June 28, 2009

तिच्या डायरीचं शेवटचं पान..

तिची मूळ डायरी कधीपासून वाचायची होती. डायरीतून ती अधिक समजेल का, असं एक कुतुहल, थोडीशी अपेक्षा, थोडी उत्सुकता... पण काही काही पुस्तकं वाचायचा योगच यावा लागतो. समोर पुस्तक असलं तरी त्याचं आपल्या नशीबात वाचन असल्याशिवाय त्या वाचनाची सुरुवात होत नाही, हेच अनेक अंतिम सत्यांपैकी एक!! तशीच ही डायरी. अ‍ॅनीची डायरी. ही डायरी, तिच्या पूर्ण आणि कोणत्याही प्रकारे संपादित न केलेल्या रुपात मला हवी होती. तशी मिळते. त्यामुळे मागच्या वेळी पुण्याला गेले होते तेह्वा मिळाली, तशी उचललीच लागलीच. पुन्हा परत आल्यावर कामाच्या वाढत्या जंजाळात बुडून गेले. डायरी वाचायची राहूनच जात होती.

अ‍ॅनी काही मला अनोळखी नाहीये तशी. जगात अनेक लोकांना ठाऊक आहे, तशीच मलाही ठाऊक आहे. आंतरजाल, पुस्तकं, अधून मधून वृत्तपत्रांमधून येणारे लेख... पण म्हणून आजवर मी तिच्यामध्ये कधी इतकी गुंतले नव्हते. मध्यमवर्गीय मनाला जितकी आणि जशी हळहळ वाटते, तशीच माझीही अ‍ॅनीसाठी वाटणारी हळहळ. पुरात वाहून जाणार्‍या व्यक्तीला पाहून काठावरच्या व्यक्तीला वाटणारी हळहळ जशी असते ना, तशीच. अ‍ॅनी हे एक उदाहरण झालं, पण एकूणच मध्यमवर्गीय हळहळीची जातकुळीच अशी. बेफाम, बेफाट, झोकून देणारं असं काही बर्‍याचदा परवडणारं नसतं हे तिच्या मध्यमवर्गीय मानसिकतेला पक्कं ठाऊक असतं. असो.

हवा तसा वेळ काही मिळत नव्हता आणि डायरी तशीच पडून राहिली होती. आधीच म्हटलं ना, एखादं पुस्तक वाचायचा योगही असावा लागतो. बाकी बाबतीत ठाऊक नाही पण पुस्तकांच्या बाबतीत तरी "जब जब, तब तब" हेच अंतिम सत्य! किती दिवस झालेत, शांतपणे वाचन करण्याचा योग साधलेला नाही. काहीतरी कामं निघतातच. घरची, नाहीतर ऑफिसची. कुठे बाहेर जावं लागत, कुठे काही. ह्या सगळ्यात वाचनाच्या नावाने मात्र मोठ्ठा भोपळा आहे, आणि तो वाढिता वाढिता वाढे, भेदिले शून्यमंडला, ह्या गतीने वाढतच चालला आहे, ही एक जाणीव नेहमी त्रास देते. ( हे एक लिहिताना आठवलं म्हणून, डेक्कन जिमखान्यावरचं क्रॉसवर्ड बंद करुन तिथे हल्लीच्या शून्य शरीरयष्टीवाल्यांच्या टिचभर कपड्यांचं दुकान सुरु केलंय! पुस्तकांचं दुकान बंद करुन कपड्यांचं दुकान! कुठे फेडाल ही पापं? :( क्रॉसवर्ड काही पुस्तकांच्या दुकानांचा मानदंड नव्हे, हे मलाही ठाऊक आहे, पण मुद्दा तो नाहीये. पुस्तकांचं दुकान बंद करुन, कपड्यांचं दुकान सुरु केलं हा मुद्दा, का तर म्हणे, तिथला भाडेपट्टी करार संपला! अरे, मग वाढवा ना! पुस्तकांचं दुकान महत्वाचं नाहीये का? उत्कर्ष आणि पॉप्युलर आहेत म्हणा, आणि आमचा अब चौकपण आहेच म्हणावं. बsssरं......असूदे.)

आणि त्यादिवशी डायरी हातात घेतली, आणि डायरी वाचण्याआधी पुस्तकाच्या शेवटी लिहिलेला उपसंहार (Epilouge) वाचायची बुद्धी झाली. फक्त एका पानाचा उपसंहार आहे, पाठपोठ लिहिलं आहे म्हणून फारतर दोन पानं म्हणूयात. एका पाठपोठ पानावर मागे पुढे लिहिलेली माहिती. अ‍ॅनीची डायरी जिथे १ ऑगस्ट १९४४ ला थांबली, तिथून पुढे अ‍ॅनीचं आयुष्य कसं गेलं ह्याची संक्षिप्त माहिती ह्या एका पानात मिळते. बस्स, एका पानात संपू शकलं, एवढंच तिचं १ ऑगस्टनंतरचं आयुष्य! ते पान पहिल्यांदा वाचताना काय वाटलं, किंवा आजही काय वाटतं, हे शब्दांत सांगता येणं केवळ कठीण! एक प्रकारचा सुन्नपणा अवतीभवती साकळल्यासारखा झाला खरा. वस्तुनिष्ठपणे, कोणताही भावनिक आव न आणता दिलेली माहिती वाचता वाचता कधी अंगावर येउन आदळली, लक्षातही आलं नाही. भयानक अस्वस्थ व्हायला झालं. आजही होतं. छिन्न, विछिन्न झाल्यासारखं वाटतं. तिने लिहिलेलं शेवटचं पत्रही असंच. अतिशय अस्वस्थ करुन जाणारं. निरागसपणा हरवलेल्या लहानग्यांच्या अंगी आलेला मोठेपणा सहन होण्यासारखा नसतो, नाही?

हे डायरीचं शेवटचं पान वाचताना मनात येणार्‍या निरर्थक प्रश्नांना उत्तरं तरी आहेत का?

मार्च १९४५ मध्ये अ‍ॅनी मृत्यू पावली. तिची शेवटची इच्छा होती, ती म्हणजे, मृत्यूनंतरही चिरकालीन सगळ्यांच्या स्मरणात असावं अशी.

तुला कोण विसरेल गं?