October 1, 2011

हर हर गंगे..२
मनातल्या मनात माईला हाका मारल्या. तिने ऐकल्या का?

तितक्यात बसच्या दुसर्‍या बाजूच्या खिडक्यांबाहेर लक्ष गेले. ओह्हो! दिसली, माई दिसली.. आणि कशी? अवाक् व्हायला झाले! छाती दडपली एकदम. आपल्या सर्व सौंदर्यानिशी, सामर्थ्यानिशी, सौष्ठवानिशी आणि ऐश्वर्यानिशी माई वाहत होती. तिच्या लाटा सातत्यपूर्ण नाद करत इतक्या वेगाने पुढे पुढे सरकत होत्या! जणू काळाच्या वेगाला मागे टाकतील. छे! शब्दांत ते दृश्य पकडणे मला केवळ अशक्य आहे! कसे दिसत होते ते? जणू काही आताच कात टाकलेल्या नागिणी सुसाटत धावत होत्या! मनात आले, माईने खरेच तर सांगितले होते भगिरथाला. तिचा वेग सहन होणे अशक्य. हा तर अंगावर येऊ पाहणारा वेग होता. जराशा दुरूनच पाहत होतो, तरीसुद्धा तसे बर्‍यापैकी ओझरते पाहतानाही तो वेग असह्य झाला होता, विलक्षण ओढ लावत होता, भुरळ पाडत होता... तर प्रत्यक्ष तिच्या सन्मुख असणार्‍यांची काय स्थिती होत असेल? जीव इतक्या काकुळतीने अस्वस्थ होऊ लागला होता, एक प्रकारची उलघाल आणि एक विलक्षण उर्मी दाटू लागली होती आणि वाटले, बस्स! बेभानपणे ह्या लाटांवर स्वतःला तनामनाने झोकून द्यावे, माई नेईल कुठे ते. सखी आहे, सांभाळूनच नेईल, आणि एकदा झोकून दिल्यावर पुढची पर्वा कोणाला? कशाला? खरंच. विल़क्षण मोहाचा क्षण. नुसते वाटले. कुडी झोकायला धीरही खरोखरच झाला असता की नाही, कल्पना नाही. उर्मी दाटणे वेगळे आणि कृती करणे त्याहून वेगळे. निरनिराळ्या जबाबदार्‍यांनी पाय मागे ओढले. जबाबदार्‍या नसत्या तर झोकून दिली असती का कुडी? जमले असते? काय, कोणास ठाऊक.. छंद म्हणून विचार पुरला आहे मात्र सद्ध्या. असो.

किती किती ओढ लावते गंगामाई! पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. किती प्रकर्षाने स्वतःला तिच्या लाटांवर झोकून, फेकून द्यावेसे वाटले आणि पुढे तिचे निरनिराळे प्रवाह पाहताना, अनुभवताना वाटतच राहिले. जमेल तितके ते दृश्य पहायला प्रयत्न केला. बस थांबली नाही, फार फार दु:ख होत होते बस न थांबत असल्याचे.

ऐलतटापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर आमची बस धावत होती आणि आत बसलेले आम्ही काही जीव, गंगेला होता होई तेवढे मनात साठवत होतो. पैलतट भाविकांनी थोडाफार गजबजलेला होता, काठांवरच्या देवळांतून दिवे लागले होते. माईची आरती सुरु होती. मोठमोठी निरांजने, आरत्या तेवत होत्या, झांजा, मृदंग, ढोल वाजवणारेही डोळ्यांनी टिपले, मोठा नाद करणार्‍या घंटा घेऊन लोक उभे होते. मोठ्या मोठ्या ज्योतींचा उजेड पाण्यावरुन परावर्तीत होत होता. आरतीचा आवाज आणि वाद्यांचे नाद एकमेकांत मिसळले होते. माई आरतीचे सोपस्कार करुन घेत मार्गक्रमण करतच होती. एका कोणत्या तरी क्षणी मनावर अगदी गारुड झाले. घशात हुंदका दाटू झाला आणि डोळे चुरचुरायला लागले. हिला सोडून पुढे जायचे? पुन्हा दर्शन? सगळे मोह, माया, बंधनं पाश सोडून लोकांना हिचा आश्रय का करावासा वाटतो, कशी प्रेरणा मिळते, का इच्छा होते, ह्याचा थोडा थोडा उलगडा झालासे वाटले.. पण आता वाटते, खरेच का झाला उलगडा?

हे जे काही सौंदर्य समोर उन्मुक्तपणे वाहते, ते मृदुमुलायम नक्कीच नसते. आपल्याच मस्तीत वाहते माई. आपल्याच धुंदीत. आखीव रेखीव वगैरे असे काही नाही माईपाशी. बस्स, एक आवेग आहे, मत्त उन्मत्तपणा आहे आणि ते केवळ तिलाच शोभून दिसते. किती बोलावे तिच्याबद्दल? न बोलवे काही. सिर्फ एहसास हैं ये, रुहसे महसूस करो. गंगामाई ही केवळ अनुभवण्यासाठी आहे. शब्द, विचार सारे काही थिटे पडते तिच्यापुढे. तिला म्हणावेसे वाटले, नव्हे, पुन्हा, पुन्हा मनात प्रवासात तिच्याशी बोलताना म्हटले, त्वं साक्षादात्मासि नित्यम्| ऋतं वच्मि| सत्यम् वच्मि|

आता पुन्हा कधी दिसेल? साहेब म्हणाले, आता अख्खा रस्ता दिसणार आहेत गंगेचे प्रवाह, गोविंदघाटीपरेंत अगदी. खरंच? खरंच का? किती आश्वस्त वाटले तेह्वा. माई बरोबरीने येणार होती, साथ सोबत करणार होती. उगीच का ती सखी आहे? तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलत प्रवास होणार तर. कोणत्या जन्मीचे पुण्य फळाला आले होते! काय सांगू हिला? विदध्या: समुचितम्! अजून काय मागायचे गं? कधीतरी तुझ्या काठाकाठाने फिरायची इच्छा आहे. पार गंगोत्रीपरेंत जायचे आहे बघ. तुझ्या संगतीने तुझ्या काठावर फुललेले, वसलेले जीवन पहायचे आहे, शिकायचे आहे. एकदा तरी तुझ्या किनार्‍यावर तुझ्या लाटांचा नाद ऐकत आणि आकाशातले चांदणे बघत निवांत पहुडायचे आहे. तुझ्या संदर्भातल्या कथा कहाण्या आठवायच्या आहेत आणि बस्स, शांत, शांत व्हायचे आहे. कधी बोलावशील पुन्हा?

माई तात्पुरती दृष्टीआड झाली. तिचा नाद मात्र मनामध्ये अव्याहत ठाण मांडून राहिला. अजूनही आहे. म्हटले ना मी, भूलना नामुमकीन.

हृषिकेशच्या रस्त्याने जाताना मध्येच एका ठिकाणी चांगलाच ट्रॅफिक जाम होता. लष्कराची वाहने, प्रवासी वाहने, तिथल्याच रिक्षा आणि त्यात कोंबलेली माणसे, ट्रक.. सारे काही एकाच लहानशा रस्त्याने ये जा करतील, तर अजून काय होईल? पण कोणी तक्रार करताना दिसत नव्हते. कदाचित सवय झाली असावी , कदाचित हेच अंगवळणी पडले असावे. कदाचित आतून मन शांत होण्याचे वरदान माईच्या प्रदेशात लाभून जात असावे. कोणास ठाऊक? जायचा रस्ता राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जात होता, हत्तींच्या कळपापासून सावध रहा, असे फलक पाहिले. कुठे हत्ती दिसतात का ह्याचा उगीच नजर शोध घेत राहिली. कोणी दिसले नाही. मिट्ट काळोखात एखादा कळप एकदम समोर ठाकला असता तर काय झाले असते, कोणास ठाऊक. बाकी काही कल्पना करु शकत नसले, तरी काही फोटो मात्र नक्कीच काढले असते.

यथावकाश हृशिकेशला पोहोचलो.

ज्या हॉटेलात रहायचे होते, तिथली ऐसपैस जागा एकदम आवडली. खालचा चौकच किती मोठा होता. केवढीतरी जागा. मोकळीच. गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या करत खेळावेसे वाटले. चौसोपी जागेला फरसबंदी होती. एक झूलाही हवा होता, सावन के झुले करायला. पाऊस पडेल तेह्वा त्या चौकात उभे राहून तो पाऊस अनुभवायचे काय सुख असेल. नुसते उभे रहायचे शांत आणि तो पाऊस अनुभवायचा, हळूहळू चेहर्‍यावर आणि मग अंगावर घ्यायचा. कधीतरी नकळत तो मनातही पोहोचतो. सुखच मग. नुसती स्वप्ने आणि इच्छा. रोजच्या धबडग्यात अशा निवांतपणीच्या इच्छा स्फुरतात हीच एक मेहेरबानी समजायची अन् काय. आपापल्या खोल्या ताब्यात घेऊन, फ्रेश होऊन खाली जेवायला आलो. सुरुवातीला सगळे बसलो होतो, आणि मला भूक नाही, तुला भूक नाही वगैरे सुरु होते, कोणालाच फारसे काही नको होते. असे निदान सगळे म्हणत तरी होतो. मात्र नंतर मात्र ऑर्डरी संपेचनात! सोबतीला गप्पा. आम्हांला मजा आली, पण वेटरसायब वैतागले. त्यांनी मनातल्या मनात किती खाताय, किती खाताय म्हटलेले ऐकू आले अगदी. पुन्हा एकदा मस्त ग्रूप आहे, ह्याची मनातल्या मनात खात्री पटली. सगळेच भरपूर खातात आणि त्याहून दुप्पट गप्पा हाणतात. अजून काय हवे?

खरं तर ह्या ऑर्डरी कशा एकामागोमाग गेल्या आणि वेटरसायबांना शेवटी कसा वैताग आला हे लिहायला हवे आहे, पण कंटाळा केला आहे लिहिण्याचा. कधीमधी मूड आलाच तर लिहीन नक्की.

दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला निघायचे होते. साडेचार-पाचला उठावे लागणार. तिघींचेही आवरायचे होते. रात्री सगळी विद्युत उपकरणे चार्ज केली. दुसर्‍या दिवशी पहाटे चारला मला जाग आली. इतके निळसर भुरकट आकाश पहिल्यांदा पाहिले. स्वप्नातल्यासारखे वाटत आणि दिसत होते. साधारण पावणेपाचच्या सुमारास तेजोनिधी प्रकटले. स्वतः दिसले नाहीत, पण आकाशाचा रंग इतका गडद केशरी झाला आणि फाकलेले किरण फक्त दृष्टीस पडले. जादू जशी. नळातून येणार्‍या गरम पाण्याने आंघोळीपांघोळी करुन घेतल्या. हे नळातले असे गरम पाणी इथे शेवटचे. यापुढे पाण्याची चैन नस्से. चैन संपली.

चहा, कॉफी ब्रेकफास्ट संपवून ६ च्या सुमारास हृषिकेशवरुन पुढे जायला निघालो.. पुढे जाणार होतो पीपलकोटीला.

क्रमश:

4 comments:

अभिजीत वाघ said...

ekach baithakit sarva lekh adhashyasarkhe vachun kadhale.
Faarach chaan jhaliye lekh malika.
Pudhache bhag pan yeu det patapat.

fakta lekhachya madhye madhye thodese photos lavales tar ajun mast vatel.

abhijit.

Samved said...

खरं म्हणजे मी सोईस्कर श्रद्धाळु आहे. त्यामुळे गंगा ही एक नदी आहे आणि ती हिंदु महापवित्र मानतात यावर माझं एक टोक संपतं. मला तिला माई किंवा मैय्या म्हणणं जमेल असंही वाटतं नाही. त्यात लाजेचा भाग जास्त हे ही खरं. गंगा ही विविध मार्गांनी प्रचंड गलिच्छ झालेली नदी आहे हे दुर्दैवाचं दुसरं टोक. त्यामुळे निदान प्रसिद्ध घाटांवर मी डुबकी मारणार नाही हे ही नक्की. आप्ल्यात स्वच्छता आणि भक्ती या दोन स्वतंत्र गोष्टी मानल्या जातात हे आपल्या देवांचं आणि नंतर आपलं फुटकं कर्म.
पण! हा पण नेहमीप्रमाणेच महत्वाचा आहे. मी मागे डिस्कवरीवर गंगेचा उमग अश्या अर्थाची डॉक्यु. बघितलेली. आपण समजतो त्याच्या कित्येक फूटवर गंगेचा उगम आहे. नेहमीप्रमाणे बोलणारा फिरंग सोडला तर तिथे एक बापडं जोडपं आणि एक साधुबाबा सोडून कोणीही नव्हतं.पण ती जागा स्वर्गीय होती याबाबत माझं दुमत नाही. उगमाच्या इथली गंगा, मला विचारशील तर, मला प्रचंड पवित्र वाटली. माझे हात तिथे आपसुक जोडले जातील, माथा विनम्र होईल आणि कुणी सांगावं एखादी आरती सुचली तर चढ्या आवाजात म्हणायला मला लाजही वाटणार नाही. गंगा भेटावी तरी अशी, एकांतात, अस्पर्श...
माझ्या कॉमेन्टचं राहु देत, तुला तुझी गंगा भेटली हे सर्वात महत्वाचं.

यशोधरा said...

अभिजित, फोटो अजून अपलोड केले नाहीत. उद्यापासून करते.
इथे - www.chayaprakash.aminus3.com अपलोड करणार आहे. सगळे भाग एकदम (!) वाचून काढलेस! धन्यचवाद! :)

संवेद, भापो. :) समजलं तुला काय म्हणायचं आहे ते, आणि बर्‍याच बाबतीत डिट्टो. मी सश्रद्ध आहे, पण वेगळ्या अर्थाने. डोळे मिटून मी कर्मकांड करत नाही, मानत नाही. पण जे जे भव्य, दिव्य किंवा नुसतं भव्य दिव्यच का, जिथे आणि जे जे मनाला भावतं, तिथे ते, ते तसं आसूसून,मनापासून आणि शंभर टक्के अनुभवायला मला आवडतं. त्यात गंगा आली, हिमालय आला, सह्याद्रीचे कडे आले, एखादं गवतफूल सुद्धा आलं. भोवतालची सृष्टी आली, कविता आल्या, सुरेख लिखाण आलं, नाटकं, सिनेमा, फोटोग्राफी, पुस्तकं.. मणसं, अनुभव, नातीगोती, मैत्र, .. यादी वाढेल, वाढता वाढता वाढे अशी. :) आणि रेंज अफाट आहे, इथून तिथपरेंत! ;)

तू म्हणतोस ते खरंच आहे. गर्दीचा मलाही भयाण उबग येतो. इतका, की माझ्या घरी मी 'माणूसघाणी' आणि - वा नाही, 'आणि', प्लीज नोट - शिष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. ह्याहून मोलाची पदवी आहे का तुझ्यापाशी? ;) स्वच्छतेबाबत तर अगदी, अगदी. काही दुमत नाहीच. त्याचमुळे हिमाचलात आदिशंकराचार्यांच्या गादीकडे जायला पहिल्यांदा नकोच वाटलं. लोक भसाभसा आत जात होते. तितक्याच भसाभस बाहेर येत होते. नकोच वाटतं अशा नासमझ गदीचा भाग होणं! आपण काय पहायला आलोय, किंवा कोणत्याही जागेचा बेसिक रिस्पेक्ट सहसा पाळतच नाही कोणी. पाळावाही वाटत नाही कोणाला. पुढे काही कहाण्या सांगेनच बघ. दुर्दैव तर आहेच.

केवळ झुंडीच्या मानसिकतेतून किंवा चार जण म्हणतात म्हणून गंगेला माई, मैय्या म्हणाले नाही मी. तशी ती भेटली मला. सखी म्हणूनही भेटलीच की. :) आणि मुख्य म्हणजे गर्दीत नाही भेटली. एकटीच भेटली. मनातल्या गोष्टी बोलायच्या तर गर्दी असून कसं चालेल? नै का? :) नाहीतर वैतरणेलाही माई आणि सखी म्हटलं नसतं का? पण गंगूताई मनात, अगदी आत उतरल्या की रे! मग काय करता?

यशोधरा said...

Samved, I guess I need to express myself in a better manner, may be more precisely. Let me try. I am not referring to Ganga as Maai, Maiyya or Sakhi because of any religious influences. Far from it. I don’t give a damn about such influences. I refer to her as Maiyya or Mai because I experienced her engulfing love towards me, I truly did. It lifted my spirits, I felt loved from within.

And Sakhi? Well, that’s because I could talk to her, communicate with her without any inhibitions, whatsoever.

Thank you Samved, your post made me question myself again and once more affirm and confirm what I found and discovered on the banks of Ganga, which will stay with me forever. Thanks! 