September 13, 2008

गणराज रंगी नाचतो

गणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll
नृत्य करता सकल देव l तटस्त होती ll

नृत्य-गणपती हे भारतीय संगीत आणि नृत्य कलेचे प्रतीक जणू. दक्षिण भारतात, नृत्य गणपतीच्या मूर्ती सापडतात. म्हैसूरच्या हळेबिड येथील होयसलेश्वर मंदिरात (बारावे शतक) नृत्य गणपतीची अत्यंत नयनमनोहर अशी अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या सहा हातांमधे परशू, पाश, मोदक्पात्र, दंत, सर्प आणि कमळपुष्प असून, दोन हात, अनुक्रमे, गजहस्त आणि विस्मयहस्त मुद्रेमध्ये आहेत.*

तंजावूरच्या भेडाघाटच्या मंदिरातही श्रीगणेशाच्या कलात्मक प्रतिमा आहेत. मयूरभंज, ओरिसा येथेही नृत्य गजाननाची अत्यंत मनोहारी अशी मूर्ती आहे. भुवनेश्वर येथे मुक्तेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची निर्मीती सन ८०० ते १०६० च्या दरम्यान झालेली आहे. ह्या मंदिरातही नृत्य गणपतीची अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीमध्ये जी नृत्य मुद्रा साकारलेली आहे, त्यात गजाननाने दोन हात वर करुन, त्या दोन्ही हातांमध्ये सर्पास पकडले आहे, चार हातांत मोदक, कुर्‍हाड, तुटलेला दात आणि कमळ धरलेले आहे. राहिलेले दोन हात भग्नावस्थेत आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सेवक असून डाव्या बाजूचा सेवक झांज तर उजव्या बाजूचा सेवक मृदंग वाजवत आहे.

काशी हिंदू विश्विद्यालयाच्या भारत कला भवनात नृत्य मुद्रेतल्या गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कनोज येथे साधारण आठव्या शतकाच्या आसपास निर्माण केलेली चतुर्भुज अशी नृत्य गणपतीची मूर्ती सापडली असून गजाननाने सर्पयद्नोपवीत (जानवे) धारण केले असून, वाघाची कातडी पांघरलेली आहे. अल्वर येथील संग्रहालयातही तोमरकालीन, गणपतीची नृत्यप्रधान मूर्ती असून तिच्या दोन हातांत सर्प असून, पायांपाशी मूषक आणि गण इत्यादी आहेत. मूर्तीबरोबर जो लेख सापडला आहे, त्यात महालोकस नामक व्यक्तीने विक्रम संवत ११०४ मध्ये (ई. स. १०४४)मध्ये या मूर्तीची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो.

मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरामधून द्विभुज, चतुर्भुज, षड्भुज, अष्टभुज ते षोडशभुज अश्या नृत्यामध्ये मग्न असणार्‍या गणपतीच्या मूर्ती आढळून येतात. लखनौच्या राजसंग्रहालयात, बाराव्या शतकातील गाहवालवंशीय राजांच्या कारकीर्दीत निर्माण झालेली नृत्य गणेशाची मूर्ती त्या काळातल्या मूर्तीकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते.

अश्या ह्या नृत्य निपुण देवतेला मानवंदना म्हणून संगीतज्ञांनी गणेशताल निर्माण केला आहे. तानसेनाच्या संगीत-सार ग्रंथात, तालाध्याय, या अध्यायांतर्गत, ब्रह्मताल, रुद्रताल, विंध्यताल, कंदर्पताल, सिंहताल, जनकताल आणि विष्णूताल या तालांची माहिती आहे, परंतु, गणेशतालाचा उल्लेख आढळत नाही. संगीतज्ञ मानतात, की गणेशतालची निर्मिती संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाच्या नंतर झाली.

ह्या तालाच्या मात्रा २१ व १० भाग आहेत.

भाग : धा ता दिं ता कत तिट धा दिं ता कत
मात्रा: १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

भागः तिट ता धागे दिं ता धागे ता तिट कत गदि गन
मात्रा: ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१


अश्या ह्या नृत्य निपुण देवतेची सेवा म्हणून तानसेनाने ब्रजभाषेत काही धृपद रचना केल्या आहेत, ज्यात श्री गजाननाची स्तुती केलेली आहे.

एकदंत गजबदन बिनायक बिघ्न -बिनासन हैं सुखदाई ll
लंबोदर गजानन जगबंदन सिव-सुत ढुंढिराज सब बरदाई ll
गौरीसुत गनेस मुसक-वाहन फरसा धर शंकर सुवन रिद्ध-सिद्ध नव निद्ध दाई ll
तानसेन तेरी अस्तुत करत काटे कलेस प्रथम बंदन करत द्वंद मिट जाई ll

आणि ही एक, ज्यात तानसेन श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करत आहे,

एकदंत वंत लंबोदर फिरत जाहे बिराजे
गनेस गौरी सुत महा सुनि महिमा सागर
गुरु गन नाथ अविघन राजे l
हेरंब गन दीपक तू ही महातुर,
उग्र तप बट चंद्रमा सों छबिनायक जगत के सिरताजे l
तानसेन को प्रसाद दीजे सकल बुध नव निध के,
सदा दायक लायक जगत के सरे काजे ll

अजून एक गणेश स्तुती,

तुम हो गनपत देव बुधदाता सीस धरे गज सुंड,
जेई जेई ध्यावै तेई तेई पावै चंदन लेप किये भुजदंड
सिद्धेश्वरी नाम तुमारो कहियत जे विद्याधर तीन लोक मध
सप्त दीप नव खंड,
तानसेन तुमको नित सुमिरन सुर-नर-मुनि-गुनि-गंधर्ब-पंडित ll


लंबोदर गजानन गिरिजासुत गनेस एक्-रदन
प्रसन्न बदन अरुन भेस,
नर्-नारी-मुनी-गंधर्ब-किंनर-यक्ष-तुंबर मिली
ब्रह्मा बिष्नु आरत पूजवत महेस l
अष्टसिद्ध नव निद्ध मूषकवाहन बिद्यापति तोहि सुमिरत
तिनको नित सेष,
तानसेन प्रभु तुमही कूँ ध्यावैं अबिघन रुप विनायक रुप
स्वरुप आदेस ll

असा हा सर्व विद्या आणि कलांचा अधिपती असलेला देव. आद्यकवी वाल्मिकी ऋषी गणेशाची स्तुती करताना म्हणतात,

चतु:षष्टीकोटयाख्यविद्याप्रदं त्वां सुराचार्यविद्याप्रदानापदाम् l
कठाभिष्टविद्यापर्कं दंतयुग्मं कविं बुद्धीनाथं कवीनां नमामि ll

अर्थात, हे गणपती, तू चौसष्ठ कोटी विद्या प्रदान करणारा आहेस, एवढेच नाही, तर देवांच्या आचार्यांनाही विद्या प्रदान करणारा आहेस. कठालाही विद्या देणारा तूच आहेस ( कठोपनिषदरुपी विद्येचा दाता) दोन दात असणारा, कवी, असा तू, कवी (बुद्धीमान) जनांच्या बुद्धीचा तू स्वामी, तुला माझे वंदन असो.


संदर्भः १. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.
* मुद्रांविषयी माहिती मिळाली नाही. कोणाला माहित असेल जर जरुर लिहा.

September 11, 2008

गणेश तत्व - परब्रह्मस्वरुप गणेश

परमात्म्याला जाणून घेणे, हेच मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. यस्तन्न वेद किमृचा करिष्यति l असे ऋग्वेदात म्हटले आहे, म्हण़जे जो परमात्म्याला जाणत नाही, तो (फक्त) ऋचा जाणून काय करणार ? वैदिक कालापासून ऋषी मुनींनी सत्याच्या, परमतत्वाच्या रहस्याला जाणून घेण्याचा प्रयास केला आहे.

ऋग्वेदात सांगितले आहे, एकं सत् l - तेच एकमेवाद्वितीय सत्य, तेच अंतिम.

गणपत्यथर्वशीर्षात गणपतीस, एकं सत्, परम तत्त्व, आत्मा मानले आहे - त्वम् साक्षादात्मासि नित्यम् l तोच सर्व जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे, पालनकर्ता आहे. गण हा शब्द समूहवाचक आहे. ह्या समूहाचा पालनकर्ता तो गणपती. आपल्या विशाल उदरात जणू सारे विश्व सामावून घेऊन, धारण करुन तो लंबोदर बनला आहे, पण त्याच वेळी, तो परब्रह्म मात्र कोणातही सामावलेला नाही. सार्‍यांना सामावून घेऊनही तो मात्र निराकार असा सर्वांहून वेगळा असा आहे. ज्ञान आणि निर्वाण पद प्राप्त करुन देऊ शकणारा ईश, म्हणून परब्रह्म. सार्‍या जगाची उत्पत्ती आणि लय त्याच्यातच.

अथर्वशीर्षातही गणक ऋषींनी हे मत मांडलेले आहे,

त्वं वाड्गमयस्त्वं चिन्मयः l त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः l त्वं सच्चिदानंदाद्वितीयोsसि l
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि l त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोsसि ll

तूच वाड्गमय(रुपी) आहेस, तू चिन्मय आहेस -( चित्ते मयः इति चिन्मयः - शब्दशः भाषांतर, जो हृदयात आहे तो, बुद्धीमान् असाही अर्थ ), तू आनंदमय आणि ब्रह्ममय आहेस. तूच सच्चिदानंदरुपी अद्वितीय असा परमात्मा आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू ज्ञान आणि विज्ञानमयी आहेस.

गणपतीला साक्षात आत्मा संबोधून, सत्व, रज, आणि तम या गुणांपलिकडे मानलेले आहे. या गुणांनी युक्त अश्या विश्वाची उत्पत्ती, ऱक्षण आणि शेवटी अंतही, गणेशरुपी आत्म्यात होतो (अनेकत्वातून एकत्व). गणेशपुराणातही गणेशामध्येच सारे जग, सार्‍या देवता आणि मनुष्यगण अविर्भूत आहेत हे सांगितले आहे.

योगशास्त्रातही षट्चक्रांच्या भेदन क्रमात प्रथम चक्रात गणेशाला स्थान दिलेले आहे. अथर्वशीर्षातदेखील गणपती मूलाधारचक्रात नित्य वास करुन आहे याचा उल्लेख आहे - त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यं l याच मूलाधारचक्रावर योगी ध्यान करतात.

ज्ञानेश्वरीतही आदिबीज ॐकार असा गणपतीचा ज्ञानेश्वर माऊलींनी उल्लेख केलेला आहे.

अकार चरण युगुल l उकार उदर विशाल ll
मकर महामंडल l मस्तकाकारें ll
हे तिन्हीं एकवटले l तेथे शब्दब्रह्म कळवळले ll
तें मियां गुरुकृपे नमिले l आदिबीज ll

ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला ॐ कार स्वरुप मानून, त्याच्या आत्मस्वरुपाचे (गणेश तत्त्व) ज्ञान केवळ स्वानुभावाने होऊ शकते असे प्रतिपादन केले आहे.

ब्रह्मवैवर्तपुराणात गणपतीच्या परब्रह्मस्वरुपाची (आत्मरुपाची) स्तुती करताना श्रीविष्णूने म्हटले आहे,

ईश त्वां स्तोतुमिच्छामि ब्रह्मज्योति: सनातनम् l
निरुपितुमशक्तेsहमनुरुपमनीहकम् ll
त्वां स्तोतुमक्षमोsनन्त: सहस्त्रवदनेन च l
न क्षमः पंचवक्त्रश्च न क्षमश्चतुराननः ll
सरस्वती न शक्ता च न शक्तोsहं तव स्तुतौ l
न शक्ताश्च चतुर्वेदा: के वा ते वेदवादिनः ll

हे ईश, सनातन ब्रह्म ज्योतीस्वरुप अश्या तुझे स्तवन मी करु इच्छितो, पण तुझ्या रुपाचे यथार्थ वर्णन करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे. शेषही आपल्या सहस्त्र मुखांनी तुझी स्तुती करण्यास असमर्थ आहे. (तुझे आत्मस्वरूप ओळखून) तुझी स्तुती करण्यास पंचमुख महेश्वर, चतुर्मुख ब्रह्मा हे ही असमर्थ आहेत; देवी सरस्वतीचीही (तुझ्या रुपाची) स्तुती करण्याची शक्ती नाही,ना माझी. वेदही तुझ्या रुपाची यथार्थ कल्पना करण्यास समर्थ नाहीत, मग ते म्हणणार्‍यांची/ मानणार्‍यांची काय कथा??

संदर्भ: १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर ३. विकिपिडिया

September 9, 2008

श्रीगणेशाची निर्गुण आणि सगुणोपासना

सृष्टीच्या आरंभापासून माणूस, आत्मा-परमात्म्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या रहस्याची उकल करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न तो पूर्वीपासून करत आला आहे. वैदिक कालापासून अनेक ऋषी मुनींनी, त्तववेत्त्यांनी हे रहस्य उकलून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ऋचा, स्तोत्रे इत्यादी रचून सृष्टीचा पसारा उकलण्याची आणि इतरांना उकलून दाखवण्याची धडपड केली आहे.

उपनिषदांमध्ये सांगितले आहे की सृष्टी अनेक रुपांनी नटण्याआधी केवळ सत्य - 'सत्' अस्तित्वात होते. हेच एकमेवाद्वितीय परब्रह्म आहे, सतत चैतन्यदायी, निर्विकार आणि अद्वितीय असे हे सत् स्वयंप्रकाशी, नित्य शुद्ध, निरहंकार आणि कालातीत आहे. प्रथमतः त्याला ना आकार होता, ना विकार. ह्या एकातून अनेकत्वाची भावना उदयास आली. एकोsहं बहु स्यां प्रजायेय l - अर्थात, मी एक आहे, अनेक होईन. या स्फुरणाबरोबर, ते एकमेवाद्वितीय सत्यच परब्रह्म गणेशरुपात प्रकट झाले - गणेशौ वै सदजायत तद् वै परं ब्रह्म l


गणेशपूर्वतापिन्युपनिषदात म्हटले आहे,

सोsपश्यदात्मनाssत्मानं गजरुपधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं यतो वा इमानि भूतानि जायन्ते यतो वाssयन्ति यतैव यन्ति च l तदेतदक्षरं परं ब्रह्म l एतस्माज्जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च l खं वायुरापो ज्योति: पृथिवी विश्वस्य धारिणी l पुरुषं एवेदं विश्वं तपो ब्रह्म परामृतमिति l

अर्थात, त्या सत् ने स्वतःस धवल वर्ण, गजमुख, (आणि ) चतुर्भुज अश्या रुपात पाहिले; ज्यातून पंच महाभूतांची उत्पत्ती होते, सर्वांना स्थिती आणि लय प्राप्त होते, तेच हे अक्षर, हेच परब्रह्म आहे. ह्यातूनच प्राण, मन आणि इंद्रियांची उत्पत्ती होते. ह्यातूनच आकाश, वायू, जल, तेज आणि सगळ्या विश्वाला धारण करणारी पृथ्वी, हे सारे उत्पन्न होते. हाच तो आदिपुरुष, हेच परब्रह्म, हेच गणेशाचे सच्चिदानंदस्वरुप.


श्री गणेशाचं निर्गुण रुप वर्णन करणार्‍या गणेशोत्तरतापिन्युपनिषदातील या काही ऋचा/मंत्र पहा,

तच्चित्स्वरुपं निर्विकारम् अद्वैतं च l - तोच चिद्रूप, निर्विकार, एकमेव आहे.

आनन्दो भवति स नित्यो भवति स शुद्धो भवति स मुक्तो भवति स स्वप्रकाशो भवति स ईश्वरो भवति स मुख्यो भवति स वैश्वानरो भवति स तैजसो भवति स प्राज्ञो भवति
स साक्षी भवति स एव भवति स सर्वो भवति स सर्वो भवतीति l

अर्थात, (तोच गणेश ) आनंदस्वरुप आहे, तोच नित्य, शुद्ध, मुक्त असा स्वयंप्रकाशित आहे, तोच ईश्वर आणि प्रमुख आहे. तोच अग्नि, तेज आणि प्राज्ञ (बुद्धिमान्) आहे. तोच सर्वसाक्षी आहे, तोच तो (परब्रह्म) आहे, आणि तोच सर्व आहे, सर्व काही आहे.


न रुपं न नामं न गुणं l स ब्रह्म गणेशःl स निर्गुणः स निरंहकारः स निर्विकल्पः स निरीहः स निराकार आनंदरुपस्तेजोरुपमनिर्वाच्यप्रमेयः पुरातनो गणेशः निगद्यते l

तो अरुप (रुप नसलेला), ना त्याला नाव ना गुण. तोच ब्रह्मरुपी गणेश होय. तो निर्गुण, निरहंकारी, निर्विकल्प, निरीह, निराकार आनंदरुपी, तेजोमय, अनिर्वचनीय आणि परमपुरातन असा कालातीत गणेश आहे.

ओमित्येका़क्षरमं ब्रह्मेदं सर्वम् l तस्योपव्याख्यानम् l सर्वं भूतं भव्यं भविष्यदिती सर्वमोंकार एव l एतच्चान्यच्च त्रिकालातीतं तदप्योंकार एव l सर्वं ह्येतद्गणेशोsयमात्मा ब्रह्मेति l

ॐ हे एकाक्षररुपी ब्रह्मच आहे. त्याची व्याख्या आहे. भून, भविष्य, वर्तमान - सर्व ओंकारस्वरुपच आहे. त्रिकालस्वरुप, आणि त्रिकालातीत, सर्व ओंकारमयच आहे. तेच ओंकाररुप ब्रह्म, हा गणेश आहे.

अथर्वशीर्षातही त्वं सच्चिदानंदाद्वितियोsसि l असे वर्णन आहे.

ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचे वर्णन करताना म्हटले आहे,

ॐ नमो श्रीआद्या l वेद प्रतिपाद्या l जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा l देवा तूचि गणेशु l
सकलमति प्रकाशु l

ॐकार स्वरुपाचे ध्यान करणे हीच निराकार परब्रह्म अश्या श्री गजाननाची एकाक्षरी नामस्वरुप निर्गुणोपासना आहे.

ज्या साधकांना निर्गुणोपासना जमत नाही, त्यांच्यासाठी सगुणोपासना आहे. सगुणोपासनेत मूर्तीपूजा अंतर्भूत आहे. निरनिराळी स्तोत्रं, प्रार्थना आहेत. उपास्य मूर्तीचे अनेक प्रकार असून, पूजनचा विधीही वेगवेगळा असतो. यात सात्विक, तथा तंत्रमार्गातल्या उपासनांचाही समावेश आहे. द्विभुज ते अठरा बाहू असलेल्या आणि एकमुखी गजाननापासून दशमुखी गजाननाच्या मूर्ती पूजेत आढळतात. झालच तर वेगवेगळी व्रतं आहेत. ह्या अतिरिक्त स्थानागणिक आणि पंथागणि़क व्रताचार, पूजापद्धतीही बदलते.

कर्ममार्गाने उपासना करणारे गणेशयाग करतात. यज्ञविधी करुन, गणेशयंत्राची विधीवत् स्थापना करुन हवन केले जाते. यज्ञामधे हविष्यान्याची आहुती देऊन, मंत्रजप केला जातो. जप, हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मणभोजन हे सारे प्रकार यात मोडतात.

अश्या प्रकारे, व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्याला जी योग्य वाटेल, रुचेल ती उपासना यथाशक्ती करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संस्कृतीत आहे. ही संस्कृती अनेकरुपा आहे, आणि तरीही तिचा गाभा एकत्वाचा आहे. मनाला रुचेल अशी कोणतीही उपासना श्रद्धेने केली तर तिचा स्वीकार झाल्याशिवाय राहत नाही.

गणेशगीतेत म्हटल्याप्रमाणे,

येन येन हि रुपेण जनो मां पर्युपासते l
तथा तथा दर्शयामि तस्नै रुपं सुभक्तितः ll

अर्थात, लोक (भक्त) ज्या ज्या रुपामध्ये माझी उपासना करतात, त्यांच्या उत्तम भक्तीने प्रसन्न होऊन मी त्यांना त्या त्या रुपामध्ये दर्शन देतो/ देईन.

संदर्भ: १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

September 7, 2008

विराणी

कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;

क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्वाचे गुंजन;

कशास होतो जीव घाबरा,
भवताली भरला ना मेळा?

भासे मृगजळ,कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण;

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;

जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर;

मौनामध्ये दु:ख लपेटूनी,
खुळा जीव शोधे सांगाती;

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

September 5, 2008

गाणपत्य संप्रदाय

हिंदू धर्मात प्रामुख्याने पाच संप्रदाय आढळतात. सौर, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव. सौर संप्रदायाचा अधिपती सूर्य, गाणपत्य संप्रदायाचा अधिपती गणपती, शाक्त संप्रदायाची अधिपती शक्ती, शैव संप्रदायाचा अधिपती शिव आणि वैष्णव संप्रदायाचा अधिपती विष्णू मानला गेला आहे.

श्रीगणेशाची प्रामुख्याने आराधना करणारे ते गाणपत्य. या संप्रदायात सहा पंथ असल्याची नोंद आनंदगिरिंच्या शांकर दिग्विजय या काव्यात सापडते. हे सहा पंथ आणि यांच्या उपास्य दैवताची नावे अशी,

१. महा - दैवत महागणपती
२. हरिद्रा - दैवत हरिद्रागणपती
३. उच्छिष्ट - दैवत उच्छिष्टगणपती
४. नवनीत - दैवत हेरंबगणपती
५. सुवर्ण - दैवत सुवर्णगणपती
६. संतान - दैवत संतानगणपती

गाणपत्य गणपतीस परब्रह्म मानून इतर दैवतांना त्या परब्रह्माचा अंश मात्र मानतात, आणि हा संप्रदाय वामाचाराचा अवलंब करतो, अशीची नोंद या काव्य ग्रंथात आढळते. श्री शंकराचार्यांच्या अद्वैतमताच्या प्रभावाखाली हा पंथ आल्याने आणि वामाचारी पूजा पद्धतीबद्दल लोकमानसांत असलेल्या समज - गैरसमजांमुळे ह्या पंथाची वाढ होऊ शकली नाही, असे काही संशोधकांचे मत आहे. गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते व वैदिक धार्मिक विधींमध्ये इतर ब्राह्मणांसोबत त्यांना बसू देऊ नये अशीही प्रवृत्ती होती. आद्य श्री शंकराचार्यांनी प्रचलित केलेल्या पंचायनत पूजेनंतर हे आपापसातील मतभेद कमी झाले, असे मत संशोधक मांडतात. गाणपत्य संप्रदायाचा उदय पाचव्या शतकानंतर आणि नवव्या शतकाअगोदर झाला, असे मत संशोधकांनी नोंदवले आहे. ह्या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणजे गणेश पुराण.


श्रीमत्कृष्णानंद आगमवीश (१६ व्या शतकातील बंगालमधले कवी) यांनी आपल्या 'तंत्रसार' या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या गणेश स्तोत्रात, गणपतीस ब्रह्मतत्व, आद्यदेव मानले आहे. या ग्रंथात, विभिन्न गाणपत्य संप्रदायांविषयी आणि महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या उपासना पद्धती, मंत्र, ध्यान व पूजा पद्धती यांचे वर्णन सापडते.

तंत्रसार ग्रंथात महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या रुपाचे वर्णन आले आहे.

महागणपती - गणपतीची दोन प्रकारची ध्यानरुपे आहेत. एक, दशभुज आणि अरुणासमान रक्तवर्ण असलेला, आणि दुसरा, गौरवर्णीय आणि चतुर्भुज. सर्वांगी हा रत्नभूषणांनी आभूषित असून ह्याच्या मस्तकातून सतत मद वाहत असतो.

ह्या गणपतीच्या ध्यान स्वरुपाचे वर्णन करताना कवि म्हणतात,


श्री महागणपतीचे मुख श्रेष्ठ हत्तीचे आहे. त्याच्या भालप्रदेशावर अर्धचंद्र विराजित असून, त्याची देहकांती अरुणवर्ण आहे. हा गणेश त्रिनयन असून, त्याची परमप्रिया हातात कमळ धारण करुन त्याच्या मांडीवर बसली असून तिने अतिशय प्रेमाने गणेशाला अलिंगन दिलेले आहे. आपल्या दहा भुजांमधे गणेशाने क्रमशः दंड, गदा, धनुष्य, त्रिशूल, चक्र, पद्म, पाश, उत्पल, धान्याच्या ओंब्या, स्वतःचा तुटलेला दात व रत्नकलश धारण केला आहे. रत्नकलशातल्या रत्नांची वृष्टी आपल्या साधकांवर करुन आपल्या साधकांना तृप्त करणार्‍या, अश्या गणपतीचे पूजन आम्ही करतो.

ह्या गणपतीचे ध्यान करण्यासाठी अठ्ठावीस, बारा व अकरा अक्षरी मंत्र आहेत.

हेरंबगणपती - तंत्रसार ग्रंथात, हेरंबगणपतीचीही दोन रुपे सांगितली आहेत. एक, चतुर्भुज, रक्तवर्णीय, तीन डोळे असणारा. आपल्या चार भुजांमध्ये त्याने क्रमशः पाश, अंकुश, कल्पलता (वेल) आणि आपला दात धारण केला आहे.

दशाक्षरी मंत्राने ह्या गणपतीचे ध्यान केले जाते.

दुसर्‍या रुपाप्रमाणे, तो पंचमुखी - पाचही मुखे हत्तीची असून दशभुज आहे. चार मुखे चार दिशांना आणि एक उर्ध्व दिशेस आहे. या मुखाचा रंग मोतिया वर्णाचा असून, बाकीच्या मुखांचा वर्ण सोनेरी, निळा, धवल आणि लाल रंगाचा (कुंकुमवर्ण) आहे. प्रत्येक मुखाला तीन डोळे असून, कपाळावर चंद्रमा विलसित आहे. त्याच्या देहाची कांती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून, तो बलवान् आहे. सिंहावर आरुढ असून, दोन हात क्रमशः वर आणि अभयमुद्रा दाखवतात. बाकीच्या हातांमध्ये मोदक, दंत, लेखणी, मस्तक, माला, मुद्गल, अंकुश आणि त्रिशूल धारण केलेला आहे.

ह्या रुपाची साधना चार अक्षरी मंत्राने केली जाते.

हरिद्रागणपती -ह्या गणपतीच्या ध्यान मंत्रात वर्णन केल्याप्रमाणे, हा गणपती पीतवर्णीय असून चतुर्भुज आहे. हळदीने माखलेले वस्त्र त्याने धारण केले असून आपल्या चार भुजांमध्ये पाश, अंकुश, मोदक आणि दात धारण केला आहे.

एकाक्षरी मंत्राने ह्याची उपासना केली जाते.

उच्छिष्टगणपती - तंत्रसारातल्या वर्णनानुसार, हा गणपती रक्तवर्णी, चतुर्भुज, तीन डोळ्यांचा असून, त्याचं मस्तक जटामंडित असून, मस्तकावर चंद्र विराजमान आहे. रक्तवर्णी वस्त्रे परिधान केलेली असून, रक्तवर्णी कमळाच्या आसनावर तो बसला आहे, चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आहे. उजव्या बाजूचा वरचा हात वरमुद्रा दाखवत असून, खालच्या हातात दात पकडलेला आहे. डाव्या बाजूचा वरील हातात पाश तर खालच्या हातात अंकुश आहे. नाना प्रकारचे अलंकार त्याने धारण केले आहेत.

उपासनेचा मंत्र दशा़क्षरी आहे.

तंत्रसारात म्हटल्याप्रमाणे या गणपतीचे पूजा विधान साधकाने उष्ट्या मुखाने आणि अशुचि अवस्थेत करावे. साग्रसंगीत पूजा करण्याची आवश्यकता नसून, मानसिक जप केला तरी चालते.

गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार, साधकाने निर्जन अश्या ठिकाणी, वनात बसून, रक्तचंदनाने माखलेला तांबूल खाताना या गणपतीची साधना करावी, तर भृगू मुनींच्या मतानुसार आराधना करताना फळे खाता खाता जप करावा. अजून एका मतानुसार मोदक खाताना जप करावा.

उच्छिष्टगणपतीचे उपासक कपाळावर तांबडा टिळा लावतात.

सुवर्ण गणपती व संतान गणपती ह्यांच्या उपासकांची पूजा पद्धत साधारण वैदिक पूजा पद्धतीशी साम्य सांगणारी आहे.

गाणपत्यांसाठी गणपती हे परम दैवत आहे, साक्षात जीवनाचा स्वामी, यासाठी त्याचे पूजन सर्वांआधी.

आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्चैव महेश्वरी l
वायो: सूर्यः क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः ll

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.

September 4, 2008

वेदांतील गणेशाचे स्थान

प्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे. प्राचीन काळात वेदांमधेही गणपतीची स्तुती करणारे, स्तवनपर मंत्र रचलेले आढळतात.

ऋग्वेदामध्ये गणपतीला बृहस्पती, वाचस्पती आणि ब्रह्मणस्पती या नावाने संबोधलेले आहे. ब्रह्मणस्पतीस ऋग्वेदात महत्वपूर्ण स्थान असून, त्याला सर्व मांगल्याचे परम निधान, सर्व ज्ञानाचा निधी, सर्वश्रेष्ठ देव आणि सर्व वाड्गमयाचा अधिष्ठाता आणि स्वामी मानलेले आहे. अकरा सूक्तांमधे ब्रह्मणस्पतीची स्तुती रचलेली असून, त्याची कृपादृष्टी आपल्यावर रहावी म्हणून मंत्र रचलेले आहेत.

उदाहरणार्थः

ब्रह्मणस्पतये त्वमस्य यन्ता सूक्तस्य तनयं च जिन्व l
विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद् वदेम विदथे सुवीरा: ll

अर्थात, हे मंत्र सूक्तांच्या अधिपती, तूच या जगाचा पालक, शास्ता आहेस, मी/ आम्ही रचलेले हे (तुझ्या स्तुतीपर) सूक्त जाणून घे (मान्य कर) आणि माझ्या/ आमच्या संततीला प्रसन्नता प्रदान कर. तुझ्यासारखे देव ज्यांचे रक्षण करतात, त्यां सर्वांचे सतत भलेच होते. आम्ही या जीवनात (जीवन यज्ञात ) सुंदर, सुदृढ पुत्र पौत्रांसहीत तुझी स्तुती, गुणगान करतो.

अश्या ह्या ब्रह्मणस्पतीची कृपादृष्टी विद्या मिळवून देते आणि विघ्नांचा नाश करते, हे सांगताना ऋषी म्हणतात,

न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न द्वयाविनः l
विश्वा इदमस्माद् ध्वरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि ब्रह्मणस्पते ll

अर्थात, हे ब्रह्मणस्पते, तू ज्यांचं रक्षण करतोस, त्यांना कोणत्याही प्रकारचे दु:ख किंवा त्रास अथवा पीडा होत नाही. शत्रू त्यांची कुठेही हिंसा करु शकत नाही, (एवढेच नाही तर), त्यांच्या कार्यांमधे कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांना बाधू शकत नाही. सर्व त्रासांपासून, हे ब्रह्मणस्पते, तू आपल्या भक्तजनांचे सदैव रक्षण करतोस.

तद्देवानां देवतमाय कर्त्वमष्नथ्नन् इळहासव्रदन्त वीळिता l
उद् गा आजदभिनद् ब्रह्मणा वलमगूहत्तमो व्यचक्षयत्सवः ll

सर्व देवांमधे श्रेष्ठ असा जो देव ब्रह्मणस्पती, कठीण असे पर्वत आपल्या बलाने विदीर्ण करु शकतो आणि जे काही कठोर आहे त्याला कोमल बनवू शकतो. ज्ञानरुपी प्रकाशाचं वरदान देऊन आणि आपल्या वाग् रुपिणी शक्तीच्या सहायाने अमंगल आसुरी शक्तींचा/ प्रवृत्तींचा नाश करुन, अज्ञानरुपी अंधकार दूर करतो.

ऋग्वेदात गणपतीला आदिदेव मानले आहे - सर्वप्रथम उत्पन्न झालेला आणि अक्षरसमूहांचा पालक, स्वामी. गणपतीची उत्पत्ती कशी झाली ह्याचे वर्णन पहा,

बृहस्पति: प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् l
सप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत्तमांसि ll

(सर्व संसाराचा स्वामी) बृहस्पती, परम व्योमरुप शक्तीच्या महान तेजापासून* सर्वप्रथम उत्पन्न होऊन सात स्वररुपी मुख/मुद्रा धारण करुन, आणि सप्तरश्मी वा सात वर्णांची विविध रुपं ( अ, क, च, ट, त, प, य) धारण करुन नादरुपाने अज्ञानरुपी अंधार दूर करतो.

*गणेशपुराणात गणपतीला गौरीतेजोभू: म्हटले आहे. ऋग्वेदात वर्णन केलेली व्योमरुप शक्ती म्हणजेच भगवान शिवाची शक्ती- चित् शक्ती वा चित्कला.

ॠग्वेदात, अमंगल, अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि यज्ञाचे रक्षण करण्यासाठी गणपतीला आवाहन केलेलेही आढळते.

चत्तो इतश्चत्तामुतः सर्वा भ्रूणान्यारुषी l
अराय्यं ब्रह्मणस्पते ती़क्ष्णशृंड्गोदृषन्निहि ll

अर्थात, ही अलक्ष्मी ह्या लोकातून (पृथ्वी) तसेच त्या लोकातूनही (स्वर्ग) नष्ट होवो, जी समस्त अंकुरांना (भ्रूण), औषधींना नष्ट करते. हे तीक्ष्णदंत ब्रह्मणस्पते, तू ह्या अलक्ष्मीचा नाश कर.

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् l
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् ll

हे ब्रह्मणस्पती! तू देवाधिदेव - गणपती असून कवींमधे / विद्वानांमधे सर्वश्रेष्ठ असा कवी आणि विद्वान आहेस. तूच ब्रह्म अर्थात अन्न, आणि उत्तम कर्मांचा रक्षणकर्ता आहेस. हे ज्येष्ठराज*, आणि मंत्रसमूहाचा (असा तू जो ) स्वामी, मी तुझे आवाहन करत आहे. आम्ही केलेली स्तुती ऐकून (मान्य करुन), आमच्या ऱक्षणार्थ, आम्ही करत असलेल्या यज्ञात उपस्थित रहा.

*सर्वात आधी उत्पन्न झालेला, सर्वांपे़क्षा ज्येष्ठ, देवतांचा राजा ह्या अर्थाने.

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपती हा रुद्राच्या गणांचा अधिपती आहे (रुद्रस्य गाणपत्यम्) हे सांगणारा संदर्भ आहे. वैदिक वाड्गमयांत गण हा शब्द लोक, देव आणि मंत्रसमूहाला उद्देशून वापरलेला दिसतो. त्यांचा अधिपती तो गणपती.

गणानां पति: गणपति: l
महत्तत्त्वगणानां पति: गणपति: l
किंवा, निर्गुणसगुणब्रह्मगणानां पति: गणपति: l

गणेश याही शब्दाचा अर्थ आहे - जो समस्त जीवांचा ईश अथवा स्वामी आहे.

गणानां जीवजातानां यः ईशः -स्वामी स गणेशः l

शुक्ल यजुर्वेदामध्ये गणपतीची वेगवेगळ्या नावांनी स्तुती केलेली आढळते. उदाहरणासाठी हे मंत्र पहा :

नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरुपेभ्यो विश्वरुपेभ्यश्च वो नमः ll

शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन संहितेतला,

गणानां त्वा गणपति हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति हवामहे, निधिनां त्वा निधिपती हवामहे l
वसो मम ll
आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् ll

हा एक प्रसिद्ध मंत्र असून अश्वमेध यज्ञात गणपतीचे आवाहन करण्यासाठी ह्या मंत्राचा विनियोग करण्यात येत असे. या मंत्राचा साधारण अर्थ असा, हे माझ्या जिविताचे रक्षण करणारा असा तू ईश्वर, सर्व गणांचा असा तू स्वामी, तुझे आम्ही आवाहन करतो. सर्व प्रियांचा प्रिय अधिपती, आणि सर्व निधींचा निधीपती आम्ही तुझे आवाहन करतो. तू सर्व ब्रह्मांडरुपी गर्भाचा पोषणकर्ता आहेस, मलाही (तुझ्या कृपेने) प्रजारुपी गर्भाचा पोषणकर्ता बनू दे.

कृष्ण यजुर्वेदात मैत्रायणी संहितेत गणेशाचे गायत्री मंत्र आढळतात.

तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l
तन्नो दन्ती प्रचोदयात् ll

अथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष तर प्रसिद्धच आहे व आजही गणपतीच्या पूजापाठात त्याचा विनियोग होतो. गणपतीबद्दल प्रचलित लोकश्रद्धा लक्षात घेऊन, अथर्ववेदांतर्गत गणपतीच्या स्तुतीपर चार उपनिषदे रचली गेली.

गणपत्युपनिषद् (अथर्वशीर्ष ) - रचयिता गणक ऋषी
हेरंबोपनिषद् - स्वतः भगवान् श्रीशंकराने पार्वतीला सांगितले.
वरदा पूर्व - रचयिता याज्ञवल्क्य ऋषी
उत्तर तापिनी उपनिषद् -रचयिता रुद्र ऋषी

ह्या उपनिषदांमधून श्री गणेश रुपाचे वर्णन (अथर्वशीर्ष - एकदंतं चतुर्हस्तं..) आणि त्याची स्तुती केलेली आहे. गणेशाचे तेजस्वी रुप, त्याची कुशाग्र बुद्धी आणि त्याचे सर्व प्राणिमात्रांवरील आधिपत्य मान्य करुन गणपती नेहमीच आपल्या बुद्धीला सन्मार्गावर राहण्याची प्रेरणा देवो यासाठी त्याची प्रार्थना केलेली दिसते.

वेदांगातही गणेशोपासनेचा उल्लेख सापडतो. वैदिक कालापासून गणपतीची उपासना भारतवर्षात सुरु होती व यज्ञयागातही गणपतीला मानाचे स्थान होते असे दिसते.

असा हा पूर्वीपासून जनमानसात रुजलेला गणपती. आदौ पूज्यो विनायकः - ह्या उक्तीनुसार सर्व शुभकार्यांरंभी अग्रपूजेचा मान मिळालेलं हे दैवत आजही तितकच लोकप्रिय आहे.

असा हा ओंकारस्वरुपी, सार्‍या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता आणि पालनकर्ता तुम्हां आम्हां सर्वांचं सतत रक्षण करो!

वेदांविषयी काही माहिती इथे मिळेल.

संदर्भः १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.