October 29, 2008

ठसठसणारा कोपरा

माझ्या लहानपणी माझी आजी मला खूप गोष्टी सांगायची, गप्पा मारायची. गोष्टी म्हणजे फक्त चिऊ काऊच्या नव्हेत. अगदी लहानपणी त्याही सांगून झाल्या. पण जसजशी मी मोठी होत गेले, तशी आजी वडिलधारीपणाची भूमिका मागे टाकून हळूच मैत्रिणीच्या भूमिकेत कधी शिरली ते समजलंच नाही. समजावण्याचा आव न आणता कितीतरी गोष्टी तिने समजावल्या, सांगितल्या. नातवंडांच्या मनात हलकेच शिरण्याचं तिचं कसबही वादातीत होतं. तिच्या अनेक गोष्टी, मतं मला प्रसंगानुरुप आठवतच असतात, पण त्यातही तिच्यावेळी, तिच्या लहानपणी, ती मुलगी म्हणून तिला कितीतरी संधी मिळू शकल्याच नाहीत, याबद्दलची तिने बोलून दाखवलेली खंतही बर्‍याचदा टोचत राहते. लहानपणी वा वाढत्या वयात त्यामागचे तिचे दुखावलेले मन त्या तीव्रतेने कधी जाणवले नाही. तेवढे कळतही नव्हते, पण आता जरुर जाणवते.

तिच्या घरातले तिला अन् तिच्या बहिणींना लागू असणारे नियम आणि भावांना लागू असणारे नियम यात तफावत तर होतीच. खूप लक्षात येईल असा दुजाभाव नव्हता त्याकाळाच्या मानाने.. पण जो काही होता, तो होताच! मुलीच्या जातीला तेह्वा शिवण यायला हवे होते, स्वयंपाक तर अनिवार्य होता, घरकाम, विण़काम, कलाकुसर, पाटपाणी, घरातली साफसफाई, झाडलोट.. थोडक्यात काय, तर अगदी गृहकृत्यदक्ष मुलगी हवी असायची. घरगुती असणारी आणि घरातली कामे बिनभोबाट करणारी. ही कामे तर मुलींचीच होती फक्त! बाहेरचे विश्व असे काही नव्हतेच त्याकाळच्या मुलींना... चालीरीतींच्या नावाखाली, घरंदाजपणाच्या समजुतींपायी, सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक बंधनं!

तिचे सगळ्यात मोठे, मनात ठसठसणारे दु:ख म्हणजे सातवीनंतर तिची शाळा बंद केली हे होते. सगळ्याच बहिणींचे असेच थोडेफार. भाऊ शिकले. तिच्या वडिलांच्या मते, खेड्यात काय करायचे आहे खूप शिकून? शेवटी घरच ना सांभाळणार आहात?? तिच्या मताला काहीच किंम्मत दिली नाही, हे तिचे, एका मनस्वी स्त्री-मनाचे दु:ख, शेवटपर्यंत तसेच जिवंत राहिले... त्यामानाने तुम्ही मुली खूप खूप सुखी आहात, हे ती आम्हाला आवर्जून सांगायची. ते तर मान्यच. आज सगळ्या नाहीत तरी समाजातल्या बर्‍याच मुली हवे तसे शिक्षण घेऊ शकतात, त्यातल्याच थोड्या काही स्वतःच्या मनासारखी, स्वतःच्या निवडीची नोकरी/व्यवसायही करु शकतात. स्वतःला हवा तसा आयुष्याला आकार देऊ शकतात. काही भाग्यवान आभाळाएवढी आव्हानंही पेलतात. हे चित्र दिसत असतानाही, खरंच परिस्थिती किंवा अधिक योग्य शब्द वापरायचा झाला तर, समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललीय का?? निखळ झाली आहे का?

आजही, उच्च शिक्षण घेतलेले माझे काही सहकारी, घर सांभाळायला लग्न करायला हवं कारण घरातली कामं त्यांच्याच्याने जमत नाहीत म्हणतात! स्वयंपाक जमत नाही, भांडी घासायला, स्वतःचे कपडे धुणे इत्यादी कामे "बोअर" होतात म्हणे! यावर तर काही प्रतिक्रिया द्यायलाही मला सुचत नाही! तरीही त्यांच्याशी थोडाफार निष्फळ वाद मी घालतेच! सहचारिणीची जरुरी घरातली कामं करण्यासाठी आहे?

शेजारचं एक जोडपं त्यांच्या मुलाच्या शाळेवर खूपच नाराज असतं! कारण? मुलाला शाळेत साधं सोपं शिवण शिकवणार असतात! मुलाला काय करायचंय हे शिकून?? आता मुलगीच असती तर ठीक होतं एक वेळ! हे त्याची आजच्या जमान्यातली तथाकथित "आधुनिक" आई अत्यंत नाराजीने बोलते!! शिवण येण्याचा अन् मुलगा किंवा मुलगी असण्याचा संबंध काय आहे, हेच माझ्या लक्षात येत नाही! कधीतरी ह्या कौशल्याचा वापर हाच मुलगाही करु शकेल ना? स्वतःच्या शर्टाची तुटलेली बटनं तरी लावू शकेल? साधासा स्वयंपाक, जरुरीपुरतं शिवणकाम, घरात आणि आजूबाजूला लागणारी जुजबी दुरुस्ती, वाहनाची जुजबी दुरुस्ती करणे वगरे असली छोटी मोठी कामं, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो वा पुरुष, यायला नकोत का? शिवण, स्वयंपाक कामं मुलांची नाहीत आणि वाहन दुरुस्ती, घरातली छोटी मोठी दुरुस्तीसारखी कामं मुलीच्या जातीला कशी जमतील, असा काही नियम आहे कुठे?

आजीच्या काळात तर मुलींपेक्षा मुलांचे महत्व जास्त होते म्हणावे, लोकांच्या समजुतीही जुन्या होत्या म्हणावे तर आजही वैषम्य वाटण्याजोगी परिस्थिती आहेच! आजच्या जमान्यात देखील अडाणी, अर्धशिक्षित, उच्चशिक्षित - कोणालाच मुलीचा गर्भ पाडण्याविषयी काही वाटत नाही... निदान डॉक्टर लोकांना असल्या कामात सहभागी होताना बाकी कसली नाही, निदान आपल्या पेशाचीही तरी लाज वाटावी?? तेही नाही! आजही कित्येक सुशिक्षित घरांतही मुलीपेक्षा मुलाचे करीअर हे महत्वाचे असते आणि योग्य वेळी मुली योग्य घरी पडू दे, हे बर्‍याच आईवडिलांचे उरी जपलेले आद्य स्वप्न असते! करीअर वगैरे होतच असते तिचे! हे सगळे बघताना वाटते, काय बदलले आहे?

आजीच्या जमान्यात आजी आणि तिच्या वयाच्या अनेकींना "मुलीची जात, बाईची जात" हा शब्दप्रयोग ऐकावा लागला, आणि आजही तो शब्दप्रयोग आम्ही, तुम्ही ऐकतोच आहोत. बर्‍याच घरांतून, आजचं, स्रीला मिळणारं स्वातंत्र्य हे एका ठराविक परिघातलं स्वातंत्र्य आहे. एक ठराविक परिघात घाल हवी तेवढी रिंगणं! पण खरंच निर्णयाची वेळ आली, की त्यागमूर्ती बनायचं ओझं पहिल्यांदा अजूनही स्त्रीच्या गळ्यातच पडतं, हेही खरच ना? लहान सहान गोष्टींत, आतल्या, बाहेरच्या जगात जरा परखडपणे डोकावून पाहिलं ना, की दरी अजून बर्‍यापैकी जैसे थे आहे हे जाणवतं, कधी कधी तर अजूनच रुंदावलेली. दुरुन पाहताना सगळं आलबेल आहे असं वाटत रहावं, पण जवळ गेल्यावर खड्डे अन् भोवरे कळावेत असं काहीसं!

आजी सांगे, तिच्या काळात मुलींना लहानपणापासूनच "मुलीच्या जातीने" कसे वागावे याचे धडे मिळत. वडिलधार्‍यांशी बोलताना कायम नजर खाली करुन बोलायचे, उलट उत्तर वा प्रश्न सोडाच, 'का?' हेही विचारायचे नाही, संयमाने उंबर्‍याच्या आत वावरायचे! घराचे घरपण जपायचे! आणि घरपण जपणारीचे मन कोणी जपायचे? आजच्या पिढीला हे असले सारे नियम पाळायला लागत नाहीत. आजीच्या पिढीला बाहेरच्या जगात वावरायला मिळालं नसेल पण आजही बर्‍याच घरांत परिस्थितीशी स्त्रीनेच आद्य कर्तव्य असल्यासारखं जुळवून घ्यायचं असतं आणि घराचं घरपण जपायचं असतं! प्रत्येकाच्या वेळापत्रकाशीही जुळवायचं असतं! आणि तरीही म्हणायचं की, घर दोघांचही असतं!

पूर्वीच्या पिढीच्या मानाने आजची स्त्री स्वतंत्र झाल्यासारखी भासत असली किंवा स्वतंत्र झालीही असली तरी त्या स्वातंत्र्याची किंमत म्हणून आज बाहेरच्या जगातलेही आणि घरातलेही कितीतरी ताणतणाव पदरी घेऊन जगणार्‍या स्त्रीच्या मनातला ठसठसणारा कोपरा अजूनही आजीच्या दु:खाशी जातकुळी सांगणाराच आहे हे जाणवतं... फक्त थोडीफार मापकं बदलली आहेत एवढंच!

******

हा लेख मायबोलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. हा अंक अतिशय देखणा झालाय! पाहिला नसाल, तर जरुर पहा. उपक्रम आणि मनोगत इथले दिवाळी अंक वाचून व्हायचे आहेत अजून.. तुम्ही वाचलेत का? कसे वाटले?

October 21, 2008

गज़ल

मायबोलीतर्फे गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यशाळेत मी भाग घेतला होता. कार्यशाळेबद्दल इथे वाचता येईल.

असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही

मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही

जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही

October 18, 2008

फेरफटका

सही चाललेत काही काही ब्लॉग्ज!! आज बर्‍याच दिवसांनी काही काही ब्लॉग्जवर चक्कर टाकली! काही काही पोस्ट्स खूप मस्त वाटली, भन्नाट एकदम! मजा आली वाचायला! धन्यवाद लेखकू मंडळी! मनापासून धन्यवाद.

**

माझं स्वतःच पोस्टणं मात्र कमी झालय का? काय अडत नाही म्हणा त्याने.. वेळ नसतो, काम असतं वगैरे वगैरे नेहमीची कारणं, आळशीपणा हे अजून एक. पण, खरं सांगायचं तर, ब्लॉग सुरु केला होता, तेह्वा नव्या नवलाईचा उत्साह होता, तो आता तितकाही राहिलेला नाही खरा! डेंजरच झालंय की हे! अगोदरच्या एक जुन्या पोस्टमधे मीच ना ते म्हटलय, की मला शब्दांची असोशी आहे म्हणून?? मग, हे काय?? अर्थात, लग्गेच मनाने सांगून टाकलय की ती असोशी इतरांच्या चांगल्या पोस्ट्स वाचूनही पुरवता येतेच! सो, फिकर नॉट!.. ह्म्म, मी उद्गारवाचक चिन्हं खूप वापरते की काय?? असंच दिसतय एकूणात... की ही पण एक फेज म्हणायची?? की ब्लॉग आचके द्यायला लागायची सुरुवात झालेली आहे म्हणू?? नियतीच्या कालचक्रासारखं ब्लॉगचंही चक्र की काय? कधी कधी जरा वाईटच वाटतं.. ब्लॉगकडे जरा दुर्लक्षच होत आहे की काय असं वाटत, पण फारसं काही सांगण्यासारखं नसताना लिहायचं तरी काय? भलतच सरळसोट चाललय सगळ! असूदेत पण, सद्ध्या तेच बरय, डोक्याला ताप नाही!!

**

ऑफिसमधे एक कलिग नोकरी सोडून चाललाय , दुसरीकडे मस्तच संधी मिळतेय त्याला. इथे आमच्या टेक्निकल मॅनेजरची आणि डिलिवरी मॅनेजरची चांगलीच फाटलीये! ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता, ते टप्प होईल आता काही काळ तरी. सगळ्यात चिवित्र गोष्ट म्हणजे मॅनेजर येऊन मला सांगतोय, की मी त्याला जाऊ नकोस म्हणून समजवावं! कमाल आहे!! सहकारी आहे, चांगला मित्र आहे म्हणून लगेच काय मी त्याला जॉब सोडू नको असं ज्ञान देईन, असं का वाटत बुवा ह्या मॅनेजर्सना?? आणि हे मॅनेजर लोकांचं गणित मल तरी समजलेलं नाही! नोकरीत असेपर्यंत चांगल्या माणसाकडे, बर्‍यापैकी दुर्लक्ष करायचं आणि सोडून चाललं असं कोणी, की मग फुगड्या घालायच्या!! इतके वेगवेगळे फंडे वापरुन त्यांचा ह्या कलिगचं मन वळवायचा प्रयत्न चाललाय की काय!! कधी कधी खरच मजा वाटते. समजा, हा इथे थांबला, अन् हे प्रोजेक्ट संपलं आणि पुढे काही खास नसलं की ह्यची गरज भासेल, तर हेच प्रेम हे मॅनेजर्स पुढेही जोपासतील का?? येडे समजतात की काय हे लोकं आपल्या टीम मधल्या लोकांना??

**

मधे पुण्याला गेलेले असताना पुस्तकांच्या दुकानात शिरले होते तेह्वा तिथे आलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे ते दुकानवाले काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली होती!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक, असा विचारही केला होता, ते राहिलच की, एकदा वेळ काढून तब्येतीत टाकलं पाहिजे. आत्ता हे लिहिताना, ते संवाद आठवून हसायला येतय! एकदम खतरा आणि जिवंत संभाषण ऐकायला मिळालेलं त्यादिवशी!

**

परत एकदा ज्ञानोबामाऊलीचं पसायदान वाचलय आणि परत एकदा ह्या लोकविलक्षण माणसाच्या एकूणच मानसिक झेपेपुढे, उंचीपुढे मी नि:शब्द!! इतके हाल, त्रास आणि खडतर आयुष्य जगून, भोगून ही व्यक्ती सगळ्या प्राणिमात्रांसाठी, त्यांच्या अंतर्बाह्य भल्यासाठी साकडे घालते!! इतक्या लहान वयात इतकी ऋजुता कुठून येते मनात?? मनामध्ये जराही द्वेष नाही, कटुता, राग, आसक्ती नाही... किती विलक्षण! पण जिथे त्यांची अवस्थाच जर, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म'.. अश्या आत्म्याला कुठले आलेत राग लोभ?

काय बोलायचं पुढे...

October 6, 2008

रखडलेलं लिखाण

हे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...
(२६ सप्टेंबर २००८)

शेवटी आज मुहूर्त सापडलेला दिसतोय!! दिसतोय म्हणण्याचं कारण, म्हण़जे आजसुद्धा लिहून संपवेनच अशी काही खात्री वाटत नाहीये. बघूयात कसं काय जमतंय - कारण, पहिली ओळ लिहून बरेच दिवस तशीच ठेवलेली - पुढे काहीच नाही!! कधी कधी लिहायचं मनात असतं, विषयही घोळत असतो डोक्यात, पण हव्या तश्या शब्दांत मांडता येईल की नाही याची खात्री वाटली नाही, की मग लिहिण्यामधली मजा निघून गेल्यासारखी वाटते. मग ठप्प! म्हणजे काही गहन विषय मांडणार नसते - तसलं काही फारसं जमतच नाही म्हणा मला, पण साधं, सोपंही नेमकं मांडायला जमलं पाहिजे की! अणि अर्थात, आळशीपणाही आहेच. असो. तर, हे दोन अनुभव प्रवासात आलेले. त्रयस्थ दृष्टीतून पाहताना, बरंच काही शिकवून गेलेले. अनुभवही काही जगावेगळे, महान वगैरे नाहीत, पण अजूनही मनात घोळतात. कधीतरी मधेच आठवतात. इथे लिहावेसे वाटले म्हणून...
(२८ सप्टेंबर २००८)

मनाजोगतं जमत नाहीये असं वाटतंय, मग लिहायलाही अळंटळं, म्हणून तारखा!! किती दिवस लागणार दळण संपायला बघूयात, हा विचार त्यामागे!! :D :P

तर, पुण्याच्या लोहगाव विमानतळावर थांबले होते. नेहमीसारखंच विमान दिल्लीहून उशीरा सुटलं होत, उशीरा पुण्याच्या हवाई अड्ड्यावर पोचणार होतं आणि तिथून नेहमीसारखं उशीरा सुटणारही होतं. एव्हाना आता याची सवय झालेय, थोडंस अंगवळणीच पडलय म्हणाना, आणि मला यात विमान कंपन्यांचीही शंभर टक्के चूक असेल असं वाटत नाही. अर्थात, उद्या सगळा कारभार सुधारला, तर हवंच आहे म्हणा! पण अगदी खूप शिव्या देण्याइतकंही काही नाही हेही खरंच. विमानतळावर एखादी मागची कोपर्‍यातली खुर्ची पकडून, निवांत बसून एकूणच सगळा माहौल निरखण्यात खूप गंम्मत असते. पुन्हा सोबत एखादे आवडणारे पुस्तक असले तर मग कशाला कंटाळा येतोय!!

असो. मूळ मुद्दा सोडून अवांतरच जास्त लिहितेय. :P

तर, त्याही दिवशी अशीच बसले होते विमानतळावर विमान कधी सुटतंय याची वाट बघत. सुरक्षा तपासण्या वगैरेचे सोपस्कार संपले होते. कधी नाही ते गर्दीही नव्हती. अख्खा विमानतळच मस्त, शांत, निवांत वाटत होता. तितक्यात एक चार पाच वर्षांचं पिल्लू आपल्या आई आणि आज्जीसकट आलं. पिल्लाच्या चेहर्‍यावर प्रचंड उत्साह आणि उत्सुकता! एकदम हसरा चेहरा, इकडे तिकडे सगळीकडे भिरभिरणारी नजर. एकदम चैतन्याचा स्रोत! पेंगुळल्या, संथ अश्या त्या वातावरणात एकदम काहीशी जान आल्यासारखं झालं, पण आई आणि आज्जी एकदम परीटघडीची इस्त्री छाप!! चेहर्‍यावर आम्ही विमानातनं प्रवास करतो.. असे काहीसे भाव. माझ्या शेजारची एक खुर्ची सोडून बसले. सामान मधल्या खुर्चीवर. हे सामान वगैरे खुर्च्यांवर ठेवणारे लोक म्हणजे जरा अतिच असतात, असं माझं एकूणच निरिक्षणावरुन बनलेलं मत आहे. कधी कधी तर बसायलाही जागा नसते, आणि यांची सामानं बसायच्या जागांवर!! रेल्वे फलाटावरही हे नमुने दिसतील!! तर, मंडळी स्थानापन्न झाली.

पण, छोटुला भलताच गोडांबा होता! एकदम गट्टूकलाल!! सुरुवातीला अगदी छान्या, छान्या मुलासारखं हाताची घडी, तोंडावर बोट असं तिथल्या एका खुर्चीवर बसून झालं, पण तेह्वाही मान जितक्या अंशात फिरु शकते, तितक्या अंशात फिरवून सगळीकडंच निरिक्षण सुरुच होतं. पाचेक मिनिटांतच शहाणपणाचं ओझं पिल्लाला सांभाळणं जरा जडच व्हायला लागलं. हळूच तिरकी नजर आई आणि आज्जीकडे ठेवत खुर्चीतच चुळबुळायला सुरुवात झाली. हळूच खुर्चीतून खाली उडीपण घेऊन झाली! चेहर्‍यावर जरा तरतरीपण आली पिल्लाच्या!
(३ ऑक्टोबर २००८)

वाटलं होतं तसच झालं! काल तर लिहिलंच नाही काही.. तर, श्टोरी पुढे -

मग हळू हळू पिल्लू इकडे तिकडे बागडायला लागलं, गर्दी नसल्यामुळे बागडायला फुल टू स्कोप होता!! पण जसजसं पिल्लू खुलायला लागलं, तसतशी परीटघडीच्या इस्त्र्या नाराजीने विसकटायला लागल्या. मी मनात, आता पिल्लू ओरडा खातय वाटतं, म्हणेपर्यंत पिल्लूने ओरडा खाल्लाच!! ते एकवेळ ठीक आहे, पण इस्त्र्या एकदम इंग्लिशमधूनच सुरु!! आणि ओरडतानापण जी एक आपलेपणाची भावना असते ती काय कुठे दिसतच नव्हती!! म्हणजे पिल्लाला काय एकदम मिठीत घेऊन समजवा, असं म्हणत नाही मी, तसं करायलाही हरकत नव्हतीच खरं तर, पण हे भलतच कोरडं प्रकरण होतं, आणि ते जाम खटकलं. बरं, असाही काही भयानक उच्छाद मांडला नव्हता पिल्लानं, पण त्यातही गंम्मत म्हणजे आई, आज्जी इंग्लिशमधून शिस्त शिकवत होत्या, खरं तर त्याच्या माथी मारत होत्या, आणि पिल्लू शुद्ध मराठीमधून न थकता उत्तरं देत (उलट उत्तरं नव्हे!) त्यांच समाधान करत होतं, स्वतःची बाजू पटवून देत होतं. खूप कौतुक वाटलं मला. शेवटी इस्त्र्या थकल्या आणि गप्प बसल्या. पिल्लू परत एकदा खेळाकडे वळलं.

इतक्यात पिल्लूला एक दुसरं पिल्लू मिळालं खेळायला!! आपल्या आई बाबांबरोबर एक छोटुली गोबरुली आली होती. त्यांचंही विमान बहुधा उशीराच येणार होतं, आणि ही छोटूली एकदम सही होती, आल्या आल्या गट्टूकलालशी दोस्ती करुन इथे तिथे मस्त बागडंबागडीला सुरुवात. खूप धमाल आली त्यांची बागडंबागडी पहायला. इतके मस्त हसत होते खऴखळून! धावत होते, पडत होते, परत उठून नाचत होते! किती मनमोकळं वागत होते! मला चक्क त्या दोघांचा मनापासून हेवा वाटला. नेहमीचे उगीच अतिशय गंभीरपणे वावरणारे मोठया लोकांचे चेहरे पाहण्यापेक्षा हे खूप छान वाटत होतं. मनातल्या मनात मीही त्यांच्याबरोबर रिंगा रिंगा रोझेस... मधे भाग घेतला.

पण, मम्मीची कोरडी शिस्त जरा अतिच कोरडी असावी. तिने लगेच पिल्लूला मी आता डॅडला फोन लावून तुझी तक्रार करतेय, असे सांगितले. मला वाटले, असंच सांगतेय घाबरवायला, पण पिल्लूचा लगेच उतरलेला चेहरा, कावरीबावरी नजर आणि अगदी काकुळतीला येऊन केलेल्या "नक्को ना गं मम्मी.. " अश्या विनंत्या बघून हे खरंच आहे समजेपर्यंत मम्मी डॅडशी फोनवर बोलून अगदी गंभीर स्वरात - अर्थात इंग्लिशमधेच - तक्रार करत होती आणि डॅडने पिल्लूला फोनवर बोलावलं. खरं सांगायचं तर मलापण मम्मीचा एकदम राग आला होता!! बरं, आज्जीने तरी नातवाची जरा बाजू घ्यायची ना?? तेपण नाही!! तीपण इंग्लिश ओरडा देण्यात मग्न!! असली कसली आज्जी??? आता पलिकडून डॅड काय ओरडणार, याची धाकधूक मलाच वाटायला लागली...

"हॅलो डॅडू..." चाचरतच पिल्लू बोललं, आणि बघता बघता पिल्लाचा घाबरा, कोमेजला चेहरा परत फुलायला लागला की!! डॅडूला पिल्लू सगळ्या गंमती जमती सांगत होतं, अश्शी उडी मारली न् तश्शी उडी मारली न् धावलो मी मस्त...!! नवीन मैत्रीण मिळालीय, आणि ती आणि मी कशा उड्या मारुन ढुमाक्कन् (पिल्लूचाच शब्द! ) खालीच बसतोय, मज्जाच येतेय, आपणपण करुयात असं मी आलो की, हेही सांगून झालं!! माझ्या समोरच काही पावलांवर उभं राहून या गप्पा सुरु होत्या. माझी हळूच आईकडे - नव्हे, मम्मीकडे नजर वळली, तीच परीटघडी बघून किंचित खट्टूच व्हायला झालं. आज्जीच्या डोळ्यांत पण फारसं कौतुक दिसत नव्हतं... ये बात तो बिलकुल हजम नै हुई!!

पण, डॅडू आणि पिल्लूचं एकदम गुळपीठ दिसत होतं आणि सगळ्या गप्पा मराठीतूनच चालल्या होत्या. अगदी दिलखुलासपैकी. मस्त वाटलं, अगदी याsssहू करून ओरडावसं वाटलं!!! कोणीतरी पिल्लाशी त्याच्या भाषेत बोलणारं आणि त्याच्या बरोबर ढुमाक्कन् खाली बसणारं पण आहे तर! डॅडूशी गप्पा संपवून गट्टूकलाल परत एकदा खेळात गुंगले. त्याबद्दल अजून दोन तीनदा अस्सखल इंग्लिशमधून ओरडापण खाल्ला. एवढं त्या छोट्याला डांबायची काय गरज त्यांना वाटत होती, मला काहीच कळू शकलं नाही. ज्या छोटूलीबरोबर तो सुखाने खेळत होता, तिच्याशीदेखील त्यांच वागणं बरोबर नव्हतं, ते तर जामच खटकलं, तेवढयात तिच्या आई वडिलांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तिला बोलावून घेतलं. काही काही लोकांना दिलखुलास वागण्या बोलण्याचं वावडं असतं का?? इतक्या लहान मुलाच्या मनात मोठेपणाच्या इतक्या तद्दन फालतू अन् खोट्या कल्पना का भरवायच्या?? (त्यांचं आपल्या छोटूशी काय बोलणं सुरु होतं, आणि त्याला जे "समजावणं" सुरु होतं, ते मी ऐकू शकले होते, त्यावरुन हे विधान करतेय. )

तेवढ्यात माझी विमानात चढायची वेळ झाली. मनातल्या मनात छोटूला बेस्ट लक दिलं, मनात आलं, ह्याची हसरी वृत्ती कधीच नाहीशी होऊ नये... मला त्याच्याशी हातही मिळवायचा होता, पण मनातली उर्मी मनातच ठेवली, न जाणो त्याच्या मम्मी, आज्जीला आवडलं नाही तर, म्हणून.... छोटू कसा असेल, असं मनात येतंच कधी कधी अजूनही.

आणि बरोब्बर याउलट दुसरा अनुभव. बंगलोरच्या विमानतळावर बसले होते. अर्धा पाऊण तास वेळ काढायचा होता. एक आई आपल्या लेकीला घेऊन आली. तीन चार वर्षांची भावली एकदम चुणचुणीत होती!! माझ्या समोरच्या खुर्च्यांवर दोघी बसल्या. भावलीही इकडे तिकडे धावत होती. आईचं बरोबर लक्ष होतं, पण भावलीला मनसोक्त बागडायलाही आडकाठी केलेली दिसली नाही. उलट, आईही मुलीबरोबर हसत होती, बसल्या जागेवरुनच लेकीशी संवाद साधत होती, बघायलाही इतकं लोभसवाणं वाटत होतं! खेळून खेळून भावली दमली आणि आईच्या कुशीत शिरुन, तिच्या खांद्यावर मान ठेवून दोन मिनिटांत मस्तपैकी झोपून गेली. ज्याप्रकारे त्या आईने तिला कुशीत धरली होती, तिच्या केसांवरुन इतक्या मायेने हात फिरवत होती... तिची ती लेकीबद्दलची माया, आत्मियता अगदी माझ्यापर्यंत पोचली! एकदम एक उबदार भावना मनात उभी राहिली. ते दृश्य मनात साठवत, खूप समाधानानं मी विमानात चढायच्या रांगेत उभी राहिले. माझ्या त्या दिवसाची सुरुवात ह्या मायलेकींमुळे अगदी मस्त झाली होती!

अनुभव अगदी साधेच आहेत, त्यातून उपदेशपरही मला काही सांगायचं वगैरे नाही किंवा आपापल्या मुलांशी कोणी कसं वागावं ह्यासंबंधीही टीकाटिप्पणी करायची नाही! एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी ते अनुभव जसे घेतले, तेह्वा माझ्या मनात आलेल्या विचारांसकट, ते तुम्हां सर्वांना सांगावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, बाकी काही नाही! बरेच दिवसांपासून हे लिहायचं राहून गेलं होतं, खरं तर, लिहू की नको, असं लिहिणं बरोबर आहे की नाही, ह्याची स्वतःच्या मनाशी खात्री होत नव्हती. आज संपलं लिहून.
(६ ऑक्टोबर २००८)