January 15, 2010

कोकणसय२००९च्या वर्षांताला पुन्हा एकदा आजोळी जायचंच असं ठरवून, आणि नशीबाने त्यात काहीही अडथळे न येता, बर्‍याच वर्षांनी कोकणात पोहोचलो. गेल्यावर लगेच लक्षात आलं, की, अरे, कोकणही आता खूप बदललं.... बरचसं ओळखीचं खरं, पण थोडंसं अनोळखीही वाटायला लागलं.....

दर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, कोकणात आजोळी - पणजोळी जायची चैन कधीचीच सरली आहे. मे महिन्यातल्या ऐन दुपारी, विहिरीकाठच्या आंब्यांच्या सावलीत बसून, जिवाला शांतवणारा वारा अनुभवत, गप्पांमध्ये रमण्याचे आणि गावाकडच्या मैत्रिणींनी सांगितलेल्या भुतांच्या "लेटेश्ट" कहाण्या आणि थोडयाफार - निरुपद्रवी का होईना - चहाडया ऐकून फिदफिदण्याचे आणि क्वचित प्रसंगी आश्चर्यचकित होण्याचे दिवससुद्धा कुठल्या कुठे उडून गेलेत...... बघता बघता, ज्या मायेच्या माणसांसाठी तिथे जात होतो, त्यांच्या कुशीत बसून आणि शेजारी झोपून कथा कहाण्या ऐकवत होतो आणि ऐकत होतो, हक्काने कौतुकं करुन घेत होतो, ती माणसंही राहिलेली नाहीत. गावी जायचं मुख्य प्रयोजनच सरलेलं आहे.....

मला आठवतं तसं, माझ्या अगदी लहानपणी आजोळी वीजही पोहोचली नव्हती. जसजशी संध्याकाळ होऊ लागे, तसतसा अंधार हलके हलके अवघ्या आसमंतात पसरत जाई. बघता, बघता मिट्ट काळोखामध्ये सभोवताल हरवून जाई. आजी रोज सकाळी कंदीलांच्या काचा घासून पुसून स्वत: स्वच्छ करायची. संध्याकाळी ह्या कंदीलांच्या वाती ती उजळत असे. घराबाहेर काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असलं तरीही, घरातला कंदीलांचा उजेड मोठा आश्वासक असायचा. त्या मंद, स्निग्ध प्रकाशात आम्ही सर्व पोरंटोरं शुभं करोति कल्याणम् म्हणत असू...पाठोपाठ, देवघरामध्ये अखंड तेवणार्‍या समयीची तेलवात ठीक आहे ना हे पाहून आणि मग तुळशीपुढे दिवा लावून, आजी सुस्पष्ट आणि हळूवार स्वरा -लयीमध्ये तिची नेहमीची स्तोत्रं म्हणायला सुरुवात करायची....संध्याकाळचं असं चित्र, तर सकाळी भल्या पहाटे उठून देवापुढं, वास्तुपुरुषाच्या गडग्यापुढं आणि पुढील दारी, तुळशीपुढं सडासंमार्जन आणि छोटीशीच का होईना, रांगोळी चितारायचा तिचा नेम कधीच चुकला नाही. देवघरातल्या देवीला आणि शाळीग्रामांना सोवळ्याचा नैवेद्य असे. घरासभोवताल असलेली कुंपणावर फुलणारी जास्वंद, चाफी, तुळशी, एखाद दुसरं गुलाबाचं फूल, काकडयाची फुलं, अबोलीचे, बकुळीचे वळेसर ह्यांनी फुलांची परडी भरायची. भटजी येऊन पूजा करुन जात.

पिंगुळी येथील दत्त पादुकापूजेनंतर, चहा आणि रव्याचा लाडू खात, दोन चार सुख दु:खाच्या गप्पा करीत, आणि कुलाचार व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे देव देवता नेहमीच ह्या घराण्यावर प्रसन्न राहतील ह्याची ग्वाही देऊन संतुष्ट मनाने निघून जात. खरं तर पूजा सुरु असताना आम्हांला ती जवळून पहायची असे, पण, "चला, चला दूर रवात आणि लांबून काय ती पूजा बघा! समाजल्यात? हात जोडल्यात काय की नुसतीच धुमशानां घालतल्यात?" असं मधून मधून सोवळेपणाचा अधिकार गाजवत, पूजा करता करता, मध्येच मंत्रपठण थांबवून भटजीबुवा आम्हांला दटावत! मग, अश्या ह्या सोवळ्यातल्या भटजींना, बिन सोवळ्या व्यक्तीच्या हातचा चहा लाडू कसा काय चालतो, हा आम्हांला पडणारा प्रश्न असे, आणि त्यांच्या ह्या - आमच्या मते असलेल्या - डयांबिसपणावर, आतल्या सरपणाच्या, काळोखी खोलीत उभं राहून आम्ही खुसखुसत असू. वडिलधार्‍यांना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसे. अगोचरपणाबद्द्ल, कदाचित आम्हांलाच धपाटे पडण्याची शक्यता होती! तरीही एकदा आजीला मी हा प्रश्न विचारलाच होता..... मात्र पूजा करताना सोवळं ओवळं पाहणारे हेच भटजीबुवा मात्र जाताना आवर्जून "शाळा शिकतंस मां नीट? आवशीक त्रास नाय मां दिणस? खूप अभ्यास कर, बरां मोठ्ठा हो, हुशार हो, मोठा होवन आपल्या गावाक विसरां नको हां...समाजलय मां.. ?" असं मायाभरल्या आवाजात सांगून डोक्यावर मायेचा हात फिरवून जात.

ह्या वेळी देवघरात उभं राहून देव्हार्‍यात स्थानापन्न झालेल्या देवीला आणि शाळीग्रामांना हात जोडताना, पुन्हा एकदा हे सगळं आठवलंच. तेह्वा येणारे भटजीबुवा आता नाहीत, पण कोणी दुसरे भटजीबुवा येऊन पूजा करतात. त्यांचं फारसं, पूर्वीइतकं सोवळं नसावं बहुधा. तुळस मात्र अजूनही तशीच बहरते, सकाळच्या कोवळ्या उन्हांत तिच्या बाळमंजिर्‍या देखण्या दिसतात! तुळशीवृंदावनाभोवती चितारलेल्या देवांना पूर्वीप्रमाणेच हात जोडले जातात आणि त्यांच्या पायांशी रसरशीत जास्वंदी वाहिल्या जातात. हे सारं पाहताना, एवढया छोटया गोष्टींसाठी काय भाबडं समाधान वाटून घ्यायचं, हे घोकतानाच, मनात नकळत समाधान रुजलंच. भाबडेपणा तर भाबडेपणा! तो थोडाफार स्वभावात असण्याची चैन अजून परवडते, हेच नशीब!

सगळ्यांसारखंच शिक्षण, कॉलेज, नोकरी वगैरे शहरी जीवन मीही जगते, जे आता हाडीमांसी रुळून गेलं आहे. असं असलं ना, तरीही, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी, जराही न बदललेलं असं, फक्त माझं स्वत:चं असं, कोकणच्या आठवणींनी पालवलेलं एक विश्व आहे. ते कधीही बदलत नाही, त्याला चरे जात नाहीत, ते फिकुटत नाही की विस्मरणात जात नाही. कधी ना कधी, ह्या ना त्या निमित्ताने ते मला सामोरं येतच राहतं. कोकण मनातून बाहेर पडायला तयार नाही! ह्या वेळी, काही वर्षांनी पुन्हा कोकणात जाताना हे असं काहीबाही आठवत होतं....

कोकणात शिरताना आंबोलीतून शिरायचं. निपाणीपर्यंत सरळसोट महामार्ग आहे. महामार्गावर जात असता, निपाणीपाशीच, एके ठिकाणी आजर्‍याकडे जायला रस्ता वळतो. तो रस्ता धरायचा. आतापर्य़ंतचा महामार्ग संपून हा छोटासा रस्ता सुरु होतो. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे, पण जसंजसं आजरा मागे पडायला लागतं, तसतसं कोकणच्या खुणा दिसायला लागतात आणि एका वळणावर समोर येतो तो आंबोलीचा घाट! आंबोली सदासुंदर ठिकाण आहे. कधीही जा, न कंटाळण्याची हमी!

पूर्वेचा वस इथून दिसणारी आंबोलीआंबोली घाटात ’पूर्वेचा वस’ म्हणून एक देऊळ आहे, तिथेच देवळाशेजारी २-३ टपर्‍या आहेत, तिथला मस्त उकळलेला चहा आणि बटाटेवडे खाण्याचं भाग्य अजून तुम्हांला लाभलेलं नसेल, तर मी केवळ एवढंच म्हणू शकते, हाय कंबख्त, तूने...!!!! ह्याच टप्प्यावर जरा पुढे जाऊन थोडा वेळ उभं रहायचं आणि आंबोलीच्या दर्‍या डोंगरातून सुसाटणारा भन्नाट, वेगवान वारा अंगावर घ्यायचा! समोर दर्‍याखोर्‍यांडोंगरांचा आणि वनराजीचा एवढा विस्तीर्ण पसारा पसरलेला असतो... वळणावळणाची वाट पुढे पुढे जात असते.

आंबोलीचं अ़जून एक दृश्यआपलं रांगडं, सभोवताल वेढून राहिलेलं देखणेपण आणि त्यापुढे आपला नगण्यपणा अतिशय सहजपणॆ निसर्ग एकाच वेळी आपल्या पदरात घालतो..... सलामीलाच असं चहू बाजूंनी कोकण तुम्हांला रोखठॊक सामोरं येतं, जसं आहे तसं. फुकाचा बडेजाव नाही, की उसनी आणलेली दिखाऊपणाची ऐट नाही. इथे जे काही आहे ते साधं, सहज आणि म्हणूनच सुंदर आहे. अगदी दगडी पाय़र्‍यांच्या खाचेमध्ये उमललेलं एखादं रानफूलसुद्धा!

जाईन विचारीत रानफुला...!आणि आंबोलीचा घाट उतरला की ह्या देवभूमीत प्रवेश होतो. आणि ही भूमीही अशी, की, सहज चित्त जाय तिथे, अवचित सौंदर्यठसा!

ह्या भूमीचं स्वत:चं असं एक, अनेक घटकांनी बनलेलं अजब रसायन आहे. स्वत:चे कायदेकानून आहेत, अंगभूत अशी एक मस्ती आहे. इथल्या विश्वाला स्वत:ची अशी एक लय आहे, तंद्री आहे. इथला निसर्गही आखीव रेखीव नाही, त्याची रुपं ह्या भूमीवर यत्र, तत्र सर्वत्र उधळलेली आहेत. हे विश्वच वेगळं. इथले लाल मातीचे रस्ते, घरांच्या कुंपणांवरल्या जास्वंदी, माडां पोफळ्यांच्या बागा, आमराया, मागील दारी लावलेली, घरची आंब्या फणसांची झाडं, एखाद दुसरी सोनकेळ, तिच्या पानांमधून डोकावणारं सुरेखसं केळफूल, क्वचित बागेच्या एका कोपर्‍यातला निरफणस ह्यां सगळ्यांमधून डोकावणारी कौलारु घरं... सगळं कसं एखाद्या चित्रात शोभून दिसेल असं.

सावंतवाडीच्या मोती तलावाचे वेगवेगळे मूड्ससावंतवाडीचा मोती तलावमोती तलावात कधीकाळी मोती सापडले होते म्हणे, म्हणून तलावाचं नाव मोती तलाव.कोकणात टिपलेली काही दृश्येयादी इथे संपत मात्र नाही. इथले वाहणारे व्हाळ, पाणंद्या, शांत, सुंदर, साधीच असली तरी शुचिर्भूत वाटणारी देवालयं, दर्शनाला येणार्‍या प्रत्येकाच्या कथा व्यथा मनापासून ऐकणार्‍या आणि केलेल्या नवसांना पावणार्‍या नीटस सजलेल्या देवता, तरंग, देवळांसमोरच्या दीपमाळा, जिवंत झरे पोटात घेऊन कडक उन्हाळ्यातही नितळ पाण्याने झुळझुळणार्‍या आणि पंचक्रोशीची वा येणार्‍या जाणार्‍या कोणाही तहानलेल्याची तहान भागवणार्‍या बावी, तीमधे सुखाने नांदणारी कासवं आणि बेडूक, आणि त्यांच्या अवतीभोवती ओलसर वातावरणात उगवलेली नेची आणि मखमली शेवाळी, रस्त्यांच्या, शेतांच्या काठाकाठानं पसरत उमललेली लाजाळू, दोन गावांना जोडणारी मेटं, लहान मोठे धबधबे, कोणा भाग्यवंताच्या घरी असलेली गुरं, त्यांच्या गळ्यांतल्या लयीत वाजणार्‍या घंटा, ओवळीची झाडं, भातशेती, एखाद्या टिकलीएवढ्या छोट्याश्या गावातलं कमळांनी फुललेलं तळं, काजूंच्या झाडांचे कोवळे लसलसते सोनेरी कोंब, रायवळांचे आणि हापूस पायर्‍यांचे गंध, फणस गर्‍यांचे दरवळ, रानमेवा.... काय आणि किती... लहानपणापासून जरी हे सगळं पाहिलेलं असलं तरी अजूनही ह्या वातावरणाची मोहिनी माझ्या मनावरुन उतरायला तयार नाही. इथल्या भुतांखेतांच्या गप्पांसकट हे सगळं माझ्या मनात कायमचं वस्तीला आलेलं आहे.

वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराशेजारचं निळंशार तळंलक्ष्मीनारायण मंदिरासमोरचे दीपस्तंभपाट - परुळेपैकी पाट गावात असलेलं भगवती मंदिराशेजारचं कमळांनी भरलेलं तळंआणि कोकणातल्या समुद्रकिनार्‍यांबाबत तर किती सांगायचं? तिथल्या निर्मनुष्य किनार्‍यांवरुन, मऊ रेतीत पावलं रोवत फिरायचं असतं, छोटे खेकडे वाळूवर तिरप्या रेषा काढत धावताना बघायचं, किनार्‍यालगतच्या माडांची सळसळ अनुभवयाची आणि समुद्राची गाज ऐकताना ’या हो दर्याचा दरारा मोठा’ हेही जाणून घ्यायचं... शांत वातावरणात, त्याच वातावरणाचा भाग होऊन कायमचं, निदान काही तास तरी निवांतपणे बसून रहायचा मोह होतो. हळूहळू समुद्र आपला जीव शांतवून, सुखावून टाकतो. काही वेळासाठी का होईना, सगळ्या चिंता, विवंचना विसरुन जायला होतं. पाठीमागे माडाचं बन, समोर अथांग समुद्र आणि माथ्यावर निळं आभाळ. एखादी होडी हे चित्र अधिक सुंदर बनवेल वाटेपर्य़ंत तीही नजरेला पडते! दर्या त्यादिवशी माझ्यावर बहुधा एकदम मेहेरबान असतो! दिवस सार्थकी लागतो!


निळी निळी सुरेल लाट, रत्नचूर सांडतो, फुटून फेस मोकळा नवीन साज मांडतो.....
भोगवेचा किनारा
वेंगुर्ले खाडीभोगवेचा किनारालांबून दिसणारा भोगवेचा सागरनजाराअशी ही देवभूमी. इथे पावलांपावलांवर सौंदर्य आहे, वातावरणात जिवंतपणा आहे आणि ह्या सर्वांपेक्षाही लोभस, जिवंत आहेत ती इथली माणसं. बर्‍या वा वाईट, अनुकूल असो की प्रतिकूल असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं माणूसपण न सोडता जगणारी, जिभेवर काटे असले तरी पोटात मात्र निव्वळ माया असलेली माणसं. मायेच्या आतल्या उमाळ्याची आणि फक्त ओठांतूनच नाही, तर डोळ्यांतूनही मनापासून हसणारी, आणि तसंच आपले राग लोभही ठामपणे बोलून दाखवणारी माणसं. त्यांच्यापाशी शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आहे. कष्टांना भिऊन एखाद्या कामापासून मागं सरणं त्यांना ठाऊक नाही, आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्यात दानत आहे. वेळी अवेळी दारात आलेल्या अतिथीचंही इथे मनापासून स्वागत होतं आणि पाहुण्यासारखं घरादारानं वागावं ही अपेक्षा न ठेवता, घरादारासारखं, त्यांच्यापैकीच एक बनून वागलात, तर कोकणातलं घर तुम्हांला कायमचं आपलसं करुन घेतं! कोणाची आर्थिक पत किंवा मोठेपणा ह्यांनी भारावून वा बुजून जाऊन किंवा त्या बाबींच्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्यक्तीकडून किती फायदा होऊ शकतो, असा हिशेबी विचार करुन तोंडदेखलं का होईना पण आदरार्थी वगैरे वागायची इथे पद्धतच नाही. बाहेरच्या जगात असणारा एखादा शेठ वगैरे, त्याच्या गावात, शेजारी पाजारी आणि पंचक्रोशीत प्रथमपुरुषी एकवचनी संबोधनानेच ओळखला जातो, अन त्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. इथलं कष्टमय आयुष्य हसतमुखानं उपसताना, परिस्थितीच्या शाळेत, अनेक अडचणींचा सामना करत इथल्या जुन्या पिढ्यांनी आयुष्यविषयक आडाखे, मतं स्वत: तयार केलेली आहेत आणि अनुभवांतून शहाणपण शिकलेलं आहे. भलेही त्यांच्याकडे उच्च शिक्षण नसेल - बर्‍याचजणांनी तर शाळेनंतर महाविद्यालयाची पायरीही चढलेली नसेल, पण त्यांचं शहाणपण कोणाहूनही कमी नाही.

हिरवे हिरवे गार गालिचे!कोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी!शेतचित्रंआता नवी पिढी बाहेरच्या जगातले बदल पाहून त्यानुसार बदलते आहे आणि आपापल्या गावांमध्येही सुबत्ता आणू पहाते आहे, जागरुक बनते आहे, शिकते आहे, त्याचंही कौतुकच वाटत. एके काळी बहुतांशी अठरा विश्वे दारिद्र्य नांदणार्‍या ह्या कोकणात आता बर्‍यापैकी सुबत्ता नांदताना दिसते. कोकणातलं दारिद्र्य असंच दूर होत रहावं, तिथे चारी ठाव सुबत्ता नांदावी, मात्र, ह्या कोकण प्रांताची कोकणी ओळख मात्र अजिबात हरवू नये ही इच्छा मनात धरून देवघरातल्या देवाला हात जोडत त्याचा आणि आजोळचा निरोप घेतला.

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले...वेळ थोडा राहिलेला, सूर सारे संपले, या असीमाला तरीही पाहिजे ना मापले?
वाहत्या पाण्यातूनी गुंफीत जावे साखळी, एक नाते मी तसे शोधीत आहे आपले!
निघायच्या आदल्या दिवशी लाडक्या तळ्यावर जाऊन खूप वेळ बसले. लहानपणी खेळायचो तो पाण्यात चपट्या टिकर्‍या फेकण्य़ाचा खेळ मनसोक्त खेळून घेतला. बाजूला तीन, चार छोटी मुलं आपलं हसू लपवत कुजबुजत होती, त्यांनाही खेळात सामील करुन घेतलं आणि मग एकदमच धमाल आली खेळायला! सूर्यास्त झाला, रात्र होत आली, तसं शेवटी तळ्यावरुन उठून घरची वाट पकडली. आठवड्याची सुट्टी संपल्याचं प्रकर्षाने जाणवलं....

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शहराकडे गाडी दामटली.

समाप्त.

12 comments:

Pravin said...

Simply Amazing.. Photos khupch bhari aahet..!!

Mee Kokan madhala nahi pan tithe baryach velala phirayala gelo aahe.. mazi atantya aavadichi jaga manje Kokan.. Tyat mala ratri samuracha aawaz ikyala khup aavadato.. jar maase pkdyala ratri lok gele astil sumdrat tar.. aawaza barobar kahi rangeet tipake distat haltana samudra madhe.. kharach amazing aanand milato thevha..!!

Aani maze ek swapna aahe .. lavkar retire houn ek chote ghar ghyache konkona madhe.. ghar chotech pahije.. pathimage wadi.. naral suparichi zade.. choti paayvaat ani tee samplyavar samor nirmanushya samudhra.. tithe ekhade mast pushak vachat nivant basache..

Kadhi Purna honar mahit nahi.. baghu..!!

Anyways.. khupach chan zali aahe post..!!

~ Pravin

NJ said...

The photos are really cool. Faar chaan lekh aahe.

Deep said...

khaasam khaas photo aahet :D:D

मुर्खानंद said...

सुंदर... फोटो तर लय भारी...

Jaswandi said...

awesome! awesome.. awesome...

aga he bharee ahe.. photos.. anubhav.. tujhi style... sahich!!!

HAREKRISHNAJI said...

पंख असायला हवे होते.

सखी said...

यशो,कोकणचा साधेपणा नुसता फोटोतच नाही तर तुझ्या शैलीतही उतरलाय. खूप मस्त!!!

यशोधरा said...

बरेच दिवस इथे आले नव्हते, लेख व फोटो आवडले हे सांगितल्याबद्दल सार्‍यांचे खूप आभार! :)

a Sane man said...

aajach pahila he....mast! tya shevatachya photo aadhichya oLi kunachya aahet?

यशोधरा said...

@ a Sane man - शांता शेळके, आणि तुमचा ब्लॉग आता केवळ निमंत्रितांसाठी का? :P

a Sane man said...

Oh..nahi nahi...I probably used different gmail id to comment...blog sataaD ughaDa aahe :-)

यशोधरा said...

ok, good :)