May 16, 2009

मी, कॅमेरा आणि माझा बाबा

अगदी लहानपणापासून, फोटोग्राफी म्हणजे काय हे कळत नसतानाही घरातला आजोबांचा कॅमेरा खूप आवडायचा. कालांतराने तो न वापरण्याने म्हणा, किंवा काय माहिती का ते, पण जवळ जवळ निकामी झाला. आताही तो आहे माझ्याकडे, असाच ठेवलाय जपून, केवळ आवडायचा म्हणून आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून.

कॅमेराबद्दलची दुसरी आठवण आहे, ती, मी शाळेत होते, आणि कॅमेराचं वेड होतंच, आणि स्वप्नंही पहायची ती कधीतरी मी इतका मस्त कॅमेरा घेईन ना.. ह्याचीच.. आणि एका वाढदिवसाला मला माझ्या बाबाने कॅमेरा आणून दिला! मी अवाक् झाले होते! कॅमेरा आवडत असला म्हणून काय झालं? तो हाताळण्याची काहीच अक्कल नव्हती, किंवा, आजूबाजूला कोणी फारसं कॅमेराबद्दल शिकवणारं, असंही नव्हतं. मीच काय, माझ्या शाळामैत्रिणीही अवाक् झाल्या होत्या आणि मी उगाच (आणि अर्थात) खूप भाव खाल्ल्याचं आठवतं! :) अगदी उच्च आणि अति उच्च मध्यमवर्गीय घरातल्या मुलींनाही अशी वाढदिवसाची भेट मिळाली नव्हती. तेह्वा तर बाबा ग्रेट वाटलाच, पण आता विचार करताना बाबाचा इतका अभिमान वाटतो! हॅट्स ऑफ रे तुला!

मनाने साधा मोकळा पण तत्वं आणि मूल्यांना पक्का असा माझा बाबा. बर्‍याचदा त्या मूल्यांची किंम्मत चुकवण्यासाठी, खूप खडतर प्रसंग त्याने पाहिले. त्या अनुषंगाने व्यावहारिक आयुष्यात येणारे सारे मानसिक, काही प्रमाणात आर्थिक त्रासही भोगले. असं असतानाही, त्या काळी, आपल्या लेकीसाठी, तो कॅमेरा आणण्यासाठी त्याने स्वत:च्या किती गरजा तेह्वा कमी केल्या असतील, हा विचार जेह्वा कधी माझ्या मनात येतो, तेह्वा तेह्वा माझ्या घशात अडकल्यासारखं झाल्याशिवाय रहात नाही. सद्ध्याचा कॅमेरा घेतला, तेह्वा त्यालाच पहिला फोन केला, आणि सांगितलं, कॅमेरा घेतला! त्याच्याइतकं माझं कॅमेरावेड कोणाला माहित असणार आहे! आज जुन्या बंगलोरात जाऊन नायकॉन वापरुन फोटो काढताना, मला सारखं हेच डोक्यात येत होतं आणि बाबा आठवत राहिला सारखा.

तसं पाहिलं तर माझा बाबा काही बोलघेवडा नाहीये. मी आणि बाबा सतत गप्पा मारत बसलो, असं कधी आठवत नाही. त्याच बरोबर, त्याच्याशी गप्पा मारायला कोणत्याही विषयाची बंदी नव्हती - नाही, हेही खरच. जेह्वा कधी बोललो वा बोलतो, खूप भरभरुन बोललो. कोणताही प्रश्न आजवर त्याने टाळलेला नाही, तू लहान आहेस, तुला काय समजतय, म्हणून आधीही डावलला गेला नाही, किंवा आताही नाही. अगदी कोणत्याही विषयाबद्दलच्या मताची खिल्ली उडवली गेली नाही. एखादं मत पटणारं नसेल, किंवा माझं काही चुकत असेल तरीही चर्चेतून समजावणार. तेह्वाही, आताही.

हे सारं खूप महत्वाचं असत, आत्मविश्वास वाढवणारं ठरत. माणूस म्हणून कसं जगावं हे मी माझ्या घरातली माणसं पाहून शिकलेय नेहमी.

मी पहिलीत असताना, शाळेच्या वार्षि़क स्नेहसंमेलनात माझा जिप्सी नाच बघायला आलेला आणि बसायला जागा नसली तरी उभ्याने सगळा कार्यक्रम पाहणारा बाबा आठवतो अजून. माझ्या लहानपणी तासतासभर माझ्या केसांना तेल लावून देणारा बाबा, शाळेत असताना जेह्वा शाळेतर्फे खेळांमध्ये भाग घेत असे, तेह्वा आवर्जून खेळ बघायला येणारा बाबा, एकदा त्याच्याबरोबर जात असताना, रस्त्यावरच्या मवाल्याने धक्का द्यायचा प्रयत्न केलेला पाहून भर रस्त्यात त्याची गचांडी पकडणारा बाबा. बर्‍याच व्यवधानांमधून जेह्वा मी मास्टर्स पहिल्या वर्गात पूर्ण केलं, तेह्वा मनापासून सुखावलेला बाबा. त्याचा आजही धाक आहे अन् तो माझा मित्रही आहे. मी त्याच्याशी काहीही बोलू शकते. अगदी काहीही. त्याची मला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्याने मला स्वतंत्र विचार करायला शिकवलं आहे. असो.

नंतरही पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर एक कॅमेरा मिळाला, परदेशी प्रवास केले तेह्वा फिल्मवाले कॅमेरा घेतले, बाजारात नवीन, नवीन जेह्वा डिजीटल कॅमेरा आला, तोही घेतला... आणि आता हा नायकॉन डी ६०. कधी तरी आता अधिक जास्त क्षमतेची लेन्स किट वगैरे घेईन, आणि बाबाला उत्साहाने फोन करेन.. बाबा, मी आज लेन्स घेतली.. फोनमधून तो अतिशय संयत अशी प्रतिक्रिया देईल, "छान हं.." पण त्याच्या मनातून ओसंडणारं समाधान माझ्यापर्यंत आपसूक पोहोचलेलं असेल, आणि माझा उत्साह त्याला तिथे समजला असेल. बाबाला सगळं समजतं, बर्‍याचदा न सांगताही कळतं.

माय बाबा स्ट्राँगेस्ट!

9 comments:

अनिकेत said...

निकॉन D६० बद्दल अभिनंदन. खुपच भन्नाट कॅमेरा आहे तो. माझा ही चंदा गोळा करण चालु आहे, पैसे जमले की घेइनच लवकर, तो पर्यंत जय 'कॅनन S2IS'

यशोधरा said...

Good luck Aniket! :)

Mahendra Kulkarni said...

माझं कॅमेरा वेड बघुन सौ. तर मला मेंटल हॉस्पिटललाच नेउन आणायचं म्हणते. माझा १ला कॅमेरा होता याशिका फ़िक्स्ड फोकस, नंतर याशिका इलेक्ट्र ३५, नंतर याशिका एस एल आर. ३५-७० एम एम , एक्स्ट्रा वाइड ऍंगल २२ एम एम सहित, नंतर सोनी डिजिटल २ मेगापिक्सल, सध्या सोनी फिक्स्ड डिजि डब्लु ५, आता डिजिटल एस एल आर घ्यायचा म्हणतोय, पण सौ, ने माहेरी जाते म्हणुन धमकी दिली म्हणुन राहिलाय. म्हणते, नुसते कॅमेरे घ्यायचे अन गाड्याच ( माझं कार वेड पण असंच! :) ) उडवायच्या आहेत कां? दोन मुलिंची शिक्षणं अन लग्न करायची आहेत की नाही? :)
एनी वे अभिनंदन.. माझा विक पॉइंट असलेला पोस्ट केलात , म्हणुन इतकी मोठी प्रतिक्रिया.. अभिनंदन..

कोहम said...

khup chaan post. camera to bahana sirf bahana hai. my baba strongest he jasta mahatvacha. that is well communicated..good work

यशोधरा said...

कुलकर्णीसाहेब, सह्ही! किती हे कॅमेराज तुमच्याकडे! :) मस्तच हां :)

कोहम, थ्यांक्यू :) हो, माझ्या बाबासारखा बाबा आधी झालेला नाही, आत्ताही इतर कोणाकडे नाही, आणि पुढेही होणार नाही! :)

सखी said...

माझ्या बाबासारखा बाबा आधी झालेला नाही, आत्ताही इतर कोणाकडे नाही, आणि पुढेही होणार नाही! :).......... :) :) यापुढे जेवढ्या स्माईली add करता येतील तेवढ्या कर. :)
मनाच्या खूप जवळ जाणारं लिहिलंयस यशोधरा,उत्तम!!!

Abhi said...

मस्त पोस्ट!!

"बाबा" हा विषय माझ्यासाठी पण तितकाच प्रिय आहे. :) [आणि स्वतः बाबा झाल्यापासून तर अगदीच :)]

यशोधरा said...

सखी :)
अभि, थॅंक्स रे!

Unknown said...

yashobay goad lihlas ! :)
maza baba strongest !! patla.. :)