February 24, 2008

अजून एक चित्र
सध्ध्या माउस वापरून, चित्र काढून पहायचा छंद लागलाय!! बहुधा हे पण अळवावरचं पाणीच असणार!! :D एक न धड, भाराभर चिंध्या, हेच खर!! असो. (कोकणातल्या व्यक्तिला अळवाची आठवण नाही येणार, तर कोणाला!!:D)


मायबोलीवरील एका स्नेह्यांनी, रेषांच्या बदलाने एकच चित्र कसे वेगळे वाटू शकते, ते दाखवण्यासाठी ह्या चित्रात काही बदल केले. ते हे बदललेले चित्र.

February 18, 2008

चित्र
आज वर्गात बसून शिकताना उगाच रटाळवाणं व्हायला लागलं होतं, शिकण्यात मन लागेना, मग हा उद्योग केला!! असच गंम्मत म्हणून... :) :) MS Paint वापरून केलं आहे.

February 13, 2008

ठळक बातमी???

आज सक्काळी सक्काळी 'एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र' वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. अगदी 'मुख्य पानावरचीच, ठळक' बातम्यांमधली बातमी!! आणि सक्काळीच असली बातमी वाचून मला धन्य, थक्क, आश्चर्यचकीत आणि तत्सम जे काही असतं ते सगळच व्हायला झालं!! ही ती बातमी, तुमच्याही वाचनासाठी.....

ज्या घटनेची बातमी दिलीय, ती घटना खूपच चांगली आहे, यात काही वादच नाही! निष्काम भावनेन सत्कृत्य केल तर त्यापायी मनुष्याला सकाम भावनेन केलेल्या चांगल्या कृत्याच जेवढ पुण्य मिळेल, त्याही पेक्षा कैक पटीने अधिक, अस पुण्य मिळत अस म्हणतात.

वैधानिक इशारा: ही माझी केवळ ऐकीव माहिती आहे!! उगाचच पुण्य कसे मिळवावे वगैरे माहिती घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न वगैरे करू नये!! :D मलाही त्याबद्दल फारशी माहिती नाही!! आपल पुण्यनगरीत असताना मी अस ऐकल होत, म्हणूनच छातीठोकपणे सांगण्याचे धाडस करत आहे!! तिथे सगळेच, सगळ काही खर सांगतात आणि स्पष्ट बोलतात, त्यामुळेच मी त्यावर विश्वास ठेवलाय, आता विश्वास कधीचाच पनिपतच्या गदारोळात गायब झाला म्हणा वा मृत्युमुखी पडला म्हणा..... पण ते नंतर कधीतरी. :वैधानिक इशारा संपला!!!

खरच जर अस काही होत असेल, तर या जवानांना खूप खूप पुण्य मिळाल असेल. नाहीतरी, लाखो करोडो इतर भारतीयांसाठी, त्यांची ओळखदेख नसताना, एक भारतीय, एवढाच सोडला, तर बाकी कोणताही कसलाही संबंध नसताना, अन बाकीची बरीचशी 'भारतीय' म्हणवून घेणारी जनता सर्वसामान्य जवानाविषयी, त्याच्या आयुष्यक्रमाविषयी, त्याच्या चिंता, काळज्या याविषयी पूर्णपणे उदासिनता बाळगून असताना, हे वीर आपल्या सर्वांसाठी आपला जीव धोक्यात घालत असतातच, त्यांच्या पुण्याची गणना करताना चित्रगुप्त पण थकत असेल, असो.

किती तरी अनाम वीरांच रक्त आतापर्यंत इथल्या मातीच सार्वभौमत्व अबाधित रहाव म्हणून सांडलं गेल असेल, ते तस सांडण्यापेक्षा, अन कोणाच्या सत्ता लालसेपायी म्हणा, मूर्ख, नेभळट अन स्वार्थी अश्या नेतृत्वापायी म्हणा, अशी अनेक आयुष्यांची राखरांगोळी होण्यापेक्षा आणि आपल्या जवानांचं रक्त सांडल जाण्यापेक्षा, जवानांच्या रक्ताने एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळतय हे वाचताना पण एकदम छान वाटल. जवानही नक्कीच सुखावले असतील मनात.

पण म्हणून अश्या पद्धतीने, इतक्या 'फिल्मी ष्टाईलने' बातमी द्यायची काही गरज?? आणि तीही अश्या 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्राला?? या प्रतिष्ठित 'जबाबदार' वर्तमानपत्राची पत्रकारितेची व्याख्या 'सवंग' अशी कधीपासून झालेली आहे?? (तशी ती खूप आधी पासून झाल्यासारखी वाटतेय, हे आपल माझ मत!! मीही पुण्याचीच असल्याने, या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची भलायकी करणार्‍या तमाम प्रतिष्ठितांची पत्रास न ठेवता हे मत मी मांडत आहे याची नोंद घ्यावी!! :D ) बातमीदाराने ही बातमी लिहिण्या अगोदर, नुकताच, किंवा बातमी लिहिता लिहिता, 'अमर अकबर अँथनी' पाहून अन त्यातल्या त्यात निरुपा रॉयला रक्त देतानाचा शीन पाहताना गद्गद होऊन ही बातमी लिहिल्याचा दाट संशय यायला लागलाय!! (त्याच सिनेमात आहे ना तो विचित्र सीन?) आणि नसला तरी, मी पुण्यातली असल्याने, माझच बरोबर आहे, कळ्ळं???

भारतीय सुरक्षा दलात जेह्वा एखादी व्यक्ती प्रवेश घेते तेह्वा कदाचित सुरुवातीला मनात भाषावाद, प्रांतीयवाद, जातीयवाद वगरे असली जळमटं असतील, तरी त्यांची साफसफाई होऊन, सगळ्या प्रशिक्षणानंतर तालावून सुखावून बाहेर पडतो तो फक्त एक 'भारतीय' सैनिक, जवान असतो, अशी आपली माझी वेडगळ समजूत!! आणि तो 'भारतीयांच्या' संरक्षणासाठी कटीबद्ध असतो, ही अशीही समजूत. आता रक्त देताना, समोरची व्यक्ती कोण आहे, तिची जात काय आहे, आपली जात काय आहे असला फालतू विचार तो करत असेल अस वाटत नाही! (आमच्या नानाने पण डिंपलसारख्या सौंदर्यवतीला साक्षी ठेवून हे दाखवून दिलेल आहेच कुठल्यातरी शिणुमातून, सगळ्यांच रक्त एकाच रंगाच असत म्हणून :D शिणुमाच नाव त्येवढ आठवना बघा! लय भारी शिणुमा व्हता पर!)

बातमीदाराने दिलेली बातमी पाहता मी खालील निष्कर्ष काढले:

१. बहुतेक बातमीदाराने तो नानाचा सिनेमा पाहिलेला नसावा, नक्कीच!! :D
२. बातमीदार, हाडाचा बातमीदार नसावा. :D
३. त्याला हिंदी सिनेमा पाहण्याचे व्यसन असून ते प्रमाणाबाहेर वाढले असवे असावे. तो ' इट सिनेमा, ड्रिंक सिनेमा, वॉक सिनेमा, टॉक सिनेमा' वगैरे वगैरे करत असावा (का??)!! :D
४. जबाबदार पत्रकारितेची त्याची अन वर्तमानपत्राची व्याख्या बदलली असावी!! :D
५. बातम्या छापायला देण्याआधी जे कोणी बातम्या तपासतात, ते लोकं सुट्टीवर असावेत, किंवा त्यांनाही हिंदी सिनेमाचे व्यसन असावे का? गेला बाजार हिंदी सिरियल्सचे तरी?? :D
६। केकता कपूरच्या सिरियल्ससाठी 'संवाद' लेखनाचा पार्टटाईम जॉब या 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्रातील काही 'वार्ताहर' करत असावेत काय?? :D

असो, अजून खूप निष्कर्ष काढता येतील, पण हे प्रमुख आहेत! मग सवडीने बाकीचे काढता येतील! :D :D

पण मला सांगा, बातम्यांचा खरच इतका दुष्काळ पडलाय का? सरळ साधी बातमी देता आली नसती का, की, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी, रक्त देऊन एका छोट्या मुलीचे प्राण वाचवले, ते 'हिंदू, मुलीम, शीख, ईसाई' चे चार चाँद लावायची काहीतरी गरज होती का??? का रक्त देण्याचा अन 'हिंमुशीई' असण्याशी काही संबंध आहे?? का त्याशिवाय ही बातमी, 'ठळक' झाली नसती?? तिला वजन आलं नसतं? या वर्तमानपत्राकडून अशी अपेक्षा निश्चितच नाही!! तस म्हटल तर 'नि:पक्षपाती अन निर्भिड बातम्या' द्यायची कामं सोडून प्रदर्शनं भरवायची अपेक्षाही नाहीच म्हणा या वर्तमानपत्राकडून, पण आता काय!! कालाय तस्मै नमः हेही खरेच, असो.

सध्ध्या बोलणेच खुंटावे अशी परिस्थिती सामाजिक जीवनात सगळीकडेच बहुतांशी आढळते, आता वाचन खुंटावे अशी पण होणार की काय???

शेवटचा डिस्क्लेमरः 'प्रतिष्ठित वर्तमानपत्र' खरं तर खूप आवडीचं होतं.शाळेत, कॉलेजात असताना, अन नंतरही काही काळ ते वाचायला खूप आवडायच. आताची घसरण पाहवत नाही.... तरीही काही काही स्तुत्य उपक्रम वर्तमानपत्राच्या सौजन्यानं अजूनही सुरु असतात, ह्याचही खूप कौतुक आहे.

डिस्क्लेमरला मराठी शब्द आठवला नाही, 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्राबद्दल असे शब्द वापरल्याबद्दल माझ्यावर दैवाने हा सूड उगवला असेल का??? :D पण अश्या बातम्यांमुळे वर्तमानपत्राचे भवितव्य कितपत 'उज्वल' राहील, अन 'प्रतिष्ठा'ही कितपत जपली जाईल, याची शंका सतवायला लागली म्हणून हा भोचकपणा, बाकी काही नाही!!

कळावे, जमलंच तर लोभही असावा थोडासा.

February 10, 2008

सुमल्याची आश्रम वारी!!... (४)

वाटेत जाताना मंडळीचे देवाधर्मावर खूप गप्पा झाले, क्वालीसमधला वातावरण अगदी भक्तीमय होवन ग्येला!! कोकणातलो माणूस तसो भाविकच, तेका आपलो देवापासून देवचारापर्यंत सगळ्यांवरच विश्वास, अन सगळयांची भीतीपण.... देवापासून देवचाराक ह्या माह्यत असता, त्यामुळे तेही आपले लाड पुरवून घेतत!! नायतरी तेंका अजून कोण विचारता आजकाल इतक्या भक्तिभावान! ता आसो आपला....... तर मंडळी दिस सरता सरता आश्रमात पोचली, आणि दिव्यांच्या लखलखाटातलो आश्रम बघून गार पडली!! असो आश्रम त्येंनी कधी स्वप्नात पण बघूक नाय होतो!! आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!

"अहो काका, हा ड्रायव्हर आपल्याला कुठे चुकीच्या ठिकाणी तर नाही ना घेऊन आला?? काय वाटते तुम्हांस? काय हो गुरवानूं?? काय म्हणता??" मास्तर जरा टेंशन घेवक लागले....

"हं, विचारुया काय त्याला? काका, तुम्ही विचारून बघा बघया..... नायतर आम्ही आपले खय तरी जावन पडूचे!! विचारा, विचारा...." गुरवानं काकांका पुढे क्येला..... काकांनी चौकशी केल्यान, आणि ह्योच आश्रम आसा अशी डायवराकडून खात्री करुन घेताल्यान. इतक्यात, समोरुन सफेदशे कपडे घालून ए़कजण हेंच्या दिशेन येताना सुमल्यान बगला, आणि काकांका तसा सांगिपर्यंत, तो माणूस येवन पोचलोही.

"जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव! प्रणाम..." सफेद कपड्याहून सफेद बत्तीशी दाखवत त्येनी सगळ्यांचा आगत स्वागत क्येला.... निवासस्थान दाखयला... "आपण थकला असाल ना, आज, विश्रांती घ्या, उद्या आपल्याला आश्रम दाखवायची व्यवस्था केली आहे. तुमच्या भोजनाची व्यवस्था झाली आहेच, निवास स्थानीच पाठवतो ताटं... आमच्या गुरुदेवांना, सगळ्यांची काळजी... आपली पुरेपूर बडदास्त ठेवण्याविषयी सांगितले आहे...." परत एकदा सफेदीकी चमकार दाखवून गुरुदेवांचो शिष्यही अंतर्धान पावलो अन मंडळी, जेवून वगैरे निद्रादेवीच्या आराधनेक लागली....

दुसरे दिसां, भल्या फाटेचीच उठून सगळी मंडळी आपापली आन्हिका आटपून, आयलेलो नाश्तो, चाय संपवून, तयार होवन काल भेटून गेलेल्या 'सफेदीकी चमकार' ची वाट बघी होती. सगळ्यांबरोबर सुमल्याही अगदी तयारच होता, बाबल्यान सगळा व्यवस्थित बघून घे म्हणान सांगितलेला त्येच्या बरोब्बर ल़क्षात होता! जावन परत रिपोर्ट देवचो होतो तेका! आणि एक गाडी घेवन कालचोच शिष्य सगळ्यांका घेवन जावक आयलो... "जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव...चलाव, आज आश्रम पाहूयात.... " आश्रमाचो फेरफटको मारुक सगळे गाडीयेत चढले.

शिष्योत्तम एकामागोमाग एक ठिकाणा दाखवत होतो... आश्रमाचो परिसर सरता सरत नव्ह्तो. कपड्यांची दुकाना म्हणा नये - तेंका बुटीक म्हणूचा अशी माहिती शिष्यान पुरवतच एक काकी दुसर्‍या काकीच्या कानाक लागली, "ह्या काय आणि कपड्यांच्या दुकानाक म्हणतत? माका आपला चिंचेचा बुटुक ठावक!! दुकानाक ही बुटुक म्हणूचा?? ऐकाचा ता नवलच बाये!!" - ट्रॅव्हल एजन्सीची कार्यालय, हाटेल, बॅंक, आयुर्वेदीक औषधाचा दुकान, दागिन्यांचा दुकान.... यादी सरतच नव्हती.... सगळ्या ऐहिक जगाच्या पसार्‍यातून मन काढून घेवन आश्रमात तपश्चर्या करूक खूप पूर्वी ऋषी मुनी जायत, पर्णकुटी बांधून थय रवीत, साधा सुधा आचरण ठेवीत, जाडी भरडी वस्त्रां प्रावरणां नेशीत, ह्या असा आपला गाववाल्यांका लहानपणापासून पुस्तकांतसून वाचून, कीर्तनातून ऐकान ठावक!! ह्या एकविसाव्या शतकातला अध्यात्म भलताच सुधारीत आवृत्तीचा होता!! सगळा ऐहिक जगच आश्रमात येवन ठेपला होता!!

अशीच आश्रमातली बाकीची ठिकाणा बघून, दर खेपेक आश्चर्याचो एकेक जोरदार धक्को खावन आणि पुरतीच चक्रावून मंडळी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाक परतली!!! दुसरे दिवशी उठून परत एकदा मंडळी क्वालिसात बसून आपल्या गावच्या वाटेक लागली, आणि दिस सरता सरता घराक पावली. लग्गेच सुमल्यान बाबलाक बोलावणा धाडल्यान. बाबल येवन ठाकलो.

"काय मग सुमल्या, कशी झाली गो तुझी आश्रम वारी?? बाकी तू खरच पुण्यवान हांऽऽऽ, ध्यानी मनी नसता गेलय का नाय!! काय प्रसाद हाडलस काय?? दे बघया..."

"रे, मेल्या गप रव!! खयचो मेल्यांनो ह्यो स्वामी हाडल्यासात?? ह्येचा लक्षण काय माका बरोबर वाटणा नाय, समाजलय? काकांका विचार....." सुमल्यान त्वांड सोडला!! "मेल्याच्या आश्रमात काय्येक द्येवाचा नाय!! देवाच्या नावाखाली बाकीचाच जास्त दिसता!! समाजलय?? शिरा रे पडो ते आश्रमवाल्यांचे..."

"गो, काय सांगतय काय तू?? म्हणजे काय आणि.....??" बाबलही चक्रावलो!

"रे, मग सांगतय काय मी, आश्रमाची मैलोगणती पसरलेली जागा आसा. खयसून पैशे इले रे त्यासाठी?? जागा काय अशी फुकट येता काय?? ध्यानासाठी येकदम भव्यदिव्य, संगमरवरी इमारत बांधूक आसा!! कित्यां मेल्या?? झाडाखाली बसून ध्यान करुक होणा नाय काय?? तेका काय गादे, गिरदे आणि संगमरवर लागता काय मेल्या?? सगळे पैशेवाले आपापल्या पैशाचा प्रदर्शन करत थय ध्यानाक बसतत!! आश्रमात बिन श्रीमंतांक प्रवेशच नाय आसा!! स्वामीक भेटूक पण पैशे मोजूचे लागतत, नायतर स्वामी भेटणत नाय!! काय समाजलय??"

"बाकी हाटेला, बुटीका, ते विलायती संगीतावरचे नाच... हे सगळे गोष्टी ही आसत!! माझी आवस नेहमी सांगी बापडी, देवाकडे मन लावूचा असात, तर हे ऐहीक गोष्टीं प्रथम बाजूक सारूक व्हये, आणि हय बघतय ता आपला तेचाच प्रदर्शन!! काय समाजलय??? शिरतासा काय डोक्यात तुझ्या प्रकार काय तो?? बरा, बाकी काय नाय ता नाय, येकही देउळ बांधूक नाय आसा खयही मेल्यांनी.. मेले भजना बरी म्हणी होते, पण तेही शिनेमाच्या गाण्यांचे चाली लावन!! आणि त्या तालार बापे अन बायलो एकत्र नाचतत मेले त्या स्वामीच्या नावान!! असाच गावाकडे नाचतले की काय?? शिरा रे पडो मेल्यांनो तुमच्या..!! गावातली पोराटोरां गावचे चेडवांबरोबर अशीच नाचतली काय?? " एकेक करून सुमल्यान बाबलाक वित्तंबातमी दिली! ह्या सगळा आश्रम पुराण ऐकून बाबलाक फेफरा येवचाच बाकी होता!!!

"रे बाबल, बघ, आपण आपली कोकणातली साधीसुधी माणसां. एकमेकांक धरून रवतो आपली... या सोद्यांचो आमका वारो देखील नको!! आपली काय पेज, आमली आसा ती खावन आम्ही आपली सुखात आसव.. रवळनाथाक काळजी आसा, ग्रामपुरुष आसाच बघूक... ह्या आता आणि आश्रमची सोंगा करू नकात, समाजलय? आधीच मेले कोकणाची वाट लावणारे कमी नाय आसत, त्यात आणि ही भर नको..." कधी नाय ता सुमल्याक इतक्या समजूतदारपणान बोलताना बघून बाबलही मनातून जरा हललो....

"जळो मेल्यांचे आश्रम!! आता मी कोणायेक बाबाची, संताची सेवा करुचय नाय!! महादेवाक नेवन चार कळशे ओतीन!! तीच माझी सेवा!! खूप झाला ह्या!!" सुमल्यान बाबलकडे जाहीर करून टाकला. "वरून बघत असतली तर आत्तापर्यंत आवशीक पण कळला असात, की आता कोण्णीयेक संत नाय आसत जगात..." या अनुभवानंतर, सुमल्याचो संतसेवा करुन पुण्य कमवचो बेत कायमचो ठप्प झालो!! पण गावाचा भला क्येला म्हणान रवळनाथान चित्रगुप्ताक सुमल्याच्या खात्यात सात जन्माचा पुण्य जमा करूची ऑर्डर काढली!! कोकणातलोच द्येव तो!! थयच्यां लोकांसारखोच, फणस अगदी. बघलो का दृष्टीक रुपडा उग्र वाटता, पण एकदम मायेस्त... आपल्या लेकरांचो भार सदा व्हाणारो, तेका काय सुमल्याची काऴजी नसात काय??

दुसर्‍या दिवशी गावात बैठक बसली अन बैठकीत या सगळ्या गोष्टींचो उहापोह झालो. सगळ्यांचाच मत आश्रम नको असा पडला. स्वाम्याची डाळ काय गावान शिजूक देवक नाय!! आश्रम बघून आयलेल्यांच्या तोंडून आश्रमातले चित्र विचित्र गजाली ऐकान लोकांचा मनोरंजन फुडे कित्येक दिस होत होता......


समाप्त.

February 6, 2008

तुमसेही....

एखाद्या व्यक्तीबद्दल सातत्याने वाटणारं प्रेम आणि त्या भावनेची पावलोपावली येणारी अनुभूती ह्याहून अजून काय वेगळी असते?

खर तर ह्या गाण्याच्या अनुषंगाने काही लिहावसही वाटल होतं, पण मग लक्षात आलं की नको, एखाद नाजूकस फूल नसत का, इतक सुंदर दिसत असत, नाजूकश्या पाकळ्या असतात, विलोभनीय रंग जीवाला वेड लावतात, पण आवडलय म्हणून त्याला नुसत बोट जरी लावल तरी पाकळ्यांमधला जीव निघून जातो आणि त्या निस्तेज होतात, तस काहीस , नकोच ते....

ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं
तुमसेही दिन होता हैं
सुरमयी शाम आती हैं
तुमसेही.... तुमसेही....
हरघडी साँस आती हैं
जिंदगी कहलातीं हैं
तुमसेही.... तुमसेही....
ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं

आँखोंमें आँखें तेरी
बाहोंमें बाहें तेरी
मेरा ना मुझमें कुछ रहाँ
हुवा क्या.......?
बातोंमें बातें तेरी
रातें सौगातें तेरी
क्यों तेरा सब ये हो गया

हुवा क्या.......?

मैं कहींभी जाता हूँ
तुमसेही मिल जाता हूँ
तुमसेही.... तुमसेही....

शोर में खामोशी हैं
थोडीसी बेहोशी हैं
तुमसेही.... तुमसेही....

आधासा वादाँ कभी
आधे से जादा कभी
जी चाहे कर लूँ
इस तरह वफाका
छोडें ना छूटे कभी
तोडे ना टूटें कभी
जो धागा तुमसे
जुड गया वफाका
मैं तेरा सरमाया हूँ
जो भी मैं बन पाया हूँ
तुमसेही.... तुमसेही....

रास्तें मिल जातें हैं
मंजिलें मिल जातीं हैं
तुमसेही.... तुमसेही....


ना हैं ये पाना
ना खोना ही हैं
तेरा ना होना जानें
क्यों होना ही हैं
तुमसेही दिन होता हैं
सुरमयी शाम आती हैं
तुमसेही.... तुमसेही....


February 3, 2008

विसूनाना उवाच... (३)

नमस्कार मंडळी!!! कसे आहात? मजेत ना? मी? मीही मजेत. तुम्हीं हल्ली थिएटरमधे गेलय का मंडळी सिनेमा बघायला?? मी गेलोय। परवा, सहकुटुंब सहपरिवार सिनेमा बघायला जायचा योग आला. आता योग आला म्हणजे काय, की मला जवळ जवळ ओढूनच नेला घरच्यांनी!! हल्ली सहसा मी बाहेर पडत नाही, अन सिनेमा बघायला तर त्याहून नाही.

तसे कधी मधी टी.व्ही. वर पाहतो म्हणा आजकालचे सिनेमा. पार डोक्यावरून जातात हो ते माझ्या. काही म्हटल्या काहीच कळत नाही!! बर, आधी दाखवलेल्या सीन्सचा अर्थ लावावा म्हणेपर्यंत, पडद्यावर समोर काय चाललेय ते बघायचे राहून जाते अन मग पुढचा सिनेमा इतका काही संदर्भहीन वाटायला लागतो, की काय बोलावं!! एकूण काय, तीन तास काय गोंधळ चाललेला असतो, काहीसुध्धा कळत नाही बघा!! मग कशाला जायच? कोणाला हे पटेल तर ना पण!! आमची ही तर इतकी गुंगून जाते ते सिनेमे बघताना.... हसते, चिडते, अगदी रडते, कळवळते देखील!! त्याच्या निम्म्यानेही तिला माझी दया मात्र काही कधी आल्याचं माझ्या बघण्यात नाही बघा लोक हो!! यालाच विरोधाभास म्हणत असावेत काय??? ह्म्म... असेलही कदाचित... असो.

तर नेहमीप्रमाणे, मी सिनेमाला न येणंच कस बर आहे, याची कारणं दिली, पण आमच्या घरी नेहमीप्रमाणेच ती कोणालाही पटली नाहीत!! हे लोक सिनेमाला जातील अन मी एक मस्त झोप काढीन, अशी दृष्यं माझ्या डोळ्यांसमोर लगेच तरळायला लागली होती. माझी स्वप्नं पण अशी माफकच असतात हो... पण नाहीच!! माझ्या प्रत्येक वाक्याला आक्षेप घेण्यासाठी जणू आमच्या घरामधे चढाओढच सुरु असते जणू!! आणि मी काय ठरवतो ना, त्याच्या नेमक उलटं ठरवल्याशिवाय घरात कोणला सुखाची झोप लागत नाही जणू!! जस काही कोण जास्ती आक्षेप घेणार त्याला काही घबाड मिळणार आहे!! माणूस रिटायर्ड झाला की त्याला घरात काय किंम्मतच नसते बघा!! आता पोरं म्हणतात, नाना, तुम्हांला काहीपण कळत नाही बघा सिनेमातलं, तर या पोरांच्या आईनं म्हणाव ना की वडिलांशी बोलायची ही काय रीत आहे का म्हणून, तर उलटं हीच खसूखुसू हसत त्यांना आणखी प्रोत्साहन देते!! पोरांना काय, आईच पाठीशी घालतेय म्हटल्यावर चेकाळायला? त्यांना तर बरच झालं ना?? तर, असे मुलांचे अन त्यांच्या आईसाहेबांचे माझी टर उडवणारे प्रेमळ संवाद घडले, आणि शेवटी बाकी सिनेमा नाही समजला तरी, कधीतरी कुटुंबासोबत बाहेर पडाव कधीतरी, असा घरचा आहेर स्वीकारून बाहेर पडलो एकदाचा..... त्यातल्या त्यात, "नशीब, निदान काहीतरी समजत नाही, एवढ मान्य तरी केलत.. " हे ऐकायला मिळालच!! लग्नाच्या आद्ही
काय या बायका कुठल्या क्लासला वगैरे जातात का हो, आयुष्यभर चिमटे कसे काढायचे हे शिकायला?? आणि कुठलाही चिमटा आमच्याकडे परत वापरला जात नाही!! असो.

तर, सिनेमाला जायचे ठरले। मीही आलिया भोगासी म्हणत आपला तयार झालो. करता काय?? रिक्षात बसून आम्ही आपले चाललो सिनेमा पहायला. आता रहदारी, रस्ते आणि रिक्षावाले यांच्याबद्दल फारसे काही ने बोललेलेच बरे, नाही का?? त्यामुळे जाऊंद्यात!! रिक्षावाल्याच्या कृपेने शेवटी एकदा थिएटरवर पोचलो अन थिएटरचं नव रुपड पाहून मी तर आ वासला, खरच सांगतो!! आमची ही म्हणालीच, "अहो, अस काय बघत बसलाय? म्हणून नेहमी जरा बाहेर फिरायला याव, जगात काय चाललय ते उघड्या डोळ्यांनी पहाव, म्हणजे मग असा गोंधळ उडत नाही!!" मुलं तर काय? त्यांना खिदळायला निम्मित्तच हवं! आणि बापाच्या जीवावर खिदळायला काय पैसे पडतात थोडेच? तेह्वा मुलांचा अन त्यांच्या मातोश्रींचा मला हसून घ्यायचा कार्यक्रम परत एकदा पार पडला! आमची ही, खर तर हरतालिका अन तत्सम उपवास का करत असावी असा मला बरेच दिवस प्रश्न पडलाय... म्हणजे अस बघा, इथे तर मारे नवर्‍यासाठी उपवास वगैरे करायचे अन तिथे तर नवर्‍याला शालजोडीतले घालायची एखी संधी सोडायची नाही!! बायकांच्या या स्वभावाची नोंद घेऊनच एका दगडात दोन पक्षी मारणे हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा! नक्कीच!! असो. आणि नवीन थिएटरची माहीती असणं म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं??? ऐकूनच गार झालो! कठीणच आहे मंडळी, नाही का??

आमचे बाळराजे तिकिटं काढायला गेले, अन तिकिटं नाचवत थोडया वेळातच परत आले। सहज म्हणून मी तिकिटांच्या किमतीची चौकशी केली, अन बाळराजांनी सांगितलेला आकडा ऐकून त्याला ओरडणारच होतो!! माझी अगदी खात्रीच पटली होती, ह्या रेम्या डोक्याच्या मुलाला कोणीतरी गंडा घातला तिकिटांच्या खिडकीपाशी!! अजून साधे हिशेब जमत नाहीत!! शाळेत असताना नाहीतरी गणितात कधीच लक्ष नाही घातल कारट्यानं!! तिकिटांची किंम्मत पाहूनच आणि हातात पुरावा ठेवूनच लेकाला ओरडावं म्हणून तिकिटं पहायला मागितली. काय करणार? मी मायनॉरिटी आहे ना, त्यामुळे, ह्या मेजॉरिटीच्या असलेल्यासुद्धा चुका लक्षात आणून द्यायच्या म्हटलं ना, तरी मला खूप काळजी घ्यावी लागते हो!! शेवटी एकत्र रहायच असत हो मला त्यांच्याच बरोबर!! काय करणार?

तिकिटांकडे पाहिलं आणि खर सांगतो, तिकिटांच्या किमती पाहूनच मला ऐन थंडीतही घाम फुटला!! लेकानं बरोबर हिशेब केला म्हणून धन्यता मानावी की एवढे पैसे तिकिटांमधे उडवले म्हणून कपाळाला हात लावावा, हेच कळेना!! आता एवढे पैसे भरल्यावर सिनेमा कळला नाही तरी बघायला लागणारच होता... आत शिरायला वेळ होता म्हणून जरा इकडे तिकडे नजर टाकत होतो.... जमाना पारच बदलला हो!! आसपासच बदललेला जमाना डोळ्यांमधे साठवून घेईपर्यंत, आत शिरायची वेळ झाली अन आम्ही आत शिरलो। तसही बदललेल्या जमान्याचे दोन नमुने माझ्याही घरात आहेतच म्हणा. लवकरच शिरल्यामुळे, तस व्यवस्थित उजेड होता, त्यात जागा शोधून एकदाचे बसलो. आताची थिएटरं पण बदलली हो बाकी!! तिकिटांचे पैसे भरमसाठ का, याचा शोध लागला लगेच. गुबगुबीत खुर्च्या, ए.सी. मधे बसून सिनेमा बघायला एवढे पैसे मोजत होतो आम्ही. आजूबाजूला गर्दी वाढतच होती अन पडद्यावर चित्रविचित्र संगीत, जाहिराती सुरु झाल्या होत्या, जाहिरातीतली माणसं, त्यांचे संवाद अन ज्यांची जाहिरात होत होती त्या वस्तू यांचा सुखासुखी एकमेकांशी काही संबंध दिसून येत नव्हता!! अर्थात, हे काय मला नवीन नाही म्हणा, आमच्या घरी हे असले एकूणच प्रसंग अन त्यांच्याशी पूर्णपणे विसंगत असे संवाद नेहमीच झडत असतात, अन मी ते ऐकत असतो, क्वचित प्रसंगी त्यात भागही घेतो॥ नाहीतर आपलं तोंडापुढे वर्तमान पत्र धरतो, किंवा तोंडावर टाकून आरामखुर्चीत मस्त झोप काढतो!! तसच इथेही मस्त गारव्यात, गुबगुबीत खुर्चीत बसल्यावर कधी झोप लागली काही कळलच नाही बघा...

मधूनच थिएटरमधे कधी हास्याचे फवारे उडत होते, टाळ्या शिट्ट्या झाल्या की आपली मधेच जाग येत असे, पण त्याच त्या रंगीबेरंगी अर्थहीन जाहिरातीच सुरु असल्याने मी आपला परत झोपत होतो, आणि थोड्या वेळाने एक मस्त डुलकी काढून उठलो.

उठलो, तेह्वा, थिएटरमधे परत दिवे लागले होते। घ्या, म्हणजे आता मुख्य सिनेमा सुरु करणार होते वाटतं..... मी विचारलही आमच्या मेजॉरिटीला तस. एवढा वेळ जाहिरातींचा कार्यक्रम सुरु होता, अन लोकं त्यालाच दाद देत होते?? आजकाल जमान्याच्या आवडी निवडीही बदलत चालल्या आहेत, आणि असल्या बदलत्या जमान्याबरोबर धावताना माझी जरा दमछाक होते खर. नक्की कशाच्या मागे अन कशासाठी धावायचे हेच कळत नाही कधी कधी... सगळे धावतात म्हणून आपलं धावायच की काय, अस वाटत... तर, मी म्हटल हीला, चला, एक चहा मारुन येऊ सिनेमा सुरु व्हायच्या आधी... तर मेजॉरिटी परत फिसफिसायला लागली आपापसात!! काय झाल विचारल तर म्हणे, नाना, आत्तापर्यंत सिनेमाच तर सुरु होता!! आता संपला, घरी जायची वेळ झाली, चला आता!! तेवढ्यात आमच्या कन्यारत्नाला आपले बाबा कित्ती विनोदी बोलतात नै, असा शोध लागला!! त्यावर मल्लिनाथी आलीच, "बाकी काही नाही जमल तरी असले विनोद भारीच जमतात हो तुझ्या वडिलांना... कुण्णाला हसू येत नाही म्हणून बरयssss" ऐकून घेतल, अन काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता शांतपणे घरी निघालो.

आता तुम्हाला म्हणून खरखुरं सांगतो मंडळी, मीही त्या दिवशी एका दगडांत दोन पक्षीच मारले!! यांची तोंडं बंद करायला अन मनं राखायला यांच्या बरोबर गेलो अन, मला हवी तशी झोपही काढली!! सिनेमा बघण्यात मला काहीच रस नव्हता खर तर, पण बोललो असतो, तर उगाच मेजॉरिटीचा कलकलाट ऐकावा लागला असता, आणि आजकालची थिएटरं अगदी आरामदायी असतात हे ऐकूनच होतो मी!! फरक एवढाच, की, आमच्या काळी थिएटरं साधीसुधी, पण सिनेमे छान असत, आता थिएटरं भपकेबाज, पण जाहिराती अन सिनेमांमधला फरक बर्‍याचदा ओळखू येत नाही मला.....

आणि बरका, आता रिकामटेकडा असलो तरी कान अन डोळे उघडे ठेवूनच मी वावरतो!! पण यांना कशाला सांगू ते?? हो की नाही?? आमची पोरं एखाद्याबद्दल बोलताना आजकाल कधीतरी म्हणतात, अरे वो येडा बनके पेढा खा रहा हैं॥ तसच काहीसं मी पण कधी कधी करतो कधी कधी मंडळी..... चालायचय, आता मायनॉरिटी बनून मेजॉरिटीबरोबर टिकून रहायच म्हणजे येवढ करावच लागत हो मंडळी... पटतय ना?? द्या टाळी!!!!