September 11, 2008

गणेश तत्व - परब्रह्मस्वरुप गणेश

परमात्म्याला जाणून घेणे, हेच मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. यस्तन्न वेद किमृचा करिष्यति l असे ऋग्वेदात म्हटले आहे, म्हण़जे जो परमात्म्याला जाणत नाही, तो (फक्त) ऋचा जाणून काय करणार ? वैदिक कालापासून ऋषी मुनींनी सत्याच्या, परमतत्वाच्या रहस्याला जाणून घेण्याचा प्रयास केला आहे.

ऋग्वेदात सांगितले आहे, एकं सत् l - तेच एकमेवाद्वितीय सत्य, तेच अंतिम.

गणपत्यथर्वशीर्षात गणपतीस, एकं सत्, परम तत्त्व, आत्मा मानले आहे - त्वम् साक्षादात्मासि नित्यम् l तोच सर्व जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे, पालनकर्ता आहे. गण हा शब्द समूहवाचक आहे. ह्या समूहाचा पालनकर्ता तो गणपती. आपल्या विशाल उदरात जणू सारे विश्व सामावून घेऊन, धारण करुन तो लंबोदर बनला आहे, पण त्याच वेळी, तो परब्रह्म मात्र कोणातही सामावलेला नाही. सार्‍यांना सामावून घेऊनही तो मात्र निराकार असा सर्वांहून वेगळा असा आहे. ज्ञान आणि निर्वाण पद प्राप्त करुन देऊ शकणारा ईश, म्हणून परब्रह्म. सार्‍या जगाची उत्पत्ती आणि लय त्याच्यातच.

अथर्वशीर्षातही गणक ऋषींनी हे मत मांडलेले आहे,

त्वं वाड्गमयस्त्वं चिन्मयः l त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः l त्वं सच्चिदानंदाद्वितीयोsसि l
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि l त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोsसि ll

तूच वाड्गमय(रुपी) आहेस, तू चिन्मय आहेस -( चित्ते मयः इति चिन्मयः - शब्दशः भाषांतर, जो हृदयात आहे तो, बुद्धीमान् असाही अर्थ ), तू आनंदमय आणि ब्रह्ममय आहेस. तूच सच्चिदानंदरुपी अद्वितीय असा परमात्मा आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. तू ज्ञान आणि विज्ञानमयी आहेस.

गणपतीला साक्षात आत्मा संबोधून, सत्व, रज, आणि तम या गुणांपलिकडे मानलेले आहे. या गुणांनी युक्त अश्या विश्वाची उत्पत्ती, ऱक्षण आणि शेवटी अंतही, गणेशरुपी आत्म्यात होतो (अनेकत्वातून एकत्व). गणेशपुराणातही गणेशामध्येच सारे जग, सार्‍या देवता आणि मनुष्यगण अविर्भूत आहेत हे सांगितले आहे.

योगशास्त्रातही षट्चक्रांच्या भेदन क्रमात प्रथम चक्रात गणेशाला स्थान दिलेले आहे. अथर्वशीर्षातदेखील गणपती मूलाधारचक्रात नित्य वास करुन आहे याचा उल्लेख आहे - त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यं l याच मूलाधारचक्रावर योगी ध्यान करतात.

ज्ञानेश्वरीतही आदिबीज ॐकार असा गणपतीचा ज्ञानेश्वर माऊलींनी उल्लेख केलेला आहे.

अकार चरण युगुल l उकार उदर विशाल ll
मकर महामंडल l मस्तकाकारें ll
हे तिन्हीं एकवटले l तेथे शब्दब्रह्म कळवळले ll
तें मियां गुरुकृपे नमिले l आदिबीज ll

ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला ॐ कार स्वरुप मानून, त्याच्या आत्मस्वरुपाचे (गणेश तत्त्व) ज्ञान केवळ स्वानुभावाने होऊ शकते असे प्रतिपादन केले आहे.

ब्रह्मवैवर्तपुराणात गणपतीच्या परब्रह्मस्वरुपाची (आत्मरुपाची) स्तुती करताना श्रीविष्णूने म्हटले आहे,

ईश त्वां स्तोतुमिच्छामि ब्रह्मज्योति: सनातनम् l
निरुपितुमशक्तेsहमनुरुपमनीहकम् ll
त्वां स्तोतुमक्षमोsनन्त: सहस्त्रवदनेन च l
न क्षमः पंचवक्त्रश्च न क्षमश्चतुराननः ll
सरस्वती न शक्ता च न शक्तोsहं तव स्तुतौ l
न शक्ताश्च चतुर्वेदा: के वा ते वेदवादिनः ll

हे ईश, सनातन ब्रह्म ज्योतीस्वरुप अश्या तुझे स्तवन मी करु इच्छितो, पण तुझ्या रुपाचे यथार्थ वर्णन करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे. शेषही आपल्या सहस्त्र मुखांनी तुझी स्तुती करण्यास असमर्थ आहे. (तुझे आत्मस्वरूप ओळखून) तुझी स्तुती करण्यास पंचमुख महेश्वर, चतुर्मुख ब्रह्मा हे ही असमर्थ आहेत; देवी सरस्वतीचीही (तुझ्या रुपाची) स्तुती करण्याची शक्ती नाही,ना माझी. वेदही तुझ्या रुपाची यथार्थ कल्पना करण्यास समर्थ नाहीत, मग ते म्हणणार्‍यांची/ मानणार्‍यांची काय कथा??

संदर्भ: १. गणेशकोष २. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर ३. विकिपिडिया

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आपण खुप चांगली अभ्यासपुर्वक माहीती आपल्या बॉगवर टाकली आहेत

यशोधरा said...

कृष्णाकाका, खूप धन्यवाद.