April 3, 2008

मी का लिहिते?

मी का लिहिते? ह्म्म्म्म... प्रांजळपणे सांगायच तर,माहीत नाही!! आत्तापर्यंत तरी माहीत नव्हतं असं वाटतंय - किंवा कदाचित कुठे तरी आत मनाच्या गाभार्‍यात ते उत्तर जाणवलंही असेल कधीतरी, तरी ते नेणीवेतून जाणीवेत आलेलं नाही - आणि कधी हे उत्तर शोधायचा जाणीवपूर्वक असा कधी प्रयत्नही केला नाही. आता करावा म्हणते...

खर तर संवादिनीने खो दिला, तेह्वा तिचाच लेख वाचला आधी अन एकदम एक दडपणच आलं मनावर!! इतक सुरेख लिहिलंय तिने अन मी काय लिहू आता असं वाटल!! पैठणीला पोतेर्‍याचं ठिगळ लावलं तर कसं वाटेल?? मग, त्यानंतर उत्सुकता स्वस्थ बसू देईना, म्हणून, आतापर्यंत सगळ्यांनी लिहिलेलं वाचलं अन मी खरं सांगायचं तर या खो मधून नाव काढून घ्यायचा विचार केला, मला हे असं इतकं ग्रेट लिहिता येत नाही.... पण, मग म्हटलं, एक प्रयत्न माझाही. कोणालाच नाही आवडलं समजा, तरी निदान आपल्याला तरी समजेल काहीतरी परत एकदा नवीन आपल्याविषयीच कदाचित.....

खर तर मुद्दाम असा कधी विचारच नाही केला यावर. जसा श्वास अत्यावश्यक, तसच लेखनही . वाचनही. कदाचित लिखाणातून स्वत:चा स्वत:शी चालणारा अखंड संवाद मला भावतो? किंवा, मी स्वत:च स्वत:ला उलगडते बहुधा... आत्ता इथे लिहायला बसलेय, का लिहावसं वाटत आणि खर सांगायच तर काय लिहू हा प्रश्नच पडलाय!! श्वास घेताना, मी हा प्रत्येक श्वास का घेतेय हा विचार तरी कुठे केला होता कधी??

माझं शब्दांवर प्रेम आहे, असोशी आहे मला त्यांची. आणि, मनात येणारे विचार, अनुभवलेल्या घटना, क्षण शब्दांत मांडताना समाधान मिळतं. लिहिताना मन शांत शांत होतं जात. बर्‍याचदा, असंही होतं की जे पाहिलं आहे, त्याचा, एखाद्या क्षणी जे लिहिते त्याच्याशी लेखालेखी संबंधही नसतो खर तर, पण कशावरून काहीतरी तिसरंच आठवतं!! मग जे वाटतय ते लिहिल्याशिवाय चैन नसतं जिवाला. मग लिहायचं, काय करणार? नाविलाज को कोई विलाज नहीं!!

हसाल आता, पण एक वेगळी वहीपण आहे माझी. इथे ब्लॉगवर मी मांडू इच्छित नाही किंवा कधीकधी धजावत नाही, ते मी वहीत उतरवते. अगदी आतलं, मनातलं. काही अनुभव आणि क्षण, अनुभूती फक्त स्वत:साठीच असतात ना? तर, फक्त माझी, माझ्यासाठीची अशी ती वही. बरचसं मनातलं असं मी त्या वहीत वेळोवेळी उतरवलय. यापुढेही उतरवणार आहे. जाणवलेलं सुख, अनुभवलेल्या वेदना, काही काही अतिशय वैयक्तिक असे क्षण, अनुभव, आठवणी, स्वत:च्या चुकांची कबुलीही, स्वप्नं... बरंच काही साठलंय त्या वहीत.

लिहिणं, तसं कोणाशी बोलण्यापेक्षा सोपं असतं, कारण, वही माझ्याविषयी कसलेही पूर्वग्रह बाळगत नाही, किंवा नवीन मतं तयार करत नाही. माझिया मनीचे, फक्त ती वही ज़ाणते. माझ्यासारख्या, मनातलं पटकन बोलून न दाखवू शकणारीला लिहिणं लहानपणापासूनच तुलनेनं सोप वाटलय, म्हणून मी लिहिते.

हे लिहिता लिहिता सांगावसं वाटलं म्हणून - शाळेतल्या एक शिक्षिका, मला लिहायला सतत प्रोत्साहन देत, त्यांना खूप आवडायच मी लिहिलेलं, अस त्या मला नेहमीच सांगायच्या. नंतर कॉलेजला गेल्यावर एकदा त्या मला भेटल्या अन मी कला शाखा निवडायच्या ऐवजी इंजिनीअरींगला गेले म्हणून खूप हळहळल्या! तुझं लिखाण थांबवू नकोस मात्र गं पोरी असं कळकळीने दहादा तरी म्हणाल्या, अर्थात त्यात त्यांच्या माझ्यावरच्या मायेचा भागच अधिक होता, पण त्या मायेचं माझ्यावर न संपणारं ऋण आहे, म्हणून मी लिहिते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि इतर कोणाशी नाहीच रहायला जमलं तरी स्वत:शी प्रामाणिक रहायला मी लिहिते. आणि काय सांगू?

संवादिनी, मनापासून आभार तुझे, तू मला खो दिलास म्हणून मला हे इतक्या जणांचं इतकं सुरेख लिखाण वाचायला मिळालं.

मी कोणाला खो देऊ? माझा खो सर्किटला.

10 comments:

a Sane man said...

"श्वास घेताना, मी हा प्रत्येक श्वास का घेतेय हा विचार तरी कुठे केला होता कधी??"... !!!

chhan lihilayas!

Sneha said...

ee mast lihala aahes ga agadi saadh saral.... :)

Meghana Bhuskute said...

"माझं शब्दांवर प्रेम आहे..."
"लिहिणं, तसं कोणाशी बोलण्यापेक्षा सोपं असतं..."
"मन शांत शांत होतं जात..."
अगदी अगदी... मनातलं बोललीस. धन्यवाद खेळात सहभागी झाल्याबद्दल. :)

Anonymous said...

chhan lihilay. :-)

यशोधरा said...

सेन मॅन, स्नेहा, अभिजित धन्यवाद.
मेघना, थँक्स कशासाठी? उलट तुझेच आभार मानायला हवेत!! तेह्वा, आभार :)

Kamini Phadnis Kembhavi said...

पोस्टच हे टायटलच एवढ आकर्षक आहे. मी पण एकदोन ब्लॉगवर वाचलं आणि विचार आला मनात का लिहितो आपण?
आता हे तुझ्यासारखं एवढ्या बारिक-सारिक बारकाव्यांसकट लिहिणं मात्र जमलंच नसतं मला. म्हणून लिहिलंच नाही काही :)

पण बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही
हा खेळ सुरु करणा-याला मन:पूर्वक धन्यवाद :)

Abhi said...

chaan lihilayas!! masta.. kharach sagalyanchya blogs var vachatoy ha kho-kho cha khel.. mast lihitayat sagale.. pan hach prashna mi majha mala vicharato tenvha matra uttar milat nahi.. ki ka lihito mi?? (sadhyatar kharach mi lihitoya ka kahi hach ek motha prashna aahe :))

anyways.. majhya blog var tujhya blog chi link denyas aapali paravanagi aahe ka?

यशोधरा said...

श्यामली, आम्ही इतके शब्द सांडून जे गद्यात मांडलय ते तू किती कमी शब्दांत काव्यात उतरवलयस!! आणि तेही किती अचूक!! धनुष्यातून निघालेला अन लक्ष्यापर्यंत पोचून रुतलेला बाण जणू!! तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार मानत नाही :)

अभि, धन्स :) आणि मला कोणी आतापर्यंत विचारलच नाही की तुझ्या ब्लॉगची लिंक देऊ का वगैरे, आपण हे सत्कर्म करताय?? तर जरुर!! :) आणि लिहित आणि क्लिकत जा अन आपला ब्लॉगही अपडेट करत जा, परत ऍक्सेस घालवायचाय का???? :D

Bhavana wagh said...

Hi yashodhara,
I opened this site today only. To be very frank I am new to handle internet. I am MSc in Physics & married woman. Marathi Sahitya is my weak point. I like to read & write . I read all your articles and liked too. While reading I feel that it's me talking with myself. sorry I wanted to give comment in mayboli marathi but I don't know yet How to open marathi font here?
Help if you can.

नीरजा पटवर्धन said...

माझा गीतकार मित्र म्हणतो.. मी लिहितो कारण लिहिणं ही माझी गरज असते. मी लिहितो कारण लिहिल्याशिवाय मला बरं वाटत नाही.
बस्स अजून काय गं!!
नी