
स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली.
रस्त्यावरुन एका जुन्या रथातून बसून कोणी साधूबाबा, कोण्यातरी बिनमहत्वाच्या पिठाचे स्वामी मिरवणूकीने चालले होते. बिनमहत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे गाठीशी पैसा नसलेले असावे. गर्दी नव्हती त्यावरुन अंदाज. समोर आणि मागे मिळून चार शिष्य. सगळ्यांनी भगवी, लाल धोतरे नेसलेली. गंधाचे, भस्माचे पट्टे. शेंड्या. समोर एक सनईवाला, एक ताशेवाला. इतकेच लोक. हसूही आले आणि अचंबामिश्रित कौतुकही वाटले. बरोबर गर्दी नव्हती, मग कसं काय मी असं बसू रथात? लोक हसतील का? वगैरे स्वामीजींना काही वाटले नव्हते बहुतेक. शिष्यही चामरे ढाळत होते, त्याच भक्तीभावाने. निदान कर्तव्यभावनेने. प्रत्येकजण आपले कर्तव्य, धर्म पाळत होते का? हीच का निष्ठा असते? अशीच? हे उगाच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणार्यांपैकी होते की खरेच भगवंतापाशी, वा जिथे कुठे स्वतःच्या श्रद्धा वाहिलेल्या होत्या, तिथे मनापासून विश्वास टाकून आपले कर्तव्य पार पाडणारे सत्शील जीव होते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले... माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे..
मला मात्र ह्यापैकी काहीच जमले नसते, जमणारही नाही बहुधा.. कितीतरी वेळा, कितीतरी कारणांनी लाज वाटली असती, ऑकवर्ड झाले असते. अशी निष्ठा अंगी बाणवू शकेन तो सुदिन. कधीतरी जमावे, ही इच्छा. आता इथून गंगामाई आणि तिचे हरिद्वार, पुढे हृषिकेश, कधीतरी भेटणार आहे तो हिमालय, एकूणातच एकामागून एक धडे द्यायला सुरुवात करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी बांधायला सुरुवात केली. घेता, किती घेशील दो करांनी.. सनईचे सूर फार फार मोहवून गेले. शांत, गंभीर असे सूर. कधीतरी मरहूम उस्ताद बिस्मिल्लां खाँ, त्यांची सनई आणि त्यांची अलाहाबादची गंगामैय्या ह्यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती, त्याची फार फार आठवण झाली. उगाच भरुन यायला लागले. आत्ताशी अजून दर्शन होणार आहे, तर ही गत? एवढ्यातच दिल गिरा वहींपे दफ्फतन होऊन कसे चालेल?
अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा.
नेहमीच्या गार वार्यात आणि पाण्यावरुन वाहत येणार्या गार वार्यात एक फरक असतो नेहमी, म्हणजे असं आपलं माझं मत. ठाम वगैरे कॅटेगरीतलं.नेहमीचा गार वारा जरासा कोरडासा. म्हणजे तुमचा जीव सुखावून देईल, पण एका अलिप्तपणे. तुमच्याभोवती रेंगाळणार नाही, तुमच्यात स्वतःला गुंतवून घेणार नाही. तुमच्या अंगावरुन म्हणता म्हणता पुढे निघून जाईल. एखाद्या बैराग्यासारखा. अडकणार नाही, आठवणी ठेवणार नाही. त्याउलट पाण्यावरुन वाहत येणारा वारा. त्याची जातकुळीच वेगळी आहे लोकहो. हा केवळ सुखावणारा वारा नसतो, हा शांतवणारा वारा. तुमच्याभोवती मायेने रेंगाळणारा, एखाद्या खर्याखुर्या दोस्ताप्रमाणे हलके हलके तुमच्या मनात शिरणारा. तुमच्याही नकळत तुमच्या मनातली खळबळ म्हणा, चिंता म्हणा, तत्समच जे काही असते, ते सारे, सारे दूर करणारा. जिवाला विसावा देणारा वारा. कोरडेपणाचा मागमूस नसलेला. असा वारा अनुभवल्याबरोब्बर पाणी कुठे आहे, हे नजरेने शोधायला सुरुवात केली. एक फार मोठाही नाही पण अगदीच नगण्यही नाही, असा कालवा सामोरा आला. मनात आले, ही गंगा? अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? नक्कीच नाही. ती तर जगन्नाथ पंडितांची गंगामाई आहे. त्यांनी भोगलेल्या सार्या तापत्रयातून त्यांना सोडवणारी. आपल्या अमर्याद मायेची फुंकर त्यांच्या श्रांत, क्लांत मनावर हळूवारपणे घालणारी.. भोळ्या सांबाने पार्वतीचा प्रसंगी कोप सहन करत मस्तकी धारण केलेली गंगा. कोण्या भगिरथाच्या पूर्वजांना उद्धरणारी गंगा. आजही जनमानसाच्या श्रद्धेचे स्थान असलेली गंगामैय्या. ह्या सर्वात मला व्यक्तिश: सगळ्यात भावलेली आहे ती तिची स्वतःच्या सामर्थ्याची असणारी पूर्ण जाण. ती लेचीपेची नाही. तिला स्वतःचे अस्तित्व आहे, त्याची बूज राखणारी. इतरांनीही ती राखावी ह्यासाठी ती सजगही आहे. तिच्यापाशी जे आहे त्यात जराही हिणकस नाही, तर तिने इतरांकडून तरी हिणकस का स्वीकारावे? पुराणे लाख म्हणतात की तिचा गर्व शंकराने हरण केला वगैरे, पण तसे नसावे ते. त्याने तिला जाणले आणि तिचे योग्य स्थान दिले असावे, यथोचित सन्मान केला असावा. तीही तिच्या शब्दाला जागून युगानुयुगे अव्याहत वाहते आहे... पण अजून दर्शन दिले नाही माईने.
मला वाटते, कोणीतरी अत्यंत अविश्वासाच्या आणि धक्का बसल्याच्या सुरात म्हणाले पण! ही गंगा? की माझ्याच डोक्यात माझ्याच मनातले शब्द ऐकू आले होते? कोणास ठाऊक. पण ही गंगा नाहीये, असेही कळाले. हुश्श.. गंगेला बघायला डोळे अणि मन आसुसल्यासारखे झाले होते. कधी दिसेल माई? आत्ता? आत्ता? की अजून थोडे पुढे गेल्यावर? डोळे भरुन बघता येईल का? किती वाचले आहे आणि किती ऐकले होते आजवर तिच्याबद्दल! खूप अपेक्षा, दडपण, आशा वगैरे अशांसारख्या आणि नेमक्या कसल्या ते अजूनही न उमगलेल्या भावना मनात बाळगून मी गंगेची वाट पहात होते आणि एक पूल लागला भला मोठा. गंगेवरचा पूल. मिट्ट काळोखाचा रंग मैय्याने पांघरुन घेतला होता. काहीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होता, संथसा. चुबळुक, चुबळूक.. किंवा पलक्, पलक् असा. की लपक्, लपक्? पलक् की लपक् हेच ठरवता येईना. राम की मरा - तसा गोंधळ. शेवटी लक्षात आले की पलक् असो की लपक्, फरक नै पेंदा. पलक लपकतेही सबके मनमें घर बसा लेती हैं माई. उसके बाद भूलना नामुमकीन. आयुष्यभरासाठीची ओढ. तीच मैया, तीच सखी, तिचाच आधार.
अंधारामध्ये नदीला घाट बांधला आहे, हे जाणवले, दगडी सुबकसा, विस्तीर्ण घाट. मनात आले, तिथेच पथारी पसरावी. माईच्या सोबतीने तिथेच शांतपणे झोपून जावे. कोणाची भीती? माई काळजी घेईल. नक्कीच.
क्रमश: