
सकाळी सहाला हृषिकेशहून निघालो, ते कौडीयालला खायला थांबलो. इथे प्रामुख्याने गंगेच्या प्रवाहामध्ये राफ्टींग चालते. जिथे थांबलो, ते एक छोटेसे हॉटेल होते. तसे यथातथा, पण तरीही अगदी सुबक, आपलेसे असे वाटणारे. आवडले. साधेच बांधकाम होते, पण खिडक्या मोठ्ठाल्या होत्या आणि जिथून तिथून जितका काही होता, तो सूर्यप्रकाश आत झिरपत होता. उजेड आणि स्वच्छता ह्या बेसिक गरजा भागत होत्या. झाले की! खूप आरामदायी प्रवासाची, मोठ्या ऐसपैस हॉटेल्समधून राहण्याची वगैरे ज्यांची इच्छा असेल, त्यांनी ट्रेकींग वगैरेच्या भानगडींत न पडलेलेच बरे, असे माझे मत. जोवर बेसिक गरजा भागत असतील, तोवर तरी फुसफुसायचे कारण नसते. खरं तर आपल्या गरजा आपणच वाढवून ठेवलेल्या असतात, आणि मग हळूहळू त्यांचे गुलाम व्हायचे. आमच्या ग्रूपमध्ये सहसा कोणी कुरकुरणारे नव्हते आणि कोणाच्याही अवास्तव अपेक्षा नव्हत्या, ह्याचे एक फार सुख होते. सगळेच तसे जुळवून घेणारे लोक होते. मी तर कोणत्याच अपेक्षा ठेवून ह्या प्रवासाला सुरुवात केली नव्हती, आणि एव्हाना मी आतापरेंत दिसलेल्या हिमाचल, हिमालय आणि गंगेच्या प्रेमात इतकी बुडाले होते, की मला काहीच त्रासदायक वाटत नव्हते. इश्कने फक्त गालिबच निकम्मा होतो की काय?
हृषिकेशवरुन जेह्वा पुढे निघालो होतोत, तेह्वा साहेबांनी मौलिक माहिती दिली होती, की पाईन वृक्ष, झाडी वगैरे दिसायला लागली, की आपण हिमाचलात आहोत हे ओळखावे. ती झाडी तर दिसायला सुरुवात झालीच होती. हिमाचलात प्रवेश करते झालो होतो. हिमाचलाला देवभूमी का म्हणायचे, हे हिमाचल पाहताना स्पष्ट होत जाते. आरस्पानी, मुक्त सौंदर्य जिथे तिथे उधळलेले असते. शंभर टक्के आणि थोडे कांकणभर अधिकच वरिजिनल. जराही नावाला हिणकस नाही. पाहण्यासाठी पावलापावलावर आणि नजरेच्या प्रत्येक टप्प्यात इथे इतके काही आहे, की शेवटी डोळे दुखू लागतात, मन ओसंडून जाते आणि थकते आणि आपण अंतर्मुख होत जातो, कोणाशी बोलावे वाटत नाही, काही सांगावे वाटत नाही, काही ऐकावे वाटत नाही.. बाऽस, केवळ त्या सार्या आसमंताचा भाग होऊन कोठेतरी शांत बसून रहावेसे वाटते. तिथे दाही दिशांत पसरलेल्या, रुजलेल्या नि:स्तब्धतेत, शांततेत हरवून जावेसे वाटते. असलेच, तर तिथे असतात, केवळ नदी, पक्षी ह्यांचे आवाज. कधीमधी वाहने जातात, पण शहरातल्यासारखे भयाण वाटत नाही. पॅं पॅं सतत हॉर्न्स कोणी वाजवत नाहीत. इतकी वर्दळच नसते माझ्यासारखीच्या कधीतरीच प्रसन होणार्या नशीबाने. ह्या वेळी मात्र नशीब फुल टू प्रसन्न झाले होते. लईच भारी चालले होते आतापरेंत. तर, अधून मधून येणारे हेही आवाज, निसर्गदत्त आवाजांबरोबरीने तेही आपल्यात रुजतात, आसमंताला आपल्या असण्याने थोडेफार भान देतात, पण रसभंग करत नाहीत. बाकी मग हवे तरी काय?
थोडेसे खाणे लागते हां पण! अडचण अशी आहे की व्यावहारिक जगाशी मेळ घातल्याशिवाय असे स्वप्न पूर्णपणे जगायची मुभा नसते. की कराँ... तेह्वा मग हॉटेलमध्ये जाणे ओघानेच येते. तर, म्हणून खायला थांबलो. सुरेख, चविष्ट पनीर पराठा खाल्ला. सोबत दही, लोणचे. हॉटेलचा मालक वा चालक, जो कोणी होता, तो अगत्यशील होता. पर्यटन हाच हिमाचलाचा मुख्य कणा असल्याने ही सेवा पुरवणारे इथले लोक अगत्यशील असणार, हे थोडेफार धरुन चालले तरीही, माझ्या मते, इथल्या लोकांनी अजून तरी माणूसपण जपले आहे. इथल्या माणसांशी बोलणे, संवाद साधणे फार सहजगत्या जमते, असं एकूण माझं मत झालं. अर्थात, दहा दिवसांत बरचंसं अंतर गाडीतून तोडणार्या माझ्या मताची ऑथेंटीसिटीही तितकीच म्हणा, पण कोणाशीही बोलायला सुरुवात केली की हसतमुखाने ती व्यक्ती बोलत असे. अगदी मनापासून. कोण हे माझा वेळ खाते आहे, कशाला बोलण्यात वेळ घालवत आहे, मला किती कामे आहेत आणि इथे मज शहाण्याचा वेळ वाया जात आहे, वगैरे असे भाव कधीच जाणवले नाहीत. चेहर्यावर प्रसन्नसे हसू असे, लागण व्हायलाच हवी असे. साधे, सोपे आयुष्य असले की कदाचित असे हसू त्याच्या सोबतीने मिळते की काय? की लुसलुशीत पनीर, मधुर दही अन् ताकाचा हा परिणाम म्हणायचा?
ह्या हॉटेलचा समोरचा रस्ता ओलांडला की छोटी छोटी कॉटेजेस होती, खाली जायला छोटासा रस्ता, पायर्या होत्या. मघा रस्त्यावर गाडी थांबली होती तेह्वाच पलिकडे गंगा वाहताना दिसली होती. लांब वाटली होती, तेह्वा लांबून का होईना, पुन्हा एकदा पाहूयात म्हणून, पायर्या उतरलो, आणि ही इथ्थेच अशी हातभर अंतरावरुन गंगा प्रवास करत होती. तेच जीवघेण्या सौंदर्याने नटलेले पहाड. तेच शुभ्र पाणी. तोच वेगवान प्रवाह आणि हे सारे नि:शब्दपणे अनुभवत तेच ते आम्ही. रैनाकडे पाहिले. तिचीही तीच अवस्था आणि स्वातीचीही. बरोबर ग्रूपमधले राहुल, प्राची (राहुलची बायको) आणि प्राची (राहुलची बहीण) होते, रोमिला म्हणूनही एक जण होती. ही आमच्यामध्ये एकदमच मिसफिट. ट्रेकींगमध्ये एकदम एक्स्पर्ट. तिला पाहूनच मला भयानक न्यूनगंड येत असे. फारशी बोलतही नसे कोणाशी, तेह्वा ती आम्हांला तुच्छ समजत असावी की काय, असे विचारही आम्ही केल्याचे आठवते अणि तिला जरा शिष्ट असावी का, हे लेबल कळत नकळत लावून ठेवले होते. त्या क्षणी मात्र सगळेच समोर जे काही दिसत होते, त्याने मंत्रमुग्ध झालो होतो. कॉटेजमध्ये जे कोण भाग्यवान मुक्काम ठोकत असतील, त्यांचा हेवा, हेवा वाटला.
पुन्हा एकदा गंगेचा प्रवाह आणि पहाडांना डोळ्यांत आणि मनात साठवत तिथूनही पुढे निघालो. प्रवास सुरु होता. बसमध्ये ग्रूपमधले सारेच खुलले होते. गाण्याच्या भेंड्या जोरात सुरु होत्या. खूप जुनी गाणी आठवून, आठवून म्हटली. रैना आणि दोन्ही प्राच्या, राहुल, साहेब गाणी म्हणण्यात पुढे होते. मीही त्यात घसा खरवडला मध्ये मध्ये. कधी कधी असा काही नजारा समोर यायचा, की गाणं वगैरे विसरायलाच व्हायचं मला. हे लोक तोवर काही दुसरंच गात असायचे. त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्यायचे.
ते P.S पुस्तक वाचायचे राहूनच जात होते....
निशांत म्हणून एकजण होता, त्याच्याकडे टपोरी गाण्यांचा एव्हरग्रीन स्टॉक होता. ती मध्ये मध्ये म्हणून दाखवून बसमधले वातावरण खिदळत ठेवण्यात ह्याचा मोठा सहभाग होता. किस्सेही असेच, अफलातून, निव्वळ टीपी. सुजय, रोमिला, दुर्गेश ही जरा शांत शांत अशी मंडळी. स्वातीही. रोमिलाकडे कवितांचे एक पुस्तक होते, ते एकदा तरी मी ट्रेक संपण्याआधी वाचायला घेईन तिच्याकडून, असे स्वतःला बजावले. अपूर्व हा सहसा बॅकबेंचर आणि एकटासा. बोलताना मृदुभाषिक अगदी. ह्या मुलाची फोटोग्राफी स्कील्स अफलातून. सुरेख फोटो काढतो. एकदम देखणे. दोघी बहिणी होत्या, संगीता आणि ललिता. गुजराथेतून आलेल्या. ललिता जराशी त्रासलेली असायची, आणि संगीता तिला सांभाळून घेत, आमच्याशीही जुळवून घ्यायची. तिचं खूप कौतुक वाटायचं, ललिताच्या स्वभावावर जराशी खसखस पिकायचीच. त्याला इलाजच नव्हता. राजश्री ही सगळ्यात सिनियर मेंबर आमच्या ग्रूपची. रोमिला खालोखाल हिचा फिटनेस. ह्या दोघींनी फिटनेसच्या बाबतीत एक लीडरसायब आणि गाईड्स सोडले आम्हां सगळ्यांनाच लाजवले म्हणायला हरकत नाही.
बरोबरचे गाईड्सही स्वभावाने लाख होते अगदी. आणि आमच्या बशीचा डायवर? त्याचे बारसे 'कैलाश खेर' असे केले होते. त्याचा रेडिओ - म्हंजे बशीतला - सतत सुरुच असायचा आणि इतक्या बेदरकारपणे पण गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवून सुसाट गाडी सोडायचा की काय सांगू. पुढे पुढे तो गाडी चालवताना समोरच्या रस्त्याकडे पाहणे सोडून दिले. उगाच डोक्याला ताप कशाला करुन घ्या? त्यापेक्षा गाणी गाणे आणि बाहेरचे नजारे पाहणे सोपे होते, अधिक आनंददायी होते. संपूर्ण प्रवासात बाजूने गंगेचा प्रवाह दिसत राहिलेला. सोबतीला उंच निंच, हिरवे, निळे, करडे, आकाशापरेंत पोहोचणारे, अंगाखांद्यांवर ढग बाळगून असलेले पहाड. मला ठाऊक आहे की, आत्तापरेंत मी हे बर्याचदा लिहिले आहे, पण पुन्हा पुन्हा हे ह्या सार्या प्रवासात जाणवले, ह्याच सदाबहार दृश्यांनी सतत मोहिनी घातली, वेड्यासारखे वेड लावले आणि थकवलेही. गंगा आणि हिमालय, हाच हिमाचलाचा आत्मा.
बसने रस्ता कापताना प्रथम देवप्रयागपाशी पोहोचलो. भागिरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. तिथे थांबलो. कमालीचे उन होते. कातडी करपवणारे उन. सहन होत नव्हते इतके तीव्र, पण त्या प्रयागापुढे सारे काही विसरायला झाले.... वर ढणाढणा उन आणि खाली भागिरथी आणि अलकनंदा आपापल्या मार्गाने पुढे येऊन एकत्र होऊन, गंगा म्हणून मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही तीरांवर दाटीवाटीने पिवळ्या, निळ्या रंगांची घरे. काय अफलातून सुरेख दिसत होते सारे. पहाडांवर घरे बांधून लोक राहतात. तिथे जाऊन २-३ दिवस का होईना, रहावे, अशी फार फार इच्छा झाली. दिवसभर नदीचा नाद कानांवर पडला की कसे वाटत असेल, हे जाणून घ्यायचे होते. तिथल्या रहिवाशांचा हेवाच हेवा वाटला. रोज त्या नद्या वाहताना अनुभवायच्या, त्यांचा नाद ऐकायचा..
इथे पाऊस कसा पडत असेल? त्यावेळी ह्या नद्या कशा भासत असतील? कशा वाहत असतील? रोरांवत असतील? फुफाटत असतील? रौद्र निसर्गाचे ते एक रुपडे पहायचे फार मनात आहे. आणि चांदण्या रात्री कशा दिसत असतील? नुसती कल्पना करुन माझ्या अंगावर काटा येतो! भारावून जायला होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते दुधाळ पाणी किती मोह घालत असेल पाहणार्याला... तेही पहायचे आहे मला. पहाटवेळी? संध्याकाळी? अमावास्येला? किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते... कधी योग आहे, पाहू.
तिथे तापणार्या उन्हात उभे राहून, घसे सुकवल्यावर, तिथेच गाडी लावून उभ्या असलेल्या एका सरबतवाल्याकडे आम्ही सुमधुर लिंबूसरबत प्यायलो. पाणी कुठले होते? कोणास ठाऊक. जाणून घेणे तितके महत्त्वाचे वाटलेही नाही. कायच फरक पडला नाही. नाही, म्हणजे आता आम्ही शहरातले फिल्टर्ड पाणी पिणारे जीव झालोय ना, म्हणून. ऑफिसमध्येही आणि घरी उकळून आणि काय काय. लहानपणी आजोळी पणजोळी जायचे, तेह्वा कसे जिवंत झर्याचे, विहीरीचे पाणी प्यायलेले चालायचे? काही होत नसे तब्येतीला. मनामध्ये इच्छा केली, की नद्यांचे पाणी आणलेले असूदेत ह्या महाभागाने सरबत बनवायला, पण बनवले होते सुरेख.
तिथे एक पाडी होती, तिच्याशी लग्गेच मैत्री झाली. तिलाही थोडे सरबत, एक लाडू, एक सफरचंद, बाटलीमधले पाणी असे काय काय मी खाऊ पिऊ घातले, पुढे तिचे पोट बिघडले असले तर मीच जबाबदार, पण ती मजेत चरत होती. तिची पोळी खाजवली. कानामागे खाजवले. गळ्याला मिठी मारली. पूर्वी पणजोळी एक गाय होती, तांबू नावाची, ही अगदी तशीच आणि त्याच रंगाची होती. तांबू मागील दारी असे, पण पुढील दारी पणजोळी पाय ठेवला, की तिला समजत असे, मग तिला जाऊन भेटेपरेंत हंबरत राही. ते सगळे आठवले. पाडी पण गुणी, मायाळू होती. सरबतवाल्याला वाटले, मला तिची भीती वाटतेय. म्हटले, नाही हो, भारी गुणी आहे बाळी. घाबरेन कशाला. मला सवय आहे, आणि पुढे मनात म्हटले, खूप खूप वर्षांपूर्वीची... तांबूची आठवण खूप घट्ट आहे.
देवप्रयागापासून हलावेसे वाटेना. भागिरथीची कहाणी तर ठाऊकच असते सगळ्यांना सहसा. अलकनंदेची काय आहे बरं? शोधायचे ठरवले.
क्रमश: