November 15, 2008

मम आत्मा गमला..१

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्‍यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.

अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत आमच्यावर मोठी माणसं, अजून काय?? :)

-क्रमशः

November 9, 2008

बोल गं घुमा... बोलू मी कशी??

विषय तुमच्या, आमच्या, सार्‍यांच्याच मनातला. खास करुन स्रियांच्या. होणारा त्रास तुम्ही, आम्ही सर्वांनींच कधी ना कधी सहन केलेला. बरं, बोलावं तरी कोणापाशी? आणि कुठे? आणि समजा तक्रार केलीच तरी उपयोग नाही हे माहितीच! त्यामुळे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

लख्ख आठवतं की लहानपणी कोकणात आजोळी जायच्या आनंदात एकच मोठ्ठा मिठाचा खडा असायचा... तो म्हणजे, एसटी स्टॅण्डवरची टॉयलेटस वापरायला लागणार हा विचार! पोटातून मळमळून आतडी बाहेर पडतील असे वाटायला लावणारे वास, अस्वच्छता, गलिच्छपणा.. श्वास कोंडून धरून तरी किती वेळ ठेवायचा?? इतकं वैतागवाणं प्रकरण असायचं ते! त्रास, त्रास नुसता!! नाकावर रुमाल दाबा, त्यावरुन आईचा पदर दाबा, काहीही केलं तरी तो वास काही नाकात शिरल्याशिवाय रहात नसे. गावी पोचलं, गावचा एसटी स्टँड दिसला, की हुश्शss व्हायचं अगदी...

आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही! एकीकडे देशाची सर्व क्षेत्रांत अत्यंत वेगात प्रगती सुरु आहे पण त्याच वेळी,आरोग्याला आवश्यक अश्या स्वच्छ टॉयलेटच्या मूलभूत सुविधा शहरांत,गावांत कुठेच नीटश्या उपलब्ध नाहीत! सामान्य माणसाचं आरोग्य महत्वाचं नाही का? आणि ह्यात बायकांचे हाल तर विचारुच नका! ह्यावर 'स्वच्छतेच्या बैलाला.. ' हा एक परखड आणि चपखल लेख मायबोलीच्या दिवाळी अंकामध्ये अज्जुकाने लिहिलाय. मंडळी, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा लेख जरुर,जरुर वाचा. स्त्रीवर्ग तर लगेच ह्या लेखाशी रिलेट होऊ शकेल. पुरुष वाचक मंडळी, वाचताना आपल्या आई, बहिण, मैत्रिण, पत्नी यांपैकी कोणाला डोळ्यांसमोर ठेवून वाचा, म्हणजे त्यातील धग जाणवेल.

तसच, मायबोलीवरचे काही लोक ह्या लेखाच्या अनुषंगाने एकत्र येऊन, ह्या समस्येवर उहापोह करुन आपल्याला ह्या संदर्भात जे करता येईल ते करत आहेत. तुम्हीही या प्रयत्नात सहभागी होऊ शकता. निदान आपल्या ब्लॉगवर अज्जुकाच्या लेखाची लिंक द्या. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा दिला, तरी खूप फरक पडू शकेल. निदान फरक पडावा ह्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे??