October 25, 2011

चरैवेति, चरैवेति.. २




सकाळी सहाला हृषिकेशहून निघालो, ते कौडीयालला खायला थांबलो. इथे प्रामुख्याने गंगेच्या प्रवाहामध्ये राफ्टींग चालते. जिथे थांबलो, ते एक छोटेसे हॉटेल होते. तसे यथातथा, पण तरीही अगदी सुबक, आपलेसे असे वाटणारे. आवडले. साधेच बांधकाम होते, पण खिडक्या मोठ्ठाल्या होत्या आणि जिथून तिथून जितका काही होता, तो सूर्यप्रकाश आत झिरपत होता. उजेड आणि स्वच्छता ह्या बेसिक गरजा भागत होत्या. झाले की! खूप आरामदायी प्रवासाची, मोठ्या ऐसपैस हॉटेल्समधून राहण्याची वगैरे ज्यांची इच्छा असेल, त्यांनी ट्रेकींग वगैरेच्या भानगडींत न पडलेलेच बरे, असे माझे मत. जोवर बेसिक गरजा भागत असतील, तोवर तरी फुसफुसायचे कारण नसते. खरं तर आपल्या गरजा आपणच वाढवून ठेवलेल्या असतात, आणि मग हळूहळू त्यांचे गुलाम व्हायचे. आमच्या ग्रूपमध्ये सहसा कोणी कुरकुरणारे नव्हते आणि कोणाच्याही अवास्तव अपेक्षा नव्हत्या, ह्याचे एक फार सुख होते. सगळेच तसे जुळवून घेणारे लोक होते. मी तर कोणत्याच अपेक्षा ठेवून ह्या प्रवासाला सुरुवात केली नव्हती, आणि एव्हाना मी आतापरेंत दिसलेल्या हिमाचल, हिमालय आणि गंगेच्या प्रेमात इतकी बुडाले होते, की मला काहीच त्रासदायक वाटत नव्हते. इश्कने फक्त गालिबच निकम्मा होतो की काय?

हृषिकेशवरुन जेह्वा पुढे निघालो होतोत, तेह्वा साहेबांनी मौलिक माहिती दिली होती, की पाईन वृक्ष, झाडी वगैरे दिसायला लागली, की आपण हिमाचलात आहोत हे ओळखावे. ती झाडी तर दिसायला सुरुवात झालीच होती. हिमाचलात प्रवेश करते झालो होतो. हिमाचलाला देवभूमी का म्हणायचे, हे हिमाचल पाहताना स्पष्ट होत जाते. आरस्पानी, मुक्त सौंदर्य जिथे तिथे उधळलेले असते. शंभर टक्के आणि थोडे कांकणभर अधिकच वरिजिनल. जराही नावाला हिणकस नाही. पाहण्यासाठी पावलापावलावर आणि नजरेच्या प्रत्येक टप्प्यात इथे इतके काही आहे, की शेवटी डोळे दुखू लागतात, मन ओसंडून जाते आणि थकते आणि आपण अंतर्मुख होत जातो, कोणाशी बोलावे वाटत नाही, काही सांगावे वाटत नाही, काही ऐकावे वाटत नाही.. बाऽस, केवळ त्या सार्‍या आसमंताचा भाग होऊन कोठेतरी शांत बसून रहावेसे वाटते. तिथे दाही दिशांत पसरलेल्या, रुजलेल्या नि:स्तब्धतेत, शांततेत हरवून जावेसे वाटते. असलेच, तर तिथे असतात, केवळ नदी, पक्षी ह्यांचे आवाज. कधीमधी वाहने जातात, पण शहरातल्यासारखे भयाण वाटत नाही. पॅं पॅं सतत हॉर्न्स कोणी वाजवत नाहीत. इतकी वर्दळच नसते माझ्यासारखीच्या कधीतरीच प्रसन होणार्‍या नशीबाने. ह्या वेळी मात्र नशीब फुल टू प्रसन्न झाले होते. लईच भारी चालले होते आतापरेंत. तर, अधून मधून येणारे हेही आवाज, निसर्गदत्त आवाजांबरोबरीने तेही आपल्यात रुजतात, आसमंताला आपल्या असण्याने थोडेफार भान देतात, पण रसभंग करत नाहीत. बाकी मग हवे तरी काय?

थोडेसे खाणे लागते हां पण! अडचण अशी आहे की व्यावहारिक जगाशी मेळ घातल्याशिवाय असे स्वप्न पूर्णपणे जगायची मुभा नसते. की कराँ... तेह्वा मग हॉटेलमध्ये जाणे ओघानेच येते. तर, म्हणून खायला थांबलो. सुरेख, चविष्ट पनीर पराठा खाल्ला. सोबत दही, लोणचे. हॉटेलचा मालक वा चालक, जो कोणी होता, तो अगत्यशील होता. पर्यटन हाच हिमाचलाचा मुख्य कणा असल्याने ही सेवा पुरवणारे इथले लोक अगत्यशील असणार, हे थोडेफार धरुन चालले तरीही, माझ्या मते, इथल्या लोकांनी अजून तरी माणूसपण जपले आहे. इथल्या माणसांशी बोलणे, संवाद साधणे फार सहजगत्या जमते, असं एकूण माझं मत झालं. अर्थात, दहा दिवसांत बरचंसं अंतर गाडीतून तोडणार्‍या माझ्या मताची ऑथेंटीसिटीही तितकीच म्हणा, पण कोणाशीही बोलायला सुरुवात केली की हसतमुखाने ती व्यक्ती बोलत असे. अगदी मनापासून. कोण हे माझा वेळ खाते आहे, कशाला बोलण्यात वेळ घालवत आहे, मला किती कामे आहेत आणि इथे मज शहाण्याचा वेळ वाया जात आहे, वगैरे असे भाव कधीच जाणवले नाहीत. चेहर्‍यावर प्रसन्नसे हसू असे, लागण व्हायलाच हवी असे. साधे, सोपे आयुष्य असले की कदाचित असे हसू त्याच्या सोबतीने मिळते की काय? की लुसलुशीत पनीर, मधुर दही अन् ताकाचा हा परिणाम म्हणायचा?

ह्या हॉटेलचा समोरचा रस्ता ओलांडला की छोटी छोटी कॉटेजेस होती, खाली जायला छोटासा रस्ता, पायर्‍या होत्या. मघा रस्त्यावर गाडी थांबली होती तेह्वाच पलिकडे गंगा वाहताना दिसली होती. लांब वाटली होती, तेह्वा लांबून का होईना, पुन्हा एकदा पाहूयात म्हणून, पायर्‍या उतरलो, आणि ही इथ्थेच अशी हातभर अंतरावरुन गंगा प्रवास करत होती. तेच जीवघेण्या सौंदर्याने नटलेले पहाड. तेच शुभ्र पाणी. तोच वेगवान प्रवाह आणि हे सारे नि:शब्दपणे अनुभवत तेच ते आम्ही. रैनाकडे पाहिले. तिचीही तीच अवस्था आणि स्वातीचीही. बरोबर ग्रूपमधले राहुल, प्राची (राहुलची बायको) आणि प्राची (राहुलची बहीण) होते, रोमिला म्हणूनही एक जण होती. ही आमच्यामध्ये एकदमच मिसफिट. ट्रेकींगमध्ये एकदम एक्स्पर्ट. तिला पाहूनच मला भयानक न्यूनगंड येत असे. फारशी बोलतही नसे कोणाशी, तेह्वा ती आम्हांला तुच्छ समजत असावी की काय, असे विचारही आम्ही केल्याचे आठवते अणि तिला जरा शिष्ट असावी का, हे लेबल कळत नकळत लावून ठेवले होते. त्या क्षणी मात्र सगळेच समोर जे काही दिसत होते, त्याने मंत्रमुग्ध झालो होतो. कॉटेजमध्ये जे कोण भाग्यवान मुक्काम ठोकत असतील, त्यांचा हेवा, हेवा वाटला.

पुन्हा एकदा गंगेचा प्रवाह आणि पहाडांना डोळ्यांत आणि मनात साठवत तिथूनही पुढे निघालो. प्रवास सुरु होता. बसमध्ये ग्रूपमधले सारेच खुलले होते. गाण्याच्या भेंड्या जोरात सुरु होत्या. खूप जुनी गाणी आठवून, आठवून म्हटली. रैना आणि दोन्ही प्राच्या, राहुल, साहेब गाणी म्हणण्यात पुढे होते. मीही त्यात घसा खरवडला मध्ये मध्ये. कधी कधी असा काही नजारा समोर यायचा, की गाणं वगैरे विसरायलाच व्हायचं मला. हे लोक तोवर काही दुसरंच गात असायचे. त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्यायचे.

ते P.S पुस्तक वाचायचे राहूनच जात होते....

निशांत म्हणून एकजण होता, त्याच्याकडे टपोरी गाण्यांचा एव्हरग्रीन स्टॉक होता. ती मध्ये मध्ये म्हणून दाखवून बसमधले वातावरण खिदळत ठेवण्यात ह्याचा मोठा सहभाग होता. किस्सेही असेच, अफलातून, निव्वळ टीपी. सुजय, रोमिला, दुर्गेश ही जरा शांत शांत अशी मंडळी. स्वातीही. रोमिलाकडे कवितांचे एक पुस्तक होते, ते एकदा तरी मी ट्रेक संपण्याआधी वाचायला घेईन तिच्याकडून, असे स्वतःला बजावले. अपूर्व हा सहसा बॅकबेंचर आणि एकटासा. बोलताना मृदुभाषिक अगदी. ह्या मुलाची फोटोग्राफी स्कील्स अफलातून. सुरेख फोटो काढतो. एकदम देखणे. दोघी बहिणी होत्या, संगीता आणि ललिता. गुजराथेतून आलेल्या. ललिता जराशी त्रासलेली असायची, आणि संगीता तिला सांभाळून घेत, आमच्याशीही जुळवून घ्यायची. तिचं खूप कौतुक वाटायचं, ललिताच्या स्वभावावर जराशी खसखस पिकायचीच. त्याला इलाजच नव्हता. राजश्री ही सगळ्यात सिनियर मेंबर आमच्या ग्रूपची. रोमिला खालोखाल हिचा फिटनेस. ह्या दोघींनी फिटनेसच्या बाबतीत एक लीडरसायब आणि गाईड्स सोडले आम्हां सगळ्यांनाच लाजवले म्हणायला हरकत नाही.

बरोबरचे गाईड्सही स्वभावाने लाख होते अगदी. आणि आमच्या बशीचा डायवर? त्याचे बारसे 'कैलाश खेर' असे केले होते. त्याचा रेडिओ - म्हंजे बशीतला - सतत सुरुच असायचा आणि इतक्या बेदरकारपणे पण गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवून सुसाट गाडी सोडायचा की काय सांगू. पुढे पुढे तो गाडी चालवताना समोरच्या रस्त्याकडे पाहणे सोडून दिले. उगाच डोक्याला ताप कशाला करुन घ्या? त्यापेक्षा गाणी गाणे आणि बाहेरचे नजारे पाहणे सोपे होते, अधिक आनंददायी होते. संपूर्ण प्रवासात बाजूने गंगेचा प्रवाह दिसत राहिलेला. सोबतीला उंच निंच, हिरवे, निळे, करडे, आकाशापरेंत पोहोचणारे, अंगाखांद्यांवर ढग बाळगून असलेले पहाड. मला ठाऊक आहे की, आत्तापरेंत मी हे बर्‍याचदा लिहिले आहे, पण पुन्हा पुन्हा हे ह्या सार्‍या प्रवासात जाणवले, ह्याच सदाबहार दृश्यांनी सतत मोहिनी घातली, वेड्यासारखे वेड लावले आणि थकवलेही. गंगा आणि हिमालय, हाच हिमाचलाचा आत्मा.

बसने रस्ता कापताना प्रथम देवप्रयागपाशी पोहोचलो. भागिरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. तिथे थांबलो. कमालीचे उन होते. कातडी करपवणारे उन. सहन होत नव्हते इतके तीव्र, पण त्या प्रयागापुढे सारे काही विसरायला झाले.... वर ढणाढणा उन आणि खाली भागिरथी आणि अलकनंदा आपापल्या मार्गाने पुढे येऊन एकत्र होऊन, गंगा म्हणून मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही तीरांवर दाटीवाटीने पिवळ्या, निळ्या रंगांची घरे. काय अफलातून सुरेख दिसत होते सारे. पहाडांवर घरे बांधून लोक राहतात. तिथे जाऊन २-३ दिवस का होईना, रहावे, अशी फार फार इच्छा झाली. दिवसभर नदीचा नाद कानांवर पडला की कसे वाटत असेल, हे जाणून घ्यायचे होते. तिथल्या रहिवाशांचा हेवाच हेवा वाटला. रोज त्या नद्या वाहताना अनुभवायच्या, त्यांचा नाद ऐकायचा..

इथे पाऊस कसा पडत असेल? त्यावेळी ह्या नद्या कशा भासत असतील? कशा वाहत असतील? रोरांवत असतील? फुफाटत असतील? रौद्र निसर्गाचे ते एक रुपडे पहायचे फार मनात आहे. आणि चांदण्या रात्री कशा दिसत असतील? नुसती कल्पना करुन माझ्या अंगावर काटा येतो! भारावून जायला होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते दुधाळ पाणी किती मोह घालत असेल पाहणार्‍याला... तेही पहायचे आहे मला. पहाटवेळी? संध्याकाळी? अमावास्येला? किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते... कधी योग आहे, पाहू.

तिथे तापणार्‍या उन्हात उभे राहून, घसे सुकवल्यावर, तिथेच गाडी लावून उभ्या असलेल्या एका सरबतवाल्याकडे आम्ही सुमधुर लिंबूसरबत प्यायलो. पाणी कुठले होते? कोणास ठाऊक. जाणून घेणे तितके महत्त्वाचे वाटलेही नाही. कायच फरक पडला नाही. नाही, म्हणजे आता आम्ही शहरातले फिल्टर्ड पाणी पिणारे जीव झालोय ना, म्हणून. ऑफिसमध्येही आणि घरी उकळून आणि काय काय. लहानपणी आजोळी पणजोळी जायचे, तेह्वा कसे जिवंत झर्‍याचे, विहीरीचे पाणी प्यायलेले चालायचे? काही होत नसे तब्येतीला. मनामध्ये इच्छा केली, की नद्यांचे पाणी आणलेले असूदेत ह्या महाभागाने सरबत बनवायला, पण बनवले होते सुरेख.

तिथे एक पाडी होती, तिच्याशी लग्गेच मैत्री झाली. तिलाही थोडे सरबत, एक लाडू, एक सफरचंद, बाटलीमधले पाणी असे काय काय मी खाऊ पिऊ घातले, पुढे तिचे पोट बिघडले असले तर मीच जबाबदार, पण ती मजेत चरत होती. तिची पोळी खाजवली. कानामागे खाजवले. गळ्याला मिठी मारली. पूर्वी पणजोळी एक गाय होती, तांबू नावाची, ही अगदी तशीच आणि त्याच रंगाची होती. तांबू मागील दारी असे, पण पुढील दारी पणजोळी पाय ठेवला, की तिला समजत असे, मग तिला जाऊन भेटेपरेंत हंबरत राही. ते सगळे आठवले. पाडी पण गुणी, मायाळू होती. सरबतवाल्याला वाटले, मला तिची भीती वाटतेय. म्हटले, नाही हो, भारी गुणी आहे बाळी. घाबरेन कशाला. मला सवय आहे, आणि पुढे मनात म्हटले, खूप खूप वर्षांपूर्वीची... तांबूची आठवण खूप घट्ट आहे.

देवप्रयागापासून हलावेसे वाटेना. भागिरथीची कहाणी तर ठाऊकच असते सगळ्यांना सहसा. अलकनंदेची काय आहे बरं? शोधायचे ठरवले.

क्रमश:

October 20, 2011

चरैवेति, चरैवेति..१





पुढच्या प्रवासाची कहाणी सांगायच्या आधी आमच्या आदल्या रात्रीच्या ऑर्डरींची आणि वेटरसायबांच्या कष्टांची दर्दभरी कहाणी सांगते. मूऽऽड आला आहे!

तरं झालेलं काय, की दिवसभरातल्या प्रवासानं अगदी दमायला झालेलं. खेळ नाही हो, खरंच. आठवा बरं,- एका ट्रेनीत - दुरांतोत - बसायचं, रात्रभर प्रवास करुन दिल्ली गाठायची. रात्री गाडीत नीट झोपायचं नाही. येतच नाही झोप. मध्ये मध्ये ह्या कुशीवरुन, त्या कुशीवर. कारणं? अनेक असतात हो. कारणांना तोटा नस्से. हवीत? ही घ्या.

झोपेची जागा बदलली, घरच्यांची आठवण. नेहमी बिल्डिंगी आणि शहरी वातावरणातले सिमेंटचे ब्लॉक्स, जीव घुसमटवणारी रहदारी आणि रखरखीत गर्दी पाहून आणि जगून कंटाळलेल्या जिवाला एकदम हिरव्या रंगाची उधळण, न संपणारं निळं, काळं, सावळं करडं आकाश, अफाट पाणी - आठवा, वैतरणेचं इथपासून ते तिथपरेंत असलेलं पात्र - दिसल्याने त्याची आनंदाने झालेली तगमग आणि घुसमट - घेता किती घेशील, असं झालं की होते तशी. झोप उडते. इतकं, असं सुख पेलवत नाही. अनुभवांची मनात जपणूक करण्यासाठी, मन, मिळालेली शांत वेळ वापरुन घ्यायला पाहते आणि झोपेला नाट लागते. त्याच वेळी एक कळही येऊन जाते मनात. का? ह्यासाठी, की हे असं सगळं पुन्हा कधी पहायला मिळेल, हेच आणि असंच.. ही बोच लावून जाते. न जाणो, कदाचित, पुढल्या वेळचा नजारा अधिक सुंदर असेलही. कोणास ठाऊक.

पण, पुन्हा दुसरी एक जाणीव डोके उंचावून उभी राहते. आत्ता जसे ते भिडते आहे, त्याच जाणिवेने आणि असोशीने पुढल्या वेळेला भिडेल का, हे अजून एक न भिरकावता येणारे ओझे माझ्यासाठी आंदण म्हणून घेऊन. कदाचित अधिक तरल जाणिवेने भिडेल का? परत कधी असा प्रवास करायला ह्यापुढे जमले नाहीच तर? - बाबा, निगेटीव्ह विचार तो हाच, हो ना? तुझा मुद्दा परत एकदा प्रूव्ह्ड.- पण खरेच, सगळेच जमून यायला हवे. तेच महाकठीण. सगळ्या बाबतींत असेच तर असते. कोणाला जाणवते, त्रास देते, कोणाला नाही. त्रास न होणारे सुखी, की त्रास होऊ शकणारे? की त्रास होणारे व त्याविषयी काही करु शकणारे? अपनी सोच का अपना दायरा. अपने, अपने खयालात. सब कुछ जायज, कदाचित. कोणी कोणाला बरोबर किंवा चूक ठरवावे? प्रत्येकाचे विचार, लिमिट्स वेगळी. आवाका वेगळा. नै का? असो.

तरी हे असं सगळं अनुभवायला लागलं, आणि ते आत आत भिडायला लागलं, की झोप आस्तालाविस्ता म्हणते. की कराँ? नाविलाजको विलाज नै होता. एऽऽऽ, कोण रे ते हसतेय मला? आँ?

पुन्हा मळवलीच्या आणि एकूणातच तिथल्या भागांतल्या होर्डींग्जने सृष्टीसौंदर्य कसं बिघडलं आहे ह्याची हळहळ पोखरतेच. वांझोटी असते, पण जीव कुरतडल्याशिवाय रहात नाही. हे आणि असले अजून काही विषय. झाडांना ठोकतात हो पाट्या वगैरे. तुमच्या शरीरांवर ठोका ना रे. सहप्रवाशांशी झालेल्या गप्पांविषयी मनात येणारं काहीबाही. कुणी काही मनातले सल बोलून दाखवले तर त्याविषयी वाटणारी हळहळ आणि वाटणार्‍या काळज्या. पूर्ण मनापासून. जोडीला पुढे ट्रेक कसा होणारे, हे एक सतत मनात ठाण मांडून, दडून बसलेले आणि मध्येच कधीतरी डोके वर काढून एकदम जोररात भॉंऽऽऽक्क करणारे लोभस भूत! एक ना दोन कारणे! एवढी पुरेत ना?

शरीराबरोबरीनं, किंबहुना त्याहून अधिक वेगाने मनही प्रवास करतं. तसं पाहिलं तर, आपल्याला आकाशाला गवसणी घालायची थोडीच असते? पण, मनाला मुद्दा समजेल तर ना?! असो, लईच भरकटले. तर प्रवासाकडे वळूयात? चलो! नॉर्मल गप्पा करुयात फॉर अ चेंज.

तर, दिल्लीला पोहोचल्यावर, तिथे पुन्हा दुपारच्याला दुसरी हरिद्वारवाली ट्रेन गाठून पाऽऽर हरिद्वारला पोहोचायचं. तिथनं पुन्हा बशीत बसून जाताना, पदरात पडलेल्या गंगेच्या दर्शनानं इतकं वेडं व्हायचं की उरली सुरली शक्ती वापरुन मनही पार दमून, थकून एकदम येडं व्हायच्याही पलिकडे. त्यात पुन्हा तो चौसोपी चौक. असं ते सगळं काय, काय. तेह्वा असं आमचं पाऽऽर गठुडं वळल्यालं. तेह्वाच कधीतरी भूक नावाची संवेदना पोटाला जाणवलेली असावी बहुधा, पण ती मेंदूपरेंत पोचत नसावी. नक्की तसंच असायला हवं, कारण नंतर पाहता आम्ही तर बकासुराला पण शरमेने मान खाली घालायला लावली असती!

हॉटेलात पोहोचून आपापल्या खोल्यांमधून सामान वगैरे टाकून थोडं स्थिरस्थावर होऊन, चौसोपी मोकळ्या जागावाल्या चौकाकडे मी आणि रैनाने आसूसून पाहून, यथावकाश सगळे खाली जेवायला म्हणून येऊन बसलो आणि डायनिंग हॉलमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी भूकच नसल्याची रेकॉर्ड वाजवली. सगळे फक्त १-२ चपात्या (पोळी नव्हे, पोळी म्हणजे फक्त पुरणाची, साध्या चपातीला पोळी वगैरे म्हणायचं म्हणजे.... असोच, असो हं काय!) आणि थोडीच भाजी वगैरे खाणार होते, उगा आपलं नावाला हो. झोपेच्या आधी काहीतरी खायला हवं ना. सवय, सवय. बाकी काही नाही. तर, सुरुवातीची ऑर्डर समोर येईतोवर ओळखीपाळखी करुन घ्यायला सुरुवात झाली. सगळ्यात शेवटी मी होते आणि नेमके तेह्वा छोट्या छोट्या फुलक्यावजा चपात्या आणि रोट्या आल्या आणि पनीर पालक, आणि अशीच आलूची भाजी. मग ओळख राहिली बाजूला. सगळ्यांच्या हातांची आपापल्या पोटांशी गाठ पडली होती. एक राउंड झाली आणि जठराग्नी भडकल्याचं सगळ्यांच्या मेंदूंच्या एकदमच लक्षात आलं असावं. मग काय? ओघाने अजून रोट्यांच्या ऑर्डरी गेल्या, ते घेऊन वेटर सायब आले, त्यांची वाटच पहात होतो. लग्गेच भाताची ऑर्डर, मग डाळीची ऑर्डर, मग परत भाजी.. दही पण मागवले, मला वाटते. शेवटी, शेवटी काही जिन्नस घेऊन आले की वेटर सायबच विचारायचे, और कुछ "खायेंगे" क्या? बघा, म्हंजे! शेवटी एकदाचे थांबलो खादडायचे. खादडायच्या भरात गप्पांचा भरही कमी झाला होता. नंतर पोटोबा भरल्यावर डोळेही मिटायला सुरुवात झाली आणि दुसर्‍या दिवशी लवकर उठायचे होते म्हणून झोपलो. माझी ओळख करुन द्यायची राहिलीच. ते ठीक झाले. फार काही नाहीच आहे तसेही सांगायला. अशी ती सगळी कहाणी.

हे लिहिलेले मजेशीर नाही वाटणार कदाचित, पण तो माहौल आठवला तरी अजूनही हसू फुटते. पनीर काय सुरेख होते. दहीही. दोन्ही माझे आवडते खाद्यप्रकार, पण ह्या हिमाचलातल्या पनीर आणि दह्याच्या तर मी प्रेमात आहे. किती तो मुलायमपणा, किती उत्तम चव. मस्त. दुसर्‍या दिवशीची कॉफीही सुरेख जमली होती. सकाळी सकाळी अशी कॉफी मिळणे हा शुभशकून असतो.

ठीक सहा वाजता आम्ही निघायला तयार होतो. बाहेर जाताना हॉटेलच्या दरवाज्यापाशी पाहिले, तर एका मातीच्या मोठ्या भांड्यात ही इतकी गावठी गुलाबाची फुलं पाण्यात घालून ठेवली होती! पाहूनच अख्खा दिवस सुगंधित झाला! गर्द गुलाबी रंगाची गुलाबफुलं सुरेख, टवटवीत दिसत होती. जोडीला त्यांचा मंद, मन प्रसन्न करणारा सुगंध. वाकून, वाकून भरभरुन सुवास घेतल्याशिवाय राहवले नाही. एखादे फूल परवानगीने सोबत घ्यावेसे वाटले, मग म्हटले, असूदेत. कोमेजून जायचे. नाही घेतले. मी लहान असताना अंगणात होते ते गावठी गुलाबाचे झाड आठवले. नऊवारी नेसून आपल्या भरगच्च आंबाड्यात एखादे फूल खोचणारी, मोत्यांच्या कुड्या घालणारी आणि ओह, कित्ती देखणी आणि मऊ मऊ असणारी आणि वागणारी आज्जी आठवली. संध्याकाळच्या वेळी ती बाकावर बसलेली असताना, अंगणात फिरणारा, शतपावली घालणारा आजोबाही आठवला - हो, त्याला मी एकेरीच हाक मारत असे - त्याला, बाबाला, काकाला. हमारेमें ऐसाच चलता था. आठवणीच आठवणी. मनाने जसे इंप्रिंटस घेतलेले असतात. ही प्रिंट हवीय, घ्या, ही नको? ती हवीय, वांदो नथी. आहे, घ्या. अजब आहे.

सकाळच्या वेळात थोडीफार फोटोग्राफी केली आणि निघालो. हृषिकेशवरुन पुढे पिपलकोटीला. लक्ष्मण झूल्याबद्दल खूप ऐकले होते. वाटेत दिसणार होता. साहेबांना हजारदा सांगितले होते की झूला आला की सांगा, दोन मिनिटे तरी गाडी थांबवायची का? हो, हो असे उत्तर मिळाले होते, म्हणून तशी निवांत होते. बराच वेळ झाला, मधल्या गावातल्या गल्ल्याही पार केल्या, चिंचोळ्या रस्त्यांमधून गाडीवान त्याच्या मते कौशल्याने आणि म्हणजेच आम्हांला भीतीदायक वाटेल अशा प्रकारे गाडी हाकत होता, आणि तो रस्ताही मागे पडला, कोणतासा घाटही पार केला. गर्दीही विरळ झाली आणि थोडीशी शंका आली, म्हणून विचारले की झूला कुठे? गेला की मागेच, असे उत्तर मिळाले. आई ग्गं! काय हे.. इतक्यांदा सांगूनही.. वाईट वाटले थोडेसे. तरी प्रवासाची गणिते मला कुठे सांभाळायची आणि सोडवायची होती? त्यांची गणिते आणि उत्तरे त्यांनाच ठाऊक, म्हणून हळहळ मनातच दडपली आणि गप्प बसले. तरीही वाईट वाटलेच. आता फक्त हरिद्वार आणि हृषीकेश करायला हवे ह्यासाठी. मनसोक्त घाटांकाठी बसायचे. झूल्यावरुन फेर्‍या मारायच्या. नक्कीच. स्वतःलाच प्रॉमिस केले.

जसे जसे पुढेपुढे जात होतो, नजारे उलगडत होते. कोणत्या नजार्‍याला म्हणावे की नजारा हो तो ऐसा हो? डावे उजवे ठरवणे फार कठीण झाले होते, आणि तेवढ्यात एक फार, फार सुरेख जागा आली. निव्वळ अप्रतिम म्हणावी, अशी. एक मोठा लांबलचक पूल गंगेच्या पात्रावर बांधला होता,दोन्ही काठांना जोडत होता. लोखंडी असावा बहुधा. त्या पूलावर जाऊन उभे रहावे असे फार वाटले. जमले नाही. पुलाच्या दोनही बाजूंना, नव्हे सभोवताली, नजर जाईल तिथे गंगेचे शुभ्र पाणी आणि नजर पाण्यावर ठरत नाही म्हणताना, ती तोलून धरायला पहाडांचे उंचच उंच कडे. पहाड कशाला म्हणायचे हे हिमालयात आल्यावाचून उमजायचे नाही, आणि हे म्हणे हिमकडे नव्हेत. खरंच? मग अजून उंच असतील हिमकडे? अजूनही कल्पना करता येत नव्हती खरं तर. आत्ताच छाती दडपत होती. भव्य, दिव्य म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे तर असेच काही पहायला हवे. खरं सांगायचं तर असे काही पहिले की त्या नजार्‍याचे वर्णन हे शब्दांनी होतच नसते, अ श क्य. शब्द बापुडे, केवळ वारा..

हिमालयाच्या रांगांमधून गंगा मनमुराद वाहत होती. आमची वाट एका काठाने जात होती आणि वाटेची दुसरी बाजू हिमालयाच्या पहाडांनी तोलून धरली होती. रस्त्यावर आमच्याशिवाय कोणी, कोणी नव्हते. सकाळच्या उन्हांत गंगेचे पात्र किती लोभस दिसावे, त्याला काही सीमा? अवर्णनीय, अप्रतिम वगैरे शब्दही पोकळ वाटावेत. काही घटना, अनुभव नुसते जगायचे आणि जपायचे. गंगेच्या पाण्यावरची त्या सकाळच्या वेळची आभा तर मी जन्मात विसरणार नाही. काहीतरी फार पवित्र आणि मनाच्या आत काही शुभ्र, काही जीवघेणेसे उलगडणारे असे समोर वाहत होते. किती जवळून. पुन्हा एकदा वाटले, झोकावे का स्वतःला? मन कधीच झोकून दिले. जवळच असलेल्या खडकावर, उंचच उंच निळ्या, हिरव्या पहाडांच्या साक्षीने आणि वाहणार्‍या पाण्याच्या सोबतीने जगाच्या अंतापरेंत तिथेच बसून रहावेसे वाटले. काही काही क्षण, काळाचा काही भाग आपल्याला किती निर्मळ भावना देऊन जातात. दुर्मिळ असतात. त्यापैकी हा नक्कीच एक. अजून ते सारे तसेच्या तसे डोळ्यांपुढे येते. वेड लागते.

अतिशय अनिच्छेने गाडीत बसून मार्गाला लागलो. एके ठिकाणी खायला म्हणून थांबलो. तिथेही गंगा अशीच वाहत होती. भरभरुन. पहाडांच्या सोबतीने. पडाड तरी कसे. उंचनिंच. एकाच वेळी मनात भरणारे आणि धडकीही भरवणारे. गंगेचा प्रवाहही तसाच आहे. जरी मनात धडकी भरली तरीही कसले अनाकलनीय आकर्षण वाटत राहते? पुन्हा पुन्हा ओढ वाटते? सारेच गूढ. तिथूनही पुढे निघालो. गाडीमध्ये आता गाण्याच्या भेंड्या, गप्पा, गाणी, टीपीवाले विनोद, हसणे खिदळणे सारेच सुरु झाले होते. समां बंध रहा था...


क्रमश:

October 1, 2011

हर हर गंगे..२




मनातल्या मनात माईला हाका मारल्या. तिने ऐकल्या का?

तितक्यात बसच्या दुसर्‍या बाजूच्या खिडक्यांबाहेर लक्ष गेले. ओह्हो! दिसली, माई दिसली.. आणि कशी? अवाक् व्हायला झाले! छाती दडपली एकदम. आपल्या सर्व सौंदर्यानिशी, सामर्थ्यानिशी, सौष्ठवानिशी आणि ऐश्वर्यानिशी माई वाहत होती. तिच्या लाटा सातत्यपूर्ण नाद करत इतक्या वेगाने पुढे पुढे सरकत होत्या! जणू काळाच्या वेगाला मागे टाकतील. छे! शब्दांत ते दृश्य पकडणे मला केवळ अशक्य आहे! कसे दिसत होते ते? जणू काही आताच कात टाकलेल्या नागिणी सुसाटत धावत होत्या! मनात आले, माईने खरेच तर सांगितले होते भगिरथाला. तिचा वेग सहन होणे अशक्य. हा तर अंगावर येऊ पाहणारा वेग होता. जराशा दुरूनच पाहत होतो, तरीसुद्धा तसे बर्‍यापैकी ओझरते पाहतानाही तो वेग असह्य झाला होता, विलक्षण ओढ लावत होता, भुरळ पाडत होता... तर प्रत्यक्ष तिच्या सन्मुख असणार्‍यांची काय स्थिती होत असेल? जीव इतक्या काकुळतीने अस्वस्थ होऊ लागला होता, एक प्रकारची उलघाल आणि एक विलक्षण उर्मी दाटू लागली होती आणि वाटले, बस्स! बेभानपणे ह्या लाटांवर स्वतःला तनामनाने झोकून द्यावे, माई नेईल कुठे ते. सखी आहे, सांभाळूनच नेईल, आणि एकदा झोकून दिल्यावर पुढची पर्वा कोणाला? कशाला? खरंच. विल़क्षण मोहाचा क्षण. नुसते वाटले. कुडी झोकायला धीरही खरोखरच झाला असता की नाही, कल्पना नाही. उर्मी दाटणे वेगळे आणि कृती करणे त्याहून वेगळे. निरनिराळ्या जबाबदार्‍यांनी पाय मागे ओढले. जबाबदार्‍या नसत्या तर झोकून दिली असती का कुडी? जमले असते? काय, कोणास ठाऊक.. छंद म्हणून विचार पुरला आहे मात्र सद्ध्या. असो.

किती किती ओढ लावते गंगामाई! पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. किती प्रकर्षाने स्वतःला तिच्या लाटांवर झोकून, फेकून द्यावेसे वाटले आणि पुढे तिचे निरनिराळे प्रवाह पाहताना, अनुभवताना वाटतच राहिले. जमेल तितके ते दृश्य पहायला प्रयत्न केला. बस थांबली नाही, फार फार दु:ख होत होते बस न थांबत असल्याचे.

ऐलतटापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर आमची बस धावत होती आणि आत बसलेले आम्ही काही जीव, गंगेला होता होई तेवढे मनात साठवत होतो. पैलतट भाविकांनी थोडाफार गजबजलेला होता, काठांवरच्या देवळांतून दिवे लागले होते. माईची आरती सुरु होती. मोठमोठी निरांजने, आरत्या तेवत होत्या, झांजा, मृदंग, ढोल वाजवणारेही डोळ्यांनी टिपले, मोठा नाद करणार्‍या घंटा घेऊन लोक उभे होते. मोठ्या मोठ्या ज्योतींचा उजेड पाण्यावरुन परावर्तीत होत होता. आरतीचा आवाज आणि वाद्यांचे नाद एकमेकांत मिसळले होते. माई आरतीचे सोपस्कार करुन घेत मार्गक्रमण करतच होती. एका कोणत्या तरी क्षणी मनावर अगदी गारुड झाले. घशात हुंदका दाटू झाला आणि डोळे चुरचुरायला लागले. हिला सोडून पुढे जायचे? पुन्हा दर्शन? सगळे मोह, माया, बंधनं पाश सोडून लोकांना हिचा आश्रय का करावासा वाटतो, कशी प्रेरणा मिळते, का इच्छा होते, ह्याचा थोडा थोडा उलगडा झालासे वाटले.. पण आता वाटते, खरेच का झाला उलगडा?

हे जे काही सौंदर्य समोर उन्मुक्तपणे वाहते, ते मृदुमुलायम नक्कीच नसते. आपल्याच मस्तीत वाहते माई. आपल्याच धुंदीत. आखीव रेखीव वगैरे असे काही नाही माईपाशी. बस्स, एक आवेग आहे, मत्त उन्मत्तपणा आहे आणि ते केवळ तिलाच शोभून दिसते. किती बोलावे तिच्याबद्दल? न बोलवे काही. सिर्फ एहसास हैं ये, रुहसे महसूस करो. गंगामाई ही केवळ अनुभवण्यासाठी आहे. शब्द, विचार सारे काही थिटे पडते तिच्यापुढे. तिला म्हणावेसे वाटले, नव्हे, पुन्हा, पुन्हा मनात प्रवासात तिच्याशी बोलताना म्हटले, त्वं साक्षादात्मासि नित्यम्| ऋतं वच्मि| सत्यम् वच्मि|

आता पुन्हा कधी दिसेल? साहेब म्हणाले, आता अख्खा रस्ता दिसणार आहेत गंगेचे प्रवाह, गोविंदघाटीपरेंत अगदी. खरंच? खरंच का? किती आश्वस्त वाटले तेह्वा. माई बरोबरीने येणार होती, साथ सोबत करणार होती. उगीच का ती सखी आहे? तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलत प्रवास होणार तर. कोणत्या जन्मीचे पुण्य फळाला आले होते! काय सांगू हिला? विदध्या: समुचितम्! अजून काय मागायचे गं? कधीतरी तुझ्या काठाकाठाने फिरायची इच्छा आहे. पार गंगोत्रीपरेंत जायचे आहे बघ. तुझ्या संगतीने तुझ्या काठावर फुललेले, वसलेले जीवन पहायचे आहे, शिकायचे आहे. एकदा तरी तुझ्या किनार्‍यावर तुझ्या लाटांचा नाद ऐकत आणि आकाशातले चांदणे बघत निवांत पहुडायचे आहे. तुझ्या संदर्भातल्या कथा कहाण्या आठवायच्या आहेत आणि बस्स, शांत, शांत व्हायचे आहे. कधी बोलावशील पुन्हा?

माई तात्पुरती दृष्टीआड झाली. तिचा नाद मात्र मनामध्ये अव्याहत ठाण मांडून राहिला. अजूनही आहे. म्हटले ना मी, भूलना नामुमकीन.

हृषिकेशच्या रस्त्याने जाताना मध्येच एका ठिकाणी चांगलाच ट्रॅफिक जाम होता. लष्कराची वाहने, प्रवासी वाहने, तिथल्याच रिक्षा आणि त्यात कोंबलेली माणसे, ट्रक.. सारे काही एकाच लहानशा रस्त्याने ये जा करतील, तर अजून काय होईल? पण कोणी तक्रार करताना दिसत नव्हते. कदाचित सवय झाली असावी , कदाचित हेच अंगवळणी पडले असावे. कदाचित आतून मन शांत होण्याचे वरदान माईच्या प्रदेशात लाभून जात असावे. कोणास ठाऊक? जायचा रस्ता राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जात होता, हत्तींच्या कळपापासून सावध रहा, असे फलक पाहिले. कुठे हत्ती दिसतात का ह्याचा उगीच नजर शोध घेत राहिली. कोणी दिसले नाही. मिट्ट काळोखात एखादा कळप एकदम समोर ठाकला असता तर काय झाले असते, कोणास ठाऊक. बाकी काही कल्पना करु शकत नसले, तरी काही फोटो मात्र नक्कीच काढले असते.

यथावकाश हृशिकेशला पोहोचलो.

ज्या हॉटेलात रहायचे होते, तिथली ऐसपैस जागा एकदम आवडली. खालचा चौकच किती मोठा होता. केवढीतरी जागा. मोकळीच. गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या करत खेळावेसे वाटले. चौसोपी जागेला फरसबंदी होती. एक झूलाही हवा होता, सावन के झुले करायला. पाऊस पडेल तेह्वा त्या चौकात उभे राहून तो पाऊस अनुभवायचे काय सुख असेल. नुसते उभे रहायचे शांत आणि तो पाऊस अनुभवायचा, हळूहळू चेहर्‍यावर आणि मग अंगावर घ्यायचा. कधीतरी नकळत तो मनातही पोहोचतो. सुखच मग. नुसती स्वप्ने आणि इच्छा. रोजच्या धबडग्यात अशा निवांतपणीच्या इच्छा स्फुरतात हीच एक मेहेरबानी समजायची अन् काय. आपापल्या खोल्या ताब्यात घेऊन, फ्रेश होऊन खाली जेवायला आलो. सुरुवातीला सगळे बसलो होतो, आणि मला भूक नाही, तुला भूक नाही वगैरे सुरु होते, कोणालाच फारसे काही नको होते. असे निदान सगळे म्हणत तरी होतो. मात्र नंतर मात्र ऑर्डरी संपेचनात! सोबतीला गप्पा. आम्हांला मजा आली, पण वेटरसायब वैतागले. त्यांनी मनातल्या मनात किती खाताय, किती खाताय म्हटलेले ऐकू आले अगदी. पुन्हा एकदा मस्त ग्रूप आहे, ह्याची मनातल्या मनात खात्री पटली. सगळेच भरपूर खातात आणि त्याहून दुप्पट गप्पा हाणतात. अजून काय हवे?

खरं तर ह्या ऑर्डरी कशा एकामागोमाग गेल्या आणि वेटरसायबांना शेवटी कसा वैताग आला हे लिहायला हवे आहे, पण कंटाळा केला आहे लिहिण्याचा. कधीमधी मूड आलाच तर लिहीन नक्की.

दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला निघायचे होते. साडेचार-पाचला उठावे लागणार. तिघींचेही आवरायचे होते. रात्री सगळी विद्युत उपकरणे चार्ज केली. दुसर्‍या दिवशी पहाटे चारला मला जाग आली. इतके निळसर भुरकट आकाश पहिल्यांदा पाहिले. स्वप्नातल्यासारखे वाटत आणि दिसत होते. साधारण पावणेपाचच्या सुमारास तेजोनिधी प्रकटले. स्वतः दिसले नाहीत, पण आकाशाचा रंग इतका गडद केशरी झाला आणि फाकलेले किरण फक्त दृष्टीस पडले. जादू जशी. नळातून येणार्‍या गरम पाण्याने आंघोळीपांघोळी करुन घेतल्या. हे नळातले असे गरम पाणी इथे शेवटचे. यापुढे पाण्याची चैन नस्से. चैन संपली.

चहा, कॉफी ब्रेकफास्ट संपवून ६ च्या सुमारास हृषिकेशवरुन पुढे जायला निघालो.. पुढे जाणार होतो पीपलकोटीला.

क्रमश: