September 20, 2011

प्रवासाच्या सुरस कथा- २

दिल्लीवाल्या कलीगने सांगितलेलं की ठेशनावर उतरुन बावळटासारखी इथे तिथे बघू नकोस. चेहर्‍यावर एक माज, बेदरकारपणा आणून वावर. जमेल का? थोडी इथेच प्रॅक्टीस कर, वगैरे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की इतरांकडे तुच्छ कटाक्ष टाकत वावरायचं. काय कॉन्फिडन्स! कलीगचा हो, माझ्याविषयी! म्हंजे मला झेपणार नाही, हा. अधिक स्पष्ट बोलायचे तर, मी बावळट(च) वाटेन, हा. पण इतकी काय मी अगदीच हे नाहीय्ये हां. त्याला काय बोलायला! अल्पनानेही प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षा करायचा सल्ला दिला होताच. कलीगनेही. तर ह्या सर्वांचा सल्ला शिरोधार्य मानून सरळ बाहेर पडले तुच्छ कटाक्ष वगैरे टाकत, तिथलीच असल्यासारखी, स्वातीला सोबत घेऊन. तरी आमचा नवखेपणा रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना कसा काय उमजला त्यांनाच ठाऊक, आणि प्रत्येक गावा, शहरात असं कसं घडतं, हेही मला आजतागायत समजलेलं नाही, म्हणजे माझ्याच असं नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत. अशा बर्‍याच कथा कहाण्या ऐकल्या आहेत. तुच्छ कटाक्ष पुरेश्या तुच्छपणे टाकायचे राहिले असावेत.

मधमाशांचा थवा यावा तसे सगळे आपले भेनजी, किदर जाना हय वगैरे करत आले. स्वाती सगळ्यांना काय काय उत्तरं देत होती. मी थक्क! अगं चल, म्हणत तिलाही प्रीपेड बूथवर घेऊन आले. तिथेही टॅक्सी आणि रि़क्षावाल्यांचा इतका माज, वैताग होता, खरंच. इतक्या मोठ्या थव्याने सभोवताली गर्दी केली की मला बूथपरेंतही जाता येईना! आत काउंटरवर बसलेला माणूस बाहेर येऊन सक्काळी सक्काळी सगळ्यांना खास दिल्लीवाल्या शिव्या घालून पुन्हा आत बसायला गेला. दोन गोष्टी घडल्या, एक, ह्या लोकांना काहीही फरक पडला नाही. दोन, माझी शब्दसंपदा वाढलेली आहे. आता मात्र जरा डोक्यावरुन पाणी चाललं होतं, मग मात्र व्यवस्थित झापलंच जरासं आणि लगेच काम झालं. निदान बूथपाशी जाऊन रिक्षा बुक करता आली, रस्ता दिला सगळ्यांनी. मर्‍हाठी पाणी हो शेवटी. असो, असो.

रिक्षा घेऊन अल्पनाकडे निघालो. तिला आणि तिच्या कुटुंबियांना प्रथमच भेटणार होतो. उत्सुकता होती.

दिल्लीचा दर्शनी भाग, जिथे राजकीय कार्यालयं आहेत, तो देखणा आहे, ह्याची जाणीव झाली. मोठे, सरळ, सुरेख रस्ते, बिनखड्ड्याचे रस्ते. झाडी. चालणारे ट्रॅफिक सिग्नल्स, सहसा ते पाळणारे लोक. क्वचित एखादा गाडीचालक बेदरकारपणे नियम धुडकावून जात होता. जाता जाता रिक्षा एका वळणावर आली आणि समोर एकदम अमर ज्योतीचं दर्शन झालं.

रिक्षातच होतो, आणि रिक्षा बघता बघता पुढेही गेली खरी, पण त्या एका क्षणामध्ये ती ज्योती, ती बंदूक आणि हेल्मेट पाहून जे काय वाटलं ते शब्दातीत आहे! बघता बघता डोळ्यांत पाणी आणि घशात हुंदका कधी दाटला हे समजलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षा थांबव सांगून मी ज्योतीचं दर्शन घ्यायला अणि फोटो काढायला जाणार होते, पण शब्दच फुटेना तोंडातून. हे सगळं घडलं काही दोन पाच क्षणातच, रिक्षा खूप लांब गेली, पण सकाळच्या धुक्यातली तेजाळ अमर ज्योती कधी विसरेन असं वाटत नाही. आपल्याच शहीद सैनिकांची आठवण देणारी ती ज्योती आहे, खरं तर मशाल आहे, सतत धगधगणारी. कोण कुठले सामान्य लोक, जिगर बाळगतात, कठीणातलं कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात शिरतात, अख्ख्या देशाची सरहद सांभाळतात. प्रसंगी जीवाचं मोल देतात. आपल्या घरच्यांपासून महिनोंमहिने दूर राहतात, सगळ्या काळज्या, चिंता, त्यापायी होणारा त्रास, आठवणी, कदाचित कधी पूर्ण न होणारी स्वप्न, साध्या साध्या इच्छा, बहुधा घरच्यांना वेळ देता येत नाही ह्याबद्द्लची खंत, हे असं सगळं आणि अजूनही बरचंस काही मनातल्या मनात कुठेतरी लपवून जराही कुचराई न करता आणि पुन्हा कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो ही शक्यता माहीत असतानाही, जीवावर उदार होऊन आपलं काम चोख करायचं ही मला तरी साधीसुधी गोष्ट वाटत नाही, मग भले कोणी सेंटीमेंटल वगैरे म्हणालात तर म्हणा. मेरी बलासे. त्यांच्या जीवावर मी स्वतंत्र भारतात जगते. ज्या गोळीवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं ती येऊन शरीरात आदळली की शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय येत असेल? येत असेल? की काही समजण्याच्या पलिकडे क्षणार्धात पोचता येत असेल? ज्या कोणाची कारकीर्द गोळी न खाता संपत असेल, त्यांच्या मनामध्ये कधीतरी गोळी खावी लागेल, हे दडपण कुठेतरी आयुष्यभरासाठी दबा धरुन बसून रहात असेल का? त्याचा एकूणच जगण्यावर कसा आणि कितपत परिणाम होत असेल? हे दडपण संपल्यावर काय वाटत असेल? रितेपणा? सुटल्याची भावना?

ही नोकरी आणि त्यापायी येणार्‍या जबाबदार्‍या, ताणही त्याबरोबर येणारच, त्यात इतकं काय इतकं, वगैरे बुद्धीवादी युक्तीवादही मी ऐकले वाचले आहेत. असं बोलणार्‍यांची, विचार करणार्‍यांची मला आता कीव येते. आधी खूप राग यायचा. नोकरी आहे वगैरे सगळं ठीके हो, पण तरीही मला कौतुक आहे आणि आदरही आहे. काही बाबतींत मी कमालीची सेंटीमेंटल आणि इमोसनल वगैरे वगैरे जे काय असतं ते सगळं आहे. असूद्यात. आपल्याकडे - म्हंजे माझ्याचकडे त्येवडंच हाये.ज्याचा त्याचा नजरिया. असो. पुढे चाललो होतो...

दिल्लीचा हा बाहेरचा दर्शनी भाग जसा बाजूला पडला तसं दिल्ली शहर एकदम दिल्ली गाँव वाटायला लागलं. ए़कदम गाँवकी मिट्टीकी याद, सौंधी सौंधी खुशबू वगैरे. एकदम घरेलू दिसायला लागली दिल्ली. बघता, बघता अल्पनाचं घर आलं, अल्पना बाहेरच उभी होती आमच्यासाठी. तिच्या कुटुंबियांनीही फार अगत्याने आगत स्वागत केलं. आम्ही तिच्या घरात घुसून हक्काने सॅक्स तिथेच बैठकीच्या खोलीतच आपटल्या. पसारा झालाच, पण परक्या ठिकाणी नव्हतोच. पुढच्या प्रवासात आंघोळीच्या पाण्याची चैन वगैरे परवडणारी नव्हती, तेह्वा अल्पनाकडे अगदी चैन करुन घेतली! अल्पनाच्या सौजन्याने प्राठे वगैरे खाल्ले. खूप अगत्याने आणि निगुतीने तिने आमची खतिरदारी केली. खूप खूप कौतुक वाटलं. आयामचा थोडक्या वेळात खूप लळा लागला. तितक्यात रैनाही येऊन पोचली होती आणि रिक्षावाल्याने तिला व्यवस्थित गंडवलेलं होतं. जाऊंद्यात झालं, असा विचार केला. कुठे कुठे डोक्याला त्रास द्यायचा हो? चलताय. दुपारी एक वाजता ट्रेकवाला ग्रूप ठेशनजवळच्या हाटेलात पोचणार होता. गप्पा मारता मारता आणि प्राठे खाता खाता तिथे पोहोचायची वेळ झाली आणि आमची सवारी पुन्हा एकदा दिल्ली ठेशनाजवळच्या हाटेलात जाण्यासाठी निघाली. तिथे सगळे जमणार होतो आणि पुढचा प्रवास एकत्र करणार होतो.

तिथे पोहोचून मग रीतसर ग्रूपशी ओळख वगैरे सोपस्कार पार पडले. सगळ्यांनी ओळख करुन दिली खरी, पण त्यावेळी मला बरीच नावं लक्षातच राहिली नाहीत. तुमचं होतं का असं कधी? कळतील पुन्हा हळूहळू, म्हणून मी गप्प बसले, पण मंडळी ट्रेक्स केलेली, अनुभवी दिसत होती, आणि त्याचं मात्र दडपण आलं होतं. भय इथले संपत नाही.. सामान उचललं आणि हरिद्वारला जायच्या ट्रेनीचा पत्ता काढत योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचून गाडी आल्यावर आपापल्या जागा पकडून जरा स्थिरावलो. एकूणातच ग्रूपशी जमेल असं वाटायला लागलं, कारण गप्पा आणि टवाळक्या सुरु झाल्याच. दिल खुस हुवी गया! आगाज ये है, तो अंजाम होगा हॅंसी..

हरिद्वारला जायच्या ट्रेनमध्ये बसलो होतो. त्याआधी ठेसनावरुन दरभंगा गेलेली पाहिली. इतकी ठासलेली माणसं. प्रत्येक डब्यामध्ये अजून एक तरी माणूस अजून चढला तर रेल्वेचा डबा फुटेल अशी परिस्थिती. कठीण आहे! गाडी सुटली आणि हळूहळू शहरी भाग मागे टाकून शेती दिसायला सुरुवात झाली. लालसर काळी माती. लांबच लांब, आडवी उभी शेती पसरलेली. पाणथळीच्या जागा. वेगळे वेगळे पक्षी दिसत होते. आणि कसे स्वैर उडत होते, सूर मारत होते... खुशहाल जिंदगी. हेवा, हेवा. माणसाच्या जगातल्या कोणत्याच चिंता नाहीत. सुखी जीव. साहेबांना सगळ्यांची नावे ठाऊक. तेच ते अचंबा प्रकरण पुन्हा एकदा वाटून गेले. आता सगळ्यांच्या गप्पा सुरु. सोबतीला चहा, खाणे वगैरे. मिल बैठे थे सब यार. मध्येच मला उगाच झापड आली. मग, मला गप्पा ऐकायच्यात पण डोळे मिटताहेत, तेह्वा डोळे मिटून ऐकते, सांगून डुलकी वगैरे काढली असावी, कारण मधले फारसे काही आठवत नाहीये. खायच्या वेळी बरोब्बर जाग येत होती मात्र!

हरिद्वारला जायच्या ट्रेनीत बसले होते, तेह्वा एका मैत्रिणीचा फोन आला. स्मिताचा. आम्ही दोघी एकाच शहारात राहून, भेटणं बर्‍याचदा दुरापास्त. तीच ती शहरी घिसीपिटी कारणं. खरीखुरी असली तरी तितकीच वैतागवाणी. आलिया भोगासी टायपाची. तर, तिने फोन केला आणि नेहमीप्रमाणे कुठे आहेस, हा प्रश्न टाकल्यावर हरिद्वारला चाललेय, असं उत्तर ऐकून ती तीही खरोखरची उडाल्याचं मला इथे ट्रेनीत समजलं. मज्जेत हसलोच मग दोघी. मग तिला सगळं सांगितलं ह्या ट्रेकविषयी. गप्पा मारल्या. मी हा ट्रेक करतेय हे ऐकून तिलाच ग्रेट वाटलं होतं, आणि तिचा हा आपलेपणा पाहून, मला.

गाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. गंम्मत वाटली, कारण नाही, उगाच आपली वाटली. आवडलं. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली? तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे. ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं. जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे.

ठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..

क्रमश:

3 comments:

Samved said...

दिल्ली....माझा तिथल्या प्रवासाचा जबर अनुभव आहे. माणूस कसा "बनतो" हे मला तिथं नव्यानं शिकायला मिळालं...लिहीन कधी विस्तारानं...
मजा येतेय. चालु दे

यशोधरा said...

लिही की लवकर आणि लिकही दे.

do said...

_/\_