July 21, 2008

प्रत्येकाचा अंधार अन् सूर्य

कधी कधी असं उगीच होऊन जातं.... सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, आतल्या आत मन धुमसत राहतं, स्वतःचं मन, स्वतःलाच अनोळखी! मनात काय चाललंय, का चाललंय, कशासाठी चाललंय, त्यातून काय निष्पन्न होणार, होणार का? सारंच कसं अगदी बेभरवशाचं. प्रश्न आहेत, कधी कधी त्यांची उत्तरंही आहेत, पण हवी असणारी अन् लागू पडणारी आहेत का, हे मात्र ठाउक नाही... प्रत्येक वेळी आजमावून पहायची हिंम्मतही नाही, आणि तरीही आयुष्य सुरुच राहतं. आला दिवस आपला म्हणायचा का? हं, तसच असावं बहुधा...

जणू काही एका अश्या वळणावर कुठेतरी उभं असतो, जिथून रस्ते तर भरमसाठ निघतात, पण यातला माझा कुठला, असं वाटत राहतं. कोणत्याच रस्त्याशी बांधिलकी वाटत नाही, चार पावलं चालून मधेच रस्ता बदलला तरी, रस्त्यावर आपल्या पाऊलखुणा राहतील असही काही नाही आणि आपल्या मनातही त्या रस्त्याची काही आठवण राहील याची खात्री नाही, नाळच जुळत नाही, आणि तरीही एक रस्ता निवडून चालायच..... का? थांबण्यातही स्थैर्य असेलच, अस खात्रीपूर्वक सांगता येतं, असही नाहीच...

वरवर सगळं कसं छान छान, सुरळीत, एकदम मस्तच असत! पण कुठेतरी मनात एक खोलवर एक डोह असतो, ज्याचा तळ गवसत नाही... किती खोल जावं तळ शोधायला? गवसेलच याचीही शाश्वती नाही, परत उलट फिरुन काठावर येईनच याचीही खात्री नाहीच, आणि समजा जरी काठ दिसला आणि तिथपर्यंत पोचता आलं तरी परत एकदा काठावर उभं राहून पुन्हा एकदा डोहात वाकून पाहताना आपलंच प्रतिबिंब आपल्यालाच परकं वाटल तर??

काही कळत नाही... स्वतःच स्वतःला अनोळखी होत जाता जाता ओळख शोधायची तरी कुठे? प्रत्येकाचा अंधार वेगळा, प्रत्येकाचा सूर्य वेगळा... एकाच्या सूर्याला दुसर्‍याचा अंधार पेलेलच असंही नाही!

शेवटी प्रत्येकाने आपापला अंधार पेलायचा आणि त्याला छेद देऊ शकणारा स्वतःचा सूर्य स्वतःच शोधायचा.. कदाचित असंच असाव.

6 comments:

कोहम said...

एकाच्या सूर्याला दुसर्‍याचा अंधार पेलेलच असंही नाही!

apratim

a Sane man said...

"एकाच्या सूर्याला दुसर्‍याचा अंधार पेलेलच असंही नाही!"

agadi!...chhan!

Sneha said...

शेवटी प्रत्येकाने आपापला अंधार पेलायचा आणि त्याला छेद देऊ शकणारा स्वतःचा सूर्य स्वतःच शोधायचा...
अप्रतिम...

असा सुर्य सापडतोही तो असतोच अगं... जोवर अंधाराच सामराज्य आहे तोवर सुर्याचा शोध चालुच ठेवायचा..ng

आशा जोगळेकर said...

छानच लिहिलं आहेस. प्रत्येकाचा सूर्य वेगळा खराच
पण कधी कधी तो आपल्याला ही प्रकाश देऊन जातो.

Vishakha said...

Manaatlya doha cha tal sapadat nahi! Kharch chhan lihilays. Lekhanatun ch sapadel na tula to tal ani to surya :)

यशोधरा said...

कोहम, सेन मॅन, स्नेहा, आशाताई, विशाखा काय बोलू? संवेदना समजावून घेतलीत, धन्यवाद :)