March 27, 2008

वृक्षवेलींच्या अन इतर आठवणी

लहानपणापासूनच वृक्षवेलींबद्दल मला जरा जास्तच माया. आजोळी, पणजोळी भरपूर झाडं. पणजोळी तर घरामागे छोटीशी आमराईच. एक भली थोरली विहीर देखील. भर दुपारी उन्हाच्या झळा मारतात, तेह्वा आमराईत जाऊन बसणे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख!! एखादं पुस्तक घ्यावं अन कोणत्याही झाडाखाली बसून वाचत दिवस घालवावा! कोणी सोबत खेळायला नसलं तरी चालायचं अश्या वेळी. सख्ख्या नाही, पण सख्खे मामाही करणार नाहीत अशी माया करणार्‍या मामांबरोबर आणि घरच्या गडीमाणसांबरोबर आंबे पाडायला जायचे. पणजोळी पतवंडांचे कौतुक चालायचेच. गडी माणसेही आम्हांला अगदी लहानपणापासून पाहिलेली अशी होती. त्यांच्याही अंगाखांद्यावर आम्ही लहानपणी बागडलो होतो, त्यांच्याच देखरेखीखाली गाई गुरांच्या गोठ्यात कपिलेशी अन तांबूशी मैत्री केली होती, लाल्यासारखे खोंड शेपटी उभारून, वारा पिऊन कसे उधळते तेही पाहिले होते. मग काय!! वरून एखादा खास आंबा, "घे गो बाय, पकड" म्हणत फ्रॉकच्या ओच्यात अल्लाद पडायचा!

घरामागच्या खळ्यात पणजीने हौसेने लावलेली अबोली, गावठी गुलाब, उगवलेली कर्दळ आणि गुलबक्षी सतत फुलत असायचे. अबोलीच्या वेण्या करायच्या अन गुलबक्षींचे दांडे पणजी एकमेकांत गुंफून द्यायची, सुई दोरा न वापरता!! ते कसब काही मला शेवटपर्यंत जमले नाही! कृष्ण कमळाची वेल वेलांट्या घेत मागील दारच्या भिंतीवरून कौलांवर जायच्या प्रयत्नात असायची. एका बाजूची नारळीची उंचच उंच झाडं वार्‍यानं सतत इकडून तिकडे झुलायची, अन धुवांधार पावसांत तर बघायलाच नको होते!! पाऊस संपल्यावर धुतली गेलेली झाडं किती सुंदर दिसायची!! घराच्या मागच्या बाजूला अशी झाडांची गर्दी, तर पुढील बाजूला भलामोठा पिंपळ वाढलेला. दुपारच्या आणि रात्रीच्या शांततेत पिंपळाची सळसळ आतल्या खोल्यांमधेही ऐकू यायची. मधला रस्ता ओलांडला तर समोर हा एवढा विस्तारलेला उजाड माळ. माळावर तुरळक उगवलेली झाडं, महादेवाचे देऊळ. सार्‍या गावचा तो राखणदार. सार्‍यांची त्या शंभू महादेवावर अपार श्रद्धा. सारी सुखंदु:खं त्याच्या साक्षीने भोगायची अन काळज्या त्याच्या पायाशी वहायच्या.

चित्रातल्यासारखं माझं हे पणजोळ सुदैवाने अजूनही तसच उभं आहें. मलाच कितीतरी वर्षं जायला नाही जमलय तिथे; पण मनानं मात्र मी बर्‍याचदा पणजोळी पोचते. खोल विहिरीत डोकावून आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकणं, झाडांखालून फिरणं, फुलं गोळा करणं हे सगळे लहानपणचे उद्योग करते!!

भली मोठी आमराई पहिल्यांदा पाहिली ती करुळला. मी लहान असताना, एकदा कोकणात करूळ गावी दूरचे एक नातेवाईक होते, त्यांच्याकडे दोन तीन दिवस राहण्यासाठी गेलो होतो. अगदी छोटंसं, इन मिन वीस पंचवीस घरांच गाव. प्रत्येक घरावर लाल कौलं, समोर निर्मळ सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन, प्रत्येक अंगणात मंजिर्‍या सांभाळत डोलत असलेल्या तुळशी..... सारं कसं अगदी जसच्या तसं आठवतं. तिथल्या काकांनी अगदी अपूर्वाईने गावची आमराई बघायला नेलं होतं. गावाबाहेरची ती घनदाट आमराई आणि भरभक्कम वाढलेले आंब्यांचे वृक्ष - हो, वृक्षच - अजूनही स्मरणात आहेत लख्ख.

आमराईपर्यंत जाणारा रस्ताही शेतांमधून, बांधांवरून चाललेला. पायाखाली बघून चालां हां, अशी काकांची वेळोवेळी सूचना. न जाणो एखादं जीवाणू पायाखाली यायचं. आमराई तशी गावाबाहेर, त्यामुळेही असेल, वातावरणात भरून राहिलेली निरव पण प्रसन्न शांतता. मधूनच शांतता भेदणारी कोण्या पक्ष्याची सुरेल साद, आणि ह्या सार्‍या पसार्‍यात शोभून दिसणारं, त्या आमराईत कोण्या पूर्वजानं बांधलेलं सुबक पण साधंच अस शंकराचं देऊळ. देवळातली स्वच्छता दृष्ट लागण्याजोगी. आत गाभार्‍यातली काळीशार पिंडी, पिंडीवर आडवं सजवलेलं गंध. पांढर्‍या चाफ्यांच्या फुलांनी बांधलेली नेटकी पूजा. पिंडीवर छाया धरून राहिलेला पितळीचा पंचमुखी नाग. समोर खोबर्‍या, खडीसाखरेचा नैवेद्य. एखादं चित्र जणू सजीव होऊन तिथे प्रत्यक्षात आकारलं होतं जणू. अजून ते दृष्य जसच्या तसं माझ्या डोळ्यांसमोर आहे. नुसतं आठवलं तरी परत एकदा त्या आमराईत विसावल्यासारखं वाटतं...

आजोळी सुध्दा घराभोवती झाडं भरपूर होती. घरापासून काही अंतरावर विहीर होती. विहिरीपाशीच आंबा, फणस, जांभळाची झाडं होती, जरा पलिकडे नारळी. घरापुढे चौथरा बांधलेलं तुळशी वृंदावन. रोज सकाळ, संध्याकाळ आजी तिथं दिवली लावायची, आणि सक्काळी पुढच्या अंगणात तुळशी पाशी अन अवती भवती सडा शिंपण करायची. रोजचा नेम. तसच घरापुढे रामफळ, पपई, चाफ्याची झाडं. आणिक एक झाड होते, पण त्याचे नाव ठाऊक नाही. त्याच्या पानाच्या पिपाण्या करून वाजवायला मात्र खूप धमाल यायची!! चाफ्यांच्या झाडांखालची चाफ्याची फुलं सक्काळी टवटवीत असत, ती पूजेसाठी गोळा करायचा ठेका आमच्यापाशीच असायचा. तसंच बकुळीच्या वृक्षाखाली आम्ही बकुळफुलं गोळा करायला पडीक!! बकुळफुलांचा सुगंध एकदा ज्यानं अनुभवला, त्या व्यक्तीला सहसा या फुलांना विसरणं कठीणच आहे. ताजी असताना जशी ही फुलं परिमळतात, तसंच सुकल्यावरही दरवळतात... आजोळच्या घराच्या जरासं पुढेच, सड्यावर बकुळफुलांचा भला थोरला वृक्ष होता, कधी पासून, किती वर्षं रुजला होता कोण जाणे! संपूर्ण पायवाट बकुळीच्या सुवासानं घमघमत असायची आणि अर्थात कोकणच्या आद्य परंपरेप्रमाणे, या वृक्षाभोवतीही भुताटकीच्या "सा रम्या कथा" गुंफल्या गेल्या होत्या!! एखाद्या चांदण्या रात्री बाहेरच्या खळ्यामधे आम्ही, आसपासचे शेजारी गप्पांमधे रंगलेले, वीज गेलेले असायची आणि नेमकं कोणाच्या तरी रसवंतीला बहार येऊन या गप्पा ऐकायला मिळायच्या!! ऐकायची उत्सुकता तर असायचीच, पण कधीतरी भीतीही वाटायची। न जाणो एखादे भूत नेमके आपल्याच समोर टपकायचे!! मग आपले हळूच आज्जीच्या किंवा मावशीच्या बाजूला सरकायचे!! वरून सांगायचे त्यांनाच, घाबरु नकोस हं, मी आहे ना!! आजी, मावशी गालातल्या गालात हसायच्या अन जवळ घेऊन बसायच्या.

अजून एक मजा आठवली या बकुळीच्या फुलांवरुन! एकदा, मी अन माझी आई लक्ष्मी रस्त्यावर काही खरेदीनिमित्ताने गेलो होतो. कधी नाही ते आम्हांला एक गजरेवाला बकुळीच्या वेण्या घेऊन विकायला बसलेला दिसला. आम्ही एकमेकींकडे पाहिलं फक्त, अन न बोलता तिथे मोहरा वळवला!! आईचं एव्हाना गजरेवाल्याशी कश्या दिल्या वेण्या वगैरे बोलणं सुरु झाल होतं, मी आपली शेजारी उभी होते, आणि एवढ्यात तिथूनच दोघी जणी जाऊ लागल्या आणि एकीचं लक्ष त्या वेण्यांकडे गेलं!!

पुढचा संवाद कानावर पडला, "अय्या!! अग ते बघ काय!! अग, तो माणूस बघ, सुकलेली फुलांचे गजरे घेऊन बसलाय विकायला!! विचित्रच आहे नै!!"

मग अग म्हणाली, " अगं पण त्या बाई बघ ना, घेताहेत चक्क ते सुकलेले गजरे!! गंम्मतच आहे बाई..."

आम्हांला बकुळफुलं ठाउक नसणार्‍या त्या दोघींची खूप मजा वाटली होती...

आ़जोळी आता कोणीच नसतं, पण कोणी नसतं असही कसं म्हणू? माणसं नसली तरी, तेच छोट्या भरभक्कम लाकडी दरवाज्याचं, येणार्‍या प्रत्येकाला वाकूनच आत यायला देणारं घर अजूनही उभं आहे, आणि आजूबाजूची वृक्षमंडळीही.

अजून एक बाग मनात घर करून राहिली आहे ती पुण्याच्या माझ्या घरापाठची। घराच्या मागच्या बाजूला व्हरांडयात उभं राहून बाग न्याहाळण्यातही मजेत वेळ जात असे! तस घरासभोवताली अजूनही झाडी आहे, मोठे मोठे वृक्ष आहेत - गुलमोहर, कॅशिया, अशोक, कडुनिंब, आवळी, नारळ... पण आमच्या शेजार्‍यांची ही बाग कोणालाही भुरळ घालेल अशी देखणी!! आमचं घर अन शेजार्‍यांची बंगली, यांमधे एक दगडी कुंपण मात्र, तेही खास उंचीचं वगैरे नाही, फक्त हद्द निश्चित करणे, एवढाच त्या कुंपणाचा उद्देश्य. बागेत कितीतरी देखणी झाडं उभी. दृष्ट लागावी अशी बहरलेली बाग.

कुंपणाच्या अगदी जवळ एका कोपर्‍याला जवळ असं चिकूचं झाड, त्याच्या एका बाजूला आंबा, अन आंब्यापलिकडे कडुनिंब. दुसर्‍या बाजूला चांगलाच उंच वाढलेला शेवगा. त्याहून उंच वाढलेला शेवगा आमच्या बागेतच पाहिला फक्त. शेवग्याच्या पलिकडे गुलमोहर. दुसर्‍या एका कोपर्‍यात कॅशिया अन त्यापलीकडे निरफणसाचं मोठ्ठ्या पानांच झाड. फणस पण तिकडेच जरासा पुढे असा. एकीकडे पेरु, डाळिंबाचं एकेक झाड. तीन नारळीची झाडं, त्यांना सतत नारळ लगडलेलेच असायचे!! एखाद दुसरा खालीही पडायचा कधीतरी. कोणी उचलून घेऊन जायचे.

एका बाजूला फुलझाडं. तांबड्या आणि गुलाबी रंगांचे गुलाब, निरनिराळ्या जास्वंदी अन रस्त्याबाजूच्या कुंपणाला धरून फोफावलेल्या रंगीबेरंगी बोगनवेली. एका कोपर्‍यात मधुमालतीची वेल. जाई जुईंचे मंडप आणि जाईच्या फुलांनी बहरलेली वेल अजून आठवते!! बंगलीच्या जवळ पाण्याचा हौद बांधलेला, आणि त्याच्या जवळच अळू आणि केळीची झाडं, केळीची हिरव्या पोपटी रंगाची पानंही एकदम रसरशीत!! सगळीकडे मुख्यतः हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांची आणि अधून मधून इतर रंगांची उधळण!! डोळयांना सुख अगदी!!

बागेत तर्‍हेतर्‍हेच्या पक्ष्यांची हजेरी आणि एक मुंगुसांची जोडीही. काही नेहमीचे पक्षी आणि काही न ओळखता येणारे. या मुंगुसांची अन येणार्‍या भारद्वाज पक्ष्यांची दर्शनं घेऊन शाळेच्या अनेक परीक्षा सुखेनैव पार पाडल्या!! शाळा संपल्यावर संध्याकाळी आम्ही मुलं खेळायला जमत असू. आमच्या सुदैवाने आम्हां कोणाच्याच आईवडिलांना आणि आजी आजोबांना शाळेनंतरच्या क्लासेसचं महत्व पटलं नव्हतं!! त्यामुळे शाळेतून आलं की संध्याकाळी जरा तास दोन तास चांगलं खेळा जरा, असच सांगून आम्हांला आपापल्या घरातून बाहेर हाकलत असत!! मग थोडावेळ इकडे तिकडे खेळून आमच्या स्वार्‍या बागेकडे वळत. बागेत आम्हांला मुक्त प्रवेश होता. झाडांवर चढून बसणे, गप्पांचा अड्डा जमवणे, बागेत लपाछपी खेळणे, बागेला पाणी द्यायच्या निमित्ताने एकमेकांना पाण्याने चिंब भिजवणे, बाग झाडून एकत्र केलेल्या पालापाचोळयात मोठ्या माणसांच्या नजरा चुकवून उड्या मारणे, पानं इतस्ततः उडवणे हे अगदी आवडते उद्योग!!

आणि मग एक दिवस, वय झाल्यामुळे बागेची देखभाल करता येत नाही म्हणून म्हणा, किंवा इतर काही कारणांनी म्हणा, बंगलीच्या मालकांनी बाग विकून टाकली!! लहान मोठे सारेच हळहळले... कोणाला कुठला हिरवा रंग कधी आणि कसा भुरळ घालेल, सांगणं, जर कठीणच, नाही??

आणि मग एक दिवस लाकूडतोडे आले अन सपासप सगळ्या झाडांवरून कुर्‍हाडी फिरल्या, एकामागोमाग एकेक वृक्ष कोसळले!! फुलझाडंही उपटून टाकली, जाई, जुई, रसरसलेली केळीं॥ काही म्हटल्या काहीच राहिलं नाही!! रंगांची उधळण जणू बघता बघता विरून गेली!! कासावीस होऊन आम्ही ते पाहत होतो.....

बघता बघता वृक्ष कोसळले आणि लाकूडतोडयांना विकायला लाकूड मिळालं, आजूबाजूच्या कामवाल्या बायांना घरी न्यायला सरपण, बंगलीच्या मालकांना जमिनीची आणि लाकडांची किंम्मत, बिल्डरला अजून एक इमारत उभी करायला अजून थोडी जागा, आणि त्या जागेचं जिवंतपण हरवलं ते कायमचं.... पक्षी तर कधीच परागंदा झाले, मुंगूस जोडीही निघून गेली!! या सगळ्याचे जागा दगड धोंडे, सिमेंट यानी घेतली अन बघता बघता जिवंत बागेच्या जागी निर्जीव इमारत उभी राहिली, कालांतराने गजबजलीही, पण आता मागचय व्हरांड्यात जाऊन उभं राहण्याचं काही कारण उरलं नव्हतं, कधी त्या जागेकडे नजर गेलीच, तर अगदी भकास वाटायचं! आणि मग हळूहळू स्वतःच्या आयुष्यात गढून गेल्यावर ह्या आठवणींच दु:खही पुसट होत गेलं....

पण या झाडांच्या, बागांच्या आठवणी मात्र अगदी आवर्जून मी मनाशी जपल्या आहेत, जपणार आहे। त्यादिवशी अचानक सगळं प्रकर्षानं आठवलं, लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं. आठवायला कारण ठरला तो, पहिल्यांदाच पाहिलेला, बुंध्यापासून शेंड्यापर्यंत हिरव्या नाजूक फुलांनी बहरलेला, अशोक वृक्ष!! अशोक वृक्षांवर तुरळक फुललेली फुलं मी पाहिली आहेत, पण हे दृश्य अलौकिक आहे!! अति देखणं आहे!!

झाडांबद्दलच्या माझ्या आठवणींत, या एका सुंदरश्या आठवणीची भर आता कायमसाठी पडली आहे.......

समाप्त.

7 comments:

कोहम said...

अप्रतिम लिहिलंयस. म्हणजे कसं माहितेय? शाळेतल्या एखाद्या जुन्या पुस्तकात एखादं पिंपळाचं पान किंवा चॉकलेटची चांदी ठेवावी आणि बऱ्याच वर्षांनी ते पान उघडल्यावर त्याबरोबरच्या सगळ्या आठवणी मनात याव्यात तसं वाटलं. खूप आवडलं. अगदी जे लिहिलंस ते डोळ्यांना दिसलं माझ्या. अप्रतिम!!

अशा नितांतसुंदर लेखाला पहिली कमेंट लिहायचा मान मिळाला ह्याचाच मला आनंद होतोय.

संवादिनी said...

कसलं लिहितेस गं तू? सहीच! पुढचा भाग लवकर येऊदे.

SamvedG said...

पिक्चर पर्फेक्ट!

Yashodhara said...

कोहम, किती सुखावणारा अभिप्राय लिहिला आहेस! अभिप्राय वाचून मला अगदी खूप छान वाटलं, आपलं कौतुक ऐकायला बरं वाटतच ना!! :)

संवादिनी, करते गं पूर्ण लवकरच. सद्ध्या जरा कामात व्यस्त झालेय गं, पण तुझा ब्लॉग मात्र वाचत असते मी. अभिप्राय नोंदवायला मात्र जमत नाही... :(

संवेद, धन्यवाद.

नंदन said...

a pra ti m!

संवादिनी said...

yashodhara....tula kho dilay.....apan ka lihito kya khokhocha.....lavakar lihi

rohinivinayak said...

vaa! khupach sunder lihile aahe!