October 29, 2008

ठसठसणारा कोपरा

माझ्या लहानपणी माझी आजी मला खूप गोष्टी सांगायची, गप्पा मारायची. गोष्टी म्हणजे फक्त चिऊ काऊच्या नव्हेत. अगदी लहानपणी त्याही सांगून झाल्या. पण जसजशी मी मोठी होत गेले, तशी आजी वडिलधारीपणाची भूमिका मागे टाकून हळूच मैत्रिणीच्या भूमिकेत कधी शिरली ते समजलंच नाही. समजावण्याचा आव न आणता कितीतरी गोष्टी तिने समजावल्या, सांगितल्या. नातवंडांच्या मनात हलकेच शिरण्याचं तिचं कसबही वादातीत होतं. तिच्या अनेक गोष्टी, मतं मला प्रसंगानुरुप आठवतच असतात, पण त्यातही तिच्यावेळी, तिच्या लहानपणी, ती मुलगी म्हणून तिला कितीतरी संधी मिळू शकल्याच नाहीत, याबद्दलची तिने बोलून दाखवलेली खंतही बर्‍याचदा टोचत राहते. लहानपणी वा वाढत्या वयात त्यामागचे तिचे दुखावलेले मन त्या तीव्रतेने कधी जाणवले नाही. तेवढे कळतही नव्हते, पण आता जरुर जाणवते.

तिच्या घरातले तिला अन् तिच्या बहिणींना लागू असणारे नियम आणि भावांना लागू असणारे नियम यात तफावत तर होतीच. खूप लक्षात येईल असा दुजाभाव नव्हता त्याकाळाच्या मानाने.. पण जो काही होता, तो होताच! मुलीच्या जातीला तेह्वा शिवण यायला हवे होते, स्वयंपाक तर अनिवार्य होता, घरकाम, विण़काम, कलाकुसर, पाटपाणी, घरातली साफसफाई, झाडलोट.. थोडक्यात काय, तर अगदी गृहकृत्यदक्ष मुलगी हवी असायची. घरगुती असणारी आणि घरातली कामे बिनभोबाट करणारी. ही कामे तर मुलींचीच होती फक्त! बाहेरचे विश्व असे काही नव्हतेच त्याकाळच्या मुलींना... चालीरीतींच्या नावाखाली, घरंदाजपणाच्या समजुतींपायी, सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक बंधनं!

तिचे सगळ्यात मोठे, मनात ठसठसणारे दु:ख म्हणजे सातवीनंतर तिची शाळा बंद केली हे होते. सगळ्याच बहिणींचे असेच थोडेफार. भाऊ शिकले. तिच्या वडिलांच्या मते, खेड्यात काय करायचे आहे खूप शिकून? शेवटी घरच ना सांभाळणार आहात?? तिच्या मताला काहीच किंम्मत दिली नाही, हे तिचे, एका मनस्वी स्त्री-मनाचे दु:ख, शेवटपर्यंत तसेच जिवंत राहिले... त्यामानाने तुम्ही मुली खूप खूप सुखी आहात, हे ती आम्हाला आवर्जून सांगायची. ते तर मान्यच. आज सगळ्या नाहीत तरी समाजातल्या बर्‍याच मुली हवे तसे शिक्षण घेऊ शकतात, त्यातल्याच थोड्या काही स्वतःच्या मनासारखी, स्वतःच्या निवडीची नोकरी/व्यवसायही करु शकतात. स्वतःला हवा तसा आयुष्याला आकार देऊ शकतात. काही भाग्यवान आभाळाएवढी आव्हानंही पेलतात. हे चित्र दिसत असतानाही, खरंच परिस्थिती किंवा अधिक योग्य शब्द वापरायचा झाला तर, समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललीय का?? निखळ झाली आहे का?

आजही, उच्च शिक्षण घेतलेले माझे काही सहकारी, घर सांभाळायला लग्न करायला हवं कारण घरातली कामं त्यांच्याच्याने जमत नाहीत म्हणतात! स्वयंपाक जमत नाही, भांडी घासायला, स्वतःचे कपडे धुणे इत्यादी कामे "बोअर" होतात म्हणे! यावर तर काही प्रतिक्रिया द्यायलाही मला सुचत नाही! तरीही त्यांच्याशी थोडाफार निष्फळ वाद मी घालतेच! सहचारिणीची जरुरी घरातली कामं करण्यासाठी आहे?

शेजारचं एक जोडपं त्यांच्या मुलाच्या शाळेवर खूपच नाराज असतं! कारण? मुलाला शाळेत साधं सोपं शिवण शिकवणार असतात! मुलाला काय करायचंय हे शिकून?? आता मुलगीच असती तर ठीक होतं एक वेळ! हे त्याची आजच्या जमान्यातली तथाकथित "आधुनिक" आई अत्यंत नाराजीने बोलते!! शिवण येण्याचा अन् मुलगा किंवा मुलगी असण्याचा संबंध काय आहे, हेच माझ्या लक्षात येत नाही! कधीतरी ह्या कौशल्याचा वापर हाच मुलगाही करु शकेल ना? स्वतःच्या शर्टाची तुटलेली बटनं तरी लावू शकेल? साधासा स्वयंपाक, जरुरीपुरतं शिवणकाम, घरात आणि आजूबाजूला लागणारी जुजबी दुरुस्ती, वाहनाची जुजबी दुरुस्ती करणे वगरे असली छोटी मोठी कामं, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो वा पुरुष, यायला नकोत का? शिवण, स्वयंपाक कामं मुलांची नाहीत आणि वाहन दुरुस्ती, घरातली छोटी मोठी दुरुस्तीसारखी कामं मुलीच्या जातीला कशी जमतील, असा काही नियम आहे कुठे?

आजीच्या काळात तर मुलींपेक्षा मुलांचे महत्व जास्त होते म्हणावे, लोकांच्या समजुतीही जुन्या होत्या म्हणावे तर आजही वैषम्य वाटण्याजोगी परिस्थिती आहेच! आजच्या जमान्यात देखील अडाणी, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित - कोणालाच मुलीचा गर्भ पाडण्याविषयी काही वाटत नाही... निदान डॉक्टर लोकांना असल्या कामात सहभागी होताना बाकी कसली नाही, निदान आपल्या पेशाचीही तरी लाज वाटावी?? तेही नाही! आजही कित्येक सुशिक्षित घरांतही मुलीपेक्षा मुलाचे करीअर हे महत्वाचे असते आणि योग्य वेळी मुली योग्य घरी पडू दे, हे बर्‍याच आईवडिलांचे उरी जपलेले आद्य स्वप्न असते! करीअर वगैरे होतच असते तिचे! हे सगळे बघताना वाटते, काय बदलले आहे?

आजीच्या जमान्यात आजी आणि तिच्या वयाच्या अनेकींना "मुलीची जात, बाईची जात" हा शब्दप्रयोग ऐकावा लागला, आणि आजही तो शब्दप्रयोग आम्ही, तुम्ही ऐकतोच आहोत. बर्‍याच घरांतून, आजचं, स्रीला मिळणारं स्वातंत्र्य हे एका ठराविक परिघातलं स्वातंत्र्य आहे. एक ठराविक परिघात घाल हवी तेवढी रिंगणं! पण खरंच निर्णयाची वेळ आली, की त्यागमूर्ती बनायचं ओझं पहिल्यांदा अजूनही स्त्रीच्या गळ्यातच पडतं, हेही खरच ना? लहान सहान गोष्टींत, आतल्या, बाहेरच्या जगात जरा परखडपणे डोकावून पाहिलं ना, की दरी अजून बर्‍यापैकी जैसे थे आहे हे जाणवतं, कधी कधी तर अजूनच रुंदावलेली. दुरुन पाहताना सगळं आलबेल आहे असं वाटत रहावं, पण जवळ गेल्यावर खड्डे अन् भोवरे कळावेत असं काहीसं!

आजी सांगे, तिच्या काळात मुलींना लहानपणापासूनच "मुलीच्या जातीने" कसे वागावे याचे धडे मिळत. वडिलधार्‍यांशी बोलताना कायम नजर खाली करुन बोलायचे, उलट उत्तर वा प्रश्न सोडाच, 'का?' हेही विचारायचे नाही, संयमाने उंबर्‍याच्या आत वावरायचे! घराचे घरपण जपायचे! आणि घरपण जपणारीचे मन कोणी जपायचे? आजच्या पिढीला हे असले सारे नियम पाळायला लागत नाहीत. आजीच्या पिढीला बाहेरच्या जगात वावरायला मिळालं नसेल पण आजही बर्‍याच घरांत परिस्थितीशी स्त्रीनेच आद्य कर्तव्य असल्यासारखं जुळवून घ्यायचं असतं आणि घराचं घरपण जपायचं असतं! प्रत्येकाच्या वेळापत्रकाशीही जुळवायचं असतं! आणि तरीही म्हणायचं की, घर दोघांचही असतं!

पूर्वीच्या पिढीच्या मानाने आजची स्त्री स्वतंत्र झाल्यासारखी भासत असली किंवा स्वतंत्र झालीही असली तरी त्या स्वातंत्र्याची किंमत म्हणून आज बाहेरच्या जगातलेही आणि घरातलेही कितीतरी ताणतणाव पदरी घेऊन जगणार्‍या स्त्रीच्या मनातला ठसठसणारा कोपरा अजूनही आजीच्या दु:खाशी जातकुळी सांगणाराच आहे हे जाणवतं... फक्त थोडीफार मापकं बदलली आहेत एवढंच!

******

हा लेख मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. हा अंक अतिशय देखणा झालाय! पाहिला नसाल, तर जरुर पहा. उपक्रम आणि मनोगत इथले दिवाळी अंक वाचून व्हायचे आहेत अजून.. तुम्ही वाचलेत का? कसे वाटले?

2 comments:

bhaskarkende said...

तुमची अनुदिनी आवडली बरं. आज ओझरतीच भेट दिली. सवडीने जुने लेखन वाचुन काढीन म्हणतो. असेच चांगले लिहित रहावे. शुभेच्छा!

यशोधरा said...

भास्कर केंडे, धन्यवाद. जरुर भेट द्या, वाचा अन् तुमचं मतही सांगा.