November 15, 2008

मम आत्मा गमला..१

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्‍यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.

अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत आमच्यावर मोठी माणसं, अजून काय?? :)

-क्रमशः

6 comments:

Nandan said...

Sheershak motha surekh nivaDala aahes. Ha bhaag chhan zala aahech, pudhchya bhaganchi vaaT pahto.

संवादिनी said...

very good..

Looking forward to the next one

Anand Sarolkar said...

Surekh suruvat jhali ahe! Pudhcha bhag patkan yeu de :)

Samved said...

खुपच मस्त यशोधरा. संस्कार असेच घडतात. खूप छान वाटलं वाचून

राज जैन said...

जबरा ॒
संस्कार असेच घडतात ! पण आम्ही संस्काराला घडवले त्याकाळी ;)
असो !
मस्त लिहले आहेस !

यशोधरा said...

@नंदन, लिहीते लवकरच. तू नेहमीच लिहायला प्रोत्साहन देतोस, थँक्स :)

@संवादिनी, बरं वाटलं तुला बर्‍याच दिवसांनी पाहून. तुझा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय मात्र दुर्दैवी! :(
त्या व्यक्तीला जे साध्य करायचं होतं, त्याला तू इतक्या सहजपणे बळी पडलीस यायच वाईट वाटलं, पण शेवटी तुझा निर्णय मान्य.

@ आनंद, धन्यवाद. लिहीन लवकरच.

@संवेद, खरय रे. माझ्या आयुष्यात आणि एकूणच आठव्णींत माझय आजी आजोबांना खूप महत्वाचं स्थान आहे. त्यांनी माझं लहानपण आणि एकूणच आयुष्य खूप श्रीमंत बनवलं. त्यांचयबद्दल बोलताना मी खूपच हळवी, आणि नॉस्टाल्जिक होऊन जाते, आणि त्या आठवणींत रमणं मला आवडतही.

@राजे, स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. लिखाण आवडल्याचे सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद.