September 29, 2009

पिवळ्या पंखांचा पक्षी

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय!

September 28, 2009

काही संवाद, काही विषाद...

हे आपलं असंच मनात आलेलं, काहीबाही सुचलेलं आणि तसंच्या तसं गिरगटवलेलं लेखन. एका वाक्याचा कदाचित पुढच्या वाक्याशी काही संबंधही नसेलही! :) क्षणात इथे, क्षणात तिथे, असं काहीसं. थोडंस दिशाहीन, आणि कदाचित बयापैकी अर्थहीन, पण आत्तातरी आहे हे असं आहे! :)

सद्ध्या काही दिवस, एक असा आपला-आपला असा स्वत:चाच मूड आहे, वेगळाच. अलिप्त आणि तरीही सर्वसमावेशक. स्वत:साठीचा म्हणू फारतर..... किंवा मग सुनिताबाईंनी म्हटल्याप्रमाणे, "आताशा मी नसतेच इथे" असा काहीसा. त्यांनी म्हटल्यासारखं, - कोणाला भेटू नये, कोणी येऊन डिस्टर्ब करु नये, एकटेच बसावे, स्वत:तच रहावे- असा. स्वत:ला पुन्हा एकदा स्वत:ची ओळख पटवून देईलसा, आणि अशी ओळख पटवून घेताना हमखास अंतर्मनात डोकावायला लावणारा.

मी लहान असताना रात्री आज्जीच्या तोंडून गोष्टी ऐकत झोपणं हा नेहमीचा कार्यक्रम. माझ्या केसांमधून अत्यंत मायेनं आपली खरखरीत बोटं फिरवत तिनं सांगितलेल्या गोष्टी अजूनही आठवतात, उपदेशात्मक वगैरे अश्याही कधी कधी असायच्या ह्या गोष्टी, आणि मग, शेवटी कधीतरी आईपण कधी काही सांगत असे, आईचा उपदेश, म्हणजे थोड्या अधिक स्पष्ट शब्दांतला उपदेश! :D अजूनही करते म्हणा, पण आता तिच्यापासून दूर असल्याने, तोही सुखकारक वाटतो फोनवरुन ऐकायला. आज्जी करायची तो उपदेशही कसा, तिच्यासारखाच मायेच्या शब्दांत गुरफटून यायचा! हे आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, आईचं एक वाक्य असायचं तेह्वा उपदेशातलं, तिला, तिची आते, आई जेव्हा लहान होती, तेह्वा सांगायची म्हणे. ते वाक्य म्हणजे, दुसयांच्या डॊळ्यांत हवी तेवढी धूळफेक करता येते, पण स्वत:च्या मनाला फसवणं शक्य नसतं.... सद्ध्याच्या मूडसंदर्भात हे वाक्य एकदम फिट्ट! :) अर्थात, तिला ही कबूली द्यायला काही जात नाही म्हणा मी... :)))) :D

आज्जीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेली मी, आणि तिचं केसांमधून बोटं फिरवणं आणि गप्पा मारणं अजूनही कधी कधी एखाद्या चित्रासारखं माझ्या डॊळ्यांपुढे तरळतं. जुन्या सिनेमांमधून फ्लॅशबॅक वगैरे दाखवायचॆ ना, तसं... किती सुंदर दिवस होते... आपलं वय वाढतं हे एकवेळ ठीक, पण आजी आजोबांची का बरं वाढतात? पण, सगळ्यांचीच वयं वाढत राहतात, आणि पाहता, पाहता, जुनी माणसं, त्यांचे प्रेमळ, मायस्थ असे जिवाला धीर देणारे स्पर्श, त्यांनी मारलेल्या प्रेमळ हाका, केलेल्या गप्पा, ठेवलेली लाडाची नावं, फक्त आठवणींत राहून जातात... आणि खरंच, म्हणता, म्हणता किती आठवणी मनामधे जमा होत राहतात.. आश्चर्य वाटतं. लहानपणापासून जमा होत राहणाया आठवणी. सतत भरच, गळती अशी नसतेच त्यांना, आणि अजूनही भर पडणारच असते.. मन म्हणजे खरोखरच अजब चीज असावी! पुन्हा कुठले संदर्भ कुठे आठवतील आणि कुठली आठवण कधी कुठे उसळी मारेल, हा एक अजूनच अजब प्रकार. असो.

कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वत:शी आणि इतरांशी पूर्ण शंभर टक्कॆ प्रामाणिक असू शकते का? स्वत:शी किंवा इतरांशी? हो? खरंच? नक्की?

माझं उत्तरही काही वर्षापूर्वी ’हो’ असंच होतं. :) कॉलेजमधे असताना एकदा आमच्या ग्रूपने ह्या प्रश्नावर गंभीर चर्चा केलेली आणि मग नंतर हसत खिदळत सुखाने खादंती केलेली आठवते! कसले सही दिवस होते! विश्वही बयापैकी मर्यादित होतं, माहित असलेले मित्र मैत्रिणी आणि आजूबाजूचे लोक होते. आज ते दिवस आठवले की स्वत:च्या तेव्हाच्या भाबडेपणाचा जणू पुन्हा एकदा नव्याने साक्षात्कार होतो! :D खरं सांगायचं, तर त्यावेळच्या बावळट माझा हेवाही वाटतो. :) तर, प्रश्न असा, की शंभर टक्क्याची अट पाळायला जमते का, जसजसं आयुष्य पुढे पुढे सरकत रहातं, तशी? प्रत्येक वेळेला? आणि १००% टक्के म्हणजे एकदम बावनकशी १००% हां! जराही हिणकस नाही चालणार. आणि खोटं म्हणजे अगदी भलं मोठं, आभाळ कोसळवणारं, आपला रथाची चाकं जमिनीला लागतील, असं खोटं असायला पाहिजे असं नाही, अगदी लहान सहान गोष्टींमधून कधी ना कधी किंवा बर्‍याचदा आपण एकतर स्वत:ची प्रतारणा करत रहतो किंवा इतरांची तरी. त्याला इलाज नसतो बहुधा. कदाचित हे असंच चालत आलय, युगानुयुगं. कोणास ठाऊक... आणि सगळ्यात वैताग कधी येतो ठाऊकाय? :) घरी जायला साधारण ३० ते ३५ मिनिटं राहिलेली असतात, दिवसभराच्या कामाचा आढावा दिवस संपवायच्या तयारीने घेतला जात असतो, आणि इतक्यात डोक्यावर बॉस येऊन उभा राहतो. दुसया दिवशी, त्याच्या बॉस लोकांबरोबर त्याची मीटींग असते, आणि त्यासंदर्भात काही टेक्निकल डिटेल्स बोलायचे राहूनच गेलेले असतात, आणि प्लीज, ते आताच जरा १५-२० मिनिटांत डिस्कस करणं आवश्यक असतं! नानाची टांग! :D हे अर्थात, मनातल्या मनात मात्र! समोर? हो, हो, चला, चला करुन टाकू पटकन, म्हणत आमची टीम १५-२० मिनिटं काहीतरी चबड चबड करते! आता हे आपलं असं मजेत लिहिलंय, बॉसला जरा खलनायक बनवलं की कसं छान वाटतं! तेह्वा मनात खूप वैताग झालेला असतोच! :) पण आता तो नोकरी बदलतोय, आणि आता येणारा नवा बॉस खरंच वैतागवाडी आहे! :( मला आठवलेली म्हण? आगीतून निघून फुफाट्यात! भ्यां...... हं, असो.

बाकी, एरवी ऑफिसमधे सर्व वेळेस, मीटींगमधे, एवढंच काय, तिथून लॅपटॉपची धोकटी खांद्यावर टाकून , आपापल्या कॅबमधे जाऊन बसेपर्य़ंत सगळ्यांच्या चेहयावर हुकूमी "प्रोफ़ेशनल" हसू केह्वाही असतंच. प्रसन्न व्यक्तीमत्व नको का वाटायला?? मग? :) प्रामाणिक रहायचं, प्रामाणिक जगायचं वय असतं, हेच खरंय की काय? कधीतरी लक्षात येतं, हे बेटं मनही तसं हुशार झालंय हल्ली! बेरकी झालंय. आपण मनाला फसवतो की तेच आपल्यावर कुरघोडी करतं आणि परिस्थितीशी जुळवून वगैरे शांतपणे, सुखाने जगायला शिकतं? टू मच गुंता! कधीतरी त्या मनालाही आईचा उपदेश आठवतो वाटतं, आणि मग आपलीच परीक्षा घ्यायला लागतं! मज्जाच आहे सगळी.... की हे सगळं असंच असतं आणि आपल्या मूडनुसार आपण घटनांचे, आपल्या आणि इतरांच्या वागण्याचे अन्वयार्थ लावतो? त्यातही आपली सोय पाहतो का? नक्कीच बहुधा. प्रतिक्षिप्त क्रिया होत असावी. काय माहित...

आणि हे? हे रहिलंच! जपायची फारशी इच्छा नसलेल्या किंवा काही अनुभवांमुळे म्हणा, घटनांमुळे म्हणा, न राहिलेल्या अशा ओळखी? एखाद्या व्यक्तीशी मित्रत्वाचे नाते जोडायला सुरुवात झालेली असावी किंवा मैत्र असावं, आणि अवचित लक्षात आलेले अश्या व्यक्तीचे मातीचे पाय, आणि त्यामुळे झालेला मन:पूर्वक वैताग आणि चिडचिड! काय करावं? मित्र मैत्रिणी तुमच्या चांगुलपणाला गृहित धरायला सुरुवात करतात, आणि मैत्री हळूहळू विरत जाते. सुंदरशी संध्याकाळ, गडद, एकसुरी अंधार्‍या रात्रीत विरत जाते तशी. तुमच्याही आत काहीतरी मरत, उसवत जातंच कुठेना कुठे तरी. नातेवाईकांबद्दल असं झालं ना, तर वाटणारी चिडचिड एवढी त्रासदायक नसते; पण हेच तुमचं मैत्र पणाला लागलं की? जास्त त्रास होतो का? का बरं? मित्र मैत्रिणींची निवड आपण केलेली असते म्हणून बहुधा. नातेवाईक (काही काही बरका! :D) जसे आपल्याला जन्मापासूनच आंदण असतात, तसे हे धागे नसतात ना...हे तुम्ही स्वत: निवडलेले, पारखून घेतलेले वगैरे वगैरे. अशा नात्यांबद्दल झालेला भ्रमनिरास म्हणजे आपली हारच की एका अर्थी! तीच पचवायला जड जाते का? समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो? पण कोणाच्याही वागण्याचा असा ठराविक साचा कुठे असतो नाहीतरी?

आणि तरीही, आजूबाजूला, जीवनाचा म्हणा, आयुष्याचा म्हणा, कोलाहल अव्याहत वाहत असतो. सगळ्या कोलाहलाबरोबर कळत नकळत आपणही त्याच कोलाहलाचा एक भाग बनून वाहत राहतो, इच्छा असो वा नसो. खरोखर किती वैचित्र्यपूर्ण आहे ना? चरैवैती, चरैवैती?

बोरकरांची कविता आठवली,

राग नाही, रोष नाही, खोल थोडा आहे विषाद
या देहाची मातीच अशी!.. प्रेमासंगे जमतो प्रमाद
पाण्याखाली गाळ जसा, ज्योतीखाली छाया जशी
प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी
पण असा अकस्मात आपलाच आपणां लागता तळ
वरची ज्योत उजळ होऊन खालचे पाणी होते निवळ
कळ्ले मोकळ्या हवेत उन्हांत फुलासारखा फुलतो प्राण
मूळचा मळ गिळता गिळताच आतून निर्मळ मिळते त्राण
वार्‍या उन्हासारख्या तुला मोकळ्या आहेत दाही दिशा
मुक्तीसाठीच जखमी उरांत फुलत असतात उषा निशा
वाटल्यास खरेच विसर मला... पण सतत फुलत रहा
व्यथा माझी स्मरलीच तर.. तिच्यांत नवे क्षितीज पहा
करु नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद
पूजा खरी असॆल तर त्याचा देखील होईल प्रसाद.

सह्ही आहे ना?

कोण्या एका पुस्तकात राल्फ वाल्डो इमर्सनच्या म्हणण्यानुसार सगळ्यात यशस्वी माणसाची व्याख्या अशी दिली होती, - " खूपदा आणि खूप हसणारे; बुद्धीमान लोकांचा आदर आणि मुलांचं प्रेम जिंकणारे; प्रामाणिक समीक्षकांकडून वाहवा मिळवणारे आणि वाईट मित्रांचा विश्वासघात सोसणारे; सौंदर्याला दाद देणारे; दुसयांमधल्या चांगल्या गोष्टींची दखल घेणारे; हे आयुष्य सुकर गेलं, कारण आपण ते जगलो, असं मानणारे लोक हे यशस्वी समजावेत.." सोपं नाही, पण कठीणही नाही... तमसो मा ज्योतिर्गमय..।

आता नंतर लिहिते.. :)

September 22, 2009

रंग माझा वेगळा

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!