February 10, 2008

सुमल्याची आश्रम वारी!!... (४)

वाटेत जाताना मंडळीचे देवाधर्मावर खूप गप्पा झाले, क्वालीसमधला वातावरण अगदी भक्तीमय होवन ग्येला!! कोकणातलो माणूस तसो भाविकच, तेका आपलो देवापासून देवचारापर्यंत सगळ्यांवरच विश्वास, अन सगळयांची भीतीपण.... देवापासून देवचाराक ह्या माह्यत असता, त्यामुळे तेही आपले लाड पुरवून घेतत!! नायतरी तेंका अजून कोण विचारता आजकाल इतक्या भक्तिभावान! ता आसो आपला....... तर मंडळी दिस सरता सरता आश्रमात पोचली, आणि दिव्यांच्या लखलखाटातलो आश्रम बघून गार पडली!! असो आश्रम त्येंनी कधी स्वप्नात पण बघूक नाय होतो!! आता रामायण महाभारतातले आश्रम तेंका वाचून ऐकून माह्यत होते, पण ते होते साधेच, पर्णकुटीये म्हणत तेंका त्या काळात!! पण हो आश्रम म्हणजे अगदी राजवाड्याच्या मुस्काटीत ठेवणारो निघालो!!

"अहो काका, हा ड्रायव्हर आपल्याला कुठे चुकीच्या ठिकाणी तर नाही ना घेऊन आला?? काय वाटते तुम्हांस? काय हो गुरवानूं?? काय म्हणता??" मास्तर जरा टेंशन घेवक लागले....

"हं, विचारुया काय त्याला? काका, तुम्ही विचारून बघा बघया..... नायतर आम्ही आपले खय तरी जावन पडूचे!! विचारा, विचारा...." गुरवानं काकांका पुढे क्येला..... काकांनी चौकशी केल्यान, आणि ह्योच आश्रम आसा अशी डायवराकडून खात्री करुन घेताल्यान. इतक्यात, समोरुन सफेदशे कपडे घालून ए़कजण हेंच्या दिशेन येताना सुमल्यान बगला, आणि काकांका तसा सांगिपर्यंत, तो माणूस येवन पोचलोही.

"जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव! प्रणाम..." सफेद कपड्याहून सफेद बत्तीशी दाखवत त्येनी सगळ्यांचा आगत स्वागत क्येला.... निवासस्थान दाखयला... "आपण थकला असाल ना, आज, विश्रांती घ्या, उद्या आपल्याला आश्रम दाखवायची व्यवस्था केली आहे. तुमच्या भोजनाची व्यवस्था झाली आहेच, निवास स्थानीच पाठवतो ताटं... आमच्या गुरुदेवांना, सगळ्यांची काळजी... आपली पुरेपूर बडदास्त ठेवण्याविषयी सांगितले आहे...." परत एकदा सफेदीकी चमकार दाखवून गुरुदेवांचो शिष्यही अंतर्धान पावलो अन मंडळी, जेवून वगैरे निद्रादेवीच्या आराधनेक लागली....

दुसरे दिसां, भल्या फाटेचीच उठून सगळी मंडळी आपापली आन्हिका आटपून, आयलेलो नाश्तो, चाय संपवून, तयार होवन काल भेटून गेलेल्या 'सफेदीकी चमकार' ची वाट बघी होती. सगळ्यांबरोबर सुमल्याही अगदी तयारच होता, बाबल्यान सगळा व्यवस्थित बघून घे म्हणान सांगितलेला त्येच्या बरोब्बर ल़क्षात होता! जावन परत रिपोर्ट देवचो होतो तेका! आणि एक गाडी घेवन कालचोच शिष्य सगळ्यांका घेवन जावक आयलो... "जय श्रीकृष्ण, जय गुरुदेव...चलाव, आज आश्रम पाहूयात.... " आश्रमाचो फेरफटको मारुक सगळे गाडीयेत चढले.

शिष्योत्तम एकामागोमाग एक ठिकाणा दाखवत होतो... आश्रमाचो परिसर सरता सरत नव्ह्तो. कपड्यांची दुकाना म्हणा नये - तेंका बुटीक म्हणूचा अशी माहिती शिष्यान पुरवतच एक काकी दुसर्‍या काकीच्या कानाक लागली, "ह्या काय आणि कपड्यांच्या दुकानाक म्हणतत? माका आपला चिंचेचा बुटुक ठावक!! दुकानाक ही बुटुक म्हणूचा?? ऐकाचा ता नवलच बाये!!" - ट्रॅव्हल एजन्सीची कार्यालय, हाटेल, बॅंक, आयुर्वेदीक औषधाचा दुकान, दागिन्यांचा दुकान.... यादी सरतच नव्हती.... सगळ्या ऐहिक जगाच्या पसार्‍यातून मन काढून घेवन आश्रमात तपश्चर्या करूक खूप पूर्वी ऋषी मुनी जायत, पर्णकुटी बांधून थय रवीत, साधा सुधा आचरण ठेवीत, जाडी भरडी वस्त्रां प्रावरणां नेशीत, ह्या असा आपला गाववाल्यांका लहानपणापासून पुस्तकांतसून वाचून, कीर्तनातून ऐकान ठावक!! ह्या एकविसाव्या शतकातला अध्यात्म भलताच सुधारीत आवृत्तीचा होता!! सगळा ऐहिक जगच आश्रमात येवन ठेपला होता!!

अशीच आश्रमातली बाकीची ठिकाणा बघून, दर खेपेक आश्चर्याचो एकेक जोरदार धक्को खावन आणि पुरतीच चक्रावून मंडळी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाक परतली!!! दुसरे दिवशी उठून परत एकदा मंडळी क्वालिसात बसून आपल्या गावच्या वाटेक लागली, आणि दिस सरता सरता घराक पावली. लग्गेच सुमल्यान बाबलाक बोलावणा धाडल्यान. बाबल येवन ठाकलो.

"काय मग सुमल्या, कशी झाली गो तुझी आश्रम वारी?? बाकी तू खरच पुण्यवान हांऽऽऽ, ध्यानी मनी नसता गेलय का नाय!! काय प्रसाद हाडलस काय?? दे बघया..."

"रे, मेल्या गप रव!! खयचो मेल्यांनो ह्यो स्वामी हाडल्यासात?? ह्येचा लक्षण काय माका बरोबर वाटणा नाय, समाजलय? काकांका विचार....." सुमल्यान त्वांड सोडला!! "मेल्याच्या आश्रमात काय्येक द्येवाचा नाय!! देवाच्या नावाखाली बाकीचाच जास्त दिसता!! समाजलय?? शिरा रे पडो ते आश्रमवाल्यांचे..."

"गो, काय सांगतय काय तू?? म्हणजे काय आणि.....??" बाबलही चक्रावलो!

"रे, मग सांगतय काय मी, आश्रमाची मैलोगणती पसरलेली जागा आसा. खयसून पैशे इले रे त्यासाठी?? जागा काय अशी फुकट येता काय?? ध्यानासाठी येकदम भव्यदिव्य, संगमरवरी इमारत बांधूक आसा!! कित्यां मेल्या?? झाडाखाली बसून ध्यान करुक होणा नाय काय?? तेका काय गादे, गिरदे आणि संगमरवर लागता काय मेल्या?? सगळे पैशेवाले आपापल्या पैशाचा प्रदर्शन करत थय ध्यानाक बसतत!! आश्रमात बिन श्रीमंतांक प्रवेशच नाय आसा!! स्वामीक भेटूक पण पैशे मोजूचे लागतत, नायतर स्वामी भेटणत नाय!! काय समाजलय??"

"बाकी हाटेला, बुटीका, ते विलायती संगीतावरचे नाच... हे सगळे गोष्टी ही आसत!! माझी आवस नेहमी सांगी बापडी, देवाकडे मन लावूचा असात, तर हे ऐहीक गोष्टीं प्रथम बाजूक सारूक व्हये, आणि हय बघतय ता आपला तेचाच प्रदर्शन!! काय समाजलय??? शिरतासा काय डोक्यात तुझ्या प्रकार काय तो?? बरा, बाकी काय नाय ता नाय, येकही देउळ बांधूक नाय आसा खयही मेल्यांनी.. मेले भजना बरी म्हणी होते, पण तेही शिनेमाच्या गाण्यांचे चाली लावन!! आणि त्या तालार बापे अन बायलो एकत्र नाचतत मेले त्या स्वामीच्या नावान!! असाच गावाकडे नाचतले की काय?? शिरा रे पडो मेल्यांनो तुमच्या..!! गावातली पोराटोरां गावचे चेडवांबरोबर अशीच नाचतली काय?? " एकेक करून सुमल्यान बाबलाक वित्तंबातमी दिली! ह्या सगळा आश्रम पुराण ऐकून बाबलाक फेफरा येवचाच बाकी होता!!!

"रे बाबल, बघ, आपण आपली कोकणातली साधीसुधी माणसां. एकमेकांक धरून रवतो आपली... या सोद्यांचो आमका वारो देखील नको!! आपली काय पेज, आमली आसा ती खावन आम्ही आपली सुखात आसव.. रवळनाथाक काळजी आसा, ग्रामपुरुष आसाच बघूक... ह्या आता आणि आश्रमची सोंगा करू नकात, समाजलय? आधीच मेले कोकणाची वाट लावणारे कमी नाय आसत, त्यात आणि ही भर नको..." कधी नाय ता सुमल्याक इतक्या समजूतदारपणान बोलताना बघून बाबलही मनातून जरा हललो....

"जळो मेल्यांचे आश्रम!! आता मी कोणायेक बाबाची, संताची सेवा करुचय नाय!! महादेवाक नेवन चार कळशे ओतीन!! तीच माझी सेवा!! खूप झाला ह्या!!" सुमल्यान बाबलकडे जाहीर करून टाकला. "वरून बघत असतली तर आत्तापर्यंत आवशीक पण कळला असात, की आता कोण्णीयेक संत नाय आसत जगात..." या अनुभवानंतर, सुमल्याचो संतसेवा करुन पुण्य कमवचो बेत कायमचो ठप्प झालो!! पण गावाचा भला क्येला म्हणान रवळनाथान चित्रगुप्ताक सुमल्याच्या खात्यात सात जन्माचा पुण्य जमा करूची ऑर्डर काढली!! कोकणातलोच द्येव तो!! थयच्यां लोकांसारखोच, फणस अगदी. बघलो का दृष्टीक रुपडा उग्र वाटता, पण एकदम मायेस्त... आपल्या लेकरांचो भार सदा व्हाणारो, तेका काय सुमल्याची काऴजी नसात काय??

दुसर्‍या दिवशी गावात बैठक बसली अन बैठकीत या सगळ्या गोष्टींचो उहापोह झालो. सगळ्यांचाच मत आश्रम नको असा पडला. स्वाम्याची डाळ काय गावान शिजूक देवक नाय!! आश्रम बघून आयलेल्यांच्या तोंडून आश्रमातले चित्र विचित्र गजाली ऐकान लोकांचा मनोरंजन फुडे कित्येक दिस होत होता......


समाप्त.

4 comments:

Nandan said...

mast :)

Yashodhara said...

नंदन, गोष्ट जर घाईतच आटोपती घेतली आहे मी. You are just too kind to appreciate it. आटोपती घेतली आहे ते तुला नक्कीच जाणवल असेल. थॅंक्स, शिव्या न घातल्याबद्दल :)

संदीप चित्रे said...

अरे वा.. मालवणी मसाल्याचा ठसका आहे. कुठल्या आश्रमाच्यावारीनंतर हे सुचलं, यशोधरा? मला मेल पाठव :)

Yogi said...

मस्तच लिवतास गो.. असाच लिवत रव.. संवादाश्रमात येवान धन्य झालो बघ.. :D