April 27, 2008

मनात आलेले काही बाही....

एखादं पुस्तक वाचायला घेतलं की साधारण एक पान वाचायला ३ मिनिटं पुरत असतील?? कुठेतरी वाचलं होतं कधीतरी की तीन मिनिटांच्या कालावधीत साधारण ३०० माणसं मृत्यू पावतात अन साधारण त्याहून दुप्पटीने जरा जास्तच, महणजे साधारण ६२० ते ६५० नवीन बालकं जन्माला येतात.

ब्लॉगवर एक पोस्ट करायला साधारण ३० मिनिटं तरी लागत असतील ना? इथं आत्ता घरी बसून , समोरच्या लॅपटॉपवर पूर्णपणे तल्लीन होऊन ही पोस्ट बडवतेय. आजूबाजूला पुस्तकं पडली आहेत, गाण्यांच्या अन सिनेमांच्या सीड्या अन डीवीड्या पडल्या आहेत अन असाच थोडा थोडा माफक पसारा. थोडा फार पसारा असाच आयुष्यात पण, जो सध्ध्या आवरता येत नाही. तो तसाच असणार आहे काही काळासाठी तरी..... नंतर कधीतरी आपसूकच आवरला जाईल. असो.

आणि हे सगळं इथे सुरु असताना, बाहेरही नेहमीची जगरहाटी चालूच आहे, रस्ते माणसांनी अन वाहनांनी भरून ओसंडताहेत, जन्म, मृत्यू, सामान्य माणसांच्या आयुष्यातले नेहमीचे सोहळे, आनंदाचे क्षण, दु:खाचे कढ... सारं काही थोड्या फार फरकानं तसच. माझ्यासकट सगळे तथाकथित 'नॉर्मल' आयुष्य जगताहेत. वरच्या कुठे तरी वाचलेल्या जन्म मृत्यूच्या संख्या खर्‍या मानल्या तर, या अर्ध्या तासात कुठेतरी ३००० जीव मृत्यू पावलेत अन ६२०० ते ६५०० जीवांनी जन्म घेतलाय.या अर्ध्या तासात, काही घरांत मृत्यूच्या दर्शनानं वातावरण शोकाकूल झालं असेल, काही घरांत नवजन्माचा जल्लोष सुरु असेल, (जरासं विषयांतर, पण डोक्यात आलंच म्हणून, कदाचित काही घरांतून मुलाऐवजी मुलगी जन्माला आल्याचा एक नकळतसा बोचरा सलही जाणवत असेल. सुपर पॉवर व्हायचं असलं - किंवा अगदी झालोच आहोत तरीही -तरी आम्हाला मुलगी झाल्याचं अजूनही तेवढच वाईट वाटत, अगदी तथाकथित सुशिक्षित घरांतही!! जाऊदेत, हा एक वेगळाच विषय आहे.... ) कदाचित, यातल्या काहीजणांनी मृत्यूला सखा म्हणून हात पुढे केला असेल, कंटाळवाण्या आयुष्याला भोग म्हणून जगण्यापेक्षा एकच मृत्यू बरा, असही वाटल असेल कधी तरी. ज्यांचा जन्म झालाय, त्यांना तरी कुठे ठाऊक आहे पुढे काय काय घडणार आहे?? एका साधी आकडेवारी, अन ती सुद्धा कितीतरी कहाण्या सांगते, अश्रूंच्या, दु:खाच्या, आनंदाच्या क्षणांच्या, नाही??

त्यातही, पुन्हा, काहीजण या आकडेवारीचा भाग बनतही नसावेत..... एकाकी, निष्कांचन अवस्थेत जगून कधीतरी शांतपणे अन एकटेच कुठेतरी डोळे मिटण्याचं प्राक्तन घेऊन आलेले जीव. अनौरसपणाचा शिक्का कपाळावर घेऊन जन्मलेले आणि सोडून, टाकून दिले गेलेले जीव... पण जगरहाटी सुरुच आहे.

आणि मी, तुम्ही, आपण सगळेच, अगदी याच आकडेवारीचा एक हिस्सा. भूतकाळात कधीतरी जन्माच्या आकडेवारीचा हिस्सा अन पुढे भविष्यात कधी तरी मृत्यूच्या आकडेवारीचा हिस्सा!! जरी जीवनाचा प्रवाह वाहता असला आणि नैनं छिन्दन्ती शस्त्राणि, नैनं दहती पावक: , हे जरी खरं असेल तरी लौकिकार्थाने आपला या पृथ्वीवरचं निदान शारिरिक अस्तित्व संपणार, हे नक्की. पण, आपलं अस्तित्व अगदी अगदी क्षणभंगूर आहे, याची जाणीव असणं, बर असत.

एकूणच आपण मृत्यूविषयी खूप कमी विचार करतो, आयुष्य खूप गृहीत धरतो आपण. आयुष्यात अनेक नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो, कधी, कधी तर जरा अतिच!! नको त्या गोष्टींसाठी, खर्‍या खोट्या समजुतींपायी, मानापमानाच्या कल्पनांपायी आणि इगोपायी कितीतरी साधे, सरळ आणि सुंदर क्षण हातातून गमावतो. इतरांकडे बोटं दाखवतो, पण स्वतः कधीही बदलायचं मनातही आणत नाही!! खूप जगावेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटत असतात, पण जरा वेगळी वाट चोखाळायचं धाडस करायच की नाही, याबद्दल सांशकता असते. आपला आपल्यावरचा विश्वास डळमळतो...... संभाव्य धोक्यांना भिडण्याची ताकद खूप कमी जणांकडे. लहान मुलांसारख निर्भय, निर्व्याज जगण्याची कला तर आणखी कमी जणांकडे. आणि तरीही आपल्याला आयुष्याची एवढी नशा चढलेली असते, की आपण केवळा स्वतःचं आयुष्यच नाही तर आपल्या आजूबाजूच्यांनाही किती गृहीत धरतो!! आपल्या लोकांनाच नाही तर परक्यांनाही.....

थोडीशी मृत्यूची जाणीव मनात बाळगली तर इतकं बेदरकार वागू शकेल का कोणी?? किती तरी गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात अगदी रोजच्या जगण्यात, एखादा फोन कॉल, जो पलिकडल्या व्यक्तीला जाणवून देतो तुमच्या आयुष्यातलं त्या व्यक्तीच स्थान. एखादं दिलखुलास हास्य, कोणाला करायची राहून गेलेली निरपेक्ष मदत, तुम्हांला जोपासायचा असलेला एखादा छंद....

खरं तर आपल्याला कुठे ठाऊक असत की पुढचा क्षण तरी आपला आहे की नाही?? आणि प्रत्येक सुरुवातीला अंत हा असतोच म्हणतात, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कधी तरी पूर्णविराम हा ठरलेला, मग त्याला घाबरायच कशाला? उलट, थोडीशी त्या पूर्णविरामाची जाणीव ठेवली तर प्रत्येक जण थोडसं अधिक संवेदनशीलतेने वागेल का??

6 comments:

नंदन said...

sahmat aahe!
http://anudinee.blogspot.com/2008/03/blog-post.html

कोहम said...

Yashodhara,

Maza apala ek Mat. Jya goshTi apalya control madhe nahit tyancha bau ka karat basava? Kadhi na Kadhi sagaLech maraNar aahet mhaNun aaj chehera lamb karUn basayachi kay garaj?

Yashodhara said...

नंदन धन्यवाद.

कोहम, अरे, चेहरा लांब करुन बसले नाही काही मी :) एक निरीक्षण नोंदवलं इतकच :)

Yashodhara said...

आणि मृत्यूची जाणीव चेहरा लांब करुन व्हायला हवी, असं काही आहे का?? ती तर एक एक सच्चाई आहे ना? घडणारच आहे. माझं म्हणणं इतकच आहे की, कधी ना कधी कोणत्या तरी टप्प्यावर आपलं शारीरिक अस्तित्व या जगातून पुसलं जातं, तर जोपर्यंत ते अस्तित्व शाबूत आहे तोपर्यंत 'आपल्या कधीतरी नसत होण्याची' जाणीव ठेवून आयुष्याचा खराखुरा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

कदाचित मला नीट मांडता आलं नसावं....

Samved said...

यशोधरा, आकड्यांचे खेळ मोठे विचित्र असतात आणि त्यांना isolation मधे बघणं तर कधी कधी अजूनच भयाण असतं. असं बघं, तीन मिनिटात ३०० माणसं मेली नसती तर पृथ्वीचं काय झालं असतं? अन्न, पाणी यावरुन युद्ध करुन आपण कित्येक लाख लोक काही सेकंदात मारले असते. हे सगळं relative असतं आणि you need to back it with some theory or numbers may look absurd. माझ्या कामाचा एक भाग म्हणजे data analysis करणे, conclusions, actions वगैरे पण नंबर मागची कारणं माहीत नसली की सगळंच विचित्र वाटायला लागतं.
आणि हो, जे अटळ आहे त्याचा विचार करायचा का? का करायचा? लुकलुकणारा छोटा ससा जो छातीत धडधडतो तो स्वतः साठी की मागे जे राहणार आहेत त्यांच्या साठी?

HAREKRISHNAJI said...

किती छान लिहीले आहेत.

माझ्या घरी मात्र उलट झाले, मुलीच्या ऐवजी मुलगा जन्माला आला तेव्हा जरासे वाईट वाटले.

होता है