October 15, 2016

शब्दभूली

अचानक कधीतरी,
तू उमलून येतेस.
काळ वेळ न पाहता,
राग लोभ न जाणता.

पापणीतल्या पाण्यात
कोणाच्या मुग्ध हास्यात,
चुकार निवांत क्षणी
कोण्या विस्कटल्या मनी.

शब्दांचा आधार घेतेस
तशी मौनातही बोलतेस
उलगडतेस, तरीसुद्धा
अलगद मिटू मिटू होतेस...

तुझा सूर, तुझा नूर
कधी फटकून दूर,
गूज जीवाचे सांगण्या
शब्द कधी महापूर.

सभोवताली वावरत रहा
शब्दांची नक्षत्रं पेरत,
गावा शब्दभूलीच्या जाईन
माग नक्षत्रांचा काढत.


February 11, 2016

राजसगाणी

भाग १ : अक्षय कविता

अर्थात, जगाला विटून, संसाराचा उद्वेग, उबग येऊन, वैतागून आलेले हे वैराग्य नव्हे. नाही म्हणायला जगाचे अनुभव, बर्‍या वाईटाचे संचितही आता गाठीशी भरपूर जमा झालेत. तिला कधीचे बरेच काही उमजले आहे.. जरी सगळ्यांत अजून ती रमते आहे, तरीही त्यातून दूरही होते आहे.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?
कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजूनजातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?
कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?
कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

हळूहळू सगळ्यांत असूनही नसण्याची मजा तिला उमगली आहे, सगळ्यांत नसूनही असता येते हेही लक्षात आलेय. तिला उमजलेय की आज जे असेल ते उद्या असेलच असे नाही, आयुष्याचं कोडं उलगडेलच असंही नाही. काही अक्षत टिकेल असंही नाही. स्वतःच्याच मनाचा भरवसा देता येत नाही, मग दुसर्‍यांचा कोणी द्यावा?

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

ज्ञात अज्ञाताचा पाठशिवणीचा खेळ आता तिच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, त्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव झालीये आणि आपल्या अट्टाहासांच्या मर्यादाही जाणवल्यात. आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी हे जाणवून सारं कसं लख्ख समोर आलं आहे...

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

तिची काही तक्रार नाही, आता काही मागणी नाही, इच्छा नाही. जे काही आयुष्य पुढ्यात आले, जसे काही दान पदरात पडले त्यात सर्वांतच लावण्याची जत्रा शोधणारी ही कविता. आता तिला अलौकिकाची कळा चढली आहे. ती शेवटचे ऋण व्यक्त करते आहे. अंतर्बाह्य शब्दसौंदर्याने सजून झाल्यावर आता उरले तरी काय?

जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
उमलल्या शब्दी नवीन पहाट
पावलांत वाट माहेराची.
अंतर्बाह्य आता आनंदकल्लोळ
श्वासी परिमळ कस्तुरीचा
सुखोत्सवी अशा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे....

समाप्त