September 13, 2008

गणराज रंगी नाचतो

गणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll
नृत्य करता सकल देव l तटस्त होती ll

नृत्य-गणपती हे भारतीय संगीत आणि नृत्य कलेचे प्रतीक जणू. दक्षिण भारतात, नृत्य गणपतीच्या मूर्ती सापडतात. म्हैसूरच्या हळेबिड येथील होयसलेश्वर मंदिरात (बारावे शतक) नृत्य गणपतीची अत्यंत नयनमनोहर अशी अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या सहा हातांमधे परशू, पाश, मोदक्पात्र, दंत, सर्प आणि कमळपुष्प असून, दोन हात, अनुक्रमे, गजहस्त आणि विस्मयहस्त मुद्रेमध्ये आहेत.*

तंजावूरच्या भेडाघाटच्या मंदिरातही श्रीगणेशाच्या कलात्मक प्रतिमा आहेत. मयूरभंज, ओरिसा येथेही नृत्य गजाननाची अत्यंत मनोहारी अशी मूर्ती आहे. भुवनेश्वर येथे मुक्तेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची निर्मीती सन ८०० ते १०६० च्या दरम्यान झालेली आहे. ह्या मंदिरातही नृत्य गणपतीची अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीमध्ये जी नृत्य मुद्रा साकारलेली आहे, त्यात गजाननाने दोन हात वर करुन, त्या दोन्ही हातांमध्ये सर्पास पकडले आहे, चार हातांत मोदक, कुर्‍हाड, तुटलेला दात आणि कमळ धरलेले आहे. राहिलेले दोन हात भग्नावस्थेत आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला सेवक असून डाव्या बाजूचा सेवक झांज तर उजव्या बाजूचा सेवक मृदंग वाजवत आहे.

काशी हिंदू विश्विद्यालयाच्या भारत कला भवनात नृत्य मुद्रेतल्या गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कनोज येथे साधारण आठव्या शतकाच्या आसपास निर्माण केलेली चतुर्भुज अशी नृत्य गणपतीची मूर्ती सापडली असून गजाननाने सर्पयद्नोपवीत (जानवे) धारण केले असून, वाघाची कातडी पांघरलेली आहे. अल्वर येथील संग्रहालयातही तोमरकालीन, गणपतीची नृत्यप्रधान मूर्ती असून तिच्या दोन हातांत सर्प असून, पायांपाशी मूषक आणि गण इत्यादी आहेत. मूर्तीबरोबर जो लेख सापडला आहे, त्यात महालोकस नामक व्यक्तीने विक्रम संवत ११०४ मध्ये (ई. स. १०४४)मध्ये या मूर्तीची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो.

मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरामधून द्विभुज, चतुर्भुज, षड्भुज, अष्टभुज ते षोडशभुज अश्या नृत्यामध्ये मग्न असणार्‍या गणपतीच्या मूर्ती आढळून येतात. लखनौच्या राजसंग्रहालयात, बाराव्या शतकातील गाहवालवंशीय राजांच्या कारकीर्दीत निर्माण झालेली नृत्य गणेशाची मूर्ती त्या काळातल्या मूर्तीकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते.

अश्या ह्या नृत्य निपुण देवतेला मानवंदना म्हणून संगीतज्ञांनी गणेशताल निर्माण केला आहे. तानसेनाच्या संगीत-सार ग्रंथात, तालाध्याय, या अध्यायांतर्गत, ब्रह्मताल, रुद्रताल, विंध्यताल, कंदर्पताल, सिंहताल, जनकताल आणि विष्णूताल या तालांची माहिती आहे, परंतु, गणेशतालाचा उल्लेख आढळत नाही. संगीतज्ञ मानतात, की गणेशतालची निर्मिती संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाच्या नंतर झाली.

ह्या तालाच्या मात्रा २१ व १० भाग आहेत.

भाग : धा ता दिं ता कत तिट धा दिं ता कत
मात्रा: १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

भागः तिट ता धागे दिं ता धागे ता तिट कत गदि गन
मात्रा: ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१


अश्या ह्या नृत्य निपुण देवतेची सेवा म्हणून तानसेनाने ब्रजभाषेत काही धृपद रचना केल्या आहेत, ज्यात श्री गजाननाची स्तुती केलेली आहे.

एकदंत गजबदन बिनायक बिघ्न -बिनासन हैं सुखदाई ll
लंबोदर गजानन जगबंदन सिव-सुत ढुंढिराज सब बरदाई ll
गौरीसुत गनेस मुसक-वाहन फरसा धर शंकर सुवन रिद्ध-सिद्ध नव निद्ध दाई ll
तानसेन तेरी अस्तुत करत काटे कलेस प्रथम बंदन करत द्वंद मिट जाई ll

आणि ही एक, ज्यात तानसेन श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करत आहे,

एकदंत वंत लंबोदर फिरत जाहे बिराजे
गनेस गौरी सुत महा सुनि महिमा सागर
गुरु गन नाथ अविघन राजे l
हेरंब गन दीपक तू ही महातुर,
उग्र तप बट चंद्रमा सों छबिनायक जगत के सिरताजे l
तानसेन को प्रसाद दीजे सकल बुध नव निध के,
सदा दायक लायक जगत के सरे काजे ll

अजून एक गणेश स्तुती,

तुम हो गनपत देव बुधदाता सीस धरे गज सुंड,
जेई जेई ध्यावै तेई तेई पावै चंदन लेप किये भुजदंड
सिद्धेश्वरी नाम तुमारो कहियत जे विद्याधर तीन लोक मध
सप्त दीप नव खंड,
तानसेन तुमको नित सुमिरन सुर-नर-मुनि-गुनि-गंधर्ब-पंडित ll


लंबोदर गजानन गिरिजासुत गनेस एक्-रदन
प्रसन्न बदन अरुन भेस,
नर्-नारी-मुनी-गंधर्ब-किंनर-यक्ष-तुंबर मिली
ब्रह्मा बिष्नु आरत पूजवत महेस l
अष्टसिद्ध नव निद्ध मूषकवाहन बिद्यापति तोहि सुमिरत
तिनको नित सेष,
तानसेन प्रभु तुमही कूँ ध्यावैं अबिघन रुप विनायक रुप
स्वरुप आदेस ll

असा हा सर्व विद्या आणि कलांचा अधिपती असलेला देव. आद्यकवी वाल्मिकी ऋषी गणेशाची स्तुती करताना म्हणतात,

चतु:षष्टीकोटयाख्यविद्याप्रदं त्वां सुराचार्यविद्याप्रदानापदाम् l
कठाभिष्टविद्यापर्कं दंतयुग्मं कविं बुद्धीनाथं कवीनां नमामि ll

अर्थात, हे गणपती, तू चौसष्ठ कोटी विद्या प्रदान करणारा आहेस, एवढेच नाही, तर देवांच्या आचार्यांनाही विद्या प्रदान करणारा आहेस. कठालाही विद्या देणारा तूच आहेस ( कठोपनिषदरुपी विद्येचा दाता) दोन दात असणारा, कवी, असा तू, कवी (बुद्धीमान) जनांच्या बुद्धीचा तू स्वामी, तुला माझे वंदन असो.


संदर्भः १. कल्याण श्रीगणेश विशेषांक, गीताप्रेस, गोरखपूर.
* मुद्रांविषयी माहिती मिळाली नाही. कोणाला माहित असेल जर जरुर लिहा.

5 comments:

HAREKRISHNAJI said...

very very informative post

प्रशांत said...

तुमचा ब्लॉग मस्त आहे. गणेशतत्त्व, गणेशोपासना या विषयांवर तुम्ही प्रकाशित केलेली माहिती विशेष भावली. मुद्गलपुराणातल्या साहित्याबद्दल तुमच्या ब्लॉगवर वाचायला आवडेल. संगीताविषयी जी माहिती दिली आहे, त्याची माहिती कल्याण श्रीगणेश विशेषांकात आहे की आणखीही संदर्भ तुम्ही पाहिलेत? संगीत रत्नाकर, भरतकृत नाट्यशास्त्र, इत्यादि ग्रंथांमध्ये बरीच माहिती आहे, पण ते मूळ ग्रंथ (किंवा अनुवादित आवृत्त्या) वाचण्याचा योग आला नाही. तुम्हाला माहिती असल्यास अवश्य कळवावे. गणेशताल अचूक पद्धतीने खालीलप्रमाणे लिहिता येईल.

१ २ ३ ४ । ५ । ६ ७ ८ ९ । १० ।
धा ता दिं ता । कत । तिट धा दिं ता । कत।
X २ ३ ४

११ । १२ १३ १४ १५। १६ । १७ ।
तिट । ता धागे दिं ता। धागे। ता ।
५ ६ ७ ८

१८ । १९ २० २१
तिट । कत गदि गन
९ १०


यात वरच्या ओळीमध्ये मात्रांचे क्रमांक दिले आहेत. मधल्या ओळीत तालातले बोल व खालच्या ओळीत सम, टाळ्या, काल आदि माहिती आहे. गणेशतालामध्ये काल नाही.
दोन किंवा अधिक बोल एका मात्रेत असतात तेव्हा त्याखाली अर्धचंद्र देण्याची पद्धत आहे पण बरहा सॉफ़्टवेअरमध्ये तशी सोय आहे की नाही हे माहित नसल्यामुळे जोडून लिहिलेले बोल एकामात्रेतले असं समजावं.

संदर्भ:
लेखक - डॉ. नारायण मंगरूळकर
पुस्तकाचे नाव - "संगीतशास्त्र विजयिनी"
आवृत्ती - तिसरी
मुद्रक - मधुकर आर्ट्स, नागपुर

यशोधरा said...

कृष्णा़काका, धन्यवाद.

प्रशांत, खूप धन्यवाद.

तुम्ही म्हणताय तसं लिहायला आवडेल, पण सद्ध्या तरी वेळेअभावी शक्य आहे असं वाटत नाही. तुमचा अभिप्राय आवडला, दिलेली माहिती आवडली. ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहेत, ते मिळतं का पाहीन पुढच्या पुणे भेटीत. मी लेख गणेश कोष आणि विषेशांकावरुनच तयार केला आहे. बाकीचे ग्रंथ पहायला, अभ्यासायला खूप आवडलं असत, पण मला शक्य नव्हतं. :(

>>>दोन किंवा अधिक बोल एका मात्रेत असतात तेव्हा त्याखाली अर्धचंद्र देण्याची पद्धत आहे

हो, ह्या पुस्तकातही तसेच दिले आहे पण इथे लिहिताना तसे लिहायची सोय आहे, असे वाटत नाही.. म्हणून मग दिले नाही.

आशा जोगळेकर said...

खूपच छान माहिती पर लेख । गणपती बद्दल एवढा रीसर्च करून लिहिल्या बद्दल आभार.

यशोधरा said...

आशाताई, कौतुकाच्या शब्दांबद्दल खूप आभार. :)