May 20, 2010

योगायोग

तर, काय सांगत होते... गेले दोनेक दिवस एका मराठी संस्थळावर मृत्यूसंबंधी गप्पा, लेख, कविता वगैरे सतत वाचायला मिळत होतं. इतकं धपाधप लेखन येत होतं की थोडंस सवंग वाटायला लागलं होतं. निदान माझ्यासाठी तरी थोडंफार अजीर्णच झालं होतं ह्या विषयाचं. का असं वाटतय आपल्याला, हेही मनात येऊन गेलं. मॄत्यूची मला भीती वगैरे वाटते का, असा प्रश्न विचारला स्वत:लाच. तर, नाही. खरोखरच नाही. वेदपुराणांत सांगितलेलं मृत्य़ूबद्दलच चिंतन मला पटतं का? तर, उत्तर आहे की, पटतं की नाही, ठाऊक नाही, कारण पटतं वा पटत नाही हे म्हणण्याआधी ते पूर्ण समजायला हवं, पण थोडंफार आश्वासक निश्चितच वाटतं. मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत, आत्म्याचा नव्हे, शरीराला जिवंत बनवणार्‍या आतल्या चैतन्याचा नव्हे...हे ऐकायला खूप उदात्त वगैरे आहे, पण हे खरंच असं होत असतं का? असेलही, किंवा काय माहीत... हे तत्त्व कधीकधी समजल्यासारखं वाटत, आणि कधीकधी पार गोंधळून टाकणारं असं वाटतं. असो.

अंत, मृत्यू तर निश्चितच असतो. निदान आपल्या लौकिक अस्तित्वाचा तरी आहेच ना? जो डोळ्यांना दिसतो आणि बुद्धीला, जाणीवेला पटतो असा. प्रत्येकाच्या अस्तित्वाबरोबर, त्या अस्तित्वाला अबाधित ठेवण्यासाठी जे झगडे होतात, ज्या किंमती मोजल्या जातात, जे जे काही केलं जातं, ते सगळं अलवारपणे पुसून कसलाही मागमूस उरु न देता, शांतपणे आपल्यासोबत नेणारा. सगळ्यांच्या अस्तित्वाला एकच नियम लावणारा आणि ज्याची त्याची वेळ झाली की ज्याला त्याला उचलणारा. त्यावेळी वय, जात, पात, वा तत्सम अजून काही निकष - जे समाजात पाळले जातात -असल्या कसल्यालाही भीक न घालणारा. जसं सबका मालिक एक, तसा, सबके लिये एकच नियम लावनेवाला!

हे आज पुन्हा एकदा सगळं मनाशीच उगाळलं. निमित्त?

कालच्या बुधवारी ऑफ़िसच्या मेलमधून एका कलिगच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी आली होती. इथलं मृत्यूविषयक लिखाण वाचत असल्याने असेल कदाचित, ती बातमी येऊन अक्षरश: आदळली! नुसती बातमीच राहिली नव्हती ती आता. काल पाहिलेली व्यक्ती आज एकदम नाहीच? व्यक्तीश: ह्या घटनेमुळे माझ्या रोजच्या आयुष्यात अर्थाअर्थी काहीही फरक पडत नसला, तरीही, दोनेक क्षण काहीच सुचू शकलं नाही हे तर खरंच. नक्की शब्दांत काय वाटल हे पकडता येत नाहीये, पण हा विचार नक्कीच आला की हे मॄत्यूविषयक लिखाण वा बोलणं वगैरे किती सोपं आहे आणि किती अर्थहीन! नुसतेच पोकळ शब्द! केवळ फोल! एखाद्या तिर्‍हाईताने केवळ सांगू शकतो, बोलू शकतो म्हणून एखादा शहाणपणाचा पाठ पढवावा तसं. एखाद्या थिअरी आणि प्रॅक्टीकलमध्ये जमीन अस्मानाचा फरक असावा असं. ह्यापुढे मरणाबद्दल इतकं सहज, तिहाईतासारखं आणि इतकं धपाधपा नाहीच लिहू, बोलू आणि वाचू शकणार...

ह्याला योगायोग म्हणा किंवा काही.