November 10, 2009

गमते उदास..

खरं तर हे, असले श्रद्धांजलीवाले लेख लिहायला मला मुळीच आवडत नाही! जमत तर त्याहूनही नाही! मुळात, ज्यांच्या निधनामुळे काही हरवलं आहे असं वाटावं, अशी माणसं बोटांवर मोजण्याइतकीही नसतात, आणि अशी माणसं कायमची उठून गेल्यावर काय सुचणार लिहायला तरी? तेह्वा, मग लिहिणार तरी काय... तरीसुद्धा, सुनिताताई, तुम्हांला, तुमची एक वाचक म्हणून काही सांगावसं वाटलं, म्हणून ह्या लेखनप्रपंचाचा प्रयत्न.

तसा आपला संबंध फक्त लेखिका आणि वाचक ह्या कुळीतला. एवढाच. खरंतर, एकतर्फीच संबंध, म्हणजे, मीच एक वाचक म्हणून, प्रथम तुमच्या लिखाणाशी आणि नंतर, लिखाण वाचता वाचताच कधीतरी आपसूक तुमच्याशी जोडलेला.

तुमच्यासारखं, लिखाणातून क्वचितच कोणी इतक्या कसदार आणि निर्भयपणे प्रतिबिंबित होत असेल.. की झालं असेल, म्हणू आता? कळतेपणी तर नाहीच, पण नकळतसुद्धा इतर कोणापाशी, इतक्या सहजासहजी स्वत:कडे कमीपणा घेण्याचा मनाचा मोकळॆपणा असेल, स्वत:च्या चुका, घोडचुका, क्वचित प्रसंगीचा करंटेपणा इतक्या स्वच्छपणे, सरळ साध्या शब्दांत, वस्तुनिष्ठपणे मांडायचं धैर्य असेल असं वाटत नाही. हे असं तुम्ही कसं लिहू शकलात? कुठेही स्वत:ला वा कोणालाच झुकतं माप नाही, फुकटची स्तुती नाही, उगाचच भरीचा मीठ मसाला नाही! जे जसं आहे, होतं, जसं घडलं, तसंच आणि तेवढंच. नेहमीच. कोणतीही सारवासारव न करता, नसते, अर्थहीन लटके खुलासे न करता, कोणत्याही सबबींचा आधार न घेता, एवढं प्रांजळ लिखाण करायची विलक्षण अशी हातोटी, तुम्ही कशी साधलीत? ह्या एका लखलखीत आणि दुर्मिळ गुणामुळे तुम्ही मला खूप खूप आपल्या वाटलात! वाचक म्हणून सुनिता देशपांडे ह्या लेखिकेशी माझे सूर कायमचे जुळून गेले...

तुमचं लिखाण वाचताना मला नेहमी ह्या ओळी आठवतात,

कडाडणारी वीज नव्हे जी
जाळून टाकील अवघ्या जगतां
शिशिर ऋतूतील गोठविणारा
हा थंडीचा नव्हे गारठा
गर्भरेशमी सौंदर्याची
सुरेख नाजूक निसर्गलेणी
अधरांवरती अवतरलेली
राजस हळवी सुरेल गाणी...

असं काहीसं आहे तुमचं लिखाण. तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच. म्हणून तर तुमच्या लेखणीतून उतरलेलं परखड आणि तरीही आपलंसं वाटणार लिखाण मनाचा ठाव घेणारं ठरलं. वाचताना कुठेतरी तुमच्याशी संवाद साधला गेला, आणि निर्भीड असलं, तरी त्या लिखाणातला सात्विकपणा, कळत नकळतसा हळवा, हळुवार भाव मनात घर करुन राहिला, नेहमीच. साध्या शब्दांत, किती परिणामकारक, उत्कट आणि मनाला स्पर्शून जाणारं, अंतर्मुख करणारं लिहिलंत तुम्ही.... तुमचं लिखाण वाचताना, कधी कधी, हेच, अगदी हेच, आपल्याही मनात येऊन जातं, गेलेलं आहे, असं वाटत रहायचं, आणि मग तुमच्याशी अधिकच जवळीकीचं नातं जडत गेलं. तुम्हांलाही कवितांची असोशी आहे, असं कळलं, आणि जीव सुपाएवढा झाला! तुम्ही मूळ कोकणातल्या हे कळलं, आणि मनातल्या मनात, कोकणातल्या लाल रस्त्यांवरुन तुमच्या संगतीने मीही फिरुन आले. अगदी, न पाहिलेल्या धामापूरच्या तळ्याच्या आणि देवळाच्या परिसरातही भटकले... आपली कोकणातली माणसंच मनस्वी, नाही? तुमच्या मनस्वी लिखाणाचे गूढ थोडेफार उकलले का?....

किती आणि काय, काय सांगावसं वाटतं... पण तुमच्यासारखी शब्दकळा माझ्यापाशी नाही. अंतरीच्या गाभ्याला हात घालण्याची ताकद माझ्या शब्दांत नाही. तुम्ही तुमच्या शब्दकळॆच्या रुपाने सतत सोबत आहातच, पण तरीही तुम्ही आता लौकिकार्थाने ह्या जगात नसणार आहात, ह्याचं अत्यंत शब्दातीत असं दु:खही आता माझ्या मनात कायमचं कुठेतरी गोठून राहील.... त्याला इलाजच नाही ना! अणि काय सांगू?

सुनीताताई, आता मात्र खरोखरच, गमते उदास.......