March 19, 2009

दुज्या गावच्या वाटा

इतक्यातच, थोडेथोडके नाही तर, चांगले पंधरा दिवस घरी जाऊन काही कामांनिमित्त राहणं झालं, आणि वरुन अजून बोनस दिल्यासारखे दोन -तीन दिवस मिळाले. अर्थात, घरुन ऑफिसचं काम करायचं, ही अट होतीच. पण घरी आणि माझ्या माणसांमध्ये इतके दिवस रहायला मिळणार असेल, तर अश्या कित्येक अटी अगदी हसत हसत सर ऑंखोंपर!

आणि म्हणता म्हणता पंधरा अधिक बोनस दोन, तीन दिवस संपलेदेखील. कालचा शेवटचा दिवस. उगाच एकदम इतकं वाईट वाटायला लागलं परत जायचं म्हणून, की काय सांगावं! आणि पंधरा दिवस रहा,चार दिवस रहा, की एक दिवस - ह्याने काहीच फरक नाही पडत. दर वेळी, पुण्याहून बंगलोरला परत येताना मला अगदी साता समुद्रापार चालल्यासारखं वाईट वाटतच. खरं तर इतकं कठीणही नाही बंगलोरहून पुण्याला येणं,म्हणजे पहायला गेलं तर साता समुद्रापलिकडून येणार्‍या व्यक्तीला जसं अन् जितकं प्लॅनिंग करुन वगैरे यायला लागतं, त्याच्या निम्म्यानेही त्रास नाही! पण तरीही, दर वेळी नव्यानं, परत तेवढंच दु:ख होतं. याउलट बंगलुरुहून सुटलेल्या माझ्या विमानाने (म्हणजे मी ज्या विमानात बसलेली असते ते विमान - मल्ल्या आणि इतर प्रभृती मला ही सेवा पुरवतात :D - त्यामुळे आकाशात अधिक प्रदूषण नको, ह्या विचाराने सवताचं इमान न्हाय घ्येतलं पघा! :P हेहेहे! :D ) पुण्याचा विमानतळ गाठला की मला दरवेळेस अगदी पहिल्यांदा बंगलोरहून पुण्याला आलेल्यावेळी जसा आनंद झाला होता, तस्साच आनंदही होतो! माझ्यातलं पुणं आणि क्वचित प्रसंगी पुणेरीपण मिटायला काही तयार नाही.

यावेळी ठरवलेली जास्तीत जास्त कामंही उत्तमरीत्या पार पडली. काही बाबतीत हत्तींचे कळप गेलेत आणि शेपटं राहिलीत. तशी खूप मजाही केली यावेळी पुण्यात. पुस्तकांची खरेदी (रसिक साहित्यमधून व्यवस्थित डिस्कांऊटसकट १०-१२ पुस्तकं -झिंच्याक, झिंच्याक, झिंच्याक, झिन् झिन् च्याक!! :) ), बोमलूशी ओळख अन् मग एकदम व्यवस्थित दोस्ती, रस्त्यावर मिळणार्‍या कुल्फ्या अन् बर्फाचे रंगीत गोळे खाणे (टुकटूक!), मित्रमैत्रिणींना भेटणे, शॉपिंग - म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे - मस्त पांढर्‍या रंगाची सुरेख डिझाईन्स असलेली सुती कापडं पाहणं हाही एक सुरेख अनुभव आहे, खरेदी करणं हा अजूनच सुंदर अनुभव! :D आणि हे पुरसं नाही म्हणून, नेहमीच्या शिंप्याकडून सांगितलेल्या वेळेत, कुठेही न चुकवता ते ड्रेसेस शिवून मिळणं! शिका म्हणावं बंगलोरमधल्या शिंप्यांना! अज्जिबात शिलाई जमत नाही बंगलोरी शिंप्यांना! एकतर झोळणे बनवतात, नाहीतर त्याहून काहीतरी विचित्र! कापडाची वाट लावायचं काम मात्र इमाने इतबारे करतात. असो. पुण्यातला तो शिंपी आणि बंगलोरचा तो कापडफाड्या! ;) आणि घरी पण खूप गप्पा झाल्या. एकदम मस्त वाटलं अगदी.

तर सांगायचा मुद्दा हा, की पुण्यातलं वास्तव्य सुखेनैव पार पडलं. जीव समाधानी झाला. काल मात्र परत निघायचं म्हणून जामच वाईट वाटत होतं, मलाही अन् घरच्यानांही, पण आपलं सगळेच एकमेकांना ते जाणवू नये असं "नॉर्मल" वागायला बघत होतो, प्रयत्न करत होतो. एकमेकांची अशी मनं जपण्यातही खूप समाधान आहे.

खूपश्या गोष्टी करायच्याही राहिल्या. माझ्या एक खूप लाडक्या शिक्षिका आहेत, त्यांना फोन करायचा राहिला. अजूनही काही पुस्तकं हवी होती, ती न मिळाल्याने घ्यायची राहिली. नाही मिळालीत. :( सगळ्याच मित्रमैत्रिणींना भेटता आलं नाही. घरातलीही काही कामं राहिलीत, ती आता पुढच्या वेळेला. अजून थोड्या गप्पा मारायच्या राहिल्या घरच्यांशी आणि शेजारी राहणार्‍या एक दोन काकवांशी. आहेत काकवा,पण मस्त जमतं माझं त्यांच्याशी. माझ्या फुलझाडांची जरा मशागत करायची होती, तेही राहिलच जरा धावपळीत रोजच्या.

काल रात्री झोपताना उगाच आपलं 'उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा' हे मनात घोळत राहिलं. कधीतरी झोप लागली, अन् आज पहाटे उठून परत एकदा विमानतळावर. बोमलू मुख्य फाटकापर्यंत सोडायला आला, अन् गोंधळलेल्या चेहर्‍याने तिथेच थबकला. मी आपली दुज्या गावच्या वाटा अन् वार्‍याच्या दिशेने निघाले होते.

परत एकदा ह्या दुज्या गावच्या वाटाही जुन्या आणि परिचित होतील, पण त्या शेवटी आहेत दुज्या गावच्याच.. त्या माझ्या गावच्या नाहीत!

March 12, 2009

बोमलू!
हा आमचा बोमलू!:) अतिशय डांबरट, खेळकर आणि एक नंबरचा नाटक्या!:) लिहिते याच्या गंमती कधीतरी :) बोमलूची आई आमच्याच परीसरात राहणार्‍या कोणी पाळली होती. तिला चार पाच पिल्लं झाली, त्यातला एक हा बोमलू. पिल्लं झाल्यानंतर, एक बोमलू सोडून बाकीची त्यांनी कोणा कोणाला देऊन टाकली. तेवढ्यात तिला काही आजार झाला, तर काळजी घ्यायच्याऐवजी तिलाच सोडून आले कुठेतरी... :( आणि हे पिल्लू आमच्या सोसायटीमधे आणून टाकलं. सुरुवातीला म्हणे,सगळ्यांनी बोमलूला हाकलायचा प्रयत्न केला, पण बोमलूने हर एक के दिल में जगह बनाही ली! :D

आता बोमलू सगळ्यांचाच लाडका झालाय! आणि त्या लब्बाड बोक्यालापण ते ठाऊकाय अगदी!

March 10, 2009

घर

घराचं महत्त्व माझ्या मनाला नेहमीच वाटत आलंय.

खरं पाहिलं तर भटकायला मला खूप आवडतं. मागच्या जन्मात मी भटकी जिप्सी किंवा नोमाड असणार नक्की! आणि भटकंती करायला माझी कधीही ना नसते, बरं, पुन्हा, फार ऐषोआरामात प्रवास करायला मिळावा वगैरे काही चोचलेही नसतात माझे. मस्तपैकी एखादी धोकटी पाठीवर मारुन मस्त कलंदर बनून प्रवास करायला मिळावा, हे माझं कधीकाळपासूनचं उराशी जपून ठेवलेलं स्वप्न आहे, आणि ते बर्‍याच अंशी बहुधा स्वप्नच राहणार आहे.

नॅशनल जिऑग्राफिक किंवा अ‍ॅनिमल प्लॅनेटवर, भटंकती करणारे अन् वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटी देणारे महान लोक पाहिले, की मला त्यांचा हेवा वाटल्याखेरीज रहात नाही. एक तर असं मस्त काम करा आणि त्यातून कमवा पण! कसलं ग्रेट! असलं काहीतरी मला जमायला हवं होतं, हे आयटी मधे रमण्यापे़क्षा... कसली धमाल आली असती! आत्ता सुद्धा कधी तरी मला मधेच हुक्की येते की शोधून तरी पाहू, माहिती तरी काढू की हे काम करण्यासाठी काय पात्रता लागेल वगैरे... आणि ते फूड नेटवर्क वाले! खाण्याच्या नावाखाली चॅनेलच्या खर्चाने फिरतात मस्तपैकी! अरे माणसांनो, गेल्या जन्मी नक्की पुण्यं तरी काय केलीत रे!! जाउंदेत.

अर्थात, आयटी विश्वातल्या नोकरीमुळे थोडंफार जग पहायला मिळालं, हा ही एक आनंदाचा भाग आहेच, अन् त्याचबरोबर, भारताबाहेरचंही भटकून झालं, पण अजून पूर्ण भारत काही बघून झालेला नाही, ह्याचाही एक विषाद आहे. भारत जाऊच दे, पण पुणे आणि त्याच्या सभोवतालचा परीसर, आणि आता बंगलोरला असते तर, बंगलोर अन् त्याच्या सभोवतालचा परीसर संपूर्णपणे मी पाहिलेला नाही! कारणं आहेतही आणि नाहीतही. नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यात हे असलं काही नेहमीच, किंवा जसं बसवायचं असतं तसं बसवताच नाही येत बर्‍याचदा, ज्या कोकणाचा मला मनापासून लोभ आणि अभिमान आहे, ती कोकणपट्टीही मी तुकड्यांतच पाहिली आहे, आणि तशीच मनात साठवली आहे.आनंद एवढाच की कधीतरी अवचित रीत्या अशी संधी येते अन् एखादी अतिशय सुंदरशी अनुभुती देऊन जाते.

अश्याच एक दोन आठवणी, सांगायचा मोह आवरत नाही म्हणून सांगते.

मध्यंतरी एकदा बंगलुरुच्या आसपास फिरायचा योग आला. बंगारु तिरुपती म्हणून एक देवस्थान पहायला आम्ही जाणार होतो. त्यादिवशी माझ्या कुंडलीत प्रवासाच्या सुखाचे ग्रह फार उच्चीचे असावेत. बंगलुरुमधून बाहेर पडलो, अन् पावसाला सुरुवात झाली. तोही कसा, असा रिमझिमणारा पाऊस, मधेच जरासाच जोरात येणारा, पण एकूणात प्रवास सुखकर बनवणारा असा पाऊस! हवा, उन्हं, वातावरण, आजूबाजूची हिरवाई सगळं काही एकसे एक बढकर असं होतं. अख्खा प्रवासच सुखकर रीत्या चालला होता... बरं, पावसाची एक मजा म्हणजे, जिथे आम्ही थांबायचो, पाय मोकळे करायला खाली उतरायचो, तिथे तोही थांबायचा. चिंब भिजलेला दूरदूरवर पसरलेला देखणा "ऋतू हिरवा" पाहून डोळे आणि मन सुखावलं होतं.

देवस्थानापाशी पोहोचलो तेह्वा एक कोपर्‍यातल्या अश्या त्या देवस्थानात गर्दी नसल्याचं पाहून खूप आनंद वाटला. पाऊस थांबत चालला होता, एखाद दुसरा चुकार, रेंगाळलेला थेंब, संपत आलेली पावसाची सर, झाडांमधून निथळणारे थेंब हे एवढंच. ओल्या हवेतला मातीचा गंध आत झिरपता झिरपता हळू हळू मन कधीतरी शांत होत गेलं असणार. नेहमीच्या रामरगाड्यात नोकरी, आणि रोजच्या धावणार्‍या आयुष्यात मन काय म्हणतय, कुठे आहे, काय करतय हे पहायची उसंत तरी कुठे? त्यामुळे मग असं काही घडलं की जरा वेळानंच लक्षात येतं खरं!

आजूबाजूची निरव, पण प्रसन्न शांतता आम्हांला हळू हळू वेढून टाकत होती. देऊळ असं जरा डोंगरातच होतं, खूप उंच असंही नाही, पण जरासं चढावरच. काळ्या डोंगरात बनवलेल्या मोठ्या पायर्‍या. वेलांची कमान. दगडातल्या प्रवेशद्वारापाशी मोठा नाग कोरलेला - कोरलेला की वेगळा बनवून तिथे प्रवेशद्वारावर चढवलेला ते नीटसं आठवत नाही, पण लक्षात येईल असा ठळकसा होता खरा. वर जाता जाता एक दोन चुकार देवळं, आणि वर बंगारु तिरुपती. वरचं काम सगळं संगमरवरी. अतिशय छोटासा गाभारा, इन मिन देव बाप्पा अन् त्यांचे पुजारी मावू शकतील असा. अतिशय अंधारा. करायचाय तरी काय मोठ्ठा गाभारा? अणूरेणूतही भरुन उरणार्‍या परमात्म्याला चार भिंतीच्या गाभार्‍याचं काय सोयरसुतक असणार? त्याचं हे घर सर्व प्रकारच्या भक्तांच्या सोयीसाठीच असावं बहुधा.

गाभार्‍यात आरती उजळून पुजारी बुवांनी तिरुपतीच्या चेहर्‍यासमोर ती धरली. अंधारलेला गाभारा क्षणभरात तेजाळून गेला. तिरुपतीच्या चेहर्‍यावरचं प्रसन्न हास्य अधिक खुलवणारा ज्योतीचा स्निग्ध प्रकाश हळूहळू अंधाराची जागा घेत सगळीकडे पसरत होता. बघता बघता अंधारलेला गाभारा प्रकाशमान भासायला लागला. पावसाळी, ओली, सांजावलेली, प्रसन्न हवा, आणि आत स्निग्ध प्रकाशात नाहून निघालेल्या गाभार्‍यात प्रसन्नपणे हसणारा तिरुपती.... पुजारीबुवा, जराही घाई न करता, शांतपणे, सुस्पष्ट स्वरात, नाद लयीत मंत्र म्हणत होते. एक गारुडच झालं होतं जणू काही. कसलीशी शांत समाधानी वृत्ती सभोवताली पसरुन राहिली होती. तो परीसर मनात साठवून घेत, थंड वार्‍याच्या झुळुकींचं सुख भोगत, थोडावेळ शांत उभं राहून हे सगळं चित्र मनात जपायचा प्रयत्न केला. याहून उत्तम अनुभव काही असूच शकणार नाही असं म्हणत गाभार्‍याच्या मागच्या बाजूला गेलो, वरुन खालचं दृश्य बघायला म्हणून.. आणि तिथेच थबकलो! आत्तापर्यंत अनुभवलं, ते मनात झिरपतय म्हणेपर्यंत हे अजून एक सौंदर्यस्थळ समोर आलं! खाली काही अंतरावर दोन बुचाच्या फुलांची झाडं, फुलांनी लगडून गेली होती. अंधारत चाललेल्या त्या संध्याकाळी, सावळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर, ओलसर वातावरणात, दोन्ही झाडांना अक्षरशः चांदण्या फुलल्याचा भास झाला! केवळ अवाक् होऊन ते दृश्य आम्ही पहात राहिलो! शब्दातीत अनूभूतीला शब्दांनी मलीन तरी का करा!

फक्त त्याक्षणी माझ्याकडे कॅमेरा नसल्याचं मला खूप खूप वाईट मात्र वाटलं. अर्थात, असता तरी ते सौंदर्य जसंच्या तसं, मला पकडता आलं असतं की नाही, कोणास ठाऊक. बर्‍याचदा फोटो काढताना मला हे जाणवतं की, जे आहे त्याच्या दशांशानेही कधी कधी कॅमेरात पकडता येत नाही! असो. खूप खूप समाधानाने आणि थोड्याफार अनिच्छेने तिथून निघून आलो. परत जायची इच्छा आहेच, पण परत तसाच माहौल जुळून येईल याची खात्री नाही...

दुसरी आठवण आहे ती माणगावची. तिथे श्री वासुदेवानंद सरस्वतींचा मठ आहे, तिथे दर्शनाला गेलो होतो. निसर्गरम्य ठिकाण आहे. दर्शन वगैरे होऊन परत फिरलो अन् कसं कोण जाणे, पण जाताना नजरेतून हुकलेलं एक जुनं असं श्री शंकराचं देऊळ दिसलं, आणि देवळासमोर छोटसं तळं होतं, ते कमळांनी भरलेलं! किती म्हणजे किती सुंदर दिसावं ते तळं! हेही चित्र टिपायचा योग नव्हताच! आजतागायत विसरु मात्र झालेलं नाही, हेच एक भाग्य! :) असो. आठवणींमुळे मूळ पोस्ट भलतच भरकटलं खरं.

तर, कशासंबंधी बोलत होतो, तर, भटकंती आणि घर.

कितीही भटकंती केली ना, तरी थकून भागून परतून यायला, भटकताना आलेल्या अनुभवांची पोतडी परत एकदा सोडून त्या पसार्‍यात हरवून जायलाही एक स्वतःची अशी जागा हवीच ना? त्यासाठी घर हवं. सद्ध्या घरी आहे नेहमीपेक्षा जास्त दिवस. घरुनच काम सुरु आहे, बॉसची कृपा! बॉस फणस आहे, म्हटलच होतं ना मी... या वेळेस अगदी शिक्कामोर्तब त्यावर.

घरी रहाणं, घरचं जेवण... जगी सर्वसुखी सद्ध्या मी आहे! :)

परवा रात्री जाग आली, पाणी पिण्यासाठी म्हणून उठले. आपल्या घरातला अंधारही सोबतीच. तिरुपतीला गाभार्‍यातला अंधार असाच सोबती वाटत असेल ना? आपल्याच पायाखालच्या वाटा, म्हणून अंधारातच स्वयंपाकघरापर्यंत पाणी प्यायला गेले. स्वयंपाकघराचं दार लोटता आत जाताना देवघरातल्या छोट्याश्या दिवलीच्या उजेडाची तिरीप येऊन अंधारात मिसळलेली दिसली. म्हटलं तर अंधार, म्हटलं तर उजेड. इतकं आश्वस्त, मायस्थ वाटलं.. घराचं रुपडं एकदम आश्वासक वाटलं, बर्‍याच दिवसांनी घरी आलेल्या माझं, मनापासून स्वागत करणारं.

घर असच असत. एकदा आपलं म्हटलं की बांधून ठेवतं. कुठेतरी खोल आपल्याही मनात कायमचं रुजतं. तिरुपतीही वर्षभर भक्तांच्या मागण्या मान्य करुन थकून भागून त्या अंधार्‍या गाभार्‍यात येऊन विश्रांतीसाठी राहतो आणि तिथे सुख पावतो म्हणे. ते त्याचं घर. त्याचं विसाव्याचं ठिकाण.