काढले अशी विचारणा काही जणांनी केली होती, तेह्वा जे उत्तर दिले होते, तेच इथे डकवते.

खास असं काही वेगळी पद्धत वापरुन वगैरे मी चित्र काढलेलं नाहीये. सहज हातानेच काढलय मायक्रोसॉफ्ट पेंट वापरुन, आणि भरपूर खोडाखोडी वगैरे करुन! आधी ग्रे रंगाची बॅकग्राउंड करुन घेतली. मग त्यावर केलय. तसं शेडींग सोपं पडेल असं वाटलं, आणि ते तसं सोपं पडलंही. चित्र काढताना - म्हणजे काढण्यासाठी झूम करुन घेतले होते. ग्रे बॅकग्राऊंडवर मग काळा आणि पांढरा रंग वापरला. झूम वरुन नॉर्मलला आणल्यावर लहान झाले आहे चित्र खूपच. म्हणून इथे थोडे मोठे करुन टाकले, ते थोडे ब्लर झाल्यासारखे वाटते. मला वाटतं की ग्रे रंगाच्या वापराने तसे वाटत असावे...


January 3, 2009

.. :)

भले बुरे जे घडून गेले,
विसरुन जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर..

कसे कोठूनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतूर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर..

एक छोटीशी विश्रांती दोस्तहो.. :)