April 27, 2008

मनात आलेले काही बाही....

एखादं पुस्तक वाचायला घेतलं की साधारण एक पान वाचायला ३ मिनिटं पुरत असतील?? कुठेतरी वाचलं होतं कधीतरी की तीन मिनिटांच्या कालावधीत साधारण ३०० माणसं मृत्यू पावतात अन साधारण त्याहून दुप्पटीने जरा जास्तच, महणजे साधारण ६२० ते ६५० नवीन बालकं जन्माला येतात.

ब्लॉगवर एक पोस्ट करायला साधारण ३० मिनिटं तरी लागत असतील ना? इथं आत्ता घरी बसून , समोरच्या लॅपटॉपवर पूर्णपणे तल्लीन होऊन ही पोस्ट बडवतेय. आजूबाजूला पुस्तकं पडली आहेत, गाण्यांच्या अन सिनेमांच्या सीड्या अन डीवीड्या पडल्या आहेत अन असाच थोडा थोडा माफक पसारा. थोडा फार पसारा असाच आयुष्यात पण, जो सध्ध्या आवरता येत नाही. तो तसाच असणार आहे काही काळासाठी तरी..... नंतर कधीतरी आपसूकच आवरला जाईल. असो.

आणि हे सगळं इथे सुरु असताना, बाहेरही नेहमीची जगरहाटी चालूच आहे, रस्ते माणसांनी अन वाहनांनी भरून ओसंडताहेत, जन्म, मृत्यू, सामान्य माणसांच्या आयुष्यातले नेहमीचे सोहळे, आनंदाचे क्षण, दु:खाचे कढ... सारं काही थोड्या फार फरकानं तसच. माझ्यासकट सगळे तथाकथित 'नॉर्मल' आयुष्य जगताहेत. वरच्या कुठे तरी वाचलेल्या जन्म मृत्यूच्या संख्या खर्‍या मानल्या तर, या अर्ध्या तासात कुठेतरी ३००० जीव मृत्यू पावलेत अन ६२०० ते ६५०० जीवांनी जन्म घेतलाय.या अर्ध्या तासात, काही घरांत मृत्यूच्या दर्शनानं वातावरण शोकाकूल झालं असेल, काही घरांत नवजन्माचा जल्लोष सुरु असेल, (जरासं विषयांतर, पण डोक्यात आलंच म्हणून, कदाचित काही घरांतून मुलाऐवजी मुलगी जन्माला आल्याचा एक नकळतसा बोचरा सलही जाणवत असेल. सुपर पॉवर व्हायचं असलं - किंवा अगदी झालोच आहोत तरीही -तरी आम्हाला मुलगी झाल्याचं अजूनही तेवढच वाईट वाटत, अगदी तथाकथित सुशिक्षित घरांतही!! जाऊदेत, हा एक वेगळाच विषय आहे.... ) कदाचित, यातल्या काहीजणांनी मृत्यूला सखा म्हणून हात पुढे केला असेल, कंटाळवाण्या आयुष्याला भोग म्हणून जगण्यापेक्षा एकच मृत्यू बरा, असही वाटल असेल कधी तरी. ज्यांचा जन्म झालाय, त्यांना तरी कुठे ठाऊक आहे पुढे काय काय घडणार आहे?? एका साधी आकडेवारी, अन ती सुद्धा कितीतरी कहाण्या सांगते, अश्रूंच्या, दु:खाच्या, आनंदाच्या क्षणांच्या, नाही??

त्यातही, पुन्हा, काहीजण या आकडेवारीचा भाग बनतही नसावेत..... एकाकी, निष्कांचन अवस्थेत जगून कधीतरी शांतपणे अन एकटेच कुठेतरी डोळे मिटण्याचं प्राक्तन घेऊन आलेले जीव. अनौरसपणाचा शिक्का कपाळावर घेऊन जन्मलेले आणि सोडून, टाकून दिले गेलेले जीव... पण जगरहाटी सुरुच आहे.

आणि मी, तुम्ही, आपण सगळेच, अगदी याच आकडेवारीचा एक हिस्सा. भूतकाळात कधीतरी जन्माच्या आकडेवारीचा हिस्सा अन पुढे भविष्यात कधी तरी मृत्यूच्या आकडेवारीचा हिस्सा!! जरी जीवनाचा प्रवाह वाहता असला आणि नैनं छिन्दन्ती शस्त्राणि, नैनं दहती पावक: , हे जरी खरं असेल तरी लौकिकार्थाने आपला या पृथ्वीवरचं निदान शारिरिक अस्तित्व संपणार, हे नक्की. पण, आपलं अस्तित्व अगदी अगदी क्षणभंगूर आहे, याची जाणीव असणं, बर असत.

एकूणच आपण मृत्यूविषयी खूप कमी विचार करतो, आयुष्य खूप गृहीत धरतो आपण. आयुष्यात अनेक नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो, कधी, कधी तर जरा अतिच!! नको त्या गोष्टींसाठी, खर्‍या खोट्या समजुतींपायी, मानापमानाच्या कल्पनांपायी आणि इगोपायी कितीतरी साधे, सरळ आणि सुंदर क्षण हातातून गमावतो. इतरांकडे बोटं दाखवतो, पण स्वतः कधीही बदलायचं मनातही आणत नाही!! खूप जगावेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटत असतात, पण जरा वेगळी वाट चोखाळायचं धाडस करायच की नाही, याबद्दल सांशकता असते. आपला आपल्यावरचा विश्वास डळमळतो...... संभाव्य धोक्यांना भिडण्याची ताकद खूप कमी जणांकडे. लहान मुलांसारख निर्भय, निर्व्याज जगण्याची कला तर आणखी कमी जणांकडे. आणि तरीही आपल्याला आयुष्याची एवढी नशा चढलेली असते, की आपण केवळा स्वतःचं आयुष्यच नाही तर आपल्या आजूबाजूच्यांनाही किती गृहीत धरतो!! आपल्या लोकांनाच नाही तर परक्यांनाही.....

थोडीशी मृत्यूची जाणीव मनात बाळगली तर इतकं बेदरकार वागू शकेल का कोणी?? किती तरी गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात अगदी रोजच्या जगण्यात, एखादा फोन कॉल, जो पलिकडल्या व्यक्तीला जाणवून देतो तुमच्या आयुष्यातलं त्या व्यक्तीच स्थान. एखादं दिलखुलास हास्य, कोणाला करायची राहून गेलेली निरपेक्ष मदत, तुम्हांला जोपासायचा असलेला एखादा छंद....

खरं तर आपल्याला कुठे ठाऊक असत की पुढचा क्षण तरी आपला आहे की नाही?? आणि प्रत्येक सुरुवातीला अंत हा असतोच म्हणतात, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कधी तरी पूर्णविराम हा ठरलेला, मग त्याला घाबरायच कशाला? उलट, थोडीशी त्या पूर्णविरामाची जाणीव ठेवली तर प्रत्येक जण थोडसं अधिक संवेदनशीलतेने वागेल का??

April 18, 2008

थँक्स मॅडम.....!!

मागचा शनिवार अगदी मस्तच उगवला!! शुक्रवारी रात्री राणीच्या देशातल्या हापिसमधून कोणी कोणताही सर्वर मोडला म्हणून फोन केला नाही, की हे सॉफ्टवेअर मोडलय, ते सॉफ्टवेअर चालत नाही म्हणून तक्रार केली नाही... सुखेनैव झोप झाली आणि दुपारी सगळे मायबोलीकर एकत्र भेटलो. खाणे, गप्पा यांत वेळ कसा निघून गेला काही कळलंदेखील नाही. मजा आली!

दोन - तीन तासांनी सगळ्यांनी आपापल्या घरी निघायचं ठरवल, तसं, मी आणि अजून एक मायबोलीकरीण, इतरांचा निरोप घेऊन, शॉपिंगसाठी सज्ज झालो!! दुसर्‍या दिवशी बॉसच्या लग्नाचं रिसेप्शन होतं आणि सगळी टीम जाऊन बॉसला अन त्याच्या झालेल्या बॉसला चेहरा दाखवून येणार होती अन मलाही सज्जड दम दिला होता की, बये ये तिथं!! बर नाही दिसत नाहीतर!! पुढच अप्रैजल हाच करणार आहे, माहिताय ना??? अरेच्या....!!! म्हणून काय झालं?? एकतर रविवारी संध्याकाळी कुठेतरी हजारो कोसांवरच्या ठिकाणी असले उच्छाव मांडायचे अन सगळ्यांनी त्याला जमायचं!! तर, मग आता ह्या उच्छावाला जायचं असल्याने, जरा शॉपिंग करणं क्रमप्राप्त होतं... इथे आल्यापासून ऑफ़िसला लागतील असे साधे रोजच्या वापरातलेच कपडे आहेत माझ्यापाशी, समारंभात घालता येतील अश्या कपड्यांची गरज होती, आणि शॉपिंगसारखं सुख कोणतं??

तर, मस्त शॉपिंग करून आम्ही रमत गमत निघालो. रस्ते वेगळे होताना एकमेकींना बाय केलं, शॉपिंगला मज्जा आली असं एकमेकींना सागून निरोप घेतला, अन घरी परतताना लक्षात आलं, की एक छोटीशी खरेदी राहिलीच!! एका मिनिटासाठी वाटलं जाऊदेत, खूप दमायला झालं होतं, पायही दुखत होते खूप... पण मग तेही पटेना मनाला. थोडक्यासाठी कंटाळा कशाला करायचा?? (हेच जर अभ्यासाची पुस्तकं वाचताना वाटलं असतं तर एखादी पी. एच. डी. तरी पडली असती हातात गेला बाजार!! हेहेहेहे!! असो.)

तर, पावलं वळलीच दुकानाकडे. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी. मला हवी असलेली खरेदी मी अक्षरश: आटोपली!! आणि नशीबाने ती आटोपलेली खरेदीही मनासारखी झाली, म्हणून बरच वाटलं. सगळा दिवस आत्तापर्यंत छानच गेला होता. असा दिवस क्वचित पदरात पडतो माझ्या!!

खुशीत दुकानाच्या दरवाज्यापाशी आले आणि मी दरवाजा उघडणार इतक्यात तिथेच दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मघाशी खरेदी करताना मी एकदा दोनदा ओझरतं पहिलं होतं त्यांना. तिथे दुकानातच काहीतरी खरेदी करायला आले असणार अशी नोंद माझ्या मनात ओझरती झाली होती, किंवा त्यांच कोणी, म्हणज़े पत्नी, मुलगी, किंवा तत्सम कोणी खरेदी करत असाव, आणि ते खरेदी संपायची वाट पाहत असावेत असा आपला माझा ग्रह झाला होता, आणि मनातल्या मनात ते या खरेदी प्रकरणाला कंटाळले असावेत, म्हणूनच असे कंटाळून एका बाजुला उभे असावेत असही वाटून हसू पण आलं होतं!! माझा बाबा नेहमीच माझ्या बरोबर किंवा आईबरोबर कुठेही बाहेर खरेदीला यायचं नेहमीच टाळत आलाय!! गृहस्थ तसे मध्यमवर्गीय वाटत होते, सभ्य, सुशिक्षित वाटत होते.

तर, जेह्वा मला दरवाज्यापाशी येताना पाहून त्यांनी दरवाजा उघडला, तेह्वाही मला काहीच लक्षात आलं नाही!! दरवाज्यापाशीच ते उभे आहेत अन एक त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांनी दरवाजा उघडून धरलाय असच वाटल मला!! शप्पत!! मी त्यांना धन्यवाद म्हणायला जाणार इतक्यात ते गृहस्थच म्हणाले, "थँक्स मॅडम, प्लीज कम अगेन.... "

......... म्हणजे?? मी दोन मिनिटं उडालेच!! आणि त्याहूनही मला मनाला लागला, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा टोन... इतका थकलेला, हरलेला आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तत्क्षणी भलतच अपराधी वाटायला लागल! प्रथम म्हणजे, डोअरपर्सन म्हणून कोणीतरी आपल्याहून वयाने मोठी अशी व्यक्ती उभी असणं आणि तिने आपल्यासाठी दरवाजा जाता येता उघडून धरणं अजून तरी माझ्या पचनी पडत नाही, बरं आत शिरताना, माझा मीच दरवाजा उघडून आत शिरले होते, त्यामुळे ते मला आधीच लक्षात आलं नव्हतं........ आणि आता माझ्या वडिलांच्या वयाचे हे गृहस्थ माझ्यासाठी दरवाजा उघडून उभे होते...!! अगदी कससंच झालं!! आत्तापर्यंत चढलेली शॉपिंगची धुंदी उतरली क्षणार्धात!!

त्यांच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर जरा हललंच आतमधे कुठे काहीतरी... ओढलेला, थकलेला चेहरा, पडलेले खांदे, चेहर्‍यावरचा खिन्न, विषण्ण आणि थकून हरल्याने येतो तसा एक अलिप्त, निर्विकार पण हार पत्करल्याचा भाव, आणि तो वैषम्याने भरलेला आवाज..... काय दु:ख असेल या काकांना, अस वाटल्यावाचून राहिलं नाही.

मनात प्रश्न उभे रहायला लागले एकामागोमाग....

या वयात हे असं दिवसभर उभं राहणं यांना जमत असेल का?? थकून जात असतील का? हो, नक्कीच.... काय कारण असेल बरं? वाईट परिस्थिती ओढवली असेल का घरी?? म्हणून मिळेल ती नोकरी पत्करावी लागली असेल का? या वयात योग्य अशी नोकरी मिळाली नसेल का? आयुष्यभर जबाबदारीने, नेकीने वागूनही आयुष्याचं विरत जाणंच सतत पाहणं तर नशीबात आलं असेल, ती अगतिकता, कुठेतरी मनानं पत्करलेली हार आवाजातून व्यक्त होत असेल का? कोणी पाहणारं नसेल का यांना अन यांच्या सहधर्मचारिणीला? का असूनही नसल्यात जमा झालं असेल?..... तेवढ्यात घरी गेल्यावर आई आणि बाबाशी फोनवर बोलायचं नक्की करुन टाकलं. तसही शनिवार, रविवार आणि आठवड्यातही माझे सतत फोन होतातच त्यांना, पण अजून एकदा....

का असं असेल? ऐन उमेदीत आयुष्य उधळलं असेल? जेह्वा, शक्य होतं तेह्वा बेदरकार वागून झालं असेल, अन शेवटी रिकाम्याच राहिलेल्या ओंजळीचा आता पश्चाताप होत असेल? पैलतीराची वाट चालताना आता आपणच आपली वाट कठीण बनवली आहे हे उमगून आणि आता वेळेचं घड्याळ मागे फिरवून आपली चूक दुरुस्त करु शकत नाही, हे लक्षात आल्याच वैफल्य असेल? अंगात रग असताना घरच्या, आपल्या लोकांना, हितचिंतकांना, मित्रांना कस्पटासमान वागवलं असेल आणि तेह्वा उमटवलेले ओरखडे इतके खोल असतील की आता ते पुसणं, अशक्य झालं असेल??

किंवा असं काहीच नसेल, बाकी सगळं ठीकच असेल अन फक्त तो दिवस खराब गेला असेल त्यांना? म्हणून मनातल्या मनात चिडचिडून वैतागल्या मूडमधे असतील त्याच दिवशी फक्त?

उगाच नुसते अर्थहीन प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि त्यापायीची वांझोटी खिन्नता....

दुसरा दिवस ठरल्यासारखा पार पडला, रिसेप्शनला पोचल्यावर मी खरेदी केली हे खूप चांगलं झालं ह्याचीही खात्री पटली, पण त्या दुकानातून बाहेर पडताना जी अस्वस्थता आली होती, ती मात्र मनातून जायला तयार नव्हती. उगाच अपराधी वाटत राहिलं.....

आता या सार्‍याला एक आठवडा उलटून गेलाय. अपराधीपणाची जाणीव बोथट होत चाललीच आहे शेवटी - त्याबद्दलही लाज वाटते मधूनच - पण अजूनही त्या गृहस्थांच्या शब्दांचा टोन आठवतो. आठवायचा अवकाश, की, अस्वस्थता एखाद्या लाटेसारखी परतून अंगावर येतेच!

कधीतरी परत त्या दुकानात शिरायचं धाडस करेन....

April 3, 2008

मी का लिहिते?

मी का लिहिते? ह्म्म्म्म... प्रांजळपणे सांगायच तर,माहीत नाही!! आत्तापर्यंत तरी माहीत नव्हतं असं वाटतंय - किंवा कदाचित कुठे तरी आत मनाच्या गाभार्‍यात ते उत्तर जाणवलंही असेल कधीतरी, तरी ते नेणीवेतून जाणीवेत आलेलं नाही - आणि कधी हे उत्तर शोधायचा जाणीवपूर्वक असा कधी प्रयत्नही केला नाही. आता करावा म्हणते...

खर तर संवादिनीने खो दिला, तेह्वा तिचाच लेख वाचला आधी अन एकदम एक दडपणच आलं मनावर!! इतक सुरेख लिहिलंय तिने अन मी काय लिहू आता असं वाटल!! पैठणीला पोतेर्‍याचं ठिगळ लावलं तर कसं वाटेल?? मग, त्यानंतर उत्सुकता स्वस्थ बसू देईना, म्हणून, आतापर्यंत सगळ्यांनी लिहिलेलं वाचलं अन मी खरं सांगायचं तर या खो मधून नाव काढून घ्यायचा विचार केला, मला हे असं इतकं ग्रेट लिहिता येत नाही.... पण, मग म्हटलं, एक प्रयत्न माझाही. कोणालाच नाही आवडलं समजा, तरी निदान आपल्याला तरी समजेल काहीतरी परत एकदा नवीन आपल्याविषयीच कदाचित.....

खर तर मुद्दाम असा कधी विचारच नाही केला यावर. जसा श्वास अत्यावश्यक, तसच लेखनही . वाचनही. कदाचित लिखाणातून स्वत:चा स्वत:शी चालणारा अखंड संवाद मला भावतो? किंवा, मी स्वत:च स्वत:ला उलगडते बहुधा... आत्ता इथे लिहायला बसलेय, का लिहावसं वाटत आणि खर सांगायच तर काय लिहू हा प्रश्नच पडलाय!! श्वास घेताना, मी हा प्रत्येक श्वास का घेतेय हा विचार तरी कुठे केला होता कधी??

माझं शब्दांवर प्रेम आहे, असोशी आहे मला त्यांची. आणि, मनात येणारे विचार, अनुभवलेल्या घटना, क्षण शब्दांत मांडताना समाधान मिळतं. लिहिताना मन शांत शांत होतं जात. बर्‍याचदा, असंही होतं की जे पाहिलं आहे, त्याचा, एखाद्या क्षणी जे लिहिते त्याच्याशी लेखालेखी संबंधही नसतो खर तर, पण कशावरून काहीतरी तिसरंच आठवतं!! मग जे वाटतय ते लिहिल्याशिवाय चैन नसतं जिवाला. मग लिहायचं, काय करणार? नाविलाज को कोई विलाज नहीं!!

हसाल आता, पण एक वेगळी वहीपण आहे माझी. इथे ब्लॉगवर मी मांडू इच्छित नाही किंवा कधीकधी धजावत नाही, ते मी वहीत उतरवते. अगदी आतलं, मनातलं. काही अनुभव आणि क्षण, अनुभूती फक्त स्वत:साठीच असतात ना? तर, फक्त माझी, माझ्यासाठीची अशी ती वही. बरचसं मनातलं असं मी त्या वहीत वेळोवेळी उतरवलय. यापुढेही उतरवणार आहे. जाणवलेलं सुख, अनुभवलेल्या वेदना, काही काही अतिशय वैयक्तिक असे क्षण, अनुभव, आठवणी, स्वत:च्या चुकांची कबुलीही, स्वप्नं... बरंच काही साठलंय त्या वहीत.

लिहिणं, तसं कोणाशी बोलण्यापेक्षा सोपं असतं, कारण, वही माझ्याविषयी कसलेही पूर्वग्रह बाळगत नाही, किंवा नवीन मतं तयार करत नाही. माझिया मनीचे, फक्त ती वही ज़ाणते. माझ्यासारख्या, मनातलं पटकन बोलून न दाखवू शकणारीला लिहिणं लहानपणापासूनच तुलनेनं सोप वाटलय, म्हणून मी लिहिते.

हे लिहिता लिहिता सांगावसं वाटलं म्हणून - शाळेतल्या एक शिक्षिका, मला लिहायला सतत प्रोत्साहन देत, त्यांना खूप आवडायच मी लिहिलेलं, अस त्या मला नेहमीच सांगायच्या. नंतर कॉलेजला गेल्यावर एकदा त्या मला भेटल्या अन मी कला शाखा निवडायच्या ऐवजी इंजिनीअरींगला गेले म्हणून खूप हळहळल्या! तुझं लिखाण थांबवू नकोस मात्र गं पोरी असं कळकळीने दहादा तरी म्हणाल्या, अर्थात त्यात त्यांच्या माझ्यावरच्या मायेचा भागच अधिक होता, पण त्या मायेचं माझ्यावर न संपणारं ऋण आहे, म्हणून मी लिहिते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि इतर कोणाशी नाहीच रहायला जमलं तरी स्वत:शी प्रामाणिक रहायला मी लिहिते. आणि काय सांगू?

संवादिनी, मनापासून आभार तुझे, तू मला खो दिलास म्हणून मला हे इतक्या जणांचं इतकं सुरेख लिखाण वाचायला मिळालं.

मी कोणाला खो देऊ? माझा खो सर्किटला.