August 30, 2008

कवितांचा खो खो

संवेद आणि मंडळींचा कवितांचा खो वाचत होते. किती सुरेख कविता उतरवताहेत सगळे! वाचताना सुद्धा इतक छान वाटतं! सगळ्यांना या नेक कामाबद्दल खूप मनापासून धन्यवाद.

खरं तर आता वाचन खूपच कमी झालय - खरं तर बंदच - याची खूप खंत आहे, त्यामुळे मनातून एकीकडे स्वतःलाही खो मिळावा असं वाटत असताना तो मिळण्याची भीतीही होती मनात. मिळाल्यावर पटकन् लिहायला कविता आठवयाला हवी, लिहायला वेळ मिळायला हवा... वाचन कमी झालं की अशीही भीती वाटते दोस्तहो..... हसू नका :( आणि, आवडणार्‍या कवितांमधे डावं उजवं तरी कसं करायच? ते आणखीनच कठीण काम!!

हल्ली ब्लॉगवर येणंही कमीच झालय. कामाचा हिमालय, दुसरं काय?? :( मात्र, एक आवडतं कामही करतेय, ते लवकरच वाचायला मिळेल मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या ई -गणेशोत्सवात :) असो, विषयांतर नको. तरी सुदैवाचा आणि महत्वाचा भाग असा की शब्ददेखण्या आणि अर्थगर्भी कवितांची मराठी सारस्वतात काहीच कमी नाही. आपल्याला फक्त आवडलेली कविता ब्लॉगवर उतरवण्याचं काम!! ते एक बरं आहे!! :D


तर, विशाखाने मला खो दिल्याबद्दल तिचे खूपच आभार. असं, खो वगैरे मिळाला की ब्लॉगविश्वात आपली दखल घेतली जातेय वगैरे वाटून मला एकदम सही वाटायला लागतं!! विशाखा, इथे दोन कविता पोस्ट करतेय, पण दोनच कविता पोस्ट करायच्या हा खूप अन्यायकारक आणि जाचक नियम आहे!! संवेद, प्लीज नोट! :D पण, तो का घातलायस, हे आलं थोड फार ध्यानात. 'घेता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था! हा खो सुरु केल्याबद्दल आभार.

नंदन, माझं स्वतःचं पोस्ट नाहीय, पण ही नवीन पोस्ट टाकली पहा :) गोड मानून घे

तर, ह्या कविता, पटकन् आठवलेल्या.

राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

कितीतरी
आवडणार्‍या कविता इथे लिहायचा मोह होतोय!! एक वेगळा ब्लॉग उघडावा लागेल आता त्यासाठी!! :P

ही अजून एक, इंदिरा संतांची. एखादी व्यक्ती किती अलवार लिहू शकते याला काही मर्यादा??

कुब्जा

अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ।

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...

- इंदिरा संत

आणि संवेद, तू घातलेला नियम मोडतेय, सपशेल माफी मागते, पण अगदीच राहवलं नाही रे!! ही अजून एक जीवघेणी गजल, सुरेश भट यांची.

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!

- सुरेश भट

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गातें हैं, हेच खरय! !!

माझा खो श्यामलीला, द किंगला आणि तिसरा खो अरुणला. लिहिताय ना??


कवितांचा खो खो: खेळाचे नियम -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र अवश्य लिहा.

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद अवश्य करा.

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण अपेक्षित नाही.

५.अजून नियम नाहीत :)

नियमपण पोस्ट केले, नियम माहित नव्हते,संवेदच्या ब्लॉगपर्यंत जायचा कंटाळा आला, ब्लॉग सापडला नाही, अशी कारणं नकोत द्यायला कोणी!!!! :D

4 comments:

Nandan said...

wa! tinhi kavita nikhaL apratim.

Sumedha said...

वा! खूपच छान कविता! कुब्जा तर माझी खूप आवडती, इथे दिल्याबद्दल धन्यवादु अरुणा ढेरेंची मात्र वाचली नव्हती! सुंदर!

विशाखा said...

यशोधरा, तुला खो दिल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घ्यावी असं वाटायला लावणाऱ्या कविता तू पोस्ट केल्या आहेस. अरूणा ढेरे आणि इंदिरा संत! व्वा- तुझ्या रसिकतेमुळे मला ह्या कविता वाचायला मिळाल्या- त्याबद्दल खूSSSप धन्यवाद. मला वाटतं, “राधे.” च्या कवितेत विषप्राशनाबद्द्ल बोलतांना, “मीरे,” चा अस्पष्ट संदर्भ आलाय... त्यावरून पुन्हा आठवलं, लता-भीमसेन जोशींच्या एका भजनाच्या ध्वनिफीतीत, “श्याम घन, घनश्याम, बरसो, बहोत प्यासी हूँ..” हे गाणं खूप आवडलं होतं (कविता म्हणूनही).

यशोधरा said...

नंदन, सुमेधा धन्यवाद. लिहिणार्‍यांचे शब्द पोचवणे एवढेच काम होते मला. सोप्पे काम. :)
विशाखा, :) किती कौतुकं करतेस!! छान वाटलं गं पण वाचून. थँक्स!