
पुढच्या प्रवासाची कहाणी सांगायच्या आधी आमच्या आदल्या रात्रीच्या ऑर्डरींची आणि वेटरसायबांच्या कष्टांची दर्दभरी कहाणी सांगते. मूऽऽड आला आहे!
तरं झालेलं काय, की दिवसभरातल्या प्रवासानं अगदी दमायला झालेलं. खेळ नाही हो, खरंच. आठवा बरं,- एका ट्रेनीत - दुरांतोत - बसायचं, रात्रभर प्रवास करुन दिल्ली गाठायची. रात्री गाडीत नीट झोपायचं नाही. येतच नाही झोप. मध्ये मध्ये ह्या कुशीवरुन, त्या कुशीवर. कारणं? अनेक असतात हो. कारणांना तोटा नस्से. हवीत? ही घ्या.
झोपेची जागा बदलली, घरच्यांची आठवण. नेहमी बिल्डिंगी आणि शहरी वातावरणातले सिमेंटचे ब्लॉक्स, जीव घुसमटवणारी रहदारी आणि रखरखीत गर्दी पाहून आणि जगून कंटाळलेल्या जिवाला एकदम हिरव्या रंगाची उधळण, न संपणारं निळं, काळं, सावळं करडं आकाश, अफाट पाणी - आठवा, वैतरणेचं इथपासून ते तिथपरेंत असलेलं पात्र - दिसल्याने त्याची आनंदाने झालेली तगमग आणि घुसमट - घेता किती घेशील, असं झालं की होते तशी. झोप उडते. इतकं, असं सुख पेलवत नाही. अनुभवांची मनात जपणूक करण्यासाठी, मन, मिळालेली शांत वेळ वापरुन घ्यायला पाहते आणि झोपेला नाट लागते. त्याच वेळी एक कळही येऊन जाते मनात. का? ह्यासाठी, की हे असं सगळं पुन्हा कधी पहायला मिळेल, हेच आणि असंच.. ही बोच लावून जाते. न जाणो, कदाचित, पुढल्या वेळचा नजारा अधिक सुंदर असेलही. कोणास ठाऊक.
पण, पुन्हा दुसरी एक जाणीव डोके उंचावून उभी राहते. आत्ता जसे ते भिडते आहे, त्याच जाणिवेने आणि असोशीने पुढल्या वेळेला भिडेल का, हे अजून एक न भिरकावता येणारे ओझे माझ्यासाठी आंदण म्हणून घेऊन. कदाचित अधिक तरल जाणिवेने भिडेल का? परत कधी असा प्रवास करायला ह्यापुढे जमले नाहीच तर? - बाबा, निगेटीव्ह विचार तो हाच, हो ना? तुझा मुद्दा परत एकदा प्रूव्ह्ड.- पण खरेच, सगळेच जमून यायला हवे. तेच महाकठीण. सगळ्या बाबतींत असेच तर असते. कोणाला जाणवते, त्रास देते, कोणाला नाही. त्रास न होणारे सुखी, की त्रास होऊ शकणारे? की त्रास होणारे व त्याविषयी काही करु शकणारे? अपनी सोच का अपना दायरा. अपने, अपने खयालात. सब कुछ जायज, कदाचित. कोणी कोणाला बरोबर किंवा चूक ठरवावे? प्रत्येकाचे विचार, लिमिट्स वेगळी. आवाका वेगळा. नै का? असो.
तरी हे असं सगळं अनुभवायला लागलं, आणि ते आत आत भिडायला लागलं, की झोप आस्तालाविस्ता म्हणते. की कराँ? नाविलाजको विलाज नै होता. एऽऽऽ, कोण रे ते हसतेय मला? आँ?
पुन्हा मळवलीच्या आणि एकूणातच तिथल्या भागांतल्या होर्डींग्जने सृष्टीसौंदर्य कसं बिघडलं आहे ह्याची हळहळ पोखरतेच. वांझोटी असते, पण जीव कुरतडल्याशिवाय रहात नाही. हे आणि असले अजून काही विषय. झाडांना ठोकतात हो पाट्या वगैरे. तुमच्या शरीरांवर ठोका ना रे. सहप्रवाशांशी झालेल्या गप्पांविषयी मनात येणारं काहीबाही. कुणी काही मनातले सल बोलून दाखवले तर त्याविषयी वाटणारी हळहळ आणि वाटणार्या काळज्या. पूर्ण मनापासून. जोडीला पुढे ट्रेक कसा होणारे, हे एक सतत मनात ठाण मांडून, दडून बसलेले आणि मध्येच कधीतरी डोके वर काढून एकदम जोररात भॉंऽऽऽक्क करणारे लोभस भूत! एक ना दोन कारणे! एवढी पुरेत ना?
शरीराबरोबरीनं, किंबहुना त्याहून अधिक वेगाने मनही प्रवास करतं. तसं पाहिलं तर, आपल्याला आकाशाला गवसणी घालायची थोडीच असते? पण, मनाला मुद्दा समजेल तर ना?! असो, लईच भरकटले. तर प्रवासाकडे वळूयात? चलो! नॉर्मल गप्पा करुयात फॉर अ चेंज.
तर, दिल्लीला पोहोचल्यावर, तिथे पुन्हा दुपारच्याला दुसरी हरिद्वारवाली ट्रेन गाठून पाऽऽर हरिद्वारला पोहोचायचं. तिथनं पुन्हा बशीत बसून जाताना, पदरात पडलेल्या गंगेच्या दर्शनानं इतकं वेडं व्हायचं की उरली सुरली शक्ती वापरुन मनही पार दमून, थकून एकदम येडं व्हायच्याही पलिकडे. त्यात पुन्हा तो चौसोपी चौक. असं ते सगळं काय, काय. तेह्वा असं आमचं पाऽऽर गठुडं वळल्यालं. तेह्वाच कधीतरी भूक नावाची संवेदना पोटाला जाणवलेली असावी बहुधा, पण ती मेंदूपरेंत पोचत नसावी. नक्की तसंच असायला हवं, कारण नंतर पाहता आम्ही तर बकासुराला पण शरमेने मान खाली घालायला लावली असती!
हॉटेलात पोहोचून आपापल्या खोल्यांमधून सामान वगैरे टाकून थोडं स्थिरस्थावर होऊन, चौसोपी मोकळ्या जागावाल्या चौकाकडे मी आणि रैनाने आसूसून पाहून, यथावकाश सगळे खाली जेवायला म्हणून येऊन बसलो आणि डायनिंग हॉलमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी भूकच नसल्याची रेकॉर्ड वाजवली. सगळे फक्त १-२ चपात्या (पोळी नव्हे, पोळी म्हणजे फक्त पुरणाची, साध्या चपातीला पोळी वगैरे म्हणायचं म्हणजे.... असोच, असो हं काय!) आणि थोडीच भाजी वगैरे खाणार होते, उगा आपलं नावाला हो. झोपेच्या आधी काहीतरी खायला हवं ना. सवय, सवय. बाकी काही नाही. तर, सुरुवातीची ऑर्डर समोर येईतोवर ओळखीपाळखी करुन घ्यायला सुरुवात झाली. सगळ्यात शेवटी मी होते आणि नेमके तेह्वा छोट्या छोट्या फुलक्यावजा चपात्या आणि रोट्या आल्या आणि पनीर पालक, आणि अशीच आलूची भाजी. मग ओळख राहिली बाजूला. सगळ्यांच्या हातांची आपापल्या पोटांशी गाठ पडली होती. एक राउंड झाली आणि जठराग्नी भडकल्याचं सगळ्यांच्या मेंदूंच्या एकदमच लक्षात आलं असावं. मग काय? ओघाने अजून रोट्यांच्या ऑर्डरी गेल्या, ते घेऊन वेटर सायब आले, त्यांची वाटच पहात होतो. लग्गेच भाताची ऑर्डर, मग डाळीची ऑर्डर, मग परत भाजी.. दही पण मागवले, मला वाटते. शेवटी, शेवटी काही जिन्नस घेऊन आले की वेटर सायबच विचारायचे, और कुछ "खायेंगे" क्या? बघा, म्हंजे! शेवटी एकदाचे थांबलो खादडायचे. खादडायच्या भरात गप्पांचा भरही कमी झाला होता. नंतर पोटोबा भरल्यावर डोळेही मिटायला सुरुवात झाली आणि दुसर्या दिवशी लवकर उठायचे होते म्हणून झोपलो. माझी ओळख करुन द्यायची राहिलीच. ते ठीक झाले. फार काही नाहीच आहे तसेही सांगायला. अशी ती सगळी कहाणी.
हे लिहिलेले मजेशीर नाही वाटणार कदाचित, पण तो माहौल आठवला तरी अजूनही हसू फुटते. पनीर काय सुरेख होते. दहीही. दोन्ही माझे आवडते खाद्यप्रकार, पण ह्या हिमाचलातल्या पनीर आणि दह्याच्या तर मी प्रेमात आहे. किती तो मुलायमपणा, किती उत्तम चव. मस्त. दुसर्या दिवशीची कॉफीही सुरेख जमली होती. सकाळी सकाळी अशी कॉफी मिळणे हा शुभशकून असतो.
ठीक सहा वाजता आम्ही निघायला तयार होतो. बाहेर जाताना हॉटेलच्या दरवाज्यापाशी पाहिले, तर एका मातीच्या मोठ्या भांड्यात ही इतकी गावठी गुलाबाची फुलं पाण्यात घालून ठेवली होती! पाहूनच अख्खा दिवस सुगंधित झाला! गर्द गुलाबी रंगाची गुलाबफुलं सुरेख, टवटवीत दिसत होती. जोडीला त्यांचा मंद, मन प्रसन्न करणारा सुगंध. वाकून, वाकून भरभरुन सुवास घेतल्याशिवाय राहवले नाही. एखादे फूल परवानगीने सोबत घ्यावेसे वाटले, मग म्हटले, असूदेत. कोमेजून जायचे. नाही घेतले. मी लहान असताना अंगणात होते ते गावठी गुलाबाचे झाड आठवले. नऊवारी नेसून आपल्या भरगच्च आंबाड्यात एखादे फूल खोचणारी, मोत्यांच्या कुड्या घालणारी आणि ओह, कित्ती देखणी आणि मऊ मऊ असणारी आणि वागणारी आज्जी आठवली. संध्याकाळच्या वेळी ती बाकावर बसलेली असताना, अंगणात फिरणारा, शतपावली घालणारा आजोबाही आठवला - हो, त्याला मी एकेरीच हाक मारत असे - त्याला, बाबाला, काकाला. हमारेमें ऐसाच चलता था. आठवणीच आठवणी. मनाने जसे इंप्रिंटस घेतलेले असतात. ही प्रिंट हवीय, घ्या, ही नको? ती हवीय, वांदो नथी. आहे, घ्या. अजब आहे.
सकाळच्या वेळात थोडीफार फोटोग्राफी केली आणि निघालो. हृषिकेशवरुन पुढे पिपलकोटीला. लक्ष्मण झूल्याबद्दल खूप ऐकले होते. वाटेत दिसणार होता. साहेबांना हजारदा सांगितले होते की झूला आला की सांगा, दोन मिनिटे तरी गाडी थांबवायची का? हो, हो असे उत्तर मिळाले होते, म्हणून तशी निवांत होते. बराच वेळ झाला, मधल्या गावातल्या गल्ल्याही पार केल्या, चिंचोळ्या रस्त्यांमधून गाडीवान त्याच्या मते कौशल्याने आणि म्हणजेच आम्हांला भीतीदायक वाटेल अशा प्रकारे गाडी हाकत होता, आणि तो रस्ताही मागे पडला, कोणतासा घाटही पार केला. गर्दीही विरळ झाली आणि थोडीशी शंका आली, म्हणून विचारले की झूला कुठे? गेला की मागेच, असे उत्तर मिळाले. आई ग्गं! काय हे.. इतक्यांदा सांगूनही.. वाईट वाटले थोडेसे. तरी प्रवासाची गणिते मला कुठे सांभाळायची आणि सोडवायची होती? त्यांची गणिते आणि उत्तरे त्यांनाच ठाऊक, म्हणून हळहळ मनातच दडपली आणि गप्प बसले. तरीही वाईट वाटलेच. आता फक्त हरिद्वार आणि हृषीकेश करायला हवे ह्यासाठी. मनसोक्त घाटांकाठी बसायचे. झूल्यावरुन फेर्या मारायच्या. नक्कीच. स्वतःलाच प्रॉमिस केले.
जसे जसे पुढेपुढे जात होतो, नजारे उलगडत होते. कोणत्या नजार्याला म्हणावे की नजारा हो तो ऐसा हो? डावे उजवे ठरवणे फार कठीण झाले होते, आणि तेवढ्यात एक फार, फार सुरेख जागा आली. निव्वळ अप्रतिम म्हणावी, अशी. एक मोठा लांबलचक पूल गंगेच्या पात्रावर बांधला होता,दोन्ही काठांना जोडत होता. लोखंडी असावा बहुधा. त्या पूलावर जाऊन उभे रहावे असे फार वाटले. जमले नाही. पुलाच्या दोनही बाजूंना, नव्हे सभोवताली, नजर जाईल तिथे गंगेचे शुभ्र पाणी आणि नजर पाण्यावर ठरत नाही म्हणताना, ती तोलून धरायला पहाडांचे उंचच उंच कडे. पहाड कशाला म्हणायचे हे हिमालयात आल्यावाचून उमजायचे नाही, आणि हे म्हणे हिमकडे नव्हेत. खरंच? मग अजून उंच असतील हिमकडे? अजूनही कल्पना करता येत नव्हती खरं तर. आत्ताच छाती दडपत होती. भव्य, दिव्य म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे तर असेच काही पहायला हवे. खरं सांगायचं तर असे काही पहिले की त्या नजार्याचे वर्णन हे शब्दांनी होतच नसते, अ श क्य. शब्द बापुडे, केवळ वारा..
हिमालयाच्या रांगांमधून गंगा मनमुराद वाहत होती. आमची वाट एका काठाने जात होती आणि वाटेची दुसरी बाजू हिमालयाच्या पहाडांनी तोलून धरली होती. रस्त्यावर आमच्याशिवाय कोणी, कोणी नव्हते. सकाळच्या उन्हांत गंगेचे पात्र किती लोभस दिसावे, त्याला काही सीमा? अवर्णनीय, अप्रतिम वगैरे शब्दही पोकळ वाटावेत. काही घटना, अनुभव नुसते जगायचे आणि जपायचे. गंगेच्या पाण्यावरची त्या सकाळच्या वेळची आभा तर मी जन्मात विसरणार नाही. काहीतरी फार पवित्र आणि मनाच्या आत काही शुभ्र, काही जीवघेणेसे उलगडणारे असे समोर वाहत होते. किती जवळून. पुन्हा एकदा वाटले, झोकावे का स्वतःला? मन कधीच झोकून दिले. जवळच असलेल्या खडकावर, उंचच उंच निळ्या, हिरव्या पहाडांच्या साक्षीने आणि वाहणार्या पाण्याच्या सोबतीने जगाच्या अंतापरेंत तिथेच बसून रहावेसे वाटले. काही काही क्षण, काळाचा काही भाग आपल्याला किती निर्मळ भावना देऊन जातात. दुर्मिळ असतात. त्यापैकी हा नक्कीच एक. अजून ते सारे तसेच्या तसे डोळ्यांपुढे येते. वेड लागते.
अतिशय अनिच्छेने गाडीत बसून मार्गाला लागलो. एके ठिकाणी खायला म्हणून थांबलो. तिथेही गंगा अशीच वाहत होती. भरभरुन. पहाडांच्या सोबतीने. पडाड तरी कसे. उंचनिंच. एकाच वेळी मनात भरणारे आणि धडकीही भरवणारे. गंगेचा प्रवाहही तसाच आहे. जरी मनात धडकी भरली तरीही कसले अनाकलनीय आकर्षण वाटत राहते? पुन्हा पुन्हा ओढ वाटते? सारेच गूढ. तिथूनही पुढे निघालो. गाडीमध्ये आता गाण्याच्या भेंड्या, गप्पा, गाणी, टीपीवाले विनोद, हसणे खिदळणे सारेच सुरु झाले होते. समां बंध रहा था...
क्रमश:
1 comment:
छान ! काय पाहिलं या बरोबरच त्यामुळे मनांत उमटलेले तरंगही तितकेच महत्वाचे व प्रवास अर्थपूर्ण करणारे ! चांगलं जमतंय तुम्हाला तें मांडणं. अभिनंदन.
- Bhau Namaskar
Post a Comment