January 29, 2008

मैत्रीचं परिमाण

आजकाल मैत्रीला परिमाण तरी काय वापरतात? आजकालच्या मैत्रीची व्याख्या मला नक्कीच समजत नसावी, याची आता मला खात्री वाटायला लागलीय....

मैत्री म्हणजे नुसत एकमेकांशी गोड गोड बोलणं, एकमेकांच्या हो ला हो करणं बनलय का? आपल्या मित्र मैत्रीणीच काही चुकत असेल तर त्यांना हे चुकतय अस सांगायचा अधिकार इतर मित्रांना नसतो का आजकाल? का, केवळ चूक झालेली व्यक्ती आपल्या मित्रगणात मोडते म्हणून चुकलेली कृती, बोलणं याच्याकडे डोळेझाक करायची? अस काही घडलच नाही अश्या थाटात हसत, बोलत अन वागत रहायच?प्रसंगी कान पकडून चुकीची जाणीव आपल्या मित्राला करून द्यायाची मुभा आजकालच्या मैत्रीच्या व्याख्येत बसत नाही का?

प्रत्येकाशी मैत्री जमत नाही - निदान मला तरी नाही। बहुतेक सर्वांशी हसून खेळून वागल तरी, मैत्रीचे धागे एखाद्याच व्यक्तीशी जुळतात, हो ना? आणि हे अस लोभसवाणं मैत्र जुळलय हे समजल्यावर, आणि कालपरवापर्यंत ह्या मैत्रीविषयी अत्यंत आत्मीयता बाळगून असलेली व्यक्ती, मैत्री वार्‍यावर भिरकावून द्यायला तयार होते, नव्हे, भिरकावते - केवळ स्वतःचा 'मी' जपायला? अस करू शकत का कोणी? मैत्री अशी असते? एक मित्र म्हणून, मी चूक दाखवून देणं मला इतक महागात पडणार आहे?

माझा एक मित्र आहे, अगदी सवंगडी कॅटेगरीमधला, की आता 'होता' अस म्हणू? :( आजपर्यंत आम्ही एकमेकांबरोबर खूप काही शेअर केलय, खूप गप्पा मारल्यात, खूप काही सांगितलय। आवडी निवडी, इच्छा, आकांक्षा, तत्वं सार सार काही. अगदी एखादी मुलगी ह्याच्या रडारवर रजिस्टर होते, तेह्वाही आधी मलाच कळत, निदान आजपर्यंत कळलय अस म्हणू आपण. खूप जवळचा मित्र. त्याच काही तरी सणसणीत चुकल, आणि ते त्याला मी जाणवून दिल, म्हणून त्याने माझ्याशी बोलणच टाकलय बरेच दिवस. त्याची चूक होती, जेव्हा त्याला तस लक्षात आणून दिलं तेव्हा त्याने ते मान्य केल, सॉरी म्हटल आणि मीही जाऊदेत रे, कळल ना तुला, म्हणत माझ्याकडून विषय संपवला. माझ्याकडून विषय संपला होता. संपायला पण हवा ना? अर्थात हे माझ मत.

दुसर्‍या दिवसापासून हळू हळू लक्षात आल की हा पठ्ठ्या बोलतच नाहीये माझ्याशी!! अर्थात माझही चुकलच की जेह्वा लक्षात आलं तेह्वाच त्याला विचारायला हव होत की ही काय आता नवी नाटकं म्हणून.... पण तेह्वा मलाही राग आला होता.... असेच आता काही दिवस उलटलेत. काल शेवटी मीच विचारल त्याला, हे काय चाललय आणि अजून किती दिवस नाही बोलणार अस, म्हणून, तर म्हणे, मला माहीत नाही, बघू.....

हे बरय म्हणजे... :( :( :( अशी असते का मैत्री??? काहीच वाटल नाही का याला अस वागताना?? आम्ही अजूनही बोलत नाही आहोत.....

मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया,सुना हैं की तू बेवफा हो गया.......

ही मैत्री मी गमावली का कायमची?? :(

January 16, 2008

विराणी

एकेक पाकळी गळली
बहराची सरली गाणी
उदास ऋतू शिशिराचा
तनमनास वेढून राही

गतस्मृतींचा सुकला मोहर
कवटाळूनी परि हृदयाशी
चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...

January 14, 2008

विसूनाना उवाच..... (2)

आजकाल तसा मला खूप रिकामा वेळ असतो मंडळी!! आता निवृत्त माणूस मी। आमची पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहे, अन सहधर्मचारिणी? त्यांच काय विचारता महाराजा? इतक्या वर्षांत, हळूहळू, त्यांनी घरी आणि थोड्या फार प्रमाणात दारीही आपल साम्राज्य स्थापन केलय. त्या साम्राज्याची वीट हलवायच स्वप्न पहायची देखील माझी टाप नाही!! होऽऽऽ! आपणच कबूल करुन टाकलेल बर, नाही का?? आणि एका अर्थी ते साम्राज्य न हलवलेलच बर खर तर! हो, उगाच मोहोळावर दगड का मारायचा?? काय, खर की नाही?? असो.

तर, मी हा असा बसतो इथे बाल्कनीत खुर्ची टाकून। काही बाही वाचतो, एखाद दुसर्‍या झाडाचं पान हालताना बघतो -आता एखाद दुसर्‍याच म्हणायच ना? झाडं राहिली आहेतच कुठे त्यांची पानं बघायला? - चालायचच. काळाचा महिमा म्हणायचं झाल! पण शहराची रया गेलीय अगदी त्यामुळे, एवढ खर मात्र. वाईट वाटत अगदी. किती ओकबोकं झालय आता हे शहर.... कधी कधी वाटत बरका, जसजशी झाडं कमी होताहेत, तसतसा हा वातावरणातला जाणवणारा वाढता रखरखाट माणसांच्या मनातही उतरत चाललाय की काय नकळे... खूप खूप फरक पडलाय, हे मात्र खर.

तर, मी आपला असा बसतो, काही बाही वाचन करतो, बाल्कनीमधून दिसणार आकाश पाहतो, रस्त्यावरची न थांबणारी गर्दी निरखतो, हिने दिलेले हुकूम पाळतो अन कधी कधी गेल्या दिवसांच्या आठवणींत बुडून जातो.....

तसा आयुष्यात मी तृप्त आहे मंडळी। फारशी तक्रार नाही. तसही बरका, आमच्या वेळी साधं सरळ आयुष्य होत, अन त्यामुळे जगणही खूप सोप होतं. आजकालच एकूणच चित्र पाहिल ना की कधी कधी वाटत, भाजी चार आण्याची अन मसाला रुपयाचा, अस काहीस आहे. म्हणजे प्रश्न असतो एवढासा, पण त्याला उगीच रुप मिळत ते हे एवढाल!! काही उमगत नाही अश्या वेळी मात्र. असो.

मी आपलं माझ्या अडाणी आज्जीने सांगितलेल साधं सोप्प तत्वज्ञान जगलो, अन भरून पावलो।

त्याच अस झाल, मी जेह्वा कॉलेजात गेलो की नाही, तेह्वाची गोष्ट। एकदा, एका वर्गात, आमच्या प्रोफेसरांनी एक वाद विवाद स्पर्धा आयोजित केली. विषय काय? तर 'प्याला अर्धा भरलाय का रिकामा?' असा. प्रत्येकाने, एक तर प्याला भरलाय किंवा रिकामा आहे अशी एकच बाजू घेऊन ती मांडायची अन सिद्ध करायची. आता आली का पंचाईत? दोन्ही एका परीने खरच की!! सिद्ध तरी कस करणार? आणि कोणत्याही अभ्यासाच्या पुस्तकातही याच उत्तर नव्हत हो!! मग आता काय करायच असा विचार करत आपला बसलो घरी येऊन......

ते पाहिलन आज्जीनं। आधीच कालिजात जाणारा नातू, म्हणून तिला कौतुक. म्हणाली, "काय रे, काय झाल?कसला विचार करतोस म्हणायच एवढा? भूकबिक लागलेय का तुला?"

म्हटल, "अग, भुकेच काय घेऊन बसलीस? काय सांगू तुला, प्रोफेसर म्हणताहेत की वादविवाद करा, प्याला अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे यावर!! शोधा अन करा सिद्ध, अस म्हणताहेत ते! त्याचाच विचार करतोय ग... "

"हात मेल्या!! येवढच होय!!" म्हणत, माझी आज्जी, आपल बोळक घेऊन मनमुराद हसली!!

म्हटल "अग, हसतेस काय अशी?? वादविवाद स्पर्धा आहे यावर!!"

म्हणाली कशी, "तुझ्या प्रोफेसरला उद्योग नाही की काय रे? त्याला म्हणावे, आधी ह्याच उत्तर दे की पेल्यातल पेय पिताय का ओतून देताय?? ते सांगा म्हणाव आधी!!त्यावरन सांगतो म्हणाव की प्याला अर्धा भरलाय की रिकामा झालाय ते.....!!"

आता वाट्याला आलेला प्याला ओठी लावायचा की ओतून द्यायचा, हे आपणच ठरवायच, नाही का मंडळी?? काय म्हणता?

January 9, 2008

नवीन वर्षाचा पहिला धक्का अन खरेदी!!

संथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला!! गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी। कुठलाही सर्वर मोडला नाही, कुठलही सॉफ्टवेअर मोडल नाही॥सगळ कस शांततापूर्ण. बर वाटल, कधी नाही ते जरा आराम केला. वर्षाची सुरुवात अशी सुखदायक पाहून अगदी धन्य झाले!!

शनिवारी, इथेच राहणार्‍या मैत्रिणीचा फोन आला, घरी येतेस का रहायला म्हणून , आता हे दोघे नवरा बायको, माझे अगदी चांगले मित्र आहेत, आणि त्यांच पिल्लूही मला बिलगत आत्त्या, आत्त्या करत। आणि मजाच असते यांच्याकडे जायच म्हणजे. खूप गप्पा, एकत्र केलेल जेवण, पाहिलेले सिनेमे, पिल्लूबरोबर केलेली धमाल, हसण, जुन्या आठवणी... तर आलेच, म्हणत धावलेच सगळी आवरा आवर करून त्यांच्या घरी. तसही आम्ही साधारण पंधरा एक मिनिटांच्याच अंतरावरच राहतो.मग काय, एकदा तिथे पोचल्यावर हसण, खाण, सिनेमे पाहण, पिल्लाची चिव चिव, सगळ मजेत नेहमीप्रमाणेच चाललेल. संध्याकाळी फिरायला गेलो, एकूण दिवस मजेत गेला. रविवार आणखीनच मस्तपैकी आळसात गेला, छान जेवलो, सुपारी चघळली, परत सिनेमा पाहिला, संध्याकाळी बाहेर जाऊन आलो, दोन्ही दिवशी गप्पा तर इतक्या केल्या की पुढच्या वीकांतापर्यंतची बेगमी झाली!!! :)

सोमवारी सकाळी घरी यायला निघाले, आणि घरी पोचल्यावर पर्समधे हात घातला तर किल्ली गायब!!

सहसा मी किल्ली नेहमीच्या एकाच कप्प्यात ठेवते, पण न जाणो कुठे, इथे तिथे ठेवली असेल म्हणून अख्खी पर्स उलटपालट करून शोधल... किल्ली नव्हतीच! तरी अजून सामानाची सॅक बाकी होतीच, ती देखील सामान काढून उलटी पालटी करुन पाहिल, त्यात पण नाही!! आणि हे सगळ, फ्लॅटच्या दारासमोरच!! दुसर काय ऑप्शनच नव्हत! तसाच परत मैत्रिणीच्या घरी फोन ठोकला, ती बिचारी पिल्लाला शाळेत पाठवायच्या तयारीत, तरी तिनेही शोधलेच घरी वेळात वेळ काढून। तोपर्यन्त मी ही परत त्यांच्या घरी जाऊन धडकलेच होते. मी अन मित्र जोडप्याने विचारविनिमय करायचा निष्फळ प्रयत्न केला. त्यातून उत्पन्न काहीच झाले नाही!! शेवटचा उपाय म्हणून पिल्लूलाही विचारले, कारण साहेबांना सवय आहे वस्तू काढून तिच्याशी खेळायची अन आत्त्याची पर्स म्हणजे, त्यावर तर हक्कच ना!! :) आता आत्त्याच्या लॅपटॉपवर हक्क आहे, तर पर्सच काय एवढ मोठ्ठ?? :) :) पण एक मात्र आहे, समजा, एखादी वस्तू आमच्या या पिल्लाने घेतली असेल ना, आणि जर ती सापडत नसेल आणि जर पिल्लूला विचारल की तू घेतली होतीस का? तर आमच हे गोडूल सगळ सांगत, कधी घेतली, ती घेऊन काय काय खेळ केला, कुठे टाकली , घरातून बाहेर टाकली का, पुढच्या गॅलरीतून का मागच्या वगैरे, वगैरे!! आणि हे सगळ, अगदी निष्पाप चेहर्‍याने, मोठे मोठे भोकर डोळे करुन आणि चेहर्‍यावर एक गोडस, कशी जम्मत झाली, ह्या थाटातल हसू घेऊन! तुम्हाला चिडायचा काही स्कोपच नाही!! तर पिल्लानेही मोठ्ठ नाऽऽऽऽही अस सांगून दिल!

त्यावर,त्याच्या बाबानेही लगेच तू किल्ली दिलीस ना, तर आत्त्या मोठ्ठ चॉकलेट देईल अस आमिष दाखवल (शोभतो की नाही बाबा एचआरचा पाईक!) तरी उत्तर बदलायची तयारी नव्हती, त्यावरून तर स्पष्टच होत सगळ, पण थोड्या वेळातच एका चिमुकल डोक प्रकाशमान झाल आणि भरभर उत्तर यायला लागली!!

"मी माळ्यावर टाकलीये!!... कुठाय चॉकलेट आत्त्या??... " परत एकदा थोड्या वेळाने, " मी ना, मी ती बाथरूममधे ठेवेलीये बेसिन पाशी... आत्त्या, तू मला चॉकलेट देणारे का?? हो ना?" हे अगदी गोड आवाजात अन त्याहून खतर हसून दाखवून!! परत एकदा, आता शाळेत जाता जाता, "आत्त्या, तुझी चावी हरवलीये का?? मग तू इथेच ये आता, मी नी, मी ती फेकून दिलीये बाल्कनीतन.. चॉकलेट आण हां.... टाटा!! " या सगळ्या गोंधळात बाबा मधून मधून निरर्थक वाक्य पेरत होता, "अरे चॉकलेट फक्त चावी शोधून दिलीस तर.." वगैरे, पण नसत्या गोष्टींकडे पिल्लू लक्ष देत नाही!! असो. पिल्लाच्या वागण्यान, थोडफार मनावरचा ताण हलका झाला होता खरा. मग परत एकदा किल्ली शोधून, ती न सापडताही, अस्मादिक सोमवार असल्यान, (आणि हापिसात सोमवारीच उपस्थिती नसल्यास बॉस ताताथैय्या करेल हे ओळखून) ऑफिसला रवाना झाले. कित्ती कर्तव्यपरायणता किनै!! असो.

चेहर्‍यावर ताण दिसत असला पाहिजे, कारण कधी नाही ते बॉसने विचारल काय झालय, आणि कारण सांगितल्यावर, उद्या किल्ली नाही सापडली तर, सगळ कुलूप वगैरे बदलूनच ऑफसला ये, म्हणाला, उशीर झाला तरी चालेल, अशीही परवानगी दिली। कित्ती ग तो माझा गुणाचा बॉस, अस म्हणावस वाटल अगदी!! मग रात्री परत एकदा वरात मित्रघरी. हसत मुखान स्वागत झाल, पिल्लाची मिठी परत एकदा गळ्यात पडली, गप्पा, सिनेमा॥परत एकदा छानस हवस वाटणार रुटीन झाल. दुसर्‍या दिवशी मी अन मित्र जाऊन नव कुलूप, नवी किल्ली हे सगळे सोपस्कार करून आलो. हापिसात आल्यावर बॉसनेही सगळ सेफ आहे ना आता, अशी चौकशी केली. फणस आहे तो अगदी.

शनिवारनंतर एकदम मंगळवारी रात्री ऑफिसमधून गेल्यावर घरात परत पाऊल ठेवल। रात्री घरी पोचले नाही तोच पिल्लाचा फोन आला, "आत्त्या, तू का गेली घरी? आली का नाही? आता येते का?" ह्या पिल्लाच्या प्रेमात पडण एकदम सोप्प आहे!! :) नव्या किल्लीची एक आवृत्ती मित्रघरी पण आहे आता!

असो. परत एकदा नवी किल्ली आणि जुन घर अस नव्या वर्षात रुटीन सुरु झालय. आणि, नवीन वर्षाची हीच ती माझी अक्कलखाती जमा केलेली नवी खरेदीही !! :D

January 1, 2008

असच, मनातल काही बाही....

बघता बघता, २००७ संपल आणि २००८ उजाडून दुसरा दिवस पण संपत आलाय :) काल दिवसाची सुरुवात सही झाली!! सुट्टी होती, त्यामुळे एकदम आराम केला! सध्ध्या इतक घड्याळाच्या तालावर नाचाव लागत ना, की अर्धा दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मस्त वाटत! :) आजपासून परत एकदा रुटीन सुरु झालय, पण सगळे अजून तसे सुट्टीच्याच मूडमधे आहेत, त्यामुळे तसा आरामच आहे.

तस काही संकल्प वगैरे या वेळी केले नाहीत, कारण, असे काही संकल्प केले की पहिल्याच आठवड्यात त्यांची वाट लागते, हे ठरलेल! पण काही काही गोष्टी करायला खूप आवडतील, जस की टॅक्सच्या बाबतीत पहिल्यापासून व्यवस्थित सगळ्या नोंदी ठेवण, म्हणजे आयत्यावेळी धावपळ टाळता येईल. :D समोरच्याला नाही म्हणायला शिकण, कधी कधी हे नाही म्हणणं खूप कठीण होत, पण ते आवश्यक ही असतच. वाचन परत एकदा वाढवण.... आजकाल, वाचन खूप कमी झालय :(. कामाच्यापलिकडे जाऊन थोडा वेळ स्वतःचा, फक्त स्वतःचा म्हणून बाजूला ठेवण, परत एकदा फोटोग्राफीकडे वळण... मारूतीच्या शेपटासारखी यादी आहे... चांगले सिनेमा पाहण, गाणी ऐकण, हे न ते, कितीतरी गोष्टी करायला आवडतील......

यात पुन्हा नवीन वर्षाच्या पोतडीत माझ्यासाठी अन माझ्या अवतीभवतीच्यां लाडक्या लोकांसाठी काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच, कारण आपण खूप काही ठरवल, तरी केवळ तेवढच पुरेस नसत! आणि माझ्या सभोवतालच्या लाडक्यांच्या आयुष्यात काय घडत, त्याचे बरे वाईट परिणाम माझ्यावरही होतातच ना!! असो.

अजून तरी, वर्ष संथ गतीने उलगडतय, तेह्वा, मीही तसच त्याच लयीत सध्ध्या नवीन वर्षाच स्वागत करायच ठरवलय, आगे आगे देखेंगे होता है क्या..... :) आणि आत्ता हे... एका सहकार्‍याच लग्न ठरतय आणि बाकीचे त्याला २९ फेब्रुवारीला लग्न करायचा सल्ला देताहेत!! ४ वर्षातून एकदाच लग्नाचा वाढदिवस साजरा करावा लागेल म्हणे!! :D :P