February 13, 2008

ठळक बातमी???

आज सक्काळी सक्काळी 'एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र' वाचताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. अगदी 'मुख्य पानावरचीच, ठळक' बातम्यांमधली बातमी!! आणि सक्काळीच असली बातमी वाचून मला धन्य, थक्क, आश्चर्यचकीत आणि तत्सम जे काही असतं ते सगळच व्हायला झालं!! ही ती बातमी, तुमच्याही वाचनासाठी.....

ज्या घटनेची बातमी दिलीय, ती घटना खूपच चांगली आहे, यात काही वादच नाही! निष्काम भावनेन सत्कृत्य केल तर त्यापायी मनुष्याला सकाम भावनेन केलेल्या चांगल्या कृत्याच जेवढ पुण्य मिळेल, त्याही पेक्षा कैक पटीने अधिक, अस पुण्य मिळत अस म्हणतात.

वैधानिक इशारा: ही माझी केवळ ऐकीव माहिती आहे!! उगाचच पुण्य कसे मिळवावे वगैरे माहिती घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न वगैरे करू नये!! :D मलाही त्याबद्दल फारशी माहिती नाही!! आपल पुण्यनगरीत असताना मी अस ऐकल होत, म्हणूनच छातीठोकपणे सांगण्याचे धाडस करत आहे!! तिथे सगळेच, सगळ काही खर सांगतात आणि स्पष्ट बोलतात, त्यामुळेच मी त्यावर विश्वास ठेवलाय, आता विश्वास कधीचाच पनिपतच्या गदारोळात गायब झाला म्हणा वा मृत्युमुखी पडला म्हणा..... पण ते नंतर कधीतरी. :वैधानिक इशारा संपला!!!

खरच जर अस काही होत असेल, तर या जवानांना खूप खूप पुण्य मिळाल असेल. नाहीतरी, लाखो करोडो इतर भारतीयांसाठी, त्यांची ओळखदेख नसताना, एक भारतीय, एवढाच सोडला, तर बाकी कोणताही कसलाही संबंध नसताना, अन बाकीची बरीचशी 'भारतीय' म्हणवून घेणारी जनता सर्वसामान्य जवानाविषयी, त्याच्या आयुष्यक्रमाविषयी, त्याच्या चिंता, काळज्या याविषयी पूर्णपणे उदासिनता बाळगून असताना, हे वीर आपल्या सर्वांसाठी आपला जीव धोक्यात घालत असतातच, त्यांच्या पुण्याची गणना करताना चित्रगुप्त पण थकत असेल, असो.

किती तरी अनाम वीरांच रक्त आतापर्यंत इथल्या मातीच सार्वभौमत्व अबाधित रहाव म्हणून सांडलं गेल असेल, ते तस सांडण्यापेक्षा, अन कोणाच्या सत्ता लालसेपायी म्हणा, मूर्ख, नेभळट अन स्वार्थी अश्या नेतृत्वापायी म्हणा, अशी अनेक आयुष्यांची राखरांगोळी होण्यापेक्षा आणि आपल्या जवानांचं रक्त सांडल जाण्यापेक्षा, जवानांच्या रक्ताने एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळतय हे वाचताना पण एकदम छान वाटल. जवानही नक्कीच सुखावले असतील मनात.

पण म्हणून अश्या पद्धतीने, इतक्या 'फिल्मी ष्टाईलने' बातमी द्यायची काही गरज?? आणि तीही अश्या 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्राला?? या प्रतिष्ठित 'जबाबदार' वर्तमानपत्राची पत्रकारितेची व्याख्या 'सवंग' अशी कधीपासून झालेली आहे?? (तशी ती खूप आधी पासून झाल्यासारखी वाटतेय, हे आपल माझ मत!! मीही पुण्याचीच असल्याने, या प्रतिष्ठित वर्तमानपत्राची भलायकी करणार्‍या तमाम प्रतिष्ठितांची पत्रास न ठेवता हे मत मी मांडत आहे याची नोंद घ्यावी!! :D ) बातमीदाराने ही बातमी लिहिण्या अगोदर, नुकताच, किंवा बातमी लिहिता लिहिता, 'अमर अकबर अँथनी' पाहून अन त्यातल्या त्यात निरुपा रॉयला रक्त देतानाचा शीन पाहताना गद्गद होऊन ही बातमी लिहिल्याचा दाट संशय यायला लागलाय!! (त्याच सिनेमात आहे ना तो विचित्र सीन?) आणि नसला तरी, मी पुण्यातली असल्याने, माझच बरोबर आहे, कळ्ळं???

भारतीय सुरक्षा दलात जेह्वा एखादी व्यक्ती प्रवेश घेते तेह्वा कदाचित सुरुवातीला मनात भाषावाद, प्रांतीयवाद, जातीयवाद वगरे असली जळमटं असतील, तरी त्यांची साफसफाई होऊन, सगळ्या प्रशिक्षणानंतर तालावून सुखावून बाहेर पडतो तो फक्त एक 'भारतीय' सैनिक, जवान असतो, अशी आपली माझी वेडगळ समजूत!! आणि तो 'भारतीयांच्या' संरक्षणासाठी कटीबद्ध असतो, ही अशीही समजूत. आता रक्त देताना, समोरची व्यक्ती कोण आहे, तिची जात काय आहे, आपली जात काय आहे असला फालतू विचार तो करत असेल अस वाटत नाही! (आमच्या नानाने पण डिंपलसारख्या सौंदर्यवतीला साक्षी ठेवून हे दाखवून दिलेल आहेच कुठल्यातरी शिणुमातून, सगळ्यांच रक्त एकाच रंगाच असत म्हणून :D शिणुमाच नाव त्येवढ आठवना बघा! लय भारी शिणुमा व्हता पर!)

बातमीदाराने दिलेली बातमी पाहता मी खालील निष्कर्ष काढले:

१. बहुतेक बातमीदाराने तो नानाचा सिनेमा पाहिलेला नसावा, नक्कीच!! :D
२. बातमीदार, हाडाचा बातमीदार नसावा. :D
३. त्याला हिंदी सिनेमा पाहण्याचे व्यसन असून ते प्रमाणाबाहेर वाढले असवे असावे. तो ' इट सिनेमा, ड्रिंक सिनेमा, वॉक सिनेमा, टॉक सिनेमा' वगैरे वगैरे करत असावा (का??)!! :D
४. जबाबदार पत्रकारितेची त्याची अन वर्तमानपत्राची व्याख्या बदलली असावी!! :D
५. बातम्या छापायला देण्याआधी जे कोणी बातम्या तपासतात, ते लोकं सुट्टीवर असावेत, किंवा त्यांनाही हिंदी सिनेमाचे व्यसन असावे का? गेला बाजार हिंदी सिरियल्सचे तरी?? :D
६। केकता कपूरच्या सिरियल्ससाठी 'संवाद' लेखनाचा पार्टटाईम जॉब या 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्रातील काही 'वार्ताहर' करत असावेत काय?? :D

असो, अजून खूप निष्कर्ष काढता येतील, पण हे प्रमुख आहेत! मग सवडीने बाकीचे काढता येतील! :D :D

पण मला सांगा, बातम्यांचा खरच इतका दुष्काळ पडलाय का? सरळ साधी बातमी देता आली नसती का, की, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी, रक्त देऊन एका छोट्या मुलीचे प्राण वाचवले, ते 'हिंदू, मुलीम, शीख, ईसाई' चे चार चाँद लावायची काहीतरी गरज होती का??? का रक्त देण्याचा अन 'हिंमुशीई' असण्याशी काही संबंध आहे?? का त्याशिवाय ही बातमी, 'ठळक' झाली नसती?? तिला वजन आलं नसतं? या वर्तमानपत्राकडून अशी अपेक्षा निश्चितच नाही!! तस म्हटल तर 'नि:पक्षपाती अन निर्भिड बातम्या' द्यायची कामं सोडून प्रदर्शनं भरवायची अपेक्षाही नाहीच म्हणा या वर्तमानपत्राकडून, पण आता काय!! कालाय तस्मै नमः हेही खरेच, असो.

सध्ध्या बोलणेच खुंटावे अशी परिस्थिती सामाजिक जीवनात सगळीकडेच बहुतांशी आढळते, आता वाचन खुंटावे अशी पण होणार की काय???

शेवटचा डिस्क्लेमरः 'प्रतिष्ठित वर्तमानपत्र' खरं तर खूप आवडीचं होतं.शाळेत, कॉलेजात असताना, अन नंतरही काही काळ ते वाचायला खूप आवडायच. आताची घसरण पाहवत नाही.... तरीही काही काही स्तुत्य उपक्रम वर्तमानपत्राच्या सौजन्यानं अजूनही सुरु असतात, ह्याचही खूप कौतुक आहे.

डिस्क्लेमरला मराठी शब्द आठवला नाही, 'प्रतिष्ठित' वर्तमानपत्राबद्दल असे शब्द वापरल्याबद्दल माझ्यावर दैवाने हा सूड उगवला असेल का??? :D पण अश्या बातम्यांमुळे वर्तमानपत्राचे भवितव्य कितपत 'उज्वल' राहील, अन 'प्रतिष्ठा'ही कितपत जपली जाईल, याची शंका सतवायला लागली म्हणून हा भोचकपणा, बाकी काही नाही!!

कळावे, जमलंच तर लोभही असावा थोडासा.

6 comments:

कोहम said...

hi batami...fakta ekach pratishthit vartamanpatrat aleli nahiye....pratishthit mhanavanarya sagalyach vartamanpatranni chapaley.....sarvadharmasamabhav ki jay!!

Samved said...

:) मी पण वाचली ती बातमी...आता "अमिताभ को ठंड लग गयी" ही एका सबसे तेज चॅनलवरची ब्रेकिंग बातमी होऊ शकते तर काय बोलणार...

Nandan said...

hmm, agadeech peet patrakarita nasali tari ashee baatmi muddam dyayachi veL yavi hech durdaiv. baki हिंमुशीई mast :). disclaimer la 'shrey avher' asa pratishabd manogatavar mage ekada vachala hota.

Monsieur K said...

the less said abt news/media channels/papers, the better!

i work at Shivaji Park, Dadar - and i am amazed at the way, the news channels portray a picture, without any responsibility - by blowing e'thing way out of proportion!

guess, ethics has taken a back seat when it comes to reporting, and all that matters now is how many eyeballs can i capture? how many copies can i sell?

ashi chid-chid jhaali ki aaplyaach aatun ek aawaaz yeto,
"shaant gadaa-dhaari bheem, shaant!" :D

सर्किट said...

ala ala, amhala hi to aawaaj aiku ala. :-D

Yashodhara said...

कोहम, सामवेद, नंदन, Monsieur K प्रतिक्रियांविषयी आभार, आणि लेख वाचल्याबद्दल सुद्धा.
सर्किट, :)